पक्षी निरीक्षण - एक सुन्न अनुभव

नारदाचार्य's picture
नारदाचार्य in जनातलं, मनातलं
2 May 2008 - 6:54 pm

कवितांच्या प्रांतामध्ये सांप्रती अनेक नवनव्या आविष्कारांचा वर्षाव होतो आहे. समाजातील जगण्याच्या रीतीमध्ये झालेल्या बदलांचे प्रतिबिंब घेऊन येणाऱ्या या कविता वाचकाला वेगवेगळया पातळ्यांवरचा अनुभव देतच असतात. 'पक्षी निरीक्षण' ही कविता याच मालिकेत जाऊन बसणारी आहे हे निर्विवाद आहे. चेतन या 'नव'कवीची ही कविता कवीने विडंबन म्हणून वाचकांच्या समोर ठेवली असली तरी, तिच्यात मूळ प्रतिभेचे अंकूर पुरेसे दिसतात हे स्पष्ट आहे. मुख्य म्हणजे अनुभवाचा सच्चेपणा आणि ते नेमक्या, मोजक्या शब्दांमध्ये मांडण्याची कवीची हातोटी या गोष्टी याच कवितेच्या नव्हे तर या कवीच्या भावी रचनांचेही बलस्थान ठराव्यात. त्या दृष्टीने ती मुळातूनच समजून घेणे अगत्याचे ठरावे.
ही कविता वृत्तामध्ये आहे की नाही हा कवितेच्या व्याकरणतज्ज्ञांपुढे पडणारा प्रश्न. कवितेच्या सच्च्या वाचकाच्या दृष्टीने तो मुद्दा फारसा महत्त्वाचा ठरत नसतोच. 'पक्षी निरीक्षण' या कवितेबाबतही असा वाज संभवतो. मात्र या कवीने लय सांभाळण्यात कमाल केली आहे हे कवितेच्या अंतऱ्यावरूनच दिसून येते.
भंकस ही करता करता, मन माझे गुंतले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

कवितेचा हा अंतरा एका लयीत गुणगुणता येतो हे त्याचे वैशिष्ट्य. ही गुणगुण गुणगुणीपुरतीच मर्यादित राहात नाही हे विशेष. त्यातील भंकस, मस्त यासारख्या शब्दांसोबत पोरी हा शब्द जेव्हा येतो तेव्हा या कवीचा शीर्षकातील पक्षी ते पोरी हा प्रवास कसा होतो हे दृष्यमान होते. आपले मन गुंतल्याची स्वच्छ कबुली देतानाच ते कोठे आणि कसे गुंतले असावे हेही मांडताना कवीने कोणत्याही दुर्बोध कल्पनांचा आधार घेतलेला नाही. या कवितेचा साधेपणा असा अंतऱ्यापासूनच सुरू होतोय हे खास.
कवीने ही कविता लिहिताना एक विशिष्ट प्रतिमाविश्व डोळ्यांपुढे ठेवले आहे का? कोणत्याही कवितेच्या संदर्भात उभा राहणारा हा प्रश्न आहे. अनेक कवींनी असे प्रतिमाविश्व असणे आवश्यक आहे, असे म्हटले असले तरी, प्रस्तुत कवितेतून त्याला सडेतोड उत्तर देताना कवी ती गृहितके नाकारून टाकतो. त्याच्या डोळ्यांसमोर कसलेही प्रतिमाविश्व गृहितकाच्या स्वरूपात नाही. आहे ते फक्त अनुभवविश्व. कवितेच्या पहिल्याच कडव्यात ते व्यक्त होते.
आळसावलेले पाय हे, पसरुन कट्ट्यावरी
इकडुन तिकडे फिरवी, ही मुंडी वरचेवरी
आज त्याचे ध्यान का, एकीवरचं थांबले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

कवी कट्ट्यावर आहे हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. आळसावलेले पाय या शब्दांतूनच तो कसा पसरला असावा, कट्टाही कसा असावा हे तर दिसतेच शिवाय त्या कट्ट्यावर त्याचे 'गुंतलेले मन' कसे भिरभिरते आहे हे पुढच्याच ओळीतून तो सांगून जातो. तिथे त्याने वापरलेला मुंडी हा शब्द अगदी खास कट्ट्यावरचाच आहे. अनुभवांच्या जोडीला तो ज्या विश्वात आला आहे त्याच्याशी प्रामाणिक राहणारी ही शब्दरचना गृहितकाच्या पातळीवर प्रतिमाविश्व का असू नये याचे एक उत्तर देऊन जाते. गृहितकाच्या पातळीवरची प्रतिमाविश्वे असती तर त्याला कदाचित तेथे मस्तक किंवा डोके असा शब्दप्रयोग करावा लागला असता, पण तो कट्ट्यावरच्या विश्वाशी जुळणारा खचितच ठरला नसता. आज त्याचे ध्यान का एकीवरच थांबले हा कवीला पडणारा चिरंतन प्रश्न असावा. कट्टा ही वस्तूच अशी आहे की, तिथे अशी कोणतीही एकनिष्ठा चालत नसतेच. पण ती व्यक्त करताना कवी बंबाळ होत नाही. तो अगदी साधेपणाने एक प्रश्न विचारून वाचकांना विचारांत टाकून सहजगत्या पुढे सरकतो.
कवितेच्या पुढच्या कडव्यात कवी अनुभवांच्या पुढच्या पातळीवर अलगदपणे उतरला आहे. कट्ट्यावरच्या या अनुभवांच्या पायऱ्या उतरत यावयाचे असते किंवा त्या चढावयाच्याच असतात असे नाही हे कवीला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे तो एखाद्यावेळी एखादी पायरी चढतो किंवा पुढच्याच क्षणी उतरत असतो. ते नेमक्या शब्दांत मांडणे हेच खऱ्या कवीचे कौशल्य. ते या कवितेत मुळातून अनुभवायला मिळते.
टक लावुन पाहताना, तोंड का वेडावले
वळुन मागे पाहताना, मन का पस्तावले
नेहमीच्या या खेळामधले, नाविन्य का हे संपले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

टक लावणे, मागे वळून पाहणे हे तर नेहमीचे खेळ. या तिन्ही घटकांना एकत्र गुंफताना कवी पुन्हा एकदा दुसऱ्याच एका चिरंतन प्रश्नावर जाऊन पोचतो. हा खेळ रोजचाच, त्यात तसे नवे काहीही अनुभवता येत नसते, तरीही माणसं हा खेळ रोज का करीत असावीत? कोणाही विचारी माणसाला पडू शकणारा हा प्रश्न आहे. तोच कवीच्याही मनात घर करून बसला आहे. त्यातून मग त्याचे तोंड वेडावत जाते. इथे तोंड वेडावत जाणे म्हणजे चेहरा वेडावत जाणे नव्हे. या नावीन्यहीन अनुभवातून तोंडाची चव जाणे अशा अर्थाने कवीने केलेली ही शब्दयोजना आहे. जीभ कडवट झाल्यावर मागं वळून पाहताना मन पस्तावतच असते. तीच भावना कवीने मांडून ठेवली आहे.
नजरेत भरता शिल्प हे, हा सांड कोठून उपटला
घाम फुटुन सर्वांगाला, कंप का हा भरला
जवळ येताना पहून तो, पाय लावून पळाले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

वा. इथं या कवीच्या अनुभवाच्या सच्चेपणाला दाद दिलीच पाहिजे. शिल्प आणि सांड, घाम आणि कंप, जवळ आणि पळणे या अगदी चित्रदर्शी शब्दांचा वापर त्याने केला आणि प्रतिमा डोळ्यांपुढे उभ्या करून ठेवल्या आहेत. त्यासाठी त्याला वेगळ्या प्रतिमाविश्वाचा वापर करावा लागलेला नाही यातच सारे काही आले. अनेक वाचकांना आपल्याच अनुभवांचे शब्दांकन वाटावे, असा हा अनुभव. कवीच्या अनुभवांची वैश्विकता किती सखोल असावी त्याचा हा प्रत्ययकारी अनुभव.
या कवितेचा आरंभ भंकस या भावनेतून सुरू होतो. तेथून पुढे ती प्रवास करीत माणसाच्या भावविश्वातील जवळपास प्रत्येक रसाचा (रुची, चव या अर्थी) अनुभव देत पुढे जाते. शेवटाला ती येते तेव्हा तेथे सांडरुपी प्रतिस्पर्धी आणि त्याच्या हातून होणाऱ्या पराभवाच्या भीतीने करावे लागणारे पलायन यामुळे ती सुन्न करून जाते.
मस्त पोरी टापताना कोण साले शिंकले या ओळीपाशी कवी वारंवार येतो. त्याचे एक अगदी साधे कारण आहे. इथे त्याने साला हा शब्द द्वयर्थी योजलेला आहे. त्यात साला हा शब्द अपशब्दवाची आहेच, शिवाय त्याच्या मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करणारा आहे. तो त्या मुलीचा भाऊ असावा आणि आपला साला व्हावा ही ती भावना आहे. खुबीने शब्दांच्या मांडणीत भावना अलगद पेरून ठेवण्याची कवीची ही हाथोटी वाखाणण्याजोगीच.
वाचकाच्या मनाला हात घालणारी ही कविता. तिचे मर्म दडलेले आहे ते या अनुभवातील वैश्विकतेमध्ये. अनुभव वैश्विक, पण तो व्यक्त करण्यातील साधेपणा हे या कवितेचे वैशिष्ट्य.

कवितावाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

नारदाचार्य's picture

2 May 2008 - 7:43 pm | नारदाचार्य

आम्ही पुढचे ४८ तास जालावर येण्याची शक्यता नाही (कारणे विचारू नका बॉ). तेव्हा ही मनापासून केलेली 'समीक्षा' मूळ कवी किंवा इतर कोणासही आक्षेपार्ह वाटल्यास बेलाशक उडवून लावावी, ही विनंती. त्याउपरही समीक्षेमागील प्रामाणिक हेतू ध्यानी घेऊन त्याविषयी कोणासही 'चर्चा' (ही 'समीक्षा' असल्याने चर्चा आवश्यकच नाही का?) करावी असे वाटल्यास त्याने/तिने आम्हाला पोष्टकार्ड टाकावे, हीही विनंती. अन्यथा तशी चर्चा येथे होईलच.

चेतन's picture

3 May 2008 - 2:38 pm | चेतन

मी हि कधी एवढा विचार केला नव्हता :/
असो....

सुन्दर समीक्षा.... (तुमच्याकडुन शिकण्यासारखे आहे)

चेतन

स्वगत : मला कोणताही असा अनुभव नाही