तंदुरुस्त का नादुरुस्त ? : भाग १

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
2 Mar 2018 - 8:22 am

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

प्रास्ताविक

माझी या आधीची आरोग्य-लेखमाला चालू असताना मित्रवर्य ‘अनिंद्य’ यांनी या विषयावर लिहिण्याची सूचना केली. मग मी त्यावर विचार केला. आधी वाटले, की ते म्हणताहेत तर लिहून काढू एक लेख लगेच. पण, जसा मी वाचन करीत या विषयाच्या अंतरंगात शिरलो तेव्हा वस्तुस्थिती लक्षात आली. या विषयाची व्याप्ती नक्कीच मोठी आहे. त्याला जाणूनबुजून एका लेखात कोंबून बसवणे हे त्यावर अन्याय केल्यासारखे होईल. तेव्हा या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याचा समग्र वृत्तांतच वाचकांसमोर मांडवा असे ठरवले व त्यातूनच या लेखमालेचा जन्म होत आहे. तेव्हा सर्वप्रथम मी अनिंद्य यांचे आभार मानतो.

एखाद्या व्यक्तीच्या ‘चाळणी चाचण्या’ (screening tests) करण्याचे प्रयोजन काय हा पहिला प्रश्न. वैद्यकीय विश्वात रुग्णाच्या ज्या अनेक चाचण्या केल्या जातात त्यांचे दोन गटात विभाजन करता येईल:
१. रोगनिदान चाचण्या (diagnostic tests) आणि
२. चाळणी चाचण्या

यापैकी पहिल्या गटातील चाचण्या या रुग्णावर केल्या जातात. म्हणजेच अशी व्यक्ती की जिला काहीतरी त्रास होतोय आणि म्हणून ती स्वतःहून डॉक्टरकडे आली आहे. याउलट चाळणी चाचण्या या आपण वरवर ‘निरोगी’ दिसणाऱ्या माणसावर करतो. त्यांच्या निष्कर्षावरून भविष्यात त्या माणसाला एखादा आजार होण्याची शक्याता कितपत आहे याचा अंदाज करता येतो.

चाचणीसाठी आजाराची निवड

आता अशा चाचण्या या नक्की कोणत्या आजारांसाठी करायच्या हा पुढचा प्रश्न. तो आजार निवडताना खालील मुद्दे विचारात घेतले जातात:
१. त्या आजाराचा समाजात प्रादुर्भाव मोठा असावा
२. त्या आजाराची पूर्वसूचना देणारी चाचणी ही करण्यास सोपी असावी आणि तिचा निष्कर्ष विश्वासार्ह असावा
३. नवजात बालकांच्या बाबतीत काही भावी आजार असे असतात की त्यांची बाह्य लक्षणे बऱ्याचदा दिसत नाहीत. तसेच यातील काही आजार पुढे झाल्यास त्यातून मेंदूस गंभीर इजा पोहोचते.
४. काही आजारांवर – विशेषतः जनुकीय – ठोस उपचार नसतात पण जर का चाचणीतून त्यांचा अंदाज आला तर त्यावर काही अंशी प्रतिबंधात्मक उपाय योजता येतात.
५. काही आजार जर त्यांच्या पूर्व-प्राथमिक अवस्थेत कळले तर त्यांच्यावर प्रभावी उपचार करता येतात.

वरील विचारमंथनातून काही आजारांची निवड करण्यात येते. ही निवड करताना त्या व्यक्तीचे वंश, देश, लिंग आणि वय हे मुद्दे महत्वाचे ठरतात. त्यानुसार प्रत्येक देशाचे एक धोरण ठरलेले असते. प्रगत देशांत काही चाचण्या या प्रत्येक नवजात बालक आणि गरोदर स्त्री यांना सक्तीने कराव्या लागतात. सर्व सरकारी रुग्णालयात सुद्धा त्या उपलब्ध असतात. गरीब देशांच्या बाबतीत मात्र असे धोरण सर्रास राबवलेले दिसत नाही. त्यामुळे तिथे अर्थातच आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाजाचे नुकसान होते.

चाळणी चाचण्यांची निवड करणे हे तसे जिकीरीचे काम असते. त्याबाबतीत सर्व तज्ञांचे एकमत बऱ्याचदा होत नाही. खालील मुद्द्यांवर वाद असू शकतो:
१. चाचणीवर होणारा खर्च आणि त्यातून होणारा खरोखर फायदा ( cost-effectiveness)
२. चाचणी करतानाचे संभाव्य धोके (विशेषतः नवजात बालकात) आणि
३. चाचणीची संवेदनक्षमता (sensitivity) आणि विशिष्टता (specificity)

चाळणी चाचण्या करण्याच्या पद्धती

१. रक्त, लघवी आदींवर केलेल्या प्रयोगशाळा चाचण्या
२. Imaging तंत्राने केलेया चाचण्या
३. शरीरातील काही विशिष्ट पेशींचा अभ्यास
४. जनुकीय चाचण्या आणि
५. निव्वळ शारीरिक तपासणीतून मिळालेली विशेष माहिती.

यावरून या विषयाचा आवाका लक्षात येईल. या लेखमालेत आपण फक्त रक्त, लघवी आदींवर केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांचाच विचार करणार आहोत. त्यातही शरीरातील रासायनिक घटकांच्या चाचण्यांवर माझा भर असेल. चाचणीचा प्रकार आणि संबंधित आजाराची थोडक्यात माहिती व त्याचे संभाव्य धोके, अशा पद्धतीचे हे लेखन असेल. प्रत्यक्ष चाचणी करण्याची तांत्रिक माहिती इथे लिहिण्याचे काही कारण नाही.
जेव्हा एखाद्या व्यक्तीत चाळणी चाचणीचा निष्कर्ष होकारार्थी(positive) येतो तेव्हा त्या आजाराची प्रत्यक्ष रोगनिदान चाचणी करणे ही पुढची पायरी असते. तर काही वेळेस खुद्द रोगनिदान चाचणीचाच वापर चाळणी चाचणी म्हणून केला जातो.

तर आपण पाहणार असलेल्या चाळणी चाचण्या नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत विविध वयोगटात आणि विशिष्ट परिस्थितीत केल्या जातात. त्यानुसार आता आपल्या तपशिलाचे पुढील गट पडतील:

१. वय ०-१ वर्षे
२. ,, २-१८
३. ,, १९-४९
४. ,, ५०चे पुढे आणि
५. गरोदर स्त्री

तेव्हा एकेक गटाच्या अनुषंगाने ही लेखमाला पुढे सरकेल. वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा करतो. शंकांचे स्वागत आहे.

(क्रमशः)
************

आरोग्यलेख

प्रतिक्रिया

नवीन विषयावरील लेखमालेचे स्वागत. पुभाप्र.

कुमार१'s picture

2 Mar 2018 - 12:06 pm | कुमार१

तत्पर आणि उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2018 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम विषय घेतला आहात या लेखमालिकेसाठी. या लेखमालिकेने वाचकांच्या मनातिल अनेक शंकाकुशंका नक्कीच दूर होतील. पुभाप्र.

कुमार१'s picture

2 Mar 2018 - 2:55 pm | कुमार१

तुमच्या शुभेच्छा उत्साहवर्धक आहेत
आभार

अनिंद्य's picture

2 Mar 2018 - 2:59 pm | अनिंद्य

@ कुमार१,
अरे वा, सुरुवात केली सुद्धा तुम्ही !
मनात असलेल्या शंका विचारीनच वेळोवेळी.
पु भा प्र

कुमार१'s picture

2 Mar 2018 - 3:39 pm | कुमार१

तुमच्या मुळेच ही सुरवात झाली आहे. तुमच्या प्रश्नांमुळे चर्चेत रंग भरेल याची खात्री आहे !

प्रमोद देर्देकर's picture

2 Mar 2018 - 4:01 pm | प्रमोद देर्देकर

खूप छान सुरुवात.

निशाचर's picture

2 Mar 2018 - 7:09 pm | निशाचर

लेखमालेचा विषय आवडला. प्रास्ताविकावरून असं वाटतंय की शरीरातील काही कमतरता, जसे लोह किंवा ड जीवनसत्त्व, शोधणार्‍या चाचण्यांचा लेखमालेत अंतर्भाव नसेल. असल्यास उत्तमच!
पुभाप्र

कुमार१'s picture

2 Mar 2018 - 7:22 pm | कुमार१

आभार!
लोह किंवा ड जीवनसत्त्व,>>>> यांचा उल्लेख असेल पण या तशा 'सौम्य' चाचण्या आहेत. गंभीर आजारांच्या चाचण्यांवर भर असेल.

चौकटराजा's picture

2 Mar 2018 - 7:48 pm | चौकटराजा

खरे तर मी आता आपले नाव विसरणे अवघड आहे. ते का ? तर " रक्तातील साखर प्राधान्याने वापरली जाते ! " ही गोष्ट सांगितल्या मुळे. मी आता आहार व २ तासानंतरची साखर यांच्या मेळात २० मिनिटांच्या ( २ तासानंतरच्या ) जलद चालण्याची भर टाकून साखर मधुमेह नसलेल्या इतकी ठेवू शकत आहे. घरीच मीटर असल्याने लक्ष ठेवून आहे. तीन महिन्यानी एच बी ए वन सी ६.० आले तर आनंदच होईल. पाहू या ! बाकी या नव्या मालिकेचे स्वागत करतो. शरीराच्या कारखान्यातील कव्हेयर बेल्ट म्हण्जे रक्त. सबब ही माला उदबोधक ठरणार. चाचण्या म्हणजे डोक्टर लोकातील मिलीभगत असे मी मानत नाही.

कुमार१'s picture

2 Mar 2018 - 8:23 pm | कुमार१

आभार. तुमचे सर्व रिपोर्ट्स A1येवोत ही सदिच्छा

कुमार१, मस्त आहे विषय. सुरूवात पण छान झालीय. तुमचे सर्व लेख अजून जास्त वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.

आजकाल मधुमेह व मुत्रपिंडाचे विविध आजार यांनी बहुतेक जणांना धडकी भरली आहे. यकृत,ह्र्दय, संधिवात हेही आजार वाढलेत. चुकीची जीवनशैली याला कारणीभूत आहे.
या आजारांसाठी कुठल्या चाचण्या कराव्या याविषयी मार्गदर्शन व्हावं ही अपेक्षा. धन्यवाद.

Nitin Palkar's picture

2 Mar 2018 - 9:31 pm | Nitin Palkar

उपयुक्त माहिती नक्की मिळेल याची खात्री. पुलेशु. पुभाप्र.

स्मिता.'s picture

3 Mar 2018 - 12:18 am | स्मिता.

तुमचे सर्व लेख वाचत आहे (आळसामुळे प्रतिसाद द्यायचे राहून जाते त्याबद्दल दिलगीर आहेच) आणि ते खूप आवडत आहेत. काही गैरसमजही दूर होत आहेत. इथे लिहीण्याबद्दल आपले अनेच आभार! तसेच प्रत्येक प्रश्णाला तुम्ही जे सविस्तर उत्तर देता ते खूप कौतुकस्पद आहे. या लेखमालेवरही नजर ठेवून असेन.

यानिमित्ताने मिपावरच्या सर्वच डाॅक्टर मंडळींचे आभार मानून घेते. त्यांच्या माहितीपूर्ण लेखनाने आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झालीये.

शेखरमोघे's picture

3 Mar 2018 - 3:47 am | शेखरमोघे

लेखमालेतील आधीच्या लिखाणाप्रमाणेच हा ही विषय महत्वाचा आहे आणि आपण तो आधीसारखाच उत्तम विषद करालच ही खात्री आहे. "चाळणी चाचण्या" या विषयाचा आवाका लक्षात घेऊन फक्त रक्त, लघवी आदींवर केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांचाच विचार करण्याने जरी या चाचण्याबद्दलची पूर्ण/पुरेशी माहिती मिळाली तरी इतर चाचण्याही नन्तर आपल्या लिखाणात येतीलच ही अपेक्षा. उपयुक्त माहितीबद्दल आभार!

कुमार१'s picture

3 Mar 2018 - 7:47 am | कुमार१

शलभ, राम, नितीन, स्मिता व शेखर,
मनमोकळ्या अभिप्रायाबद्दल आभार ! तुमच्या अपेक्षा मी पुऱ्या करण्याचा प्रयत्न करेन.
** लेखमालेच्या २ लेखांमध्ये किती दिवसांचे अंतर असावे याबाबतीत वाचकांचे मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

तुषार काळभोर's picture

3 Mar 2018 - 1:09 pm | तुषार काळभोर

वा!....
अतिशय छान उपक्रम!
आधीच्या लेखमालेसारखी हीसुद्धा सर्वांना मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2018 - 1:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली लेखमाला अनेकांना उपयोगाची ठरावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
लेखमालिकेसाठी शुभेच्छा....!!

-दिलीप बिरुटे

कुमार१'s picture

3 Mar 2018 - 2:38 pm | कुमार१

शुभेच्छाबद्दल आभार. तुमच्या सारख्या जाणकार वाचकांमुळेच चर्चा चांगली होईल

पैसा's picture

3 Mar 2018 - 5:21 pm | पैसा

ही मालिका सुद्धा अतिशय माहितीपूर्ण होणार.

कुमार१'s picture

6 Mar 2018 - 3:26 pm | कुमार१

भाग २ इथे आहे
http://www.misalpav.com/node/42173

balasaheb's picture

25 Mar 2018 - 1:58 pm | balasaheb

खुप मस्त

कुमार१'s picture

25 Mar 2018 - 2:20 pm | कुमार१

आभारी आहे !

अत्रन्गि पाउस's picture

27 Mar 2018 - 3:26 pm | अत्रन्गि पाउस

कोणत्याही pathological टेस्ट करायला गेलो कि असतील नसतील तेवढे parameters करून घ्यावे अशा मानसिकतेत असतो ...

अत्रन्गि पाउस's picture

27 Mar 2018 - 3:26 pm | अत्रन्गि पाउस

कोणत्याही pathological टेस्ट करायला गेलो कि असतील नसतील तेवढे parameters चेक करून घ्यावे अशा मानसिकतेत असतो ...

कुमार१'s picture

27 Mar 2018 - 3:40 pm | कुमार१

त्यात तुम्ही आणि प्रयोगशाळा या दोघांचाही फायदा आहे !

भटक्य आणि उनाड's picture

7 Apr 2018 - 11:45 am | भटक्य आणि उनाड

लेखमालिकेसाठी शुभेच्छा....!! येवु द्या...

कुमार१'s picture

7 Apr 2018 - 12:07 pm | कुमार१

धन्यवाद, पण पूर्ण लेखमाला (६ भाग) लिहून संपली आहे !!
अनुक्रमणिका बघावी ही वि