- डॉ. सुधीर रा. देवरे
मित्राबरोबर दळवटजवळच्या कोसुर्डे गावाच्या रानखळीवर प्रत्यक्ष कोकणा लोकांच्या डोंगर्या देवाच्या भक्तांचा अनुभव घेतला. रात्रभर त्यांच्याबरोबर थंडीत थांबलो. त्यांच्या सोबत भुज्या नावाचा कुठलीही चव नसलेला पदार्थ खाल्ला. नागलीची भाकर खाल्ली. कडाक्याच्या थंडीत शेकोटी शेजारी बसून संपूर्ण रात्र डोंगर्या देवाच्या उपासकांचा नाच, अंगात घेण्याची पध्दत, काकडा आणि चिमटा उघड्या अंगावर मारून घेण्याची पध्दत, त्यांचे आदिम हुंकार, नाच पहात, थाळीवरची कथा ऐकत थंडीत कुडकुडत बसलो. शिवार देव, वाघ देव, नागदेव, भूते यांची लोकश्रध्देच्या मुळातून माहिती भक्तांकडून काढत होतो.