एकाकी वाट
वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज
चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज
बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर
पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर
भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर
पण सारतो पोटात दाम मोजून जहर
कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती
चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती
झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती
पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती
त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश
फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस
वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे
दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे
जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ
अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट
****************