नदीकाठी सासूरवाशीण
अल्याड आहे सासर माझं,
पल्याड माहेरा पाहते
मधी वाहे चंद्रभागा,
त्यात धुनं मी गं धुते ||
पानी वाहे दुधगंगा,
जसं अमृताच्या चवीचं
त्याची गोडी काय सांगू,
त्याची गोडी अविट ||
नदीकाठची शाळू वाळू,
बारीक बारीक
मदी आसतील गोटे,
बी संगे खारीक ||
माहेर मोठं दांडगं,
नाही कसली वनवा
सासर बाई आसलं द्वाड,
त्याला कसली पर्वा ||
सोडले मोकळे पाय
नदीच्या ग पान्यात,
ऐन्यात रूप दिसे,
रूपे सोनेजडीत ||
जा ग माय जा ग माय,
अशीच ग तू वाहत
भरव तुझ्या लेकरांना,
चारा देई दुष्काळात ||
कितीकदा येते मी ग,
तुझ्या भरलेल्या काठाशी
गर्दी कितीका आसंना,
धरते मला पोटाशी ||
नदी बाई तू अन मी ग,
एकसारखे वाही पानी
तू धूते जनांचे पापं,
मी धूते माझी धूनी ||
ऐकते का ग सारं काही,
जे बोल मी बोलते
काय नको वाटून घेवू,
संन्याशीन तू तूझं कर्म करते ||
नदी काठी आली मी ग,
आहे सासूरवाशीण
सांगे आपली सुखदु:ख्ख,
पिंजर्यातील पक्षीण ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०५/२०१०
प्रतिक्रिया
29 May 2010 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली . काही ओळींमधे 'यमकांची' मशागत कमी पडली असे वाटते.
गावाकडील नदीच्या काठावरील चित्र डोळ्यासमोर आले...!
नदी काठी आली मी ग,
आहे सासूरवाशीण
सांगे आपली सुखदु:ख्ख,
पिंजर्यातील पक्षीण ||
सुंदर....!
-दिलीप बिरुटे
29 May 2010 - 12:36 pm | पाषाणभेद
अचूक निरीक्षण. कवी म्हणून थोडे स्वातंत्र घेतले आहे.
विरस झाला असेल तर क्षमस्व.
दुरूस्ती केली आहे. कृपया कशी वाटते ते सांगा.
मागे असल्याच वाटेने जाणारी (सासूरवाशीण नसणारी) कविता केलेली होती. पण तिचा कागूद काय गावंना झालाय. म्हून ही कविता केली. पण यात हिरवीन सासूरवाशीण होवून गेली. चालायचंच.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
29 May 2010 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>विरस झाला असेल तर क्षमस्व.
विरस वगैरे काही नाही रे बाबा...! :)
मला कवितेतला भाव आवडला. [आणि आता केलेला बदलही आवडला]
अजून एक गोष्ट सांगायची राहिली होती. नुसते 'सासूरवाशीण' शिर्षक मस्त जमले असते. कवितेतला आशयच जर नदीकाठाच्या निमित्तानं व्यक्त होतोय तर 'नदीकाठी' हा शब्दच 'घुसाडायला' नको होता असे वाटले. आणि कविता काही एका सासूरवाशीणीची नाही. तर सार्याच गावातल्या सुना तिथं धुनं [सार्याच अर्थांनी] ;) धुवायला जमल्या आहेत. मग माहेरच्या गप्पा, सासरच्या गप्पा, नदीशी बोलणं, या सार्या गोष्टी तिथे येतात, असेही वाटले.
आपल्या कवितेवरुन बहिणाबाईची 'सासुरवाशीण' आणि 'माहेराच्या' अशाच काही शिर्षक असलेल्या कवितांची आठवणही झाली. [आता पुस्तक आणि त्या ओळी शोधायचं जरा जिवावर आलं राव...! ]
अवांतर : कविता आवडली म्हणून 'दिल की बाते' टंकली. तेव्हा काही गैरसमज नको. नाही तर, आवडली, छान, मस्त, और भी आने दो, असे पर्याय नेहमीच असतात. :)
-दिलीप बिरुटे
29 May 2010 - 4:43 pm | राजेश घासकडवी
नदीशी जोडलेलं भावविश्व आवडलं. बिरुटेंनी लिहिलेल्याशी सहमत.
29 May 2010 - 5:50 pm | मीनल
ती बाई ` धुणे धुणारी``हे सुरवातीलाच वाचून काहीसे आवडले नाही .
कडवी वार खाली करावीत असे वाटते.
आधी नदी कशी आहे ते सांगून मग ही स्त्री तिथे काय करते आहे , त्यांच्याती ल साधर्म्य ,फरक , व्यथा मांडायली हवी होती.
भावना ,कवितेचा आशय वाखाणण्याजोगा आहे यात दुमत नसावे.
अवांतर : कविता आवडली म्हणून 'दिल की बाते' टंकली. तेव्हा काही गैरसमज नको. नाही तर, आवडली, छान, मस्त, और भी आने दो, असे पर्याय नेहमीच असतात.
मला तर ह्य प्रतिक्रिया वाचण्याचाच कंटाळा येतो. मी ही देते क धी तरी. टंकायचा कंटाळा आला असेल तर.
पण शक्य असेल तेव्हा अधिक चांगली प्रतिक्रिया लिहिण्याचा निदान प्रयत्न तरी करते.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
29 May 2010 - 7:01 pm | पाषाणभेद
बाई जरी 'धुणे धुणारी ' असली तरी ती एक सासूरवाशीण आहे अन तिचे सासर माहेर अल्याड पल्याड आहे. या कवितेत ते महत्वाचे आहे. तरच कवितेत प्रवेश होवू शकतो. अन ग्रामीण भाग असो की शहरी भाग धुणे धुणे सामान्य गोष्ट आहे. (प्रतितयश मॉडर्न विचार, केवळ कामवाल्या बाईचीच प्रतिमा, नदीचे प्रदूषण हे विषय बाजूला ठेवून.) ग्रामिण भागात अल्याडपल्याड सासर माहेर असते. मी ते जवळून अनूभवलेय. नदीवर 'धुणे धुणे' हे केवळ 'धुणे धुणे' राहत नाही ते एक सुखदु:ख व्यक्त करण्याचे ठिकाण असते. काही बाया चहाडी करतात पण आपली हिरवीन येथे नदीशी गुजगोष्टी करते. त्यातूनच ती नदीशी बोलते. म्हणूनच पहीले कडवे अपरिहार्यपणे पहिल्यांदा येते.
गैरसमज तर कधीच नसणार! तुम्ही एवढी 'खुलके' प्रतिक्रिया दिली म्हणून मी ही हिरवीनचे मन उलगडवले.
बाकी तुम्ही एवढ्या मन लावून कविता वाचलीत यातच माझे कौतूक आहे.
अन प्रा. बिरूटे सर, राजेश सो. अन ताई मार्गदर्शनाबद्दल, प्रतिक्रियांबद्दल तुमचे जाहीर आभार.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही