काही काळापासून हा प्रश्न उपस्थित करावा अथवा करू नये अशा वैचारिक अडचणीमध्ये मी आहे. अखेर विचारूनच टाकावा असे वाटले म्हणून ह्या लेखाचा उद्योग.
अन्य ठिकाणी (छापील अथवा अन्य संस्थळावर) पूर्वप्रकाशित अशा आपल्याच कृतीचे आपणच ’मिसळपाव’ वा अन्य एखाद्या तत्सम संस्थळावर पुन:प्रकाशन करणे कितपत स्वागतार्ह आहे ह्याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. कोठल्याहि संस्थळाच्या ध्येयधोरणात ह्याविषयी काही लिहिले असल्यास माझ्या वाचनात ते आलेले नाही. अशा पुन:प्रकाशनाच्या विरुद्ध आणि बाजूने काही विचार मांडता येतील.
विरुद्ध विचार म्हणजे पुन:प्रकाशन स्वप्रसिद्धीच्या मोहामधून असे केले आहे असा आरोप केला जाऊ शकतो आणि असा आरोप माझ्यावर केला जाणार असल्यास मी तो टाळू इच्छितो. (पुन:प्रकाशानाचे ’पातक’ माझ्या हातूनहि घडले आहे.)
पुन:प्रकाशनाच्या बाजूने असे म्हणता येईल की पुन:प्रकाशन हे छापील पुस्तकाची नवी आवृत्ति काढण्यासारखे आहे. छापलेल्या पुस्तकाच्या प्रथम छापलेल्या प्रती संपल्या आणि तरीहि पुस्तकाला मागणी असली तर पुढची आवृत्ति काढली जाते आणि कोणासहि त्यात वावगे असे काही दिसत नाही. एका संस्थळावर लेख प्रकाशित झाला आणि त्या संस्थळाच्या वाचकांनी - ज्यांची संख्या मर्यादित असते - तो वाचला तरी ज्यांनी तो वाचलेला नाही पण ज्यांना तो वाचायला आवडेल अशा अन्य संस्थळांच्या वाचकासाठी तो पुन:प्रकाशित केला तर अधिक वाचकांपर्यंत तो पोहोचतो ही पुन:प्रकाशनाची जमेची बाजू.
तेव्हा ह्या विषयावर जनतेचा कौल वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
10 Feb 2018 - 1:42 am | उपाशी बोका
स्वतःचे लिखाण असेल तर ते फक्त मिपावरच कशाला, इतर १०० ठिकाणीपण प्रकाशित करायला माझी व्यक्तिशः काहीच हरकत नाही. उलट ते आवडेल कारण त्यामुळे इतरांचे माहीत नसलेले लेख वाचता येतील. आंतरजालावर बरेच जण आहेत, जे ब्लॉगवर पण लिहितात आणि मग मिपावरपण लिहितात किंवा मिपाव्यतिरिक्त इतर वेबसाईटवर लिहितात, इतकेच कशाला वर्तमानपत्रात पण त्यांचे लिखाण छापून येते. माझ्यासारख्या वाचकाला, जे इतर वेबसाईट किंवा वर्तमानपत्र नियमित वाचत नाहीत, त्यांना असे पुन:प्रकाशन सोईस्कर पडते.
तुम्ही व इतरांनी निसंकोचपणे तुमचे लेख लिहावे अशी विनंती. कोण प्रामाणिकपणे लिहित आहे आणि कोण अजेंडासाठी लिहित आहे, हे ओळखायला मिपाकर सूज्ञ आहेत.
10 Feb 2018 - 1:45 am | कपिलमुनी
प्रत्येक संस्थळाचा वेगळा वाचक वर्ग असतो . काही जण सगळ्या साईट वाचतात , काही जण ठराविक साईट वाचत असतात. आणि कोणतीही साईट त्यावर प्रताधिकार सांगत नाही त्यामुळे स्वतःचे लेखन पुन:प्रकाशित करण्यास अडचण नसावी
10 Feb 2018 - 2:46 am | फारएन्ड
मी किमान तीन स्थळांवर करतो - मायबोली, मिपा आणि ऐसीअक्षरे. जे काही लिहीतो ते जास्तीत जास्त लोकांनी वाचावे हाच मुख्य उद्देश. असे अनेक लोक आहेत की जे यापैकी फक्त एकाच ठिकाणी असतात.
त्यामुळे अन्य ठिकाणी जरी लिहीलेले असेल तरी प्रताधिकार भंग वगैरे जर होत नसेल तर असे करणे लेखकाला फायद्याचेच आहे.
10 Feb 2018 - 8:54 am | प्रचेतस
इकडे लिहित रहा, तुमचे लेख आम्हांसाठी पर्वणी असते, इतर संस्थळांवरील लेख वाचले जात नाहीत किंवा वाचले जाउनही प्रतिसाद दिला जात नाही. तेव्हा इथे पुनःप्रकाशन करणे इष्टच.
10 Feb 2018 - 10:32 am | पैसा
संस्थळांची हरकत नसते. मी स्वतः मिपा आणि मायबोली सोडून
इतर नेट वरचे फार कमी वाचते. अगदी ब्लॉग किंवा फेसबुक फार वाचले जात नाही. तुम्ही ऐसी अक्षरे वर लिहिता हे माहीत आहे पण तिथल्या चर्चा मी विशेष वाचत नाही. माझ्यासाठी तरी तुमचे लिखाण नवीन असते. जरूर पुन्हा प्रकशित करा.
10 Feb 2018 - 11:21 am | पगला गजोधर
बिनधास्त पुनः प्रकाशित करा....
10 Feb 2018 - 12:31 pm | नाखु
वाचनीय असते ते एका संस्थळावर असो वा अधिकाधिक, वाचले जातेच
जर वाचलं नाही म्हणून "वाचलो" असं असेल तर अधिकाधिक लिहूनही काही फरक पडत नाही
फक्त मिपावर वावरत असलेला आणि मिपावरील नितवाचक नाखु
10 Feb 2018 - 12:37 pm | धर्मराजमुटके
अरविंदजी,
आपण ऐसी आणि मिसळपाववर लिहिता ते मी वाचत असतो. आपले लिखाण वाचायला आवडते. लिखाणाव्यतीरिक्त आपले प्रतिसाद देखील वाचनिय असतात. त्यामुळे लेखन पुनःप्रकाशित करायला काहिच हरकत नाही. सगळे जण सगळीकडे असतात असे नाही. मात्र बराच मराठी वर्ग मिपा, मायबोली, ऐसी आणि मनोगत या संस्थळावर आढळतो. यापैकी मनोगत संस्थळावर लेखन पुनःप्रकाशनासंदर्भात नियम आहेत. ते वाचून घ्या. अर्थात मनोगत च्या शुद्धलेखनाच्या आग्रही धोरणामुळे तिथे फार कमी लोक लिहितात. मात्र तुमच्या बाबतीत ही अडचण दिसत नाही.
आपण (बहुधा) कॅनडात राहता पण आपले बहुसंख्य लिखाण भारताविषयीच असते. बाहेरच्या जगातील इतिहास, प्रवास वर्णनांव्यतिरिक्त आपण परदेशांतील राहणीमान, तिथले अनुभव, मनात होणारी देश परदेशाची तुलना इत्यादी विषयावर आधारीत आपले अनुभव, मते मांडावित ही विनंती. शिवाय कोठेतरी वाचल्याप्रमाणे आपण न्यायालयांशी संबंधित काम करत होता असे स्मरते. (चुकभूल देणे घेणे). व्यावसायिक गुप्ततेच्या दृष्टीने आवश्यक भाग वगळून त्याबद्दल ही लिहिता येईल. (अवांतर : आजकाल अॅमेझॉन प्राईमच्या कृपेने मला कोर्टरुम ड्रामा फार आवडायला लागला आहे.)
आपण लिहित रहावे ही विनंती. वरील प्रतिसादात काही व्यक्तीगत नावडत्या गोष्टी लिहिल्या गेल्या असतील तर त्याबद्द्ल आगावू क्षमस्व __/\__
10 Feb 2018 - 1:27 pm | कंजूस
मि>>जनतेचा कौल>>
पुन: प्रकाशन किंवा दोनतीन ठिकाणी कॅापीपेस्ट करणे मला पटत नाही.
* दुसरीकडे त्याच विषयासंबंधी कुणाचा लेख आल्यास प्रतिसादात वेगळ्या शब्दांत लिहायला आवडते.
*जिकडे लेख अगोदर काही वर्षांपुर्वी दिला असेल तर त्याच विषयाशी जोडून नवीन काही घटना घडली तर पुन्हा वेगळ्या शब्दांत अधिकची माहिती देणे योग्य वाटते.
// संदर्भ : माइक्रोसॅाफ्टने 'सेव वेबपेज' काढून टाकले. फक्त रीडिंग लिस्टमध्ये लिंक घेता येते.
मिपाच्या वाचनखुणा
डिडब्ल्यु टिवि चानेलवाले प्रोग्राम (दोन दिवसांनंतर) रिपिट पुन्:प्रसारण करत नाहीत.
10 Feb 2018 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
"ज्या लेखनाचे प्रताधिकार तुमच्या हाती आहेत" असे लेखन "येथे लेखनाची केवळ प्रथमप्रसिद्धी करावी (पुनर्प्रसिद्धी नको)" अशी अट नसलेल्या कोणत्याही माध्यमात प्रसिद्ध करणे हे केवळ सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
खुद्द तुमच्या लेखनाबद्दल माझे असे मत आहे : तुमचे लेखन माहितीपूर्ण, अभ्यासू आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. कोणत्याही एकाच माध्यमाचे* प्रेक्षक-वाचक नेहमीच मर्यादित असतात. त्यामुळे, तुमचे लेखन शक्य तितक्या माध्यमांत प्रसिद्ध करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवले तर ते एक उत्तम काम होईल.
======
* : यात लेखन रसिकांपर्यंत पोहोचवण्याची अनेक माध्यमे (छापील, दृक्श्राव्य, जाल, इ) आणि त्यापैकी प्रत्येक माध्यमातील अनेक प्रकार (उदा: जालावरची अनेक संस्थळे) गृहित धरलेले आहेत.
10 Feb 2018 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजून एक...
तुमचे लिखाण इतर ठिकाणी प्रसिद्ध करा न करा पण, मिपावर मात्र जरूर प्रसिद्ध करा. इथे तुमचा खास चहाता वर्ग निर्माण झाला आहे, हे विसरू नका... त्याला नाराज करू नका !
12 Feb 2018 - 9:13 pm | आनंदयात्री
हेच म्हणतो. तुमचे नवीन जुने सगळे लेखन येउद्या, अशी सगळ्या कोका फॅन क्लबच्या मेम्बरांची आग्रहाची विनंती आहे.
12 Feb 2018 - 9:27 pm | सुबोध खरे
"ज्या लेखनाचे प्रताधिकार तुमच्या हाती आहेत" असे लेखन "येथे लेखनाची केवळ प्रथमप्रसिद्धी करावी (पुनर्प्रसिद्धी नको)" अशी अट नसलेल्या कोणत्याही माध्यमात प्रसिद्ध करणे हे केवळ सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
बाडीस
11 Feb 2018 - 10:20 am | बिटाकाका
तुमचं लिखाण मिपावर नसतं तर मी तुमच्या मौलिक लेखन ठेव्याला मुकलो असतो!! तस्मात, सगळीकडे प्रकाशित करा,माझ्यासारखे अनेकजण एकाच संस्थळाला भेट देणारे असू शकतात!!
11 Feb 2018 - 4:07 pm | Jayant Naik
आज कालच्या युगात प्रिंट मेडिया आणि वेब मेडिया या दोन्ही ठिकाणी असणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त वाचकवर्ग मिळावा म्हणून.एका मासिकात प्रसिद्ध झालेला लेख दुसऱ्या मासिकात देऊ नये अशी मासिकांची अट असते. ती वेब मिडीयावर अजून तरी नाही .अमाझोन वर जर तुम्ही काही स्वयम प्रकाशित केले तर ते दुसरी कडे कुठेही digital स्वरुपात असू नये अशी काही तरी त्यांची अट आहे असे वाचनात आले आहे. तसे तुम्हाला स्वयम प्रकाशित करायचे नसेल ...अमेझोन वर ..तर दोन तीन वेब मिडिया वर प्रकाशित करायला हरकत काय ?
12 Feb 2018 - 8:46 pm | मित्रहो
जर संस्थळाच्या धोरणात बसत असेल तर पुर्नप्रकाशित करण्यास हरकत नसावी. मी इतरत्र प्रकाशित झालेले किंवा पूर्णपणे नवीन लिखाण मिपावर टाकतो, कधी कधी माबोवर सुद्धा.
तुमचे लिखाण वाचतोच
12 Feb 2018 - 9:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा धोरणात कलम क्रमांक दोन मधे पहिली ओळ अशी आहे की ''स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही.'' आपलं स्वरचित साहित्य असल्यामुळे मिसळपाव’ संस्थळावर आपले लेखन पुन:प्रकाशित करण्यास हरकत नाही, असे दिसते.
आपलं लेखन आंतरजालावर आपल्याला वाटतं ना तिथे त्या सर्व संकेतस्थळावर टाकायला हरकत नसावी, आपले लेखन माहितीपूर्ण आणि वेगळे असते तेव्हा ते लेखन सर्व वाचकांपर्यंत॑ पोहचलं पाहिजे. सध्या मिसळपाववर लिहिलं की ते सर्वत्र पोहचतं. बाकी मराठी संस्थळे चालू आहेत की नाही ते माहिती नाही. (आम्ही मिपा कधी बंद पडलं तर मायबोलीवर चक्कर टाकायला जातो)
बाकी, कोल्हटकर साहेब, मी तुम्हाला इ.स. २००८-९ मधेच म्हणालो होतो की मिसळपाववर लिहायला या आणि हे निमंत्रण मी तुम्हाला उपक्रम मराठी संकेतस्थळ शेवटचे श्वास मोजत होते तेव्हाच दिलं होतं, आता तुम्ही 'पाकिस्तान' मार्गे भारतात आला आहात तरी लिहित राहा. स्वागत आहेच. ;) (हलकेच घ्या)
-दिलीप बिरुटे