आनंद - टोपालोव : सामना १

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
27 Apr 2010 - 2:12 am

आईसलँडमधल्या ज्वालामुखीचा उद्रेक, आनंदचे फ्रँकफुर्टला ४ दिवस अडकणे, शेवटी स्पर्धेसाठी गाडीने २००० किमी. चा ४० तासांचा प्रवास करुन जायला लागणे, स्पर्धा ३ दिवस पुढे ढकलता येईल का? अशा त्याच्या विचारणेला आयोजकांनी नकार देणे, पण मग एक दिवस स्पर्धा उशिराने घ्यायला मान्यता देणे!
अशा स्पर्धेपूर्वीच्या उत्सुकता शिगेला पोचवणार्‍या घटनांनंतर शनिवार दि. २४ एप्रिल २०१० रोजी सकाळी १० वाजता (अमेरिका पूर्व किनारा प्रमाणवेळेनुसार) पहिला सामना सुरु झाला.

ड्रॉनुसार आनंदला पहिल्या सामन्यात काळी मोहरी घेऊन खेळायचे होते.

सध्याचे एलो रेटिंग २८०५ असलेला टोपालोव "ह्या स्पर्धेत मी एकही बरोबरी स्वीकारणार नाहीये!" "सामन्या दरम्यान मी एकही शब्द बोलणार नाहीये." वगैरे आतषबाजी करुन सामन्याच्या आधीपासून फुर्फुरत होताच. आनंदने सामन्याआधी मुलाखती दिल्या नाहीत तर टोपालोवने शेवटपर्यंत दिल्या! अशा अंमळ तापलेल्या वातावरणात सुरु झाला पहिला सामना. पाहूयात -
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1579916
वरच्या दुव्यावर जाऊन तुम्हाला सामना एकेक खेळी खेळून बघता येईल.

वजिराच्या समोरचे प्यादे दोन घरे ढकलून खेळाला सुरुवात झाली. तिसर्‍या खेळीत आपल्या वजिराचे प्यादे दोन घरे सरकावून आनंदने डाव ग्रुनफिल्ड ओपनिंग मधल्या क्लासिकल वेरिएशनकडेनेला. (ह्या ओपनिंगचे मूळ इंडियन डिफेन्स मध्ये आहे.) कारपोव, कास्पारोवसकट अनेक मान्यवर खेळाडूंनी ह्या ओपनिंगचा वापर यशस्वीरीत्या केलाय. सुरुवातीच्या चाली इतक्या वेगाने खेळल्या गेल्या की हा ब्लिट्झचा सामना सुरु आहे का काय असे वाटावे! सामन्याआधी मी सकाळी चहा करायला टाकला होता. तो गाळून घेऊन परत संगणकापाशी येऊन बघतो तो पाच मिनिटात सहा-सहा चाली झालेल्या होत्या!

टोपालोवच्या डी४ ह्या प्याद्यावर हल्ला करणे हा आनंदचा उद्देश होता आणि त्या प्याद्याला जोर वाढवणे हा टोपालोवचा. पहिल्या नऊ चालीत फारसे वेगळे काही घडले नाही. आपापले राजे कॅसल करुन दोघे बसले. दहाव्या चालीत मात्र आनंदने एनए५ अशी वेगळीच खेळी करुन उंटावर हल्ला चढवला. इथे दोन गोष्टी घडल्या. डी४ प्याद्यावरचा जोर सोडून आनंदचा घोडा पटाच्या कडेला जाऊन बसला आणि टोपालोवच्या उंटाला सी४ हे घर सोडावे लागले पण टोपाचे फारसे काही बिघडले नाही मात्र हा बाजूला जाऊन बसलेला घोडा आनंदला नंतर त्रासदायक झाला.

बाराव्या खेळीला वजीर एक घर पुढे ढकलून टोपाने वजीर - आणि काळ्या घरातला उंट अशी युती केली. आनंदच्या राजासमोरचा काळा उंट हे त्याचे लक्ष्य होते! ई५ ही खेळी करुन आनंदने डी४ प्याद्यावरचे आपले लक्ष ढळू दिले नाही. आता एकतर त्या डी ४ प्याद्याला पांढर्‍याचे जोर कमी पडत होते मारामारी झाली तर त्याचे एक प्यादे जास्त मारले जाणार होते पण त्याबदल्यात पांढर्‍याला सी पट्टी मोकळी मिळणार होती जिथे त्याचा हत्ती येऊन बसू शकत होता. (पोझिशनल अ‍ॅडवांटेज आणि मटीरिअल अ‍ॅडवांटेज असा हा सामना असतो. कुठल्या परिस्थितीत काय उपयोगाचे ठरेल ह्याबद्दलचे सगळे आडाखेच असतात आणि म्हणून बुद्धीबळ कायमच थरारक खेळ आहे!)
टोपालोवने त्या मार्गाने जायचे ठरवले. त्याने उंट थेट एच ६ मधे नेला. सोळाव्या खेळी अखेर आनंदने प्याद्यांची मारामारी करुन पांढर्‍याचे एक प्यादे जास्त मिळवले आणि टोपाने सी ह्या स्तंभाचा ताबा मिळवला.

आता स्थिती नीट पहा. आनंदची सर्व महत्त्वाची मोहरी खालच्याच पट्टीत बंदिस्त आहेत. त्यांच्या समोर रान मोकळे आहे पण त्यांची प्रगती झालेली नाही! घोडा पटाच्या बाजूला जाऊन बसलाय. राजा कॅसलिंग मधून बाहेर येऊन बराच असुरक्षित अवस्थेत आहे. उलट पांढर्‍याकडे एक प्यादे कमी असले तरी त्याची मोहरी अतिशय समन्वय साधून आहेत. हत्तीने सी स्तंभ बळकावलाय. उंट सुस्थितीत बसलाय. घोडा दोन उड्यात काळ्याच्या राजापाशी जाऊ शकतो. कॅसलिंग सुरक्षित आहे! पांढरा नक्कीच वरचढ आहे.

पटाच्या मध्यभागची पोकळी भरु काढण्यासाठी आनंदने वजीर डी ६ इथे हलवला. पांढर्‍या पाद्यांना पुढे ढकलून जागा बळकावणे हे टोपाचे उद्दिष्ट होते ते त्याने एफ ४ ह्या खेळीने साध्य केले. पांढर्‍याची पुढची धमकी ई ५ होती. ती थोपवायला आनंद एफ ६ खेळला. इथे दबाव कमी न करता टोपाने एफ ५ असे रेटले. आता सगळा दबाव जी ६ ह्या राजाच्या समोरच्या प्याद्यावर होता! वजीर ई ५ ह्या मोक्याच्या घरात आणून आनंदने एक महत्त्वाचे ठाणे बळकावले परंतु बाजूला गेलेला घोडा आणि अप्रगत उंट ह्यामुळे त्याच्या वजिराची डावाच्या मध्यात अत्यंत तणावाची परिस्थिती झाली. तशात एन एफ ४ ही घोड्याची खेळी आनंदला हबकवूनच गेली! ह्याच्या पुढच्या धमक्या म्हणजे हत्ती एफ ३ आणि नंतर एच ३ अशाच होत्या. आता गोची कशी आहे बघा. हत्तीने सी फाईल दाबून धरल्याने आनंदचा घोडा मदतीला येऊ शकत नाही. त्याला मोकळे करायचे असेल तर आधी उंट डी ७ असा हलवून सी ६ ह्या घरात जोर निर्माण करावा लागतो. मगच घोडा सी६ - ई ७ असा मदतीला मैदानात येऊ शकतो. पण पांढर्‍याच्या मार्‍यापुढे एवढ्या खेळ्याच आनंदकडे नाहीत. त्या त्या वेळेपुरता बचाव एवढेच त्याच्या हातात राहिले आहे!
आता आनंदवर वेळेचाही दबाव वाढत होता. नियमानुसार पहिल्या दोन तासात प्रत्येकी ४० खेळी व्हायलाच हव्यात (म्हणजे सरासरी ३ मिनिटाला एक खेळी). अठराव्या खेळीअखेर आनंदचा एक तास दहा मिनिटे झाली होती!
त्या गडबडीत आणखीन एक चूक त्यानं केली जी ५ ए प्यादे सरकवून घोड्याच्या अंगावर तो जाताच घोड्याने एच ५ असा चेक दिला! आता काळ्या राजाच्या बाजूला पांढर्‍या प्याद्यांचा ब्लिट्झक्रिग होणार हे दिसतच होते!
बाविसाव्या खेलीअखेर मारामारी होऊन एच पट्टीत घोडा बसलेला होता. आता गंमत बघा दोघांचे घोडे पटाच्या कडेला आहेत. पण आनंदचा तबेल्यात बांधून घातलाय आणि टोपाचा फक्त टाच द्यायची वाट बघतोय! क्या बात है! ह्या सौंदर्यासाठी मी चेस खेळतो!

पुढच्याच खेळीत अपेक्षेप्रमाणे हत्ती एफ ३ घरात आला. आता दबाव बघा कसा आहे. घोडा एफ ६ प्याद्यावर नजर ठेवून आहे. ते प्यादे मारुन घोड्याने स्वतःचा बळी दिला तर पुढच्या शक्यता अशा आहेत - हत्तीने घोडा मारला तर पांढरा वजीर जी ५ हे प्यादे मारुन राजाला शह देत थेट आतच घुसतो! वजिराने घोडा खाल्ला तर हत्ती जी ३ आणि नंतर वजीर एफ ४ अशी धमकी आहे. आणि एकदाका पांढरा वजीर एफ ४ मधे बसला की सी पट्टीतला हत्ती थेट सी ७ मधे मुसंडी मारायला मोकळा! अशा दबावात आनंदने शेवटची चूक केलीन राजा एफ ७?? (त्यातल्या त्यात बरी खेळी उंट डी ७ अशी होती. ह्या खेळीने दोन काळ्या हत्तींचा समन्वय आणि एन सी ६ अशी खेळी करुन हत्तीचे सातव्या पट्टीत येणे कदाचित थोपवले जाऊ शकते.) आता टोपालोवने शेवटचा घाव घातला एन x एफ ६!! घोड्याचा बळी दिला!!! फायदे?? जी ५ प्याद्याचा जोर गेला आणि एच स्तंभ मोकळा झाला!!! पुढच्या खेळ्यात बचावाचा क्षीण प्रयत्न होता.
अठ्ठाविसाव्या खेळीत आर सी सी ७ करुन टोपालोवने त्याचा हत्ती सातव्या पट्टीत नेला आणि राजा शेवटच्या घटका मोजायला लागला. राजा डी १ अशी क्षीण हालचाल त्याने केलीन परंतु उंट बी ५!! ह्या अप्रतिम खेळीने टोपालोवने गुणवत्ता सिद्ध केली!! काहीतरी करायचे म्हणून वजिराने ई ४ चे प्यादे मारले पण हत्तीने सी ८ घरातला उंट मारुन टोपालोवने सामना संपवला. वीसेक सेकंद विचार करुन आनंदने हात मिळवला आणि एकमेकांच्या खेळी लिहिलेल्या कागदांवर सह्या करुन दोघे उठून गेले!! टोपालोव अर्थातच खूपच खूष होता आणि आनंद शांत.

आनंद ह्या सामन्यात अगदीच सर्वसाधारण खेळला. त्याने अपेक्षेपेक्षा खूपच जास्त चुका केल्यान. त्यामुळे मी नाराज झालो. पण दुसर्‍याच सामन्यात त्याने जो काही खेळ केलान त्याने मी पुन्हा एकदा त्याच्यावर फिदा झालो. तो सामना पाहूया उद्या!!

चतुरंग

क्रीडाआस्वादमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

27 Apr 2010 - 5:25 am | राजेश घासकडवी

असं रसग्रहण करून सांगितल्याबद्दल. (विडंबन कधी येणार ते सांगा :) )

तो घोडा ए५ मध्ये अडकवून काय साधलं कळलं नाही! अर्थातच मी हे तोकड्या ज्ञानावर म्हणतोय, आनंदचा तो काढण्यासाठी काहीतरी बेत असणारच. पण तिकडे गेल्यावर तो मृतवत झाला. सी७ सारखी मोक्याची जागा उघडी, ती जपायला काळ्या घरचा उंट नाही, आणि वजिर बिचारा तिचं राखण करतोय. काळ्याकडे उंट, हत्ती आहेत पण ते काढायलासुद्धा वेळ नाही, इतकं मूमेंटम मिळणं हा पहिल्या क्षुद्र प्याद्याच्या बदल्यात केवढा तरी फायदा मिळाला...

एकंदरीत शेवटच्या निम्म्या मूव्ह्जमध्ये आनंदची परिस्थिती खूपच दयनीय झाली होती...

शेखर's picture

27 Apr 2010 - 8:00 am | शेखर

मस्तच लिहलय.... जसा काही सामना डोळ्या समोर होतो आहे असे वाटले...
रंगाशेठच्या बुद्धीबळाच्या धाग्याची कायम वाट बघत असतो...
लवकर दुसरा सामना लिहा...

नितिन थत्ते's picture

27 Apr 2010 - 8:14 am | नितिन थत्ते

हात्तिच्या, बुद्धीबळाविषयी चाललंय होय?

जाउद्या, बुद्धी असलेले वाचून प्रतिसाद देतील ....बुद्धीचा आणि आमचा काय संबंध? :(

नितिन थत्ते

निखिल देशपांडे's picture

27 Apr 2010 - 10:34 am | निखिल देशपांडे

रंगा काका बेस्ट..
आता दुसर्‍या सामन्याचे पण येउद्या

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

विशाल कुलकर्णी's picture

27 Apr 2010 - 10:58 am | विशाल कुलकर्णी

वाचतोय.. आता दुसर्‍या सामन्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागलीय. रंगासेठ लवकर टाका.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

टुकुल's picture

27 Apr 2010 - 11:17 am | टुकुल

पोझीशन नीट समजत नाहीत मला अजुन, तरीपण वाचत आहे, लवकर येवु द्या पुढचा भाग.

--टुकुल

रामदास's picture

27 Apr 2010 - 11:39 am | रामदास

म्हणजे विकास एका प्याद्यापासूनच होते.त्यामुळे सुरुवातीला बर्‍याच वेळा प्यादीच बोर्डावर आघाडी घेतात्ईआघाडी घेण्यासाठी प्यादी /प्यादे कुर्बान करणं हे कुशल खेळाडूच्या हँडलींगवर असतं .
वा!!! लेख वाचून परत एकदा बोर्डावरची धूळ झटकायची इच्छा झाली.
अवांतर : क्वीन रुल्स.(सामन्याआधी मी सकाळी चहा करायला टाकला होता. तो गाळून घेऊन...)

रेवती's picture

27 Apr 2010 - 6:51 pm | रेवती

क्वीन रुल्स.(सामन्याआधी मी सकाळी चहा करायला टाकला होता. तो गाळून घेऊन...)
वाटलच मला कोणीतरी एखादी टपली मारणार यावरून.;)
ही सुद्धा एक चाल नसेल कशावरून?;)

रेवती

रमताराम's picture

27 Apr 2010 - 12:03 pm | रमताराम

तपशीलवार विवेचन आणि दुव्याबद्दल आभार.

आनंदचा तबेल्यात बांधून घातलाय आणि टोपाचा फक्त टाच द्यायची वाट बघतोय! क्या बात है! ह्या सौंदर्यासाठी मी चेस खेळतो!

वा रंगराव! चित्रदर्शी वर्णन!

सामना आधी तुम्ही दिलेल्या दुव्यावर पाहिला.. नंतर पुन्हा तुमच्या वर्णनासोबत पाहिला.. आणि लढाई ६४ घरांतलीच मात्र, समोर घडणार्‍या डावपेचांचे वर्णन केल्याने लढत बघण्यापेक्षा ती अनुभवता आली.. अनेक आभार

फारच म्हंजे फारच सुंदर वर्णन.. पुढील सामन्याच्या चाली तुमच्यासोबत चालून बघण्यास उत्सूक आहे

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

भडकमकर मास्तर's picture

27 Apr 2010 - 2:05 pm | भडकमकर मास्तर

बेष्ट...
दुसर्‍या डावाचे वर्णन वाचायला उत्सुक आहे

चतुरंग's picture

27 Apr 2010 - 4:44 pm | चतुरंग

तुम्ही आवडीने वाचताय असे दिसते.
डावात पटाचे चित्र टाकायचा प्रयत्न राहील. आणखी काय सुधारणा करता येतील तेही बघतो. तुम्हीही सुचवा.

(शतरंज का खिलाडी)चतुरंग

जयंत कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 11:54 am | जयंत कुलकर्णी

आपण जे वर्णन केले आहे ते फारच छान आहे. त्या व्हिडीओ बरोबर रेकॉर्ड करुन टाकता येईल का ? किंवा एक वेगळा नुसता पटाचा आणि सोंगट्यांच्या हलचालीचा करुन त्याच्यात हे वर्णन टाकता येईल का ते बघितलए पाहिजे

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

Dipankar's picture

27 Apr 2010 - 5:07 pm | Dipankar

एकदम छान, डाव लावून पहायला पाहिजे

मस्त कलंदर's picture

27 Apr 2010 - 6:23 pm | मस्त कलंदर

बुद्धीबळात माझी बुद्धी बेताचीच चालते... पण या लेखाने तिला थोडंसं चालवावं वाटू लागलंय!!! सकाळी हा लेख ओझरता पाहिला होता.... नंतर नीट वाचायचा म्हणून ठेवून दिला होता...
क्रिकेट कॉमेंटरी ऐकली होती.... पण या खेळाची पहिल्यांदाच...!!! मजा आली.. ॠ सारखी मॅच पण पाहीन आता सवडीने. :)

पुढच्या सामन्याची वाट पाहातेय... :(

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्राजु's picture

27 Apr 2010 - 6:54 pm | प्राजु

अरे वा!!
बुद्धीबळाच्या खेळाचं असं रसग्रहण!!!! मस्तच आहे ही कल्पना.
हा खेळ मला म्हणावा तितका आवडत नाही ,त्यामुळे कधी खेळलेही नाहीये मी. पण हे असं लिहिलंत तर त्यामध्येही आवड निर्माण होईल मला नक्की.
पुढच्या सामन्याच्या प्रतिक्षेत.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

विसोबा खेचर's picture

27 Apr 2010 - 7:43 pm | विसोबा खेचर

बुद्धीबळाच्या खेळाचं असं रसग्रहण!!!! मस्तच आहे ही कल्पना.

सहमत आहे.. रंगाने अगदी भरभरून आणि मनापासून लिहिलंय.. वरवर वाचले, मजा आली..आता जरा सवडीने पुन्हा एकवार वाचेन..

तात्या.

संदीप चित्रे's picture

27 Apr 2010 - 8:52 pm | संदीप चित्रे

आवडल रे.
अजून सगळ्या चाली नीट समजल्या नाहीत पण वाचायला आवडतंय हे ही नसे थोडके :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

चतुरंग's picture

27 Apr 2010 - 9:02 pm | चतुरंग

दुव्यावर जाऊन दुसर्‍या खिडकीत डाव उघडा आणि वर्णनाबरहुकूम खेळून बघा. सगळ्या मूव्ज समजण्याजोग्या आहेत.

चतुरंग

मदनबाण's picture

28 Apr 2010 - 6:04 am | मदनबाण

पुढच्या भागाची वाट पाहतोय...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

आनंदयात्री's picture

28 Apr 2010 - 8:37 am | आनंदयात्री

धन्यवाद रंगाशेठ !!
खुप दिवसांनी पुन्हा बुद्धीबळावर लिहायला सुरुवात केलीत. आधी (कोणे एके काळी) म्हटल्याप्रमाणे बुद्धीबळाचे थोडे बेसिक्स पण गिरवुन घ्या ना आमच्याकडुन !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2010 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रंगासेठ, पुढच्या भागाची वाट पाहतोय.
दुव्यावर जाऊन चाली देत बसलो. पण, शेवट काय समजला नाही...:(

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 2:45 pm | विशाल कुलकर्णी

रंगाशेठ, अहो पुढचा भाग टाका लवकर....
रसग्रहणासकट... :-)

आत्तापर्यंत तिन डाव उलटून गेलेत... दुसरा डाव जिंकून आनंदने १-१ अशी बरोबरी साधली. तर तिसर्‍या डावात आनंदने, "ह्या स्पर्धेत मी एकही बरोबरी स्वीकारणार नाहीये!" अशा वल्गना करणार्‍या टोपोलोवला ४७ व्या चालीला बरोबरी स्विकारण्यास भाग पाडलेय.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

श्रावण मोडक's picture

28 Apr 2010 - 6:53 pm | श्रावण मोडक

हेच हवे होते. पुढचे कधी?