पुणे ते लेह (भाग ३ - शामलजी ते शाहपुरा)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
25 Nov 2017 - 6:10 pm

पुणे ते लेह (भाग 2 - पुणे ते शामलजी)

२६ ऑगस्ट
आज देखील लवकर तयारी करून ६:४५ ला मंगलमूर्ती लॉजवरून निघालो. ५ मिनिटात शामलजी बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मंदिरात पोचलो. हे मंदिर ११ व्या शतकात बांधले असून कृष्ण किंवा विष्णूला समर्पित आहे अशी माहिती विकिपीडियावर आहे.

शामलजी मंदिर

मंदिराची कलाकुसर अतिशय सुंदर आहे. बाहेरच्या भिंतींवर कोरलेले हत्ती, सैनिक, देवतांच्या मूर्ती व अन्य नक्षीकाम फारच अप्रतिम आहे.

मंदिराची कलाकुसर

७:१५ ला मंदिरातून निघून राष्ट्रीय महामार्ग ८ वर आलो. शामलजी पासून १०-१२ किमी अंतर गेल्यावर राजस्थान सुरु होतो. शामलजी ते गुजरात/राजस्थान सीमा हे १०-१२ किमी आणि राजस्थान मधील पहिले १५ किमी महामार्ग अतिशय भयानक स्थितीत होता. मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करता येईल इतके मोठे खड्डे होते काही ठिकाणी. नंतर मात्र रस्ता उत्तम होता. मोठमोठी मशिनरी घेऊन जाणारे ट्रक सोबतीला होतेच. काही ट्रक तर इतके मोठे होते की त्यांना ५०-६० च्या आसपास चाके असावीत. ८:१५ च्या सुमारास एका धाब्यावर चहा पिण्यासाठी थांबलो. ढाब्याच्या मागे एक पांढरा पर्वत दिसत होता. हा एक प्रकारचा दगड असून त्याच्या मुर्त्या बनवतात अशी माहिती एकाने दिली.

पांढरा पर्वत

ढाब्यावरच्या बरणीत गठीया नामक वेगळाच पदार्थ होता. चहा गठीया खाऊन प्रवास पुढे सुरु झाला. आजचा आमचा प्रवास खूपच थांबत थांबत चालला होता. कारण एकच. राजस्थान म्हणजे प्रचंड मोठे राजवाडे किंवा वाळूचे वाळवंट आणि प्रचंड ऊन असे मला अपेक्षित होते. पण इथे राजस्थानात प्रवेश केल्यापासून आम्हाला दिसणारे दृश्य एकदम वेगळे होते. रस्त्याच्या बाजूने छोट्या छोट्या टेकड्या, त्यावर खुरटे हिरवेगार गवत आणि ह्या सर्वांच्या जोडीला प्रचंड स्वच्छता. त्यामुळे आम्ही दर ५ मिनिटांनी थांबत होतो. प्रत्येक वेळी एखाद्या जागी थांबलो की 'आता हा शेवटचा स्टॉप. मग डायरेक्ट उदयपूर' असे स्वतःला बजावायचो. पण इतका सुंदर निसर्गरम्य परिसर पाहून आपोआप थांबले जात होते. राजस्थान मध्ये इतका हिरवागार भाग देखील आहे हे मला माहीतच न्हवते.

९ वाजता एका हॉटेलवर नाष्टा केला.
'राजस्थान में तो बहुत हरियाली है और काफी साफ सुथरा है' मी हॉटेलच्या मालकाला बोललो. तो खुश झाला.
'यहां ऐसे ही हरियाली होती है. आप बारिश के मौसम मे आये है इसलिये बहुत खूबसूरत है नजारा. यहां से आगे उदयपूर तक नजारा और भी अच्छा होगा. हमको कभी भी पाणी की कमी नहीं होती. १५ फीट पर पाणी मिल जाता है. रेगिस्तान उधर जैसलमेर साईड. इधर रेगिस्तान नहीं.' - इति हॉटेल मालक. मग कुठून आलाय, कुठे निघालाय वगैरे चौकश्या झाल्या. पुण्याहून लडाखला कारने निघालोय हे ऐकून त्याने कौतुक केले. हॉटेल मालकाचा निरोप घेऊन प्रवास सुरु केला आणि उदयपूर गाठले. शामलजी ते उदयपूर ह्या प्रवासासाठी तब्बल साडेतीन तास घेतले होते आम्ही. वास्तविक हे अंतर विनाथांबा गेले तर जेमतेम २ तासात पार होऊ शकते. काल रात्री उदयपूरला न येता शामलजी मध्ये राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला होता. नाहीतर हे सर्व निसर्गसौंदर्य रात्रीच्या अंधारात दिसलेच नसते.

उदयपूर जवळ आम्ही चुकीचा बायपास घेतला. फक्त २ लेनचा आणि ट्रकची प्रचंड वाहतूक असलेला हा रस्ता पार करण्यात अर्धा तास गेला. त्या रस्त्याने सुखेरला आलो. सुखेर, नाथद्वारा, राजसमंद पटापट ओलांडले. नाथद्वाराच्या पुढे मशिनरी वाहून नेणारे ट्रक जाऊन त्याजागी प्रचंड मोठे संगमरवरी दगड खाणीतून घेऊन जाणारे ट्रक दिसू लागले.

संगमरवरी दगड घेऊन जाणारा ट्रक

ह्या ट्रकच्या चालकाशी दोन शब्द बोललो. 'ह्या भागात संगमरवराच्या खाणी आहेत. हा दगड किशनगडला कारखान्यात पाठवला जातो. तिथे त्यापासून फारशी बनवतात' अशी माहिती ट्रक चालकाने दिली. प्रवास पुढे चालू. उदयपूरच्या पुढे हिरवळ कमी झाली होती, रखरखाट जाणवत होता आणि प्रचंड ऊन होते. राजसमंदच्या पुढे एका पूर्णपणे बांबूपासून बनवलेल्या धाब्यावर जेवणासाठी थांबलो. दुपारची जेवणाची वेळ असून देखील ढाब्यावर अजिबात गर्दी न्हवती आणि आम्ही एकमेव ग्राहक होतो. त्यामुळे ढाबा चांगला नसेल अशी शंका आली. पण नंतर जे चवदार जेवण समोर आले त्यावरून ती खोटी ठरली. जेवण आणून देणाऱ्या मुलाला आम्ही जेवण चांगले होते असे सांगितले. तो खूप खुश झाला. 'हमारा कूक है ही बढिया.' असे म्हणून त्याने जेवणानंतर बिलाबरोबर बडीशेपच्या ऐवजी जी चोकोलेट्स आणली होती ती सगळी जबरदस्ती मुलाच्या खिशात कोंबली. ह्या भागात पाण्याची वगैरे परिस्थिती कशी असते असे विचारल्यावर 'हम बहुत सोच समझकर इस्तेमाल करते है. इसलिये कभी कम नहीं पडता'असे म्हणाला. जेवण आटोपून पुढे निघालो. भीम नामक गाव आले. इथे जत्रा भरली होती आणि त्यासाठी निम्मा हायवेच वाहतुकीला बंद करून टाकला होता. कसलेतरी झेंडे घेऊन लोक नाचत होते. अरुंद रस्त्यावरून प्रचंड वाहतूक चालू असल्याने इथे थोडा वेळ वाया गेला. भीम मधून बाहेर आलो आणि लगेच अजमेर, जयपूरला उजवीकडे वळा असे दर्शवणारा बोर्ड दिसला. पण गूगल मॅप मात्र सरळ जा असे दर्शवत होते. आम्ही उजवीकडचा रस्ता घेतला तर 'Take a U -Turn' असे प्रेमळ आवाजात गूगल मॅप मधली महिला बजावू लागली. आता कुणाचे खरे समजावे हा प्रश्न होता. मग तिथल्या एका हॉटेल मालकाकडे चौकशी केली. जुन्या हायवेवर खूप गर्दी असते. हा नवीन हायवे (NH -१४८ D) आहे. ह्यावरून गेल्यास ब्यावर आणि अजमेर वाटेत लागत नाही. आणि सरळ किशनगडला जात येते अशी माहिती हॉटेलमालकाने दिली. मग गूगल मॅप्सला बंद केले आणि NH -१४८ D वरून निघालो.

NH -१४८ D

जवळपास ७० किमीचा हा दुपदरी रस्ता कल्पना करता येणार नाही इतका गुळगुळीत होता. वाटेत फारशी लोकवस्ती नाही आणि वाहतूक देखील नगण्य. अंदाजे ७० किमी जाऊन लांबा गावाजवळ किशनगडला जाण्यासाठी डावीकडे वळलो. ४:१५ च्या दरम्यान किशनगड ओलांडले. दुदू जाऊन पिंक सिटी जयपूर आले. पिंक सिटीला बायपासनेच बाय बाय केले तेव्हा ६ वाजून गेले होते. चांदवाजीच्या थोडे अगोदर एक वालुकामय टेकडी दिसली. तिथे जवळ जाऊन बघितले तर ती एकदम मऊ अशी वेगळ्याच प्रकारची माती होती. वाळू वाटत न्हवती. आमच्या प्लॅन प्रमाणे आज आम्ही चांदवाजीमध्ये राहणार होतो. पण आज आपण अजून थोडे अंतर जाऊ शकतो असा विचार करून पुढे जाऊ आणि शाहपुरा मध्ये मुक्काम करू असे ठरवले. शाहपुरा येताच महामार्गावरून शहरात शिरलो. तिथल्या एका काकांना विचारले तर त्यांना लॉजची काहीच माहिती नव्हती. ते मला तिथल्या एका दुकानदाराकडे घेऊन गेले.
'गांव में कुछ लॉज नही है. आप फ़िरसे हायवे पर जाईये. ३ किलोमीटर की बाद मिलन लॉज आयेगा. वो अच्छा है.' - दुकानदार काका
जवळपास ३० हजार लोकसंख्येच्या ह्या शहरात लॉज नाही हे ऐकून नवल वाटले. काकांचे आभार मानून परत महामार्गावर आलो. ३ किमी झाले, ४ झाले, ५ झाले तरी मिलन लॉज काही दिसलाच नाही. 'कुठे नेऊन ठेवलाय मिलन लॉज ?' असे वाटले. रस्त्याच्या कडेने इतका भयाण अंधार होता की त्यामुळे लॉज येऊन गेलेला आपल्याला दिसलाच नसेल असे वाटून आम्ही निराश झालो. बघू आता पुढे काय मिळतेय का असे ठरवून पुढे निघालो आणि अचानक मिलन लॉज दिसला. काकांनी ३ किमी सांगितले होते पण प्रत्यक्षात ते अंतर जवळपास ८ किमी होते. असो. लॉज ठीक होता. बाहेर व्यवस्थित गवत, झोपाळे, थोडी खेळणी देखील होती. प्रचंड उकाडा असल्याने ए.सी. रूम घेतली. फक्त १२००/- रु. सामान रूमवर टाकून खाली जेवायला गेलो. मेनू कार्ड मध्ये सगळ्या पंजाबी डिश. दाल बाटी सोडून तुमची कुठली स्पेशल डिश आहे का इथली असे विचारल्यावर 'हमारा स्पेशल सिर्फ दाल बाटी. और दाल बाटी तो अब हमारे लोग भी नहीं खाते तो आप क्या खाओगे. सबको पंजाबी ही चाहिये.' असे लॉजच्या मॅनेजरने प्रांजळपणे सांगितले. मग पंजाबी जेवण करून लॉजच्या लॉनवर अर्धा तास फेऱ्या मारल्या. शामलजी ते उदयपूर आरामात प्रवास करून देखील आज ६२० किमी अंतर कापले होते. आता उद्याचे डेस्टिनेशन होते चंदीगड.

प्रतिक्रिया

श्रीधर's picture

25 Nov 2017 - 6:53 pm | श्रीधर

+1

वाचतोय. मस्त चाललाय प्रवास.

छान सुरू आहे प्रवास.

अनन्त्_यात्री's picture

1 Dec 2017 - 2:06 pm | अनन्त्_यात्री

आवडलं.

मराठी कथालेखक's picture

6 Dec 2017 - 5:26 pm | मराठी कथालेखक

एक कुतुहल : मध्येच कृष्णधवल छायाचित्रांचे काय रहस्य आहे ? म्हणजे सहजच केलेत की काही गडबड झाली होती.

अभिजीत अवलिया's picture

6 Dec 2017 - 7:30 pm | अभिजीत अवलिया

काही गडबड नाही. मीच कॅॅमेरा कृृष्णधवल सेटिंंगवर ठेवला होता.

सर्व वाचकांंचे देखील आभार.

केडी's picture

7 Dec 2017 - 1:03 pm | केडी

...आला एकदाचा...पुढचा भाग लवकर टाका...वाचतोय...

यशोधरा's picture

25 Dec 2017 - 8:09 pm | यशोधरा

हाही भाग आवडला.