Skip to main content

भावकविता

रियल रियल

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 14/05/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या.... मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या लिक़्विड जमान्यात प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत ओहो....ते काय असते आणि? आठवण बिठवण वेड्यांचा बाजार... एक कॉल मारायचा नाहीतर मेसेज धाडायचा बात करनेका मामला खतम. मनात आठवण, झुरणे बिरणे अरेरे, हाताबाहेरच्या केसेस... डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल एवढेच काय ते रियल रियल बाकी जग तो मृगजल मृगजल... मीराबाई मीराबाई, तो तुम्हाला उन्हात भासे.... राधाबाई राधाबाई, तो तुम्हाला जलात दिसे.... भ्रम भ्रम भ्रम भ्रम भ्रम नुसते नुसते भ्रम.....

माणसे कविता होऊन येतात.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 26/04/2019 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे कविता होऊन येतात एकएक हट्टी कडवे लाडाकोडाने घालून ठेवतात, दोन कडव्यांमध्ये एक जीवघेणी कळ विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे कविता होऊन येतात अलंकार भिरकावून केवळ अर्थ होऊन रात्रभर उशाशी बसतात उजाडताना परत पुस्तकाच्या अंधारात गुडूप होतात...... माणसे कविता होऊन येतात.... -शिवकन्या

पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/04/2019 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना विचार करायचा देवा, पाण्याला इतके झोके देताना उसंत घ्यायची देवा.... उसळून पुन्हा आदळते पाणी खडक द्यायचा देवा... दोन डोळे पुरत नाहीत पाण्याचा संसार पेलताना... देवा, आता पाण्याचे तीर्थ करा अन् पाण्यातून मुक्ती द्या.... शिवकन्या

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या

...असं काही नसतं

लेखक निओ यांनी शनिवार, 06/04/2019 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा बायकोचं भांडण असं काहीच नसतं तो म्हणतो पूर्व, ती म्हणते पश्चिम बस एवढंच म्हणणं असतं बघितलं तर ती ही एक गंमत असते हाताबाहेर जाईल एवढं ताणायचं नसतं दोन चार दिवसांच्या अबोल्यानंतर आपोआपच नरम व्हायचं असतं वीजांच्या कड्कडाटानंतर पावसानं धरणीला भिजवायचं असतं तिनं हळूच कुशीत शिरायचं असतं त्यानं हळूवार कुरवळायचं असतं मायेच्या ओलाव्यात नवीन जग फुलवायचं असतं

दाराआडचा बाबा

लेखक सोन्या बागलाणकर यांनी शुक्रवार, 05/04/2019 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी एक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार जिथे एक मुलगी बसली आहे नटून.... करत असेल का ती ही ताटातुटीचा विचार? जाईल का ती ही मुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे? बाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... उभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत, याची जाणीव नसलेली मुलगी आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते.... मुलगी हरवलेला बाबा गळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो... बघतच राहतो....

(दाराआडची आई)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

स्वतःसाठी जगू नका

लेखक नायकुडे महेश यांनी शुक्रवार, 22/02/2019 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मातीसाठी प्राण वेचतो आम्ही जातीसाठी लढू नका । तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।। कितीही येवो वादळे मोठी आम्ही त्यांना घाबरत नाही, आपलेच खेचतात आपले पाय ते आम्हाला पाहवत नाही, तुमच्यासाठी लढतो आम्ही कुणापुढे झुकू नका। तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।। हसत असें तेव्हासुद्धा जेव्हा मरण समोर येईल, भ्याड हल्ले करणाऱ्यांच्या यम होऊन समोर येईन, मेल्यानंतर आमच्या देहाचे राजकारण करू नका । तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।।

एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 09/02/2019 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया बालपणी गेलासी तू शाखेसी धराया हादरली ती जननी, थरथरले घरचे जन भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ? मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला? खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान आले किती गेले किती संपले भरारा नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा गुलाबी आणल्या नोटा आम

तुझी कविता

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 18/01/2019 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापाशी जन्मलेली माझी हट्टी, खोडकर, अल्लड कविता तू डोळ्यांत सांभाळून घेऊन ये.... येता येता वाट चुकली तर मला जागं कर...पण मी माझ्याच तंद्रीत असेन तर माझ्या कवितेला वाट विचार.... ती आधी मस्करी करेल, तुला चकवा घालेल, घनघोर गप्पा मारेल, निळावंती होऊन, वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल, लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल, मिठीत शिरता शिरता एकदम वारा होऊन तुझ्या गळ्यात पडेल, शेवटी थकून तुझ्या दुमडलेल्या हातावर निर्धास्त झोपी जाईल, तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव.... अशी थकून झोपलेली, झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी माझी कविता सांभाळून घेऊन ये.... मी असेनच कवितेच्या आसपास. -शिवकन्या