आनंद - टोपालोव : सामना ३

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
29 Apr 2010 - 8:02 pm

आनंद - टोपालोव : सामना १
आनंद - टोपालोव : सामना २
------------------------------------------------------------------------
सोमवार दि. २६ एप्रिलच्या एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दोघे खेळाडू एकमेकाला भिडण्यासाठी आसुसले असणार हे गृहित होते. गमावलेली आघाडी पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी टोपा निकराचे प्रयत्न करणार हे सांगायची आवश्यकताच नव्हती त्यात त्याची बाजू पांढरी. आनंद आज बरोबरीसाठी जाण्याची शक्यता बरीच मोठी होती. झालंही तसंच डाव बरोबरी झाला.

खरंतर बरोबरीत सुटलेल्या ह्या सामन्यात असं काय थरारक असणार असं वाटेल पण टोपा हल्ल्यामागून हल्ले कसे चढवतो आणि आनंद अभेद्य बचाव कसा करतो हे पाहूयात. अत्यंत थंड डोक्याने प्रतिस्पर्ध्याचा एकेक हल्ला कसा परतवून लावावा याचं हा डाव म्हणजे प्रात्यक्षिक आहे. पाहूयात डाव ३ -

खाली दिलेल्या दुव्यावरील डाव एका खिडकीत उघडा आणि एकेक खेळी करुन त्याचवेळी रसग्रहण वाचा आणि डावाचा लुत्फ घ्या! ;)
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1581334

पुन्हा एकदा वजिराचे प्यादे २ घरे पुढे आलं आणि डावाला सुरुवात झाली. (टोपालोव 'क्लोज्ड गेम्स' प्रकारानेच खेळत आहे. वजीरापुढचे प्यादे सरकवणे म्हणजे क्लोज्ड गेम. सर्वसाधारणपणे ह्या दर्जाच्या सामन्यात राजाचे प्यादे सरकवून खेळला जाणारा ओपन गेम खेळला जात नाही, त्या प्याद्याला लगेच जोर नसतो, उलट वजिराच्या प्याद्याला वजिराचा जोर असतो इ..).

1. डी ४, डी५
2.सी ४
डाव क्वीन्स गँबिटकडे गेला. (हे ओपनिंग १९२०-१९३० च्या दरम्यान अतिशय विकसित झालं. होजे राऊल कापाब्लांका आणि अलेक्झांडर अलेखाईन (ह्या अलेखाईनबद्दल लिहायचंय एकदा) ह्या दोन महारथींच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३४ पैकी तब्बल ३२ डाव ह्या प्रकाराने खेळले गेले!!)

सी ६ खेळी करुन आनंदने स्लाव बचाव स्वीकारला. (ह्या बचावाला स्लाव बचाव म्हणायचे कारण असे की इंडो-यूरोपिअन भाषिक आणि वांशिक धाग्यातून उदयाला आलेल्या काही महान स्लाविक खेळाडूंनी हा बचाव विकसित केला होता. ह्यात अलेखाईन सुद्धा होता!) असो.

डाव पुस्तकाप्रमाणे चालला होता. (इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की आनंद, कास्पारोव, कारपोव अशा महान खेळाडूंचे डोके हे महासंगणक असते. हजारो, अक्षरशः हजारो डाव त्यातल्या प्रत्येक चाल आणि त्यातली वेरिएशन्स सकट त्यांच्या लक्षात असतात आणि ऐन सामन्यात त्यातली कित्येक वेरिएशन्स ते डाव चालू असताना पटावर विज्युअलाईज करत असतात!)
तर सहाव्या खेळी आनंदने ई६ अशी वेगळी खेळी केली (सामान्यपणे इथे वजिराचा घोडा पुढे येतो). नंतरच्या तीन खेळ्या ह्या पटाचा मध्य बळकावण्यासाठी झाल्या. पांढर्‍याच्या अकराव्या खेळी अखेरची स्थिती अशी - वजिरावजिरी झालेली आहे. टोपालोवचा उंट आणी दोन घोडे डावाच्या मध्यात विराजमान झाले आहेत दुसरा उंटही विकसित झालेला आहे. त्याच्याकडे एक प्यादं कमी आहे. उलट एक उंट आणि घोडा सोडता आनंदची बाकी मोहरी विकसित नाहीत. सी ५ वरचं प्यादंही बिनजोराचं बसलंय.

आता डावाचा मध्य आलाय. मोहोर्‍यांची प्रगती आणि पटाच्या मध्यावरचे वर्चस्व ह्या दोन हेतूंनी पुढल्या चाली झाल्या. १६ व्या खेळी अखेर पटाच्या मध्यावर दोन प्रभावी उंट, एक घोडा, सी स्तंभात आलेला एक हत्ती - समन्वयातला दुसरा हत्ती, राजाच्या बाजूची सुरक्षित प्यादे साखळी अशी स्थिती पांढर्‍याची आहे. आनंदचा डावही बर्‍यापैकी विकसित आहे. त्याच्या मुख्य अडचणी दोन - एक म्हणजे फक्त तिसर्‍या पट्टीपर्यंत सीमित असलेली प्रगती आणि दुसरी फारशी हालचाल करु न शकणारा पांढरा उंट आहेत. त्याचाच फायदा टोपाने घेतला
एच ५!, बी एच ७
पांढरा उंट नाईलाजाने अतिशय विचित्र अवस्थेत कोपर्‍यात ढकलला गेला.
ए ५ प्यादे पुढे ढकलून टोपाने पाचव्या पट्टीत आता दोन प्यादी केली. वजिराच्या बाजूला आता हल्ल्याची तयारी सुरु आहे. काळ्याने जर वेळेत त्याचा कोपर्‍यात गेलेला पांढरा उंट प्रबळ अवस्थेत आणला तरच त्याला बरोबरीचा उजेड दिसेल अन्यथा परिस्थिती हळूहळू अवघड होत जाईल!

पुढच्या दोन खेळ्यात घोडा ए ४ मधे पुढे दामटणे, बी ४ असे प्यादे दामटणे असे पांढर्‍याने केले आणि ई ५ अशी पांढर्‍या प्याद्याची आगेकूच रोखण्यासाठी एफ ३ अशी खेळी आणि हत्ती सी स्तंभात नेऊन बसवणे ही दोन कामे काळ्याने केली. (इथे पांढर्‍याचे बी ४ चे प्यादे बिनजोराचे दिसते आहे पण ते विषारी प्यादे आहे कारण डी ६ मधल्या उंटाने ते खाल्ले तर पांढरा हत्ती बी स्तंभातून सातव्या पट्टीत मुसंडी मारतो आणि काळ्याचा डाव खिळखिळा करतो.)
२४ व्या खेळीअखेरीस दोघांचे काळे उंट आणि राहिलेले घोडे मारामारी झाले होते. पांढर्‍याची तीन प्यादी पाचव्या पट्टीत सरकली होती.
२५ व्या खेळीला आनंद बी जी ८ असा खेळला. (जालावर चालींचे विश्लेषण सुरु असताना अनेकांना प्रश्न पडला की आनंदने हत्तीला डी ४ घरात मुसंडी मारायला का पाठवले नाही? त्याचे कारण, पांढर्‍याचे उंट - हत्ती ही प्रबळ युती आणी 'ए' व 'सी' स्तंभातली पाचव्या पट्टीतली प्यादी हे आहे.)
बीज़ी ८ ही खेळी किती महत्त्वाची होती हे थोड्या वेळात कळेलच.

टोपालोव एक सुंदर खेळी खेळला सी ६! प्यादे पुढे ढकलले. (ह्या प्याद्याला सहज गिळंकृत करता येऊ शकते कारण त्याल एकच जोर आहे पण त्यानंतर काही चालीत काळ्याचा डाव जातो. एक चुणूक बघा - काळ्याची खेळी आर x सी६, आर x सी६, बी x सी६ आता लगेच पांढरा त्याचा हत्ती बी १ मधे आणतो! पुढच्या खेळीत हत्ती बी ६ आणि त्याच्या पुढच्या खेळीत ए ६ चे काळे प्यादे पडते. पांढर्‍याचे ए ५ वरचे प्यादे मुक्त प्यादे झाले त्याचा वजीर कोणीही रोखू शकत नाही. काळ्याचा उंट कोपर्‍यात खितपत पडलाय!) आनंदचा संयम बघा किती वाखाणण्याजोगा आहे. पांढर्‍याची सारी आमिषे, हल्ले तो स्थितप्रज्ञपणे हाताळतो आहे. अजूनही तो नाजूक अवस्थेतून बाहेर पडलेला नाही पण तरीही तो दडपणाला समर्थपणे तोंड देतो आहे!

आर डी ६ आनंदची अतिशय चांगली खेळी. पास्ड पॉन (मुक्त प्यादे) आणि पांढर्‍या हत्तीची घुसखोरी दोन्ही एकाच खेळीत रोखले. सत्तावीस खेळ्यात बी ७ आणि सी ६ अशी प्याद्यांची मारामारी झाली. आता पांढरा हत्ती सी ३ असा सरकला - एच स्तंभातला हत्ती सी स्तंभात आणून दुहेरी करायचा घाट घातला जातोय!
बी एफ ७ आनंदच्या उंटाने त्या खेळीला चाप लावला!! हत्तीने एच स्तंभ सोडला तर त्याचे प्यादे धोक्यात येते. (समजले आधीच्या बी जी ८ खेळीचे महत्त्व?)
टोपाला झकत वाट बघणे आले. संभाव्य शह टाळण्यासाठी तो राजा ई ३ मधे घेऊन गेला. ह्या पुढची आनंदची खेळी सुद्धा सुरेख आहे बी ई ८! किती गोष्टी साध्य झाल्या आहेत बघा - उंटाच्या शक्तीचा पूर्ण वापर एका ऐवजी दोन कर्ण धरुन ठेवले, पांढर्‍या एच ५ प्याद्यावरची धमकी अजून टिकवून आहे, जर पांढरा हत्ती मुसंडी मारुन आलाच तर उंटाच्या मागे लपायला राजाला एक जागा झाली, ही एक वाट बघणारी खेळी सुद्धा आहे कारण पांढरा नेमका काय खेळणार आहे त्यानुसार दोन्ही हत्ती हवे तिथे जाउ शकतात. (ज्या वेळी परिस्थिती अशी तरल असते त्यावेळी समोरच्याला आधी कमिट करायला लावायचे हा दोघांचा उद्देश असतो. कोणत्याही एका चालीने डावाचे पारडे अचानक झुकू शकते. हे मानसिक आणि पटावरचे द्वंद्व एकाच वेळी सुरु असते! क्या बात है!! अंगावर शहारे येतात अशावेळी!!)

जी ४ प्यादे पुढे सरकले कारण एच ५ मधे जोर देऊन हत्ती तिथून हलवणे पांढर्‍याला भाग आहे. ई ५ पांढर्‍या राजाची एफ ४ मधली संभाव्य आगेकूच थांबवली. आर सी १ पांढर्‍याने हत्ती दुहेरी केले. उंटाचं एच ५ प्याद्यावर लक्ष द्यायचे काम संपलेच होते, आनंदची अप्रतिम खेळी बी डी ७!! एच ७ ह्या कोपर्‍यातल्या घरात अडकलेला उंट चार खेळ्यात नागमोडी हलवत त्याने डी ७ मधे आणून डावाच्या महत्त्वाच्या क्षणी हवा तिथे विराजमान केला, तोही संपूर्ण डावाचा तोल कुठेही जाऊ न देता. काय कमालीचं कौशल्य आहे!! (सच्यानं ब्रेट ली च्या १५० किमि वेगाने येणार्‍या चेंडूला स्ट्रेट ड्राईवचा 'तडका' मारुन चौकाराची वाट पकडायला लावावी तसंच आहे हे!!).

आता स्थिती बघा - काळा राजा सुरक्षित आहे, सगळी प्यादी ही काळ्या घरात आहेत त्यामुळे पांढरा उंट त्यांचं काहीही वाकडं करु शकत नाही. प्याद्यांची साखळी तोडायला पांढरा राजा पुढे घुसु शकत नाही, इतकंच काय तो डी स्तंभातच पाऊल टाकू शकत नाही कारण काळा हत्ती! पांढर्‍याचं पोझीशनल अ‍ॅडवांटेज संपूर्णपणे संपलं आहे. डाव बरोबरीत सुटणार हे नक्की! टोपालोव चडफडत होता. त्याच्या अस्वस्थ हालचालींवरुन हे समजत होतं. तितकाच आनंद शांत होता.

आर सी ५, बी बी ५ - पांढर्‍या उंटावर हल्ला.
बी xबी ५
ए x बी ५
पुढच्या खेळ्यात ए स्तंभातली प्यादी आणि दोन हत्ती ह्यांची मारामारी होते.
चाळिसाव्या खेळी अखेर दोघांकडे ४ -४ प्यादी आणि एकेक हत्ती आहे. आनंद पांढर्‍या राजाला परपीच्युअल चेक देत ठेवणार आणि राजा ई३-एफ२ अशा दोन घरात घोटाळत रहाणार किंवा टोपालोव काळ्या राजाला चेक देणार आणि आनंद एफ्७-एफ८ असा घोटाळणार. प्याद्यांची खेळी कोणी खेळणार नाही.

दहा सेकंद विचार करुन टोपालोवने निराशेने मान हलवली आणि आर्बिटरना (सामना नियंत्रक) बोलावून घेवून सामना बरोबरीची मागणी केली. आनंद तयारच होता. बरोबरी झाली पण खिलाडूपणाला गालबोट लागेल अशा प्रकारे टोपालोव वागला - आनंदशी हस्तांदोलनही न करता तो तडक पटावरुन उठून चालायला लागला!! नुसतेच मोठे खेळाडू आणी असामान्य खेळाडू ह्यातला हाच फरक आहे. असामान्य खेळाडू माणूस म्हणून मोठे असतात आणि म्हणूनच ते रसिकांच्या हृदयावर राज्य करतात. (हस्तांदोलन न करण्याच्या प्रकारावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला - टोपालोव लोकांच्या मनातून उतरला.)

(पुढच्या चौथ्या सामन्यात आनंदने जो काही खेळ दाखवला आहे त्याने त्या सामन्याची गणना आनंदच्या ऑल टाईम ग्रेट सामन्यात व्हावी पण ते उद्या!!)

-चतुरंग

क्रीडाआस्वादलेखमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

29 Apr 2010 - 9:13 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे...

मस्त कलंदर's picture

29 Apr 2010 - 9:56 pm | मस्त कलंदर

+१
बर्‍याचशा गोष्टी डोक्यावरून जात आहेत.. तरीही रंगत येतेय हे नमूद करायलाच हवं!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

हरकत नाही. खेळून बघा डाव हळूहळू समजेल.
आवडतं आहे हे महत्त्वाचं! :)

चतुरंग

श्रावण मोडक's picture

29 Apr 2010 - 10:15 pm | श्रावण मोडक

नक्को. त्याची मला गरज वाटत नाही (म्हणजे खरं सांगायचं तर तितकी बुद्धी नाहीये). कारण, तुमच्या या लेखनातील कंस, करड्या रंगातील वाक्ये यानं जी मजा येतीये आणि (उगाच) डोळ्यांपुढे पट नाचू लागतोय ते मी पहिल्या दोन वाचनात एन्जॉय करतोय. तेवढं खरं तर बास्स. अर्थात, दुसरा डाव खेळून पाहण्याचा प्रयत्न केला होता हे कबूल करून टाकतो...

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2010 - 1:51 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच काहीसे....

बिपिन कार्यकर्ते

बरोबरीचे सामने समजून घेणं थोडं चॅलेंजींग वाटतं (म्हणजे, बरोबरी का दिली गेली, का स्विकारली गेली, ई.)

४थ्या खेळाच्या रसग्रहणाची वाट बघत आहे. साईटवर खेळून बघितला. माझ्या अत्यंत तुटपूंज्या ज्ञानानुसार टोपाचा बचाव खुपच विस्कळीत वाटला. कदाचित आनंदने खिळखिळा केला असेल (पण कसा? तेच जाणून घ्यायचा आहे. प्लिज लवकर टाका.)

आता ३ रा बघतो..

-एक

मी दिलेलं वाक्य बघा -

चाळिसाव्या खेळी अखेर दोघांकडे ४ -४ प्यादी आणि एकेक हत्ती आहे. आनंद पांढर्‍या राजाला परपीच्युअल चेक देत ठेवणार आणि राजा ई३-एफ२ अशा दोन घरात घोटाळत रहाणार किंवा टोपालोव काळ्या राजाला चेक देणार आणि आनंद एफ्७-एफ८ असा घोटाळणार. प्याद्यांची खेळी कोणी खेळणार नाही.

वरच्या डावात हेच कारण आहे बरोबरी मान्य करण्याचं.
----------------------------------------
मटेरिअल/पोझीशनल अ‍ॅडवांटेज आहे का? आणि असेल तर ते डाव जिंकण्याजोगं आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळाच्या नियमावलीनुसार बरोबरी कधी होते हे
http://en.wikipedia.org/wiki/Draw_(chess)
ह्या दुव्यावर बघता येईल.

चतुरंग

छोटा डॉन's picture

29 Apr 2010 - 10:07 pm | छोटा डॉन

चाळिसाव्या खेळी अखेर दोघांकडे ४ -४ प्यादी आणि एकेक हत्ती आहे. आनंद पांढर्‍या राजाला परपीच्युअल चेक देत ठेवणार आणि राजा ई३-एफ२ अशा दोन घरात घोटाळत रहाणार किंवा टोपालोव काळ्या राजाला चेक देणार आणि आनंद एफ्७-एफ८ असा घोटाळणार. प्याद्यांची खेळी कोणी खेळणार नाही.

:)
हे १००% पटले.
ह्या परिस्थितीत कोणीच रिस्क घेणार नाही.
शिवाय प्याद्यांची पोझिशन अशी विचित्र आहे की जो पहिले धाडस करेल त्याचा राजाला असलेला प्याद्यांच्या वॉलचा डिफेन्स संपला.
हत्तीने चेक देत बसण्यातही पॉइन्ट नाही, कारण राजा ठराविक घरातच फिरत राहणार ...

बाकी एकंदरीत गेम मजेशीर वाटला.
दोघांनी भरपुर हाणामारी केली, क्विन-क्विन सॅक्रिफाईज जास्त फायद्याचे नाही पडले, एका प्याद्यासाठी आख्खी क्विन घालवावी लागली.
जास्त गेम समजला नाही पण आम्ही जशी मजे मजेत मारामारी खेळतो तसा वाटला ;)

रंगाशेठ, मस्त लेखमाला आहे.
पुढच्या भागाची वाट पहातो आहे...

दिलेल्या वेबसाईटची लिंकही झक्कास आहे, खुप उपयोगी ;)

------
( आक्रस्ताळा वजिर ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

एक's picture

1 May 2010 - 2:42 am | एक

खेळून बघितलं आणि पटलं..

ऋषिकेश's picture

30 Apr 2010 - 1:24 am | ऋषिकेश

विकीवर तुम्ही दिलेल्या धाग्यात क्विंन्स गँबिटला उत्तर देताना c6 आणि e6 हे कोणत्याही क्रमाने खेळले गेल्यास त्यास स्लाव बचाव न म्हणता सेमी स्लाव्स म्हणतात असं दिलं आहे. आता बचावाला सेमी स्लाव म्हणण्यासाठी c6 आणि e6 एकापाठोपाठ एक हवे का या सामन्याप्रमाणे मधे काहि चाली असल्या तरी चालतात?

आनंद पांढर्‍या राजाला परपीच्युअल चेक देत ठेवणार आणि राजा ई३-एफ२ अशा दोन घरात घोटाळत रहाणार

आधी एकदा वाटलं होतं टोपाकडे जी३ ऑप्शन आहे.. पण त्याचाही काहि फायदा नाहि.. तेव्हा बरोबरी अपरिहार्य..

आनंदच्या संयमामुळे सामना खूपच रंगला हे निश्चित!! बाकी तुम्ही उंटांच्या चालीमागचा विचार इतका छान समजावला आहे की उंटाच्या चाली म्हणजे एखाद्या कसलेल्या सेनापतीने आपले सैन्य योग्य वेळी योग्य छावणीत हलवावे किंवा एखाद्या कॅप्टनने आपल्या बॉलरच्या बॉलिंगचा व समोरच्याच्या बॅटींग स्टाईलचा अचूक अंदाज घेऊन योग्य जागी झेल घेण्यासाठी फिल्डर लावावा असा भास झाला

४था सामना भन्नाटच आहे.. समालोचनाची वाट पाहतोय

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

चतुरंग's picture

30 Apr 2010 - 1:54 am | चतुरंग

पहिल्या ३-४ खेळ्यातून उलगड जाते.
कॉपीबुक स्टाईलने मुख्य स्लाव डिफेन्स दर्शवणार्‍या खेळी
1. d4 d5
2. c4 c6
3. Nf3 Nf6
अशा आहेत

सेमी स्लाव च्या खेळी
1. d4 d5
2. c4 e6
3. Nc3 Nf6
4. Nf3 c6
अशा आहेत

आता आनंदच्या सामन्यात ई६ तिसर्‍या खेळीला नाहीये. त्यामुळे हा सेमी स्लाव नाही स्लाव डिक्लाईन्ड प्रकारात मोडतो (दुसर्‍या मूवला पांढर्‍याने देऊ केलेले प्यादे नाकारणे म्हणून 'डिक्लाईन्ड')

वीकीवर स्लाव डिफेन्स असे शोधलेस तर बरीच माहिती मिळेल.

चतुरंग

निखिल देशपांडे's picture

30 Apr 2010 - 10:57 am | निखिल देशपांडे

आजचा सामनाही त्या चेसबोर्डावर पाहिला...
एकुणच ह्या लेखमालेतुन बर्‍याच नवीन गोष्टी कळत आहेत...
पुढच्या ऑलटाईम बेस्ट सामन्याचे समालोचनाची वाट पाहतोय

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

रामदास's picture

30 Apr 2010 - 10:58 am | रामदास

मालीकेइतकीच ही समालोचनाची मालीका देखील रंगतदार होते आहे.
धन्यवाद.

राघव's picture

30 Apr 2010 - 11:05 am | राघव

मालिकेइतकीच ही समालोचनाची मालिका देखील रंगतदार होते आहे.
सहमत आहे. खूप आवडले समालोचन :)
पुढच्याची वाट बघतोच आहे.

राघव

घाटावरचे भट's picture

30 Apr 2010 - 4:42 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2010 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार

झ क्का स !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

झकासराव's picture

30 Apr 2010 - 5:54 pm | झकासराव

रंगासेठ भारी लिहिताय. :)

आनंद's picture

30 Apr 2010 - 6:01 pm | आनंद

मजा येते आहे. धन्यवाद.

गोगोल's picture

30 Apr 2010 - 6:20 pm | गोगोल

वाटते की आनंद जर सिसिलियन बचाव खेळला असता तर डाव अधिक नाट्यमय झाला असता.

चतुरंग's picture

30 Apr 2010 - 8:13 pm | चतुरंग

खरंच की, मला हे लक्षातच आले नव्हते!
आपल्या बुद्धीबळ व्यासंगाबद्दल आदर आहे! :)

(गोलगोल)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2010 - 1:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मजा येत आहे.....!

आनंद पांढर्‍या राजाला परपीच्युअल चेक देत ठेवणार आणि राजा ई३-एफ२ अशा दोन घरात घोटाळत रहाणार किंवा टोपालोव काळ्या राजाला चेक देणार आणि आनंद एफ्७-एफ८ असा घोटाळणार. प्याद्यांची खेळी कोणी खेळणार नाही.

:) इथे तर लैच मजा आली....!

-दिलीप बिरुटे