व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जे न देखे रवी...
21 Jan 2010 - 12:57 pm

सर्च: 'आभास' + मैत्र =
काही चॅट्स (आणि मेल्स)
काही अटॅचमेंटसह,
अनंत ओळींची मोजणी.
सिलेक्ट ऑल... म्यूट,
(ताजेतवानेपणा
स्क्रीनचा, स्क्रीनचाच...)
अदृष्याचा "आभास"!
दीर्घ संवाद, एकाच कमांडमुळं,
'म्यूट'ल्याच्या आभासातून
वास्तवात आणणारी
एक बदललेली प्रतिमा;
काचेमागच्या पार्‍यानेच
स्थिरावत पुढं आणलेली!!
---
संवाद अन् सुसंगती,
बोल आणि भांडणे...
वाद अन् विसंगती,
बडबड आणि मोजणे...
प्रतिवाद अन् युक्तिवाद,
स्पष्टता आणि हसणे...
संताप अन् अबोला,
हताशा आणि समजावणे...
खुलासे अन् सबबी,
आर्तता आणि खचणे...
केवळ
आभास आणि वास्तव
---
फिर्यादी, तपासी,
अभियोक्ता,
अन् न्यायाधिशाचीही भूमिका
एकाकी वठवत
"आरोप सिद्ध, सजा,"चा
निकाली पुकारा.
एण्टर... @मेल.कॉम,
सर्च: is:muted =
आभासी "अस्तित्त्व"
अन्,
अस्तित्त्वाचे वास्तव -
पार्‍यानेच परतवलेल्या
प्रतिबिंबातून टोचत येणार्‍या
केवळ प्रतिमेचे!!!

शांतरसकविता

प्रतिक्रिया

ज्ञानेश...'s picture

21 Jan 2010 - 5:33 pm | ज्ञानेश...

विषय समजला.
दुसरा भाग कळला (असे वाटले) , आणि आवडला.

पण एकंदर काव्य दुर्बोध वाटले.

अक्षय पुर्णपात्रे's picture

21 Jan 2010 - 10:58 pm | अक्षय पुर्णपात्रे

'आभास +मैत्र' शोधण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून त्यामुळे तरी कवितेचा बोध व्हावा. माझे कवितेचे आकलन खाली एका संक्षिप्तेत देत आहे. (संक्षिप्ता कवितेतील शब्द वापरूनच दिली आहे. (शेवटच्या दोन ओळी सोडून)

अस्तित्त्व-आभास,
वास्तव-प्रतिबिंब,
प्रतिमा-संवाद,
व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी...
बाकी सगळा
व्हाइट नॉइज...

ट्रिवियल: अभियोक्ता हे अभिवक्ता असे हवे होते का?

निमीत्त मात्र's picture

22 Jan 2010 - 1:15 am | निमीत्त मात्र

पुनेरी ह्यांच्या 'कातरवेळ' ह्या लेखावरुन प्रेरणा घेऊन कविता केली आहे का?

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Jan 2010 - 9:52 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मात्र, उलटे असावे. खाली वेळा पहा. अर्थात मिपाव्यतिरिक्त विदा उपलब्ध नसल्याने निश्चित सांगता येत नाही.

कातरवेळ
प्रेषक पुनेरी ( गुरू, 01/21/2010 - 14:05)

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी
प्रेषक श्रावण मोडक ( गुरू, 01/21/2010 - 12:57) .

धनंजय's picture

22 Jan 2010 - 2:22 am | धनंजय

कविता आवडली.

चतुरंग's picture

23 Jan 2010 - 10:29 pm | चतुरंग

सगळेच आभासी आहे आणि त्याच वेळी खरेही आहे. (प्रकाश जसा पुंज आणि लहरी ह्या दोन्हीत एकाचवेळी असतो तसे काहीसे!)

चतुरंग

चन्द्रशेखर गोखले's picture

23 Jan 2010 - 5:03 pm | चन्द्रशेखर गोखले

२१व्या शतकातील कवित्तेची नवी भाषा.. कविता आवडली !

शुचि's picture

2 Feb 2010 - 7:01 am | शुचि

कविता आवडली ....... कळली पूर्ण नाही आणि म्हणूनच खूप आवडली. आरशासार्खी वाटते .... जो पाहील त्याल स्वतःचं प्रतिबिम्ब दिसेलशी.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2010 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवीतेची मांडणी आवडली. अर्थ समजून घ्यायला जरा कठीण जात आहे. पण, न्यायव्यस्थेबद्दल काही तगमग जाणवत आहे.

संवाद अन् सुसंगती,
बोल आणि भांडणे...
पासून ते...
केवळ
आभास आणि वास्तव
इथपर्यंतच्या शब्दाची मांडणी खासच...!

कवीनं कवीतेवर बोलावं, असे वाटते..!

-दिलीप बिरुटे

शुचि's picture

2 Feb 2010 - 9:05 pm | शुचि

मला उलट वाटतं नेहेमी. कोणतीही कलाकृतीची चीरफाड झाली (अर्थात कवी अथवा चित्रकार त्यावर बोलला) की त्या कलाकृतीमधील अथान्गता/ गूढ तत्वं (मिस्टिक ) निघून जातं. उरतात फक्त शब्दांचे बुडबुडे. आणि त्या कलाकृतीवर बंधनं येतात ती वेगळीच.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2010 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणतीही कलाकृतीची चीरफाड झाली (अर्थात कवी अथवा चित्रकार त्यावर बोलला) की त्या कलाकृतीमधील अथान्गता/ गूढ तत्वं (मिस्टिक ) निघून जातं. उरतात फक्त शब्दांचे बुडबुडे. आणि त्या कलाकृतीवर बंधनं येतात ती वेगळीच.
आपल्या विचारांशी १००% सहमत आहे.

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

3 Feb 2010 - 3:53 pm | विजुभाऊ

कवीता आवडली
आभसी जगात जगत असताना रागलोभ मात्र मात्र प्रत्यक्षातलेच राहतात.
मरणान्तान्ती वैराणी हे तत्व लॉगौटान्तान्ती वैराणी असे रहात नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Feb 2010 - 4:58 pm | प्रकाश घाटपांडे

आभसी जगात जगत असताना रागलोभ मात्र मात्र प्रत्यक्षातलेच राहतात

हे बाकी खर ह.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

II विकास II's picture

4 Feb 2010 - 8:41 am | II विकास II

>>>मरणान्तान्ती वैराणी हे तत्व लॉगौटान्तान्ती वैराणी असे रहात नाही.
काही तरीच काय विजुभाउ !!!!
जुने हिशेब सेट्ल करण्यासाठी जिथे नविन आय. डी निघतात, ब्लॉग निघतात, तिथे लॉगौटान्तान्ती वैराणी काय कथा.