अप्पा गेले.
नाही विश्वास बसत अजून. अप्पा जाणं कसं शक्य आहे? अहो आत्ता उठतील आणि फिरायला जातील, भगवदगीतेतील श्लोक म्हणतील, नातू- नातींशी गप्पा मारतील, तब्बेतीची चौकशी करायला आलेल्याचीच काय चाललंय म्हणून चौकशी करतील, हसत हसत फिरकी घेतील, एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला न मागता, न विचारता देतील, असे कसे जातील?
नाही. खरंच अप्पा गेले.
जीवन जगावं कसं आणि मरणाला स्वीकारावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अप्पा. पु ल देशपांडे म्हणाले होते, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय उरले नाहीत. माझं सुदैव की असे पाय मला,आम्हाला लाभले.