आवाज

हेरंब's picture
हेरंब in जनातलं, मनातलं
1 May 2008 - 10:30 am

जन्माला येणार्‍या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते.
पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला. मतांसाठी राजकीय पक्ष तर लांगुलचालन करतातच, पण यावेळेस आश्चर्य म्हणजे कोर्ट पण झुकले! लोकमान्यांनी मागे एकदा " सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिला होता. पण कोर्टाच्या बाबतीत तर तसेही म्हणायची सोय नाही.
भारतीय समाजात तशा अंधश्रद्धा बर्‍याच आहेत. पण परमेश्वराला मोठ्ठा आवाज आवडतो, किंबहुना तो बहिरा असल्यामुळेच त्याच्यासमोर घंटा, थाळ्या, ढोलताशे वगैरे जे कांही हाती लागेल ते वाजवून त्याचे लक्ष आपल्याकडे वळवावे लागते असा भक्तांचा समज असावा. तसेच उत्सव हे आवाजानेच साजरे करायचे असतात, देव बहिरा असल्यामुळे सर्वांनीच लवकरांत लवकर बहिरे होऊन त्याच्याशी एकरुप व्हावे असा उदात्त हेतू मनाशी बाळगून सर्वजण कटिबद्ध असतात.
कांही लोकांचे तर आवाज हेच टॉनिक असते. दोन मिनिटे शांतता पसरली तर यांचा जीव कासावीस होतो. मंद सुरांत गाण्याचा आनंद लुटणे यांना मान्यच नसते. दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो. लहान मुलांना एकवेळ आवाज करावा असे वाटले तर ते समजण्यासारखे आहे. पण लहानपणातला निरागसपणा, प्रामाणिकपणा मोठेपणी मागे पडतो पण ठणठणपाळपणा काही सुटत नाही!
लहानपणी घरांत सगळे झोपलेले असताना जरा मोठ्याने बोलले तरी आई रागे भरत असे. रेडिओचा आवाज थोडा वाढला तर वडिलांच्या भुवया उंचावत. संस्कार संस्कार बहुधा हेच असावेत. आपल्यामुळे दुसर्‍याला जराही त्रास होऊ नये ही शिकवण घरोघरी होती. माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्‍या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते.
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???

समाजराहणीविचारलेखमत

प्रतिक्रिया

शितल's picture

1 May 2008 - 6:29 pm | शितल

:) तुम्ही छान लिहले आहे, अगदी सरळ आणि मनातले. कधी कधी हा आवाज सहन होत नाही चिडचिड होते, त्या गो॑गाटात आपला आतला आवाजच आपल्याला ऐकु येईनासा होतो.
पण नैसर्गिक आवाज हा कानाला सुखावतो. मन प्रसन्न करतो. काही काही माणसे फोनवर देखिल इतक्या मोठ्याने बोलतात तेव्हा तर फोन ठेवासा वाटतो. गणपती उत्सव आणि नवरात्रात तर ह्या आवाजाने ह्रदयाचे ठोके ही चुकतात की काय अशी भिती वाटते.

मदनबाण's picture

1 May 2008 - 7:28 pm | मदनबाण

दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो.
खरय तुमच म्हणण आज काल लोकांना वाटत की मोठा आवाज केला तरच एन्जॉय करता येत.....
तुझ्या म्युझिक सिस्टिम पेक्षा माझी म्युझिक सिस्टिम कशी जबरदस्त आहे त्याचा खेळ चालतो.....
खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो.
१०००%सहमत.....
हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते.

फिरायला.....अहो मी तर म्हणतो आता तर कायमचेच वास्तव्य करावे.....

(ध्वनी प्रदुषणाने त्रस्त ) ~X(
मदनबाण

मानस's picture

1 May 2008 - 8:28 pm | मानस

या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला.

मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है |

मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

मानस's picture

1 May 2008 - 8:28 pm | मानस

या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला.

मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है |

मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

पद्माकर टिल्लु's picture

1 May 2008 - 9:12 pm | पद्माकर टिल्लु

वा छानच
भारताच्या पुढिल पिढ्या बहिरया निपज्ञणार असे वाट्ते.

वरदा's picture

1 May 2008 - 11:21 pm | वरदा

हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???
खरच....मी तिथे असताना तर आमच्या घरासमोर लग्नाचा हॉल सुरु झाला..एकाच वेळी एकाच मांडवात ३ लग्न होती आणि ३ जणांनी वेगवेगळे बँड आणले होते..इमॅजिन करा काय प्रचंड आवाज असेल्.....आणि ३ बँड जवळजवळ ६-७ तास सतत वाजत होते....ह्या लोकांचे कान कसले बनलेले असतात कोण जाणे....

भडकमकर मास्तर's picture

1 May 2008 - 11:43 pm | भडकमकर मास्तर

माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्‍या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते
आणि हे वाक्य तर भन्नाटच... B)

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 2:37 pm | धमाल मुलगा

छान लेख.
थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा.

हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???

आँ...पंताना चिमटा :) :) :)

आणि मानस यांनी इथं उद्घत केलेला कबिरांचा

मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है |
मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

दोहा ही अगदी यथोचित....