भाकरी निर्मिती एक कला..

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
6 Jan 2011 - 12:42 pm

लष्कराच्या भाकरी थापणे जितके सोपे तितके भाकरीचे निर्माण नाही. ज्वारी, बाजरी, नाचणी ही एकदल धान्ये आता औषधापुरतीच जगतमान्य झाली आहेत. अन् अशांची भाकरी भाजणे ही एक चैन समजावी अशी परिस्थिती दिसते. मुळात भाकरी थापणे, भाजणे या फार मोठ्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. गावाकडची एखादी जुनी जाणती कौशल्याबाईच ते करु जाणे.
तर 'भाकरी निर्माण' ही बऱ्‍यापैकी अवघड कला. त्यासाठी धान्य निवडण्यापासून सुरुवात करावी लागेल. दळण्या अगोदर धान्यातली कच, खडे, तुसे बाहेर टाकली नाहीत तर भाकरी खमंग होऊनही चावतांना वादंग उठण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा डोळ्यांत तेल घालून धान्याची निवडणूक झाली की चांगलं पीठ दळून घ्यावं लागतं. गिरणीवाला गृहिणीच्या फेवरमधला असेल तर तो जरा बेताचीच कळ पिळून खास भाकरीसाठीचं पीठ काढून देईल. गव्हासारखा फार बारीक आटा भाकरीला मानवत नाही. संयुक्तिक पीठ मिळाले की ते पुरेशा पाण्यात व चवीइतक्या मीठात मळावे लागते. बोटातून गळू नये इतके फेटावे लागते. कणकेचा तो पिठाळ गोळा एकजीव होणे फार महत्त्वाचे. आत्ताच्या स्टीलच्या मऊसूत परातीत ते शक्य नाही. त्याकरिता काथवट नावाची वस्तू फार उपयोगी असायची. एकतर ते लाकडाचे असल्याने त्यात पीठ व्यवस्थित मळले जायचे, शिवाय ते स्टीलसारखे गुळगुळीत नसल्याने भाकरीखाली फार पीठ भुरभुरावे लागायचे नाही. परंतु असे हे एकसंध असलेले काष्ठपात्र स्वैँपाकघरातून केव्हाच हद्दपार केले गेले आहे. असो.
एकदा का पीठ योग्यप्रकारे मळले की त्याचा मिटत्या ओंजळी इतका मुटका तोडून घ्यायचा. त्याला दोन्ही हातांनी गोलाकार देऊन परातीत भुरभुरलेल्या पीठावर टाकायचा अन् भाकरी थापायला सुरुवात करायची.
हे थापणं म्हणजे सर्वाँगिण काम असतं. कारण परात इकडे तिकडे सरकून भाकरीचा नकाशा होऊ नये यासाठी पायाच्या अंगठ्यांनी ती जमिनीवर दाबून धरावी लागते. किचन ओट्यावर हे जमणं अशक्यच. कोणतंही कसदार काम करायचं असेल तर जमिनीवरच यावं लागतं याची प्रचिती यावेळी येईल.
नंतर कणकेवर सगळ्या बाजूंनी सारख्या दाबाच्या चक्राकार थपट्या मारीत भाकरी पसरत न्यायची. साधारणतः दोन्ही हातांचे अंगठे चिकटवून व बोटे पसरवून जेवढा पंखा तयार होईल त्या आकाराची भाकरी थापायची. शक्यतो चिरा पडू नयेत या वेगाने थापा द्यायच्या. उजवे असाल तर घड्याळाच्या दिशेने पीठ थोपटणे सोईस्कर जाते, डावखुरे असाल तर त्याउलट. कदाचित चिरा पडल्या तर पाणी व पीठ याचा संमिश्र वापर करून त्या बुजवता येतात. मुळात पीठ योग्य प्रमाणात हाटले असेल तर चिराही पडत नाहीत व भाकरीही उचलतांना तुटत नाही.
भाकरी एका तळव्यावर उचलून गरम तव्यावर वेळेत टाकणे हा अनुभवाने सिद्ध होण्याचा भाग असतो. गरम तव्यावर भाकरी पडली की पातळ पापुद्रा सुटण्यासाठी घोटभर पाण्याने वरची बाजू मऊ करायची. जरावेळाने म्हणजे भाकरी पचल्यावर उलथण्याने तिच्या सर्व कडा मध्यापर्यंत सोडवून ती पटदिशी उलथायची. त्याबाजूनेही पचली की निखाऱ्‍यावर भाजायला टाकायची.
आजकाल चूल व निखारे या दंत कथा झाल्या आहेत. विस्तवावर भाजलेल्या भाकरीची चव 'खरपूस' असते तर गँसवर भाजलेली 'करपूस' लागते! असो.
तेव्हा खरपूस पापुद्रा वर येऊन भाकरी पुरीसारखी टम्म फुगली की भाकरीच्या यशस्वी निर्माणाची पोचपावती मिळाली असं समजून चालायचं... ( 'चौफेर' मधुन..)

कलापाकक्रियालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 12:47 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख लेख!!!
मी १-२ दा तान्दळाच्या भाकर्या केल्या होत्या.
झाल्या छान पण पसारा एवढा झाला कि नवर्याला "भाकरी नको पण किचन आवर" असे झाले होते.

( कधी कधी अतिशय सुगरण)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 Jan 2011 - 1:58 pm | घाशीराम कोतवाल १.२

कधी कधी अतिशय सुगरण
;) ह्याचा अर्थ काय हो चुचु काकु ?

नगरीनिरंजन's picture

6 Jan 2011 - 2:30 pm | नगरीनिरंजन

मस्त! माझ्या आजीची टम्म फुगणारी भाकरी आठवून व्याकुळ झालो. :-(
आधुनिक किचनचा भाकरी करायला कणमात्रही उपयोग नाही हे स्वानुभवाने कळले आहे.

मुलूखावेगळी's picture

6 Jan 2011 - 2:49 pm | मुलूखावेगळी

छान लेख न टीप्स

मी जेव्हा भाकरी केल्या इतके चटके बसवुन घेतेले की हापिसात्ल्या लोकानी विचारले कि रोज कुठे
जळ्पोळ करुन येतेस
तेव्हापसुन बन्द
भाकरी बनवने
पन २र्यानी बनवली तर आपला १ला नम्बर

रुमवरील आठवण झाली.

पहिल्याच वेळेस गोल गरगरीत भाजरीची भाकरी मस्त जमली मला.
नंतर जाड, पातळ मोठी , छोटी मस्त येत होत्या मला. हात मोठा असल्याने तवा भरुन गोल मस्त मस्त ..

भाकरी आणि कालवण या गोष्टी त्यामुळॅ वर्षभर माझ्याकडेच राहिल्या. आणि या मेन गोष्टींमुळे भांडी कधी घासावी लागली नाही.
माझा मित्र मसाला भात भारी करायचा ..

लेख आवडला

योगप्रभू's picture

7 Jan 2011 - 1:29 am | योगप्रभू

आता भाकरीच्याच आठवणी जागवल्या आहेत तर माझ्याही या काही आठवणींच्या पाकळ्या...

* ज्वारीचे पीठ फार काळ टिकत नाही. खूप जुने झाल्यास त्याला जाळी लागते त्यामुळे ताजे दळून आणल्यावर लवकर भाकरी करुन संपवणे चांगले. जुन्या पिठाच्या भाकरींना कितीही केले तरी चिरा पडतात. अशा पिठाला 'विरी गेलेले पीठ' म्हणत.
* चुलीवर शेकलेली खरपूस भाकरी ताटात घेऊन पापुद्र्यातून साजूक तुपाचा गोळा आत टाकायचा. तो विरघळल्यावर थोडे मीठ टाकून भाकरी चोळून घ्यायची. ही तूप-मीठ लावलेली गरम भाकरी म्हणजे स्वर्गसुख.
* सोलापूर आणि पुढे उत्तर कर्नाटकात भाकरी हातावरच सुंदर गोल आणि अगदी पातळशा थापतात. अशी भाकरी खरपूस आणि किंचित कडक असते. ती शेंगदाणा चटणीसोबत खाणे हा अवर्णनीय आनंद आहे महाराजा! (सोलापुरात सुगरण डायनिंग हॉलमध्ये थाळीत आजही हा मेनू असतो, असे ऐकून आहे. चला देवाची कृपा!)
* गावरान कोंबडी किंवा मटणाच्या जेवणाला ज्वारीची भाकरी आणि मासे असतील तर तांदळाची भाकरी. वांग्याचे भरीत बाजरीच्या भाकरीबरोबर खावे. नाचणीची शिळी भाकरी -लसणाची चटणी आणि कवडीचे दही या न्याहरीपुढे बाकी सारे तुच्छ.
* परवा भुसावळला जाणे झाले. जळगाव भागात हिरवी चवदार वांगी असतात. त्याचे भरीत सुंदर होते. त्यासोबत कळणाची भाकरी मिळते. म्हणजे भाकरीच्या पिठात दळताना उडीद डाळ व आणखी दोन डाळी मिसळलेल्या असतात. सोबत हिरव्या मिरचीचा तेलातला ठेचा. ऐश केली.

सुनील's picture

7 Jan 2011 - 1:42 am | सुनील

भाकरीसारखाच खरपूस लेख!

शिल्पा ब's picture

7 Jan 2011 - 9:47 am | शिल्पा ब

छान लेख..
मी सुद्धा भाकरी करायचा प्रयत्न चालवलाय आजकाल. किती जाड ठेवाव्यात हेच समजत नाही....कधी फुगते कधी नाही...एखादी छान होऊन जाते :)
कुठलाही स्वयंपाक हि कालच आहे. (मी स्वयंपाक म्हणतेय सैपाक नाही हे जिज्ञासूंनी लक्षात घ्यावे.)

५० फक्त's picture

7 Jan 2011 - 10:57 am | ५० फक्त

योगप्रभु, सोलापुरची आठवण काढल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

विषय भाकरीचा आहे अन सोलापुरचं नाव येणार नाही हे अशक्यच, सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढ्याला ज्वारीचे कोठार म्हणले जाते. या भागातली जमीन अतिशय सपाट आहे, अगदी लांब लांब पर्यंत कुठेही उंचसखल पणा नाही.

सोलापुरात, योगप्रभंनी सांगितल्याप्रमाणे सुगरण मध्ये भाकरी छान मिळतेच. पण पुणॅ हायवेला कोंडी येथिल नसले बंधु हे भाकरी पिठले या प्रकारातील आद्य आहेत. तसेच पुणे-सातारा रोडवर खेड -शिवापुरला कॅलास गार्डन मध्ये भाकरी छान मिळते.

पण माझ्या नशिवाने माझी बायको व आई या दोघिही भाकरी छान करतात. गरम भाकरी वर तुप व मिठ लावुन खाणे, आणि उरलेलं पिठलं नुसतेच खाणे या साठी मी ब-याच वेळा दोघिंची बोलणी खात असतो.

हर्षद.

डॉ. लेख चांगला लिहीलात. पण अजुनही गावात बायका खुप चांगल्या पातळ मोठ्या आणि पापुद्रा वाल्या भाकर्‍या बनवतात. मलाही बनवता येते. पण त्या बायकांएवढी छान नाही. मी टाकेन इथे रेसिपी केली की. तांदळाच्या भाकरीसाठी जया हा तांदुळ चांगला असतो. चुलीवर मातीची खापरी ठेउन केलेली भाकरी अजुन चविष्ट असते. तीही मी केली आहे. माझ्याकडे मातीची तवी आहे. त्यात मला कधी वेळ असला आणि हौस आली तर मी कालवण आणि भात बनवते. खापरीही होती. आणि एक चुलही मी आणली होती. आता परत चुल आणि खापरी आणायची आहे. पण हल्ली ह्या गोष्टी करायला वेळच नसतो.

भाकर्‍या सुक्या पिठाच्याही असतात. मळलेला गोळा सुक्या पिठावर गोलाकार थापायचा व पिठ हलकेच झाडून ती तव्यावर टाकुन वरुन पाण्याने सारवायची.

भाकरी लाटूनही करतात. पण त्याला तितकी चव नसते. हल्ली बाजारात लाटलेल्या भाकर्‍याच जास्त मिळतात.

आमच्याकडे भाकर्‍या वेगळ्या पद्दतीन करतात. तांदळाच पीठ डोश्या सारख सरसरीत भिजवुन मग कडकडित तापलेल्या तव्यावर हातानेच डोश्या सारख पसरवुन भाकर्‍या भाजल्या जातात.

पण लोणावळ्याला खाल्लेल्या ज्वारी-बाजरीच्या (थापुन केलेल्या) भाकर्‍यांची चव अजुन विसरलो नाही.


इंजिनियरिंगला असताना एक आगरी मित्रं तांदळाच्या (उकडीच्या) भाकर्‍या डब्यात आणायचा. त्याही मस्त असायच्या. (फटु : जालावरुन साभार)

लेख मस्तचं.

मी ज्वारी, बाजरी आणि तांदूळ.. सगळ्या प्रकारच्या भाकरी करते. होतातही चांगल्या.

भाकरीचे पीठ मळताना .. पीठ जुने असेल तर त्यात कडकडीत गरम पाणी घालावे.

प्रतिक्रियांमधल्या टिप्स ही उपयुक्तच.

खाली मला आवडलेला एक भाकरीचा व्हिडीओ देतो आहे:

"