गवगवा.....
बघ पुन्हा शब्द आले
अन् अर्थ नवा ल्याले
अंधारी अडखळता तू
तुजसाठी दिवा झाले !
हरवलेला सूर तुझा
लोपले संगीतही
शब्द तेच , साद तीच
दुवा खरी, दवा झाले !
मग बहरलीस तू अशी
विसरलीस सहज मला
तूच माझे विश्व सखे,
तुझे अस्तित्व....वानवा झाले !
ताकद बघ शब्दांची
सह्स्त्र लोक गुणगुणले
माझ्या भावनांचा पक्षी - एक
आपोआप थवा झाले !
आलीस मग परतून तू
मन मोरपिशी हवा झाले
ऊष्ण तुझ्या अश्रूंचे
स्पर्श माझ्या शवा झाले !
शब्द माझे गाऊन तू
लोळतेस ऐश्वर्यी
संपल्या म्या भणंगाचे
गीत.....गवगवा झाले , गीत गवगवा झाले !