लॉलीपॉप - १

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
12 Jan 2017 - 11:02 am

आज मी थोडी लवकरच क्लिनिकमध्ये पोचले होते. कर्णिक सरांनी नेहमीप्रमाणे सर्वात आधी येऊन क्लिनिक उघडले होते. बाहेर पावसाची संततधार सुरु होती. सगळ्या वातावरणात एक वेगळीच मरगळ होती. माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये जाऊन मी उगीच सर्व वस्तू जिथल्या तिथे आहेत की नाही ते पाहून घेतलं. एकवेळ खुर्चीत बसून बघायचीही इच्छा झाली पण मी तिला आवर घातला. एक काऊन्सलर म्हणून खुर्चीत बसायची, समुपदेशन करायची ही काही माझी पहिली वेळ नाही असं स्वतःला बजावलं. पण एकटीनं कुठलीही केस ऐकायची ही नक्कीच पहिलीच वेळ होती. याआधी प्रत्येक केसमध्ये कर्णिकसर किंवा देसाईसर असायचे सोबत. तसं विशेष कधी बोलावंच लागलं नव्हतं मला स्वतःला. खरंतर सरसुद्धा कमीच बोलायचे, अगदी क्वचित. जास्तीत जास्त वेळ आम्ही सगळे ऐकतच असू. ट्रीटमेंटविषयी जे काही निर्णय होत ते कर्णिकसर किंवा देसाईसर घेत. मला फक्त नंतर प्रश्न विचारत आम्ही ही ट्रीटमेंट का निवडली असेल? तुला काय वाटतं या ट्रीटमेंटचा अपेक्षित उपयोग होईल का? झाला तर का होईल? नाही झाला तर पर्यायी ट्रीटमेंट काय असावी? त्यांच्या बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरे मला देता येत असत. जिथे काही चुकत असेल तिथे सरांनी सांगितलेले मुद्दे मी वेळच्या वेळी लिहून ठेवले होते. वर्षभरात मी पाहिलेल्या, ऐकलेल्या अशा केसेसच्या नोट्स लिहून एक मोठी डायरी आता भरत आली होती. त्यामुळे कर्णिकसरांनी एक केस आता तू स्वतःच हॅन्डल कर असं सांगितलं तेव्हा अजिबात आश्चर्य किंवा दडपण आलं नाही. उलट इट्स अबाउट टाइम असा एक दृढ आत्मविश्वास होता, स्वतःबद्दल, स्वतःच्या ज्ञानाबद्दल.

किचनमधे जाऊन मी स्वतःसाठी एक कप गरम गरम कॉफी बनवून घेतली. आता थोड्याच वेळात माझी पहिली केस येणार होती. तिचे सर्व पेपर्स मी वाचले होते. तिला भेटण्यासाठी खरंतर मीच जास्त उत्सुक होते. तिला बहुदा कल्पनाही नसावी, ती कुठे जाणार आहे, कुणाशी बोलणार आहे याची. कॉफी घेऊन मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले. खिडक्यांचे पडदे उघडावेत का? बरं वाटेल जरा. असं स्वतःशीच म्हणून मी उठून पडदे बाजूला केले. पण बाहेर सूर्य नव्हताच. रिपरिप पाऊस फक्त. पडदे पुन्हा बंद करून मी खुर्चीत बसले. काही क्षणांतच दारावर टक टक झाली. साधारण माझ्याच वयाची एक तरुणी आत आली. पण दाराबाहेरची व्यक्ती, माझा पहिला पेशन्ट आत यायला तयार नसावा. दार तसंच किलकिलं उघडं ठेवत ती तरुणी, तिला आत बोलवत होती.

"ये ना पिलू, हे बघ या मावशीकडे किती खेळणी आहेत! तुला पुस्तक हवंय का? पुस्तक पण आहे."

मी घाईघाईने एका छोट्या बॉक्समधे काही खेळणी होती त्यातलं एक टेडी बेयर काढून त्या तरुणीला दिलं. तिनं बाहेर उभ्या तिच्या चिमुकलीसमोर ते धरलं. चिमुकलीनं ते हातात घेतलं. मला वाटलं दॅट्स इट. पण एकच क्षण, फक्त एकच क्षण तिनं त्याला हातात घेतलं आणि पुढच्याच क्षणी त्याच वेगानं आत फेकलं. टेबलवरच्या माझ्या कॉफी मगकडे चाललेली त्या टेडी बेयरची झेप मी एका हाताने अडवली.

"अद्विका! तू ऐकणार आहेस की नाही माझं? पटकन आत ये. आय डोन्ट वॉन्ट एनी मोर टॅनटृम्स. इनफ."

मी काही म्हणायच्या आत त्या तरुणीनं, एका आईनं तिला योग्य वाटतं होतं ते काम चोख बजावलं होतं. रागावण्याचं!

पण ही मात्रा लागू पडली. खाली मान घालून एक गोड मुलगी आत आली. तिच्या हातात एक छोटीशी बाहुली होती. तिनं मान वर करून आजूबाजूला काय आहे, आपण कुठे आलोत काही पाहिलं नाही. तिच्या आईनं तिला एका खुर्चीत बसवलं आणि स्वतः दुसऱ्या खुर्चीत बसली.

"आय एम रियली सॉरी. तिला घरातून बाहेर काढता काढताच माझ्या नाकी नऊ आले. यायलाच तयार नव्हती... इतका गोंधळ घालते कुठं जायचं म्हणलं की..."

भावनेच्या भरात बहुदा ती अजून भरपूर काही सांगत राहिली असती, पण मी नजरेनंच आता नको अशी खुण केली. तिलाही ते पटलं असावं.

"तुम्हाला कर्णिकसरांनी सर्व कल्पना दिली असेलच. त्यांनी खूप कौतुक केलं तुमचं म्हणून आम्ही तयार झालो. खरतर एवढ्या लहान वयात काय गरज आहे या सर्वाची? आपल्यावेळी कुठे असले नसते लाड केले आपल्या आईवडिलांनी. झालोच की आपण मोठे. काहीतरी थेरं आहेत या नव्या जनरेशनची."

"हे पहा मिसेस.." मी एवढा अभ्यास करूनही अगदी ऐन वेळी नावच विसरले पेशंटच्या आईचं. माझ्या हातातली फाईल उघडून मी, त्यांचं नाव चेक करायच्या आत समोरून उत्तर आलं होत.

"मिसेस. वर्तक. अपर्णा वर्तक. आणि ही अद्विका. आता जानेवारीमध्येच चार पूर्ण झाले. तशी लहानच आहे पण फार नखरे आहेत..."

मी त्यांचं वाक्य मधेच तोडत म्हणलं,

"मिसेस.वर्तक, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. परंतु आपण जे काही अवांतर बोलणं असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील, मला काही प्रश्न असतील तर ते प्लीज आपण सेशननंतर डिस्कस करूयात का? हा वेळ खूपच मोलाचा आहे अद्विकासाठी आणि माझ्यासाठीही. मला तिला जेवढं समजून घेता येईल तेवढं घ्यायचं आहे. तेव्हा प्लीज, तुम्ही बाहेर थांबू शकता."

"हो हो नक्की. काही हरकत नाही. बरोबरच आहे तुमचं. मी आहे बाहेरच."

असं म्हणून अद्विकाची आई उठून बाहेर जाऊ लागली. जाता जाता काहीतरी आठवल्यासारखं करून खुर्चीत बसलेल्या अद्विकाकडे पाहिलं.

"आदू मी बाहेर जातीये. थोडावेळ या मावशीबरोबर खेळ काय! गुड गर्ल!"

अद्विकाने मान वर करून देखील पाहिलं नाही. मला आश्चर्य वाटलं. सहसा या वयातील मुलं अनोळखी जागी इतक्या लवकर सेटल होत नाहीत. त्यांना आई किंवा बाबा हवा असतो जवळ. माझ्या नोट्समध्ये मी ही गोष्ट लिहून ठेवली आणि उठून अद्विकाजवळच्या खुर्चीत बसले.

"हाय अद्विका!"

समोरून काहीही प्रतिसाद आला नाही. ठीक आहे. हे अपेक्षितच आहे. हे तिच्या फाईलमध्ये आहेच लिहलेलं. तरीही मी नेटानं बोलायचा प्रयत्न करत राहिले.

"माझं नाव आहे मानसी. तू मला मानसीमावशी म्हणू शकतेस किंवा मनुमावशी म्हणू शकतेस. तुला आवडत असेल तर मनीमाऊ म्हणलंस तरी चालेल. तुला आवडतं का मनीमाऊ? मला खूप आवडतं. किती क्युट असतं ना, मऊ मऊ."

पण काहीच नाही. अद्विकाने कमीत कमी रागाने तरी माझ्याकडे पहावं असं मला एक क्षण वाटलं. कोण ही बाई, किती बडबड करतेय! असा बराच वेळ गेला. मी वेगवेगळे विषय काढून काही ना काही बोलत राहिले. ती प्रतिसाद देईल या अपेक्षेने. पण तो अक्खा तास तिनं मी त्या रूममध्ये तिच्यासोबत आहे याचीही दखल घेतली नाही. तिच्या बाहुलीबरोबर खेळत राहिली. तिच्या बाहुलीच कौतुक करता करता माझे शब्द संपले. पण नाहीच. अद्विका एका वेगळ्याच जगात होती. तिथे फक्त ती होती आणि तिची बाहुली. त्या एका तासातला एक एक क्षण मला जाणवला. एकदा तर कर्णिकसरांना बोलावून घ्यावं असाही विचार मनात आला. पण मी कटाक्षाने तसं करणं टाळलं. हॅव पेशन्स माय डियर असं कर्णिकसर कुठल्याही अवघड केसच्यावेळी म्हणायचे ते आठवलं आणि परीक्षेचा तास संपायची वाट पाहू लागले.

शेवटी कसाबसा तो एक तास संपल्यावर मी उठून वेटींग रूममध्ये बसलेल्या मिसेस.वर्तकांकडे गेले. त्या बहुदा माझ्याही पेक्षा जास्त अधीर असाव्यात आत काय झालं हे जाणून घ्यायला. मी तिथे जाताच बसलेल्या जागेवरून उठून त्या माझ्याजवळ आल्या.

"काय झालं? बोलली ती? हसली का तरी?"

मला स्वतःलाच खूप निराश, हरल्यासारखं वाटत होतं. पण तरीही स्वतःच्या भावनांना आवर घालून मी त्यांना समजावणीच्या सुरात आत जे झालं ते सांगितलं.

"असं होतं मिसेस.वर्तक. आज पहिलाच दिवस होता. इट विल टेक टाइम. पुढच्या आठवड्यात थोडं लवकर आलात तरी चालेल मला. तिला या जागेत सरावायला मदत होईल."

"डॉकटर मला अपर्णा म्हणलं तरी चालेल. मी पुढच्या आठवड्याची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे. त्याआधी एक दहा पंधरा मिनिटं मी येईन आदूला घेऊन." असं म्हणता म्हणता तिचे डोळे भरून आले. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःला सावरलं. एक टिपीकल आई माझ्यासमोर उभी होती. तिला तिच्या हाडामासांच्या जिवंत बाहुलीला हसताना पहायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं, त्या चिमुकलीची बडबड ऐकायची होती. तिला मिठीत घेऊन झोपवायचं होतं. पण आदू कुणालाही तिला हातदेखील लावून देत नसे. चुकूनही तिला कुणाचा स्पर्श झाला तर आकांडतांडव करत असे. कित्येक दिवस हे वागणं म्हणजे केवळ एक फेज असेल या समजुतीखाली अपर्णा आणि अजय होते. पण एक दिवस तिच्या डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेली असताना तिने तिथे ज्याप्रकारे रडारड केली, ते पाहून त्यांनी अपर्णाला तिला सायकियाट्रिस्टकडे घेऊन जा असं सजेस्ट केलं. एक क्षण मला अपर्णाचं कौतुक वाटलं, आपल्या मुलांना मदतीची गरज आहे हे मान्य करणं खूप अवघड असतं पालकांसाठी.

"सर्व ठीक होईल अपर्णा. काळजी करू नको." नकळतच माझ्या तोंडून दिलासा देणारे शब्द बाहेर पडले. तिलाही ते ऐकून बरं वाटलं असावं, आदूला घेऊन बाहेर जाताना तिनं आठवणीनं पर्समधून लॉलीपॉप काढून तिला दिलं. इतका वेळ आदूच्या हातात विसावलेली बाहुली काही क्षणांसाठी आईच्या हातात गेली.

माझ्या डायरीत मी त्या दिवसातली दुसरी महत्वाची नोंद केली.

लॉलीपॉप.

*****

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

12 Jan 2017 - 11:08 am | गणामास्तर

सकाळ सकाळी असं काही वाचलं कि चांगलं लिहिलंय असे म्हणवत नाही राव.
पु.भा.प्र.

आनन्दा's picture

12 Jan 2017 - 11:23 am | आनन्दा

पु भा प्र. ती मुलगी नंतर नॉर्मल झाली असेल अशी आशा करतो.

संजय क्षीरसागर's picture

12 Jan 2017 - 11:38 am | संजय क्षीरसागर

सायकॉलॉजी म्हटलं की ज्याम उत्सुकता निर्माण होते. त्यात ही चाईल्ड सायकॉलॉजीची केस म्हटल्यावर तर विशेषच!

लवकर लिहाल का पुढचा भाग ?

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2017 - 12:14 pm | टवाळ कार्टा

Jabaradast suruwat

चिनार's picture

12 Jan 2017 - 12:31 pm | चिनार

छान सुरुवात!!
पुभाप्र!!

चिनार's picture

12 Jan 2017 - 12:32 pm | चिनार

छान सुरुवात!!
पुभाप्र!!

चिनार's picture

12 Jan 2017 - 12:32 pm | चिनार

छान सुरुवात!!
पुभाप्र!!

सस्नेह's picture

12 Jan 2017 - 12:46 pm | सस्नेह

रोचक सुरुवात !
पुभाप्र.

पुढच्या भागाची वाट पाहत आहे..

ग्रेंजर's picture

12 Jan 2017 - 1:17 pm | ग्रेंजर

सुरुवात तर भारी झालीये. पु. भा. ल. टा.

सुधांशुनूलकर's picture

12 Jan 2017 - 2:09 pm | सुधांशुनूलकर

चांगल्या सुरुवातीमुळे उत्सुकता वाढली आहे.

किसन शिंदे's picture

12 Jan 2017 - 2:16 pm | किसन शिंदे

त्या छोटूला नेमका काय त्रास होत असावा हे जाणून घेण्यासाठी उत्सुक.

नावातकायआहे's picture

12 Jan 2017 - 2:16 pm | नावातकायआहे

पुभाप्र!!

श्रीगुरुजी's picture

12 Jan 2017 - 2:24 pm | श्रीगुरुजी

छान सुरुवात! उत्सुकता वाढलीये.

रोचक सुरूवात. पुभाप्र.

नीलमोहर's picture

12 Jan 2017 - 2:49 pm | नीलमोहर

मात्र अशा केसेस मागे साधारणपणे जे कारण असू शकतं तसं वाईट काही निघू नये ही मनापासून इच्छा आहे.
लहान मुलांबाबतीत काही वाईटसाईट ऐकायला, वाचायला नको वाटतं.
(सायकॉलॉजिकल/हॉरर वगैरे लिहू लागलीस काय)

स्मिता.'s picture

12 Jan 2017 - 3:56 pm | स्मिता.

अगदी असंच वाटतंय.

हो.. थोडाफार अंदाज तसाच येत आहे.. खास करुन "लॉलीपॉप"मुळे "चॉकलेटवाले गंदे अंकल" आठवले.

लेखनशैली पुन्हा एकदा मस्तच!

खास करुन आता "घेतलं", "असं" असे शब्द योग्य लिहिल्यामुळे वाचायला आणखी छान वाटत आहे :)

मार्मिक गोडसे's picture

13 Jan 2017 - 8:56 pm | मार्मिक गोडसे

थोडाफार अंदाज तसाच येत आहे.. खास करुन "लॉलीपॉप"मुळे "चॉकलेटवाले गंदे अंकल" आठवले.

असं काही तीच्याबाबतीत घडलं असतं तर तीने लॉलीपॉप घेतलाच नसता.

स्वराजित's picture

12 Jan 2017 - 2:53 pm | स्वराजित

छान सुरुवात. वाचायला आवडेल.

स्वराजित's picture

12 Jan 2017 - 2:53 pm | स्वराजित

छान सुरुवात. वाचायला आवडेल.

मराठी कथालेखक's picture

12 Jan 2017 - 4:13 pm | मराठी कथालेखक

लहान मुलांचा लैंगिक छळ हा विषय घेतलेला दिसतोय.

ज्योति अळवणी's picture

12 Jan 2017 - 7:44 pm | ज्योति अळवणी

सुंदर सुरवात. उत्सुकता वाढावी अशी. लवकर पुढचा भाग टाका. वाट पहाते आहे

ज्योति अळवणी's picture

12 Jan 2017 - 7:44 pm | ज्योति अळवणी

सुंदर सुरवात. उत्सुकता वाढावी अशी. लवकर पुढचा भाग टाका. वाट पहाते आहे

ज्योति अळवणी's picture

12 Jan 2017 - 7:44 pm | ज्योति अळवणी

सुंदर सुरवात. उत्सुकता वाढावी अशी. लवकर पुढचा भाग टाका. वाट पहाते आहे

ज्योति अळवणी's picture

12 Jan 2017 - 7:45 pm | ज्योति अळवणी

सुंदर सुरवात. उत्सुकता वाढावी अशी. लवकर पुढचा भाग टाका. वाट पहाते आहे

अंतु बर्वा's picture

12 Jan 2017 - 8:13 pm | अंतु बर्वा

छान सुरुवात.. मनात येतय ते खरं असु नये अशी प्रार्थना!

रातराणी's picture

13 Jan 2017 - 12:04 am | रातराणी

सर्वाना अनेक धन्यवाद. पुढील भाग टाकते आहे लवकरच.

पैसा's picture

18 Jan 2017 - 4:08 pm | पैसा

छान सुरुवात!