मी मराठी
भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी कानावर पडतात. त्यातच 'भय्या' लोकांची हिंदी देखील मराठी भाषेत आपले 'हात पाय पसरू' लागली आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे या सार्या
प्रसारमाध्यमांमधून आपल्याला इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचाच खुराक रोज मिळत आहे. त्यामुळे आपली भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.
अशा प्रकारचे लेख वाचून आणि तेच विचार डोक्यात घेऊन पडल्या पडल्या मला एक बारीकसा साक्षात्कार झाला आणि इतर भाषेतील शब्द मराठी भाषेत कां शिरू लागले आहेत याचे मुख्य कारण काय असावे ते माझ्या लक्षात आले. आजकाल आपण आपल्या परंपरागत चालीरीती सोडून नवनव्या परकीय गोष्टींचा उपयोग रोजच्या जीवनात करू लागलो आहोत आणि त्या वस्तू आपापल्या नांवानिशी आपल्या जीवनात येऊन आपली भाषा भ्रष्ट करीत आहेत हे एक महत्वाचे कारण बहुधा त्याच्या मुळाशी आहे. तेंव्हा 'मूले कुठारः ' घालून निदान माझ्यापुरता हा प्रश्न निकालात काढायचा असे मी ठरवले. (संस्कृत भाषा मराठीची जननी असल्यामुळे मराठी भाषेला संस्कृत भाषेचे प्रदूषण चालते, किंबहुना ती समृध्द झाल्यासारखे वाटत असावे.) त्यानंतर मला जराशी शांत झोप लागली.
सकाळी उठून स्वच्छतागृहात गेलो. आमच्या गांवाकडच्या वाड्यातल्या न्हाणीघरात होत्या तशा पाण्याचा हौद, पाणी तापवण्याचा बंब, कळशी, बिंदगी, घमेली, तपेली, तांब्ये, कपडे आपटण्याचा दगड असल्या कोणत्याच वस्तू तिथे नव्हत्या. साधी सांडपाण्याची मोरीसुध्दा नव्हती. इथे तर पायाखालच्या फरशीपासून डोक्यावरच्या छतापर्यंत सगळीकडे भाजलेल्या चिनी मातीचे चौकोनी तुकडे बसवले होते आणि त्याच पदार्थापासून तयार केलेली विचित्र आकाराची परदेशी बनावटीची भांडी होती. पण आणीबाणीची परिस्थिती आलेली असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल विचार करायलाही वेळ नव्हता. त्या जागी आंग्ल संस्कृतीचे झालेले अतिक्रमण सहन करून घेण्याखेरीज
त्या वेळी मला गत्यंतर नव्हते.
पण सकाळी उठल्यावर पहिल्या क्षणी झालेल्या या पराभवाने मी खचून गेलो नाही. अनेक रसायने मिसळून बनवलेले एक लिबलिबीत द्रव्य आणि ते दातांना फासण्याचा बारीक कुंचला या गोष्टींनी दांत घासायची मला संवय होती. रोजच्या वापरातील या गोष्टी मी तिरीमिरीने कचर्याच्या पेटीत टाकून दिल्या. गांवाकडून येऊन गेलेल्या कोठल्याशा पाहुण्याने आणलेली माकडछाप काळी भुकटी खणात राहून गेलेली होती. पण तिच्या डब्यावर 'दंतमंजन' या मराठी शब्दाऐवजी आंग्ल भाषेत लिहिलेले शब्द वाचल्यानंतर तिच्या शुद्धतेची खात्री वाटेना.
पूर्वीच्या काळात मराठी माणसे दांत घासण्यासाठी राखुंडीचा उपयोग करतात असे ऐकले होते. पण या राखुंडीत नक्की कशाची राख मिसळलेली असते याची मला कल्पना नव्हती. घरात तर औषधाला वापरतात तसले भस्मसुध्दा नव्हते. "संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी" असे म्हणतात. इथे संन्यास घेण्यासाठी (अंगाला फासायला) राखेपासून तयारी करावी लागणार होती. माझ्या भिकार लिखाणाचे चिटोरे या निमित्ताने जाळून टाकावेत असा एक प्रस्ताव समोर आला, पण त्या राखेने घासून दांत स्वच्छ होतीलच अशी खात्री नव्हती. शिवाय त्यात कांही स्फोटक सामुग्री आहे असे सांगून मी त्यांना वाचवले. कोणीच ते वाचलेले नसल्यामुळे ही थाप पचून गेली.
"तुम्ही आपले दांत मिठाने घासता कां?"असे जाहिरातीतली एक बाई ज्याला त्याला विचारत असते. तेंव्हा साध्या मिठानेच दांत घासावेत असे म्हणून ते आणायला स्वयंपाकघरात गेलो, तेवढ्यात 'ताता ' नावाच्या कोणा पारशाने त्यातही 'आयो'पासून सुरू होणारे एक मूलद्रव्य मिसळले असल्याची जाहिरात कानावर आदळली आणि चिमटीत घेतलेले मीठ टाकून दिले.
खडेमीठ विकत आणण्यासाठी पिशवी घेऊन वाण्याकडे गेलो. तो मुळातला मारवाडी असला तरी माझ्याशी मराठीत बोलायचा. "मला पावशेर खडेमीठ दे" असे त्याला सांगताच तो ताडकन उठून उभा राहिला आणि हळूच माझ्या तोंडाजवळ नाक नेऊन त्याने हुंगून पाहिले. मी पावशेरच काय पण छटाकभर देखील 'मारलेली' नाही याची खात्री करून घेतल्यावर म्हणाला, "शेठ, आता पावशेर, अच्छेर वगैरे राहिले नाहीत. आमचा समदा व्यापार किलोमंदी होतो."
मी म्हंटले, "तुझा होत असेल, पण मी या आंग्ल शब्दांचा उच्चार माझ्या जिभेने करणार नाही." असे म्हणत मी समोरच्या पोत्यातले बचकाभर खडेमीठ उचलून त्याच्या तराजूच्या पारड्यात टाकले आणि त्याचे वजन करून किती पैसे द्यायचे ते सांगायला सांगितले. मराठीसहित बावीस भाषांमध्ये मूल्य लिहिलेले कागदी चलन त्याला दिल्यावर त्याने कांही नाणी परत केली. पण त्यांवर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा होती. त्यामुळे ती न स्वीकारता त्याबद्दल हवे तर मूठभर शेंगदाणे किंवा फुटाणे द्यायला त्याला सांगितले. "अहो, माझी मस्करी करता काय? त्यासाठी आणखी नोटा द्याव्या लागतील." असे म्हणत त्याने एक लिमलेटची गोळी देऊ केली. तिच्या वेस्टनावर सुध्दा 'रावळगाव' असे इंग्रजीत लिहिलेले पाहताच मी ती गोळी दुकानात आलेल्या एका मुलाला देऊन टाकली.
त्या खडेमीठाचे चूर्ण करण्यासाठी माझ्या घरी जाते, पाटा वरवंटा, खलबत्ता असले कांहीच साधन नव्हते. त्यामुळे ते खडे एका रुमालात गुंडाळून त्यांना कुलुपाने ठेचले. त्यात तो रुमाल वाया गेला, कुलुपाचे काय झाले कोणास ठाऊक, पण थोडे चूर्ण मिळाले. ते दांत घासण्यासाठी वापरले. या खटपटीत दोन तीन जागी हिरड्या खरचटल्या जाऊन थोडे रक्तही आले, पण ध्येयाच्या साधनेसाठी रक्त सांडण्यातही एक प्रकारचे दैवी समाधान मिळते असे म्हणतात. त्यामुळे मी माघार घेतली नाही.
"आधी केले, मग सांगितले" हे माझे ब्रीदवाक्य असल्यामुळे माझा कृतनिश्चय मी कोणाला सांगितला नव्हता. घरातील मंडळींनी आपला दिनक्रम सुरू ठेवला होता. रोजच्याप्रमाणेच त्यांनी अमृततुल्य ऊष्ण पेय प्राशन केले. या परकीय पेयाला जरी आपण मराठी नाव दिले असले आणि आता ते भारताच्या इतर राज्यांत मुबलक प्रमाणात पिकत असले तरी महाराष्ट्रासाठी ते परकीयच आहे. त्याच्या सोबतीने आलेली इतर पेये अजून आंग्ल नांवानेच ओळखली जातात. शिवाय त्याच्या बरोबर किंवा त्यात बुडवून खाण्याच्या, भट्टीत भाजलेल्या मैद्याच्या चकत्याही आल्याच. त्यांनी आपले आंग्ल नांव सोडले नसल्यामुळे त्यांचा त्याग करणे आवश्यक होते. त्यामुळे मी स्पष्ट नकार दिला.
स्नान करण्यासाठी न्हाणीघरात गेलो. इथे पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाचा प्रवेश कधी झालाच नव्हता. विद्युल्लतेच्या वहनाला विरोध करून निर्माण होणार्या ऊष्णतेचा उपयोग त्यासाठी केला गेला होता. पण त्या साधनाचे इंग्रजी नांवच मला माहीत होते. ते सुरू करावयासाठी अंगुलीस्पर्श करायच्या जागेला मराठीत कळ असे म्हणतात असे ऐकले होते पण घरात कोणीच तसे म्हणत नाहीत आणि बाजारात देखील 'कळ' मागायला गेलो तर मिळत नाही. काय करावे ते न 'कळ'ल्यामुळे 'नळ'राजाची तोटी सोडली आणि थंड पाण्यानेच स्नान करून घेतले. आता मात्र मोठाच प्रश्न समोर उभा राहिला आणि भरीत भर म्हणून डोक्यात एक नवीनच प्रकाश पडला. बहुधा थंड पाण्याच्या स्पर्शाचा परिणाम असावा.
अंग पुसण्यासाठी जे रेषारेषांनी युक्त असे चौकोनी फडके मी ठेवले होते त्याचे फक्त इंग्रजी नांवच मला ज्ञात होते. ते बाजारातून विकत आणल्यापासून ते वापरतांना, धुवून वाळत घालतांना किंवा घडी करून कपाटात ठेवतांना अशा सर्व प्रसंगी त्या अंगपुसण्याचा उल्लेख त्याच्या आंग्ल नांवानेच होत असे. त्याच्या बदल्यात राजापुरी पंचा आणायला हवा होता. एवढेच नव्हे तर माझ्या अतर्वस्त्रावरील 'वायफळ इब्लिस परदेशी' या शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे मला वाकुल्या दाखवीत होती. आतापर्यंत मी बाहेर जातांना जे कपडे अंगात घालत आलो होतो त्यांची नांवे देखील इंग्रजी होती तर घरात वापरात असलेले कपडे परप्रांतातून आलेले होते. मराठी बाणा जपायचा झाल्यास मला कंबरेला पंचा किंवा धोतर गुंडाळून वर कुडते, बाराबंदी, उपरणे असे कांही तरी परिधान करावे लागणार. ही वस्त्रे तर माझ्याकडे नव्हतीच. शिवाय ती कोणत्या दुकानात मिळतात हे सुध्दा मला ठाऊक नव्हते. कासेला लंगोटी बांधण्यासाठी करगोटा देखील नव्हता.
दोन हजार वर्षापूर्वी कोठलासा वेडा शास्त्रज्ञ "सापडले, सापडले" असे ओरडत न्हाणीघरातून निघाला आणि रस्त्यातून विवस्त्र स्थितीत पळत सुटला होता म्हणे. आता मीसुद्धा "कोठे सापडेल कां? कोठे मिळेल कां?" असे ओरडत रस्त्यातून धांवतो आहे या विचाराने मला दरदरून घाम फुटला.
वाचने
10443
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
वाह...
आवडला
छान ...............
हेच म्हणतो....
माझा अनुभव
उत्तरप्रदेशी...
उत्तरप्रदेशी...
In reply to उत्तरप्रदेशी... by प्रभाकर पेठकर
:-)
मस्त...
मस्त
In reply to मस्त by धनंजय
असेच
कसा काय निसटून गेला वाचायचा?
In reply to कसा काय निसटून गेला वाचायचा? by चतुरंग
अगदी सहमत..
छान लेख...
In reply to छान लेख... by स्वाती राजेश
:-))
चांगला लेख !
खूप आवडला लेख.
खुसखुशीत
भाषा