तू तर माझी बायको, शारदा.....

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
24 Nov 2009 - 3:33 am

गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या बागेत-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच ज्येष्ठ नागरिक एका गोल टेबलाभोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे तरणतलावामध्ये थोडावेळ व्यायाम करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स तरंगत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते. दोघे बुद्धिजीवी मन लावून बुद्धिबळाचा डाव मांडून पाइप ओढत तल्लीन झाले होते.

गार्डनमध्ये चार कोपऱ्यात असलेल्या गोल बाकांपैकी एका कोपऱ्यात काही आज्यांचे हास्यविनोद-गप्पा रंगात आल्या होत्या तर दुसऱ्या कोपऱ्यात सहा जणांचा ग्रुप हार्मोनियम वर येऊ घातलेल्या कार्यक्रमाची रंगीत तालीम करत होता. तिसऱ्या कोपऱ्यात मे-जून चे सुटीचे दिवस असल्याने आजी-आजोबांकडे आलेल्या नातवंडानी आपला अड्डा जमवला होता. त्यांचा गलका, मस्ती.... पकडापकडी रंगात आली होती. या ज्येष्ठांमध्ये- नव्वदीपर्यंत पोचलेल्या व अगदी तीन-चार वर्षांच्या नातवंडापर्यंत एक समान-जोडणारा धागा होता. तो म्हणजे हे सगळे, जीवन भरभरून उपभोगत होते. यातील अनेक जणांना स्वत:च्या खाजगी समस्या होत्यच. काहींच्या तब्येती अत्यंत नाजूक होत्या. काही जण आयुष्याच्या संध्याकाळी संपूर्णपणे एकटे-एकाकी होते. काहींचे जोडीदार अर्ध्यात साथ सोडून गेलेले, मुले दूरदेशात किंवा कामामुळे देशात असूनही जवळ नव्हती. दुःख, विरह, मनस्ताप सगळ्यांनाच घेरून असूनही या क्षणाला ही सगळी माणसे एका आनंदाच्या लाटेवर आरूढ होऊन हसत-खेळत होती. मी एका बाकावर बसून सगळ्यांचा आनंद पाहत होते. अन जरासे द्ऱ असलेल्या चौथ्या कोपऱ्यात ती दोघे मला दिसली.

काका (आजोबा) पंचाऐशीच्या आसपास तर काकू ( आजी ) सत्त्यात्तर -अठ्ठ्यातर..... काकांच्या हातात काठी होती. किंचित गोंधळलेली, हरवलेली नजर वाटली. मात्र काकू शिडशिडीत बांध्याच्या, छोटासा अंबाडा, हलक्या गुलाबी रंगाची कलकत्ता साडी त्याला मॅचिंग ब्लाऊज व छोटीशी गोल टिकली, प्रसन्न मुद्रा..... स्मार्ट चालणे-बोलणे अशा होत्या. अरे, कालच तर मी यांना चौथ्या मजल्यावर पाहिले होते.... थोडेसे जुजबी बोलणेही झालेले. नेमके काकूंचेही माझ्याकडे लक्ष गेले. मी हसून हात हालवला तसे त्यांनीही.... ओळखलेय, काय म्हणतेस असे खुणेनेच विचारले. तसे मी उठून त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मी बाकापाशी पोचताच त्यांनी पटकन माझा हात हातात घट्ट पकडून मला जवळ बसवून घेतले.

त्या हाताच्या स्पर्शात अनेक भाव होते. सलगी होती...... अचानक कोणीतरी आपल्याशी आपणहून बोलायला आलेय याचा आनंद होता. हाताच्या घट्ट पकडीत न जाणो मी पटकन निघून गेले तर चे हिरमुसलेपण टाळण्याचा प्रयत्न होता...... मला थोडासा वेळ त्यांच्यापाशी पकडून ठेवण्याची आंतरिक ऊर्मी होती. किती आणि काय काय बोलू असे त्यांना झाले होते. हे सगळे मला नेमके पोचवलेही होते त्या स्पर्शाने. आमच्या गप्पा सुरू झाल्या. पाच मिनिटातच माझ्या लक्षात आले की मी आलेय, बसलेय, आम्ही जरा मोठ्यानेच बोलतोय पण काकांचा चेहरा अगदी कोरा होता. ते आमच्याकडे पाहतही नव्हते. काठीची मूठ दोन्ही हाताने धरून त्यावर हनुवटी टेकवून कुठेतरी दूरवर संपूर्ण रिकाम्या नजरेने पाहत होते.

माझे काकांकडे पाहणे काकूंच्या लक्षात आले. त्यांनी जरासे माझ्या हातावर थोपटले आणि मग काकांच्या खांद्याला स्पर्श केला तसे काकांनी काकूंकडे वळून पाहिले. डोळ्यात थोडीशी ओळखीची झाक तरळली. दोन मिनिटे टक लावून काकूंकडे पाहून मग काका आपले माणूस दिसल्याच्या आनंदाने हसले. मग काकूंनी त्यांना हळूहळू फेऱ्या मारता का असे विचारले. तशी बरं, " तू म्हणतेस तर मारतो फेऱ्या " असे म्हणत काका उठले. ते जरासे म्हणजे दहा पावले गेल्यावर काकू म्हणाल्या, " अग, गेली सात-आठ वर्षे हळूहळू करत यांची स्मरणशक्ती क्षीण होते आहे. आताशा विस्मृतीने जवळजवळ संपूर्णच कब्जा घेतला आहे गं. प्रकृती चांगली आहे त्यांची. थोडेसे बिपी आणि जरासे डाव्या कानाने कमी ऐकू येते एवढाच काय तो त्रास आहे. पण या काहीही न आठवण्याने सगळी कसर भरून काढलीये बघ. तुला गंमत दाखवते थांब. " असे म्हणत फिरताना आमच्यापाशी आलेल्या काकांना त्यांनी हाताला धरून थांबवले.

काकांनी त्यांच्याकडे पाहिले.... नजरेत कुठेही ओळख दिसत नव्हती. खरं सांगते माझ्या छातीत धडधडले, आता जर काकांनी यांना ओळखलेच नाही तर? तेवढ्यात काकू म्हणाल्या, " अहो, सांगा बरे मी कोण आहे? नीट माझ्याकडे पाहा आणि आठवा..... काय, कोण आहे मी? " श्वास रोखून मी काकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. दोन -तीन मिनिटे स्थिर नजरेने काकूंकडे काका पाहत होते. काकू मध्येच त्यांच्याकडे तर मध्येच माझ्याकडे पाहत होत्या. नजरेनेच मला बघ तर ते आत्ता मला ओळखतील असे सांगत होत्या. मी मनात देवाचा धावा करत होते. तोच काकांनी मिस्कील( तसे मला तरी भासले ) हसत काकूंना म्हटले, " तू ना.... अग तू तर माझी बायको, शारदा. " अन अगदी लहान मूल जसे आईच्या हाताला धरून झोके घेते ना तसे काका काकूंचा हात घट्ट धरून हालवत होते. काकूंनी माझ्याकडे पाहत म्हटले, " चला आज तरी बायकोला ओळखले गं त्यांनी. अग दिवसातून दहा वेळा ही रीहर्सल चालते. तसे इतरही अनेक गोष्टी मी विचारते पण उत्तरे कधी बरोबर आणि बरेचवेळा चुकीचीच येतात. मात्र बायकोची ओळख अचूक आहे हो. "

मग थोड्या अजून गप्पा करून उद्या येशील ना गं बागेत... नक्की ये बरं का , चे प्रॉमिस घेऊन काकू काकांना घेऊन घरी गेल्या. दिवेलागणी झालेली. सगळे आजी-आजोबा आपापल्या घरी गेले होते. घराघरातून टिवीचे आवाज येऊ लागले. मीही उठले.... पण राहून राहून मनात येत होते, काकांचे बरेच वय झाले आहेच. तशात हा असा आजार. उद्या जर काकूंना ओळखण्याचा तंतूही तुटला तर शरिरी भावनांव्यतिरिक्त संवेदना, गुंतवणूक..... संभाषण या सगळ्याच्या परे काका पोचतील. समोरून पाहणाऱ्याला काकांची ही अवस्था वेदनादायक वाटली तरी त्यांना तिचे दुःख, त्रास वाटण्याच्या पलीकडे ते पोचलेले असतील. कशाचाच काहीही फरक पडत नाही अशी निर्वात पोकळी. परंतु काकूंचे काय होईल? काका अजूनही काकूंना ओळखतात हा एकमेव तंतू काकूंना जगवतो आहे. दररोज अनेकदा विचारून त्या खात्री करून घेत आहेत. जर काका विस्मृतीच्या काळोखात बुडाले तर काकूंच्या जगण्याचे प्रयोजनच संपेल. नाही नाही असे होता नये. कदापिही होता नये.

दुसरे काकांच्या आधी काकू गेल्या तर फारच मोठी गडबड होऊ शकेल. आपल्यामागे यांचे कसे होईल याविचाराने काकूंच्या जिवाला कुठेही शांती मिळणारच नाही. शिवाय काकांचेही काय होईल कोण जाणे.... त्यापेक्षा काकाच आधी....... काय हे विचार मी करतेय.... फार वाईट वाटले. अगदी खरं सांगते, राहून राहून मला वाटतेय की काकूही देवाकडे फक्त एवढेच मागत असतील. " देवा शेवटच्या दिवसापर्यंत हे मला ओळखू देत व ह्यांना माझ्याआधी ने रे बाबा. माझ्यामागे यांचे हाल नकोत. त्यांना समजत नसले तरी मला समजतेय ना. देवा, ऐकशील ना एवढे माझे....

समाजजीवनमानराहणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

24 Nov 2009 - 4:03 am | मदनबाण

ह्म्म्म्...काय बोलु ?
कोणालाही न-चुकणारी वेळ...

तुम्ही जबरदस्त लिहता...

जाता जाता :--- श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथा मधले हे चित्र सर्व काही सांगुन जाते...

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

टुकुल's picture

24 Nov 2009 - 4:51 am | टुकुल

निशःब्ध

--टुकुल.

गणपा's picture

24 Nov 2009 - 4:02 am | गणपा

खुप छान आणि ओघवत्या शैलित लिहिलय.
पण मनाला कुठेतरी चटका लावुन गेल.
:(
-गणपा

विकास's picture

24 Nov 2009 - 4:41 am | विकास

खुप छान आणि ओघवत्या शैलित लिहिलय.
पण मनाला कुठेतरी चटका लावुन गेलं.

असेच म्हणतो.

अमेरिकन सुप्रिम कोर्टाची प्रथम स्त्री न्यायाधीश सँड्रा डे ओकॉनर यांचा या संदर्भातील चटका लावणारा प्रसंग यावरून आठवला.

न्या. ओकॉनर यांनी मानाची आणि स्वत:च्या वागणुकीने शान वाढवलेली तहहयात न्यायाधीशाची जागा, स्वतःचा (लग्नास ५४ वर्षे झालेली असतानाचा) नवरा जॉन ओकॉनर, याचा अल्झायमरचा रोग अगदीच बळावला म्हणता क्षणी, २००६ साली सोडून दिली आणि नवर्‍याची काळजी घेण्यास सुरवात झाली. अर्थात तब्येत फारच खालावत जात असल्याने त्याला इथल्या पद्धतीने अल्झायमर रुग्णांसाठीच्या खास नर्सिंग होम मधे ठेवले होते. थोडीफार तिथल्यातिथे हालचाल चालू होती पण काहीच आणि कुणालाच न ओळखता येत असताना ७५ व्या वर्षी स्मृतीभ्रंशाबरोबरच आलेल्या विचित्र एकांतामुळे त्याला डिप्रेशनने ग्रासलेले होते. मात्र त्याच वेळेस तशाच एका अल्झायमर रुग्ण स्त्रीशी त्याची मैत्री चांगली जमू शकली.

स्वतःचा नवरा आपल्याला (आणि घरातील कुणालाच) ओळखू शकत नाही आणि या स्त्री बरोबर नर्सिंग होम मधील झोपाळ्यावर गप्पा मारत बसू शकतो हे पाहून अर्थातच एकीकडे वाईट वाटले असले तरी किमान त्यामुळे त्याचे शेवटच्या घडीस डिप्रेशन कमी झाले आहे आणि किमान अशापद्धतीने तरी त्याला एकटेपणाने रहावे लागत नाही, हे पाहून तीने त्यात समाधानच मानले आणि माध्यमांनी गाजावाजा करायच्या आधी स्वतःच ही गोष्ट नवर्‍याबद्दल प्रेमाने सांगितली.... जॉन हा स्वतः प्रथितयश वकील होता आणि सार्वजनीक कामात पण आघाडीवर होता. तरी देखील बायकोस सुप्रिम कोर्टातील अतिशय मानाचे स्थान मिळाले म्हणता क्षणी "Sandra's accomplishments don't make me a lesser man. They make me a fuller man." असे म्हणत प्रसिद्धीपासून लांब रहात वकीली चालू ठेवली. दोघांच्याही वर्तनातून एकमेकांसाठीचा त्याग दिसण्यापेक्षा पती-पत्नीचे परीपूर्ण नाते दिसते असे वाटते.

जॉन ओ कॉनर चे याच महीन्यात १० का ११ नोव्हेंबरला निधन झाले.

बहुगुणी's picture

24 Nov 2009 - 4:10 am | बहुगुणी

अल्झायमर्स डिसिझ असावा.

खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचं मनात आहे, विशेषतः घरातल्या एका अगदी जवळच्या वडीलधार्‍या व्यक्तीचं डायग्नॉसिस गेल्याच महिन्यात झाल्यापासून.

सध्या इतकंच म्हणेनः नातेवाईकांचं आणि समाजाचं या व्याधीबद्दल प्रबोधन झालं तर फार बरं होईल, कारण अल्झायमर्स डिसिझवर सध्या तरी curative उपाय नाहीत, आणि या व्याधीने बाधित वृद्धांइतकीच, किंबहूना त्यांपेक्षाही आधिक दयनीय अवस्था त्यांच्या हयात असलेल्या जीवनसाथीदारांची असते. म्हणून समाजाचा दृष्टीकोन समजावून घेणारा असेल तर खूप मदत होईल. (अवांतरः समजावून घेणारा तो 'समाज' अशी या शब्दाची उत्पत्ती असेल का!)

जाता जाता: या विषयावरील काही चित्रपट

स्वाती२'s picture

24 Nov 2009 - 4:13 am | स्वाती२

हम्म! आयुष्याचा जोडीदार डोळ्यादेखत असा हळूहळू हरवताना पहायला लागणे म्हणजे...
आमच्या इथे दोन घरं सोडून एक आजी आजोबा राहातात. या लेखाच्या उलटी परिस्थीती आहे. एखाद्या लहान मुलाला सांभाळावं तसे आजोबा आजींना सांभाळतात.

रेवती's picture

24 Nov 2009 - 4:54 am | रेवती

लेखन चांगले झाले आहे पण आठवण जरा दु:खदायकच म्हणायला हवी!
विकास यांनी सांगितलेली बातमीही सुन्न करणारी!
मध्यंतरी मी दोनचारवेळा काही गोष्टी विसरल्यावर अशीच भिती वाटली होती. त्या गोष्टीचे नंतर हसू आले.

रेवती

विसोबा खेचर's picture

24 Nov 2009 - 8:28 am | विसोबा खेचर

राहून राहून मला वाटतेय की काकूही देवाकडे फक्त एवढेच मागत असतील. " देवा शेवटच्या दिवसापर्यंत हे मला ओळखू देत व ह्यांना माझ्याआधी ने रे बाबा. माझ्यामागे यांचे हाल नकोत.

हम्म...हे बाकी खरं आहे! काकूंच्या मनात असेच विचार येत असतील..

भानस, चांगलं लिहिलं आहेस..

तात्या.

सहज's picture

24 Nov 2009 - 8:47 am | सहज

छान लिहलयं

अवलिया's picture

24 Nov 2009 - 11:34 am | अवलिया

छान लिहलयं

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

प्रभो's picture

24 Nov 2009 - 7:53 pm | प्रभो

छान लिहिलय..सविस्तर प्रतिक्रियेला शब्द अपुरे आहेत माझ्याकडे.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Nov 2009 - 9:31 am | बिपिन कार्यकर्ते

खूप छान लिहिलंय. चटका लावून गेले काका-काकू. विकासनी लिहिलेली आठवण पण सुंदर.

बिपिन कार्यकर्ते

jaypal's picture

24 Nov 2009 - 11:43 am | jaypal

"त्या हाताच्या स्पर्शात अनेक भाव होते. सलगी होती...... अचानक कोणीतरी आपल्याशी आपणहून बोलायला आलेय याचा आनंद होता. हाताच्या घट्ट पकडीत न जाणो मी पटकन निघून गेले तर चे हिरमुसलेपण टाळण्याचा प्रयत्न होता...... मला थोडासा वेळ त्यांच्यापाशी पकडून ठेवण्याची आंतरिक ऊर्मी होती. किती आणि काय काय बोलू असे त्यांना झाले होते. हे सगळे मला नेमके पोचवलेही होते त्या स्पर्शाने."
विश्वास ठेवा ५/७ मिनीट हरवलो.
संवेदन शिल आहत या बद्दल आपले अभिनंदन. कारण स्पर्शातला अर्थ काढायला इथे कोणाला फुरसत आहे?(ती ब-याच वेळा मिळत नसते, काढावी लागते.)
घर म्हणजे लोजिंग-बोर्डींग झालं आहे.
अवांतर :- वाचल्यावर एक विचार मनात आला कदाचित विस्मरण कही लोकांच्या कामास ही येत असावं.
पण एक मात्र खर डोळे पाणावले.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अमृतांजन's picture

24 Nov 2009 - 4:52 pm | अमृतांजन

छान प्रतिसाद! इमेज तर चपखल!

sneharani's picture

24 Nov 2009 - 11:44 am | sneharani

छान लिहलयं..! मनाला चटका लावून जाणारं...!

श्रावण मोडक's picture

24 Nov 2009 - 3:09 pm | श्रावण मोडक

सहमत!

टारझन's picture

24 Nov 2009 - 9:48 pm | टारझन

अगदी !! मनला भाजलंय फार माझ्या !!

सुंदर आणि हळवा लेख !!

- टारझन

भाग्यश्री कुलकर्णी's picture

24 Nov 2009 - 2:52 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खरच डोळे भरुन आले ग्.तु खुपच छान लिहीतेस.

धमाल मुलगा's picture

24 Nov 2009 - 4:37 pm | धमाल मुलगा

..........तोच काकांनी मिस्कील( तसे मला तरी भासले ) हसत काकूंना म्हटले, " तू ना.... अग तू तर माझी बायको, शारदा. " अन अगदी लहान मूल जसे आईच्या हाताला धरून झोके घेते ना तसे काका काकूंचा हात घट्ट धरून हालवत होते.

:( :(
बस्स! ह्यापुढे वाचलंच नाही मी! पाणीच आलं डोळ्यात...

माफ करा, पुढचं न वाचताच हा प्रतिसाद देतोय.

अमृतांजन's picture

24 Nov 2009 - 4:56 pm | अमृतांजन

नशीबवान आहेत ते काका, त्यांना एव्हढी प्रचंड मोठ्या मनाची बायको मिळाली.

फ्रॅक्चर बंड्या's picture

24 Nov 2009 - 6:11 pm | फ्रॅक्चर बंड्या

जबरदस्त..
मनला चटका लावुन गेले लेखन...
binarybandya™

झकासराव's picture

24 Nov 2009 - 6:34 pm | झकासराव

निशब्द:

देवदत्त's picture

24 Nov 2009 - 8:21 pm | देवदत्त

छान लिहिलंय. बाकी काय लिहावे सुचत नाही.

जाता जाता: ह्यावरून '५० फर्स्ट डेट्स' हा सिनेमा आठवला.

लवंगी's picture

24 Nov 2009 - 8:57 pm | लवंगी

"पानगळीच्या आठवणी " आठवल्या

भानस's picture

24 Nov 2009 - 11:19 pm | भानस

टुकुल, गणपा, स्वाती२, रेवती, तात्या :), सहज, अवलिया, प्रभो, बिपिन कार्यकर्ते, अमृतांजन, स्नेहराणी, मोडक साहेब, टारझन, भाग्यश्री :), धमाल मुलगा, फ्रॅक्चर बंड्या, झकासराव, देवदत्त, लवंगी.....मनःपूर्वक आभार.

मदनबाण किती यथार्थ चित्रे आहेत ही. अनेक आभार शेअर केल्याबद्दल.

विकास आपण नमुद केलेला प्रसंग...पतीपत्नीचा एकमेकांसाठी केलेला त्याग इतकेच नसून त्याही पलीकडे जावून एकमेकांचा सम्मान- प्रेमपूर्वक आदर दिसून येतो. इतका सुंदर प्रसंग वाचायला मिळाला, आभार.

रेवती मध्ये एकदोनदा मलाही पटकन असेच काही आठवत नव्हते.....चक्क दरदरून घाम फुटला मला....दोनचार टपल्याही मारल्या बथ्थडपणाला....पण बेटे बसले अडून...मग काय मीही इरेला पेटले....हाहा :)
बहुगुणी हा विस्मरणाचा रोग आजकाल फारच बळावताना दिसून येतो आहे. रोग्याला जोवर कळत असते तोवर त्याची स्वतःला पकडून ठेवण्याचा आकांत, कधीकधी नकारात्मक धोरण, तर नकळत घातलेले खतपाणी....काय करायचेय लक्षात ठेवून असे म्हणत हळूहळू बंद होत चाललेले कप्पे.... :( घरची माणसे विशेषतः जोडीदार....डोळ्यात तेल घालून जपावे लागते. आमचे एक काका...कधीही घरात सापडायचेच नाहीत इतके बाहेर जाणारे. एक वेळ अशी आली की घर सोडा स्वतःचे नावही आठवेना. शेवटी लहान मूल हरवू नये म्हणून जसे दोरा बांधतात तसे करावे लागले. पोटात तुटायचे इतके पण आपण हरवलोय हेही त्यांना कधीच कळले नसते आणि आम्ही सगळे वेडे झालो असतो. तुमचे म्हणणे खरेच....या विषयावर प्रबोधन होण्याची फार फार गरज आहे. पुन्हा या रोगाचे स्वरूप व व्याप्ती व्यक्तीव्यक्तीनुरूप बदलत असते. एकच ठोकताळा प्रत्येकाला लावता येत नाही. असो. आभार.

जयपाल चित्र फार बोलके आहे. खरे आहे फुरसत ही मनात काढावी लागते. ऑन लायटर नोट विस्मरण हे काही लोकांच्या खूपच कामी येत असेल.....शंभर टक्के सहमत :) धन्यवाद.

र्‍हास दर्शवतो. अनेक संस्था जगभरात ह्या विकारावर संशोधन करताहेत. हा दुवा बघा. मेंदूतील पेशीत होणार्‍या सिनॅप्टिक कनेक्शन्सचा एक अफलातून विडिओ देखील तिथे बघता येईल.
आनंदी रहाणे, नियमित व्यायाम करणे, एखादा तरी छंद, कला जोपासणे, नियमितपणे कोडी सोडवणे, आपण ज्या गोष्टी सर्वसाधारणपणे करत नाही त्या करुन बघणे उदा. लहान मुले घरात असतील तर त्यांच्याबरोबर बसून चित्रे काढणे, ओरीगामी शिकणे, नवीन बैठा खेळ शिकणे, एखादी नवीन भाषा शिकणे, चक्क रांगून बघणे (मी हे कधीकधी करुन बघतो, मजा येते ;)), साधा पत्त्यांचा बंगला उभा करणे, अरुंद तोंडाच्या बाटलीत पाणी किंवा बारिक रेती न सांडता भरुन बघणे असले क्षुल्लक खेळही मजा आणतात!
एखादा खेळ नेहेमी उजव्या हाताने खेळत असाल तर कधी डाव्या हाताने खेळून बघणे, नकाशे घेऊन त्यात वेगवेगळी ठिकाणे हुडकून काढणे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी मेंदूला व्यायाम होतो आणि त्यामुळे मेंदूचे आरोग्य टिकून रहाण्यास मदत होते.
ह्या प्रत्येक गोष्टीमागे काही खास उद्दिष्ट दरवेळी असलेच पाहिजे असे नाही. आपण कित्येक गोष्टी ह्या सहजपणाने करायच्या विसरुनच गेलेलो असतो. केवळ आणि केवळ आनंद मिळतो म्हणून काही करणे आजकाल आपण विसरत चाललो आहोत.

भानस, तुमचा लेख आवडला. एका सद्यकालीन गोष्टीची तीव्रतेने जाणीव करुन गेला. एक गोष्ट जराशी खटकली की सगळेच वृद्ध असताना त्या आजीआजोबांना एकटेच एका बाजूला बसावे लागावे. त्यातल्या धडधाकट लोकांनी त्यांच्याशी मैत्री का साधली नसावी बरे? सहसंवेदनेचा अभाव मला तरी त्यात जाणवला.

चतुरंग

माझ्या माहिती प्रमाणे आपल्या मेंदुच्या पेशी एकदा मेल्या की कधीही नव्याने तयार होत नाहीत.
कही मानसिक तणाव आसेल, किंवा डिप्रेशन ई. असल्यास "दोन्ही हाताने करता येण्यासारखी साधी कामे करावीत .उदा.भाजी निवडणे, शेंगा सोलणे, ई. " असे वाचनात आले होते. हे कितपत खरे आहे? रंगाशेठ जरा सांगाकी.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

स्वाती२'s picture

25 Nov 2009 - 12:40 am | स्वाती२

>>त्यातल्या धडधाकट लोकांनी त्यांच्याशी मैत्री का साधली नसावी बरे? सहसंवेदनेचा अभाव मला तरी त्यात जाणवला.

बरेचदा अशा आजारात जास्त गर्दी, गडबड या गोष्टींनीही आजारी व्यक्ती गोंधळते. एखाद्या लहान मुलाने एकदम नविन ठिकाणी घाबरून जावे तसे होते त्यामुळे कदाचित आजी मुद्दाम एका बाजूला बसत असतील. आमच्या जवळ राहाणार्‍या आजींशी आम्ही त्या बोलल्या तरच बोलतो. कारण त्यांच्या दृष्टीने आम्ही कधी त्यांचे शेजारी असतो तर कधी परके. या 'परके' मोड मधे त्या खूप बावरतात. काही वेळा आता ओळख आहे आणि ५ मिनिटांनी नाही असेही होते. आजोबा मोकळे असले तर बसतात गप्पा मारत पण आजी बरोबर असतील तर नुसता हात हलवून पुढे जातात. कारण कशाने काय बिनसेल याचा भरवसा नसतो.

चतुरंग's picture

25 Nov 2009 - 12:46 am | चतुरंग

ही बाब माझ्या लक्षात आली नव्हती. असे असेल तर मग आणखीनच अवघड! :( एकूण अल्झायमर हा भंजाळून टाकणारा प्रकार आहे तर.

चतुरंग

मोहन's picture

25 Nov 2009 - 10:59 am | मोहन

अतीशय सुंदर आणी संवेदनशील लेख दिल्या बद्दल धन्यवाद. रंगाशेठ्चा प्रतिसाद देखील आवडला.

अवांतरः- तात्याराव आता एखादा कोड्यांचा विभाग मिपावर टाकताय का बघा. तेवढेच आमच्या सारख्या मिपावर पडिक असणार्‍यांना मेंदूचा व्यायाम.

मोहन

धनंजय's picture

25 Nov 2009 - 8:23 pm | धनंजय

चटका लावणारा प्रसंग. लेखन अगदी सहज-प्रभावी आहे. (विकास यांनी सांगितलेले उदाहरणही तसेच - नाते प्रगल्भ असले की त्यात कोणाला "त्याग" असा वाटतच नाही, परिपूर्णताच वाटते, हे अगदी पटण्यासारखे.)

भानस's picture

27 Nov 2009 - 12:57 am | भानस

चतुरंग जसे स्वातीने म्हटलेय तसेच काहीसे असते. मी रोजच काका-काकूंना भेटत होते. काकांच्या डोळ्यात एकदाही ओळख दिसली नाही. मात्र एकदम पाच-सहा जण अवतीभोवती जमले की ते बावरून जात. अंग चोरून एका कडेला सरकू लागत. काहीवेळा असेही होते की अशी माणसे गर्दीत रमतात. खेळतातही. बरेचदा लक्षात येते की पशु-पक्षी, खाणे पिणे ( काही जण मात्र खाल्लेलेही विसरतात. एक आजी रोज सुनेला शिव्या देत...पोटाला घालत नाही कुठे फेडशील गं पाप....आणि बरेच काही बोलत...पण ती कधीही उलट बोलत नसे. दरवेळी एका छोट्याश्या वाटीत काहीतरी खाऊ देई, मग त्या शांत होत. की पुन्हा अर्ध्या तासाने तेच ...वाटते पण अशावेळी फार संयम हवा... हे सोपे नाही.), आन्हिके, एवढेच काय वाचनही करतात. मात्र माणसांना ओळखत नाहीत. घर आठवत नाही. हल्ली बरेच जण रोजचा बौध्दिक व्यायाम करतात... नेमाने करत राहील्यास नक्कीच काहीसा उपयोग होत असावा.
चतुरंग, मोहन, धनंजय आभार.