आनंद - टोपालोव : सामना १
आईसलँडमधल्या ज्वालामुखीचा उद्रेक, आनंदचे फ्रँकफुर्टला ४ दिवस अडकणे, शेवटी स्पर्धेसाठी गाडीने २००० किमी. चा ४० तासांचा प्रवास करुन जायला लागणे, स्पर्धा ३ दिवस पुढे ढकलता येईल का? अशा त्याच्या विचारणेला आयोजकांनी नकार देणे, पण मग एक दिवस स्पर्धा उशिराने घ्यायला मान्यता देणे!
अशा स्पर्धेपूर्वीच्या उत्सुकता शिगेला पोचवणार्या घटनांनंतर शनिवार दि. २४ एप्रिल २०१० रोजी सकाळी १० वाजता (अमेरिका पूर्व किनारा प्रमाणवेळेनुसार) पहिला सामना सुरु झाला.
ड्रॉनुसार आनंदला पहिल्या सामन्यात काळी मोहरी घेऊन खेळायचे होते.
सध्याचे एलो रेटिंग २८०५ असलेला टोपालोव "ह्या स्पर्धेत मी एकही बरोबरी स्वीकारणार नाहीये!" "सामन्या दरम्यान मी एकही शब्द बोलणार नाहीये." वगैरे आतषबाजी करुन सामन्याच्या आधीपासून फुर्फुरत होताच. आनंदने सामन्याआधी मुलाखती दिल्या नाहीत तर टोपालोवने शेवटपर्यंत दिल्या! अशा अंमळ तापलेल्या वातावरणात सुरु झाला पहिला सामना. पाहूयात -
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1579916
वरच्या दुव्यावर जाऊन तुम्हाला सामना एकेक खेळी खेळून बघता येईल.
वजिराच्या समोरचे प्यादे दोन घरे ढकलून खेळाला सुरुवात झाली. तिसर्या खेळीत आपल्या वजिराचे प्यादे दोन घरे सरकावून आनंदने डाव ग्रुनफिल्ड ओपनिंग मधल्या क्लासिकल वेरिएशनकडेनेला. (ह्या ओपनिंगचे मूळ इंडियन डिफेन्स मध्ये आहे.) कारपोव, कास्पारोवसकट अनेक मान्यवर खेळाडूंनी ह्या ओपनिंगचा वापर यशस्वीरीत्या केलाय. सुरुवातीच्या चाली इतक्या वेगाने खेळल्या गेल्या की हा ब्लिट्झचा सामना सुरु आहे का काय असे वाटावे! सामन्याआधी मी सकाळी चहा करायला टाकला होता. तो गाळून घेऊन परत संगणकापाशी येऊन बघतो तो पाच मिनिटात सहा-सहा चाली झालेल्या होत्या!
टोपालोवच्या डी४ ह्या प्याद्यावर हल्ला करणे हा आनंदचा उद्देश होता आणि त्या प्याद्याला जोर वाढवणे हा टोपालोवचा. पहिल्या नऊ चालीत फारसे वेगळे काही घडले नाही. आपापले राजे कॅसल करुन दोघे बसले. दहाव्या चालीत मात्र आनंदने एनए५ अशी वेगळीच खेळी करुन उंटावर हल्ला चढवला. इथे दोन गोष्टी घडल्या. डी४ प्याद्यावरचा जोर सोडून आनंदचा घोडा पटाच्या कडेला जाऊन बसला आणि टोपालोवच्या उंटाला सी४ हे घर सोडावे लागले पण टोपाचे फारसे काही बिघडले नाही मात्र हा बाजूला जाऊन बसलेला घोडा आनंदला नंतर त्रासदायक झाला.
बाराव्या खेळीला वजीर एक घर पुढे ढकलून टोपाने वजीर - आणि काळ्या घरातला उंट अशी युती केली. आनंदच्या राजासमोरचा काळा उंट हे त्याचे लक्ष्य होते! ई५ ही खेळी करुन आनंदने डी४ प्याद्यावरचे आपले लक्ष ढळू दिले नाही. आता एकतर त्या डी ४ प्याद्याला पांढर्याचे जोर कमी पडत होते मारामारी झाली तर त्याचे एक प्यादे जास्त मारले जाणार होते पण त्याबदल्यात पांढर्याला सी पट्टी मोकळी मिळणार होती जिथे त्याचा हत्ती येऊन बसू शकत होता. (पोझिशनल अॅडवांटेज आणि मटीरिअल अॅडवांटेज असा हा सामना असतो. कुठल्या परिस्थितीत काय उपयोगाचे ठरेल ह्याबद्दलचे सगळे आडाखेच असतात आणि म्हणून बुद्धीबळ कायमच थरारक खेळ आहे!)
टोपालोवने त्या मार्गाने जायचे ठरवले. त्याने उंट थेट एच ६ मधे नेला. सोळाव्या खेळी अखेर आनंदने प्याद्यांची मारामारी करुन पांढर्याचे एक प्यादे जास्त मिळवले आणि टोपाने सी ह्या स्तंभाचा ताबा मिळवला.
आता स्थिती नीट पहा. आनंदची सर्व महत्त्वाची मोहरी खालच्याच पट्टीत बंदिस्त आहेत. त्यांच्या समोर रान मोकळे आहे पण त्यांची प्रगती झालेली नाही! घोडा पटाच्या बाजूला जाऊन बसलाय. राजा कॅसलिंग मधून बाहेर येऊन बराच असुरक्षित अवस्थेत आहे. उलट पांढर्याकडे एक प्यादे कमी असले तरी त्याची मोहरी अतिशय समन्वय साधून आहेत. हत्तीने सी स्तंभ बळकावलाय. उंट सुस्थितीत बसलाय. घोडा दोन उड्यात काळ्याच्या राजापाशी जाऊ शकतो. कॅसलिंग सुरक्षित आहे! पांढरा नक्कीच वरचढ आहे.
पटाच्या मध्यभागची पोकळी भरु काढण्यासाठी आनंदने वजीर डी ६ इथे हलवला. पांढर्या पाद्यांना पुढे ढकलून जागा बळकावणे हे टोपाचे उद्दिष्ट होते ते त्याने एफ ४ ह्या खेळीने साध्य केले. पांढर्याची पुढची धमकी ई ५ होती. ती थोपवायला आनंद एफ ६ खेळला. इथे दबाव कमी न करता टोपाने एफ ५ असे रेटले. आता सगळा दबाव जी ६ ह्या राजाच्या समोरच्या प्याद्यावर होता! वजीर ई ५ ह्या मोक्याच्या घरात आणून आनंदने एक महत्त्वाचे ठाणे बळकावले परंतु बाजूला गेलेला घोडा आणि अप्रगत उंट ह्यामुळे त्याच्या वजिराची डावाच्या मध्यात अत्यंत तणावाची परिस्थिती झाली. तशात एन एफ ४ ही घोड्याची खेळी आनंदला हबकवूनच गेली! ह्याच्या पुढच्या धमक्या म्हणजे हत्ती एफ ३ आणि नंतर एच ३ अशाच होत्या. आता गोची कशी आहे बघा. हत्तीने सी फाईल दाबून धरल्याने आनंदचा घोडा मदतीला येऊ शकत नाही. त्याला मोकळे करायचे असेल तर आधी उंट डी ७ असा हलवून सी ६ ह्या घरात जोर निर्माण करावा लागतो. मगच घोडा सी६ - ई ७ असा मदतीला मैदानात येऊ शकतो. पण पांढर्याच्या मार्यापुढे एवढ्या खेळ्याच आनंदकडे नाहीत. त्या त्या वेळेपुरता बचाव एवढेच त्याच्या हातात राहिले आहे!
आता आनंदवर वेळेचाही दबाव वाढत होता. नियमानुसार पहिल्या दोन तासात प्रत्येकी ४० खेळी व्हायलाच हव्यात (म्हणजे सरासरी ३ मिनिटाला एक खेळी). अठराव्या खेळीअखेर आनंदचा एक तास दहा मिनिटे झाली होती!
त्या गडबडीत आणखीन एक चूक त्यानं केली जी ५ ए प्यादे सरकवून घोड्याच्या अंगावर तो जाताच घोड्याने एच ५ असा चेक दिला! आता काळ्या राजाच्या बाजूला पांढर्या प्याद्यांचा ब्लिट्झक्रिग होणार हे दिसतच होते!
बाविसाव्या खेलीअखेर मारामारी होऊन एच पट्टीत घोडा बसलेला होता. आता गंमत बघा दोघांचे घोडे पटाच्या कडेला आहेत. पण आनंदचा तबेल्यात बांधून घातलाय आणि टोपाचा फक्त टाच द्यायची वाट बघतोय! क्या बात है! ह्या सौंदर्यासाठी मी चेस खेळतो!
पुढच्याच खेळीत अपेक्षेप्रमाणे हत्ती एफ ३ घरात आला. आता दबाव बघा कसा आहे. घोडा एफ ६ प्याद्यावर नजर ठेवून आहे. ते प्यादे मारुन घोड्याने स्वतःचा बळी दिला तर पुढच्या शक्यता अशा आहेत - हत्तीने घोडा मारला तर पांढरा वजीर जी ५ हे प्यादे मारुन राजाला शह देत थेट आतच घुसतो! वजिराने घोडा खाल्ला तर हत्ती जी ३ आणि नंतर वजीर एफ ४ अशी धमकी आहे. आणि एकदाका पांढरा वजीर एफ ४ मधे बसला की सी पट्टीतला हत्ती थेट सी ७ मधे मुसंडी मारायला मोकळा! अशा दबावात आनंदने शेवटची चूक केलीन राजा एफ ७?? (त्यातल्या त्यात बरी खेळी उंट डी ७ अशी होती. ह्या खेळीने दोन काळ्या हत्तींचा समन्वय आणि एन सी ६ अशी खेळी करुन हत्तीचे सातव्या पट्टीत येणे कदाचित थोपवले जाऊ शकते.) आता टोपालोवने शेवटचा घाव घातला एन x एफ ६!! घोड्याचा बळी दिला!!! फायदे?? जी ५ प्याद्याचा जोर गेला आणि एच स्तंभ मोकळा झाला!!! पुढच्या खेळ्यात बचावाचा क्षीण प्रयत्न होता.
अठ्ठाविसाव्या खेळीत आर सी सी ७ करुन टोपालोवने त्याचा हत्ती सातव्या पट्टीत नेला आणि राजा शेवटच्या घटका मोजायला लागला. राजा डी १ अशी क्षीण हालचाल त्याने केलीन परंतु उंट बी ५!! ह्या अप्रतिम खेळीने टोपालोवने गुणवत्ता सिद्ध केली!! काहीतरी करायचे म्हणून वजिराने ई ४ चे प्यादे मारले पण हत्तीने सी ८ घरातला उंट मारुन टोपालोवने सामना संपवला. वीसेक सेकंद विचार करुन आनंदने हात मिळवला आणि एकमेकांच्या खेळी लिहिलेल्या कागदांवर सह्या करुन दोघे उठून गेले!! टोपालोव अर्थातच खूपच खूष होता आणि आनंद शांत.
आनंद ह्या सामन्यात अगदीच सर्वसाधारण खेळला. त्याने अपेक्षेपेक्षा खूपच जास्त चुका केल्यान. त्यामुळे मी नाराज झालो. पण दुसर्याच सामन्यात त्याने जो काही खेळ केलान त्याने मी पुन्हा एकदा त्याच्यावर फिदा झालो. तो सामना पाहूया उद्या!!
चतुरंग
प्रतिक्रिया
धन्यवाद...
मस्तच
बुद्धी
रंगा काका
वाचतोय..
पोझीशन नीट
गेम डेवलपमेंट
क्वीन
आभार
फारच म्हंजे फारच सुंदर वर्णन
बेष्ट... दुस
धन्यवाद मिपाकरांनो!
आपण जे
एकदम छान,
बुद्धीबळा
अरे
बुद्धीबळा
'चाल'तं रसग्रहण
मी दिलेल्या
पुढच्या
धन्यवाद
रंगासेठ,
रंगाशेठ,
हेच