काहूनची लढाई - मराठ्यांनी लढलेली......भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Jun 2011 - 5:47 pm

सुभेदार जाधव हे कॅ. ब्राउन यांचे अत्यंत विश्वासू आणि लाडके अधिकारी होते. मुख्य म्हणजे त्यांनी अनेक लढाया एकत्र लढल्या होत्या. हा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला. बलुची टोळ्यांचे खबरेही काहूनमधे घिरट्या घालत होतेच. अशा खबर्‍यांना पकडून ब्राऊनने आदेश दिला की टोळ्यांच्या पहिल्या हल्ल्याबरोबर यांनाही गोळ्या घाला. ते कामही तत्परतेने उरकण्यात आले. आता कॅ. ब्राऊनकडे फक्त १४० सैनिक आणि एक तोफ उरली होती. या एवढ्या सामग्रीवर एवढामोठा किल्ला लढवणे अवघड होते. किल्ल्याखाली टपाल घेऊन जाण्यासाठी १५० रुपये (त्या काळात) देऊन सुध्दा कोणी गावकरी जाण्यास तयार होईना. तशातच टोळ्यांचे धाडस आता फारच वाढले होते. ५०-६० टोळीवाले घोड्यावर, नंग्या तलवारी फिरवत, आरडाओरडा करत किल्याभोवती चकरा मारत.

२१ तारखेला निरोप आला की ले. क्लार्कही मारला गेला. ले. वरडॉनने कळवले होते की ले. क्लार्क आणि त्याची तुकडी ते उंट घेऊन डोंगर उतरले तोच त्यांच्यावर बलुची टोळ्यांनी हल्ला केला. हे ठिकाण काहून पासून साधारणत: २० मैल असावे. ले. क्लार्कने तीस जवानांना सोबत घेऊन या टोळीवाल्यांशी दोन तास झुंज दिली. शेवटी दारूगोळा संपल्यावर मात्र त्यांचा नाईलाज झाला. वेढले गेल्यामुळे त्या सर्वांची कत्तल झाली. स्वत: ले. क्लार्क याने मरता मरता दोन बलुची यमसदनास पाठवले आणि एकाला खाली पाडून त्याला मारणार तेवढ्यात वरून येणार्‍या गोळीने त्याचा वेध घेतला. जे घोडेस्वार होते त्यांनी पुलाजीला पळ काढला पण पायदळातील सैनिकांचा मात्र सफाया झाला. सर्व ७०० उंट, तंबू बंदूका इ. साहित्य शत्रूच्या हातात पडले. ले. क्लार्क हाही अत्यंत शूर आणि सैनिकांचा अत्यंत लाडका असा अधिकारी होता. सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून तो लढत असे आणि तेवढ्याच हालपेष्टांना हसत सामोरे जात असे. जखमी झाल्यावर सुद्धा त्याने कधी रणांगण सोडले नाही. त्याचे शत्रू मुरीजमातही त्याचे गुण गात असे व आदराने त्याला बडा बहादूर साहेब म्हणत. (लढाई संपल्यानंतर काही काळाने कॅ. ब्राउनने त्याच रस्त्यावर 'सर्तोफ' नावाच्या गावापाशी या शूराला आणि सुभेदार जाधव आणि त्याच्या ५ हवालदार, १ जमादार व १३९ जवानांना मूठमाती देण्याचे मोठे काम केले.) हे एवढे झाल्यावरही ब्रिगेडियर स्टिव्हनसन यांना निरोप पाठवण्यात आला की चार महिन्याची रसद असल्यामुळे चार महिने हा किल्ला लढवण्यात येईल.
२४ तारखेला आता कुठ्लीही नवीन रसद येणार नाही याची खात्री पटल्यामुळे सर्व रसद मोजण्यात आली. त्या दिवसापासून सगळ्यांचा शिधा अर्ध्यावर आणण्यात आला. उरलेल्या सैनिकांच्या चार तुकड्या करण्यात आल्या आणि तटबंदीच्या डागडुजीचे काम अधिक जोमाने करण्यात आले तसेच एकाआड एकाला रात्रीच्या पहार्‍याची कामगिरी देण्यात आली. तसेच तटबंदीच्या भोवतालची २०० यार्ड पर्यंतची जागाही साफ करण्यात आली. सगळी झाडी, झुडपे कापण्यात आली. याच दिवशी ले. लॉक यांचा निरोप आला की ते स्वत: २०० सैनिकांना घेऊन काहूनची खबर घ्यायला येत आहेत. ते निघायच्या अगोदरच, परतपावली त्यांना असे वेडे साहस करू नका असे सांगण्यात आले कारण आता मधली खिंड बलुची टोळ्यांच्या ताब्यात होती आणि त्यामुळे घोडदळाला ती पार करणे अशक्यच होते. बलुची टोळ्यांच्या घिरट्या चालूच होत्या. त्यातले काही अती शूर बंदुकींच्या टप्प्यात आले की मराठे त्याना टिपत होते.

पुढचे तीन दिवस भिंतींच्या कडेने, पण आतल्या बाजूला खंदक खोदण्यात आले आणि त्यात अणकुचीदार खिळे, काठ्या घट्ट रोवण्यात आल्या. तसेच भिंतींजवळची सर्व घरे पाडण्यात आली जेणेकरून शत्रूला कमीतकमी २५ फुटावरून उडी मारावी लागेल आणि त्या अणकुचीदार वस्तूंनी ते जखमी होऊन पडतील.

४ जूनला नवीन विहीर खोदायचे काम हाती घेण्यात आले. जुन्या विहीरीचे पाणी खराब व्हायला लागले होते कारण बलुची लोकांनी त्यात कुजणार्‍या वस्तू टाकल्या होत्या. ते प्यायल्यावर सैनिकांना पोटदुखीचे विकार जडायला लागले होते. सगळ्यात नशिबाची गोष्ट म्हणजे मराठ्यांना त्या किल्ल्यावर पाणी सापडले. (मला खात्री आहे त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील किल्ल्यांची आठवण झाली असणार) पाण्यासाठी खाली उतरून नदीवर जाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच होते. याच दिवशी बटवड्यात एक बातमी आली की सुकूरमधून काही मदत मिळण्याची आशा करू नये पण मुरींचे कट्टर शत्रू 'कहार' ( एक जमात) यांची मदत मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. अर्थात मराठ्यांनी सुकूरमधून येणार्‍या मदतीची आशा केव्हाच सोडली होती.
मराठ्यांनी मग बालेकिल्ला लढवायची तयारी सुरू केली. बघा यांची कमाल. माणसे राहिली होती १४० पण तयारी चालली होती महिनोंमहिने लढायची. बालेकिल्ल्यात रसदही साठवून ठेवण्यात आली. गावकर्‍यांना धान्याच्या पोत्यांमधे वाळू भरायचे काम सांगण्यात आले. काहींना लाकडाचे चांगले जाडजूड सोटे बनवण्याचे काम देण्यात आले. जे जास्त धीराचे होते त्यांना रात्रीच्या गस्तीच्या कामात सामिल करून घेण्यात आले. त्याच दिवशी विरुध्द दिशेचे दोन बुरूज चांगल्या रस्त्याने जोडण्यात आले. त्याचा उपयोग वेळ पडल्यास ती तोफ एका बुरूजावरून दुसर्‍या बुरूजावर नेण्यासाठी करण्यात आला. आता कुठलेही जनावर पाणी पिण्यासाठी किंवा चरण्यासाठी बाहेर सोडण्यास मनाई करण्यात आली. एक आटलेली नदी जवळच होती आणि तिच्या खोर्‍यात हजार दोन हजार घोडेस्वार सहज लपू शकत होते. एकही माणसाचा मृत्यू आता परवडणारा नव्हता.

१५ जूनला हेरांनी अजून एक वाईट बातमी आणली. मुरी आणि बुगताई जमातींनी या लढाईत हात मिळवणी केली असून ते कुठल्याही रात्री किल्ल्यावर हल्ला करायच्या तयारीत आहेत. मराठ्यांनी पुढच्या दरवाजाची संरक्षण व्यवस्था अजून मजबूत केली. टोकदार काठ्यांचे व बांबूचे कुंपण उभारण्यात आले. हे लक्षात आले असेल की मराठे सारखे काही ना काही तरी कामात होते.

२९ तारखेला कॅ. ब्राऊनने आदेश दिलेला असतानासुध्दा २० गाडीवाले त्यांच्या बैलांना चरायला बाहेर घेऊन गेले आणि १५० बलूचींच्या हातात सापडले. हे लक्षात येताच ले. अर्स्काईनने त्यांच्यावर एक तोफेचा गोळा टाकण्यात यश मिळवले आणि ब्राऊनने ४० जवान त्या माणसांची सुटका करायला पाठवले. त्यातील १० गाडीवाल्यांची कत्तल झाली आणि १० जणांना वाचवण्यात आले. त्यातले काही लपून बसले होते त्यांनी बघितले की काही जण विनवण्या करत असताना करीम खान जो बलूचींचा प्रमुख होता, “मारो मारो” म्हणून त्याच्या सैनिकांना प्रोत्साहन देत होता. एक गोळा त्यांच्यातच फुटून तीन बलुची जागेवरच ठार झाले आणि बाकीचे पळून गेले. दुसर्‍या दिवशी दोन मराठा सैनिक उंट चालवणार्‍या माणसांबरोबर उंटांना चरण्यासाठी बाहेर घेऊन गेले असता, २०-२५ बलूचींनी त्यांच्यावर हल्ला केला. या दोन जवानांनी पळून न जाता शांतपणे त्यांच्या थोबाडावर गोळ्या घातल्या. ते बघून उरलेले पाय लावून पळून गेले. त्याच संध्याकाळी या दोन मराठा जवानांना बढती देण्यात आली. हे सैनिक जर भिंतींच्या आत आले असते तर त्या सर्व माणसांची व उंटांची कत्तल झाली असती. त्याच दिवशी या सैनिकांकडे असलेली एकमेव बकरी बलुची लोकांनी पळवली असती, पण तिलाही वाचवण्यात आले. कारण अन्न म्हणून तिची किंमत फारच होती. दुसरी आनंदाची घटना म्हणजे कॅ. ब्राऊनच्या ओळखीने किल्ल्यावर ४५ बकर्‍या आणण्यात आल्या आणि जवानांना बर्‍याच दिवसानी मटणाची मेजवानी मिळाली. त्या आटलेल्या नदीच्या पात्रात लपून बसलेल्या बलुची टोळ्यांची आक्रमणे मधून मधून चालूच होती. खरे तर मराठ्यांना आता त्यांची सवय झाली होती आणि त्यांना त्यांची आक्रमणे करमणूक म्हणून आवडायला लागली होती. त्यांना गोळीने उडवण्यात आता ते आपापसात पैजा लावत. त्या कंटाळवाण्या दिवसात त्यांना ती करमणूक बरी वाटे असे कॅ. ब्राऊनने लिहून ठेवले आहे.

आता उपासमार होऊ लागल्यामुळे उंट खाली पडू लागले. तोफ ओढणार्‍या पाच बैलांची त्याहूनही वाईट परिस्थिती झाली. त्यांना शेवटी ठार मारण्यात आले. त्याच दिवशी या सैनिकांना एक चांगल्या बकर्‍यांचा कळप किल्ल्यासमोरून नदीकडे जाताना दिसला. हा एक सापळा होता, नशिबाने त्याला कोणी फसले नाही.
१३ तारखेला अजून एक वाईट बातमी आली. कहार आणि कोजूक जमातींनी इंग्रजांना मदत करण्याऐवजी मुरींची बाजू घेतली आहे. जो इंग्रज अधिकारी या जमातींना मुरीजमाती विरूध्द लढण्यासाठी तयार करत होता त्याच्यावरच कहारांनी प्राणघातक हल्ला केला होता. मराठ्यांना अर्थातच याचे काही विशेष वाटले नाही कारण ते त्यांनी गृहितच धरले होते.

त्या विहीरीचे घाणेरडे पाणी पिऊन आजारी पडलेल्या सैनिकांची तब्येत अजूनच बिघडली. पोटाच्या अल्सरमुळे त्यांना धड पट्टाही बांधता येईना. तरीपण एकाही मराठा सैनिकाने पहार्‍याच्या कामावर जाताना कुरबूर केली नाही की ती कामगिरी टाळली नाही. सामान्य हमालांना/धोब्यांना/नोकरांना दिलेले प्रशिक्षण यावेळी कामाला आले आणि त्यांनीही पहार्‍यासाठी बरीच मदत केली.

१८ तारखेला रात्री तुफान पाऊस आणि वादळाने सगळ्यांची झोप उडवली. एवढा पाऊस पडत होता की कॅ. ब्राऊनला वाटले की हा किल्ला आता वाहून जातो की काय. पण मराठ्यांना याची सवय होती. पाऊस थोडा ओसरल्यावर सगळ्यांना भरपूर काम मिळाले. मुख्य दरवाजाच्यासमोरचा तलावही ओसंडून वहात होता. सगळ्या खोर्‍यात तुफान पाऊस होऊन पूर आला होता.

२५ तारखेला जवळ जवळ २०० बलुची घोडेस्वार किल्ल्याच्या दिशेने दौडत येताना दिसले. मराठा सैनिकांना वाटले की आता बहुधा आक्रमण चालू झाले पण ते नुसते आले आणि बंदूकीच्या टप्प्यात न येता बाजूने निघून गेले. ( याबाबतीत नंतर असे कळाले की हा खरोखरीचा हल्ला होता. आणि बलूचींच्या सय्यद्ने त्यांना सांगितले होते की आज शत्रूच्या तोफांच्या गोळ्यात एकही बलुची मरणार नाही. पण पहिल्याच गोळ्यात १५ बलुची ठार झाल्यामुळे ती मोहीम आटोपण्यात आली .) आता बलुचीही हुशार झाले होते. बंदुकीच्या टप्प्यात न येता हुलकावणी देऊन ते निघून जात. गंमत म्हणजे तेच लोक दुपारच्यावेळी मराठ्यांना शेतात काम करताना दिसत. ते दृष्य फार विलोभनीय दिसे. (आपल्या शेताची त्यांना आठवण येत असेल का ? निश्चितच !)

२६ तारखेला मराठ्यांना वाळूच्या वादळात एक घोडा मरून पडलेला दिसला. त्याच ठिकाणी ले. अर्स्काईनने काल रात्री तोफ डागली होती. त्या वादळात फार दूरचे दिसत नव्हते. पण थोड्याच वेळात मराठ्यांना उमगले की बलुची टोळ्यांनी सर्व किल्ल्याला वेढा घातला आहे आणि ठिकठिकाणी चौक्या उभारल्या आहेत. त्यांना त्याची काळजी नव्हती पण संदेशवहनाचे सर्व मार्ग आता रोखले गेले होते आणि सैनिकांना पत्रे मिळू शकणार नव्हती. या आठ दिवसांनी येणार्‍या पत्रांचा सैनिकांना व आधिकार्‍यांना खूपच आधार होता. तशातच आजारी सैनिकांची संख्याही वाढू लागली खुद्द डॉ. ग्लासच आजारी पडला. कॅ. ब्राउनलाही थोडासा ताप आला होता पण त्याने तो विचार मागे टाकला. बलुची टोळ्या आता त्यांचा वेढा आवळत चालल्या होत्या. किल्ल्यात आता दर १२ तासांनी हजेरी होऊ लागली. तापाने फणफणलेले मराठी सैनिक, स्वत: कॅ. ब्राऊन, आजारी असताना एकही काम चुकवत नव्हते.

६ ऑ. पर्यंत ३३ सैनिक विचित्र तापाने आजारी पडले डॉ. ग्लास्लला तर अंथरुणावरुन उठताही येईना. अखेरीस बलूचींच्या एकजूटीला खिंडार पाडण्यात कॅ. ब्राउनला यश मिळाले. एका टोळीच्या प्रमुखाला – हैबत खान याच्याशी तह करण्यात आला. याची किल्ल्याच्या अवती भोवती जमीन होती आणि तो ती कसायच्या निमित्ताने किल्ल्याच्या बराच जवळ यायचा. त्याच्याकडून बातमी कळाली की लाल खान नावाचा सरदार कदाचित एक दोन दिवसात हल्ला करेल. याच हैबतखानाने टपाल लेहरीला पोहोचते करण्यासाठी ५० रुपये मागितले पण त्याने अन्नासाठी काहीही मदत केली नाही. इकडे हैबत खानाची जनावरे किल्ल्याजवळ येऊन तेथील गवत फस्त करत होती. गवत ही त्यावेळी फारच महत्वाची बाब होती. या खानाला जनावरांसाठी पाहिजे ती किंमत कबूल करण्यात आली पण त्याने एकही बकरी देण्याचे नाकारले. दोनच दिवसांनी बकर्‍यांचा एक मोठा कळप किल्ल्याच्या बर्‍याच जवळ आला आणि त्या पकडायचे कॅ. ब्राऊन आणि मराठ्यांनी ठरवले. तो कळप राखण्यासाठी दोनच बलुची होते. एका बुरजातून बंदूकीचे संरक्षण घेऊन आणि तोफ तयार ठेवून तो कळप पळवण्यात आला. बरीच मोठी संपत्ती हाती लागली. ३०० बकर्‍या आणि ५७ मेंढ्या हाती लागल्यावर त्या किल्ल्यात आनंदी आनंद पसरला. त्या रात्री त्या किल्ल्याचे रुपांतर एका मोठ्या रसोईखान्यात झाले होते. दुसर्‍या दिवशी हैबत खान आपल्या बकर्‍या मागायला आला तेव्हा त्याला त्या सर्व मारल्या गेल्यामुळे देता येणार नाहीत असे सांगण्यात आले. संतापून त्याने किल्ल्यावर हल्ल्याची धमकी दिली. ती ऐकताच कॅ. ब्राऊनने एका तरूण मरठा जवानाला त्याला गोळी घालायचा आदेश दिला. बंदूकीचा आवाज झाल्यावर खानाने तेथून पळ काढला..........

क्रमशः....
जयंत कुलकर्णी

इतिहासकथालेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

14 Jun 2011 - 6:13 pm | मृत्युन्जय

हे खुपच रोचक होत चालले आहे. थोडे कंटाळवाणे भाग टाका ना म्हणजे पुढच्या भागाची एवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाणार नाही :)

पाषाणभेद's picture

15 Jun 2011 - 9:31 am | पाषाणभेद

>>> थोडे कंटाळवाणे भाग टाका ना

युद्धकथांमध्ये कंटाळवाणे भाग? अहो ही काय शृंगारीक कादंबरी आहे काय? अंगावर रोमांच उभे राहतात महाराज. थोडी सबूरी ठेवा, अन वाचत रहा.

जय काळी ५!!

मृत्युन्जय's picture

14 Jun 2011 - 6:14 pm | मृत्युन्जय

प्रकाटाआ

धमाल मुलगा's picture

14 Jun 2011 - 6:57 pm | धमाल मुलगा

केवळ थरारक.

पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतो आहे.

शैलेन्द्र's picture

14 Jun 2011 - 9:09 pm | शैलेन्द्र

मस्त... खरी लढाई...

आदिजोशी's picture

14 Jun 2011 - 10:02 pm | आदिजोशी

झक्कासच. पटापट टाका पुढचे भाग, वाट बघायला लाऊ नका.

नीलकांत's picture

14 Jun 2011 - 11:28 pm | नीलकांत

छान रंगतेय. वाचतोय. लवकर येऊद्या :)

आनंदयात्री's picture

16 Jun 2011 - 1:42 am | आनंदयात्री

हेच म्हणतो. पुढला भाग येउ द्या लवकर.

रणजित चितळे's picture

15 Jun 2011 - 8:37 am | रणजित चितळे

फारच रोमांचकारी. वाट बघत आहे पुढच्या भागाची