मी मराठी

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
31 Mar 2008 - 5:42 pm

भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी कानावर पडतात. त्यातच 'भय्या' लोकांची हिंदी देखील मराठी भाषेत आपले 'हात पाय पसरू' लागली आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे या सार्‍या
प्रसारमाध्यमांमधून आपल्याला इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचाच खुराक रोज मिळत आहे. त्यामुळे आपली भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.

अशा प्रकारचे लेख वाचून आणि तेच विचार डोक्यात घेऊन पडल्या पडल्या मला एक बारीकसा साक्षात्कार झाला आणि इतर भाषेतील शब्द मराठी भाषेत कां शिरू लागले आहेत याचे मुख्य कारण काय असावे ते माझ्या लक्षात आले. आजकाल आपण आपल्या परंपरागत चालीरीती सोडून नवनव्या परकीय गोष्टींचा उपयोग रोजच्या जीवनात करू लागलो आहोत आणि त्या वस्तू आपापल्या नांवानिशी आपल्या जीवनात येऊन आपली भाषा भ्रष्ट करीत आहेत हे एक महत्वाचे कारण बहुधा त्याच्या मुळाशी आहे. तेंव्हा 'मूले कुठारः ' घालून निदान माझ्यापुरता हा प्रश्न निकालात काढायचा असे मी ठरवले. (संस्कृत भाषा मराठीची जननी असल्यामुळे मराठी भाषेला संस्कृत भाषेचे प्रदूषण चालते, किंबहुना ती समृध्द झाल्यासारखे वाटत असावे.) त्यानंतर मला जराशी शांत झोप लागली.

सकाळी उठून स्वच्छतागृहात गेलो. आमच्या गांवाकडच्या वाड्यातल्या न्हाणीघरात होत्या तशा पाण्याचा हौद, पाणी तापवण्याचा बंब, कळशी, बिंदगी, घमेली, तपेली, तांब्ये, कपडे आपटण्याचा दगड असल्या कोणत्याच वस्तू तिथे नव्हत्या. साधी सांडपाण्याची मोरीसुध्दा नव्हती. इथे तर पायाखालच्या फरशीपासून डोक्यावरच्या छतापर्यंत सगळीकडे भाजलेल्या चिनी मातीचे चौकोनी तुकडे बसवले होते आणि त्याच पदार्थापासून तयार केलेली विचित्र आकाराची परदेशी बनावटीची भांडी होती. पण आणीबाणीची परिस्थिती आलेली असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल विचार करायलाही वेळ नव्हता. त्या जागी आंग्ल संस्कृतीचे झालेले अतिक्रमण सहन करून घेण्याखेरीज
त्या वेळी मला गत्यंतर नव्हते.

पण सकाळी उठल्यावर पहिल्या क्षणी झालेल्या या पराभवाने मी खचून गेलो नाही. अनेक रसायने मिसळून बनवलेले एक लिबलिबीत द्रव्य आणि ते दातांना फासण्याचा बारीक कुंचला या गोष्टींनी दांत घासायची मला संवय होती. रोजच्या वापरातील या गोष्टी मी तिरीमिरीने कचर्‍याच्या पेटीत टाकून दिल्या. गांवाकडून येऊन गेलेल्या कोठल्याशा पाहुण्याने आणलेली माकडछाप काळी भुकटी खणात राहून गेलेली होती. पण तिच्या डब्यावर 'दंतमंजन' या मराठी शब्दाऐवजी आंग्ल भाषेत लिहिलेले शब्द वाचल्यानंतर तिच्या शुद्धतेची खात्री वाटेना.

पूर्वीच्या काळात मराठी माणसे दांत घासण्यासाठी राखुंडीचा उपयोग करतात असे ऐकले होते. पण या राखुंडीत नक्की कशाची राख मिसळलेली असते याची मला कल्पना नव्हती. घरात तर औषधाला वापरतात तसले भस्मसुध्दा नव्हते. "संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी" असे म्हणतात. इथे संन्यास घेण्यासाठी (अंगाला फासायला) राखेपासून तयारी करावी लागणार होती. माझ्या भिकार लिखाणाचे चिटोरे या निमित्ताने जाळून टाकावेत असा एक प्रस्ताव समोर आला, पण त्या राखेने घासून दांत स्वच्छ होतीलच अशी खात्री नव्हती. शिवाय त्यात कांही स्फोटक सामुग्री आहे असे सांगून मी त्यांना वाचवले. कोणीच ते वाचलेले नसल्यामुळे ही थाप पचून गेली.

"तुम्ही आपले दांत मिठाने घासता कां?"असे जाहिरातीतली एक बाई ज्याला त्याला विचारत असते. तेंव्हा साध्या मिठानेच दांत घासावेत असे म्हणून ते आणायला स्वयंपाकघरात गेलो, तेवढ्यात 'ताता ' नावाच्या कोणा पारशाने त्यातही 'आयो'पासून सुरू होणारे एक मूलद्रव्य मिसळले असल्याची जाहिरात कानावर आदळली आणि चिमटीत घेतलेले मीठ टाकून दिले.

खडेमीठ विकत आणण्यासाठी पिशवी घेऊन वाण्याकडे गेलो. तो मुळातला मारवाडी असला तरी माझ्याशी मराठीत बोलायचा. "मला पावशेर खडेमीठ दे" असे त्याला सांगताच तो ताडकन उठून उभा राहिला आणि हळूच माझ्या तोंडाजवळ नाक नेऊन त्याने हुंगून पाहिले. मी पावशेरच काय पण छटाकभर देखील 'मारलेली' नाही याची खात्री करून घेतल्यावर म्हणाला, "शेठ, आता पावशेर, अच्छेर वगैरे राहिले नाहीत. आमचा समदा व्यापार किलोमंदी होतो."
मी म्हंटले, "तुझा होत असेल, पण मी या आंग्ल शब्दांचा उच्चार माझ्या जिभेने करणार नाही." असे म्हणत मी समोरच्या पोत्यातले बचकाभर खडेमीठ उचलून त्याच्या तराजूच्या पारड्यात टाकले आणि त्याचे वजन करून किती पैसे द्यायचे ते सांगायला सांगितले. मराठीसहित बावीस भाषांमध्ये मूल्य लिहिलेले कागदी चलन त्याला दिल्यावर त्याने कांही नाणी परत केली. पण त्यांवर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा होती. त्यामुळे ती न स्वीकारता त्याबद्दल हवे तर मूठभर शेंगदाणे किंवा फुटाणे द्यायला त्याला सांगितले. "अहो, माझी मस्करी करता काय? त्यासाठी आणखी नोटा द्याव्या लागतील." असे म्हणत त्याने एक लिमलेटची गोळी देऊ केली. तिच्या वेस्टनावर सुध्दा 'रावळगाव' असे इंग्रजीत लिहिलेले पाहताच मी ती गोळी दुकानात आलेल्या एका मुलाला देऊन टाकली.

त्या खडेमीठाचे चूर्ण करण्यासाठी माझ्या घरी जाते, पाटा वरवंटा, खलबत्ता असले कांहीच साधन नव्हते. त्यामुळे ते खडे एका रुमालात गुंडाळून त्यांना कुलुपाने ठेचले. त्यात तो रुमाल वाया गेला, कुलुपाचे काय झाले कोणास ठाऊक, पण थोडे चूर्ण मिळाले. ते दांत घासण्यासाठी वापरले. या खटपटीत दोन तीन जागी हिरड्या खरचटल्या जाऊन थोडे रक्तही आले, पण ध्येयाच्या साधनेसाठी रक्त सांडण्यातही एक प्रकारचे दैवी समाधान मिळते असे म्हणतात. त्यामुळे मी माघार घेतली नाही.

"आधी केले, मग सांगितले" हे माझे ब्रीदवाक्य असल्यामुळे माझा कृतनिश्चय मी कोणाला सांगितला नव्हता. घरातील मंडळींनी आपला दिनक्रम सुरू ठेवला होता. रोजच्याप्रमाणेच त्यांनी अमृततुल्य ऊष्ण पेय प्राशन केले. या परकीय पेयाला जरी आपण मराठी नाव दिले असले आणि आता ते भारताच्या इतर राज्यांत मुबलक प्रमाणात पिकत असले तरी महाराष्ट्रासाठी ते परकीयच आहे. त्याच्या सोबतीने आलेली इतर पेये अजून आंग्ल नांवानेच ओळखली जातात. शिवाय त्याच्या बरोबर किंवा त्यात बुडवून खाण्याच्या, भट्टीत भाजलेल्या मैद्याच्या चकत्याही आल्याच. त्यांनी आपले आंग्ल नांव सोडले नसल्यामुळे त्यांचा त्याग करणे आवश्यक होते. त्यामुळे मी स्पष्ट नकार दिला.

स्नान करण्यासाठी न्हाणीघरात गेलो. इथे पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाचा प्रवेश कधी झालाच नव्हता. विद्युल्लतेच्या वहनाला विरोध करून निर्माण होणार्‍या ऊष्णतेचा उपयोग त्यासाठी केला गेला होता. पण त्या साधनाचे इंग्रजी नांवच मला माहीत होते. ते सुरू करावयासाठी अंगुलीस्पर्श करायच्या जागेला मराठीत कळ असे म्हणतात असे ऐकले होते पण घरात कोणीच तसे म्हणत नाहीत आणि बाजारात देखील 'कळ' मागायला गेलो तर मिळत नाही. काय करावे ते न 'कळ'ल्यामुळे 'नळ'राजाची तोटी सोडली आणि थंड पाण्यानेच स्नान करून घेतले. आता मात्र मोठाच प्रश्न समोर उभा राहिला आणि भरीत भर म्हणून डोक्यात एक नवीनच प्रकाश पडला. बहुधा थंड पाण्याच्या स्पर्शाचा परिणाम असावा.

अंग पुसण्यासाठी जे रेषारेषांनी युक्त असे चौकोनी फडके मी ठेवले होते त्याचे फक्त इंग्रजी नांवच मला ज्ञात होते. ते बाजारातून विकत आणल्यापासून ते वापरतांना, धुवून वाळत घालतांना किंवा घडी करून कपाटात ठेवतांना अशा सर्व प्रसंगी त्या अंगपुसण्याचा उल्लेख त्याच्या आंग्ल नांवानेच होत असे. त्याच्या बदल्यात राजापुरी पंचा आणायला हवा होता. एवढेच नव्हे तर माझ्या अतर्वस्त्रावरील 'वायफळ इब्लिस परदेशी' या शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे मला वाकुल्या दाखवीत होती. आतापर्यंत मी बाहेर जातांना जे कपडे अंगात घालत आलो होतो त्यांची नांवे देखील इंग्रजी होती तर घरात वापरात असलेले कपडे परप्रांतातून आलेले होते. मराठी बाणा जपायचा झाल्यास मला कंबरेला पंचा किंवा धोतर गुंडाळून वर कुडते, बाराबंदी, उपरणे असे कांही तरी परिधान करावे लागणार. ही वस्त्रे तर माझ्याकडे नव्हतीच. शिवाय ती कोणत्या दुकानात मिळतात हे सुध्दा मला ठाऊक नव्हते. कासेला लंगोटी बांधण्यासाठी करगोटा देखील नव्हता.

दोन हजार वर्षापूर्वी कोठलासा वेडा शास्त्रज्ञ "सापडले, सापडले" असे ओरडत न्हाणीघरातून निघाला आणि रस्त्यातून विवस्त्र स्थितीत पळत सुटला होता म्हणे. आता मीसुद्धा "कोठे सापडेल कां? कोठे मिळेल कां?" असे ओरडत रस्त्यातून धांवतो आहे या विचाराने मला दरदरून घाम फुटला.

विनोदमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

31 Mar 2008 - 6:13 pm | धमाल मुलगा

ज ह ब ह र्‍या!!!!

खर॑च अस॑ होत॑ बॉ!
कधी-मधी मलाही असा शुद्ध मराठीचा झटका येतो आणि मग मी घरादाराला वात आणतो :-)

पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह॑! कारण काय आहे ना, की हल्ली मराठी वर्डस् रिमे॑बर करायला स्लाईटली डिफिकल्टच जात॑ हो. आता वर्डस् ची ही कथा तर तुम्हाला वस्तु काय मिळणार कप्पाळ?

बाकी, एकदम खुसखुशीत लेख हो!

आवडला आपल्याला.

आपला,
- (मराठीत) ध मा ल.

सहज's picture

31 Mar 2008 - 7:30 pm | सहज

मजेशीर लेख आवडला.

:-)

विद्याधर३१'s picture

31 Mar 2008 - 7:47 pm | विद्याधर३१

लेख मनापासून आवडला.....

आपला ( मराठीप्रेमी )विद्याधर

ब्रिटिश टिंग्या's picture

31 Mar 2008 - 10:09 pm | ब्रिटिश टिंग्या

लेख मनापासुन आवडला....

सृष्टीलावण्या's picture

31 Mar 2008 - 10:35 pm | सृष्टीलावण्या

दादरला सुप्रसिद्ध कबुतरखाना आहे. तिथली दादरभर शीटा टाकत फिरणारी कबुतरे आणि त्यांचे
जैन बांधवांकडून होणारे अवास्तव लाड हा समस्त जुन्या दादरकरांचा रागाचा विषय आहे. तिथे जवळच एक राम मंदीर आहे.

एकदा माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी शीवहून येताना एक राममंदीर द्या असे थाटात त्या
थांब्याचे नाव सांगितले. त्यावर बस वाहकाच्या मेंदूची चक्र विचार करकरून थकली शेवटी तो म्हणाला, कुठे आले हे राममंदीर...

त्यावर ह्यांनी त्या वाहकाला जवळपासच्या सगळ्या खुणा सांगितल्या. शेवटी तो कंटाळून म्हणाला, अहो काका, त्यापेक्षा कबुतरखाना म्हणाला असतात तर लगेच कळले असते.

त्यावर ते मराठी-अभिमानी काका म्हणाले, काही नाही हो सकाळी सकाळी रामाचे नाव घेत होतो.

तो बसवाहक असला तडकला.

>
>
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 11:19 pm | प्रभाकर पेठकर

बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी.......

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 11:19 pm | प्रभाकर पेठकर

बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी.......

सर्किट's picture

31 Mar 2008 - 11:51 pm | सर्किट (not verified)

बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी.......

जेव्हा राम वनवासासाठी नाशिकजवळ आला होता, तेव्हाही एक "परप्रांतीयाविरुद्ध आंदोलन" झाले होते, असे ऐकिवात आहे.

काही दाक्षिणात्य अतिरेक्यांनी तर ह्या परप्रांतीयाची बायकोच पळवून नेली म्हणतात !

कारण हे परप्रांतीय दक्षिणेत येऊन येथील दाक्षिणात्यांच्या चरितार्थाची साधने, म्हणजे यज्ञात विघ्ने निर्माण करणे, वगैरे हिरावून घेत होते !

- सर्किट

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 11:25 pm | प्रभाकर पेठकर

लेख मस्त आहे. बरीच करमणूक केली. मराठी भाषेने दुकान, रुमाल, मैदान पासून कोण कोणते शब्द दुसर्‍या भाषेतून घेतले आहेत ह्यावर विचार करून 'शुद्ध मराठीत' बोलायला गेले तर कोणाला कळणारही नाही असे वाटते. पण पिढ्या न् पिढ्या रुळलेले शब्द, पँट-शर्ट प्रमाणे, स्विकारून जमेल तितके आणि इतरांना समजताना कष्ट पडणार नाहीत इतके मराठी बोलत राहावे आणि निदान ह्या पुढे तरी मराठीचा र्‍हास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कसें?

धनंजय's picture

1 Apr 2008 - 10:09 pm | धनंजय

खुसखुशीत तर आहेच - वाचणार्‍यांसाठी विचारप्रवर्तकही व्हावा ही आशा करूया.

कोलबेर's picture

1 Apr 2008 - 11:47 pm | कोलबेर

लेख आवडला!

मस्तच आहे. डोळ्यात काजळ घालतोय असे सांगून अंजन घालणारा!;)
धनंजयशी सहमत.

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Apr 2008 - 11:27 pm | llपुण्याचे पेशवेll

मला पण असेच म्हणायचे होते. पण नेमक्या शब्दात चतुरंगरावानी प्रतिक्रिया लिहीली आहे.
पुण्याचे पेशवे

स्वाती राजेश's picture

1 Apr 2008 - 10:16 pm | स्वाती राजेश

आज पासून आपण वरील लेखका प्रमाणे वागायला लागलो तर? :))))
व्वा काय धमाल येईल नाही?

धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून)

धमाल मुलगा's picture

2 Apr 2008 - 11:56 am | धमाल मुलगा

धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून)

स्वातीताई,
मि.पा. च्या सदस्याचे नाव =धमाल = मजा/गंमत हाच अर्थ घ्यावा.
ही णम्र इन॑ती!

-ध मा ल (= मजा + ग॑मत)

सचिन's picture

1 Apr 2008 - 10:20 pm | सचिन

जोक्स अपार्ट्...पण खरंच विचार करायला लावणारा लेख.
अरेच्या !! पहिलेच दोन शब्द आपोआप आंग्ल भाषेतले आले की !

प्राजु's picture

2 Apr 2008 - 12:20 am | प्राजु

अगदि मनापासून..
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

भोचक's picture

2 Apr 2008 - 10:47 am | भोचक

मस्त धमाल आणि खुसखुशीत लेख.

आनंद घारे's picture

2 Apr 2008 - 11:26 am | आनंद घारे

मी कांही भाषातज्ञ नाही. पण माझ्या मते भाषा प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी. इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात किती नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे. आपण ते सगळे सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना जीभ अडखळेल .

आपण ठरवू किंवा न ठरवू , आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, ज्या शब्दात मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आता ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न त-हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणा-याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते.

आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यांना त्यातून कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाचे थोडे पालन करणे आवश्यक असते.