मराठी दिवस २०२०

पुणे ते लेह (भाग १४ (अंतिम) - दारचा ते मनाली)

Primary tabs

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
27 May 2018 - 4:47 pm

८ सप्टेंबर

होमस्टेच्या खिडकीतून सकाळी दिसणारे दृश्य

होमस्टे

इथली व लडाख भागातील ही खिडक्यांची रचना मला खूप आवडली. लोखंडी ग्रील वगैरे प्रकार नाही. फक्त लाकडी फ्रेम.

ह्या कुटुंबाचा होमस्टे अधिक एक टेन्ट स्टे पण होता. काल रात्रीचा अंत बघणारा प्रवास करून आम्ही इथे पोचलो तेव्हा वाजले होते रात्रीचे ८:१५. पण अगदी घरची माणसे आल्यासारखे ह्या लोकांनी आमचा पाहुणचार केला. पुढच्या अर्ध्या तासात जेवण समोर आले. आणि साडेनऊच्या आधीच आम्ही झोपलो पण होतो. काही वेळापूर्वी जेव्हा आम्ही बारालचा पासवर होतो तेव्हा आज आपल्याला मुक्कामाला लॉज आणि खाण्यासाठी जेवण मिळेल का हा प्रश्न आम्हाला पडला होता.

'हमारा इलाका भी बहुत सुंदर है. आईये इधर एक बार लंबी छुट्टी लेकर' - होमस्टेच्या मालकाने सांगून ठेवले.
नक्कीच येऊ असे सांगून सकाळी ७:४५ ला त्यांचा निरोप घेतला. हे दारचा गाव हिमाचल प्रदेश मधील लाहुल व स्पिती जिल्ह्यात येते. इथून झंस्कार व्हॅलीतील पदूम ह्या ठिकाणापर्यंत पायी ट्रेक देखील करता येतो. बघू कधी जमतेय ते.

इथून मनाली आहे १५० किमी वर आणि वाटेत येतो रोहतांग पास. रोहतांग पास ह्या महामार्गावरील सर्वात कमी उंचीचा पास असला तरी तो सगळ्यात जास्त धोकादायक आहे. एकदा का मनाली गाठले की तिथून पुढे फक्त गाडी पळवणे हेच एक काम होते.

दारचातून बाहेर पडताच पावसाची रिपरिप सुरु झाली.

भागा नदीच्या किनाऱ्याने जाणारा लेह मनाली महामार्ग

उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या आणि त्यातून वाहणाऱ्या नद्या. कमालीचा सुंदर आहे हा भाग.

जिस्पा, क्येलॉंग पार करून रोहतांग पासच्या सुरवातीला ग्राम्फू नामक गावी आलो तेव्हा पावणेदहा झाले होते.
रोहतांग पासची सुरवात

इथून पुढचा ४ किमीचा रस्ता पूर्णपणे नाहीसा झाला होता. फक्त चिखल, चिखल आणि चिखल. अधेमधे पडलेले मोठे दगड. ह्या चिखलातून ट्रकसारखी वाहने जाऊन जाऊन बाजूने खड्डे आणि मध्यभागी उंचवटे तयार झाले होते. इतका चिखल होता की गाडी मनानेच कशीही वाकडीतिकडी जात होती. एक चाक खड्ड्यात आणि दुसरे उंचवट्यावर ठेऊन गाडी चालवायची नेहमीची युक्ती पण कामी आली नाही. गाडी चालवण्याच्या दृष्टीने संपूर्ण ट्रिप मधला हा सर्वात कठीण गेलेला पॅच होता आमच्यासाठी. ह्या ४ किमीच्या भागात खूपच घासली गेली गाडी खालून. पण सुदैवाने कुठल्याही महत्वाच्या भागाला काहीच झाले नाही. ही ४ किमीची प्रवेश परीक्षा पार केल्यावर मात्र अनपेक्षितपणे एकदम चांगला, नव्याने केलेला रोहतांग पास सामोरा आला. कोणत्याही अडचणीशिवाय रोहतांग पासच्या टॉपवर ११:४५ ला पोचलो.
१९९९ साली झालेल्या कारगिलच्या युद्धात पाकिस्तानने श्रीनगर लेह महामार्गाला लक्ष करून कारगिल भागाला उर्वरित देशापासून तोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे लडाखच्या संरक्षणाच्या दृष्टीने मनाली लेह महामार्ग वर्षभर वाहतुकीस उपलब्ध असणे खूप महत्वाचे आहे. सध्या हा महामार्ग जेमतेम ४-५ महिने वाहतुकीला खुला असतो. हा पूर्ण रस्ता वर्षभर वाहतुकीस खुला राहावा ह्या दृष्टीने २०१० साली तत्कालीन केंद्र सरकारने रोहतांग पास साठी एक टनेल बांधायचे काम सुरु केले होते. सध्याच्या रोहतांग पासच्या पश्चिमेला सुरु होऊन ही ८.८ किमी लांबीची टनेल टेलिंग ह्या गावाजवळ सध्याच्या मनाली लेह महामार्गास जाऊन मिळेल. ह्या टनेल मुळे मनाली लेह महामार्गाचे अंतर ५० किमी ने तर प्रवासाचा वेळ जवळपास ४ तासाने कमी होईल. सध्या वर्षाचे ७-८ महिने देशाच्या अन्य भागाशी संपर्क न ठेवता येणाऱ्या हिमाचल प्रदेश मधील लाहुल व स्पिती जिल्ह्याला वर्षभर मनालीशी दळणवळण चालू ठेवता येईल. सध्या ही टनेल बांधून पूर्ण झाली आहे पण व्हेंटिलेशन सिस्टीम पूर्ण न झाल्याने वाहतुकीस अजून खुली केलेली नाही. पण अपवादात्मक स्थितीत जर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण शक्य नसल्यास ऍम्ब्युलन्स सारखी वाहने ह्या टनेल मधून जाऊ दिली जातात. २०१९ साली ही टनेल सर्व प्रकारच्या वाहतुकीस खुली केली जाईल असे समजते.

जवळपास पाऊण तास रोहतांगच्या टॉपवर थांबलो. समोर बर्फाच्छादित शिखरे आणि दुसऱ्या बाजूला मनालीकडे जाणारा वळणावळणाचा उत्तम रस्ता दिसत होता.

इथून पुढे ना बर्फाच्छादित शिखर दिसणार होते ना कुठला 'ला' पार करायचा होता. ह्या आम्हाला दिसलेल्या शेवटच्या 'माने'चे सौंदर्य मनात साठवून ह्या स्वर्गतुल्य भागाचा निरोप घेतला .

समाप्त.

***************************************************************************************
अन्य काही महत्वाची माहिती
१) लडाख भागातील ऑक्सिजनची कमतरता - ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरातील लाल पेशींचे प्रमाण वाढते व रक्त घट्ट होणे हा प्रकार इथे होतो. त्यामुळे विमानाने लेहला येणाऱ्या लोकांनी २ दिवस तरी आराम करून इथल्या विरळ हवेला अड्जस्ट होणे महत्वाचे आहे. तसेच दर तास दोन तासाला एखादा ग्लास पाणी पिण्याने हा त्रास होण्याचे प्रमाण कमी करता येते. पहिले एक दोन दिवस श्वास फुलणे, धाप लागणे हे प्रकार होतात. त्यामुळे शरीराची हालचाल कमीत कमी ठेवावी. सुरवातीचे काही दिवस रक्तदाब देखील वाढतो. त्यामुळे रक्तदाब असणाऱ्या लोकांनी थोडी अधिकची काळजी घ्यावी.

२) लहान मुलांना बरोबर घेऊन या ट्रिप वर जाणे योग्य आहे का? - नक्कीच. लहान मुलांना इकडे आणण्यात कोणतीच समस्या नाही. जितके वय जास्त तितके ह्या भागात अड्जस्ट होण्यासाठी लागणारा वेळ जास्त. जर कोणताही शारीरिक त्रास नसेल तर वय वर्षे ४ च्या पुढची मुले इथल्या वातावरणात प्रौढांपेक्षा जलदरीत्या अड्जस्ट होतात. मुलांना जास्त नाजुकपणाची सवय लावू नये हे माझे वैयक्तिक मत आहे. जेव्हा आमच्या ह्या ट्रिपचा प्लॅन ठरला होता तेव्हा लहान मुलाला घेऊन ह्या भागात जाणे हा एक मूर्खपणा आहे असे बऱ्याच जणांनी सांगितले होते. (त्यांच्यापैकी कुणीही लडाख मध्ये कधी आले न्हवते हे वेगळेच). हा पुणे - लडाख - पुणे हा ६५०० किमीचा संपूर्ण प्रवास कोणत्याही त्रासाशिवाय अगदी आनंदाने आमच्या मुलाने पूर्ण केला.

३) खारदूंग ला, चांग ला, बारालचा ला ही जवळपास वर्षभर हिमवृष्टी होणारी ठिकाणे आहेत. त्यामुळे स्नो गॉगल न विसरता जवळ ठेवावा. इथल्या अति थंड हवामानाचा आणि वाऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी पुरेसे गरम कपडे, सॉक्स, हॅन्डग्लोव्ज, सन स्क्रीन लोशन जवळ ठेवावे. येण्यापूर्वी शक्यतो TT चे इंजेक्शन घ्यावे.

४) कमी वातावरणीय दबाव आणि ह्युमिडिटी - कमी वातावरणीय दबावामुळे स्नायू थोडेसे कमजोर होतात. वातावरण ड्राय असल्याने नाक फुटणे हा प्रकार होणे कॉमन आहे. व्हॅसेलीन जेली वगैरे सोबत बाळगल्यास उत्तम.

५) खाणे पिणे - घन आहारापेक्षा फळांचे ज्यूस, गरम पाणी, चहा, कॉफी वगैरे जास्त पोटात जाणे योग्य. त्यामुळे शरीराचे डिहायड्रेशन होणे टळते. शरीराचे जलद डिहायड्रेशन करणाऱ्या दारू/बिअर सारख्या गोष्टी आणि धूम्रपान ह्या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात.

६) अति उंचीवरच्या ठिकाणी मुक्काम करणे टाळावे किंवा जास्त वेळ थांबू देखील नये.

७) जिथे कुठे पेट्रोल पंप असेल तिथे गाडीत पेट्रोल/डिझेल भरून घ्यावे आणि दुर्गम भाग असल्याने जिथे कुठे खायला प्यायला मिळेल तिथे खाऊन पिऊन घ्यावे.

८) B.S.N.L. चे पोस्टपेड सिम कार्ड असावेच. इथल्या बहुतांशी भागात कुठल्याच कंपनीची सेवा नाही तरी पण जर चुकून रेंज मिळाली तर ती B.S.N.L. चीच. मोबाईलसाठी कार चार्जर जवळ ठेवावा.

९) लेह वरून मनाली स्वत:च्या गाडीने यायचे असल्यास काहीच कागदपत्रे लागत नाहीत. पण मनाली वरून लेहला जायचे असल्यास रोहतांग पास पार करण्याचे परमिट घ्यावे लागते. परमिट साठी इथे आवेदन करता येईल.
http://admis.hp.nic.in/ngtkullu/BeyondRohtang/InformatoryScreen

हे आवेदन रोहतांग पास पार करायच्या ६ दिवस अगोदर करता येते. त्यातही दर मंगळवार हा रोहतांग पासच्या दुरुस्तीचा वार असल्याने मंगळवारचे परमिट मिळत नाही व वाहनांची ये जा पूर्णपणे बंद असते.

१०) अतिशय खराब रस्ते असल्याने (मुख्यत्वे जून जुलै हे दोन महिने रस्त्यांची दुरुस्ती चालू असते) गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. पण केवळ ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे म्हणून अति आत्मविश्वास/घाई धोक्यात घालू शकते. ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये रस्ते सर्वात योग्य स्थितीत असतात. काळजी घेऊन आणि संयम बाळगून गाडी चालवल्यास कठीण असे काहीच नाही.

ह्यातली काही माहिती मला ज्यांनी दिली त्यांचे आभार. ते ज्या क्षेत्रात काम करतात तिथल्या नियमानुसार ओळख सार्वजनिक करणे योग्य नसल्याने त्यांच्या सुचनेनुसार त्यांचे नाव लिहीत नाही.

प्रतिक्रिया

कुठेही फाफटपसारा नाही, पण सर्व प्रकारची माहिती, नेमके वर्णन, अत्यंत सुंदर छायाचित्रे, तीही फार नाहीत. पण तोकडीही नाहीत. तब्येतीनं एखाद्या मैफिलीचा आस्वाद घेत राहावा तसं ही लेखमाला वाचताना वाटत असे. अतिशय छान. देखणी. उपयुक्त. सगळंच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2018 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

अतिशय वाचनिय, प्रेक्षणिय आणि संग्रहणिय लेखमाला... वाखु साठवली आहे. धन्यवाद !

प्रचेतस's picture

28 May 2018 - 6:58 pm | प्रचेतस

अगदी सहमत.
ह्या मालिकेने एक परिपूर्ण वाचनानंद दिला.

पद्मावति's picture

27 May 2018 - 9:19 pm | पद्मावति

अतिशय सुंदर लेखमाला. खुप आवडली.

दुर्गविहारी's picture

27 May 2018 - 9:25 pm | दुर्गविहारी

अतिशय मस्त लेखमाला आणि खुपच महत्त्वाच्या टिप्स शेवटी दिल्या. माझा मित्र तिकडे जाणार आहे, त्याला हि पुर्ण लेखमाला फॉरवर्ड केली आहे. उपयोगी लेखनाबद्दल धन्यवाद.

यशोधरा's picture

27 May 2018 - 11:18 pm | यशोधरा

अतिशय सुरेख लेखमाला
भन्नाट आवडली. फोटोही.

यशोधरा's picture

27 May 2018 - 11:18 pm | यशोधरा

अतिशय सुरेख लेखमाला
भन्नाट आवडली. फोटोही.

स्रुजा's picture

28 May 2018 - 12:42 am | स्रुजा

फार छान झाली लेखमाला. इथे जायचं फार मनात आहे आणि मुलाला घेऊन गेलात हे वाचून फार बरं वाटलं. बघू आता कधी योग येतो .

राघवेंद्र's picture

28 May 2018 - 2:57 am | राघवेंद्र

छान झाली लेखमाला. पु. ले. प्र.

भटक्य आणि उनाड's picture

28 May 2018 - 11:26 am | भटक्य आणि उनाड

अत्यंत सुंदर छायाचित्रे..

अनिंद्य's picture

28 May 2018 - 11:43 am | अनिंद्य

@ अभिजीत अवलिया,

ही लेखमाला आवडीने वाचली. फार सुखासीन असल्यामुळे स्वतः कधी एवढे खटाटोप करीन असे वाटत नाही पण तुमचे फार कौतुक वाटते :-)

तुम्हाला असेच अनेक रोमहर्षक प्रवासयोग येवोत ही शुभेच्छा.

पु ले शु,

अनिंद्य

स्नेहांकिता's picture

28 May 2018 - 12:44 pm | स्नेहांकिता

आणि सुंदर फोटो. लेहला कधी जायचे झाले तर ही मालिका नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

चार चार नव्वद's picture

28 May 2018 - 2:22 pm | चार चार नव्वद

संपूर्ण लेखमालिका आवडली. फोटो पण छान आहेत. तुमच्याबरोबर प्रवास केल्यासारखं वाटलं. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

विशुमित's picture

28 May 2018 - 2:47 pm | विशुमित

अभिजित जी,
खूप छान, सरळ, सुंदर आणि माहितीपूर्ण लेखमाला. हा भाग पालथा घातला असल्याकारणाने खूप रिलेट केले.
====
लेह कडून मनालीला जाताना रोहतांगचा घाट चालू होण्यापूर्वी एकदम सपाटीवर "कोकसर" हे नितांत सुंदर गाव मला अजून आठवते. हे गाव चारी बाजूने मटारची शेती आणि प्रचंड धबधब्यांनी वेढले आहे.
नदीकाठच्या सपाट जागेवर तेथील स्थानिक मुलांबरोबर एक क्रिकेटची म्याच देखील खेळलो होतो.

अभिजीत अवलिया's picture

29 May 2018 - 10:09 pm | अभिजीत अवलिया

सर्वांचे मन:पूर्वक आभार.

@अनिंद्यजी,
बरेच रोमहर्षक प्रवास करण्याची इच्छा आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला कधी तरी जायला मिळावे अशी खूप इच्छा आहे. जर कधी गेलो आणि सहीसलामत परत आलो तर त्याबद्दल लिहीनच.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला कधी तरी जायला मिळावे अशी खूप इच्छा आहे.

- तथास्तु !

मराठी कथालेखक's picture

30 May 2018 - 7:41 pm | मराठी कथालेखक

जमल्यास परतीच्या प्रवासाचे वर्णनही लिहा

श्रीधर's picture

12 Jun 2018 - 7:36 pm | श्रीधर

सुंदर फोटो, फार छान झाली लेखमाला.
इथे जायचं फार मनात आहे बघू आता कधी योग येतो ते
लेहला जाण्यासाठी ही मालिका नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

शलभ's picture

12 Jun 2018 - 11:52 pm | शलभ

सुंदर लेखमाला.