तुझी कविता
- Read more about तुझी कविता
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
तुझ्यापाशी जन्मलेली माझी
हट्टी, खोडकर, अल्लड
कविता
तू डोळ्यांत सांभाळून
घेऊन ये....
येता येता वाट चुकली
तर मला जागं कर...पण
मी माझ्याच तंद्रीत असेन
तर
माझ्या कवितेला वाट विचार....
ती आधी मस्करी करेल,
तुला चकवा घालेल,
घनघोर गप्पा मारेल,
निळावंती होऊन,
वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल,
लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल,
मिठीत शिरता शिरता एकदम
वारा होऊन
तुझ्या गळ्यात पडेल,
शेवटी थकून
तुझ्या दुमडलेल्या हातावर
निर्धास्त झोपी जाईल,
तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव....
अशी थकून झोपलेली,
झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी
माझी कविता सांभाळून
घेऊन ये....
मी असेनच कवितेच्या आसपास.
-शिवकन्या