Skip to main content

एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी (शाळेची डायरी) : ३

लेखक मितान यांनी रविवार, 08/04/2012 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
(या लेखात आणि यापुढेही ज्या केसेस् लिहीत आहे त्यातली नावे बदलली आहेत. त्यांच्या खाजगीपणाचा पूर्ण आदर राखण्यासाठी आवश्यक ते संदर्भही बदललेले आहेत. समस्या सारख्या किंवा अनुभवाच्या वाटल्या तरी त्यावरील उपाय मात्र व्यक्ती, वय, समाजिक, सांस्कृतिक स्तर, परिस्थिती यानुसार वेगवेगळे असू शकतात.) विभागाची रचना छान झाली आहे. शाळेच्याच एका इमारतीतला एक कोपरा मिळालाय.स्वतंत्र समूपदेशन कक्ष ! एक टेबल, तीन खुर्च्या, एक बंद कपाट आणि अशीच अडगळीला आणून टाकलेले दोन डेस्कटॉप्स !! ( बंद तर बंद ! आमच्या हापिसात संगणक बघून बघणारे इंप्रेस होणारच की हो ! ;) ) इंटर्नी म्हणून काम करत होते तेव्हाचे दिवस आठवले.इन्स्टिट्यूटकडून पत्र घ्यायचं.कोणत्याही शाळेत जायचं, त्यांना काम करू देण्याची ( अर्थात फुकट ! ) विनंती करायची. मग ते विनंतीला मान देऊन काम तुम्हीच शोधा म्हणणार. मग काम ( व्यक्तिगत समस्या किंवा गटसत्र ) ठरले की जागेचा प्रश्न यायचा. मग कधी रसायनशास्त्राची प्रयोगशाळा, कधी चित्रकला वर्ग कधी स्टाफरूमचा कोपरा कधी एखादा रिकामा वर्ग, कधी मैदानावरच्या झाडाखाली तर कधी व्हरांड्यात सत्र घ्यायचो आम्ही सगळे. अर्थात गटसत्र घेताना फार अडचण यायची नाही पण व्यक्तिगत सत्राला मात्र स्वतःची नि सल्लार्थीची एकाग्रता अक्षरशः दोरखंडांनी बांधून ठेवावी लागायची. त्यामानाने आता एवढ्या सुविधा म्हणजे अहाहा ! माझ्यासोबत अजून दोन समूपदेशक आहेत. टीम म्हणून काम करताना मजा येतेय. पाच वर्षात किती बदलल्यात गोष्टी ! पूर्वी आणि आता असे दोन रकानेच करायला हवेत असं वाटतंय. पूर्वी पालक आमच्याकडे यायला तयारच नसायचे. मानसतज्ञ म्हणजे वेड्यांबरोबर काम करणारे ही धारणा खूप खोलवर रुजलेली आहे. तिची तीव्रता आता खूप कमी जाणवते. पालक स्वतः मुलांच्या अडचणी घेऊन येतात. ६वर्षांपूर्वी हाताळलेली एक केस आठवली - एक आई आपल्या ८ वर्षाच्या मुलाला घेऊन आली. कॅम्पातल्या एका चांगल्या शाळेत शिकणारा अवि अभ्यासात मागे पडत होता. एकाग्रता कमी आहे. आळस आहे अशा तक्रारी पालक सांगत होते. अवि मजेत असल्यासारखा खोलीतली चित्र बघत होता. नजर भिरभिरत होती. हाताच्या अस्वस्थ हालचाली चालू होत्या. आई अखंड तक्रारी सांगत होती. थोड्या वेळाने मी अविशी एकट्याशी बोलले. शहाण्या मुलासारखी पूर्ण वाक्यात उत्तरे देत होता. अर्धा तास गप्पा झाल्यावरही मला नेमकी समस्या कळली नाही. नवशिकी असल्याने थोडी खट्टू झाले. आपण आता काउन्सेलर, मग समोरच्या व्यक्तीचं मन आपल्याला लगेच कळलं पाहिजे असं वाटायचं तेव्हा. खरं तर समोरच्या व्यक्तिला विश्वास वाटणं, सुरक्षित वाटणं यासाठी लागणारा वेळ द्यावाच लागतो. तो काहीजणांसाठी एक सत्र म्हणजे ४५ मिनिटांचा असतो तर काही लोक ३-४ सत्र तुमचीच परीक्षा घेत असतात. मग मन मोकळं करतात. मुलं तर या बाबतीत जास्त चिकित्सक असतात. त्यांना तुमच्याबद्दल कशामुळे विश्वास वाटेल याचे लॉजिक तुम्ही कधीच मांडू शकत नाही... तर अवि. अविला मी दोन दिवसांनी पुन्हा बोलवले. अखेर त्याच्या परीक्षेत मी पास झाले नि तो घडाघडा बोलायला लागला. त्यातून समजलेली माहिती धक्कादायक ( तेव्हातरी ! ) होती. त्याच्या आईबाबांचे आंतरजातीय लग्न होते. त्यामुळे सगळे नातेवाईक तुटलेले. स्वता:ला सिद्ध करण्याच्या नादात वडील पैशाच्या मागे लागलेले. आई कमी शिकलेली म्हणून आर्थिक रित्या नवर्‍यावर विसंबून. एकामागे एक झालेली ही दोन मुलं. मुलांना बाबा आठवड्यातून एखादेवेळी भेटायचे.महागडी खेळणी, बाहेर खाणं असे लाड (?) करायचे. घरात भरपूर पैसा खेळत होता. पण हळूहळू व्यसनंही खेळू लागली. भांडणं वाढली. मारहाण सुरू झाली. त्याचा राग मुलांवर काढला जाऊ लागला. अवीला त्याच्या धाकट्या बहिणीबद्दल खूप माया. आई तिला मारायला लागली की हा आईला मारायला लागला. हिशोब चुकता करण्याच्या नादात बाबा अवीचं समर्थन करू लागले. मग काय.. मुलांना २-२ तास बाथरूम मध्ये कोंडणं, स्वयंपाक न करणं, बाबांनी घरीच न येणं, आले तरी बायकोला मारहाण करणं सुरू झालं. या सगळ्याचा परिणाम म्हणून अविला घरात प्रचंड असुरक्षित वाटू लागले. बाबा मारतात ते बरोबर असेल तर मी मारतो ते चूक का ? असा प्रश्न त्याला पडला. मार खाऊन अवि एवढा कोडगा बनला की शाळेतल्या शिक्षांचे त्याला काहीच वाटेनासे झाले. मग एक दिवस अवि दिवसभर आणि अर्धी रात्र होईपर्यंत घरी आलाच नाही. मग जाग येऊन आई त्याला आमच्याकडे घेऊन आली. या केस मध्ये पहिल्यांदा त्याला होणार्‍या शारीरिक शिक्षा बंद करण्याची गरज होती. मग आईवडिलांच्या नात्यातल्या समस्यांचा मुलांवर होणारा परिणाम त्यांना सकारण पटवून देणे. त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे. अविच्या मनातली असुरक्षितता कमी करण्यासाठी पूर्ण कुटुंबाने काम करणे, त्यासाठी वेळ देणे, आई-अवि, बाबा-अवि, आई-बाबा-अवि, आणि चौघे एकत्र करण्याच्या काही गोष्टींची एक यादी तयार केली.तो त्यांचा गृहपाठ होता.शिवाय त्याच्या शाळेत देण्यासाठी एक रिपोर्ट, शिक्षकांकडून हवी असणारी मदत असा एक पेपर तयार केला. प्रत्यक्षात वेगळंच झालं. बाबा मला भेटायला यायलाच तयार नाहीत असे अवि म्हणाला. आईची वाटेल ते करण्याची तयारी असली तरी एकटीने काम करून होणार नव्हतेच. मला खूप असहाय वाटले. समस्या काय आहे ते नेमकेपणाने समजले होते. उपाय स्पष्ट होते. पण बाबा ते स्वीकारायला आणि त्यात मदत करायला तयार नव्हते. शेवटी बाबांचा असहकार ध्यानात घेऊन जमतील त्या गोष्टी करूया असे अविच्या आईने ठरवले आणि त्या डोळे पुसत गेल्या ! इथे एक धडा शिकले. आपल्या कामाला मर्यादा आहेत. त्या स्वीकारायच्या. त्यामानाने आता विभागात येणारे पालक बरेच सहकार्य करतात. चुका असतिल तर सुधरवण्याचा प्रयत्न करतात. अगदी शहराच्या वेगवेगळ्या भागातल्या शाळांमधून आता केसेस यायला लागल्या आहेत. हा बदल खरंच आशादायक आहे. काही वेळा मात्र गंमत वाटते. मुलांच्या अती काळजीपोटी येणारे पालकही बरेच असतात. ४ वर्षाच्या मुलाला अंथरुणात शू होणं हा एका आईला फार गंभीर प्रकार वाटला होता. मुलगा एका जागी बसून अभ्यास करत नाही ही तक्रार ८०% पालक करतात. मुलगी ऐकत नाही, वाद घालते, डबा खात नाही, मुलगा सतत टीव्ही बघतो, घरी सगळे येते पण परीक्षेत लिहिता येत नाही, खोटं बोलतो, अमुक एक विषयात गतीच नाही, खूप हुशार आहे पण मार्क्स पडत नाहीत अशा तक्रारी घेऊन पालक येतात.यात खरी समस्या असणारी मुलं फारतर ५ % असतात. आधी मनात हसू यायचं. पण अनुभवाने ( प्रत्यक्ष आई म्हणून सुद्धा ) कळलं. समस्या कितीही छोटी असली तरी ती खूप प्रामाणिक असते. मी त्या प्रामाणिकपणाचा आदर करायला शिकले. त्या किरकोळ वाटणार्‍या समस्येचे निराकरण लवकर झाले नाही तर पालक म्हणून ताण वाढत जातो. खरं म्हणजे प्रत्येक शाळेने पालकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजेत. त्यात मुलांच्या वाढीचे टप्पे, त्या त्या टप्प्यावर होणारे शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक-भावनिक बदल, कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या अपेक्षा कराव्या, मुलांच्या पाल्कांकडून काय अपेक्षा असतात या विषयांची माहिती दिली पाहिजे. ही माहिती असलेले पालक खूप कमी असतात कारण आपल्याला हे माहीत असायला हवं हेच त्यांना माहीत नसतं. आणि अजून एक म्हणजे माहिती नसणं हा गुन्हा नाही हे पण मान्य करावं. मग पटकन मदत मागता येते. बदलता येतं. सहकार्‍यांसोबत होणार्‍या चर्चेत असे विषय अनेकदा येतात तेव्हा पालक प्रशिक्षण हा शालेय व्यवस्थेचा भाग झाला पाहिजे ही निकड जाणवते. अशा केसेस मध्ये पालकांना माहिती देणं, त्यांच्या शंकांना उत्तरं देणं एवढं केलं की कोडं सुटतं. प्रत्येक केस काही सहा सहा महिने चालत नाही. अगदी किरकोळ गोष्ट न कळल्यामुळे मोठी समस्या उभी राहते. एक उदा: सांगते. शिशुवर्गात असणारी नीतू सुरुवातीला खूप आनंदात शाळेत जायची. अचानक एक दिवस शाळेत जायचं नाही म्हणून रडायला लागली. असे आठ दिवस झाले, एक महिना झाला तरी रडणे चालूच. शाळा म्हटलं की खूप गप्पा मारणार पण प्रत्यक्ष जायची वेळ आली की भ्यां..... आई हवालदिल ! बाबा परदेशात. आई समोर बसून रडायलाच लागली !!! प्रत्यक्ष नितूशी बोलताना लक्षात आले की तिचा डबा रोज एक मुलगा खायचा ! आणि ३० मुलांच्या गोंधळात ताईंच्या हे लक्षात आले नव्हते. त्या मुलाला नीतूच्या डब्यावर असलेले चित्र फार आवडायचे म्हणून तो डबा घ्यायचा. स्वतःचा डबा तिला द्यायचा ! पण त्याचा स्टीलचा डबा हिला अज्जिबात आवडायचा नाही !!!! हे समजल्यावर आई, वर्गताई आणि मी कपाळाला हातच लावला ! आता तो मुलगाही रंगीत डबा आणतो. आणि सगळी मुलं आपापला डबा खातायत ना हे नवशिक्या वर्गताई न चुकता तपासतात.... :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8762
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

प्रत्येक मुलाची आणि प्रत्येक घराची 'केस' आणि गोष्ट वेगळी असते. हे सगळ्यांना समजेल तो सुदिन! तोपर्यंत तुला असंच काम करावं लागणार! लेख मस्तच! पुढच्या भागाची वाट बघायची अर्थातच तयारी आहे!

उत्तम, मुलांची मानसिकता ही मान सिक होण्यामध्ये कधी बदलेल सांगता येत नाही. अवांतर - पुढच्या महिन्यापासुन एक उपक्रम (उपद्याप ) हाती घेतो आहे, तुझी मदत लागेल.

लेख आवडला. छान मांडले आहेत अनुभव. डायरी वाचायला आवडते आहे. पु.ले.शु.

तर काही लोक ३-४ सत्र तुमचीच परीक्षा घेत असतात. मग मन मोकळं करतात. मुलं तर या बाबतीत जास्त चिकित्सक असतात. त्यांना तुमच्याबद्दल कशामुळे विश्वास वाटेल याचे लॉजिक तुम्ही कधीच मांडू शकत नाही...
हा हा हा... :)

>>>आपल्या कामाला मर्यादा आहेत. त्या स्वीकारायच्या. खूप सहजतेने खूप महत्वाचे सांगीतले आहेस.. एकदा हा विचार मान्य केला की पुढचा प्रवास थोडातरी सोपा वाटत असेल. बर्‍याचदा आपण स्वतः परिस्थीती मान्य न करता बंद दार ठोठावत राहतो. हाती शून्य असते; शून्यच राहते आणि वाढत जाते ते हतबलतेचे दु:ख. पुढच्या भागाची वाट पाहत आहे.

वाचतोच आहे... काही ऐकलेले, काही अनुभवलेले. कृपया, पुढील भाग लवकर लवकर टाकावे ही विनंती. अन्यथा नियमानुसार कारवाई करणेत येईल.

अन हे वाक्य विशेष आवडलं, "आपल्या कामाला मर्यादा आहेत. त्या स्वीकारायच्या."

In reply to by वपाडाव

अवांतर वाटेल पण या वाक्याला समर्पक असा एक किस्सा... डॉ. वर्गीस कुरीयन ज्यावेळी ऐन भरात होते, (अमूल, धारा, दिल्लीतल्या दूध बाजाराची घडी बसवणे वगैरे..) त्यावेळी त्यांना भेटायला मीठागरातील कामगारांचे काम जवळून 'बघणारा' कार्यकर्ता आला. मीठागरात काम करणे खूप अवघड असते. उष्ण दमट हवेत, चिकट, ओलसर अशा उग्र वासाच्या मीठासोबत दिवसभर काम करणे खरोखरी कष्टाचे काम - बर्‍याच बेसीक गोष्टीं उपलब्ध नसलेले अत्यंत हलाखीचे जीवन. त्या कार्यकर्त्याने सगळी परिस्थीती सांगीतली. संपूर्ण आयुष्य पायांचा मीठाशी संपर्क आल्याने या मजुरांचे पाय जिवंतपणीच सडायला चालू होतात, हालचालींवर मर्यादा येतात.. जखमा बर्‍या न होणे, गँगरीन वगैरे खूप कॉमन गोष्टी. सगळ्यात वाईट बाब म्हणजे, मृत्यूनंतर चितेमध्ये तेच मीठ यांच्या पायांना इतर शरीराप्रमाणे संपूर्णपणे संपवत नाही.. [संपूर्ण शरीरातील फक्त पाय जळत नाहीत.. विचार करूनही अंगावर शहारे येतात.. :-( ] हे सगळे ऐकता ऐकता अचानकपणे डॉ. कुरीयननी त्या कार्यकर्त्याला बोलायचे थांबवले आणि कोणतीही मदत करू शकत नसल्याचे सांगीतले... त्यांचाही हाच मुद्दा होता.. "मी सगळ्यांचे सगळे प्रश्न सोडवू शकत नाही" असे काही वाचले / वाचलेले अचानकपणे आठवले की खूप त्रास होतो. :-(

In reply to by मोदक

मोदका, हे असलं काहीतरी जळजळीत लिहून 'सहमत आहे' असं लिहवून घेऊ नको :( खूप वाईट तरीही उद्बोधक किस्सा !

मस्त लेख! पुढचा भाग लवकर येऊ दे!

आम्ही पण तुमच्या बरोबर शाळेत आलो आहोत असं वाटायला लागलंय! चर्च मधलं 'कन्फेशन बॉक्स' सगळीकडं असायला हवं नै???

अवघड पण खूप समाधान देणारे काम करता आहात .. तुमच्या कामाला अन लिहिण्याला शुभेच्छा !

लहान मुलांचे पालक हाताळने फार अवघड असते. बरेचदा पालकांच्यातच बदल व्हायला हवा असतो मात्र बहुतेक पालक स्वत:ला सर्वज्ञ समजत असतात. मुलाना चार धपाटे घातले की सुधारतील यावर त्यांचा फारच विश्वास असतो मानसतज्ञ वगैरे उगाच थोतांड आहे असे त्यांचे पक्के मत असते

खुप छान. उपयुक्त व मार्गदर्शक लेख. आभार

वाचतोय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

त्याच्या आईबाबांचे आंतरजातीय लग्न होते. त्यामुळे सगळे नातेवाईक तुटलेले. स्वता:ला सिद्ध करण्याच्या नादात वडील पैशाच्या मागे लागलेले. आई कमी शिकलेली म्हणून आर्थिक रित्या नवर्‍यावर विसंबून. एकामागे एक झालेली ही दोन मुलं. मुलांना बाबा आठवड्यातून एखादेवेळी भेटायचे.महागडी खेळणी, बाहेर खाणं असे लाड (?) करायचे. घरात भरपूर पैसा खेळत होता. पण हळूहळू व्यसनंही खेळू लागली. भांडणं वाढली. मारहाण सुरू झाली. त्याचा राग मुलांवर काढला जाऊ लागला. अवीला त्याच्या धाकट्या बहिणीबद्दल खूप माया. आई तिला मारायला लागली की हा आईला मारायला लागला. हिशोब चुकता करण्याच्या नादात बाबा अवीचं समर्थन करू लागले. मग काय.. मुलांना २-२ तास बाथरूम मध्ये कोंडणं, स्वयंपाक न करणं, बाबांनी घरीच न येणं, आले तरी बायकोला मारहाण करणं सुरू झालं. या सगळ्याचा परिणाम म्हणून अविला घरात प्रचंड असुरक्षित वाटू लागले. बाबा मारतात ते बरोबर असेल तर मी मारतो ते चूक का ? असा प्रश्न त्याला पडला.
हे सगळं घरात घडत असुन आई वडिलांना तुमच्या कडे यावा लागलं "समस्या काय?" ते शोधायला....??? कमाल आहे... अशा वातावरणात मुलं नोर्मल राहतील्च कशी? तुमचं काम फार वेगळं आणि मस्त आहे!!!!

मितानताई, खूप छान लिहिताय. पहिल्या भागापासून वाचतेय आणि पुढच्या अनेक अनुभवांच्या प्रतिक्षेत आहे. तुमचं काम खूप वेगळं तसंच प्रत्येक केसकरता निराळं असं आहे. त्यात सोबतीला 'आपल्या कामाला मर्यादा आहेत. त्या स्वीकारायच्या' हे ही आहेच. या सकारात्मक कार्याकरता शुभेच्छा!
समस्या कितीही छोटी असली तरी ती खूप प्रामाणिक असते. मी त्या प्रामाणिकपणाचा आदर करायला शिकले.
ही तुमची विचारसरणी आवडली. त्रयस्थाच्या समस्या आपल्याला छोट्या-फालतू वाटत असल्या तरी त्या प्रामाणिक असतात हेसुद्धा कित्येक लोकांना समजत नसतं.

मस्त आहे. विचार प्रवर्तक लेखन आहे. फारच छान.