लॉलीपॉप - २

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
13 Jan 2017 - 9:07 am

लॉलीपॉप - १

दुसऱ्याच दिवशी माझ्या डेस्कवर एक जार स्थानापन्न झाला. रंगीबेरंगी लॉलीपॉपने भरलेला.

त्यानंतरचा पूर्ण आठवडा मी अद्विकाची फाईल पुन्हा पुन्हा वाचली. न जाणो एखादा दुवा निसटला असेल तर तो लक्षात येईल या आशेने.

आदू येणार होती त्यादिवशी मी आठवणीने दुकानातून फुलं आणली. ती आधी बसली होती, त्या खुर्चीतून दिसतील अशा जागी एका कपाटावर फुलदाणीमध्ये ठेवली. यावेळेस मुद्दामचं खिडकीचे पडदे उघडले. कृत्रिम प्रकाश शक्य तेवढा कमी केला. रूममध्ये काय केल्याने एका चार वर्षांच्या मुलीला छान वाटेल तसे बदल केले. बऱ्याच फाईल्स डेस्कवर होत्या त्या आठवणीने बाजूला काढून ठेवल्या. माझ्या सईने काढलेली काही चित्रं भिंतीवर लावली. त्यादिवशी कन्सल्टिंग रूममध्ये मलासुद्धा प्रसन्न वाटलं.

ठरलेल्या वेळेच्या काही मिनिटं आधी आदू आली. पण यावेळेस आत येताना अपर्णाला तिला रागवावं लागलं नाही. बहुदा आदून मागच्यावेळेस आई रागावली होती ते लक्षात ठेवलं होतं. किंवा अपर्णाने तिच्याशी बोलून तिच्या मनाची तयारी करून घेतली असावी. आदू स्वतःहून आत आली आणि आधी बसलेली त्याच जागी बसली. पुन्हा एकदा अपर्णा मी बाहेर आहे असं सांगून वेटींग रूममध्ये जाऊन बसली. यावेळेस मी बराच विचार करून काही बोलायचं नाही असं ठरवलं होतं. फक्त पहायचं काम करणार होते.

रूम आवरण्याचे निमित्त करून मी टेबलवरील काही गोष्टी हलवल्या. मग थोड्या वेळाने खेळण्यांचा एक बॉक्स खाली होता तिथे जाऊन अक्षरश: फतकल मांडून बसले. एक एक खेळणं काढून पाहिलं. अधूनमधून आदूकडे लक्ष गेलं तर ती आजही माझ्याकडे पहात नव्हती. पण भिंतीवरच्या एका चित्राने तिचं लक्ष वेधण्यात यश मिळवलं होतं. डेस्कवरच्या ड्रॉवरमध्ये काही कोरे कागद आणि रंगीत खडू होते ते काढून मी आदूजवळच्या रिकाम्या खुर्चीवर ठेवले. मला वाटलेलं ती चटकन एखादा खडू घेऊन काहीतरी चित्र काढेल. तिने अगदी रेघोट्या ओढल्या असत्या तरी माझी हरकत नव्हती, पण आदूने यातलं काहीही केलं नाही.

तरीही मागच्या आठवड्यापेक्षा, आजचा वेळ बरा गेला. मी स्वतः सतत काहीना काही निमित्त करून काम करत राहिले. आदूशी बोलण्याचं शक्य तेवढं टाळलंच. बरोबर एक तासाने अपर्णाने दरवाजावर नॉक केलं आणि मी खुर्चीतून उठून दार उघडलं.

"बाय आदू!" असं म्हणून तिच्यापुढे लॉलीपॉपचा जार धरला. आदूने त्यातलं एक लॉलीपॉप घेतल आणि काही न बोलता आईबरोबर बाहेर पडली.

पुढच्या आठवड्यासाठी मी विशेष काही तयारी केली नाही. माझी गाडी योग्य मार्गावर आहे याची मला खात्री होती. जाणीवपूर्वक मी रूममधली एकही गोष्ट बदलली नाही. सगळं जिथल्या तिथे ठेवलं. अगदी आदूसाठी काढून ठेवलेले कोरे कागद आणि खडूसुद्धा. आठवणीने नवीन फुलं मात्र आणून ठेवली.

असे अनेक आठवडे आले आणि गेले. बहुतेकवेळा मी बाय याशिवाय इतर काहीच आदूशी बोलत नव्हते. इतक्या दिवसात एकच गोष्ट मला कळली होती ती म्हणजे मला तिच्या भावविश्वात जायचं होतं. तिला माझ्या विश्वात घेऊन येणं सध्या तरी अशक्यप्रायच गोष्ट वाटत होती. पण मला कळत नव्हतं असं काय झालं असेल ज्यानं ही चिमुरडी इतकी शट डाऊन झाली असेल. मला छळणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे, स्पर्श! लहान मुलांचे पापा घेणं, त्यांचे लाड करणं ही तर आपल्या देशात केवढी सामान्य गोष्ट. कित्येकदा तर अनेक लहान मुलांना आजीआजोबा अगदी जबरदस्ती पकडून गालगुच्चा घेतात. पण ती मुलं त्याबद्दल रिऍक्ट होतात. बहुतांश मुलं थोडा वेळ रडतात आणि पुन्हा विसरून जातात. त्यांच्या खेळण्यात गुंग होतात. काही मुलं स्वतःहून परत पापा देतात. माझ्या ओळखीतल्या कित्येक आया कधी कौतुकाने, कधी तक्रार म्हणुन सांगत,

"अगं, मला अजिबात हलतासुद्धा येत नाही राधा झोपली की. पूर्ण लक्ष असतं झोपेत पण. आई दूर गेली की ही उठलीच म्हणून समज."

"माझा आकाश तर झोपतच नाही, माझा हात छातीवर घेऊनच झोपलेला असतो."

"काय सांगू, रात्रभर लाथा मारत असतो, एखादी लाथ हवेत बसली की हा उठलाच पपा पपा म्हणून रडत."

तो आश्वासक स्पर्श हवा असतो मुलांना. मी आहे इथेच असं सांगणारा. मग अद्विका का बरं या सर्वांपेक्षा वेगळं वागत असेल. पण खरंच हे वागणं वेगळं आहे का? तिच्या दृष्टीकोनातून ते नॉर्मलही असेल. पण मग तिच्या आईवडिलांचं म्हणणंही काही चुकीचं नाही. तिला आता हळू हळू इतर मुलांमध्ये मिसळण्याची सवय व्हायला हवी. काही वर्षांत शाळा सुरु होईल. लहान मुलांना जवळ घेणं, त्यांनी आपल्या कुशीत शिरणं ह्यातही एक वेगळाच आनंद असतो. आता अजून एका सेशननंतर कर्णिकसरांशी बोललंच पाहिजे असा विचार करून मी पुन्हा एकदा माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये आदुची वाट पहात बसले.

इतर अनेक सेशनप्रमाणेच त्यादिवशीच सेशनही सुरु झालं. तसं वेगळं काही होत नव्हतंच. विचारांच्या तंद्रीत मी मात्र आज माझा फोन सायलेंट मोडवर ठेवायला विसरले होते. अर्धा एक तास उलटून गेला असेल नसेल तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. घाईघाईने मी माझ्या पर्समधून फोन काढला आणि कट केला. पण त्या काही क्षणात आदूने चक्क माझ्याकडे नजर वर करून पाहिलं होतं. प्रचंड अविश्वास होता तिच्या डोळ्यांत. तिचे डोळे भरून आले. त्यापुढे तिने जे केलं ते पाहून मी स्तब्ध झाले.

*****
क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

13 Jan 2017 - 9:16 am | नावातकायआहे

हा भाग पण मस्त....
पु भा प्र

प्रचेतस's picture

13 Jan 2017 - 9:21 am | प्रचेतस

खूप छान लिहिताय.

गणामास्तर's picture

13 Jan 2017 - 9:36 am | गणामास्तर

हा भाग जरा मोठा असायला हवा होता. वाट पाहतोय पुढच्या भागाची. आंदो :)

चाणक्य's picture

13 Jan 2017 - 10:47 am | चाणक्य

.

चाणक्य's picture

13 Jan 2017 - 10:49 am | चाणक्य

.

ज्योति अळवणी's picture

13 Jan 2017 - 11:31 am | ज्योति अळवणी

सुंदर लिखाण. लवकर पुढचा भाग टाका... आणि भाग थोडा मोठा असला तर बरं होईल

शलभ's picture

13 Jan 2017 - 11:44 am | शलभ

वाचत आहे.

संजय क्षीरसागर's picture

13 Jan 2017 - 11:45 am | संजय क्षीरसागर

अनुभवाशिवाय असं लिहीणं शक्य नाही. त्यात हे निरिक्षण :

तो आश्वासक स्पर्श हवा असतो मुलांना.

एकदम बरोब्बर आहे.

जसजसं मानवी मूल मोठं होतं तसं ते स्पर्शसुखापासून वंचित व्हायला लागतं. एकूण पाच इंद्रिय सुखांपैकी दृक, भोज्य, श्राव्य, आणि काही प्रमाणात गंध अशी उतरंड लागून स्पर्शसुख अगदि न्यूनतम राहातं.

लिहीत राहा.

एस's picture

13 Jan 2017 - 12:37 pm | एस

पुभाप्र.

ओह डॅम इट्ट!!
इतक्या उत्कट क्षणाला तुम्ही क्रमशः टाकलंत!!

ग्रेंजर's picture

13 Jan 2017 - 2:32 pm | ग्रेंजर

+1

सस्नेह's picture

13 Jan 2017 - 1:27 pm | सस्नेह

वाचतेय...

सिरुसेरि's picture

13 Jan 2017 - 2:37 pm | सिरुसेरि

उत्कंठा वाढतेच आहे . पुभाप्र .

कुठ जाणारे कळत नाही. अत्याचार, वाईट स्पर्श वगैरे असु नये त्या बिचारीच्या नशिबात म्हणजे झाल. पुभाप्र.

लॉरी टांगटूंगकर's picture

13 Jan 2017 - 2:48 pm | लॉरी टांगटूंगकर

पुभाप्र

निखिल माने's picture

13 Jan 2017 - 4:34 pm | निखिल माने

प्रत्येक भाग योग्य ठिकाणी संपवताय
छान...............

पंतश्री's picture

13 Jan 2017 - 4:44 pm | पंतश्री

लवकर लवकर....
वाट बघतोय.

पद्मावति's picture

13 Jan 2017 - 6:42 pm | पद्मावति

वाचतेय. पु.भा.प्र.

कौशी's picture

14 Jan 2017 - 4:55 am | कौशी

पु.भा.प्र.

सुधांशुनूलकर's picture

14 Jan 2017 - 11:29 am | सुधांशुनूलकर

कथनाला एका उत्कंठापूर्ण बिंदूला आणून योग्य बिंदूला प्रत्येक भाग थांबवताय. त्यामुळे पुढील भाग वाचायची उत्सुकता वाढते आहे.
पुढचा भागही फार उशीर न करता टाकलाय.
छान लिहिताय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jan 2017 - 11:35 am | ज्ञानोबाचे पैजार

गोष्ट चांगली रंगणार असे दिसते आहे. दुसर्‍याच भागात घट्ट पकड घेतली आहे.
आता भरधाव सुटूदे गाडी..
पुभालटा

पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

14 Jan 2017 - 5:32 pm | प्राची अश्विनी

गोष्ट आवडली.

किसन शिंदे's picture

15 Jan 2017 - 2:53 pm | किसन शिंदे

पुभाप्र

अस्वस्थामा's picture

16 Jan 2017 - 5:22 pm | अस्वस्थामा

पुभाप्र.. पुभाप्र ..

आनंदयात्री's picture

16 Jan 2017 - 10:34 pm | आनंदयात्री

एकदम योग्य ठिकाणी क्रमश: टाकल्याने उत्कंठा वाढलीये. लेखन अतिशय प्रभावी आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

मराठी कथालेखक's picture

18 Jan 2017 - 3:56 pm | मराठी कथालेखक

लॉलीपॉपचा डबा पुन्हा उघडला नाहीत अजून ?

पैसा's picture

18 Jan 2017 - 4:12 pm | पैसा

उत्कंठावर्धक! जरा मोठा भाग हवा होता.