दामूचं कायतरी बिनसलंय हे तिनं तो संध्याकाळी घरी आला तेंव्हाच ओळखलं होतं. एक दोनदा तिनं तसं विचारायचा प्रयत्नही केला पण दामूने दाद दिली नाही. जेवताना दामूचं लक्ष नव्हतं. आज कित्येक दिवसांनी तो पोरांवर डाफरला ही नव्हता. रात्री विचारू असं म्हणून ती शांतपणे तिची कामं करत होती. अर्थात रात्री दामू तिला विचारायला वेळ कधीच देत नव्हता. अश्या कितीतरी गोष्टही तिने रात्री बोलू,विचारू म्हणून मनातच दाबून ठेवल्या होत्या. रात्री दामू आपला 'कार्यभाग' साधेपर्यंत ती मनातल्या मनातच त्याच्याशी कितीतरी बोलून जायची. तोंड उघडलं तर आवाजाने पोरं उठतील अशी भीती तिला वाटायची. आता खोलीतल्या इतर आवाजाने पोरं उठण्याची शक्यता जास्त असली तरी त्याविषयी बोलायची तिची हिंमत नव्हती. आजही सगळी कामं उरकून ती खोलीत आली. दामू कोपऱ्यात गोधडीवर पडला होता. एका बाजूला पोरांचा गलका सुरु होता. तिने दिवे मालवले. पोरांचा गलका हळूहळू कमी होत गेला. पोरं झोपलेत हे बघून रोजच्याप्रमाणे हळूच ती दामूच्या जवळ सरकली. संपूर्ण क्रियेतील तिचा सहभाग एवढाच असायचा ! पण आजची रात्र काहीतरी वेगळी होती. दामू चक्क तिच्याकडे पाठ करून झोपून गेला. काय झालंय हे तिला कळेना. ती तशीच पडून राहिली. खरंतर तिला थोडा हायसं वाटत होतं. कारण दामू रागात असला त्यारात्री तिची खैर नसायची. दामूचा सगळा राग त्याच्या कृतीत उतरायचा. त्यामुळे तिला दुखापत ठरलेलीच. अर्थात 'आज नको!' असं म्हणण्याची सोयच नव्हती. नको म्हटल्यावर होणाऱ्या दुखापतीपेक्षा ही रोजची दुखापत बरीच सुसह्य होती. शिवाय या दुखापतींपेक्षा कितीतरी तीव्र वेदना तिने भोगल्या होत्या. त्या वेदनांची मलमपट्टी ह्या जन्मात तरी होणे शक्य नव्हते. तश्याच अवस्थेत तिचे विचार सुरु झाले.
जवळपास पंधरा वर्षांपूर्वी अठराव्या वर्षीच तीच लग्न झालं.चार पोरींपैकी एक खपली अश्या सरळसोट हिशोबाने तिचे लग्न लावून देण्यात आले होते. दामू त्यावेळी बांधकामावर मुकादम होता. दामू अत्यंत रागीट स्वभावाचा माणूस. त्याच्या या स्वभावामुळे त्याने कित्येक नोकऱ्या गमावल्या होत्या. गेल्या बारा वर्षात त्याने मुकादम, चपराशी, क्लीनर अश्या कितीतरी नोकऱ्या केल्या होत्या. सध्या तो एका मोठ्या वकिलाच्या गाडीवर ड्रायव्हर होता. दामूने लग्न ही जबाबदारी म्हणून कधीच मानली नाही. त्याचं मन मानेल तसं तो वागायचा. कधी बायकोवर प्रेमाचा वर्षाव तर कधी लाथाबुक्यांचा. कामाखेरीज तिने जास्त बोललेलं त्याला आवडायचं नाही. आणि "कामा"तही तिने काही बोललेलं त्याला खपायचं नाही. कधी कधी ही घुसमट असह्य व्हायची तिला. पण तिचा नाईलाज होता. त्याला कारणही तसंच होतं. "त्या" एका प्रसंगानंतर तिने दामूसामोर सपशेल शरणागती पत्करली होती. तो प्रसंग आठवला की आजही तिच्या अंगावर शहारे यायचे.
"लग्नानंतर वर्षभरातच तिला दिवस गेले. तरी सहाव्या-सातव्या महिन्यापर्यंत दामूची "मागणी" थांबत नव्हती. अर्थात त्यामुळे बाळाला इजा होते का इतपत तिला समज नव्हती पण तिला त्रास व्हायचा म्हणून ती नाही म्हणायची. शेवटी आठव्या महिन्यात डॉक्टरने रागावून ,"आता चार-पाच महिने काहीही नाही" असे बजावल्यावर दामू शांत झाला. तेसुद्धा होणाऱ्या बाळाची काळजी म्हणून नव्हे तर हिला काही झाले तर पुढचं कठीण होईल या विचाराने ! पण एका रात्री काही केल्या दामूला झोप लागेना. शेवटी तो बायकोजवळ गेला आणि तिला खेटु लागला. तिने झोपेतूनच विरोध केल्यावर दामू चरफडत खोलीतून बाहेर निघून गेला. गाढ झोपेत असताना अचानक तिला एक किंचाळी ऐकू आली. स्वतःला सावरत ती खोलीबाहेर आली. तिच्या बाळंतपणात मदत करायला घरी आलेली तिची लहान बहीण समोरच्या खोलीत झोपली होती. दामूने आता तिला धरले होते. ते दृश्य बघून तिला धक्काच बसला.
"काय करताय? सोडा तिला?"
"चाल जाय आतमध्ये. आता न्हाय सोडणार मी इले."
ती जवळ जाऊन त्याला ओढू लागली. दामू थांबायला तयार नव्हता. तिची लहान बहीण भीतीने अर्धमेली झाली होती.
“तू व्हय बाजूला न्हायतर जीव घेईन दोघींचा."
त्याच्या या वाक्याने ती भानावर आली. पोटातल्या बाळाचा विचार करून ती थोडी बाजूला झाली. पण तिच्या विनंत्या सुरूच होत्या.
"अवं ती लहान हाय अजून. सोडा तिले. पाया पडते तुमच्या."
दामू काही ऐकायला तयार नव्हता. त्याचे काम पूर्ण करूनच तो बाजूला झाला."
ती रात्र आठवल्यावर तिच्या अंगावर काटा आला. त्यानंतर कधीही तिने माहेरच्या लोकांना घरी येऊ दिले नाही. किंवा स्वतःही तिकडे राहायला गेली नाही. अर्थात ती घटना तिने माहेरी इतर कोणालाही कळू दिली नव्हती. मधल्या काळातही दामू मध्ये काही सुधारणा नव्हतीच. उलट वेळोवेळी बहिणीच्या बदनामीची धमकी देऊन दामू तिच्याकडून हवं ते करून घेत होता. पोलिसात तक्रार वगैरे पर्याय तिच्यासमोर नव्हता. किंबहुना तो तिच्यासारख्या कोणाजवळही नसतोच. तो प्रसंग आठवून आताशा तिला रडूही येत नव्हते. काही घटना विसरल्या जात नाहीत. उलट प्रत्येक श्वासागणिक त्याची तीव्रता वाढत जाते. कालांतराने श्वास घेण्याइतकीच ती घटना आयुष्याचा भाग बनते. अश्यावेळी श्वास थांबवताही येत नाही आणि घेताही येत नाही. रात्र झाली की तिला भीती वाटायची. भीतीला कारणही तसंच होतं. तिची मोठी मुलगी आता वयात येत होती. काही केल्या, ती दामूच्या नजरेत येऊ नये यासाठी ती धडपड करायची. दामू काही करेलच असे नाही, पण त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. दामू घरी आल्यावर कुठल्या ना कुठल्या कारणाने ती त्याचं लक्ष वेधून घ्यायची. दामूने चिडचिड केली, मारहाण केली तरी कसंही करून रात्रीपर्यंतचा वेळ काढणे एवढंच तिच्या डोक्यात असायचं. त्यामुळेच झोपताना ती दामूला कधीही 'नाही' म्हणत नव्हती.
त्याच विचारात तिला कधी झोप लागली तिला कळलंच नाही. थोड्या वेळाने कसल्याश्या हालचालीने तिला जाग आली.
रात्रीच्या किर्रर्र शांततेत दामूतला "नर" पुन्हा जागा झाला होता !
प्रतिक्रिया
15 Feb 2017 - 4:26 pm | निरु
क्रमशः टाकायाचं राहिलंय का?
15 Feb 2017 - 4:27 pm | चिनार
नाही...
15 Feb 2017 - 4:37 pm | मराठी कथालेखक
अखेर दामूने मुलीला जवळ ओढलेच असं म्हणायचं आहे बहूधा..
15 Feb 2017 - 11:39 pm | एक एकटा एकटाच
असले वासनांध अस्तित्वात आहेत
आणि मुजोर पणे जगतात
हिच समाजाची खरी शोकांतिका आहे
फार चांगल मांडलय
17 Feb 2017 - 8:49 am | ज्योति अळवणी
कथा म्हणून छानच आहे. तुम्ही ती अशा पॉईंट वर नेऊन सोडली आहे की प्रत्येकाने त्याचा विचार करत रहावं. पण अशा दुष्ट नरभक्षक स्वभावाच्या लोकांना खरच कडक शिक्षा झाली पाहिजे असं वाटत
17 Feb 2017 - 9:29 am | चिनार
धन्यवाद !
17 Feb 2017 - 10:14 am | एक एकटा एकटाच
अगदी योग्य बोललात
18 Feb 2017 - 9:41 am | पैसा
असह्य आहे हे!