श्रीगणेश लेखमाला: फिरत्या चाकावरती..

मोदक's picture
मोदक in लेखमाला
5 Sep 2016 - 1:36 pm

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

सायकलिंग..

१
मी गेल्या दोन वर्षांपासून जसा वेळ मिळेल तशी सायकल चालवत आहे. अनेकदा महाबळेश्वर, कोकण सायकलीने पार केले. लांब अंतरे आणि घाट नेहमीच खुणावत असतात. रोजच्या वेळापत्रकात एक बदल म्हणून सायकलीने कचेरीतही जायला सुरुवात केली. गाडीने होणारा प्रवासाचा वेळ आणि सायकलने लागणारा वेळ यात फार फरक नसल्याचे आश्चर्यकारकरित्या लक्षात आले. गाडीच्या तुलनेत सायकलने लागणारा वेळ अगदी १०-१५ मिनिटे जास्त होता. सायकल घेणे, त्याची निगा राखणे, मोठ्या राइड्स वगैरे प्रकार नियमित सुरू झाले.

सुरुवातीला वाटणारे "६० किमी?? सायकलवर??" असे विचार आता "१५० किमी आहे का? ठीक आहे, एका दिवसात सहज जमेल" येथपर्यंत आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट सायकलिंगमुळे शक्य झाली, ती म्हणजे 'सहनशीलता वाढली..!!' रस्त्यावरून जाताना मोठाल्या गाड्यांनी कट मारून जाणे, दुचाकीवीरांनी उगाचच जवळून जाणे, रस्त्यावर लोकांनी चेष्टा करणे वगैरे गोष्टी सवयीच्या झाल्या. सायकल चालवताना अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये एकदा जोरदार आपटल्यामुळे 'उतारावर वेग नियंत्रणात राहिलाच पाहिजे' याचा नीट धडा मिळाला.

मात्र सगळेच लोक असे नसतात. टळटळीत उन्हात घाट चढताना कोणीतरी हात दाखवून "कीप इट अप..!!!" असे प्रोत्साहन देतात.

२

कुठेतरी थांबून विश्रांती घेताना मुद्दाम गाडी थांबवून "काही हवे आहे का?", "सगळे ठीक आहे का?" अशी चौकशी करतात.
एखादी मदत हवी असल्यास आवर्जून मदत करण्याची तयारी दाखवतात.

आम्हाला सायकलवर बघून लोकांच्या प्रामाणिक पण मजेदार प्रतिक्रिया बघून 'नक्की काय प्रतिक्रिया द्यायची' हे कळायचेच नाही. सायकल चालवताना एखादी गाडी शेजारी येऊन आमच्या गतीने चालायला लागली, की "सायकल चालवल्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतात का..?" येथपासून ते "तुम्ही फक्त सायकल चालवता का? कामधंदा काही करत नाही का..?" असे कोणतेही प्रश्न येऊ शकतात, याचे अनेक मजेदार अनुभव आले.

सायकल राइडमध्ये अनेक मजेदार घटना आजूबाजूला घडत असतात.. त्यातल्या निवडक घटना येथे देत आहे.. तुम्हाला सायकल चालवताना किंवा गाडी चालवताना असे अनुभव आले असल्यास येथे जरूर लिहा. :)

************************************************************

असेच एकदा महाबळेश्वरहून परत येत होतो. पसरणी किंवा कोणताही घाट उतरणे हा कुठल्याही सायकलवीराचा एक आवडीचा प्रकार असतो. कारण एकच.. सगळा उतार असतो आणि भन्नाट वेगाने सायकल पळते.

पाचगणी, पसरणी, वाई सगळा रस्ता व्यवस्थित पार पडला. वाई ते सुरूर फाटा या आमच्या आवडीच्या रूटवर सायकली धावू लागल्या. मी थोडा पुढे होतो.. अचानक मागे मोठमोठ्याने हॉर्न वाजू लागला. बघितले, तर लांबवर एक टँकर होता. मी सायकल शक्य तेवढ्या बाजूला घेतली आणि त्याला जायला थोडी जागा मोकळी केली.

तरी त्याचा हॉर्न थांबेना.

सिंगल रोड असल्याने हॉर्न वाजवत असेल अशा विचाराने मी दुर्लक्ष केले, तरी टँकरचे पँ पँ पँ सुरूच होते. शेवटी मीच सायकल चालवता चालवता मागे वळून 'आता जा की पुढे..' अशा अर्थाचे हातवारे केले.

३

मला ओलांडून तो टँकर पुढे गेला, त्याचा वेग थोडा कमी झाला, त्या टँकरचा क्लीनर डाव्या बाजूने 'खतरोंके खिलाडी'सारखे स्टंट करत चालत्या टँकरमधून बाहेर उलट्या दिशेने लोंबकळला व मला मोऽऽठ्ठ्याने ओरडून विचारले,

"पाणी पायजे का??"

मी अवाक, चकित वगैरे झालो..

त्याला नको नको असा हात केला आणि हसत हसत पुन्हा पॅडल मारायला लागलो.

************************************************************

आमची एक भन्नाट कँपिंग ट्रिप... सगळे सायकलचे आवश्यक गिअर्स घालून तयार झालेलो आम्ही... वेगवेगळ्या सायकलवर लादलेले टेंट, एक दिवस राहण्याचे सामान, वाटेत खादाडी करायला लागेल म्हणून चिक्की, राजगिरा लाडू वगैरे खुराक आणि किरणच्या सायकल कॅरियरवर चक्क एक जिवंत कोंबडा - हो, जिवंत कोंबडा!! - रात्रीच्या जेवणाची सोय!

४
सकाळी आम्ही निघालो. बर्‍यापैकी ऊन असल्याने आरामात मजल दरमजल करत ताम्हिणी घाटाकडे कूच केले. एका ठिकाणी झकास खादाडी केली. पुन्हा सायकलवर प्रवास सुरू केला. वाटेत टाईमपास करत चाललो होतो. एका ठिकाणी त्या बिचार्‍या कोंबड्याला पाणीही पाजले.

थोड्या वेळाने किरण (कोंबड्यासह) पुढे गेला. मी आणि केदार पाणी प्यायला थांबलो होतो, तोच शेजारी पोर्शची चकाचक SUV येऊन थांबली. आम्ही मनातल्या मनात त्या गाडीला दाद दिली. भारी गाडी होती.

ड्रायव्हरशेजारची काच खाली झाली आणि अत्यंत सफाईदार इंग्लिशमधून प्रश्न आला.

"Are you guys doing BRM..?"

मी : No.. no.. we are just out on a ride.

पोर्शवाला : (आश्चर्याने..) In this summer??

मी : Yup.. its fun.

पोर्शवाला : You know guys... I really appreciate you for the passion you have. You are going on cycle in such heat is really commendable.

मी : (आता काय बोलावे या विचारात..) ...

पोर्शवाला : You guys are doing great job... Keep up the passion.

मी : Yup... thank you. Best of luck to you too...

मी आणि केदारने एकमेकांकडे पाहिले.. आमचा डोक्यात एकच विचार..

... आता हा हिरो पुढे जाणार आणि हेल्मेटपासून बुटांपर्यंत सगळे गिअर्स घातलेल्या किरणच्या सायकलला गाठणार आणि कॅरियरवरचा जिवंत कोंबडा बघून वेडा होणार...!!!!!!!!

५

************************************************************

मे महिन्याच्या टळटळीत उन्हातील दुपार. अमित आणि मी सातार्‍याला चाललो होतो. आमच्या अगदी पहिल्यावहिल्या मोठ्या सायकल ट्रिपपैकी एक ट्रिप..

पुण्यातून निघताना उशीर झाला. आम्ही अगदी आरामात साडेसात-आठला बाहेर पडलो. नंतर कापूरहोळजवळच सायकल पंक्चर झाली. आमच्याकडे पंक्चर किट होते, पण पंक्चर काढायचा फारसा अनुभव नव्हता. हे पंक्चर दोनदा काढावे लागले. पहिल्यांदा पंक्चर काढल्यानंतर पुन्हा ट्यूब चेक केली, तेव्हा कळले की आम्ही पंक्चर झालेल्या ठिकाणाच्या बरोब्बर शेजारी पंक्चरचा पॅच चिकटवला आहे.

..भर दुपारी शिरवळला पोहोचलो. श्रीराम वडापावकडे वडा, ताक, पोहे वगैरे प्रकार पोटात ढकलले. पुन्हा सातार्‍याकडे कूच केले. भर उन्हात सायकल चालवायला सुरुवात केली. पण उन्हाचा खूप त्रास होत होता. मला थोड्या अंतरावर डाव्या बाजूला एक डेरेदार झाड दिसले. त्याची झकास सावली पडली होती. शेजारी पाण्याचा एक नळही दिसत होता. काहीही विचार न करता मी आणि अमितने सायकली तिकडे वळवल्या. त्या सावलीत पोहोचलो, तोच लक्षात आले की तेथे एक झोपडी होती, एक मंदिरही होते. आम्ही आवारात पोहोचलो तर त्या झोपडीतून एक आज्जी बाहेर आल्या. एकदम थकलेल्या, वाकलेल्या, काठी घेऊन चालणार्‍या आज्जीबाई.

"आज्जी.. आम्ही थोडा वेळ सावलीत थांबू का?" अमितने विचारले.

"बसा की बाळांनो" असे प्रत्युत्तर आले.

आम्ही झाडाच्या सावलीत असेल नसेल तितक्या गवतावर डोक्याखाली टेकायला एक दगड घेऊन आडवे झालो.

थोड्या वेळाने आज्जी बाहेर आल्या, एक मोठी गोधडी आम्हाला दिली आणि यावर झोपा असे सांगितले. आम्ही नको नको म्हणत असताना ती गोधडी आमच्याकडे देऊनच गेल्या.

माणुसकीचा अंश आज जर कुठे टिकून असेल.. तर तो खेड्याऽत..! असा काहीतरी अनुभव होता तो.

अचानक आज्जी पुन्हा अवतरल्या. "बाळांनो.. मला जरा १०० रुपये द्या. देवळाचे लाईटचे पैशे द्यायचे हायेत."

मी आणि अमित एकमेकांकडे बघतच राहिलो. नंतर देवळाकडे बघितले तर देवळाच्या आजूबाजूला कुठेही लाईटची वायर वगैरे काहीही दिसत नव्हते. झोपडीमध्येसुद्धा दिवे होते की नाही तेही कळत नव्हते.

शेवटी त्या आज्जींच्या हातावर ५० रुपये टिकवले आणि सातार्‍याच्या वाटेला लागलो.

************************************************************

हर्णे बंदर..

६

अमित, केदार, वर्धन, किरण आणि मी कोकणात सायकलने भटकत होतो. मुरूडच्या किनार्‍यावर एका ठिकाणी मुक्काम होता आणि मासे घेण्यासाठी हर्णे बंदरावर गेलो होतो. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मासे बघत निवांत फिरत होतो. तेथे चालणारे लिलाव, वाहतूक, बर्फाचे ट्रक, त्यातून त्या लहान क्रशरमध्ये जाणार्‍या बर्फाच्या लाद्या आणि नंतर लहान आकाराच्या बर्फाने भरले जाणारे क्रेट बघायला मजा येत होती.

शेवटी आम्हाला हवी तशी मासळी विकणार्‍या 'रिटेल' भागाकडे मोर्चा वळवला.

तेथे तर कोळीण मावशांची झुंबड उडाली होती. त्यात त्यांची बोलण्याची, माल खपवण्याची पद्धत एकदम रोखठोक आणि अंगावर येणारी होती. माशांचा विभाग असल्याने माल ठरवणे ते घासाघीस करणे वगैरे सगळे हक्क केदारकडे सोपवून आम्ही मजा बघत बसलो.

"ए भाऊ.. अरे भाऊ.. बघ, असला माल कुठे मिळणार नाही.."
"इतक्या पैशात कसा मिळेल असला मासा..?"
"नाय रे नाय.. इतक्या स्वस्त कसा होईल.."

वगैरे वाक्ये ऐकू येऊ लागली.

शेवटी केदारने बरोब्बर गाभोळीवाला मासा शोधून काढला, भाव ठरवला आणि तो बाकीच्यांसोबत गप्पा मारत बसला.

मासे कसे कापतात ते बघण्याची उत्सुकता असल्याने मी त्या कोळीण मावशीचे काम बघत बसलो.

"कुठून आलास रे..?" माशांचे खवले काढताना त्या मावशीने विचारले.

"पुण्यातून" मी सांगितले. "मावशी, आम्ही सायकलवरून आलो आहोत." मी उगाच कॅसेट वाजवली.

"असू दे, असू दे. वाईट दिवस सगळ्यांच्यावर येतात बघ." मावशी शांतपणे मासे चिरता चिरता उद्गारली.

मी : "ऑ..?????"

"ओ मावशी.. वाईट दिवस नाही.. मजा म्हणून फिरतोय सायकलवरून." मी पडलेला चेहरा उचलत थोडी सारवासारव करायचा प्रयत्न केला.

"अस्सा अस्सा" त्या मावशीला काहीही फरक पडला नव्हता, ती एकाग्र चित्ताने माशांचे काम करत बसली होती.

************************************************************

तुम्हालाही प्रवासात असे अनेक अनुभव आले असतील. मजेदार, फजिती झाल्याचे किंवा कुणाचीतरी फजिती केल्याचेही.. असे अनुभव येथे जरूर लिहा.. :)

प्रतिक्रिया

अरिंजय's picture

5 Sep 2016 - 8:50 am | अरिंजय

दादा, नेहमी प्रमाणेच लय भारी. मजा आली. अजुन असतील तुमच्या पोतडीत. ते पण येऊ द्या.

अभिजीत अवलिया's picture

5 Sep 2016 - 9:00 am | अभिजीत अवलिया

तुमचे सायकलिंगचे वेड लाजवाब.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Sep 2016 - 9:02 am | अनिरुद्ध.वैद्य

कोळीण डायलॉग मस्त!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2016 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त किस्से.

>>> ''तुम्ही फक्त सायकल चालवता का? कामधंदा काही करत नाही का..?

हे खूप आवडलं. थेट भिडलं. :)

आमचा मित्र सायकलस्वार प्रशांतचेही किस्से वाचायला आवडतील.

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

5 Sep 2016 - 5:27 pm | जव्हेरगंज

''तुम्ही फक्त सायकल चालवता का? कामधंदा काही करत नाही का..?

मलापण हाच प्रश्न पडलाय!
कसं करता हे सगळं म्यानेज?

"असू दे, असू दे. वाईट दिवस सगळ्यांच्यावर येतात बघ."

हे लै झणझणीत.
=))

डॉ श्रीहास's picture

5 Sep 2016 - 9:10 am | डॉ श्रीहास

तूफान ऽऽऽऽऽ
आॅसम् , झक्कास .... सगळी विशेषणं लावता येतील... पोर्श काय कोंबडा काय आज्जीबाई काय .. एेक नंबर सगळे अनुभव.... पुढच्या ट्रिप ला आम्हाला घेऊन चला राव !!

स्थितप्रज्ञ's picture

5 Sep 2016 - 9:17 am | स्थितप्रज्ञ

शेवटचा अनुभव भन्नाटच आहे! "सायकलिंग के साईड इफेक्ट्स" असं पुस्तक लिहू शकाल इतके अनुभव दिसतायत तुमच्याकडे!!!

इल्यूमिनाटस's picture

5 Sep 2016 - 9:27 am | इल्यूमिनाटस

छान!

बाबा योगिराज's picture

5 Sep 2016 - 9:30 am | बाबा योगिराज

ख्या ख्या ख्या.
सकाळी सकाळी हसत सुटलोय राव.मस्त लेख. अनुभव एकसे एक आहेत. मासोळीवाली मावशी आन कार वाले मामा, सगळेच भारी.सायकल वर कोंबडा, लोक काय विचार करत असतील, कल्पना करवत नाही.

और भी आने दो.

आपला वाचक
बाबा योगीराज

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Sep 2016 - 9:37 am | मिसळलेला काव्यप्रेमी

असू दे, असू दे. वाईट दिवस सगळ्यांच्यावर येतात बघ

लईच भारी...

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2016 - 9:37 am | प्रभाकर पेठकर

हा: हा: हा: सगळेच प्रसंग विलक्षण म्हणावे असे पण कोळणीचा ड्वायलॉग लै भारी.

डॉ श्रीहास's picture

5 Sep 2016 - 10:01 am | डॉ श्रीहास

आमचा ऐक किस्सा आहे नाही म्हणायला का होईना ..... रविवारच्या लांब राईड ला २५-३० किमी नंतर ब्रेक घेतला असतांना एक जण जवळ येऊन स्वत:च्या ढेरी वर हात फिरवत विचारतो 'सायकलींग नी हे(पोट)कमी होतं का ?'
आता आम्ही दोघं (मी आणि अभिजीत) आमच्या पोटांकडे बघत ' नाही फार फरक नाही पडत, पण सायकलिंग पेक्षा चांगला व्यायाम सांगू का ?'
समोरचा लक्ष देत कारण इंटरेस्ट वाढल्यामुळे ' हा सांगा सांगा !!'
मग मी म्हणतो ' मान ऐकदा उजवीकडे आणि ऐकदा डावीकडे अशी फिरवायची; करा करा तुम्ही करूनच बघा .' असं म्हणत त्या माणसाला करायला लावायचं , मग विचारायचं 'कधी करणार हा व्यायाम?'
तो ' कधी करायचा?'
मी'जेव्हा समोर आवडीची खाण्याची गोष्ट येईल तेव्हा प्रत्येकवेळी !!'
सगळे जण क्षणभर शांत मग हास्याचे फवारे !!!

(हा प्रयोग ३-४ वेळा यशस्वीपणे केला गेलेला आहे.)

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 10:22 am | संदीप डांगे

सुंदर!! आवडलं, लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल सेमपिंच. सिग्नल्वर सायकल घेऊन उभे दिसलो की लोकांच्या नजरा अशा असतात जसं की फेरारी-लॅम्बोर्गिनी आहे. ;)) ते फीलिंग लै भारी असतं. टीनेजरमुलांचा हमखास प्रश्न, "कितने की है?"

बाकी, सायकलिंग हे एक चांगले मेडिटेशन आहे. ध्यानापासून मिळणारे बरेच फायदे सायकलिंगपासून मिळतात. पण ते चार-पाच किमी वालं नाही तर किमान पन्नासच्या पुढं हवं.

नाखु's picture

5 Sep 2016 - 10:39 am | नाखु

पुन्हा सायकल चालवायला सुरुवात करू काय? सोडून किमान १२ वर्षे झाली.

किस्से भन्नाट (कोळीणीने एकाच वेळी दोन मासे सोलले)
एके काळी मी नोकरी निमित्त रोजच्याला पाषाण-भोसरी-पुणे-पाषाण अशी सायकल चालविली होती याच्यावर माझाच अजून विश्वास बसत नाही.

गाडीने रि-सायकल झालेला नाखु

डॉ श्रीहास's picture

8 Nov 2016 - 6:31 pm | डॉ श्रीहास

गियर ची चांगली सायकल घ्या आणि सणाण सुटा...... मी पण ११ वर्षांच्या गॅप नंतर सुरू केलय.... फार उत्तम व्यायाम !!

डॉ श्रीहास's picture

8 Nov 2016 - 6:28 pm | डॉ श्रीहास

सायकलींग आणि मेडिटेशन ह्यात खरंच फार साम्य आहे......

डॉ श्रीहास's picture

8 Nov 2016 - 6:34 pm | डॉ श्रीहास

सायकलींग आणि मेडिटेशन ह्यात खरंच फार साम्य आहे......

मोक्षदा's picture

5 Sep 2016 - 11:40 am | मोक्षदा

सायकलचा छंद उत्तम

पैसा's picture

5 Sep 2016 - 11:43 am | पैसा

अफलातून किस्से!

लोनली प्लॅनेट's picture

5 Sep 2016 - 11:52 am | लोनली प्लॅनेट

वा.. वा.. मोदक राव मज्जा आली वाचायला
भन्नाट सायकल चालवता राव तुम्ही..Amazing

पियुशा's picture

5 Sep 2016 - 11:58 am | पियुशा

भारिये :)

मदनबाण's picture

5 Sep 2016 - 12:29 pm | मदनबाण

लयं भारी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माझा गणपती... :- मी येतोय

शलभ's picture

5 Sep 2016 - 1:18 pm | शलभ

झकास किस्से..

एस's picture

5 Sep 2016 - 1:19 pm | एस

ख्याः ख्याः ख्याः!

मुक्त विहारि's picture

5 Sep 2016 - 1:27 pm | मुक्त विहारि

सगळेच एक नंबर...

पाटीलभाऊ's picture

5 Sep 2016 - 2:43 pm | पाटीलभाऊ

नेहमीप्रमाणेच मस्त, खुसखुशीत..!

असू दे, असू दे. वाईट दिवस सगळ्यांच्यावर येतात बघ

तुम्ही फक्त सायकल चालवता का? कामधंदा काही करत नाही का..?

लै बेक्कार हसतोय यावर... :D

जेपी's picture

5 Sep 2016 - 2:46 pm | जेपी

मस्त किस्से..!-

-अवांतर -तुमची भटकंती पाहता मलापण एक प्रश्न पडलाय.
"काय काम धंदा करता का हो..?"

पाटीलभाऊ's picture

5 Sep 2016 - 4:15 pm | पाटीलभाऊ

हाच प्रश्न पण वेगळ्या शब्दांत..."पोटापाण्याचं काय ???" :P

फार काही नाही हो.. काम असले की मान मोडून काम करायचे आणि नसेल तेंव्हा उंडारायचे असा साधा सोपा हिशेब आहे. हवे तिकडे फिरण्याला घरच्यांचा भरपूर सपोर्ट आहे.

सुदैवाने वाट्टेल त्या वातावरणाला तोंड देण्यास काहीही शारिरीक त्रास नाही.

आजचेच बघा.. आज सुट्टीच्या दिवशीसुद्धा घरचा सण साजरा करून हाफिसात बसलो आहे.
कोकणाची सायकल वारी झाल्यानंतर; गेले १५ दिवसात एकही आठवड्याची सुट्टी मिळालेली नाही. शनिवार / रविवारसह सगळे दिवस काम सुरू आहे. :)

पाटीलभाऊ's picture

6 Sep 2016 - 3:20 pm | पाटीलभाऊ

असेच उंडारत राहा..आणि लेख लिहीत राहा.. :)
आम्ही पण प्रयत्न करतोय..!

भीमराव's picture

5 Sep 2016 - 3:21 pm | भीमराव

लेख वाचुन अतिउत्साहाने शेजारच्या बारक्याला दम देऊन त्याची छोटीशी सायकल चालवायला घेतली, आणि अर्धा किलोमीटर मधेच घाईवर आलो राव, माझा मलाच विश्वास वाटेना की मि रोज दहा किलोमीटर वर असलेल्या कॉलेज ला सायकल वर जायचो,

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Sep 2016 - 4:54 pm | माम्लेदारचा पन्खा

केल्याने देशाटन..मनुजा येते शहाणपण.....!

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Sep 2016 - 2:52 pm | माम्लेदारचा पन्खा

मोदक शेठ पॉटरी का काय तेही करतात की काय ? याने पोटरी नक्की मजबूत होते म्हणा !

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2016 - 5:07 pm | प्रभाकर पेठकर

सायकल भरपूर चालविली आहे. व्यसनच होतं म्हणा नं.

आमचा १५ जणांचा मित्रपरिवार होता. एकाच गल्लीतील त्यामुळे घट्ट दोस्ती होती. दर वर्षी दिवाळीच्या नर्कचतुर्दशीला पहाटे आम्ही सायकल सहल करायचो. हेमंत (नांव बदललेले नाही) नांवाच्या माझ्या मित्राकडे स्वतःची सायकल होती. बाकी १४ सायकली भाड्याने (रेंटल) आणायच्या. त्या आदल्यारात्रीच एक दिवसाच्या बोली वर आणलेल्या असायच्या. दुसर्‍या दिवशी नर्कचतुर्दशीला पहाटे उठून फराळ, फटाके वगैरे उरकून ५.३० सहाला सर्वजणं बाहेर पडायचो. दहिसरहून निघून गणेशपुरी, वज्रेश्वरी वगैरे करून संध्याकाळ पर्यंत दहिसरला परतायचो. हेमंतच्या (नांव बदललेले नाही) सायकलवर सायकलींच्या दुरुस्तीचे (पंक्चर वगैरे) सामान असायचे. तो आमच्यातला एकमेव ताकदवान (देशी व्यायाम वगैरे करणारा) सदस्य होता. त्यामुळे कुठे कांही ताकदीची कामे आली की हेमंत (नांव बदललेले नाही) अक्षरशः कामी यायचा. शिवाय स्वतःची सायकल असल्याकारणाने सायकलींची देखभाल हा त्याच्या डाव्या हाताचा खेळ होता (उजव्या हातात मावा असायचा). तो आमच्या मित्रपरिवाराचा अघोषित नायक असल्याकारणाने इतरांबरोबर न राहता नेहमी कमीतकमी १०० मिटर्स पुढेच असायचा. एकदा आमच्या एका मित्राची सायकल पंक्चर झाली. तो मित्र थांबला. झालं सगळे त्याच्या भोवती थांबले. आता पंक्चर काढण्याचे कौशल्याचे काम हेमंत (नांव बदललेले नाही) वर आले. पण तो होता कुठे? तो जवळ जवळ २०० मिटर्स पुढे पोहोचला होता. त्याला थांबवायला आणि परत आणायला मी सायकल हाणली. कामणची चढण होती. व्यायामाची सवय नसलेल्या मला ती अवघड चढण चढताना तोंडाला फेस आला, पायात गोळे आले. तोंडाने मी हाका मारत होतो हेमंत (नांव बदललेले नाही), हेमंत (नांव बदललेले नाही). त्याने ऐकले आणि मागे वळून पाहिले पण तो सहलीच्या आनंदात होता. त्याला वाटले मी त्याच्याशी स्पर्धा करतो आहे. झाले त्याने त्याच्या पिळदार शरीराने त्याची सायकल जास्तीच जोरात हाणायला सुरुवात केली. मी अवाक झालो. धापा टाकत मी आमच्यातले अंतर कमी करायला पाहात होतो आणि तो स्पर्धेच्या मनोवस्थेत अजून जोरात पुढे पुढे जात राहिला. हा पाठलाग जवळ जवळ ५ कि.मी. तरि झाला असणार. शेवटी मी नाद सोडून दिला आणि बाजूलाच जवळच्याच गवतावर उताणा पडून राहिलो. छातीचा भाता जोरजोरात चालला होता आणि मी श्वास नियमीत होण्याची वाट पाहात होतो. श्वास बर्‍यापैकी नियमित होऊन आता परत निघावं विचार करत होतो तर सायकल वळवून हेमंत (नांव बदललेले नाही) माझ्याजवळ आला. मी त्याच्यावर जाम भडकलो होतो. त्याला शिव्यांची लाखोली वाहून आम्ही दोघेही परतलो तर बाकी मित्र माझ्यावरच उखडले. तू हेमंतला (नांव बदललेले नाही) बोलवायला गेला होतास की दोघेच सहलीची मजा मारायला गेला होतात. कुठे तरी चहा पित बसले असणार. वगैरे वगैरे मला विनाकारण बरेच ऐकावे लागले. असो.
ही मोजून ४२ वर्षांपूर्वीची घटना आहे. त्यानंतर कधी सायकलचा इतका गांभिर्याने वापर झाला नाही. आणि गेल्या ३०-३५ वर्षात तर सायकलला हातही लावलेला नाही. चारचाकीने शरीरावर इतका नकारात्मक परिणाम केला आहे की आता सायकल पाहिली की मी आणि मला पाहिले की सायकल, थरथरा कापतात.

शलभ's picture

5 Sep 2016 - 7:14 pm | शलभ

कहर..:)
-शलभ (नाव बदललेलं आहे) :)

अरिंजय's picture

6 Sep 2016 - 11:51 am | अरिंजय

हसुन हसुन पोट दुखलं.

- मानस (नाव बदललेलं नाही)

हेमन्त वाघे's picture

5 Sep 2016 - 8:27 pm | हेमन्त वाघे

हेमंत (नांव बदललेले नाही) हे अनेकदा का ?
गजिनीतील आमिर सारखा मिपा करांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो का ??

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2016 - 8:35 pm | प्रभाकर पेठकर

हा: हा: हा: तो एक विनोद निर्मितीचा क्षीण प्रयत्न आहे. शिवाय माझा त्याच्यावरचा राग (त्या वेळी) इतका तीव्र होता की माझ्यापेक्षा बलवान असल्याकारणाने त्याच्यावर हात उचलणे मला शक्य नव्हते. त्यानेच मला बुकलून काढले असते. मग राग काढायचा कसा? तर अश्या प्रकारे. की बाबा, माझ्याशी असा वागून मला त्रास दिलास का? मीही सर्वांना सांगतोच की असा वागणारा कोणी काल्पनिक व्यक्ती नाही. असो. ती एक गंमत आहे. सोडून द्या.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 8:43 pm | संदीप डांगे

हा हा! मजेशीर होते हे! =))

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2016 - 8:46 pm | प्रभाकर पेठकर

ह्यावर एक ऐकिव विनोदही आहे.

एकदा एका ऑफिसातला साहेब अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरतो. तो कचेरीत फार खडूस आणि आपल्या कर्मचार्‍यांना पिडणारा, अपमान करणारा असतो. त्याच्या हाताखालचा एक कारकून त्याच्या घरी फोन करतो. फोन बायको घेते. संवाद पुढील प्रमाणे होतो:-
कारकून : साहेब आहेत?
बायको (रडत रडत) : नाही हो. साहेब आज सकाळीच हृद्य विकाराच्या धक्क्याने वारले.
कारकूनः अरेरे! फार वाईट झाले. (फोन ठेवतो)
तासाभराने तोच कारकून पुन्हा फोन करतो आणि विचारतो : साहेब आहेत?
बायको अजूनही रडत असते ती म्हणते: नाही हो तुम्हाला सांगितले न ते सकाळीच वारले म्हणून.
तासाभराने तो कारकून पुन्हा फोन करतो आणि विचारतो : साहेब आहेत?
आता ती बाई पण संतापते. म्हणते : किती वेळा सांगू ते आज सकाळीच गेले म्हणून? का करता तुम्ही असं?
कारकून : माफ करा बाई, पण ऐकायला बरं वाटतं म्हणून करतोय फोन.

सायकलींची देखभाल हा त्याच्या डाव्या हाताचा खेळ होता (उजव्या हातात मावा असायचा).

लौल!

मोदक's picture

5 Sep 2016 - 9:09 pm | मोदक

कहर किस्सा आहे.. या गैरसमजावरून एक मजा सांगतो..

आमच्या सातारा राईडला त्या प्रेमळ आज्जींच्याकडे विश्रांती घेतल्यानंतर आम्ही पुढे गेलो.. पाचवडच्या दरम्यान मी अमितला काहीतरी सांगायला थांबण्यासाठी हाका मारत होतो, फोन करत होतो. पण अमित गाणी ऐकत एका लयीत सायकल चालवत चालला होता आणि मला काही केल्या त्याला गाठणे जमत नव्हते..

मग आमची नेहमीची युक्ती "आजुबाजूच्या दुचाकीस्वारांकडून निरोप पोहोचवणे" अवलंबली...

एका दुचाकीला हात केला.. माझ्या शेजारी येवून माझ्या गतीने त्याची गाडी चालू लागली. मग नेहमीची प्रश्नोत्तरे झाल्यावर मी त्याला माझे काम सांगितले.. बरं बरं म्हणून तो गडबडीने पुढे गेला आणि अमितला दम दिल्याच्या सुरात "मागच्याने थांबायला सांगितले आहे" असे सांगून थांबायचा आग्रह करू लागला. अक्षरशः त्याला पुढेच जावू देईना..!!

अमितला हे सगळे अनपेक्षित होते म्हणून तो एकदम चमकून थांबला.. तोपर्यंत मी तेथे पोहोचलो होतो.

वाचताना फारसे जाणवणार नाही.. पण त्या दुचाकीवाल्याने दम दिल्याच्या सुरात माझा निरोप देणे आणि अमितला थांबण्यासाठीचा आग्रह करणे या दोन्ही गोष्टी धमाल होत्या. :))

मास्टरमाईन्ड's picture

8 Sep 2016 - 4:55 pm | मास्टरमाईन्ड

:)

हेमंत (नांव बदललेले नाही)

काका विनोद निर्मिती झाली आणी वाळली पण!

आता सायकल पाहिली की मी आणि मला पाहिले की सायकल, थरथरा कापतात.

पोटात दुखतंय अजून.

ऑफिसात सगळे बघतायत माझ्याकडे. येड्यासारखं एकटाच हसतोय म्हणून

सविता००१'s picture

5 Sep 2016 - 5:12 pm | सविता००१

हसतेय बेक्कार..
बाकी इतर किश्शांबरोबर गोधडीवाल्या चापलूस आज्जी पण भारीच...

बोका-ए-आझम's picture

5 Sep 2016 - 5:42 pm | बोका-ए-आझम

फार पटकन संपला लेख!

बोका-ए-आझम's picture

5 Sep 2016 - 5:42 pm | बोका-ए-आझम

फार पटकन संपला लेख!

मोदक's picture

5 Sep 2016 - 5:52 pm | मोदक

धन्यवाद..

वाचकांनी असे प्रवासात अनुभवलेले किस्से वाचण्यास उत्सुक आहे. :)

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 8:46 pm | अभ्या..

भारीच. मस्त.
माझ्याच्याने मात्र कधी होईल सायकल चालवणे असे वाटत नाही.

उल्का's picture

5 Sep 2016 - 9:19 pm | उल्का

मस्तच!

अमितदादा's picture

5 Sep 2016 - 9:54 pm | अमितदादा

छान किस्से....आवडेश