या चाफ्याचं काय करू ?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Dec 2009 - 5:50 pm

(आमची प्रेरणा - एक प्लान.... खुनाचा : http://www.maayboli.com/node/12190 )

"च्यायला विशल्या, पण जाम तंतरली होती रे माझी. सॉलीड घाबरलो होतो. ऐनवेळी माझ्यातल्या रहस्यकथा लेखकाने हात दिला म्हणून थोडा सावरलो. त्यात चाफ्याच्या ' त्या कॉलने' कृपा केली आणि मी कसंबसं धीर एकवटून तो फटका मारला." हातातला कॉफीचा कप खाली ठेवत कौतुक स्वतःशीच हसला आणि मी खुसखुसायला लागलो.

"हसा लेको, तुमचं काय जातय हसायला? एक जण काहीतरी प्लान करतो, दुसरा नशिबानं त्यातुन वाचतो आणि मधल्या मध्ये प्लान एक्झिक्युट करणार्‍या माझा मात्र बळी. कौत्या, साल्या हाडं आहेत का काय लेका तुझी? अजुन जबडा दुखतोय माझा. कवटी हादरली यार माझी!"

चाफा जोरात विव्हळला तसे आम्ही दोघे अजुनच जोरजोरात हसायला लागलो. आम्हाला हसताना बघुन चाफाही मग आमच्यात सामील झाला.

"मग आता तुझं नाव कवटीचाफा ठेवायला हरकत नसावी? काय रे कौतुक?"
"नको रे बाबा, कवटी म्हणलं की मला माझ्याच भुतकथांची आठवण येत राहील आणि सद्ध्या तरी मी त्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय?"

चाफ्याचा युक्तिवाद अफलातूनच होता.

"ओके, वुई विल युज समथिंग सिमिलर देन. कवटीच्या ऐवजी कवठी म्हणू "कवठीचाफा"...! तुलाही 'भुत'काळातील 'भुत्'कथांची आठवण यायला नको आणि आम्हालाही हा प्रसंग विसरायला नको. काय?"

मी टाळीसाठी हात पुढे केला. तसे दोघेही खदखदायला लागले.

"मजा आली पण लेको. विशल्या तु याचा थोबडा पाहायला हवा होता. बारा वाजले होते चेहर्‍यावर साहेबांच्या." चाफा आठवुन आठवुन हसायला लागला.

परवाच्या घटनेनंतर साधारण आठवडाभराने आम्ही तिघेही कौतुकच्या घरी एकत्र जमलो होतो. मस्त मैफल रंगात आली होती. मी आणि कौतुक दोघेही चाफ्याच्या कथांचे जबरी फॅन. त्यामुळे चाफ्याच्या कथांवर चर्चा चालु होती. मग त्याबरोबर आमच्याही कथा, मराठी संस्थळावर चालणार्‍या भानगडी या सगळ्यांवर चर्चा निघणे साहजिकच होते.

"झालय सगळं, जेवायला चला. आता पुढच्या गप्पा जेवतानाच मारा म्हणे." कौतुकवहिनींची ऑर्डर आली तसे आम्ही जेवायला ऊठलो.

मस्तपैकी झणझणीत भाजी, मिरच्याचा खरडा आणि तांदळाची भाकरी असा साधाच पण आवडीचा बेत होता. देवाचे नाव घेवुन पहिला घास तोंडात घातला.....

"ट्रिंग ट्रिंग.... ट्रिंग ट्रिंग" दारावरची बेल वाजली. मी दाराच्या जवळ होतो म्हणुन उठायला गेलो.

"बस रे शेजारच्या दक्षीणाकाकू असतील, त्या नेहमीच अशा वेळी अवेळी येतात आणि मग जाता जात नाहीत. जेवण झाल्यावर उघडू म्हणे. लक्ष नको देवूस. जेव निवांत." कौतुक जेवता जेवताच म्हणाला.

आम्ही पुन्हा गप्पा मारत जेवायला लागलो. दोनच मिनीटात पुन्हा बेल वाजली.....

"ट्रिंग ट्रिंग.... ट्रिंग ट्रिंग.....ट्रिंग ट्रिंग.... ट्रिंग ट्रिंग......ट्रिंग ट्रिंग.... ट्रिंग ट्रिंग आणि वाजतच राहीली.

आम्ही सगळेच एकमेकाकडे पाहायला लागलो. तसा वहिनी उठल्या, "तुम्ही जेवा मी बघते. " वहिनी उठुन दार उघडायल्या गेल्या आणि आम्ही जेवण कंटिन्यु केलं.

"कौतुक शिरोडकर इथेच राहतो का?"

हा आवाज दक्षीणाकाकूंचा नक्कीच नव्हता. कारण बोलणारा कुणीतरी पुरूष होता.

"कौतुक, पोलीस!" मी चमकलोच.

आमच्या पिताश्रींच्या पोलीसाच्या नोकरीमुळे पोलीसी आवाजातली रग, अधिकारामुळे येणारा गुर्मीचा टोन मला चांगलाच माहीत झाला होता. त्यामुळे बोलणारा एक पोलीस आहे हे ओळखणे मलातरी अवघड नव्हते.

आम्ही तिघेही झटकन उठलो.

दारात एक पोलीस सब इन्स्पेक्टर दोन शिपायांसोबत उभा होता.

"तुमच्यापैकी कौतुक शिरोडकर कोण?"

आमच्याकडे बघत त्याने विचारलं तसा कौतुक पुढे झाला...

"मीच कौतुक, कौतुक शिरोडकर ! माफ करा साहेब, पण मी तुम्हाला ओळखले नाही. काही काम होतं का?"
" आता ओळखशील! आमच्याबरोबर राहायचय काही दिवस. चांगली ओळख पटेल."
"मी समजलो नाही साहेब." आम्ही सगळेच बुचकळ्यात पडलो होतो.
"मी सब-इन्स्पेक्टर शिरवडेकर, विलेपार्ले पोलीस स्टेशन. मि. शिरोडकर, यु आर अंडर अरेस्ट! एका निरपराध स्त्रीच्या खुनात सहभागी झाल्याबद्दल आम्ही तुला अटक करतोय."
"काय?" आम्ही चौघेही एकदमच ओरडलो.
"येस, पार्ल्यात एका स्त्रीचा खुन झालाय. आम्ही तिच्या नवर्‍याला अटकही केलीय. त्याने या खुनाची स्विकृती दिलीय मि. शिरोडकर. आणि त्याने पुढे असा जबाब दिलाय की या खुनाचा प्लॅन त्याला तुम्ही आखुन दिलात. अँड आय मीन इट, माझ्याकडे याचा पुरावा आहे. सो यु आर अंडर अरेस्ट! लेट अस मुव्ह नाऊ! हवालदार, बेड्या घाला याला."

आमच्या चेहर्‍याचा रंगच उडाला.

"त्या माणसाचं नाव काय आहे, फौजदारसाहेब?" चाफ्याने थरथरत्या आवाजात विचारले.

सब इन्स्पेक्टरने थंडपणे चाफ्याकडे बघितले......

"माधव....., माधव जोशी !"
"ओह नो !" मी जोरात ओरडलो आणि त्या क्षणी डोकं धरुन मटकन खाली बसणार्‍या कौतुक वहीनींकडे माझं लक्ष गेलं. तोपर्यंत कौतुक आणि चाफा वहिनींना सावरायला धावले होते..........

*****************************************************************************

"माझं डोकं जाम भंजाळून गेलय यार. करायला गेलो एक अन होवून बसलं भलतंच. सगळ्या मस्करीची कुस्करी झालीय यार."

कौतुकला पोलीसांनी पकडल्यावर आम्ही दोघेही त्यांच्याबरोबरच पोलीसचौकीवर गेलो होतो. लगेच जामीन भरता येतो का हे पाहून शक्य झाल्यास कौतुकला जामीन मिळवण्याची व्यवस्था करायची होती. पण नेमका आज शनिवार असल्याने कौतुकला जामीनही नाही मिळू शकला. फौजदार शिरवडेकरांनी स्पष्ट सांगितले की जामीन आता सोमवारी कोर्ट उघडल्यावरच देता येवू शकेल. म्हणजे निदान आजची आणि उद्याची रात्र आणि उद्याचा दिवस तरी कौतुकला चौकीच्या लॉक-अपमध्ये काढणं मस्ट होतं. कशीबशी वहीनींची समजुत काढून त्यांना घरी पोचवलं. हा सगळा प्रकार माझ्या डोक्यातून निघालेल्या मस्करीमुळे झालेला होता. काहीही करून कौतुक निर्दोष आहे हे सिद्ध करायलाच हवं होतं. पण दुर्दैवाने अजुन त्यांनी कौतुकला कुठल्या पुराव्यांच्या आधारावर अटक केलीय ते पोलीस सांगायला तयार नव्हते.

"चाफ्या, कौतुक काय करत असेल रे आत्ता? आयुष्यात पोलीसांशी कधीही संबंध न आलेला कौतुक आज चक्क माझ्यामुळे कोठडीत अडकलाय?"

मला काहीच सुचत नव्हते. कुठल्याही क्षणी रडू फुटेल की काय असे वाटत होते. एक अतिशय जवळचा मित्र केवळ माझ्यामुळे.......

"हे बघ, विशल्या उगीच पॅनिक होवू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात घे, इथे तुझा काहीही दोष नाहीये. आपण फक्त एक गंमत केली होती. आणि ती योग्य वेळी कबुलही केली होती. आता झालय असं की कुणातरी तिसर्‍या माणसाला ऐन कैन प्रकारेण आपल्या या योजनेची माहिती कळाली. आणि त्याने याचा गैरफायदा घेवून कौतुकला पद्धतशीरपणे अडकवण्याचे कारस्थान रचले. त्यातल्या त्यात जमेची बाजु म्हणजे कौत्या अजुनही स्थिर आहे, कोण जाणे? ते येडं या क्षणी कोठडीत बसुन या अनुभवावर एखादी नवी कथा लिहायचा विचारही करत असेल?"

चाफ्याने विनोद करुन वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशीच ठरला. मी हसायच्या मुडमध्ये अजिबात नव्हतो.

"चाफ्या, तु म्हणतो तसेच असेल. कारण कौतुक काहीही झाले तरी कायद्याच्या बाहेर जावून, माणुसकीला कलंक ठरेल असे कुठलेही काम, कुठलाही गुन्हा करणार नाही याची मला खात्री आहे. अतिशय सज्जन माणुस आहे रे तो. हां आता जगाचे सगळे टक्के-टोणपे खाल्लेले असल्याने बिलंदर बनलाय खरा पण, हि इज नॉट क्रिमिनल माईंडेड यार! आणि कुठल्याही कारणासाठी अगदी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी देखील तो कुणाचे प्राण धोक्यात टाकणार नाही याची खात्री आहे मला."

मी थोडासा भावनाविवश झालो होतो. कौतुकमधल्या समाजसेवकाची चांगली ओळख होती मला.

"विशल्या, तुझं म्हणणं अगदी १००% पटतय रे मला. पण हा प्रकार इतका विचित्र आहे की....

"तुच विचार कर, माधव जोशी हे नाव ही तुझ्या मेंदुची उपज होती, बरोबर? तु, मी आणि कौतुक, आपल्या तिघांशिवाय या नावाचे आपल्याला अपेक्षित असलेले महत्त्व इतर कुणालाही माहीत असणे शक्य नव्हते. मग तरीही बरोबर आपल्या योजनेतल्या उल्लेखाप्रमाणे एका स्त्रीचा खुन होतो आणि तिच्या नवर्‍याचे नाव 'माधव जोशी' असते. जे वापरून आपण कौतुकला घोळात घेण्याचा प्रयत्न केला होता."

"नाही विशल्या, हा कोणीतरी आपल्या तिघांनाही अगदी जवळुन ओळखणाराच व्यक्ती आहे. पण नक्की कोण? विशल्या, ट्राय टू रिकलेक्ट एवरीथिंग. आपण अगदी सुरूवातीपासुन या गोष्टीचा विचार करू या. म्हणजे बघ त्या दिवशी तु मला फोन केलास.... आपण बराच वेळ बोलत होतो. बोलता बोलता मी तुला म्हणालो की पुढच्या आठवड्यात मुंबईला येतोय, मला कौतुकलाही भेटायचे आहे. तेव्हा तु विचारलस की तु किंवा कौतुक एकमेकांना कधी भेटला आहात का?
मी सांगितले की प्रत्यक्ष नाही पण कौतुकने माबोवर माझा फोटो बघितला असेलच. तर तु म्हणालास, सोड रे, तो एवढासा फोटो त्याच्यावरून प्रत्यक्ष भेटल्यावर कौतुक थोडाच ओळखू शकणार आहे तुला. आपण थोडी गंमत करुया........आणि असं म्हणून तु मला तुझी ती अफलातून कल्पना ऐकवलीस....!मला वाटतं कुठल्यातरी पब्लिक बुथवरून बोलत असावास तू. तो बुथ बहुदा कुठल्यातरी हॉटेलच्या काऊंटरवर असावा. कारण मागुन वेटरचे आवाज ऐकु येत होते. आवाज क्लिअर नसल्याने तु मला नंतर फोन करतो असे म्हणालास आणि तुझा मोबाईल नंबरही दिलास........."

चाफ्यामधला रहस्यकथालेखक जागा झाला होता. इनफॅक्ट चाफ्याच्या लेखनाचं वेड लागण्याचं हेच कारण होतं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा अगदी बारकाईने विचार करण्याची त्याची पद्धतच त्याला एक उत्कृष्ट रहस्यकथा लेखक बनवत होती. पण आजकाल त्याने रहस्यकथा लिहायचे सोडून भलत्याच हलक्या फुलक्या विषयावर लिहायला सुरूवात केली होती. श्श्या...! पुन्हा भरकटलो मी...

"चाफ्या, एक मिनीट!" मी चाफ्याचे बोलणे मध्येच तोडले ...
तसे चाफ्याने आपली मान वर केली आणि माझ्याकडे बघायला लागला.

"काय रे...?"
"यार लेट मी कन्फेस वन थिंग? चाफ्या तुला आलेला तो माझा तथाकथीत पहिला फोन, ज्यात मी तुझ्यापुढे कौतुकला फसवण्याची, मस्करीची योजना मांडली होती........
तो फोन, मी केलेला नव्हता. खरेतर माझ्या डोक्यात अशी कुठलीही कल्पनाही नव्हती. त्या दिवशी जेव्हा तु मला फोन केलास आणि मी माझे नाव सांगताच मला म्हणालास,
"विशाल्...मी चाफा ! कालच्या तुझ्या कल्पनेवर काल रात्रभर मी विचार केला अँड आय थिंक वुई कॅन वेरी वेल एक्झिक्युट धीस प्लान!"
"चाफ्या, टू टेल यु वेरी फ्रँकली, आय वॉज स्टनड ! कारण माझ्याकडे तुझा नंबरच नव्हता त्यामुळे मुळात तुला फोन करायचाच प्रश्न येत नव्हता तर कुठलीही कल्पना, तिही कौतुकसारख्या जवळच्या मित्राला गंडवण्याची कल्पना तुझ्याबरोबर, ज्याच्याशी मी कधीही बोललो नव्हतो, भेटलो नव्हतो शेअर करण्याचा प्रश्नच येत नव्हता."
"अरे मग तुला तो प्लान कसा काय माहित होता? आणि जर तु नाहीस तर तो फोन कुणी केला होता? " आता डोकं धरायची पाळी चाफ्याची होती.
"तो कोण होता ते आपल्याला शोधावेच लागेल चाफ्या. त्याशिवाय कौतुकला निर्दोष ठरवणे शक्य नाही. पण सद्ध्या मी तुला तो प्लान मला कसा माहीत झाला तेवढे मात्र सांगू शकतो. तुला आठवतय की त्या दिवशी तु मला फोन केल्यावर आपले जे संभाषण झाले....

आम्ही दोघेही ते संभाषण आठवायचा प्रयत्न करू लागलो.

"हाय विशाल, चाफा बोलतोय रे ."
"क्या बात है गुरूजी, आज आमची आठवण कशी काय झाली?"
"असं काय करतोयस विशाल. काल तर बोललो नाही का आपण. कालच्या तुझ्या त्या कल्पनेवर मी रात्रभर खुप विचार केला. मला वाटतं थोडं नीट प्लान केलं तर आपण धमाल करू शकू....!"

चाफा मध्येच बोलला...

"हो बरोबर, त्यानंतर तु काही सेकंड बोललाच नाहीस. नंतर एकदम म्हणालास थोडं नीट समजावून सांग ना... नक्की काय करायचं?"
"एक्झॅटली! कारण तु कुठल्या योजनेबद्दल बोलतो आहेस तेच माहीत नव्हतं मला. पण माझी एक सवय आहे, चालूपणा म्हण हवं तर. पण माझ्याकडे प्रचंड पेशन्स आहे. समोरच्याचं ऐकण्याची माझी तयारी असते. म्हणून मी ठरवलं की कुठली योजना? ते तरी ऐकू आणि मग ठरवू पुढे चाफ्याला खरं ते सांगायचं का नाही ते? पण मग तु ती योजना ऐकवत गेलास आणि मी त्या योजनेच्या प्रेमात पडत गेलो. कौत्याला गंडवण्याचा हा अफलातून प्लान होता आणि तुझ्यामते त्या कल्पनेचा जनक मी होतो. स्वतःच्या डोक्याला काहीही त्रास न देता असल्या भन्नाट कल्पनेचं श्रेय मला मिळत होतं. आणि साधी सरळ मस्करी होती, कौतुकला कसलाही त्रास देण्याची किंवा फसवण्याची शक्यता नव्हती त्यामुळे मला मोह पडला आणि मग मी तुला काही न सांगता तुझ्या हो ला हो मिळवत गेलो."

मी खालमानेने उदगारलो....." सॉरी यार, चाफ्या !"

"इट्स ओके यार ! मी तुझ्या जागी असतो तरी हेच झालं असतं. तरीच मला तुझा आवाज दुसर्‍यावेळी वेगळाच वाटला होता. पण फोनवर असेही काही फरक लक्षात येत नाही म्हणून मी दुर्लक्ष केले. पण विशल्या तसे असेल तर 'तो' कोण होता? तुझ्या लक्षात येतय का विशल्या? कुणी अतिषय हुश्शार आणि पाताळयंत्री माणसाने पद्धतशीरपणे आपला वापर करून घेतलाय. आणि हा जो कोणी आहे तो तुला अगदी व्यवस्थीत ओळखतोय. तुझा स्वभाव, तुझ्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी तो चांगलाच माहितगार आहे.
त्याने अगदी व्यवस्थितपणे आपली कल्पना माझ्या गळी उतरवली. हे करताना त्याने जाणुन बुजून लॅंडलाईनवरुन, पब्लिक बुथवरुन फोन केला. त्याला पक्के माहीत होते की मी परत तुला फोन करणार म्हणुन त्याने मला तुझा मोबाईल नंबर दिला. त्याला हे ही पक्के माहीत होते की तु या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार. फार बारकाईने विचार करून, स्वभाव वैशिष्ठ्यांचा अभ्यास करुन हा प्लान आखण्यात आलेला आहे. हा नक्कीच कुणीतरी जवळचा, आपल्याला नीट ओळखणारा माणुस आहे विशाल."

चाफ्याचा मेंदू व्यवस्थित काम करत होता.

"पण चाफ्या, हे सगळे करून त्याला नक्की काय साधायचे होते? कारण असे बघ... एकवेळ असे म्हणता येइल की आपल्याला पुढे करून त्याला कौतुककडुन आपल्या बायकोच्या खुनाची योजना, प्लान तयार करून हवा होता असे म्हणले तर...."

"विशल्या त्या माधव जोशीचा तर प्लान नसेल हा? पण तो आपल्याला कसा काय ओळखतोय?"

चाफा मध्येच डोके खाजवत म्हणाला, तसे माझे डोकेही त्या बाबीचा विचार करू लागले.

"सॉरी यार तु कंटिन्यु कर, मी उगाचच लिंक तोडली तुझी.... !" चाफा

"हा तर मी काय म्हणत होतो जर त्याला कौतुककडुन आपल्या बायकोच्या खुनाची योजना, प्लान तयार करून हवा होता असे म्हणले तर....तिथे तो अपयशीच ठरला आहे. कारण कौतुक त्या गोष्टीला शेवटपर्यंत तयार झालाच नाही. त्याने अशी कुठली योजना तुला द्यायच्या आधीच तर आपले सोंग पकडले गेले ना! मग हे करुन त्याने ... एकवेळ गृहीत धरुन चालु की तो म्हणजे माधव जोशीच आहे, तर त्याने नक्की काय साधले. आणि आता तो कशाच्या जोरावर म्हणतोय की खुनाचा प्लान त्याला कौतुकने तयार करुन दिला? आणि पोलीसांना असा काय पुरावा सापडलाय कि ज्याच्या जोरावर त्यांनी थेट कौतुकला अटक केली. काहीतरी सॉलीड लोचा आहे चाफ्या, कुछ तो गेम है इसमें. साला डोकं जाम भंजाळलं आहे."

"विशाल एकच करता येण्यासारखं आहे. उद्या पोलीसचौकीवर जावून शोधुन काढण्याचा प्रयत्न करणे की त्यांच्याकडे पुरावा काय आहे? कशाच्या जोरावर त्यांनी कौतुकला अटक केलीय? परवा दिवशी सकाळी त्याच्या जामीनाचा प्रयत्न करू. त्यानंतर मी एकदा गावाकडे जावून रजेचा अर्ज टाकून येइन. एकदा कौतुक जामीनावर बाहेर आला की त्याच्याकडूनही बरीच माहिती मिळू शकेल. काय म्हणतोस?"

चाफ्याने विचारले आणि मी मुंडी हलवली.

"तु म्हणशील तसे यार मला तर काहीच सुचत नाहीय!"

******************************************************************************

दुसर्‍या दिवशी म्हणजे रवीवारी सकाळी सकाळी आम्ही पोलीसचौकीवर जावून पोचलो. वहिनींनाही तिथेच बोलावून घेतले होते. आधी तर तो शिरवडेकर कौतुकला भेटुच द्यायला तयार नव्हता. मग तिथून सरळ आण्णांच्या एका जुन्या मित्राला, जे सद्ध्या बांद्रा कंट्रोलला सिनीअर पी.आय. म्हणुन कार्यरत होते त्या दातारकाकांना फोन लावला. त्यांनी मध्यस्थी केली तेव्हा कुठे शिरवडेकराने आम्हाला कौतुकला भेटायची परवानगी दिली.

आम्ही वहिनींना आधी जावू दिले. म्हंटलं आपण नंतर भेटू.

थोड्यावेळाने आम्ही आत गेलो आणि मला धक्काच बसला. एका रात्रीत माझ्या हसतमुख मित्रात प्रचंड फरक पडला होता.कौतुकचा चेहरा आक्रसल्यासारखा झालेला होता. रात्रभर झोप आलेली नसल्याने डोळे सुजल्यासारखे वाटत होते. डोळ्याखाली एका रात्रीतच काळी वर्तुळे जमा झाली होती. एका रात्रीत माझा मित्र दहा वर्षाने म्हातारा झाल्यासारखा भासत होता. मी अंतर्बाह्य चरकलो. पोलीसांनी काही त्रास तर दिला नसेल ना कौतुकला?

मी गर्रकन वळुन शिरवडेकरांकडे पाहीले. तसे त्यांनी माझ्या मनातले विचार ओळखल्याप्रमाणे उत्तर दिले.

"अजुन त्याला हात ही लावलेला नाहीय मी. निदान चौकीत तरी मी कायदा पाळतो. उद्या न्यायालयात त्याची कस्टडी मागुन घेणार आहे मी. मग बोलेल पोप्पटासारखा. आमच्या ताब्यात आला की पत्थरपण बोलतो." शिरवडेकर कुत्सितपणे बोलले.

मी रागा रागात काहीतरी सणसणीत बोलणार होतो तेवढ्यात चाफ्याने माझा हात हलकेच दाबला.

"गप्प बस विशल्या, काही बोलायची ही जागा नव्हे. उद्या कोर्टात आपले वकील बोलतीलच काय ते."
मी राग आवरला आणि आम्ही कौतुककडे वळलो.

कौत्याकडं अगदी बघवत नव्हतं. एका प्रसन्न , हसतमुख माणसाची ही अशी अवस्था बघणं खरंच खुप क्लेशदायक होतं.

"कौतुक त्यांनी काही त्रास नाही ना दिला तुला?" चाफ्याने कौतुकला विचारलं.
"नाही रे, ......"कौतुकचा आवाज कुठुनतरी खोल विहीरीतून आल्यासारखा वाटत होता. तो वरवर दाखवत नसला तरी आतुन थोड्याफार प्रमाणात खचलेला होता हे निश्चीत.

"पण विशाल, सुटका कठीण आहे. त्यांच्याकडे माझ्या विरुद्ध चांगलाच पुरावा आहे."
"काय आणि कसला पुरावा आहे, कौतुक त्यांच्याकडे." माझे डोळे चमकले ....
"माधव जोशीने त्यांना माझ्या स्वहस्ताक्षरात असलेला खुनाचा प्लानच दिलाय विशाल. म्हणजे त्याच्या घरात तपास करताना त्यांना ते हस्तलिखीत सापडले. त्यावर माधवने पोलीसांना तो प्लान मीच त्याला बनवून दिला असल्याचा जबाब दिला आणि त्यामुळे पोलीसांनी मला अटक केलीय." इति कौतुक.
"काय? पण तु असला प्लान त्याला कधी दिला होतास.. आणि ते नक्की तुझेच अक्षर आहे कशावरुन?"
"काहीतरी विचारू नकोस विशल्या. मी कशाला त्याला असला काही प्लान द्यायला जातोय. मला काय वेड लागलय का? तु आज ओळखतोस आहेस का मला?"
"कौतुक ....., तु त्याला प्लॅन दिला नाहीस हे निश्चीत....." चाफ्याच्या डोक्यात काही तरी चक्र सुरू झाले बहुदा.
"हो रे, आजकाल लिहायचा प्रचंड कंटाळा येतो. आणि लॅपटॉप घेतल्यापासुन टायपायची सवय आणि सोय झालीय. मग जर त्याला काही द्यायचेच असते तर स्वहस्ताक्षरात देवून स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड कसा मारून घेइन मी. आय एम नॉट अ फुल, यार!"

कौतुक अगदी मनापासुन बोलला. तसा चाफ्याचा चेहरा फुलला.

"मग सोपे आहे कौतुक, जर ते तु लिहीलेले नसशील तर नक्कीच कुणीतरी तुझ्या हस्ताक्षराची नक्कल केलेली असणार आणि हे सिद्ध करणे अवघड नाही. फक्त आपल्याला एक चांगला हस्ताक्षरतज्ञ शोधून काढावा लागेल."
"पण त्यासाठी पोलीसांनी ती हस्तलिखीताची प्रत आपल्याला द्यायला हवी ना. ते स्वतःहून आपली केस का कमजोर करतील." कौतुकचा स्वर अगदीच निराश होता."
"त्यांचा बाप देइल. आपणच वकीलच तसा देवू. तू त्याची काळजी करू नकोस." चाफ्याच्या स्वरात आता कमालीचा आत्मविश्वास होता.
"सॉरी यार कौतुक, माझ्या त्या मुर्ख आयडीयेमुळे तुला हे सगळं भोगावं लागतय. आय एम रिअली सॉरी, यार. पण तू काळजी नको करू. आकाशपाताळ एक करू, पण तूला यातुन निर्दोष सोडवूच आम्ही." मी खालमानेने बोललो तसा कौतुकने माझ्या डोक्यावर जोरात एक टपली मारली.

"गप ए विशल्या. काहीतरी मुर्खासारखं बोलू नकोस. आता जा तुम्ही! जरा घराकडे लक्ष असु द्या माझ्या."
"डोंट वरी, यार. ती आघाडी सांभाळु आम्ही. इनफॅक्ट वहीनी खुप धीराच्या आहेत. नाहीतर अवघड होतं. येतो आम्ही. संध्याकाळी पुन्हा येवू वकीलाबरोबरच ."

चाफा आणि मी, आम्ही दोघेही वहीनींना घेवून चौकीच्या बाहेर पडलो.

**************************************************************************

दुपार बरीच धावपळीची गेली. वकीलाला भेटणं. त्याला केस समजावून सांगणं, आपली बाजु पटवून देणं यात बराच वेळ गेला. दुपारचं जेवणही राहून गेलं त्यातच. तशीही भुकेची भावना नव्हतीच म्हणा. संध्याकाळी वकीलाला घेवून आम्ही पुन्हा चौकीवर गेलो. त्यांना वकीलपत्रावर कौतुकच्या सह्या हव्या होत्या. तर कौतुक आमची वाटच पाहात होता. चांगलाच एक्सायटेड वाटत होता.

"विशल्या, तुला आठवतं काही दिवसापुर्वी मी तुला एका फिल्म प्रोड्युसरबद्दल बोललो होतो. ....."

माझ्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह...?

"तो रे... समीर वर्धन. त्याला माझ्या कुठल्याशा कथेवर चित्रपट काढायचा होता. म्हणुन मला भेटला होता तो."

आत्ता माझी ट्युब पेटली...

"येस आठवलं आणि त्याचा ससेमिरा टाळण्यासाठी तु त्याला तुझा म्हणून माझा नंबर दिला होतास." मी बोललो.

"तोच तो.....!" कौतुक चांगलाच उत्तेजीत झाला होता. "मला तो तेवढा जेनुइन वाटला नव्हता रे. त्याला एक अशी कथा हवी होती की ज्यात एक व्यक्ती आपल्या श्रीमंत पत्नीचा खुन करुन तिची इस्टेट बळकावते आणि पोलीस त्याचे काहीही बिघडवू शकत नाहीत. तो व्य्वस्थीतपणे पोलीसांच्या नाकावर शिरजोर होवून मुक्तच राहतो. मला तो माणुस बरोबर वाटला नाही म्हणुन त्याला मी प्रेमाने बाहेर काढला. त्याला कटवण्यासाठी म्हणुन मी तुझा फोन नंबर दिला होता माझा म्हणुन आणि तुला अर्थातच सांगुन ठेवले होते की त्याचा फोन आला तर कटव म्हणून. त्या कामात तू एक्सपर्ट आहेस चांगलाच."

"साल्या....., शहाणाच आहेस. पण त्याने नंतर काही फोन नाही केला कधीच. मी तर विसरूनही गेलो होतो त्याला. पण त्याचे इथे काय?" मी बोललो.

आता कौतुक चांगलाच गंभीर झाला.

"विशल्या, काल पोलीसांनी माधव जोशीकडून माझी ओळख परेड करुन घेतली. आणि दहा माणसातून त्याने मला बरोब्बर ओळखले. तो शेवटच्या कोठडीतला माणुस... तो माधव जोशी आहे. उद्या माझ्याबरोबर त्यालाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे."

आम्हा तिघांच्याही मी, चाफा आणि वकिलसाहेब नजरा आपसुक तिकडे वळल्या. त्या कोठडीतला तो गोरा गोमटा माणुस आमच्याकडेच पाहात होता. आम्ही पाहीले की त्याने मान वळवली. पण त्याचा देखणा चेहरा आम्हाला तेवढ्या वेळातही स्पष्ट दिसला होता.

"कौतुक, अरे पण तु त्याला कधी भेटला नाहीस, बोलला नाहीस तरी त्याने तुला ओळखले?" चाफ्याचा प्रश्न.
"कमॉन चाफ्या, ते काही अवघड नाही. एवढे सगळे प्लान केल्यावर कौतुकचा फोटो मिळवणे काहीच अवघड नाही त्या प्लानरला. पण कौतुक इथे त्या समीर वर्धनचा काय संबंध? ते सांगीतलेच नाहीस तू?"
"समीर वर्धन" हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतेय." चाफा डोके खाजवत म्हणाला.
"अरे तो एक फिल्म प्रोड्युसर आहे, कुठेतरी एखाद्या चॅनेलवर किंवा मे बी वर्तमानपत्रामध्ये वाचलं असशील." इति कौतूक
"शक्य आहे, पण इट वॉजन्ट रिलेटेड विथ फिल्म्स? काहीतरी वेगळेच होते...., आत्ता आठवत नाहीये. एनी वेज तु आणखी काहीतरी सांगत होतास" इति चाफा.
"तेच तर सांगतोय यार... मी माधव जोशीला कधीही भेटलो नाहीये, पण समीर वर्धनला भेटलोय. आणि मी चुकत नसेन, माझी स्मरणशक्ती जर मला दगा देत नसेल तर......, मी अजुन सब इन्स्पेक्टर शिरवडेकरांना काही बोललो नाहीये पण माधव जोशी आणि समीर वर्धन ही दोन्ही एकाच माणसाची नावे आहेत असा मला ठाम संशय आहे." कौतुक ठामपणे उदगारला.
"तुला काय म्हणायचेय कौतुक......., म्हणजे कदाचित.......!"
"एक्झॅटली विशल्या........., आता लिंक लागतेय मला." चाफा ओरडलाच जवळजवळ.
"ओ सायेब भेटायची वेळ संपली. चला आता उद्या कोर्टात या सरळ, चला चला नाहीतर आमचे साहेब ओरडतील परत आमच्यावर." हवालदाराने इशारा दिला तसे नाईलाजाने आम्हाला तेथुन दूर व्हावे लागले.
जाता जाता चाफ्याने कौतूकला इशारा दिला....
"डोंट वरी कौत्या, काही नाही निदान.... संशयाचा फायदा मिळून का होईना पण तुझी सुटका होईलच याची खात्री बाळग. माझ्यावर विश्वास ठेव. चल विशल्या!"

सर चाफाराव होम्स आनंदाने डॉक्टर नसलेल्या विशाल वॅटसनला घेवून चौकीच्या बाहेर पडले.

*******************************************************************************

"चाफ्या, तुला काय सुचलेय? मला जरा सांगशील का? तुझ्या सुपीक मेंदुत नक्कीच काहीतरी भनाट कल्पना आलेली आहे." मला उत्कंठा लपवता आलीच नाही. मी चौकीच्या बाहेर पडल्या पडल्या अधीरपणे चाफ्याला विचारले.
"सगळे सांगतो, या बाबतीत वकीलसाहेब आपली बर्‍यापैकी मदत करू शकतील."
"अरे बोला ना तुम्ही, जर कौतुकरावांना सोडवण्यात मदत मिळणार असेल तर शक्य असेल ती मदत करणे माझे कर्तव्यच आहे. आता ते माझे अशील आहेत." वकिलसाहेब उत्साहाने तयार झाले.
"वकिलसाहेब, एक साधारण ५-६ वर्षापुर्वी नागपुरात एक केस झाली होती, चेक फोर्जरीची आठवतेय? समीर वर्धन या नावाच्या एका गृहस्थाला त्या खटल्यात दोन वर्षाची कैदही झाली होती. येस त्या केसचे डिटेल्स मिळतील का आपल्याला? जमल्यास त्या समीर वर्धनचा फोटो हवाय आपल्याला."
"येस, नागपुर कोर्टात चांगलीच ओळख आहे माझी. तिथुन त्याची माहिती काढता येइल. उद्या कौतुकरावांना जामीनावर सोडवून घेवु आणि थेट नागपुरला जावू आपण." वकीलसाहेबांची कळी खुलली होती.
"पण कौतुकला कसे काय येता येइल आपल्याबरोबर. कोर्ट परवानगी देइल त्याची?" माझी शंका.
"नका देइना, आपण तिघेच जावून येवु. दरम्यान मी माझ्या तेथील स्नेह्यांशी बोलुन माहीती काढुन ठेवायला सांगतो. काय म्हणता?" इति वकिलसाहेब.
"साहेब, कौतुकला या केसमधुन सोडवण्यासाठी आमची उत्तर धृवावर देखील जायची तयारी आहे." मी आणि चाफा एका पायावर तयार झालो.

प्रत्यक्ष खुनात सहभाग नसल्याने आणि पोलीसांकडे केवळ ते हस्तलिखीत एवढा एकच पुरावा कौतुकविरुद्ध असल्याने कौतुकला जामीन मिळवणे फारसे अवघड गेले नाही. आणि पुन्हा वकीलसाहेबांनी आपले सगळे वकीली कौशल्य पणाला लावुन हस्तलिखीताच्या वैधतेबद्दल न्यायालयाच्या मनात शंका निर्माण करण्यात यश मिळवले. न्यायाधीषमहोदयांनी कौतुकला जामीन देतानाच त्या हस्तलिखीताची वैधता तपासुन लवकरात लवकर कोर्टाला त्याची माहिती पुरवण्याचा आदेश पोलीसांना दिला आणि पुढची तारिख दिली.

आता आमच्या जिवात थोडा जिव आला. चाफ्याने कौतुकला समीर वर्धन बद्दल माहिती दिली.

"देव करो, तो समीर वर्धन आणि हा समीर वर्धन एकच असोत." इति चाफा.

"पण त्याने काय साध्य होणार आहे? ती केस आणि ही केस पुर्णपणे वेगळी आहे. इथे माधव जोशी समीर वर्धन म्हणु हवे तर त्याने सरळ सरळ खुनाचा आरोप मान्य केला आहे, पोलीसांकडे त्याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. या माहितीच्या आधारावर आपण कौतुकला कसे काय निर्दोष साबीत करणार."

कौतुक आणि चाफा, बरोबर तो वकीलसुद्धा माझ्याकडे बघायला लागले. तिघांच्याही नजरेत काय मुर्ख माणुस आहे हा... अशा प्रकारचे भाव होते. मला आपलं काहीतरी चुकलेय याची जाणीव झाली.

"विशल्या, तु ठिक आहेस ना? रहस्यकथा लेखक आहेस ना तुही? येड्या, अरे हा जर तोच समीर वर्धन असेल तर तो फोर्जरीसाठी फेमस आहे. इन दॅट केस हे तथाकथीत कौतुकच्या हस्ताक्षरातील हस्तलिखीतही त्यानेच तयार केलेले नसेल कशावरून? असा मुद्दा आपण मांडू शकतो. मी जे काल म्हंटले होते "संशयाच्या आधारावर" ते याच साठी. यु नीड अ ब्रेक विशल्या!"

चाफ्याने मला फटके मारायचेच काय ते बाकी ठेवले होते. अर्थात माझा प्रश्नही तेवढाच मुर्खपणाचा होता म्हणा.

मंगळवारी, मुक्काम पोष्ट नागपूर.....

इथे आल्यावर जी माहिती मिळाली त्यानुसार त्या केसमध्ये "समीर वर्धन"ला दोन वर्षाची शिक्षा झाली होती आणि त्यासाठी त्याला अमरावतीच्या कारागृहात डांबण्यात आले होते. आमची गाडी अमरावतीला पोहोचली. वकीलसाहेबांच्या नागपुरातील स्नेह्यांनी इथल्या जेलरसाहेबांना आधीच फोन करून कल्पना दिली होती त्यामुळे आमचे काम सोपे झाले.

इथे आल्यावर कळाले की त्यावेळी समीरची शिक्षा चांगल्या वर्तनामुळे सहा महिने कमी झाली होती. म्हणजे दिड वर्षातच तो तिथून सुटला होता.

"साहेब, त्या समीर वर्धनचा एखादा फोटो मिळू शकेल बघायला?"

चाफ्याने विचारले तसे जेलरसाहेबांनी त्याची फाईल काढून त्याचा फोटो आम्हाला दाखवला. फाईल त्याच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या माहितीने भरलेली होती. आणि त्यातले ९०% गुन्हे फोर्जरीचे होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फोटोतून हसर्‍या चेहर्‍याचा माधव जोशी चौकस नजरेने आमच्याकडे पाहात होता.

चाफ्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. आम्ही तिथुन बाहेर पडलो.

"विशल्या, केस इज इन अवर हँड्स ! वकीलसाहेब, आता तुमचे काम सुरू होते. दुर्दैवाने ते हस्तलिखीत कौतुकच्या हस्ताक्षरात आहे की नाही हे अजुन सिद्ध झालेले नाही. पण मला खात्री आहे की कौतुक असला मुर्खपणा करणार नाही. तेव्हा तो एक आधार आणि समीर वर्धन उर्फ माधव जोशीचे पुर्वायुष्य याच्या आधारावर कौतुकला निर्दोष सोडवणे आपल्याला रादर तुम्हाला अवघड जाणार नाही. इथुन पुढे आमचा सारा भरवसा तुमच्या वकीली कौशल्यावर अवलंबुन असणार आहे."

चाफा गेल्या दोन तीन दिवसात पहिल्यांदाच जरा रिलॅक्स वाटत होता.

"डोंट वरी फ्रेंड्स...., अगदी ही नव्याने मिळालेली माहिती मिळाली नसती तरी आहे त्या माहितीवर मी कौतुकरावांना सोडवलं असतं. त्यांच्याकडून फी घेणार आहे मी. तशीही ही केस खुपच कमजोर होती. पण या माहितीमुळे निश्चितच आपली बाजु अगदी बळकट झाली आहे. सेलिब्रेशनची तयारी करा."

अखेर जे व्हायचे होते तेच झाले. त्या हस्तलिखीतावरील अक्षर कौतुकचे नव्हतेच त्यामुळे ते सिद्ध करणे कठीण नव्हते. हस्ताक्षरतज्ञांनी ते सहज सिद्ध करुन दाखवले. आणि माधव जोशी उर्फ समीर वर्धन या माणसाची 'फोर्जरी किंग' म्हणुन असलेली ओळख आमची बाजु अजुनच मजबुत करत होती.

न्यायालयात वकीलसाहेबांच्या सांगण्यावरुन कौतुकने एक थोडीशी मॅनीपुलेटेड जबानी दिली की माधव जोशीने यापुर्वी त्याला समीर वर्धन या नावाने भेटून त्याच्याकडुन आपल्या पत्नीचा खुन करण्याचा निर्दोष प्लान मागितला होता. त्याबदल्यात त्याने पाच लाख रुपये मोजायची तयारी दाखवली होती. पण कौतुकने ती स्विकारली तर नाहीच उलट त्याचा अपमान करुन त्याला घरातुन हाकलुन दिले होते. त्यामुळे तो कौतुकवर दात खाऊन असावा आणि म्हणुनच जेव्हा त्याने आपल्या पत्नीचा खुन करायचा ठरवला तेव्हा त्यात कौतुकला अडकवायचा प्लान केला असावा. जर तो पकडला गेला नसता तर कदाचीत हे सगळेच गुलदस्त्यात राहीले असते किंवा मग त्याने कौतुकला अडकवण्याचा दुसरा काहीतरी प्लान केला असावा. पण जर सापडलोच तर आपल्याबरोबर कौतुकलाही अडकवायचे यासाठी हा बॅक अप प्लान त्याने तयार ठेवला होता. पण पोलीसांच्या हुशारीने...... (च्यायला मेहनत आम्ही केली आणि नाव पोलीसांचं?) त्याचा प्लान फसला होता.

न्यायाधीषांनी कौतुकला निर्दोष मुक्त करत माधव जोशीला पुढील चौकशीसाठी पोलीसांच्या ताब्यात दिले. अर्थात केस संपेपर्यंत, तिचा निकाल लागेपर्यंत पोलीसांना पुर्ण सहकार्य करायचे कौतुकला आदेश देण्यात आले. तसेच केस संपेपर्यंत कुठेही शहर सोडून जायचे असल्यास पोलीसांना कळवण्याची अटही घालण्यात आली.

आम्ही कौतुकला घेवून न्यायालयाच्या बाहेर पडलो.

"सॉरी मिस्टर कौतुक, बट इट वॉज माय ड्युटी. होप यु विल अंडरस्टँड अवर प्रॉब्लेम? पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही एक नामांकीत रहस्यकथा लेखक आहात. तुमचे नाव या केसमध्ये आल्यावर अभ्यासासाठी म्हणून मी तुमच्या काही रहस्यमय कादंबर्‍या आणुन वाचल्या आहेत. आणि मी तुमचा फॅन झालोय. आता या अनुभवावरही एक मस्त कादंबरी येवू द्या."

सब. इन्स्पेक्टर शिरवडेकरांनी हसुन आपले मन मोकळे केले.

पण कौतुक मात्र खुपच गंभीर झाला होता.

"शिरवडेकर साहेब, या रहस्यकथालेखनामुळेच किंबहुना जनसामान्यात असलेल्या रहस्यकथालेखक या ओळखीमुळेच हे सगळे भोगावे लागलेय. मला दोन रात्री का होइना जेलची यात्रा घडलीय, जी मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्यापेक्षाही माझ्या घरच्यांना, माझ्या या मित्रांनाही याचा प्रचंड त्रास झालाय. आज जर विशल्या आणि चाफा नसते तर ... कदाचीत मी तेव्हाही निर्दोष सुटलो असतो, पण ते सगळे इतक्या सहज झाले नसते. त्यामुळे मी यापुढे जावुन निर्णय घेतलाय की यापुढे रहस्यकथालेखन पुर्णपणे बंद. कदाचीत माझी भुमिका टोकाची वाटेल तुम्हाला पण सद्ध्यातरी ते बंद करायचा निर्णय घेतलाय मी, पुढे भविष्यात कदाचित सुरू करेनही पुन्हा पण ते अनिश्चितच आहे. सद्ध्या चार मराठी सामाजिक आणि दोन हिंदी हॉरर टी.व्ही. मालीकांचे काम आहे. दोन मराठी चित्रपट हातात आहेत. आणि मला खात्री आहे की यापुढे फिल्म इंडस्ट्रीत भरपुर काम मिळत राहील. तेव्हा यापुढे रहस्यकथा, कादंबर्‍या लिहीणे बंद. आता सगळे लक्ष सामाजिक वा फार फार हॉरर विषयांवर लेखन. माझी बायकोही माझ्या रहस्यकथालेखनावर दात खावुन असायची. ती सारखी म्हणते तुझ्या रहस्यकथांमध्ये खुन पाडता पाडता एखादे दिवशी माझा ही खुन पाडायचास. माझा हा निर्णय ऐकल्यावर ती ही सॉलीड खुश होइल. अर्थात रहस्यकथाच वाचायच्या असतील तुम्हाला तर विशल्या, चाफा आहेतच ना! चाफ्याने आजकाल रहस्यकथा, भयकथा लिहीणे बंद केलेय पण विशल्याही मस्त लिहीतो. मी माझ्या सर्व प्रकाशकांना आता विशल्याचे नाव सुचवणार आहे अँड आय एम शुअर त्याच्या कथाही लोकांना माझ्यापेक्षाही जास्त आवडतील. जमेल ना विशल्या?"

शेवटचा प्रश्न माझ्यासाठी होता. मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, पण वरवर गंभीर चेहरा धारण करत मी म्हणालो,

"कौतुक एका जबरदस्त रहस्यकथालेखकाला रसिक वाचक मुकणार तर! तसा मी लिहीनच रे... पण माझ्या लेखनाला कौतुकच्या कथांची सर येणार आहे का?"
"चल रे असं काही नाही. तु लिहीच, ऑल द बेस्ट. तुम्हा दोघांचेही आभार मानून तुम्ही माझ्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा, तुमच्या प्रेमाचा अपमान मी करणार नाही. पण तुम्ही जे माझ्यासाठी केलं ती मी विसरणार नाही खास हे मात्र नक्की."
"अबे मी नुसताच चाफ्याबरोबर फिरत होतो, सगळे काम तर त्यानेच केलेय. डॉकॅलिटी त्याचीच होती, गधामजुरी मी केली. काय चाफ्या?"
मी चाफ्याकडे पाहात टाळीला हात पुढे केला. माझ्या हातावर कौतुक आणि चाफा दोघांनीही टाळी दिली....

चलो.... सेलिब्रेशन !

*****************************************************************************

कौतुकला वहीनींबरोबर त्याच्या घरी सोडुन चाफ्याच्या गाडीतुन आम्ही परत निघालो.

"मग काय भावी सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक श्री. विशालजी, कधी घेताय लिहायला नवीन कथा?" चाफ्याने मला विचारलं तसा मी ओशाळलो.

"गप ना बे, तु पण झाला का सुरू? त्या कौत्याला एक नाय उद्योग. "
"काही चुकीचं तर नाही ना बे बोलला कौतुक. यु डिजर्व दॅट माय फ्रेंड. असो... एकदाचा कौतुक या दुष्टचक्रातुन बाहेर पडला. पण यार विशल्या मला एक शंका अजुनही छळतेय यार." चाफ्याचा विचारमग्न चेहरा बघून मी परत काळजीत पडलो.
"आता काय?"
"विशल्या, एखाद्याचे हस्ताक्षर कॉपी करता येइल, पण त्याची लिखाणाची शैली, त्याची विचार करण्याची पद्धत कुणी कशी काय कॉपी करू शकेल? मी त्या हस्तलिखीताची एक कॉपी मिळवून वाचली होती वकीलसाहेबांकडुन. ती अगदी २०० टक्के कौतुकची शैली आहे. त्यातल्या काही खाचाखोचा अशा आहेत की ज्या फक्त कौतुकच वापरु शकतो. त्या लेखनावरुन कौतुकच्या लेखनाचा कुणीही चाहता अगदी सहज सांगेल की ते कौतुकनेच लिहीले आहे म्हणुन. तुला काय वाटते, कौतुक ................................ ?"
"चल बे चाफ्या, काही तरी भलत्या कल्पना काढू नकोस आता? त्याने जर कौतुकला अडकवायचेच ठरवले होते तर तो पुर्ण तयारी करुनच उतरणार ना? 'फोर्जरी किंग' म्हणतात यार त्याला.......!"
"तु म्हणतोस तसेच असेल आणि तसेच असावे...., चल तुला कुठे ड्रॉप करु?"
"मला ठाण्याला सोड, माझी बाईक तिथे स्टेशनला पार्क केलेली आहे. ती घेवुन मी जाईन घरी. पण काहीही म्हण चाफ्या, या केसच्या निमीत्ताने पुन्हा एकदा तुझ्या बुद्धीचा प्रचंड आवाका बघून मी अवाक झालो यार! हॅट्स ऑफ टू यू मित्रा !" ग्रेट यार, खरेच ग्रेट !"

********************************************************************************

च्यायला या चाफ्याचं काही तरी करायला हवं, पण काय आणि कसं?

म्हणे हस्ताक्षर कॉपी करता येइल पण शैली, विचारसरणी कशी कॉपी करणार?

वेड्या अरे आता तुला कसं सांगु, जेव्हा कौतुकची नव्याने ओळख झाली तेव्हा कौतुकनेच तर ते हस्तलिखीत मला दिलं होतं, त्याने पुर्वी कधीतरी कॉलेजमध्ये असताना ती कथा लिहीली होती म्हणे. ती त्याला कुणालातरी पाठवायची होती आणि टायपत बसण्याचा कंटाळा म्हणुन त्याने मला रिक्वेस्ट केली, तेवढी कथा मला टाईप करुन देशील का म्हणुन? पण पुढे त्याचा विचार बदलला आणि ते हस्तलिखीत माझ्याकडेच राहून गेलं. कौतुक ते विसरुनही गेला होता. पण मी कसा विसरेन? माझ्यात आणि त्याच्यात असा काय फरक आहे.... म्हणुन तो प्रसिद्ध रहस्यकथा लेखक!..... आणि विशाल....? नो बडी....? अरे एवढं सगळं झालं , एकालाही साधी शंका तरी आली?

असे काय बघताय माझ्याकडे?

ऐकायचीय कथा .... नाही ऐकाच....

सगळ्यात प्रथम जेव्हा कौतुकचा फोन आला त्या "समीर वर्धन" बद्दल तेव्हाच माझ्या मेंदुत किडे वळवळायला सुरूवात झाली होती. याचा काही वापर करुन घेता येइल का?
त्यानंतर काही दिवसांनी मला समीरचा फोन आला. यावेळी मात्र तो थोडा गंभीर होता....

"कौतुक....." तो मला कौतुकच समजला, कारण कौतुकने माझा नंबर त्याला स्वतःचा म्हणुन दिला होता.

"कौतुक, या वेळेस आपण थोडे स्पष्टच बोलु या. फोनवरच सांगतोय की येस तुझा गेस बरोबरच होता. मी कुणी फिल्म निर्माता वगैरे नाही. मला माझ्या बायकोचा खुन करायचाय आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. तुझ्याकडुन मला फक्त खुनाचा निर्दोष प्लान हवाय आणि त्यासाठी मी तुला वीस लाख रुपये द्यायला तयार आहे. कारण तुझा प्लान म्हणजे तो फुलप्रुफ असणार याची मला खात्री आहे. विचार असेल तर उद्या सकाळी ११ वाजता मला व्ही.टी. जवळच्या एक्सेलसिअरच्या लेन मधल्या त्या बरिस्ताजवळ येवून भेट."

एवढे बोलुन त्याने फोन कट केला. मी लगेचच जमालला फोन लावला. हा येडा स्वतःला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह समजतो. तसा हुशार आहे. मी त्याला व्ही.टी. ला घेवून गेलो. समीरच्या समोरुन आम्ही दोन वेळा गेलो. कौतुकने सांगितलेल्या वर्णनावरुन मी त्याला ओळखलं. (इथे पुन्हा सगळ्या गोष्टीत बारकावा शोधण्याची कौत्याची सवय त्याला नडली) पण तो बहुदा कौतुकला एक्स्पेक्ट करत होता. त्यामुळे मला त्याने ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तो पुन्हा फोन करणार याची मला खात्री होती. तसा त्याने केलाही नंतर. थोडेसे आढेवेढे घेत शेवटी पंचवीस लाखावर कबुल झालो. मला त्या पंचवीस लाखापेक्षाही महत्त्वाचं असं काही वेगळंच साध्य करायचं होतं.

एकदा समीर दाखवुन जमालला या समीरच्या मागे लावलं. जमालने एका दिवसातच त्याच्या बद्दल प्रचंड माहिती गोळा केली. समीरचं खरं रुप समोर आलं आणि मला सॉलीड धक्का बसला. हा माणुस समीर वर्धन नेहमीच्या आयुष्यात माधव जोशी या नावाने वावरत होता. एकवेळ मी ठरवलं होतं की या माणसाला विसरून जायचं. पण पुन्हा कौतुकचं ते हस्तलिखीत आठवलं.... तो प्लान इथे परफेक्ट बसणार होता.

समीर उर्फ माधवचा पुन्हा एकदा फोन आल्यावर वर सांगितल्याप्रमाणे मी त्याला पंचवीस लाखासाठी कबुल करुन घेतले पण एक अट घातली. यावेळेस मी उर्फ कौतुक त्याला प्रत्यक्ष भेटणार नव्हता. त्यासाठी मी वेगळ्या नावाने अंधेरी डी.एन. नगर पोस्ट ऑफीसमध्ये एक पोस्ट बॉक्स नंबर घेतला. अर्धी रक्कम अ‍ॅडव्हान्समध्ये त्या पोस्ट बॉक्स नंबरवर माधवने पाठवायची होती आणि उर्वरीत अर्धी प्लॅन वर्क आउट झाल्यावर असे ठरले होते. अर्थात पहीली अर्धी रक्कम हातात पडल्यावर मी तिकडे फिरकण्याचा मुर्खपणा करणार नव्हतो. एकतर पैसे हे माझं उद्दीष्ठ कधीच नव्हतं आणि प्लॅन वर्क आउट झाल्यावर लगेच पोलीस माधव जोशी उर्फ समीर वर्धनला अटक करणार होती. उरलेले पैसे पाठवायला त्याला वेळ तरी मिळायला नको? आणि समजा त्याने वेळ काढुन पाठवले असलेच तरी त्या पी.ओ. बॉक्सची माहीती त्याने पोलीसांना दिली असण्याची शक्यता होतीच, म्हणुन मी उदार मनाने (?) उर्वरीत रकमेवर पाणी सोडण्याचे आधीच ठरवले होते.

आता हे सगळं कशासाठी?

कौतुक, माझा खुप चांगला मित्र आहे. आम्ही दोघेही रहस्यकथांचे मास्टर आहोत. दोघांचाही आपला असा एक चाहता वर्ग आहे. मग प्रसिद्धी, प्रतिष्ठा त्याच्याच वाट्याला का? मला का नको? ते जर हवं असेल तर.... कौतुकने रहस्यकथा लिहीणं सोडायला हवं.

व्यवहार तो व्यवहार शेवटी. मैत्रीपायी जर माझ्या करिअरला अडथळा होणार असेल तर...!

नोप्,आय वोंट टॉलरेट दॅट! पण मित्र म्हणुन कौतुकला फार त्रास झालेलाही मलाच आवडलं नसतं. खरेतर हा एक जुगारच होता. कौत्याचा स्वभाव मला फार चांगल्याप्रकारे माहीत आहे. एखादी गोष्ट मनात आली की तो लगेच निर्णय घेवून रिकामा होतो. मग त्याला देवही त्याच्या निर्णयापासुन परावृत्त करु शकत नाही. फक्त त्याच्या मनात रहस्य कथा लेखनाबद्दल पराकोटीची अनास्था किंवा भीती निर्माण करणं आवश्यक. त्याशिवाय माझ्या मार्गातला एकमेव काटा कसा दुर होणार? आय हॅव टु प्ले धिस गँबल. ही संधी चांगली होती.

समजा एखाद्या व्यक्तीचा खुन झाला आणि पोलीसांना असे समजले की प्रत्यक्ष खुनी जरी कुणी दुसरा असला तरी त्या खुनाचा प्लान कौतुकने बनवला आहे. तर अर्थातच ते कौतुकला अटक करतीलच. निदान चौकशीसाठी तरी ताब्यात घेतीलच. तेवढे पुरेसे आहे. पोलीस स्टेशनमध्ये एक रात्र जरी काढावी लागली तरी सामान्य माणसाचे मनोधैर्य ढासळायला तेवढे पुरेसे असते. कौतुक तसा स्थिर वृत्तीचा आहे. पण मनुष्य स्वभाव कुणाला कळलाय? पोलीसचौकीतली एखादी रात्र त्याचे ही मनोधैर्य ढासळवू शकेल कदाचीत.

ठिक आहे, एक जुगार खेळायला काय हरकत आहे. नाहीतरी कौतुकला निर्दोष सोडवण्याचा प्लॅन माझ्याकडे तयार होताच ना!

आणि मी कौतुकचा प्लान तसाच्या तसा थोडाच समीरला देणार होतो, तो तसा दिला तर समीर उर्फ माधव यशस्वी होणार यात शंकाच नाही. म्हणुन मी त्या प्लानमध्ये थोडे लुप होल्स निर्माण केले आणि मी त्याच्यावर नजर ठेवून होतोच. एकदा का समीरने आपल्या बायकोचा खुन केला की पोलीसांना एका अज्ञात हितचिंतकाचा फोन जाणार होताच की. अर्थात कौतुकला कायमचे अडकवायचा माझा हेतु नव्हताच त्याने फक्त या प्रसंगाने घाबरुन जावून रहस्य कथा लेखन थांबवले म्हणजे झाले. माझा मार्ग मोकळा.

त्यामुळे मी कौत्याचे ते हस्तलिखित पुन्हा एकदा माझ्या हाताने, कौत्याच्या अक्षरात, त्याच्याच शैलीत लिहून काढले. फोर्जरी किंग नसेन मी. पण थोडा प्रयत्न केल्यास नक्कल करणे मला अशक्य नव्हते. अ‍ॅग्रीड आय एम द मास्टर ऑफ नन, बट अ‍ॅटलिस्ट आय एम अ जॅक ऑफ ऑल. सर्व साधारण माणसाला कौतुकच्या अक्षरात आणि माझ्या त्या हस्तलिखीतात काहीच फरक आढळला नसता. पण उद्या जेव्हा हस्ताक्षर तज्ञ त्या हस्तलिखीतातले अक्षर आणि कौतुकचे अक्षर पडताळून पाहतील तेव्हा ते वेगवेगळ्या व्यक्तींचे आहे हे त्यांना कळायला नको का? त्याशिवाय कौतुक या सगळ्यातुन निर्दोष कसा सिद्ध होणार? कारण कौतुकला शिक्षा व्हावी अशी माझी कधीच इच्छा नव्हती. पुन्हा यातुन कुणाला माझा काहीच संशय येता कामा नये. काय करावे बरे?

म्हणुन मग एक वेगळेच नाटक रचले. चाफ्याला माधव जोशी बनवून कौतुकवर सोडला. मग ऐनवेळी सगळे कबुल करुन माघार घ्यायची असे ठरवले. पण कौतुकच्या अनपेक्षीत रिअ‍ॅक्शनमुळे तो प्लॅन अर्धवटच सोडावा लागला. अर्थात त्यामुळे काही फारसा फरक पडला नाही. आणि मग प्लॅनला खरी सुरूवात झाली.

मग माधव जोशी... त्याच्याकडून त्याच्या बायकोचा खुन..... मग पोलीसांना त्याबद्दल अज्ञात हितचिंतकाचा फोन...मग माधवला अटक.... मग पोलीसांना ते हस्त लिखीत सापडणं...... मग कौतुकला अटक.... मग स्वतःकडे थोडा कमीपणा घेवून, चाफ्याला ढील देवून कौतुकला निर्दोष सिद्ध करणं.... प्रसंगी सगळ्यांच्या नजरेत थोडं बावळट ठरणं. अर्थात या सगळ्या प्रकरणात मी कायम चाफ्याबरोबर होतो. थोडासा जरी तो माझ्या योजनेपासुन दुर जातोय असं वाटलं की त्याला मला अपेक्षीत असलेले क्ल्यु देवून पुन्हा मला हव्या असलेल्या रस्त्यावर आणणं...... किती सोपं होतं सगळंच? सगळ्या गोष्टी मला जशा हव्या होत्या, जेव्हा हव्या होत्या तेव्हा आणि अगदी तशाच, अगदी माझ्या प्लॅनप्रमाणेच घडत गेल्या.

आता यात त्या बिचार्‍या समीरच्या बायकोचा बळी गेला विनाकारण. पण आफ्टर-ऑल एव्हरी थिंग इज फेअर इन लव, वार अ‍ॅन्ड ऑफकोर्स .......... इन बिझनेस टू!

कौतुकचा अडथळा तर दुर झालाय्...पण हा चाफा.... या चाफ्याचं काय करू?

समाप्त.

(डिस्क्लेमर : चाफा व कौतुक हे माबोवरील अतिषय चांगल्या दर्जाचे लेखन करणारे रहस्यकथाकार आणि भयकथाकार आहेत . परंतु प्रस्तुत कथेतील सर्व प्रसंग, घटना आणि पात्रे ही पुर्णपणे काल्पनिक असून त्यांचा वास्तवातील कुठल्याही घटना वा व्यक्तीशी कसलाही संबंध नाही आणि तसा तो आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा.)

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

18 Dec 2009 - 6:25 pm | स्वानन्द

बापरे!... एवढं प्रदीर्घ लेखन!!
नंतर मोकळा वेळ पाहून नक्की वाचेन.

अवांतर : एवढं सगळं टंकायला किती वेळ लागला?

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

स्वाती२'s picture

18 Dec 2009 - 6:33 pm | स्वाती२

मस्त!

या चाफ्याचं काय करू?
चाफ्यासाठी पोलिसांच्या जोडीला मांत्रीक पण लागणार ;)

निमीत्त मात्र's picture

18 Dec 2009 - 10:50 pm | निमीत्त मात्र

बाप रे! भरपूर मोकळा वेळ दिसतोय विशालजींकडे! सवडीने वाचूयात..

विशाल कुलकर्णी's picture

21 Dec 2009 - 9:18 am | विशाल कुलकर्णी

सर्वांचे मनःपूर्वक आभार !

बाप रे! भरपूर मोकळा वेळ दिसतोय विशालजींकडे! >>>>

वाचायला तुमच्याकडे मोकळा वेळ नसेलच ! ;-) बादवे लिहीण्यासाठी फक्त मोकळा वेळ लागत नाही, त्यासाठी थोडीफार कल्पनाशक्ती लागते, इच्छा लागते................. वेळ काय कसाही काढता येतो हो. दर रोज पंधरा मिनीटे ( २४ तासातली फक्त पंधरा मिनीटे ) दिली तरी एवढा मजकुर लिहायला आठवडा पुष्कळ होतो....

सवडीने वाचूयात..>>>>

धन्यवाद, वर्षभर लागले तरी काही हरकत नाही.

फक्त जरा आवरती घेतली असती तर जास्त लोंकानी वाचली असती.>>>>

टुकुलजी, धन्यवाद. काही गोष्टी अपरिहार्य असतात. कुठलेही लुपहोल्स न ठेवता कथा लिहायची म्हणजे एवढे लेखन आवष्यकच आहे. कुठल्याही मासिकाची फारतर तीन पाठपोठ पाने भरतील याने आणि तेवढे तर हवेच. बाकी कुठे काही पाल्हाळिक झाले असे वाटत असेल तर जरुर सांगा. सुचनेची दखल निश्चित घेतली जाईल. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

टुकुल's picture

19 Dec 2009 - 7:22 am | टुकुल

सवडीने वाचल ;-)
जबरदस्त वळण कथेला, फक्त जरा आवरती घेतली असती तर जास्त लोंकानी वाचली असती.

--टुकुल

sneharani's picture

19 Dec 2009 - 11:33 am | sneharani

मस्तच झालीये रहस्यकथा..!

एकदम मस्त कथा तयार झाली आहे विशाल.वेगवान व झटकन अनपेक्षीत वळण देनारी उत्तम रहस्यकथा लिहली आहे तुम्ही.आपल्याला खुप आवडली.

वेताळ

पाषाणभेद's picture

19 Dec 2009 - 10:24 pm | पाषाणभेद

मस्त रहस्यकथा.
एकीकडे क्रमश: कथांना लवकर लिहा असे म्हणायचे व ही पुर्ण कथा एकाच वेळी वाचायला भेटली म्हणून नाके मुरडायची हे काही बरे नव्हे.

कृपया कोणीही लेखकांना नाउमेद करू नये. प्रोत्साहन द्यावे.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

प्राजु's picture

20 Dec 2009 - 2:10 am | प्राजु

कथा अतिशय वेगवान झाली आहे.
कौतुक आणि चाफा दोघांच्याही रहस्य कथांची मी नियमित वाचक आहे.
विशाल, या तुझ्या कथेलाही शेवटी मस्त कलाटणी दिली आहेस.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

स्वप्निल..'s picture

20 Dec 2009 - 3:15 am | स्वप्निल..

विशाल भाऊ,

एकदम झक्कास जमली आहे .. शेवट तर मस्तच!!!

स्वप्निल

सोत्रि's picture

20 Dec 2009 - 9:05 am | सोत्रि

विशाल,
फारच रोमांचकारी कथा! कुठेही पाल्हाळिक झाले असे वाटले नाही. तु म्हणाल्याप्रमणे सर्व संदर्भ आवश्यक होते. शेवटची कलाटणी फारच छान. वाचता वाचता मधेच 'सुशि' ची झाक जाणवली.

पुढील कथेची वाट बघतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रहस्यकथा आवडली.

>>कौतुकचा अडथळा तर दुर झालाय्...पण हा चाफा.... या चाफ्याचं काय करू?
एकदम झकास ! =D>

विशालसेठ, रहस्यकथा अजून येऊ द्या..!

-दिलीप बिरुटे

स्वानन्द's picture

20 Dec 2009 - 3:18 pm | स्वानन्द

एकदम झकास!!

सुशि च्या कथांची झाक जाणवते तुमच्या लेखनात.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

मी-सौरभ's picture

20 Dec 2009 - 11:40 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

हर्षद आनंदी's picture

21 Dec 2009 - 8:36 am | हर्षद आनंदी

कथेची लांबी रुंदी व्यवस्थित, डीटेलिंग अवास्तव नाही.
ऐवढ्या मोठ्या लेखात हे व्यवधान पाळणे अवघडच, पण ते सहज गत्या पेलले आहे.

विशेष म्हणजे, रोज टप्प्या टप्प्याने लिहायचे म्हटले की, मागचे-पुढचे भान ठेवणे अजुनच अवघड.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विशाल कुलकर्णी's picture

21 Dec 2009 - 9:16 am | विशाल कुलकर्णी

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

JAGOMOHANPYARE's picture

21 Dec 2009 - 12:15 pm | JAGOMOHANPYARE

आता चाफ्याचा काटा कधी काढताय?

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Dec 2009 - 12:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विशाल, मागच्याच आठवड्यात विचार करत होते, तुमची कथा आली नाही म्हणून! सवडीने वाचून प्रतिक्रिया देते.

अदिती

विशाल कुलकर्णी's picture

21 Dec 2009 - 12:40 pm | विशाल कुलकर्णी

>:) >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"