श्रीगणेश लेखमाला: फिरत्या चाकावरती..

मोदक's picture
मोदक in लेखमाला
5 Sep 2016 - 1:36 pm

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

सायकलिंग..

१
मी गेल्या दोन वर्षांपासून जसा वेळ मिळेल तशी सायकल चालवत आहे. अनेकदा महाबळेश्वर, कोकण सायकलीने पार केले. लांब अंतरे आणि घाट नेहमीच खुणावत असतात. रोजच्या वेळापत्रकात एक बदल म्हणून सायकलीने कचेरीतही जायला सुरुवात केली. गाडीने होणारा प्रवासाचा वेळ आणि सायकलने लागणारा वेळ यात फार फरक नसल्याचे आश्चर्यकारकरित्या लक्षात आले. गाडीच्या तुलनेत सायकलने लागणारा वेळ अगदी १०-१५ मिनिटे जास्त होता. सायकल घेणे, त्याची निगा राखणे, मोठ्या राइड्स वगैरे प्रकार नियमित सुरू झाले.

सुरुवातीला वाटणारे "६० किमी?? सायकलवर??" असे विचार आता "१५० किमी आहे का? ठीक आहे, एका दिवसात सहज जमेल" येथपर्यंत आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट सायकलिंगमुळे शक्य झाली, ती म्हणजे 'सहनशीलता वाढली..!!' रस्त्यावरून जाताना मोठाल्या गाड्यांनी कट मारून जाणे, दुचाकीवीरांनी उगाचच जवळून जाणे, रस्त्यावर लोकांनी चेष्टा करणे वगैरे गोष्टी सवयीच्या झाल्या. सायकल चालवताना अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये एकदा जोरदार आपटल्यामुळे 'उतारावर वेग नियंत्रणात राहिलाच पाहिजे' याचा नीट धडा मिळाला.

मात्र सगळेच लोक असे नसतात. टळटळीत उन्हात घाट चढताना कोणीतरी हात दाखवून "कीप इट अप..!!!" असे प्रोत्साहन देतात.

२

कुठेतरी थांबून विश्रांती घेताना मुद्दाम गाडी थांबवून "काही हवे आहे का?", "सगळे ठीक आहे का?" अशी चौकशी करतात.
एखादी मदत हवी असल्यास आवर्जून मदत करण्याची तयारी दाखवतात.

आम्हाला सायकलवर बघून लोकांच्या प्रामाणिक पण मजेदार प्रतिक्रिया बघून 'नक्की काय प्रतिक्रिया द्यायची' हे कळायचेच नाही. सायकल चालवताना एखादी गाडी शेजारी येऊन आमच्या गतीने चालायला लागली, की "सायकल चालवल्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतात का..?" येथपासून ते "तुम्ही फक्त सायकल चालवता का? कामधंदा काही करत नाही का..?" असे कोणतेही प्रश्न येऊ शकतात, याचे अनेक मजेदार अनुभव आले.

सायकल राइडमध्ये अनेक मजेदार घटना आजूबाजूला घडत असतात.. त्यातल्या निवडक घटना येथे देत आहे.. तुम्हाला सायकल चालवताना किंवा गाडी चालवताना असे अनुभव आले असल्यास येथे जरूर लिहा. :)

************************************************************

असेच एकदा महाबळेश्वरहून परत येत होतो. पसरणी किंवा कोणताही घाट उतरणे हा कुठल्याही सायकलवीराचा एक आवडीचा प्रकार असतो. कारण एकच.. सगळा उतार असतो आणि भन्नाट वेगाने सायकल पळते.

पाचगणी, पसरणी, वाई सगळा रस्ता व्यवस्थित पार पडला. वाई ते सुरूर फाटा या आमच्या आवडीच्या रूटवर सायकली धावू लागल्या. मी थोडा पुढे होतो.. अचानक मागे मोठमोठ्याने हॉर्न वाजू लागला. बघितले, तर लांबवर एक टँकर होता. मी सायकल शक्य तेवढ्या बाजूला घेतली आणि त्याला जायला थोडी जागा मोकळी केली.

तरी त्याचा हॉर्न थांबेना.

सिंगल रोड असल्याने हॉर्न वाजवत असेल अशा विचाराने मी दुर्लक्ष केले, तरी टँकरचे पँ पँ पँ सुरूच होते. शेवटी मीच सायकल चालवता चालवता मागे वळून 'आता जा की पुढे..' अशा अर्थाचे हातवारे केले.

३

मला ओलांडून तो टँकर पुढे गेला, त्याचा वेग थोडा कमी झाला, त्या टँकरचा क्लीनर डाव्या बाजूने 'खतरोंके खिलाडी'सारखे स्टंट करत चालत्या टँकरमधून बाहेर उलट्या दिशेने लोंबकळला व मला मोऽऽठ्ठ्याने ओरडून विचारले,

"पाणी पायजे का??"

मी अवाक, चकित वगैरे झालो..

त्याला नको नको असा हात केला आणि हसत हसत पुन्हा पॅडल मारायला लागलो.

************************************************************

आमची एक भन्नाट कँपिंग ट्रिप... सगळे सायकलचे आवश्यक गिअर्स घालून तयार झालेलो आम्ही... वेगवेगळ्या सायकलवर लादलेले टेंट, एक दिवस राहण्याचे सामान, वाटेत खादाडी करायला लागेल म्हणून चिक्की, राजगिरा लाडू वगैरे खुराक आणि किरणच्या सायकल कॅरियरवर चक्क एक जिवंत कोंबडा - हो, जिवंत कोंबडा!! - रात्रीच्या जेवणाची सोय!

४
सकाळी आम्ही निघालो. बर्‍यापैकी ऊन असल्याने आरामात मजल दरमजल करत ताम्हिणी घाटाकडे कूच केले. एका ठिकाणी झकास खादाडी केली. पुन्हा सायकलवर प्रवास सुरू केला. वाटेत टाईमपास करत चाललो होतो. एका ठिकाणी त्या बिचार्‍या कोंबड्याला पाणीही पाजले.

थोड्या वेळाने किरण (कोंबड्यासह) पुढे गेला. मी आणि केदार पाणी प्यायला थांबलो होतो, तोच शेजारी पोर्शची चकाचक SUV येऊन थांबली. आम्ही मनातल्या मनात त्या गाडीला दाद दिली. भारी गाडी होती.

ड्रायव्हरशेजारची काच खाली झाली आणि अत्यंत सफाईदार इंग्लिशमधून प्रश्न आला.

"Are you guys doing BRM..?"

मी : No.. no.. we are just out on a ride.

पोर्शवाला : (आश्चर्याने..) In this summer??

मी : Yup.. its fun.

पोर्शवाला : You know guys... I really appreciate you for the passion you have. You are going on cycle in such heat is really commendable.

मी : (आता काय बोलावे या विचारात..) ...

पोर्शवाला : You guys are doing great job... Keep up the passion.

मी : Yup... thank you. Best of luck to you too...

मी आणि केदारने एकमेकांकडे पाहिले.. आमचा डोक्यात एकच विचार..

... आता हा हिरो पुढे जाणार आणि हेल्मेटपासून बुटांपर्यंत सगळे गिअर्स घातलेल्या किरणच्या सायकलला गाठणार आणि कॅरियरवरचा जिवंत कोंबडा बघून वेडा होणार...!!!!!!!!

५

************************************************************

मे महिन्याच्या टळटळीत उन्हातील दुपार. अमित आणि मी सातार्‍याला चाललो होतो. आमच्या अगदी पहिल्यावहिल्या मोठ्या सायकल ट्रिपपैकी एक ट्रिप..

पुण्यातून निघताना उशीर झाला. आम्ही अगदी आरामात साडेसात-आठला बाहेर पडलो. नंतर कापूरहोळजवळच सायकल पंक्चर झाली. आमच्याकडे पंक्चर किट होते, पण पंक्चर काढायचा फारसा अनुभव नव्हता. हे पंक्चर दोनदा काढावे लागले. पहिल्यांदा पंक्चर काढल्यानंतर पुन्हा ट्यूब चेक केली, तेव्हा कळले की आम्ही पंक्चर झालेल्या ठिकाणाच्या बरोब्बर शेजारी पंक्चरचा पॅच चिकटवला आहे.

..भर दुपारी शिरवळला पोहोचलो. श्रीराम वडापावकडे वडा, ताक, पोहे वगैरे प्रकार पोटात ढकलले. पुन्हा सातार्‍याकडे कूच केले. भर उन्हात सायकल चालवायला सुरुवात केली. पण उन्हाचा खूप त्रास होत होता. मला थोड्या अंतरावर डाव्या बाजूला एक डेरेदार झाड दिसले. त्याची झकास सावली पडली होती. शेजारी पाण्याचा एक नळही दिसत होता. काहीही विचार न करता मी आणि अमितने सायकली तिकडे वळवल्या. त्या सावलीत पोहोचलो, तोच लक्षात आले की तेथे एक झोपडी होती, एक मंदिरही होते. आम्ही आवारात पोहोचलो तर त्या झोपडीतून एक आज्जी बाहेर आल्या. एकदम थकलेल्या, वाकलेल्या, काठी घेऊन चालणार्‍या आज्जीबाई.

"आज्जी.. आम्ही थोडा वेळ सावलीत थांबू का?" अमितने विचारले.

"बसा की बाळांनो" असे प्रत्युत्तर आले.

आम्ही झाडाच्या सावलीत असेल नसेल तितक्या गवतावर डोक्याखाली टेकायला एक दगड घेऊन आडवे झालो.

थोड्या वेळाने आज्जी बाहेर आल्या, एक मोठी गोधडी आम्हाला दिली आणि यावर झोपा असे सांगितले. आम्ही नको नको म्हणत असताना ती गोधडी आमच्याकडे देऊनच गेल्या.

माणुसकीचा अंश आज जर कुठे टिकून असेल.. तर तो खेड्याऽत..! असा काहीतरी अनुभव होता तो.

अचानक आज्जी पुन्हा अवतरल्या. "बाळांनो.. मला जरा १०० रुपये द्या. देवळाचे लाईटचे पैशे द्यायचे हायेत."

मी आणि अमित एकमेकांकडे बघतच राहिलो. नंतर देवळाकडे बघितले तर देवळाच्या आजूबाजूला कुठेही लाईटची वायर वगैरे काहीही दिसत नव्हते. झोपडीमध्येसुद्धा दिवे होते की नाही तेही कळत नव्हते.

शेवटी त्या आज्जींच्या हातावर ५० रुपये टिकवले आणि सातार्‍याच्या वाटेला लागलो.

************************************************************

हर्णे बंदर..

६

अमित, केदार, वर्धन, किरण आणि मी कोकणात सायकलने भटकत होतो. मुरूडच्या किनार्‍यावर एका ठिकाणी मुक्काम होता आणि मासे घेण्यासाठी हर्णे बंदरावर गेलो होतो. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मासे बघत निवांत फिरत होतो. तेथे चालणारे लिलाव, वाहतूक, बर्फाचे ट्रक, त्यातून त्या लहान क्रशरमध्ये जाणार्‍या बर्फाच्या लाद्या आणि नंतर लहान आकाराच्या बर्फाने भरले जाणारे क्रेट बघायला मजा येत होती.

शेवटी आम्हाला हवी तशी मासळी विकणार्‍या 'रिटेल' भागाकडे मोर्चा वळवला.

तेथे तर कोळीण मावशांची झुंबड उडाली होती. त्यात त्यांची बोलण्याची, माल खपवण्याची पद्धत एकदम रोखठोक आणि अंगावर येणारी होती. माशांचा विभाग असल्याने माल ठरवणे ते घासाघीस करणे वगैरे सगळे हक्क केदारकडे सोपवून आम्ही मजा बघत बसलो.

"ए भाऊ.. अरे भाऊ.. बघ, असला माल कुठे मिळणार नाही.."
"इतक्या पैशात कसा मिळेल असला मासा..?"
"नाय रे नाय.. इतक्या स्वस्त कसा होईल.."

वगैरे वाक्ये ऐकू येऊ लागली.

शेवटी केदारने बरोब्बर गाभोळीवाला मासा शोधून काढला, भाव ठरवला आणि तो बाकीच्यांसोबत गप्पा मारत बसला.

मासे कसे कापतात ते बघण्याची उत्सुकता असल्याने मी त्या कोळीण मावशीचे काम बघत बसलो.

"कुठून आलास रे..?" माशांचे खवले काढताना त्या मावशीने विचारले.

"पुण्यातून" मी सांगितले. "मावशी, आम्ही सायकलवरून आलो आहोत." मी उगाच कॅसेट वाजवली.

"असू दे, असू दे. वाईट दिवस सगळ्यांच्यावर येतात बघ." मावशी शांतपणे मासे चिरता चिरता उद्गारली.

मी : "ऑ..?????"

"ओ मावशी.. वाईट दिवस नाही.. मजा म्हणून फिरतोय सायकलवरून." मी पडलेला चेहरा उचलत थोडी सारवासारव करायचा प्रयत्न केला.

"अस्सा अस्सा" त्या मावशीला काहीही फरक पडला नव्हता, ती एकाग्र चित्ताने माशांचे काम करत बसली होती.

************************************************************

तुम्हालाही प्रवासात असे अनेक अनुभव आले असतील. मजेदार, फजिती झाल्याचे किंवा कुणाचीतरी फजिती केल्याचेही.. असे अनुभव येथे जरूर लिहा.. :)

प्रतिक्रिया

फेदरवेट साहेब's picture

5 Sep 2016 - 11:02 pm | फेदरवेट साहेब

रस्त्यावरून जाताना मोठाल्या गाड्यांनी कट मारून जाणे, दुचाकीवीरांनी उगाचच जवळून जाणे, रस्त्यावर लोकांनी चेष्टा करणे वगैरे गोष्टी सवयीच्या झाल्या.

हे सोडूनही, आमचे काही अज्ञानी जातभाई तुमच्या मागे वगैरे लागले असतील(च) कधीतरी, मी त्यांच्यावतीने तुमची माफी मागतो. त्याचं काय न सगळी कुत्री मिपावर नाहीत, मीच आहे बाकी उकिरडे फुकत हिंडत्यात.

-आज्ञाधारक
ढेल्या

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2016 - 4:25 am | पिलीयन रायडर

ओपनिंगचा लेख मोदकशेठचा!! खत्राच किस्से आहेत रे!

तुला कामधंदे नाहीत का हा प्रश्न मलाही केव्हाचा पडलाय!! ;)

असू दे, असू दे. वाईट दिवस सगळ्यांच्यावर येतात बघ

=))

जॅक डनियल्स's picture

6 Sep 2016 - 7:06 am | जॅक डनियल्स

फार सुंदर किस्से आहेत ! जरा काही वेगळा छंद असेल तर लोक काही पण प्रश्न विचारतात. तुझा म्हातारीचा किस्सा वाचून, एका म्हातारीने आम्हाला धाक बहिरी जवळ गाय-छाप मागितले होते त्याची आठवण झाली. :)

डिट्टेल किस्सा द्या की..!!

संत घोडेकर's picture

6 Sep 2016 - 10:08 am | संत घोडेकर

हा!हा!हा!,मस्त किस्से.

रातराणी's picture

6 Sep 2016 - 10:08 am | रातराणी

अतिशय सुंदर लेख!!

जिन्गल बेल's picture

6 Sep 2016 - 10:09 am | जिन्गल बेल

झक्कास..मस्त...खुमासदार लेख....

गणामास्तर's picture

6 Sep 2016 - 11:32 am | गणामास्तर

शेवटची सायकल दहा वर्षांपूर्वी बारावीला असताना चालवली. आता परत चालवणे होईल असे वाटंत नाही.
बाकी प्रवासातले किस्से मस्त.

सस्नेह's picture

6 Sep 2016 - 11:41 am | सस्नेह

छंद आणि किस्से, दोन्ही तितकेच रोचक...

वरुण मोहिते's picture

6 Sep 2016 - 11:54 am | वरुण मोहिते

सायकल चालवण्याची परत इच्छा उत्पन्न करून देण्याबद्दल धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

6 Sep 2016 - 12:01 pm | मृत्युन्जय

एक नंबर जमला आहे लेख. तुझ्या पॅशनला सलाम

अभ्या..'s picture

6 Sep 2016 - 12:19 pm | अभ्या..

तुझ्या पॅशनला सलाम

मेरीडा आणि बुलेटला पण सलाम ठोकून घे. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2016 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं खुसखुशीत लेख !

स्वीट टॉकर's picture

6 Sep 2016 - 12:28 pm | स्वीट टॉकर

किस्से एक से एक क्लासिक आहेत. जाम हसायला आलं. मस्त लिहिलं आहेत.

वेल्लाभट's picture

6 Sep 2016 - 1:04 pm | वेल्लाभट

झकास ! अशीच चाकं गरगरवत रहा !

मोहनराव's picture

6 Sep 2016 - 1:22 pm | मोहनराव

छान लेख.
मी आजही नियमितपणे सायकल चालवतो. इकडे खुप लोक ऑफिस जवळ असेल तर (साधारणपणे ४-५ किमी) सायकलनेच जातात.
अगदी माझा बॉससुद्धा सायकलनेच येतो. येता जाता ८ किमी. इकडच्या हवामानामुळे ते शक्य आहे म्हणा. पण पुण्यात असताना एक मित्र आवर्जुन सायकलने यायचा. तेव्हा खुप कौतुक वाटायचं त्याचं. तुमची सायकलप्रवास असाच चालु राहो..

किरण कुमार's picture

6 Sep 2016 - 1:26 pm | किरण कुमार

त्या कोंबडा राईडची एक आठवण अशी ..............

मी आधल्या दिवशी कोंबडा आणून ठेवला होता पण कोणाला माहिती नव्हते, त्याच रात्री कार्यालयाच्या सहकारी वर्गाबरोबर ओली पार्टी झाली ,सहाजीकच झोपायला उशीर झाला आणि राईडच्या दिवशी मी सकाळी ७.१५ ला उठलो .....

उठल्यानंतर व्हॉट्स ग्रूप बघितला ,(सकाळी ६ वाजता चांदणी चौकात भेटायचे असे आधीच ठरले होते), केदार मोदक आणि अमितने शिव्या घालून कहर केला होता , आता राईड रद्द इथपर्यंत निर्णय येवून ठेपले , केदार काही बोलत नव्हता , त्याने आधल्या दिवशीच कोबड्यासाठी वाटण वगैरे करुन ठेवले होते, कूकींगची जबाबदारी पण त्याने घेतली होती , ऐन वेळी पोपट होणार म्हणून जाम भडकला होता..
मी कसाबसा आवरुन आणि कोंबड कॅरिअर वर टाकून वारजे पूलाखाली आलो , तिथे अमित भेटला, म्हणाला केदार येत नाही आणि आता काही बोलत नाही .. मी पण बर म्हणालो

त्यानंतर अमितचा डायलॉग होता..... मी काय म्हणतो केदार येत नसेल तर त्याने केलेले वाटण तरी घेवून येवू
:)

(जसे काय केदारच्या घरी पोहचल्यावर आमचे स्वागत होवून ते वाटण सहज मिळाले असते :)

शेवटी कोंबड्याचा फोटू डकावला तेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आणी मन वळवले भावड्याचे

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2016 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्य आहात ! =))

केडी's picture

6 Sep 2016 - 2:43 pm | केडी

खरंय, त्या गरीब कोंबड्याचा फोटो पाहिला आणि मी निघालो.
:-)):-))

शलभ's picture

6 Sep 2016 - 3:16 pm | शलभ

खतरनाक..:)

शलभ's picture

6 Sep 2016 - 3:17 pm | शलभ

खतरनाक..:)
तू नही तो तेरा वाटण सही..

मास्टरमाईन्ड's picture

8 Sep 2016 - 4:59 pm | मास्टरमाईन्ड

मी काय म्हणतो केदार येत नसेल तर त्याने केलेले वाटण तरी घेवून येवू

हे खासच.
आवडलं आपल्याला.

रच्याकने, जिवंत कोंबडा "कापायचं" सत्कृत्य तुमच्या टीम पैकी कोणी केलं?

अरिंजय's picture

6 Sep 2016 - 2:39 pm | अरिंजय

त्यानंतर अमितचा डायलॉग होता..... मी काय म्हणतो केदार येत नसेल तर त्याने केलेले वाटण तरी घेवून येवू
:)

जबरदस्त आशावाद.

सकाळी आम्ही निघालो. बर्‍यापैकी ऊन असल्याने आरामात मजल दरमजल करत ताम्हिणी घाटाकडे कूच केले. एका ठिकाणी झकास खादाडी केली.

इथली सुद्धा एक मज्जा आहे.
आम्ही मुळाशीला ब्रेकफास्ट साठी थांबलेलो ती जागा बरीच पॉप्युलर आहे. बाहेर चारचाकींची हि गर्दी. आम्ही सायकली कोपर्यात टेकवल्या आणि सायकली दिसतील असं टेबल पकडून बसलो.

इतका वेळ कॅरीर घट्ट धरून बसलेल्या कोंबड्याला बहुदा जाणवलं, कि हीच ती वेळ, हाच तो क्षण, आणि त्याने पिशवीतून डायरेक्ट खाली उडी मारली! तो पर्येंत झाकलं कोंबडं सव्वा लाखांचं होत. एकंदर आमचा गेटअप बघून आधी भारावलेली आजूबाजूची टेबलं अचानक असा कोंबडा बघून " अरे मुर्गा, अरे मुर्गा लेके जा राहे है!"
आणि मग प्रचंड खसखस पिकली. किरणभाऊंनी शांतपणे कोंबडा उचलून परत पिशवीत ठेवला.
:-)) :-))

ती कोंबडा राईड अनेक कारणांनी मेमोरेबल झाली आहे..!!

:-)) :-))

प्रशांत's picture

8 Sep 2016 - 10:02 pm | प्रशांत

तुम्हि अशी कोंबडा राईड वर्षातुन किति वेळ करता?

प्रभाकर पेठकर's picture

6 Sep 2016 - 3:19 pm | प्रभाकर पेठकर

आम्ही पण असाच एक कोंबडा आमच्या सहलीच्या वेळी आणला होता. त्याला अंगणात बांधून ठेवला आणि उपाशी मरू नये म्हणून कांही ज्वारीचे दाणे टाकले होते आणि प्यायला पाणीही ठेवलं होतं. तो आनंदात होता. बाकी मित्र पत्ते खेळण्यात दंग होते तेंव्हा त्या कोंबड्याचे मी निरिक्षण करत होतो.
रात्री झोपताना माझा मित्र मला म्हणाला, 'अरे उद्या लवकर उठव हं. सगळ्यांच स्वयंपाक करायचा आहे.' मी बरं म्हणून झोपण्याचा प्रयत्न करत होतो पण तो दाणे खाणारा तुर्रेबाज कोंबडा सतत आठवत राहिला. केंव्हातरी झोप लागली. पहाटे पहाटे त्या कोंबड्यानेच बांग देऊन मला ऊठवलं. मी मित्राला उठवलं. त्या कोंबड्याची मला द्या आली. त्याला कल्पनाच नव्हती की तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. त्यानेच कसायला उठवलं होतं. मित्राला म्हणालो आपण हा कोंबडा सोडून देऊया. आणि बाजारातून रितसर कापलेला दुसरा घेऊन येऊया. तो हसायलाच लागला. आणि दुपारच्या जेवणात तोच कोंबडा ताटात आला. मी नाही खाऊ शकलो. मी वाटी मित्राला देऊन टाकली आणि शाकाहारच केला.

अमित खोजे's picture

8 Sep 2016 - 12:49 am | अमित खोजे

कोंबड्यावरून माझ्या लहानपणाची एक आठवण झाली. माझ्या दूरच्या एका मामाकडे आमच्या घराचे सर्व उन्हाळ्याच्या सुटीचे गेलो होतो. तेव्हा मी साधारण चौथी पाचवीत असेन. रात्री जेवणासाठी कोंबड्याचा बेत ठरला आणि घरातील गड्याने दुपारीच बाजारातून एक जिवंत कोंबडा आणून ठेवला. आम्ही लहान लहान मुलं त्या कोंबड्याशी खेळू लागलो. त्याला कुठे पाणी पाज, धान्य खायला घाल, तो कसा मान हलवत पुढे जातो असे सर्व निरीक्षण सुरु होते. संध्याकाळी जेव्हा मामा त्या कोंबड्याला घेऊन जायला आला तेव्हा त्याच्या दुसरीतल्या मुलाने विचारले, "बाबा, याला कुठे घेऊन चाललात?"
तेव्हा मामा म्हणाला, "अरे आता जेवणाची वेळ झाली ना म्हणून तयारी करायला घेऊन चाललो आहे."
मुलाने विचारले, "कसली तयारी? "
मामा म्हणाला, "आता रात्रीचा चिकनचा बेत आहे ना. तुला आवडते ना चिकन? म्हणून मग याला कापून त्याची भाजी बनवायला घेऊन चाललो."
"म्हणजे? मी खातो ते चिकन याचे असते? या जिवंत कोंबड्याला मारून तुम्ही चिकन बनवणार?" रडवेला होऊन त्याने विचारले.
"हो" मामा उत्तराला.
ते ऐकून माझ्या त्या लहान भावाने जे भोकाड पसरले, ते तो ऐकायलाच तयार होईना. त्याची आई स्वयंपाक घरातून हे सर्व ऐकत होती. तिला पण कणव आली आणि तिनेही मामाची समजूत घातली. चिकनचा बेत म्हणजे पाहुण्यांसाठी मेजवानी परंतु त्या दिवशी रात्री शुद्ध शाकाहारी स्वयंपाक झाला.

एवढेच नाही तर मामीने तो कोंबडा चक्क पाळला. पुढे त्याच्यासाठी कोंबडी आणून त्यांची पिल्ले पण झाली. अन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मामीने त्या दिवसापासून मांसाहार करणे सोडले. आई बरोबर माझा लहान मामे भाऊही शाकाहारी झालाच हेवेसांनल.

भीडस्त's picture

6 Sep 2016 - 3:35 pm | भीडस्त

बरेच दिवस झाले म्हणायचं राहून गेलं होतं
आज म्हणून घेतो

असा मिपाचा मोदकु (गोष्टी)वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया मिपाभाळ

मित्रहो's picture

6 Sep 2016 - 3:59 pm | मित्रहो

सायकलींग सारखी भन्नाट गोष्ट नाही. तुम्ही सांगितलेला एकेक किस्सा भन्नाट आहे. मजा आली वाचून.

मला सायकलींगने झालेला एक फायदा म्हणजे नवे मित्र, नव्या ओळखी, नवे ग्रुप.
सायकल चालवल्याशिवाय कळत नाही की आपण रोज ज्या रस्त्याने जातो त्यात चढ उतार सुद्धा आहेत.
शहरातून थोडच दूर गावात गेलो की मुल कौतुकाने बघत म्हणतात 'गिअरा सायकला'. मोठी राइड असली की बरेच सायकलस्वार गावातून जातात मग मुले रस्त्याच्या कडेने उभे राहून तुम्हाला टाळी देतात. त्यावेळेला आपण फार मोठ्या स्पर्धेत भाग घेत असल्यासारखे वाटते.
आमच्या इथे नेहमी होनारा संवाद
"किधरसे आया"
"हैद्राबाद"
"किधरकू जाता"
"हैद्राबाद"
"कायकू चलाता इतना सायकला"
एकाने तर हेही विचारले सायकल चलानेका पैसा मिलता है का म्हणून.

एकदा नवीन रस्त्याने यायचे म्हणून आम्ही नेहमीचा रस्ता सोडून गुगल मॅप वापरुन आतल्या रस्त्याने आलो. रस्ता फुटलेला, खडबडीत, पवासामुळे साचलेले पाणी, चिखल असा रस्ता होता. अशा वेळेस सायकल हमखास पंक्चर होते. एका गावात आम्ही असाच पंक्चर काढत होतो. ती पंक्चर काढनारी मुल इंग्रजीत बोलत होती. त्यांच्या भवताल सारी गर्दी जमली होती. आम्ही आठ दहा जण, बघायला गावातली बरीच मुल आणि माणसे जमा झाली. एका गावकऱ्याने येउन विचारले
"क्या हुवा"
"सायकलका पंक्चर निकाल रहे है"
"ऐसा अंग्रेजी बोलके"
कुणी इंग्रजी बोलनारा पंक्चर काढू शकतो यावरच त्याचा विश्वास नव्हता वाटते.

सायकल म्हणजे स्वातंत्र्य मनमोकळे पणे, वाटेल तेंव्हा, वाटेल तसे फिरायचे स्वातंत्र्य. मी कितीतरी रस्त्यांवर सायकलींनीच आधी गेलो, कितीतरी जागी आधी सायकलीने गेलो आणि मग दुसऱ्या वाहनाने.

लेख आवडला आणि चित्रे सुद्धा सुंदर. Merida Rocks

अशाच प्रकारचा अनुभव अनेकवेळा आला आहे..

सायकल चालवत असताना शेजारी गाडीवरून येतात आणि सरळ महाराष्ट्रीयन हिंदीत सुरू करतात.

"किदरकू जा रहे हो..?"

(म्हणजे सायकल चालवणारा इथला असूच शकत नाही असे काहीतरी..)

मग आपण त्यांच्याकडे बघून शुद्ध मराठीत उत्तरे दिली की त्यांच्या पण चेहर्‍यावर समाधान येते आणि लगेच गप्पा सुरू करतात.

मित्रहो's picture

12 Sep 2016 - 10:28 am | मित्रहो

आणखी येनार अनुभव म्हणजे एकच प्रश्न
"कितनेका है"
माझे ठरलेले उत्तर
"किरायेका है, पचास रुपयेमे चार घंटा ऐसा मिलता है"

नवीन चांगली सायकल घेतल्यानंतर तिला बाहेर ठेवायची इच्छा होत नाही. ती घरातच ठेवतो तेंव्हा पहिल्यांदी बायको नाही म्हणते मग किंमत वगेरे जास्त आहे चोरीची भिती वगेरे म्हटले की घरात सायकल ठेवता येते. सायकल गॅलेरीत ठेवली. परंतु सायकल म्हणजे कपडे वाळू घालायची जागा ही शिकवण काही जात नाही. त्या सायकलवर तो टॉवेल वाळू घातला आणि त्याचे घागे गिअरच्या आसपास फिरायला लागले की माझी धडधड वाढत होती. शेवटी मी सायकल माझ्या खोलीत ठेवली. घरी कुणी पाहुणे आले की त्यांना आश्चर्य वाटते. बोलण्यात मी जे बायकोला सांगितले ते ती त्यांना सांगते मग ते रोज त्या सायकलकडे फार साशंक नजरेने बघतात. ही सायकल आहे की इंद्राचा ऐरावत. कदाचित मूर्ख माणसे आहेत म्हणून सोडून दिले. तरी बर महागडी कार्बन रोड बाइक नाही.

राइडला गेल्यावर कुठे बाहेर सायकल उभी केली की गावातली मुल गिअरशी खेळतात, रनिंग मधे झटका बसतो. हल्ली मी आधी जागेवरच हाताने पायडल फिरवितो आणि मग निघतो.

अनन्न्या's picture

6 Sep 2016 - 4:19 pm | अनन्न्या

अजून लिहा

बाळ सप्रे's picture

6 Sep 2016 - 5:02 pm | बाळ सप्रे

भारी किस्से मोदका..
खासकरून

माणुसकीचा अंश आज जर कुठे टिकून असेल.. तर तो खेड्याऽत..!

आणि

"असू दे, असू दे. वाईट दिवस सगळ्यांच्यावर येतात बघ."

लाँग राइडला असे बरेच जण गप्पा मारायला उत्सुक असतात सायकलवाल्यांशी..
मला एकदा एक मोटरसायलकवाला भेटला होता बाजू बाजूने चालवत होता बराच वेळ.. मला पुढेही जायला देइना मागेही जायला देइना.. थोड्यावेळाने म्हणाला तुमचा स्पीड मोजत होतो.. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2016 - 9:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> थोड्यावेळाने म्हणाला तुमचा स्पीड मोजत होतो.. :-)

हाहाहा ! भारी.

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

6 Sep 2016 - 5:20 pm | स्वाती दिनेश

किस्से भारीच!
लेखही खुसखुशीत!
स्वाती

स्मिता_१३'s picture

7 Sep 2016 - 4:24 pm | स्मिता_१३

खुमासदार लेख. !!

मुक्त's picture

7 Sep 2016 - 5:36 pm | मुक्त

छंद आणि लेखण दोन्ही.

नूतन सावंत's picture

7 Sep 2016 - 7:55 pm | नूतन सावंत

झकास किस्से.सायकल चालवणं राहूनच गेलं.

तुमचा प्रवास, तुमचे लिखाण आणि फोटो सगळंच झकास.

तुमच्याप्रमाणेच ज्यांना ज्यांना असा काही छंद नाही खरंतर खाज असेल त्यांना आपल्या छंदाला न्याय देता येईल अशी नोकरी/ व्यवसाय मिळावा अशी श्रीं च्या चरणी प्रार्थना.

एक छोटीशी फुटकी वीट.
मागच्या आठवड्यात शहरातून माझ्या MTB वरून हेल्मेट,ग्लोव्हज अश्या साज शृंगारासह निघालो होतो. एका चौकात सिग्नलसाठी थांबलो होतो. तिथे भिक मागणारे कम चायनीज कचरा विकणा-या (इमर्जिंग अंतरप्रीनर) पैकी आठ दहा वर्षाचा मुलगा आला पाण्याच्या बाटलीवर लावयचा स्प्रे विकत होता तो. मला वाटलं तो आता स्प्रे गळ्यात मारेल किंवा भिक मागेल. पण तसे काही न मागता तो मला सरळ माझी सायकल मागत होता. ते पण चक्कर मारायला नाही तर अशीच.

पिलीयन रायडर's picture

7 Sep 2016 - 9:26 pm | पिलीयन रायडर

किश्श्यांसाठी परत ह्या धाग्यावर आल्याचे सार्थक झाले!! आणि इथेल केडी तुमचा कोंबडा बनवणार होते का?!! मग काय आनंदानी लोक सायकली चालवत येतील हो सोबत!!

वाटण घेउन येऊ म्हणे =))

पेठकर काका (नाव बदलले नाही) ह्यांनी तर धमाल उडवुन दिलीये ह्या धाग्यावर!!

इथेल केडी तुमचा कोंबडा बनवणार होते का?

हो, पण त्या राईड चा खरा हिरो तो कोंबडाच होता, अगदी त्याच्या "शेवंटा" नंतर सुद्धा भाव खाऊन गेला. :-))

राघवेंद्र's picture

7 Sep 2016 - 10:01 pm | राघवेंद्र

मस्त आवड , किस्से सांगायची पध्द्त आणि किस्से !!!

खटपट्या's picture

7 Sep 2016 - 11:04 pm | खटपट्या

बबौ काय धमाल धागा आहे हा. कस्काय सुटला नजरेतुन....

रुपी's picture

8 Sep 2016 - 3:21 am | रुपी

छान लेख! लेखातले आणि प्रतिसादांमधले किस्सेही मजेशीर आहेत :)

प्रशांत's picture

8 Sep 2016 - 9:57 pm | प्रशांत

किस्से आणि सायकल चे फोटो फारच आवडले.

सायकल घेवुन १ महिना झाला असेल, हिंजेवडी फेज ३ TCS जवळील सर्कल मधे पाणी प्यायला /थोडी विश्रांती घ्यायला थांबलो असाता टेम्पो वाला (नाव माहित नाही) बाजुला येवुन थांबला
टेम्पो वाला (नाव माहित नाही) - कुठे जाताय?
मी - पिरंगुट
टेम्पो वाला (नाव माहित नाही) - टाका सायकल मागे आणि बसा
मी - काय?
टेम्पो वाला (नाव माहित नाही) - सोडुन देतो, मी तिकडेच जातोय
मी - नाही, नको..
टेम्पो वाला (नाव माहित नाही) - पैसे नका देवु
मी - अहो दादा नको जा तुम्हि
टेम्पो वाला (नाव माहित नाही) - शपथ घेवुन सांगतो खरच पैसे नाहि मागणार
मी - अहो मला सायकल चालवायची आहे तुम्हि जा,
(तो बाबा हलायला तयारच नव्हता) शेवटी त्याला म्हटल मी तुमच्या टेम्पोचा फोटो काढतो त्यात तुमचा नंबर येइल गरज वाटल्यास फोन करतो.
फोटो काढायची अ‍ॅटिंग केली केली तेव्हा कुठे निघाला तो.

प्रचेतस's picture

9 Sep 2016 - 2:18 pm | प्रचेतस

बशीवला टेंपोत.

सिरुसेरि's picture

9 Sep 2016 - 1:27 pm | सिरुसेरि

भारी अनुभव

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Sep 2016 - 2:07 pm | भ ट क्या खे ड वा ला

अजुन काही किमी चालला असता.
फारच लवकर संपला .
किस्से भारीच .

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Sep 2016 - 2:07 pm | भ ट क्या खे ड वा ला

अजुन काही किमी चालला असता.
फारच लवकर संपला .
किस्से भारीच .