शस्त्रास्त्रांचा बाजार- २

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
30 Dec 2017 - 10:21 am

शस्त्रास्त्रांचा बाजार- २
अनंताने राहुलला जायच्या अगोदर विचारले कि तुझा स्टॅनफोर्डचा प्रवेश कसा झाला आणि पुढे काय करायचा विचार आहे?
त्यावर राहुल हसून म्हणाला आवश्यक त्या ठिकाणी आपले संबंध असले(right contacts in right place) कि सर्व जमते. माझे एम एस झाले कि तेथेच माझी नोकरी ठरलेली आहे त्यानंतर व्हिसा आणि ग्रीन कार्ड.
अनंत म्हणाला, 'एवढं सगळं पुढचं कसं ठरवता येईल?"
त्यावर राहुल त्याला म्हणाला, "हे बघ तू साधा सरळ आहेस. तुला म्हणून सांगतो आहे. बाहेर कुठेही बोलू नकोस आणि बोललास तर मी कानावर हात ठेवेन.
माझे डॅड दिल्लीत ज्या आस्थपनात काम करीत आहेत त्यात भारताला लागणाऱ्या संरक्षण सामग्रीचे उत्पादन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जाते. हे तंत्रज्ञान विकसित करण्यास वेळ लागला कि आपले लष्कर शस्त्रास्त्रे अद्ययावत करण्यासाठी सरकारकडे लकडा लावतात.
तुला माहीतच आहे कि लष्कर म्हणजे एक "पूज्य गोमाता"(sacred cow) आहे. त्यांनी काहीही मागितले तरीही त्यांना ते "देणार नाही" असे कोणतेही सरकार म्हणू शकत नाही. मग आपले "देशी तंत्रज्ञान" नसेल तर "बाहेरून" ते आयात करावेच लागते. यात परदेशी कंपन्यांचा भरपूर फायदा असतो त्यामुळे त्या मग अशा उत्पादनाच्या विक्रीसाठी आपले दलाल नेमतात. हे दलाल मग कोण "महत्त्वाची व्यक्ती" आहे त्याचा शोध घेतात. मग त्या व्यक्तीने आपल्याला मदत करावी म्हणून त्यांच्या मागे गोंडा घोळतात. हे सर्व "स्वच्छ व्यवहार" आहे. तुम्ही मला काय देणार आणि मी तुम्हाला काय देणार? बहुसंख्य सरकारी कंत्राटे अशा देवघेवीवरच चालतात.
मी काही तुझ्याइतका हुशार नाही हे फक्त "मला आणि तुला" माहिती आहे. पण कागदावर माझे कॉलेज उच्च दर्जाचे आहे. माझी येणारी पदवी पण जगमान्य आहे. बाकी या सर्व पार्श्वभूमीवर मौजमजा करून माझं लग्न पण एका अब्जाधीश कंत्राटदाराच्या मुलीशी (पिंकी) होणार आहे. डॅड म्हणाले बेटा काय मौज मजा करायची आहे अमेरिकेत ती दोन चार वर्षे करून घे. पण लग्न मात्र याच मुलीशी करायचं आहे.
मी आत्ता तरी त्यांना हो म्हणालो आहे.
पुढचं पुढे पाहू."
अनंत काहीच बोलला नाही. राहुल गेल्यावर तो बराच वेळ थंड बसून होता. मनात प्रचंड वादळ होत होतं. डोकं सुन्न झालं होतं. शेवटी डॉ कुलकर्णींकडे गेला आणि त्यांना हि हकीकत सांगितली.
डॉ कुलकर्णी उठून त्याच्या खुर्चीशी आले. त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले "अनंता या गोष्टींची तुला आताच माहिती होत आहे हे चांगले आहे. हे बघ जग हे काही साधू संतांचे नाही. सर्व तर्हेचे चोर दरोडेखोर हरामखोर लोक या जगात आहेत. मग ते संरक्षण खात्यात किंवा सरकारी नोकरीत नसतील असे कसे गृहीत धरणार? काही गोष्टी तुला सांगतो आहे त्या नीट लक्षात ठेव. चांगल्या कामाचा लाभ तुला कधी ना कधी होईलच.
लोकशाहीमुळे सर्व जण समान असतात हा एक आपला "गैरसमज" झाला आहे तो सर्व प्रथम काढून टाक.
तुझ्या वर्गात अंबानींचा मुलगा असेल तर तो तुझ्या बरोबरच पदवी घेईल. ज्ञानात आणि पदवीत तुम्ही समान असाल.
पण उद्या तो त्याच्या वडिलांच्या कंपनीत संचालक म्हणून रुजू होईल आणि तू मात्र कनिष्ठ, वरिष्ठ, उप,नंतर मुख्य अभियंता असा बढतीत "चढत" जाशील. आता यात समानता कुठे आली?
तेंव्हा आपण "काम करायचे" असते ते स्वतःच्या "समाधानासाठी".
तू फार मोठा माणूस होशील ही शक्यता "वस्तुस्थितीत" बदलेलच असे नाही. नोकरीत तुला अनेक आमिषे दाखवली जातील, दडपण आणले जाईल, एवढेच कशाला ब्लॅक मेल केले जाईल. अनेक मोहाचे प्रसंग येतील. याबद्दल तुझा निश्चय आणि विचारसरणी काय आहे यावर तू कुठे जाशील हे ठरेल. पैसा हा काळा किंवा पांढरा किंवा करडाही असतो.
तू जर "रंगांध" असशील तर प्रश्नच मिटला. बहुधा लवकर प्रगती होईल किंवा दुर्दैव असेल तर खड्ड्यातही जाशील."
पुढे मी सांगणार आहे ते भयानक आहे पण सत्य आहे. ते जाणूनच तुला आयुष्यात पुढे जायचे आहे. तेंव्हा मनाची तयारी कर. दुर्दैवाने या गोष्टी मध्ये तुला आईवडील कदाचित कोणताही सल्ला किंवा आधार देऊ शकणार नाहीत कारण ते त्यांच्या समजाच्या कदाचित पलीकडचे असेल.
क्रमशः

प्रकटनमुक्तक

प्रतिक्रिया

नाखु's picture

30 Dec 2017 - 10:38 am | नाखु

वाचतोय

वाचण्यासाठी वाचणारा नाखु

सिरुसेरि's picture

30 Dec 2017 - 12:24 pm | सिरुसेरि

पुभाप्र . राहुल , त्याचे डॅड यांवरुन रंग दे बसंती मधला सिद्धार्थ , आणी त्यातले त्याचे अब्जाधीश कंत्राटदार ( मिग विमाने संदर्भात ) डॅड अनुपम खेर आठवले .

सुबोध खरे's picture

30 Dec 2017 - 1:38 pm | सुबोध खरे

आता "रंग दे बसंती" पाहावा लागेल.
अरे ये "पी एस पी ओ" नही जानता असे कृपया म्हणू नका.
मी "गाझी" पण पाहिलेला नाही

माहितगार's picture

30 Dec 2017 - 12:48 pm | माहितगार

पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2017 - 10:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

कथेसारखे फुलवत सत्य सांगण्याची पद्धत आवडली ! कल्पनेपेक्षा सत्य जास्त आश्चर्यकारक (? भयानक) असते असे म्हणण्याजोगा विषय आहे हा ! पुभाप्र.

चाणक्य's picture

31 Dec 2017 - 5:06 pm | चाणक्य

वाचतोय.

असंका's picture

2 Jan 2018 - 8:13 pm | असंका

आईशप्पथ!!! डॉ. साहेब कुठे होतात इतके दिवस!!!!

काय सुरेख लिहिलंय!!!
पुभाप्र!!!

धन्यवाद!!

मोहन's picture

3 Jan 2018 - 2:07 pm | मोहन

पुढ्चा भाग लवकर टाका डॉक.

खबो जाप's picture

3 Jan 2018 - 4:49 pm | खबो जाप

अतिशय सुंदर आणि उत्सुकता वाढवणारे भाग , पुढचे भाग लवकर येऊ द्यात

Nitin Palkar's picture

28 Feb 2018 - 8:29 pm | Nitin Palkar

ज्यांचे लिखाण केवळ वाचनीयच नव्हे तर मननीय असते अशा मिपावरील मोजक्या लेखकांमध्ये तुम्ही अग्रस्थानी आहात (वैम).
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत....

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2018 - 1:12 am | पिवळा डांबिस

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
एक गोष्टः ज्याचे वडील भारतीय आस्थापनात जबरदस्त आहेत आणि ज्याचा भावी सासरा अब्जाधीश आहे त्याने अमेरिकेतील शिक्षणानंतर, तिथे नोकरी (व्हिसा) आणि ग्रीनकार्ड ह्याची महत्वाकांक्षा ठेवणं म्हणजे क्षुल्लक वाटतं (लो एम). म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांसारख्या माणसानं अमेरिकेतलं शिक्षण झाल्यावर तिथेच फोर्ड्सारख्या कंपनीत नोकरी करत बसण्यासारखं...
अ‍ॅन्ड लो एम इज अ क्राईम! :)
अर्थात त्या वाक्याचा पुढील कथानकाशी काही खोल संबंध असेल तर चूभूद्या घ्या...

जबरदस्त बाप आणि अब्जाधीश सासरा नसलेला,
बापुडा डांबिस

विजुभाऊ's picture

14 Jun 2018 - 9:03 am | विजुभाऊ

डॉक्टर साहेब.
कथेचे पुढे काय झाले

पिवळा डांबिस's picture

28 Jun 2018 - 3:08 am | पिवळा डांबिस

ते आमच्या प्रतिसादावर रागावले बहुतेक. :)
रागावू नका हो डॉक्टर, मनावर नका घेऊ आमचा प्रतिसाद. तुम्ही लिहा पुढील भाग.
(नायतर विजुभाऊ रागावतील!)

सुबोध खरे's picture

28 Jun 2018 - 1:30 pm | सुबोध खरे

पिडां साहेब
,भारतात आपण मोठी कंपनी काढा किंवा कितीही पैसा मिळवा तुम्ही एक बनिया असता. लोकांना विदेशी पदवीचे आकर्षण जबरदस्त आहे. शिवाय जर उद्या लफडी बाहेर आली तर विदेशी नागरिकत्व आपल्याला बरेच संरक्षण देऊ शकते. (उदा सलमान रश्दी याना ब्रिटनने अमाप पैसे खर्च करून संरक्षण दिले होते कारण ते ब्रिटिश नागरीक आहेत) म्हणून तर पैसेवाल्या लोकांना विदेशी नागरिकत्वाचे आकर्षण असते.
श्री अनिल अंबानी, सचिन पायलट यानी व्हार्टन रतन टाटा आणि जयंत सिंन्हा यांनी हार्वर्ड आदी गोदरेज नरेंद्र पटनी यांनी स्लोन्स सारख्या ठिकाणी प्रवेश घेतला होता.
शिवाय विदेशात व्यवस्थापन आणि उद्योग (business/ management) स्कूल्सचे माजी विद्यार्थी(alumni) यांचे क्लब असतात(जसे डून स्कुल आहे)
उदा https://www.whartonclubindia.com/ ज्याने उद्योग सुरु करणे सोपे जाते.
भारतात पैसे देऊन आय आय टी किंवा आय आय एम मध्ये प्रवेश घेता येत नाही पण विदेशात फुल्ली पेड सीट मध्ये प्रवेश जास्त सहज मिळू शकतो
आपले कर्टी चिदंबरम सुद्धा असेच प्रदेशात शिकून आले आहेत He went on to study business management at the University of Texas at Austin and law at the University of Cambridge. https://en.wikipedia.org/wiki/Karti_Chidambaram इथे आल्यावर त्यांनी इतक्या कंपन्यांचे जाळे विणले आहे कि त्याचा थांग सुद्धा अंमलबजावणी संचालनालया लागत नाहीये. आता अर्थ मंत्र्यांचा मुलगा बाहेर का शिकून येतो?
दोन चार वर्षे तेथे नोकरी केल्यावर त्यांना हिरवे पत्र (ग्रीन कार्ड) आणि नंतर नागरिकत्व मिळवणे सोपे जाते. कागदोपत्री या गोष्टी दिसणे पण महत्त्वाचे आहे.
याशिवाय अनेक लोक तेथे उद्योगाबद्दल शिकून भारतात परत येऊ उद्योग सुरु करणे
https://economictimes.indiatimes.com/small-biz/entrepreneurship/with-mba...

साहेब कुणावरही नाराज होण्याचा प्रश्न च नाही. हे प्रकरण एखाद्या वाळूत( quicksand) मध्ये फसल्यासारखे आहे. लिहायला घेतले खरे पण त्याला इतके पदर, फाटे आणि फांद्या आहेत कि कुठे आणि कसा हात घालावा याचा पार गोंधळ उडून गेला. यास्तव हे प[रकरां मागे ठेवून इतर दोन लेख मालिका( पाणबुडी आणि ऍमस्टरडॅम) लिहितो आहे

पिवळा डांबिस's picture

29 Jun 2018 - 1:49 am | पिवळा डांबिस

मी परदेशात उच्च शिक्षण घेण्याबद्दल काहीच शंका घेतलेली नाही. ती एक उत्तमच गोष्ट आहे. प्रत्येकाने अ‍ॅस्पायर करावी अशी, विशेषतः विज्ञानाच्या विद्यार्थ्याने. माझी शंका ही भारतात आर्थिक आणि सरकारी पातळीवर अतिशय मजबूत असलेल्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणोत्तर तिथेच रहाण्याबद्दल होती. माझ्या मते अशा मुलांनी भारतात परत येऊन काही हालचाली केल्यास त्यांच्या भविष्याला जास्त उज्ज्वल आशा आहे. एनिवे, सोडून द्या...

साहेब कुणावरही नाराज होण्याचा प्रश्न च नाही.

धन्यवाद. माझ्यापुरतं तेव्ह्ढं ते साहेब हे संबोधन सोडलंत तर बरं! :) पिडां/पिडांकाका म्हणायला हरकत नाही.

हे प्रकरण एखाद्या वाळूत( quicksand) मध्ये फसल्यासारखे आहे. लिहायला घेतले खरे पण त्याला इतके पदर, फाटे आणि फांद्या आहेत कि कुठे आणि कसा हात घालावा याचा पार गोंधळ उडून गेला.

येस, असं होतं कधी कधी. माझेही दोन-तीन धागे पूर्वी मी असेच अर्धवट सोडून दिले होते...

यास्तव हे प[रकरां मागे ठेवून इतर दोन लेख मालिका( पाणबुडी आणि ऍमस्टरडॅम) लिहितो आहे

पाणबुडी वाचतो आहे, त्यावर प्रतिसादही देतो आहे. मालिका आवडली.
नेदरलॅन्ड तितकी भावली नाही. पण त्याचं कारण तुमचं लिखाण नसून, मी यापूर्वी अनेकदा तिथे गेलेलो असल्याने त्यात मला नाविन्य वाटले नाही हे आहे.
दोन्ही लिखाण येऊ द्या. हार्दिक शुभेच्छा...

जेम्स वांड's picture

28 Jun 2018 - 9:55 pm | जेम्स वांड

एकंदरीत अनपेक्षितच म्हणावं लागेल. माझ्यापुरते तरी टायटल बऱ्यापैकी फसवे निघाले. म्हणजे बघा शस्त्रास्त्रांचा बाजार म्हणल्यावर मला वाटले की बुआ अनादीअनंत काळापासून माणसाची युद्धाची गरज, त्यातुन आलेली शस्त्रांची गरज, ती तयार करण्याची खास कला (उदाहरण सामुराई कताना जिच्यात अतिशय कॉमन सेन्स वापरून व्यवस्थित हाय कार्बन स्टील ब्लेड साधले जाई, किंवा बुआ आपले उट्झ स्टील, जे पार दमास्कस, चीन, वगैरेमध्ये निर्यात होई इत्यादी) शस्त्रास्त्रांचा बाजार कसा फोफावत गेला, अस्त्रे कशी विकसित झाली , आधुनिक काळात अमेरिकन व्हेपन इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स कसे अजस्त्र होत गेले वगैरे वाचायला मिळेल असे वाटले होते.

असो. ही "सत्याला स्पर्श करणारी कथाही" काही अगदीच वाईट नाहीये, चांगली आहे. थोडी अजून खुलवता आली तर मला तरी एक वाचक म्हणून अजून आनंद येईल वाचायला. शुभेच्छा.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 7:28 pm | आयर्नमॅन

पिंकी (खिक्क) चे पुढे काय झाले जाणून घ्यायची इच्छा आहे

डीप डाईव्हर's picture

2 Dec 2020 - 7:20 pm | डीप डाईव्हर

ते समजणार नाही कारण लेखक सांगत नाहीत तो पर्यंत...खूप फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते... नाईलाज अजून काय?

महासंग्राम's picture

2 Dec 2020 - 5:13 pm | महासंग्राम

याचा पुढचा भाग यायला पाहिजे

टर्मीनेटर's picture

3 Dec 2020 - 9:44 am | टर्मीनेटर

अनुमोदन
डॉक्टरसाहेब आता मनावर घ्याच!