साहित्य
अर्धा किलो खेकडे/चिंबोर्या/कुरल्या, साफ करून
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ मध्यम कांदा उभा चिरून
१ तमालपत्र
१ तुकडा दालचिनी
२ ते ३ हिरवे वेलदोडे
१ बडी इलायची
२ चमचे धने
१ चमचा शहाजिरे
२ ते ३ लवंगा
१० ते १२ काळेमिरे
१ मूठ किसलेले ओले खोबरे
२ चमचे पंढरपूरी डाळं
२ चमचे आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हळद
१ लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
मीठ चवीनुसार
२ ते ३ मोठे चमचे तेल
चिरलेली कोथिंबीर
कृती
हि कृती माझ्या आईची. अगदी लहानपणा पासून ह्या अश्या खेकड्याच्या मसाल्यावर ताव मारत आलोय. यंदा सुद्धा पाककृती केली तिनेच आहे, मी फक्त प्लेटिंग आणि फोटो काढलाय. मी अकरावीत असताना वडिलांचा अपघातामुळे हाथ फ्रॅक्चर झालेला, तेव्हा त्यांना, खेकडे खा, असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला. मूळचे खवय्ये असलेले वडील आणि सुग्रण असलेली आई, त्यामुळे मग अगदी दर २ दिवसा आड घरी जेवायला खेकडे आणि हे असं मसालेदार कालवण! पण हे प्रकरण इथेच थांबला नाही, ऐन बारावीच्या परीक्षेच्या ४ महिने आधी, अस्मादिक स्वतः सायकल वरून पडले, आणि हाथ मोडून घेतला! मग काय, पुन्हा खेकडे पुराण सुरु! शेवटी शेवटी तर अगदी नकोसे झालेले नंतर कित्येक दिवस खेकडे!
खेकडे साफ करून त्यांना हळद आणि तिखट लावून ठेवा. एका पॅन मध्ये १ चमचा तेल सोडून त्यात आधी उभा चिरलेला कांदा छान लालसर परतून घ्या. ह्यातच किसलेले ओले खोबरे आणि पंढरपुरी डाळं घालून ते देखील कांद्या सोबत छान खरपूस भाजून घ्या. (पंढरपुरी डाळं वापरल्याने रस्श्याला एक दाट पणा येईल, ते नसल्यास १ चमचा तांदळाची पिठी पाण्यात घोळवून वापरली तरी चालेल). हे गार झाल्यावर मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घ्या. (वाटल्यास थोडा पाणी घालून).
ह्याच पॅन मध्ये सगळे खडे मसाले भाजून, मग त्याची मिक्सर मधून पावडर करून घ्या (अश्या ताज्या गरम मसाल्याचा वास, आणि त्याने पदार्थाला येणारी चव हि काही वेगळीच असते!).
पॅन मध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. ह्यात आता आलं लसूण मिरची पेस्ट घालून अजून थोडा वेळ परतून घ्या. ह्यात खेकडे घालून ते कांद्या सोबत परतून घ्या. आपण बारीक वाटलेली कांद्या खोबऱ्याची पेस्ट ह्यात घालून, थोडं पाणी घालून, मंद आचेवर, झाकण ठेवून, खेकडे शिजू द्या (साधारण १०-१५ मिनिटे). शेवटी गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ आणि चिंचा कोळ घालून अजून एक वाफ द्या. रश्याला दाटपणा जसा हवा असेल त्यानुसार पाणी कमी जास्त करा. वरून चिरलेली कोथिंबीर घाला.
हा असा मसालेदार रस्सा मऊ भात सोबत खायला घ्या!
[खेकड्याच्या रस्सा आदल्या दिवशी करून फ्रिज मध्ये ठेवावा, दुसऱ्या दिवशी खायला घ्यावा. त्याने खेकड्याची चव अतिशय सुंदर उतरते रश्यात!]
प्रतिक्रिया
28 Apr 2017 - 11:44 am | संजय पाटिल
जबरदस्त पाक्रु. आणि फोटो..
फोटो पाहुन तोंपासू...
28 Apr 2017 - 12:01 pm | सूड
आकाराने मोठी असते ती चिंबोरी आणि लहान असतात त्या कुरल्या. बाकी चालू द्या.
28 Apr 2017 - 1:09 pm | केडी
बरोबर, पण मग आकारामुळे पाककृतीत काही बद्दल असतो का? माझ्या माहिती प्रमाणे नाही.
28 Apr 2017 - 2:01 pm | सूड
ओके, शुभेच्छा!!
28 Apr 2017 - 2:13 pm | केडी
धन्यवाद!
4 May 2017 - 3:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तर खूप आवडलं. :)
-दिलीप बिरुटे
28 Apr 2017 - 12:24 pm | इरसाल कार्टं
झकास
28 Apr 2017 - 1:13 pm | एस
अत्यंत आवडता प्रकार!
28 Apr 2017 - 1:43 pm | वरुण मोहिते
खेकडे हा प्रकारच माझा वीक पॉईंट आहे:))आठवड्यातून एकदा खाल्ला नाही कि चुकल्यासारखं वाटतं .
पाकृ आणि फोटो आवडले .
28 Apr 2017 - 2:01 pm | अभय म्हात्रे
फिमेल = कुरल्या/कुरलि.
मेल = चिंबोडा .
28 Apr 2017 - 2:23 pm | केडी
बरं....थोडक्यात आता ह्या बद्दल स्वतंत्र लिहावे लागेल असे दिसते.... बोली भाषेत खेकडा/चिंबोर्या/कुरल्या ते अगदी अलास्कान क्रॅब किंवा ब्लू/रेड किंग क्रॅब ते डुंजेन्स क्रॅब पर्येंत. .....
असो, करू हा प्रपंच कधीतरी.....
:-))
28 Apr 2017 - 9:08 pm | सुमो
म्हणूया का ? मग ते नर ,मादी ,किंवा बच्चू खेकड्याचं का असेना !
फर्मास रेशीपी आहे असं म्हणतो
आणि या ठिकाणी गरमा गरम भात, कालवण,करलीची तुकडी आणि सोलकढी असं जेवण असेल तर .. आनंद परमानंद ब्रम्हानंद !
28 Apr 2017 - 9:35 pm | केडी
अगदी! काय सपाटून भूक लागली हे वाचून! दर्दी, अगदी दर्दी!
28 Apr 2017 - 10:31 pm | चतुरंग
कोणत्याही क्षणी तो खेकडा स्वतःच भात आणि रस्सा कालवून रपारप ओर्पायला लागेल असलं भन्नाट आलंय चित्र! :)
मी सामिष खात नसलो तरी आवडले..
(कर्क)रंग
2 May 2017 - 3:20 pm | केडी
हाहाहा... कल्पना भारी आहे ... :-)
28 Apr 2017 - 11:59 pm | आषाढ_दर्द_गाणे
सुंदर फोटो!
खेकड्यांचा हाडाच्या वाढीत उपयोग होतो हे माहीत नव्हते.
पाकृपासून प्रेरणा घेऊन पुढच्या आठवड्यात खेकडे नक्की बनवणार आहे!
एक प्रश्न - डाळं ऐवजी काय घालता येईल?
29 Apr 2017 - 6:13 am | केडी
डाळं, हे रश्याला दाटपणा आणण्यासाठी...त्या ऐवजी बरेचदा तांदळाचे पीठ पाण्यात घोळवून मग रश्याला लावले तरी तो दाटपणा येतो.
29 Apr 2017 - 1:25 am | अभ्या..
भाताचा नगारा वाजवायलाय खेकड़ा.
29 Apr 2017 - 1:53 am | स्रुजा
किती सुंदर फोटो आलाय ! मी आपला नुसताच रस्सा करेन. खातात कसा म्हणे हा खेकडा? अवघड असेल ना?
29 Apr 2017 - 2:45 am | पिलीयन रायडर
मी सुद्धा किती तरी वेळ हाच विचार केला. खेकडा कसा खात असतील?
रंग कातीलच आलाय! आपण बटाटे सोडुन खावं!
30 Apr 2017 - 9:55 pm | गोपिनाथ राजाराम काले
आमच्या गोव्यात ही कुर्ल्याचे कालवण, खेडेगावात मस्त बनवतात.मस्त रेसिपी.
2 May 2017 - 2:11 am | विशाखा राऊत
खेकडे, कुर्ली, चिंबोरी काय म्हणायचे ते म्हणा.. चव एक नंबर असते.. फोटो एकदम वाह वाह आला आहे
2 May 2017 - 6:03 am | केडी
धन्यवाद!
_/\_
2 May 2017 - 11:33 pm | निशाचर
फक्त सावकाश जेवण्यासाठी वेळ हवा! पावसाळ्यात थोडेच दिवस मिळणारे मुठे आठवले... खूप वर्षं झाली खाऊन.
3 May 2017 - 10:50 am | केडी
काय आठवण काढलीत हो... अगदी..
3 May 2017 - 11:40 am | वरुण मोहिते
जबरदस्त आठवण
4 May 2017 - 2:36 pm | पियुशा
कहर आहे हे !!!
4 May 2017 - 3:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नंबर एक पाकृ आणि फोटो.
-दिलीप बिरुटे
4 May 2017 - 3:19 pm | गवि
"खेकडा साफ करुन" म्हणजे काय?
खेकड्याची चव लै भारी असते हे मान्य. पण ताटात वाढताना होणारा टण्ण आवाज आणि हॉटेलात तो खाण्यासाठी दिलेली उपकरणं (पक्कड , टोचा, कवचाच्या आतून मांस कुरतडून काढण्याची शस्त्रे वगैरे ) पाहून एकंदरीत ते खायला नकोच वाटतं.
म्हणजे कडाक्कड तोडफोड, टोकरणे वगैरे करुन त्या मानाने कणभर मांस मिळतं म्हणून उत्साह जातो.
4 May 2017 - 5:26 pm | सूड
ही पद्धत हिंस्त्र वाटू शकते. तळहाताएवढे "काळ्या पाठीचे"* खेकडे बघून घ्यायचे. मोठ्या नांग्या (यात खाण्यालायक गर असतो) कोळणीकडून मोडून घ्यायच्या, अन्यथा आपल्याने ते होत नाही. घरी आणल्यानंतर एकेक खेकडा थैलीतून बाहेर काढून पाठ जमिनीकडे आणि पोट आपल्याकडे होईल असा धरुन डाव्या हातात डाव्या बाजूच्या नांग्या घट्ट धरायच्या (हे करताना खेकडे थोडं टोचतात, पण त्याने इजा होत नाही) आणि उजव्या हाताने एकेक करुन नांग्या मोडून ताटात काढायच्या, डाव्या बाजूच्या नांग्या मोडायला तीच कृती. आता मोडलेल्यातलीच एक नांगी उचलून खेकड्याच्या पोटावर एक उलट्या व्ही शेप मध्ये पाठ-पोट जोडणारा भाग असतो, तो त्या नांगीने उचकटुन टाकावा. जागुतैच्या या धाग्यातले चित्र क्रमांक १ बघणे डावीकड्ल्या खेकड्यावर गुलबट आणि उजवीकडल्यावर दिसणारा काळसर भाग काढायचा आहे. आता खेकडा या धाग्यातल्या चित्र क्रमांक २ प्रमाणे दिसेल. आता पाठीचा भाग एका हातात आणि पोटाचा एका हातात पकडून जरा जोर लावावा. दोन्ही भाग विलग होऊन खेकडा चित्र क्रमांक ९ प्रमाणे दिसेल. आता खेकड्याच्या पोटातली लाख तुम्ही भरले खेकडे करत असाल तर डाळीच्या पीठात कालवायला बाजूला काढून घ्यायची.
बाजूला काढलेले मोठे आणि लहान नांगे पाण्यात स्वच्छ धुवून शेवाळं वैगरे काढून टाकायचं. मोठे नांगे सरळ कालवणात घालायचे आणि लहान नांगे पाट्यावर वाटून त्याचं पाणी वेळून घ्यायचं आणि ते कालवणात घालायचं.
*खेकडे काळ्या पाठीचे'च' घ्यायचे. एरवी बाजारात दिसणार्या इतर खेकड्यांना शिजवल्यावर ओषट वास येतो.
5 May 2017 - 1:00 pm | गवि
धन्यवाद सूड.
पण म्हणजे अगदी शिजवतानाही ते खेकडे जिवंत असतात का?
त्यांना शिजवण्यापूर्वी मारत नाहीत का?
5 May 2017 - 2:29 pm | सूड
वरच्या प्रतिसाद म्हटलेल्या चित्र क्रमांक ९ च्या स्टेपला खेकडा मेलेला असतो.
5 May 2017 - 2:33 pm | सूड
म्हणजे या स्टेपला, पाठ-पोट वेगळं झालं की त्यानंतर जीव उरत नाही त्यात. भावूक होऊन अजून पण खेकड्यात जीव आहे का विचार करत बसलात तर मग खेकडा घशाखाली उतरणं अवघड आहे. आणि खेकडा ही हाटेलात खायची गोष्ट नव्हे. घरी ठाण मांडून दिड दोन तास (किमान) सावकाश होऊ द्यावं.
5 May 2017 - 3:32 pm | गवि
मान्य..
5 May 2017 - 3:38 pm | गवि
हॉटेल असो किंवा घर. पण अति फोडाफोडी, उकराउकरी, कुरतडणं नको वाटतं.
खेकड्याचे सगळे खाणेबल पार्ट्स वेगळे काढून "बोनलेस" खेकडा मिळत नाही का?
5 May 2017 - 4:02 pm | अभ्या..
जौद्या गविराज,
आपण खेकडा भजी खाऊ. ;)
5 May 2017 - 4:07 pm | गवि
तूच रे बाबा एक खरा मित्र....
5 May 2017 - 4:32 pm | सूड
सहमत!!
5 May 2017 - 5:00 pm | केडी
मिळतो, काही सी फूड हॉटेलांमध्ये क्रॅब केक किंवा बोनलेस क्रॅब विथ लेमन गार्लिक बटर मिळालं तर अवश्य ट्राय करा. पुण्यात लालन सारंग ह्याच्या मासेमारी हॉटेलात असाच मसालेदार रस्सा मिळतो (बोनलेस क्रॅब मुंबई मसाला). चव छान आहे त्याची, आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बोनलेस त्यामुळे त्रास नाही.
5 May 2017 - 5:48 pm | गवि
धन्यवाद...
4 May 2017 - 5:40 pm | केडी
सूड ह्यांनी परफेक्ट लिहिलंय. हे असले उपद्व्याप पूर्वी आई करायची, स्वारगेट बस स्टॅन्ड बाहेर खेकडे मिळायचे, जिवंत, ते घरी आणून मग ते साफ करणे हा एक मोठा व्याप असायचा. खेकडे नीट झाकून ठेवली नाहीत तर एखादा स्वैपाकघरात ओट्यावर फिरायचा, हे अगदी स्पष्ट आठवतंय :-)
सध्या कोळी/कोळीण साफ करून देतो/देते त्यामुळे फार त्रास होत नाही.
अर्थात त्यांनी लिहिलंय त्याप्रमाणे भारतात तरी हीच पद्धत आहे, पाशात्य देशात मात्र ते हुमेन (humane) पद्धतीने म्हणजे आधी खेकडा/लॉबस्टर डीप फ्रिज मध्ये ठेवून गारठवुन टाकतात (त्याने त्याला त्रास कमी होतो). नंतर डोक्यात सूरी ने खुपसून त्याला मारले जाते. असो ....
4 May 2017 - 6:07 pm | वरुण मोहिते
ह्यावरून आठवलं एकदा मी बदलापूर ला होतो . त्यावेळी भरपूर खेकडे पकडायचो आम्ही . कर्जत , बदलापूर , कोकण इत्यादी इत्यादी . तर बदलापूर आणि कर्जत वरून गोणी भरून खेकडे यायचे आम्हाला . त्या काळी.मी छोटा होतो . तर असेच एकदा बदलापूर ला कोणी तरी खेकडे आणून दिले सागाव वरून बारवी डॅम च्या पुढे . आणि घरच्यांनी ती गोणी उशीर झाला म्हणून तशीच ठेवली . रात्री कुठल्यातरी खेकड्याची नांगी लागली गोणीला.गोण फाटली आणि घरभर खेकडे फिरू लागले . नशिबाने कोणाला तरी जाग आली..मग आमच्या १०-१५ कुटुंबातील लोकांची अक्खी रात्र खेकडे पकडण्यात गेली .
4 May 2017 - 6:12 pm | सूड
आयला बदलापूरला कुठे म्हणे?
5 May 2017 - 7:13 am | केडी
हाहाहा..... गोणीभर खेकडे रात्री घरभर फिरतायत हे चित्र डोळ्यापुढे आलं.....
4 May 2017 - 6:20 pm | वरुण मोहिते
अश्या अनेक ठिकाणी बदलापुरात सुट्ट्या गेल्यात आमच्या .
सदर किसा सागाव चा आहे . किसन शेठ कथोरे ह्यांचं मूळ गाव . बारवी डॅम च्या पुढे आहे
4 May 2017 - 6:54 pm | सूड
गाववाले की मग तुम्ही!! कधी बदलापूरात येणार असाल तर सांगा, मी पण असेन आलेलो तर भेटता येइल.
5 May 2017 - 9:45 am | आषाढ_दर्द_गाणे
केडी, आपल्या पाकृने प्रेरणा घेऊन मीही कुर्ल्या बनवल्या...
चव अतिशय सुंदर! अनेकानेक धन्यवाद!
लवंग आणि शहाजिरे घातल्याने सुवास दरवळत होता घरभर.
माझे तुम्हाला दोन प्रश्न -
१. तुमचा रस्सा छान लालभडक कसा झाला? माझा कधीच होत नाही.
२. फोटो काढायला खेकड्याचे पाय कसे वळवलेत? :)
बाकी मला लेखातला पहिला फोटो दिसत नाहीये
5 May 2017 - 11:48 am | केडी
क मा ल! सुंदर!
खेकड्याला जे हळद आणि तिखट लावतो, ते तिखट छान रंग देते (काश्मीरी लाल तिखट वापरतो मी)
खेकडे साफ करून घेताना ते पाय आणि नांग्या कोळीण काढून देते, (वर खेकडे साफ कसे करतात तो प्रतिसाद बघा)
तुमचे फोटो पाहून खूप छान वाटलं! आपली पाककृती कोणीतरी कौतुकाने करून बघितली कि खरंच खूप आनंद होतो!
5 May 2017 - 10:04 pm | आषाढ_दर्द_गाणे
अहो मी पाय काढण्याचे नाही, पाय वळवण्याचं विचारत होतो.
असं 'नगारा वाजवण्याच्या' आसनात आणण्यासाठी.
असो. कदाचित भिन्न प्रकारच्या खेकड्यांच्या नांगीच्या सांध्यांची लवचिकता (mobility) वेगवेगळॆ असावी..
बाकी तुम्ही पाकृच अशी टाकलीत की खेकडे खायचा मोह होण्यावाचून गत्यंतर नव्हते.
मग दोन तासावरच्या एका शहरात जाऊन खेकडे आणले आणि केला प्रयत्न.