बेबिन्का किंवा बिबिक हा एक पारंपरिक गोवन केक. ख्रिसमस किंवा इतर सणासुदीला केला जाणारा हा गोड पदार्थ. हा पदार्थ पोर्तगाल आणि मोझाम्बिक ह्या देशात देखील आवडीने बनवून खाल्ला जातो. पारंपरिक पाककृतीत ७ किंवा १६ पदरी केक बनवतात, व रंग वापरला जात नाही. मी थोडा आकर्षक करायला खायचा रंग वापरून केलेला आहे.
साहित्य
४०० ml नारळाचं दूध किंवा १ कॅन नारळाचं क्रीम
१ कप साखर
१० अंडी
१ १/२ (दीड) कप मैदा
१ १/२ (दीड) चमचा जायफळ पूड
१ १/२ (दीड) चमचा वेलची पूड
तूप (भरपूर)
मीठ, एक चिमूट
खायचा रंग (ऐच्छिक)
कृती
नारळाचं दूध आणि साखर एकत्र करून, साखर विरघळे पर्येंत नीट फेटून घ्या.
अंड्यांचे पांढरे व बलक वेगळे करून घ्या. आपल्याला बलक वापरायचे आहे. (पांढऱ्या भागाची मस्त भुर्जी बनवून टाका नंतर!). नारळाच्या दुधात एक एक करत बलक टाकून, मिश्रण नीट फेटून घ्या (ह्याला हॅन्ड मिक्सर वापरल्यास उत्तम राहील).
मैदा आणि मीठ नीट चाळून , मिश्रणात घाला. मिश्रण परत एकदा नीट फेटून घ्या, गुठळ्या होता कामा नयेत. जायफळ आणि वेलची पूड घालून मिश्रण फेटून घ्या. रंग वापरात असल्यास जितके रंग असतील (अधिक पांढरा) तितके सम प्रमाणात मिश्रणाचे भाग करून घ्या. प्रत्येक भागात रंग घालून (एक चिमूट किंवा २ थेंब), मिश्रणाचा रंग एकसारखा होईस्तोवर नीट फेटून घ्या.
ओवन १८० ला प्रे-हिट करून घ्या. बेकिंग पॅन ला एक तुपाचा हात लावून घ्या. पॅन ओवन मध्ये ठेवून जरा गरम झाला की बाहेर काढा. आता ओवन ग्रील मोड मध्ये ठेवा (वरून धग लागली पाहिजे). आपल्याला मिश्रणाचे थर लावायचे आहेत. एक ते दोन डाव मिश्रण (आपल्या आवडीच्या रंगाचे) पॅन मध्ये घालून, व्यवस्थित पसरून, ओव्हन मध्ये ठेवा.
साधारण ३ ते ४ मिनिटे ओवन मध्ये मिश्रण शिजले की बाहेर काढा. मिश्रण अर्धवट शिजलेले हवे. ह्यावर भरपूर तूप लावा (ब्रश असेल तर उत्तम, नाहीतर चमच्याने सोडा आणि पसरा). आता दुसऱ्या रंगाचा थर लावा. परत ओवन मध्ये ठेऊन अर्धवट शिजवून घ्या. बाहेर काढून तुपाचा अभिषेक करा. ही कृती सगळ्या मिश्रणाचे भाग संपे पर्येंत करायची आहे.
शेवटचा थर नीट शिजला (सुंदर वेलची, जायफळ चा वासाने लगेच कळेल) की पॅन बाहेर काढून, परत वरून थोडा तूप लावा. हा बहुपदरी केक आता गार करायला ठेवा. एकदा झाला की अलगद एक प्लेट मध्ये उपडा करून, कापून सर्व्ह करा!
प्रतिक्रिया
23 Jun 2016 - 2:09 pm | सूड
हा पदार्थ अंडे न घालता करता येईल का?
23 Jun 2016 - 2:34 pm | केडी
केक किंवा कुठलाही बेक्ड पदार्थ करताना अंड वापरतात, त्याला कारण आहेत. अंड्याच्या बलकातल्या चरबी (फॅट) मुळे मिश्रण एकजीव होते, त्याला एक स्मूथ क्रिमी टेक्शर मिळते. तुम्ही अंडी न घालता ह्या काही गोष्टी वापरून बघू शकता
१. सिल्कन टोफू (१/४ कप = १ अंड). हे मिक्सर मधून काढून एकदम मऊ करून घायचं
२. केळ (अर्धे केळं = १ अंड). पण ह्याने पदार्थाची चव थोडी बदलेल (हे शकतो केक, पॅनकेक करताना वापरावे)
३. जवस (Flaxseed, १ मोठा चमचा जवस, ३ मोठे चमचे पाणी = १ अंड). हे मिक्सर मधून काढून मग बराच वेळ फेटून घायचा. त्याच एक चिकट मिश्रण तयार होईल, ते वापरावं
23 Jun 2016 - 2:10 pm | मोदक
भारी..!!!!
23 Jun 2016 - 2:16 pm | विअर्ड विक्स
कलरफुल एकदम... आता दोदोल पण येऊ द्या..
23 Jun 2016 - 2:24 pm | पद्मावति
वाह, खूप मस्तं!
23 Jun 2016 - 2:26 pm | सविता००१
कसला सुरेख दिसतोय..
23 Jun 2016 - 2:29 pm | sagarpdy
तोंपासु
23 Jun 2016 - 6:22 pm | अजया
मस्तच दिसतंय.
23 Jun 2016 - 6:43 pm | Jayanti
मस्त
23 Jun 2016 - 6:53 pm | नूतन सावंत
झकासच दिसतंय.
23 Jun 2016 - 8:20 pm | बाबा योगिराज
भरपूर पेशन्स आहेत राव.
एक नंबर.
23 Jun 2016 - 9:02 pm | उल्का
वाचता वाचता मनात आलेले प्रश्न -
ह्यात बेकिंग पावडर किंवा सोडा नाही घालायचा का?
सर्वात पहिला थर अतिबेक होणार नाही का?
अंड्याचे फक्त बलक वापरल्याने केकला अंड्याचा वास येत नाही का?
(कारण मला स्वतःला तो वास सहन होत नाही म्हणून एकदा मी फक्त पांढरा भाग वापरून चॉकोलेट केक केला होता. चांगला हलका झाला होता. तसे इथे करून बघितले तर...असेही मनात आले. त्यात मी बेकिंग सोडा मात्र वापरला होता.)
23 Jun 2016 - 9:43 pm | केडी
पाककृती हि मला माहित असलेली पारंपरिक कृती आहे. वर प्रतिसाद दिल्या प्रमाणे अंड्या ऐवजी चे पर्याय आपण वापरून बघू शकता.
बेबीन्का हा एक डेन्स (dense) केक असतो. सोडा वापरून कदाचित मिश्रण फसफसेल. पण प्रयोग करून बघायला हरकत नाही. करून बघा आणि जमला तर नक्की सांगा.
24 Jun 2016 - 8:30 am | असंका
चित्रात आठ थर असावेत. सगळ्यात वरचा थर लावल्यानंतर केक किती वेळ बेक केला आहे?
(वास सुटेपर्यंत, यावरून काहीच अंदाज न आल्याने....)
24 Jun 2016 - 10:30 am | केडी
शेवटचा थर लावल्यानंतर केक अजून ८ ते १० मिनिटे बेक करायचा आहे. केक बाहेर काढल्यावर सुद्धा नंतर शिजत राहतो त्यामुळे कच्चा राहणार नाही. थर शक्यतो जितका पातळ करता येईल तेवढा करावा म्हणजे लवकर शिजतो.
24 Jun 2016 - 9:19 am | त्रिवेणी
भारी डिस्टेय पाककृती.पण इतका संयम नै बा स्वयंपाकात सो बघुनच समाधान mananyat आलेय.
24 Jun 2016 - 11:12 am | सस्नेह
नारळाच्या दुधातला केक म्हंजे टेंप्टिंग टेस्ट असणार.
वेलचीमुळे अंड्याचा वास नाही येणार पण बेकिंग पावडर नसल्याने न फुगलेला केक पिठूळ लागत नाही का ?
बाकी पाकृ भलतीच दमाची आहे.
24 Jun 2016 - 11:08 am | धनंजय माने
भलताच साजिरा दिसतोय पदार्थ. आवडला
24 Jun 2016 - 11:15 am | पियुशा
कल्लर फुल्ल केक लैच जरा दिसतोय :)
24 Jun 2016 - 2:06 pm | स्वामिनी
बेबिन्का किंवा बिबिक हा प्रकार Moist च असतो. एका गोवन मित्रामुळे अस्सल गोवन बेबिन्का खाल्ला आहे बरेचदा.