East India Company - भाग २

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
1 May 2016 - 4:10 pm
गाभा: 

या भागात कंपनीचा चायना टी ट्रेड हा टॉपिक घेतोय. कारण हा कंपनीचा एक महत्वाचा मोठा ट्रेड होता. हा चालवतांना कंपनीची ट्रेड स्कील्स व इतरही अनेक बाबी प्रकर्षाने जाणवतात दुसर भारताच्या शेजारीच एका भिन्न देशात भिन्न परीस्थीतीत मुख्य म्हणजे राजकीय वर्चस्वाच्या अभावातही हीच सेम कंपनी कसे काम करत होती हे बघणे भारतीय संदर्भात भारताने कंपनीला दिलेल्या प्रतिसादाच्या तुलनेत बघणे हे तुलनेसाठी अधिक योग्य वाटते व कंपनीच्या क्षमता मर्यादांचे एकुणच कंपनीचे कदाचित अधिक अचुक आकलन होउ शकते असे वाटते. शिवाय या ट्रेड शी असलेला भारताचा घनिष्ठ संबंध हेही एक कारण.

चायना टी ट्रेड ची पार्श्वभुमी

१५ व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात येण्यासाठी शोधलेला नविन सागरी मार्ग आणि अमेरीकेचा "शोध" या दोन गोष्टी "युरो-एशिया ट्रेड" च्या संदर्भात सर्वात क्रांतीकारी घटना होत्या. अ‍ॅडम स्मिथ त्यांना " Two greatest events in the history of mankind " म्हणतो. लॅटीन अमेरीकेतील मेक्सीको, पेरु, बोलीव्हीआ इ. कॉलनीज च्या खाणींमधुन स्पेन ने सिल्व्हरचा प्रचंड उपसा केला. या " अमेरीकन सिल्व्हर" चा ब्रिटीश डच इ. युरोपियन देशांकडुन चायना इंडिया इ. एशियन देशांत केलेल्या खरेदीचे पेमेंट करण्यासाठी वापर केला जात असे. चायनीज माल खरेदी करण्यासाठी "सिल्व्हर" पेमेंट ला पर्यायच नव्हता. चायनाला युरोपियन देशांकडुन कुठल्याच मालाची विशेष गरज नव्हती. मात्र चायनाकडुन युरोपियन देशांना टी-पोर्सेलीन-सिल्क या सर्वच कमॉडिटीजची अत्याधिक गरज होती. अनेक वर्षे हा एकतर्फ़ी व्यापार सुरु होता. या टी-पोर्सेलीन-सिल्क च्या बदल्यात चायनामध्ये प्रचंड प्रमाणात "सिल्व्हर"ची आवक झाली. स्पेनची व्यापाराची स्वत:ची एक पद्धत होती. स्पेन स्वत: प्रचंड "अमेरीकन सिल्व्हर" अगोदर फ़िलीपाइन्स बेटांवर आणत असे. त्याच्या बदल्यात इंडियन कॉटन व चायनीज सिल्क खरेदी करुन ते पुन्हा त्यांच्या अमेरीकन कॉलनीज मध्ये नेऊन विकत असे. उरलेला माल युरोप मध्ये विकला जात असे "मनिला" त्या काळातील महत्वाचे व्यापार केंद्र होते. डचांची कंपनी व्हीओसी १६०२ मध्ये स्थापन झाली होती.(साहेबाची कंपनी १६०० मध्ये) तरी जवळजवळ १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत व्हीओसी क्लीअर विनर होती. याच्या अनेक कारणांपैकी दोन मुख्य कारणे एक डचांनी जपानशी जुळवलेले व्यापारी संबंध त्याचा मोठा फ़ायदा त्यांना "जॅपनीज सिल्व्हर" मिळवण्यात व त्याचे पेमेंट चायना इ.ला करुन आशियाई माल खरेदीस होत असे. (जपान तेव्हा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सिल्व्हर प्रोड्युसर होता. तरीही डचांना खरेदीसाठी युरोपहुन जास्तीचे सिल्व्हर आणावेच लागत असे पण या पर्यायामुळे "लोड" कमी येत असे.) दुसर डचांनी अत्यंत कुशलतेने "इंट्रा-एशियन ट्रेड" विकसीत केला होता. (भारताचा माल चायनात- चायनाचा- अ‍ॅम्बोनियात- शिवाय चायनीज सिल्कची जपान मध्ये तुफ़ान मागणी होती त्यांना चायनीज सिल्क विकुन सिल्व्हर घेणे अस इथल्याइथे सर्क्युलेशन) यातला नफ़ा पुन्हा खरेदीत गुंतवुन शेवटी घरवापसी करतांना मोठ्या प्रमाणावर एशियन माल व्हीओसी नेत असे. ही एक गंमत आहे इतक्या दुर युरोपहुन इथे येऊन एका शेजार्‍याचा माल शेजार्‍याला विकत असो. तर १७ व्या शतकाच्या अखेरीस इंग्लंडच्या नागरीकांना चाय का "चस्का" लागण्यास सुरुवात झाली होती. चहात साखर पडली ती इंग्लंड च्या "वेस्ट इंडिज" च्या वसाहती मिळवल्यावर. तिथे अफ़्रीकन गुलामांकरवी बनवलेल्या शुगरमुळे. मग इंग्लंडमध्ये टी ड्रींकिंग ची एक जोरदार फ़ॅशनेबल लाट आली. चहा ब्रिटीश समाजात संस्कृतीत कीती खोलवर रुजलेली होती आणि आहे याचा नमुना म्हणुन ही दोन विधाने बघा.
१८३९ मध्ये Tea- it,s effects, Medicinal and Moral या पुस्तकाचा लेखक G.G.Sigmond या humble friend विषयी म्हणतो.
"Man is so surrounded by objects calculated to arrest his attention, and to excite either his admiration or his curiosity, that he often overlooks his humble friend that ministers to his habitual comfort; and the familiarity he holds with it almost renders him incapable of appreciating its value."

तर १९९२ मध्ये "The book of Tea "या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दीडशे वर्षांनंतर Anthony Burgess तशीच भावना वेगळ्या शब्दात मांडतो.

"Perhaps tea is so woven into the stomach linings of the British that they cannot view it in a scholarly or an aesthetic manner. It is a fact of British life, like breathing."

कंपनीच्या चायना व्यापाराची सुरुवात

चायनाशी व्यापार करण्याचा पहील्या महत्वाच्या प्रयत्नात १६१३ त कंपनीने जपानमध्ये "हिराडो" इथे फ़ॅक्टरी टाकुन जपानमार्फ़त चायनीज मालाची खरेदी करण्याचा प्रयत्न केला.(याच काळात भारतात मासुलीपट्टम व सुरत मध्ये सुरवात झालेली होती.) जपानमध्ये व्हीओसी अगोदरच स्थिरावली होती आणि जपानला विकण्यासारख कंपनीकडे काही विशेष नव्हत. म्हणुन हा इनडायरेक्टली व्यापार करण्याचा प्रयत्न फ़सला. मध्यंतरी बरीच वर्ष चायनात मिंग आणि मंचुरीयन्स या दोन शक्तीशाली राजवटींमध्ये भीषण संघर्ष सुरु होता. ( नुडल्स राजवट ही असेल एखादी अजुन सापडली नाही.) याचा शेवट १६४४ मध्ये मंचुरीयन राजा च्या विजयात झाला. व मिंग जाऊन चिंग साम्राज्याची सुरुवात झाली. चिंग ने संपुर्ण मेनलॅन्ड चायनावर विजय मिळवला तरी बाहेर कोस्टल एरीया वर असलेल्या अ‍ॅमॉय व फ़ॉर्मोसा (तैवान) वरुन डचांना हाकलुन इथे हरलेल्या मिंग चा निष्ठावंत सेनापती "कोक्झींगा" अजुन तळ ठोकुन होता. यानंतर याचा सुपुत्र झेंगझिंग शी संधान साधुन कंपनीने अ‍ॅमॉय ला पहीली फ़ॅक्टरी १६७२ मध्ये टाकली. आता डचांचा मेनलॅन्ड चायना च्या चिंग शी सरळ संबंध होता त्यांना सरळ व्यापार करण्याची परवानगी होती. मात्र कंपनीची चिंग च्या किनार्‍यावरील शत्रुशी हातंमिळवणी होती. इथे कंपनीच्या "बॅन्टम" फ़ॅक्टरी चा मोठा फ़ायदा कंपनीला चायनाशी व्यापार करण्यात झाला. कारण हे एक मुख्यालयासारखे काम करत असे शिवाय इथुन "पीपर" मोठ्या प्रमाणावर मिळत असे. हिराडो नंतर बॅन्टम हा एक मोठा बेस होता. आणि एक बेस होता "मकाऊ" हा दिर्घकाळ पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. १६८३ मध्ये अखेर चिंग ने तैवान चा पराभव करुन संपुर्ण चायनावर सत्ता प्रस्थापित केली. इथुन १६८४ पासुन सर्व युरोपियन देशांना चायनाने व्यापार खुला केला. आणि १६९९ मध्ये कॅन्टॉन इथे कंपनीची पहीली फ़ॅक्टरी रीतसर सुरु झाली.

चायनाची व्यापारी यंत्रणा -हॉंग मर्चंट्स- टी ट्रेड चे स्वरुप इ.

१७१५ नंतर कंपनीच्या चायना वारी वाढु लागल्या. सिल्व्हर च्या बदल्यात रॉ सिल्क, पॉर्सेलीन, आणि चहाची धुमधडाक्यात खरेदी सुरु झाली. नविन चिंग राजवटीने सर्व युरोपियनांसाठी व्यापार सुरु केला मात्र ते "अतिथी दानवो भव" धोरणाने चालणारे होते. चायनाने अनेक वर्ष संपुर्ण व्यापारावर/ युरोपियनांवर एकतर्फ़ी नियमांनी "स्ट्रीक्ट" नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल होत.. सर्वप्रथम विशाल चायनाच्या अगदी एका टोकावर असलेल्या किना‍र्‍यावरील "क्वांगटांग" प्रांताच्या राजधानी "कॅन्टॉन" पुरताच विदेशी व्यापार मर्यादीत केला (अपवाद- फ़ार कमी काळ इतर बंदरे वापरु दिली होती). विदेशींना कॅन्टॉन व्यतिरीक्त इतर कुठल्याच बंदरात शहरात व्यापार तर दुरच राहीला प्रवेशही नव्हता.( काही मोजक्या पोर्ट मध्ये परवानगी होती पण नियम असे की कॅन्टॉन ला पर्याय मिळु नये असेच सरकारी धोरण होते ) दुसर चहाचा एक विशिष्ट सीझन असे. त्यापुरताच युरोपियन शीप्स ला प्रवेश दिला जात असे तो संपल्यावर शीप्सना तिथे थांबण्याची परवानगी नव्हती त्यांनी गाशा गुंडाळुन निघुन जावे वा जवळच्या "मकाऊ" बेटावर मुक्काम करावा. या व्यापारावर कॅन्टॉन मध्ये नविन स्थापित केलेल्या चायनीज सुपरीन्टेन्ड्न्ट ऑफ़ कस्टम "हॉप्पो" बोर्ड चे कठोर नियंत्रण असे. हॉप्पो चे अधिकारी मॅन्डारीन्स व्यापारा चे नियमही ठरवत आणि मुख्य म्हणजे कस्टम ड्युटीज, टॅक्स कलेक्शन करुन पेकींग मधील "चिंग" साम्राज्याच्या ट्रेझरीत जमा करत. चायनाच्या मालाची प्रत्येक युरोपियन कंपनीला गरज आणि चायनाला त्यांच्याकडुन कशाचीच "विशेष " गरज नव्हती एकतर्फ़ी इश्क चा मामला असल्याने ज्यादतीयॉ कुछ ज्यादा ही थी. "फ़ॅक्टरीज" ना स्थापन करण्यास केवळ कॅन्टॉन मध्ये प्ररवानगी होती. ( इथे फ़ॅक्टरी म्हणजे सध्याची आधुनिक मशीनरीज व मॅन्युफ़ॆक्चरींग या अर्थाने नव्हे तर मुख्य म्हणजे यात मोठे गोडाऊन असे तिथे चालणारी पॅकींग थोडीफ़ार चिल्लर प्रोसेसींग वगैरे, अकाउंट्स बुक्स, बसण्याच ऑफ़ीस अस मिळुन फ़ॅक्टरी एक ट्रेडिंग पोस्ट्स इतकच असे. इथला कर्मचारी म्हणजे "फ़ॅक्टर") सीझन संपल्यावर "फ़ॅक्टरी" ही सोडुन जाव लागत असे. शिवाय फ़ॅक्टरी सोडुन इकडे तिकडे उंडारायलाही परवानगी नव्हती. तर चायनात एक ठराविक व्यापाराचा छान सीझन येत असे कॅन्टॉन पोर्ट विविध युरोपियन शीप्स ने व्यापार्‍यांनी गजबजुन जात असे धंदापाणी झाल्यावर सर्व परतुन जात ,तितकाच चायनाशी संबंध. कंपनीने इथे एक त्यांच्या सुपरकार्गोज च एक "कॅन्टॉन कौन्सिल" स्थापित केल होत. (सुपरकार्गो-एकेका जहाजावरील ट्रेड इन्चार्ज ) कॅन्टॉन फ़ॅक्टरी व हे कौन्सिल लंडनमधील कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्स च्या आदेशाने सुचनेने इथला कारभार चालवीत असत. कंपनीने इथे एक स्वतंत्र चायना "ट्रेझरी"ही स्थापन केलेली होती.

प्रशासनाने (हा शब्द आता पुढेही चायनीज सरकारी अ‍ॅथॉरीटीज साठी वापरतो) चायनीज व्यापार्‍यांची दोन प्रमुख गटात विभागणी केली होती. ( हे त्यांच्या इतिहासात पहील्यांदाच झाल होत ) एक ग्रुप होता चिन-सु-हॅन्ग हे व्यापारी चायनातल्या इतर बंदरावरील व देशातील केवळ चायनीज व्यापार्‍यांशी व्यापार करत. दुसरे होते यांग-हुओ-हॅन्ग हे व्यापारी केवळ फ़ॉरेनर्स शी व्यापार करत त्यांच्यासाठी खरेदी व त्यांनाच विक्री. यांनाच "हॉन्ग मर्चंट्स" म्हटले जात असे. सरकारने युरोपियन्स शी व्यापाराची स्पेशल परवानगी केवळ हॉन्ग मर्चंट्स ना दिली होती. यां हॉन्ग मर्चंट्स ची संख्या फ़ार लहान होती २०-२२ फ़क्त पुढे ती कमी कमी होत गेली. हा "चोझन फ़्यु" ग्रुप होता. सुरुवातीला युरोपियन्स "हॉन्ग मर्चंट्स "ला किंवा डायरेक्ट हॉप्पोला कस्टम ड्युटी पोर्ट चार्जेस देत असत. मात्र कलेक्शन पुरेस व नियमीत होत नव्हत टॅक्स पेंडींग राहुन जाऊ लागल्यावर प्रशासनाने हॉप्पो मार्फ़त नविन कडक नियम केला. हॉप्पो ने पाच हॉन्ग सिक्युरीटी मर्चंट्स ची निवड करायची. व व्यापारासाठी आलेल्या प्रत्येक युरोपियन शीपने यातील एक मर्चंट निवडायचा.. हा मर्चंट या शीप ला सिक्युरीटी म्हणुन राहणार एक प्रकारे हमी घेणार तो फ़ॉरेनर्स कडुन पोर्ट चार्जेस कस्टम ड्युटी वसुल करुन "हॉप्पो" त जमा करणार शिवाय युरोपियन शीप ने काही "राडा" केल्यास नुकसान केल्यास त्याचीही जबाबदारी हा घेणार. याने प्रशासना ला रेव्हेन्यु कलेक्शन ची निश्चीती आली. फ़ॉरेनर्स च्या प्रखर विरोधाला भीक न घालता चायनीज प्रशासन सातत्याने येथील कस्टम ड्युटीज मध्ये वाढ करत असे. कॅन्टॉन पेकींग मधल्या चिंग साम्राज्यासाठी मोठी रेव्हेन्यु मशीन झाली होती. संपुर्ण चायनाचा फ़ॉरेन ट्रेड करणार्‍या या मोजक्या २०-२२ हॉन्ग मर्चंट्सनी प्रचंड मोठी कमाई केली. हॉन्ग्सनी काही काळासाठी एक को हॉन्ग हा गिल्ड ही स्थापन केला होता जो कंपनीने कुशलतेने मोडुन काढला. तर ही दोन्ही बाजुने मोनोपली होती कंपनी ला ब्रिटीश सरकारकडुन व्यापाराची व चायनीज प्रशासना कडुन हॉन्ग मर्चंट्स ना फ़ॉरेन ट्रेड ची. मोनोपली समोरासमोर उभी ठाकली होती.. हॉंग मर्चंट्स च्या संप्पतीचे आकडे चक्रावणारे होते. उदा. जेव्हा १८२० मध्ये Puan Kheua II हा हॉन्ग व्यापारी वारला तेव्हा तो १० मिलीयन स्पॅनीश डॉलर्स (७२ लाख चायनीज Taels ) मागे सोडुन गेला.तरीही पुढे यापैकी अनेक हॉन्ग मर्चंट्स दिवाळखोर झाले. ते कसे ते पुढे बघु.

चायना टी ट्रेड ची प्रचंड वाढ व कंपनीच्या एकुण व्यापारातील त्याचे स्थान.

१७१० नंतर टी ट्रेड चा ग्राफ़ उंचावतच गेला. उदा. १७५० च्या वर्षात ३ मिलीयन पाउंड्स (वजनात) चहा ब्रिटनमध्ये नेण्यात आला. हा आकडा १७६० पर्यंत ६ मिलीयन पर्यंत पोहोचला. १७३० च्या दशकातला ३१ चा ग्रोथ रेट (१७२० च्या दशकाच्या तुलनेत) पुढे १७४० मध्ये ७५ % व १७५० मध्ये ८५ % पर्यंत गेला. चहाची अतीप्रचंड मागणी युरोप अमेरीकेत वाढतच चालली होती. १७११ ते १७६० च्या दरम्यान इंग्लंड मध्ये होम कन्झम्पशन नंतर उरलेला एकुण आयातीच्या सुमारे २० % चहा इतर देशांमध्ये री-एक्सपोर्ट केला जात असे. कंपनीच्या संपुर्ण आशियातुन एकुण आयात केलेल्या मालात चहाचा वाटा १६९० मध्ये १ ट्क्के पेक्षाही कमी होता. हा चहाचा वाटा १७१७ मध्ये ७ टक्के १७५० मध्ये २० टक्के आणि त्यापुढच्या दशकांमध्ये तर कधीही ४० टक्केच्या खाली आला नाही ( एकुण संपुर्ण माल आयातीच्या तुलनेत हे लक्षात ठेवा) म्हणजे हा टी ट्रेड कीती महत्वाचा होता भारतीय मालापेक्षाही याचा वाटा व आकडा मोठा होता हे ध्यानात घ्या. एक शीपवाइज ही तुलना करता येते..
१७६० मध्ये एकुण ९ जहाजे चायनात गेली त्याचे टनेज होते ४४९४ टन्स. ( यावेळेस कंपनी शीप्स ची साईज लहान होती ती पुढे वाढत गेली)
१७९० मध्ये एकुण २५ जहाजे टनेज-१८३९२
१८१५ मध्ये एकुण २४ जहाजे टनेज-२७१५० (बघा तितकीच जहाजे मात्र शीप साइज क्षमता वाढलीये)
१८३३ मध्ये एकुण २५ जहाजे टनेज-२८१६७ ( या वर्षी मोनोपली संपली इतर इंग्लीश ट्रेडर्स ना चायना टी व्यापाराची परवानगी मिळाली.)
शिवाय हे एक बघा १७५१ ते १७६० मध्ये टी सेल अमाउंट होती-७२,३६,४२१/- पाउंड्स
१७७१ ते १७८० मध्ये १,०५,१८,३०२/- पाउंड्स
१७८१ ते १७९० मध्ये १,९८,०८,४९६/- पाउंड्स
१८०० ते १८१० मध्ये ३,८२,७२,३०३/- पाउंड्स
यासाठीच जरी १८१३ मध्ये कंपनीकडुन भारतीय व्यापाराची मोनोपली काढुन घेण्यात आली तरीही पुढे १८३३ पर्यंत सुमारे २० वर्षे चायनीज टी ट्रेड मधली कंपनीची मोनोपली मात्र अबाधित ठेवण्यात आलेली होती. त्यानंतर मात्र हा व्यापार सर्वच ब्रिटीश व्यापार्‍यांसाठी खुला करण्यात आला. या सतत वाढत असलेल्या आलेखामागे "इंडिया" चा मोठा हात होता कस ते पुढील भागात बघु.

चहाच्या विविध ग्रेड व त्यांचा क्वालिटी कंट्रोल

कंपनी मुख्यत: दोन प्रकारच्या चहाची खरेदी करत असे. त्या म्हणजे ग्रीन टी आणि ब्लॅक टी. याचे ढोबळ वर्गीकरण म्हणजे ब्लॅक टी ही फ़र्मेंटेशन केलेली व ग्रीन ही नॉन-फ़रमेन्टेड. पुन्हा ब्लॅक टी मध्ये बोहीया, कॉन्गु, कॅम्पॉइ, सोचॉन्घ आणि पिको. हे पाच मुख्य प्रकार ब्लॅक टी चे होते. आणि सिंगलो, ट्वान्कॉय, हायसन, आणि गनपावडर या ग्रीन टी च्या मुख्य व्हरायटीज होत्या. यामध्ये पुन्हा अनेक उपप्रकार होतेच. यात एक गंमत होती. जरी चहाचे असंख्य प्रकार होते. तरी झाडाची जात एकच होती त्याची वेगवेगळी कलमे रोपे नव्हती. मग एकाच क्वालिटीच्या झाडातुन इतका फ़रक कसा ? तर ते जमिन, पाने खुडण्याचा सीझन, आणि क्युरींग व प्रॉडक्शन मुळे बदलत असे. उदा. बोहीया वर्षातुन चार वेळा तोडली जात असे. वसंतात खुडलेल्या कोवळ्या पानांची क्वालिटी सर्वोत्कृष्ठ असे. "यंगर द लीफ़ स्ट्रॉन्गर द टी " ही व्याख्या होती. याच चहाला इंग्रजी त पिको हे नाव होते. (सध्यापण बाजारात पिको चहा मिळतो.)
तर कंपनीसाठी क्वालिटी फ़ार महत्वाची आग्रहाची बाब होती. यासाठी त्यांनी अनेक मार्ग अवलंबले. एकदा माल कॅन्टॉन च्या गोडाऊन मध्ये आल्यावर हॉन्ग मर्चंट्स एकेका चॉप मधुन काही नमुने काढुन कंपनीला पाठवत. कंपनीच्या "टी हॉल " मध्ये इन्स्पेक्शन होत असे. टेस्टींग च्या विवीध पद्धती विकसीत केल्या गेल्या होत्या. उदा. चहाची पाने उकळत्या पाण्यात काही वेळ टाकुन मग त्यांचा रंग सुगंध चव तपासणे. ऊकळत्या पाण्याचा पानाच्या आकारावर होणारे परीणाम हाही एक निकष होता. एकेक पानाचे वजन करणे हा एक,इ. याचा सरळ संबंध किमतीशी होता. जिथे चहाची क्वालिटी कमी आढळली तिथे कंपनी सरळ दर कपात करुन टाकत असे. सुपरकार्गोज ना या संदर्भात डायरेक्टर्स च्या स्ट्रीक्ट ऑर्डर्स होत्या.
१७८४ साली इंग्लडमध्ये कम्युटेशन अ‍ॅक्ट पास करण्यात आला. हा या व्यापारावर प्रचंड दुरगामी बदल करणारा अत्यंत महत्वाचा कायदा होता. याच सुमारास चायनीज मर्चंट्स नी चहात भेसळ करण्यास सुरुवात केली. म्हणजे वरच्या दर्जाच्या चहात हलक्या दर्जाची चहा मिसळणे हा प्रकार. १७८९ मध्ये जो माल इंग्लंडमध्ये नेण्यात आला तो फ़ार भेसळ वाला व निन्म दर्जाचा होता. यावर उपाय म्हणुन मग डायरेक्टर्सनी १७९० साली लंडनहुन "चार्ल्स आर्थर" या प्रोफ़ेशनल टी टेस्टरची नेमणुक कॅन्टॉन मध्ये केली. हा माणुस जीनीयस होता. तर इथे आर्थर ने ग्रेडींग ची एक जबरदस्त शास्त्रीय अचुक सिस्टीम विकसीत केली. जी भविष्यातही कंपनीला फ़ार उपयोगात आली.वर सांगितल्याप्रमाणे सुरुवातील कंपनी चॉप मधुन काही सॅम्पल घेऊन तपासत असे. व त्या आधारावर सुपरकार्गोज हॉन्ग मर्चंट्स दर निश्चीत करत.. हॉन्ग्स नी सतत उत्कृष्ठ दर्जा पुरवावा म्हणुन कधी कधी जर ठरलेल्या भावापेक्षा वरच्या दर्जाचा चहा आला तर भाव वाढवुन द्यायलाही कंपनी मागेपुढे पाह्त नसे. तर या ग्रेडींग सिस्टीमनुसार चहाच्या ग्रेडसाठी जवळजवळ २० टेक्नीकल टर्म्स टी इन्स्पेक्टर्स वापरत असत. यात सर्वात हलक्या ग्रेड पासुन उदा. मस्टी अ‍ॅन्ड मोल्डी, मस्टी, ऑड स्मेल, डस्टी, स्मोकी, थ्रु, ऑर्डीनरी, गुड ऑर्डीनरी, बट मिडलींग, मिडलींग, गुड, व्हेरी फ़ाइन, आणि सर्वात वरची ग्रेड होती."सुपरफ़ाइन" या ग्रेडे ला अर्थातच सर्वात जास्त भाव मिळत असे. प्रत्येक ग्रेड वेल डिफ़ाइन्ड आणि शास्त्रीय तांत्रिक निकषांवर आधारीत होती. "बट मिडलींग " ग्रेड मध्यावर होती हा मध्यम्म दर्जा मानला जात असे.. डायरेक्टर्स नी एक आदेश काढुन सुपरकार्गोज ना बजावले की " द क्वालिटी ऑफ़ ऑल कॉन्ट्रॆक्ट टीज हॅड टु बी अ‍ॅट ऑर अबोव्ह द " बट मिडलींग " कॅरेक्टर्स डिफ़ाइन्ड बाय इन्स्पेक्टर्स " म्हणजे किमान मध्यम दर्जाच्या वरचाच माल खरेदी करायचा. (एक हदसे नीचे नही गिरनेका.) आदेश बजावला व हे धोरण कायम ठेवले. पॅकींग मध्येही हलके लाकुड वापरल्यास कंपनी दंड लावुन पेमेंट मध्ये कपात करत असे. रिजेक्टेड माल रीटर्नही होत असे. या सततच्या प्रयत्नांना यश येऊन उत्तरोउत्तर कंपनीच्या चहाचा दर्जा वाढतच गेला व रीजेक्शन च प्रंमाण घटुन मोनोपलीच्या शेवटच्या काही वर्षात तर ते टोटल टी परचेसच्या ०.३ % पेक्षा कमी शिल्लक राहील इतका उत्कृष्ठ क्वालिटी कंट्रोल कंपनीने साध्य केला होता.

कॉन्ट्रॅक्टींग आणि अ‍ॅडव्हान्सींग सिस्टीम

कंपनीने १७१० नंतर चहा च्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात "कॉन्ट्रॅक्टींग" सिस्टम राबवलेली होती. याचा पुरावा कंपनीच्या कॅन्टॉन डायरी त थेट १७१६ पासुन सापडतो. या चायनीज व्यापार्‍यांशी केलेल्या चहाच्या खरेदी करारांमध्ये, किंमत, क्वालिटी ग्र्ड इतकच नव्हे तर मालाच्या डिलीव्हरी डेट/ पिरीयड चा ही काळजीपुर्वक स्पष्ट उल्लेख केलेला असे. उदा. १७२३ मध्ये कंपनीच्या सुपरकार्गोजनी "किकुआ" या व्यापार्‍याशी केलेला हा करार बघा याची डायरीत नोंद अशी येते की " Contracted with Quiqua for 500 peculs of Bohea Tea, head sort, at 23 tales per pecul. which must be delivered in 100 days" सर्वसाधारण डिलीव्हरी पिरीयड १०० ते १२० दिवसांचा असे, १७४० नंतर जेव्हा खरेदी चे प्रमाण प्रचंड वाढले त्या नंतरच्या काळात कॉन्ट्रॆक्ट मध्ये (चायनीज मर्चंट्सनी मालाचा दर्जा सांभाळावा यासाठी) किंमत क्वालिटी ग्रेडनुसार कमी जास्त करण्याच्या तरतुदींचा समावेश होऊ लागला. काही कॉन्टॆक्ट्स मध्ये तर सुपरकार्गोज चहाची "प्राइस" प्रत्यक्ष मालाची डिलीव्हरी मिळाल्या नंतरच ठरेल हे कलमही टाकु लागले. हे केवळ " फ़ाइन / सुपरफ़ाइन ग्रेड च्या चहांच्या कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये होत असे. पुन्हा वर पाहीले तसे कंपनीला प्रत्येक जहाजावर एक सिक्युरीटी हॉन्ग मर्चंट घ्यावा लागत असे. कंपनी या बाबतीत जो कमीत कमी दर देइल त्याला सिक्युरीटी मर्चंट म्हणुन निवडत असे. १७५० नंतर एका सीझनच्या शेवटी घरवापसी पुर्वी कंपनीने पुढील येणार्‍या सीझन साठीही चहा खरेदीचे "कॉन्ट्रॅक्ट" करण्यास सुरुवात केली. यांना " विंटर कॉन्ट्रॅक्ट्स" म्हटले जात असे. या करारांसाठी हॉंग मर्चंट्सना" अ‍ॅडव्हान्स" देण्याची सिस्टीम कंपनीने सुरु केली. या कॉन्ट्रॅक्टेड मालाची डिलीव्हरी पुढील सीझन च्या सुरुवातीला देणे करारान्वये बंधनकारक होते ते न जमल्यास हेवी पेनाल्टीची तरतुद ही टाकली जात असे. अ‍ॅडव्हान्स पर पेकुल ( हे एक चायनीज युनिट होते तर टाएल हे चायनीज चलन होते) असे . उदा. हे बघा. " 1759-60 चा सीझन संपल्यावर "मकाऊ" ला जाण्यापुर्वी "स्वीटीया " या व्यापार्‍याशी केलेल्या या "स्वीट" कराराची नोंद बघा." The company contracted with "Sweetia" to provide 3000 peculs of Bohea at 12.5 taels per pecul. 500 peculs of Twankay at 23 taels. per pecul. For Bohea tea. "Sweetia" would receive 10 taels each per pecul by way of an advance while 18 taels per pecul advance for Twankay " if delayed the provisions of contract 2 tales per pecul on each of the said teas would be deducted. हे सर्व करार लादणं शक्य होत होते कारण हे जरी "सेलर्स मार्केट" होत तरी कंपनी अनेक वर्षे चायनीज टी चा सर्वात मोठा खरेदीदार होती. तेथील इतर सर्व परकीय युरोपियन कंपन्यामध्ये सर्वात मोठा खरेदीदार. पुढे एकुण खरेदीत करारा ने केलेल्या खरेदीचा टक्का जरी मोठा होता.तरी जहाजात जागा शिल्लक राहीली तर कंपनी "ऑन द स्पॉट" ही खरेदी करत असे. हॉंग मर्चेंट्स जे टी सप्ल्यायर्स होते त्यांना "टी मेन" म्हटले जात असे. ते चहा उत्पादक प्रांतातुन मोठ्या प्रमाणात खरेदी करुन कॅन्टॉन ला आणुन हॉन्ग्स ना तो माल विकत.त्यांचा माल हॉन्ग मार्फ़त कंपनी ऑन द स्पॉट खरेदी करत असे.

ट्रकींग मेथड

कंपनीचा चायना व्यापारात सर्वात मोठा प्रॉब्लेम होता सिल्व्हर पेमेंट चा. त्यांना सातत्याने या बुलियनची जमवाजमव करुन चायनाला "सिल्व्हर"मध्ये पेमेंट करुन माल खरेदी करावा लागत असे. यावर डायरेक्टर्स कडे एकच उपाय होता तो म्हणजे इंग्लीश माल अधिकाधिक चायनात विकणे व त्यातुन मिळवलेल्या फ़ंडाने चहाचे बिल भरणे. मात्र वर म्हटल्या प्रमाणे चायनात कुठल्याच ब्रिटीश मालाची विशेष मागणीच नव्हती तो देश एका अर्थाने तसा अप्रगत पण स्वावलंबी होता. मेरे पास चाय है सिल्क है पॉर्सेलीन है तुम्हारे पास क्या है ? या चायनीज प्रश्नाला लाजत लाजत ब्रिटीश उत्तर देत असे मेरे पास वुलन है कॉपर है. यावर चायनीज डोळा मिचकावुन जोरजोरात विकट हास्य करत असे हा हा हा!!! तर एकीकडे कंपनीवर ब्रिटनमध्ये मौल्यवान सिल्व्हर चा जो ड्रेन होत होता व त्याच्या बदल्यात जे चायनीज "ओरीएंटल गुड्स" आणले जात होते यासाठी देशातुन प्रखर टीका होत होती. आणि तुम्ही "इंग्लीश गुड्स " इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात विकु शकत नाही ही विचारणा डायरेक्टर्स ला वारंवार केली जात असे. ब्रिटीश वुलन चायनात फ़ारशी विकली जात नसे कारण या "ट्रॉपिकल" हवामानाच्या देशात याची फ़ारशी गरजच नव्हती. हॉंग मर्चंट्स गरम वुलन ला थंड प्रतिसाद देत. इथे आणलेला माल विकलाच जात नसे.मात्र १७७० नंतर एकीकडे कंपनीची चहा खरेदी वाढली व दुसरीकडे हॉंग मर्चंट्स ची आर्थिक अडचण. इथे डायरेक्टर्सनी अचुक नाडी आवळली. झाले असे की घरवापसीच्या वेळी कंपनी इथे आणलेल्या वुलनची किंमत घटवुन कसाबसा माल नुकसानीत विकुन संपवत असे. तरीही घटवलेल्या किंमतीतही हॉन्ग मर्चंट्स ही वुलन घ्यायला तयार होत नसे. तर या सीझन अखेरीस जेव्हा हॉन्ग्स विंटर कॉन्ट्रॅक्ट्स साठी आले तेव्हा कंपनीने चाय के बदले वुलन लेना पडेगा नविन अट टाकली. उदा. युंगशॉ नावाच्या व्यापार्‍याला ही ऑफ़र दिली.
जर युंगशॉने एकुण मालाच्या १/४ वुलन घेतली तर खालील भाव मिळेल.
5000 peculs of bohea @ 15.5 taels
1000 peculs of bohea @ 25.5 taels
1000 peculs of 1st sort of Singlo @ 23.5 taels
जर त्याने वुलन नाही घेतली तर खालील कमी दराने कंपनी त्याचा माल विकत घेईल.
5000 peculs of bohea @ 14.5 taels
1000 peculs of bohea @ 24.5 taels
1000 peculs of 1st sort of Singlo @ 22.5 taels
पुन्हा जर त्याने ३/४ वुलन घेतली तर अजुन वेगळे भाव अशी एक फ़ार डिटेल ऑफ़र होती. थोडक्यात जितकी जास्त वुलन घेण्याची तयारी युंगशॉ दाखवेल तितका अधिक दर त्याला मिळत जाईल. याला ट्रकींग मेथड म्हटले जात असे. ही ट्रकींग मेथड फ़क्त वुलनच नव्हे कॉपर,मेटल्स इ. ब्रिटीश गुड्स खपवण्यासाठी कंपनीकडुन सातत्याने वापरली जाऊ लागली हा एक ट्रेंड च त्यांनी चायनात प्रस्थापित केला. याचा सर्वात मोठा फ़ायदा म्हणजे" सिल्व्हर बुलियन" देण्याचा लोड कमी होत असे. हॉन्ग मर्चंट्स हा जबरदस्तीचा सौदा पुढे "टी मेन" जे त्यांचे सप्लायर्स होते त्यांच्याशी याच रीतीने ट्रकींग करुन पुढे ढकलत नेत असत. हळुहळु या सवयीने ब्रिटीश गुड्स चा थोडा नॅचरल सेल ही वाढु लागला. लोकांना ब्रिटीश मालाची सवय होऊन मागणीही येऊ लागली.

कंपनी सर्व्हंट्स चा समांतर चालणारा प्रिव्हीलेज ट्रेड

कंपनीच्या कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्स समोर नेहमीच चायनात प्रचंड प्रंमाणात केलेल्या खरेदीच "टी पेमेंट" कस करायच हा यक्षप्रश्न असे. याची सोडवणुक त्यांनी कशी केली या पेमेंटसाठीचे फ़ंड रेजींग जुळवणी ते कसे विवीध क्रिएटीव्ह मार्गांनी करत हे बघण्यासारखे आहे. ब्रिटनमधुन कमीत कमी बुलियन आणणे हा प्रयत्न असे. व इथल्याइथे इतर सर्व मार्ग अवलंबुन पेमेंट उभे करुन "लोड" कमी करण्याचा प्रयत्न डायरेक्टर्स सातत्याने करत.तर कंपनीच्या सर्व्हंट्स ना कंपनीकडुन व्यक्तीगत स्वत:चा खासगी व्यापार करण्याची युनिक परवानगी होती (डचांच्या व्हिओसी त नव्हती) याला कंपनी "प्रिव्हीलेज ट्रेड" म्हणत असे. याचेही काही नियम होते उदा. काही कमॉडिटीज मध्ये व्यापारास बंदी होती यात saltpetre, cotton yarn, raw silk इ. चा समावेश होता. (saltpetre याचा वापर गनपावडर मध्ये होत असे आर्मीसाठी महत्वाची.) सर्व्हंट्सना चहा च्या व्यापाराला परवानगी होती मात्र १७८६ मध्ये शीपवरील पदानुसार मालाची किती क्वांटीटी जहाजावर घ्यायची हे ठरत असे. व सर्वात महत्वाच म्हणजे सेल रीसीट्स च्या ठराविक टक्के रक्कम कंपनी कमिशन वसुल करत असे. उदा.कॅप्टन ला सर्वात जास्त ६८८ अलाउड होते. चीफ़ मेट ला ९० सर्जन ला ५४ पर्सर ला ५४ गनर ला १८८ कारपेंटर ला १८ असे पदानुसार ठरत असे. यात पुन्हा १७ % ने कमिशन दिल्यास क्वांटीटी पुन्हा पदानुसार ठराविक वाढवुन मिळत असे. प्रिव्हीलेज ट्रेड मध्ये पुढे टी ही सर्वात लोकप्रीय झाली. आणि सर्व कमिशन देऊन ही सर्व्हंट्स यावर जोरदार नफ़ा कमवीत असत. एकवेळ कंपनीची फ़ंड जुळवायला कसरत होत असे पण सर्व्हंट्स मजेत होते. सर्व्हंट्स चहा व्यतिरीक्त वुव्हन सिल्क, नानकीन्स, व चायनावेअर इ. वस्तुंचा ही व्यापार करत असत. सुरुवातीच्या काळात कंपनी स्वत: मोठ्या प्रमाणात चायनावेअर चा व्यापार करत असे. नंतर ब्रिटनची स्वत:ची पॉर्सेलीन इंड्स्ट्री विकसीत झाल्याने याची मागणी ब्रिटनमध्ये घटली. कंपनीने हा व्यापार थांबवला मात्र त्यांना जहाजाच्या फ़्लोरींग साठी म्हणजे वर ठेवलेला चहाचा नाजुक महत्वाचा माल डॅमेज होऊ नये म्हणुन खाली तळावर पॉर्सेलीन रचुन ठेवणे गरजेचे असे. म्हणुन त्यांनी हा व्यापार सर्व्हंट्स ना अलाउड करुन प्रोत्साहन दिले. मात्र फ़्लोरींग साठी फ़क्त ३० टन माल लागत असे. तर एक सीलींग लिमीट त्यांनी ठरवुन टाकली की याहुन अधिक लोड करायचा नाही. केला तर दंड. सर्व्हंट्स यातही छान कमाई करुन टाकत. कारण मागणी जरी घटली तरी काही प्रमाणात इंग्लंडमध्ये ओरीजीनल चायनावेअर ची लक्झरी डिमांड होतीच त्याचा फ़ायदा सर्व्हंट्स घेत.कंपनीचे सर्व्हंट्स इंग्लंडहुनही अनेक छोटे मोठे आर्टीकल्स आणुन चायनात विकत जसे मेकॅनिकल क्लॉक्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, अमेरीकन फ़र, सॅंडलवुड, अनेक कटलरी आयटेम्स नॉव्हेल्टीज यात ते रग्गड कमाई करत. यात त्यांची माल निवडण्यातली चतुराई होती. याची मागणी मर्यादीत असल्याने "कंपनी हत्ती" याकडे दुर्लक्ष करत असे. कंपनीचा फ़ोकस बिग आयटेम्स वर होता. मात्र सर्व्हंट्सनी या व्यापारात मिळवलेल्या भांडवलाचा सिल्व्हर चा उत्कृष्ट उपयोग कंपनी करुन घेत असे. कंपनीने सर्व्हंट्स ना नफ़ा (सिल्व्हर) डायरेक्ट इंग्लंडमध्ये नेण्यास बंदी केली होती.त्यांना एकच मार्ग ठेवला होता सर्व्हंट्स नी आपल्याकडील सिल्व्हर कंपनीच्या कॅन्टॉन ट्रेझरी मध्ये जमा करायचे त्या बदल्यात कंपनी त्या किमतीचे सर्टीफ़ीकेट्स वा बिल ऑफ़ एक्सचेंज (हुंडी) इश्यु करत असे. हे बिल्स इंडिया वा व्रिटन मध्ये ९० व ३६० अनुक्रमे सादर केल्यावर पेयेबल होत असत. या मार्गाने कंपनी "सिल्व्हर" मिळवत असे जे पुढे पेमेंटसाठी वापरले जात. अशा रीतीने मोठ्या प्रमाणात प्रिव्हीलेज ट्रेड चा कंपनीला उपयोग होत असे.

कंट्री ट्रेड आणि मनिला कनेक्शन

एक कंपनीचा स्वत:चा "बेसीक ट्रेड" आणि दुसरा कंपनीच्या सर्व्हंट्स चा त्यांच्या आशीर्वादाने समांतर चालणारा "प्रिव्हीलेज ट्रेड." मात्र या व्यतिरीक्त ही एक व्यापाराची वेगळी साखळी अस्तित्वात होती. यात प्रामुख्याने दोन प्लेअर्स होते. तर ( इथे इंडियन कनेक्शन सुरु होते ) विवीध युरोपियन कंपनीज चायनात येण्याअगोदरच्या कित्येक वर्षे अनेक एशियन मर्चंट्स इंडिया चायना व इतर एशियन देशांशी व्यापारात "इन्ट्रा एशियन ट्रेड" मध्ये सक्रीय होते. भारतीय व्यापारी व त्यातही विशेषत: पारशी व्यापारी या व्यापारात अव्वल होते. विवीध चायनीज वस्तु चहा सहीत ते भारतात व इतर देशात विकत व भारतीय आणि इतर देशातील वस्तु चायनात नेऊन कुशलतेने विकत असत. हा खासगी वा भागीदारी पातळी पर्यंतचा व्यापार होता. तर पहीला प्लेअर " इंडियन/एशियन मर्चंट्स"
याशिवाय अनेक इंग्लीश व्यापारी (कंपनी व सर्व्हंट्स व्यतिरीक्त) होते ज्यांना हा प्रचंड नफ़्याचा "युरो-एशिया" ट्रेड करायचा असे. मात्र कंपनीकडे एशियन व्यापाराची राजसत्तेने चार्टर ने बहाल केलेली Exclusive मोनोपली होती. कंपनी व्यतिरीक्त इतर कुठल्याच ब्रिटीशाला हा व्यापार करण्यास कायदेशीर बंदी होती. पण मोहाने मोनोपली धुडकावुन लावली. तर हे इंग्लीश ट्रेडर्स यांना "फ़्री मर्चंट्स " ही म्हटले जात असे, विवीध चोरटे मार्ग अवलंबुन एशिया ट्रेड करत असत.उदा. दुसर्‍याच देशाचा फ़्लॅग जहाजावर लावुन ते चायनात घुसत असत इ. सुरुवातीला त्यांच्या या फ़्री भाउबंदांना रोखण्याचे अनेक प्रयत्न कंपनीने केले मात्र ते सर्व निष्फ़ळ ठरले. मोहविजय झाला मोनोपली हरली. पण हरेल तो साहेब कसला ?.तर या खेळातला दुसरा प्लेअर होता इंग्लीश फ़्री मर्चंन्ट्स"
इन्ट्राएशियन ट्रेड करणारे इंडियन मर्चंन्ट्स व युरो एशिया ट्रेड करणारे ब्रिटीश फ़्री मर्चंट्स यांना कंपनीने व इतिहासकारांनी एकाच बास्केट मध्ये टाकले व नामकरण केले. "कंट्री ट्रेडर्स" यांचा धंदा तो "कंट्री ट्रेड" व यांची स्वत:ची जी जहाजे होती ती "कंट्री शीप्स" तर इथुन पुढे ही व्याख्या नीट लक्षात असु द्या. प्रिव्हीलेज ट्रेडला असलेल्या कंपनी निर्बंधामुळे त्यांच्या तुलनेने कंट्री ट्रेड चा व्यापारातील हिस्सा फ़ार मोठा होता. यांची स्वत:ची छोटी मोठी जहाजे होती. यांचा व्हॉल्युम मोठा होता. तर कंट्री ट्रेडर्स नेमक्या कुठल्या कमॉडिटीज बाहेरुन चायनात आणत व तिथुन नेत ? कंपनीच्या प्रिव्हीलेज ट्रेडर्सपेक्षा यांची पॉडक्ट रेंज व सिलेक्शन जबरदस्त होत. ही यादी मोठी रोचक आहे हा टेबल बघा.

आता कंपनीचा डोळा या "कंट्री ट्रेडर्स" च्या या ट्रेडमधुन त्यांनी कमावलेल्या "सिल्व्हर" वर होता. कंपनीची याची नितांत कधी न संपणारी गरज आपण पाहीली. कंपनीने सर्वात अगोदर इंग्लीश फ़्री मर्चंट्सना रोखण्याचे प्रयत्न निष्फ़ळ झाल्यानंतर त्यांना युरो-एशिया ट्रेडसाठी "लायसन्स" देण्याची एक नविन सिस्टीम सुरु केली. थोड अनधिकृतला अधिकृत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे जस जस भारतात प्लासीनंतर राजकीय वर्चस्व वाढलं तस तस त्यांच्या अखत्यारीतील प्रेसीडेन्सीजमध्ये येत असलेल्या सर्वच" इंडियन मर्चंट्स" ना देखील इन्ट्राएशियन व्यापारासाठी कंपनी कडुन "लायसन्स" घेण्याची अट लादणे सुरु केले. याची अंमलबजावणी तशी अवघड होती.पण सातत्य कंपनीचा आत्मा होता. हळुहळु यश येऊ लागल. डायरेक्टर्सनी १७६९ पासुन आता अजुन एक मार्ग अवलंबला चायनात कंट्री ट्रेडर्सनी विकलेल्या मालातुन मिळवलेल्या "सिल्व्हर पेमेंट" चा भरणा परत सोबत न नेता, "कॅन्टॉन ट्रेझरी" तच करण्यास लायसन्स्ड कंट्री ट्रेडर्सना प्रोत्साहीत केले जात असे. या सिल्व्हर च्या बदल्यात कंपनी त्यांना "बिल्स ऑफ़ एक्सचेंज" वुइथ इंटरेस्ट इश्यु करत असे. विशेष म्हणजे ते दोन्ही ठीकाणी इंडिया व इंग्लंड (वरील दोन प्रकारच्या प्लेअर्ससाठी सुविधा) मध्ये सादर केल्यावर पेयेबल होत असत. कंट्री ट्रेडर्सनाही एक फ़ायदा होता परतीच्या प्रवासातली सिल्व्हर बाळगण्यातली रिस्क कमी होत असे. कारण कंपनीच्या जहाजावर असलेला मोठा स्टाफ़ गन्स सुरक्षा यांचा अभाव कंट्री ट्रेडर्सच्या लहान लहान शीपवर होता. डायरेक्टर्सनी १७७१ मध्ये अधिक फ़ंड्स ची गरज निर्माण झाली तेव्हा सुपरकार्गोज ना कंट्री ट्रेडर्सना इश्यु करण्यात येत असलेल्या बिल्सचा ५शीलींग ६पेनी पर डॉलर पर्यंत रेट वाढवुन दिला. १७६९ मध्येच कोर्ट ऑफ़ डायरेक्टर्सनी "इंडियन प्रेसीडेन्सीज"ना कंट्री ट्रेडर्स ना बिल्स इश्यु करण्याचा अधिकार दिला. बंगाल प्रेसीडेन्सीला एका प्रत्रात डायरेक्टर्स म्हणतात " द चायना रेमीटन्सेस आर टु बी ओपेन्ड टु ऑल कंट्री ट्रेडर्स अ‍ॅज वेल अ‍ॅज कंपनी सर्व्हंट्स" कंपनी कंट्री ट्रेडर्स कडुन कर्जही घेत असे त्यावर चांगल्या दराने व्याजही देत असे. भारतात अशा रीतीने उभारलेल भांडवल डायरेक्ट फ़ॉर्म मध्ये चायनात नेत नसे. उदा. १७८१ मध्ये बेंगाल प्रेसीडेन्सी ने १० लाख रुपये (लंडनला ३६५ दिवसात पेयेबल बिल्स इश्यु करुन ) कंट्री ट्रेडर्स कडुन उभे केले त्यातुन अगोदर इंडियन गुड्स ची खरेदी केली आणि मग ते कॅन्टॉन ला रवाना केले. तिथे चायनात ते विकुन मुळ भांडवलात भर पाडली कंट्री ट्रेड चा व्हॉल्युम मोठा होता. उदा. कॅन्टॉन ट्रेझरी ने १७६९ व १७७० मध्ये ड्रॉ केलेल्या बिल्स ची रक्कम होती..३४,१५,३१४ पाउंड्स पुढे १७८४-८५ मध्ये ही पोहोचली होती तब्बल ७५,१८,१६५ पर्यंत. थोडक्यात "कंट्री ट्रेड" मधुन कमावलेला सिल्व्हर चा ओघ कंपनीने लायसन्स इंटरेस्ट बेअरींग बिल्स इ. च्या माध्यमातुन स्वत:च्या चहा खरेदीसाठी "कॅन्टॉन ट्रेझरी" कडे यशस्वीरीत्या वळवला.
फ़िलीपाइन्स मध्ये मनिला येथे वर पाहील्या प्रमाणे स्पेन कडुन त्यांच्या साऊथ अमेरीकेतील कॉलनीज असलेल्या मेक्सीको व पेरु येथील खाणींमधुन मोठ्या प्रमाणावर सिल्व्हर चा उपसा केला जात असे. व त्याची सिल्वर नाणी पाडुन हे "स्पॅनीश अमेरीकन डॉलर " फ़िलीपाइन्स मध्ये "मनिला" या सेंटर वर आणले जात असे. स्पेन यासाठी वेगळ्या क्रॉस पॅसेफ़ीक ट्रेड रुट चा वापर करीत होता. ( हा रुट रोचक आहे अजुन नीट समजला नाही प्रयत्न चालु आहे) इथुन मग स्पेन स्वत: चायना इंडिया आदींशी "स्पॅनीश अमेरीकन डॉलर" च्या बदल्यात एशियन मालाची खरेदी करत असे. हा एशियन माल तो पुन्हा अमेरीक युरोप ला नेऊन विकत असे. कंपनीने कोलकाता ते मनिला एक ट्रेड लिंक प्रस्थापित केली ज्यातुन ते भारतीय माल पीस गुड्स टेक्सटाइल मनिला ला नेउन विकत बदल्यात "स्पॅनीश अमेरीकन डॉलर" मिळवत तो कॅन्टॉन ट्रेझरीत जमा करुन त्यातुन चहाची खरेदी करत. या व्यापारात अनेक कंट्री ट्रेडर्स ही होते. कलकत्यात त्या काळात युरोपियन व इंडियन व्यापार्‍यांच्या अनेक पार्टनरशीप फ़र्म्स अस्तित्वात होत्या. याचाही एक वापर कंपनीने करुन घेतला पण विस्तारभयास्तव इथेच थांबतो.

इंग्लिश मिशन्स व त्याचे परीणाम

चायनीज ट्रेड पुर्णपणे एकतर्फ़ी असल्याने कॅन्टॉन अधिकार्‍यांकडुन व राजसत्तेकडुन वारंवार येणारे नवे निर्बंध कंपनीला फ़ार जाचक ठरत होते. पोर्ट चार्जेस कस्टम ड्युटीज मध्ये सतत वाढ केली जात असे.उदा. मेझरमेंट फ़ी मधील वाढ प्रत्येक जहाज कॅन्टॉन मध्ये दाखल झाल्यावर एन्ट्रीलाच ही लावली जात असे. याला कारणही होते "कॅन्टॉन" प्रशासना ला दरवर्षी सम्राटाला महागड्या भेटवस्तु पाठवणे बंधनकारक होते. पेकींगच्या शाही ट्रेझरी चा भरणा होताच. यादवी युद्ध वा इतर युद्धा दरम्यान चायनीज एंपायरची कॅन्टॉन कडुन रेव्हेन्युची अपेक्षा वाढत असे. कॅन्टॉन चा हॉप्पो व चायनीज सरकारी अधिकारी "मॅन्डारीन्स" पण भ्रष्ट होते. इथला युरोपियन व्यापारी हा हक्काचा रेव्हेन्यु सोर्स होता. याला अधिकाधिक पिळले जात असे. हे अनेक जाचक निर्बंध अटी व नियम बदलण्यासाठी डायरेक्टर्सनी डायरेक्ट चायनीज सम्राटा पर्यंत पोहोचण्याचे व त्याच्याकडुन अनुकुल व्यापारी वातावरण होइल, नियमांचा जाच कमी व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले.

यातला पहीला मोठा प्रयत्न होता. जेम्स फ़्लीन्टचा. अगदी सुरुवातीच्या काळात कॅन्टॉन प्रशासनाचा हॉप्पो चा चा ताप वाढल्याने डायरेक्टर्सनी चायनाच्या दुस‍र्‍या बंदराकडे निन्गपो ला फ़्लीन्ट च्या नेतृत्वात जहाज पाठवले. हा पोर्ट टी सिल्क प्रोड्युसींग रीजन्सना जवळचा व तुलनेने कमी निर्बंधाचा होता. पुढील दोन सीझन शीप्स कॅन्टॉन सोडुन निन्गपोकडे वळु लागल्यावर रेव्हेन्यु कमी झाल्याने कॅन्टॉन प्रशासन चिंतीत झाले. त्यांनी पेकींग ला सम्राटाकडे अर्ज करुन निन्गपो ला कस्टम ड्युटीजचा दोन्ही इम्पोर्ट व एक्स्पोर्ट चा रेट दुप्पटीने वाढवुन घेतला. यालाही दाद न दिल्याने पुढे कॅन्टॉन ने सम्राटाकडुन निन्गपो साठी नविन ऑर्डर मिळवली ज्यानुसार कुठलाही युरोपियन कॅन्टॉन व्यतिरीक्त इतर पोर्ट वर व्यापार करु शकणार नाही.
हा नियम लावला. तरी पुन्हा दुसर्‍यावेळेस धाडसाने नियम मोडुन डायरेक्टर्सनी फ़्लीन्ट मार्फ़त मुद्दाम सक्सेस नावाचे जहाज निन्गपो ला पाठवले. मात्र निन्गपो अधिकार्‍यांनी व्यापाराला नकार देत फ़्लीन्ट ला तात्काळ पोर्ट सोडण्यास सांगितले. परततांना चिवटपणे फ़्लीन्ट ने एक चायनीज ट्रान्सलेटर गाठुन राजाच्या नावाने अर्ज तयार करुन घेतला. व काही अधिकार्‍यांना लाच देऊन कंपनीची कैफ़ियत मांडणारा तो अर्ज सम्राटापर्यंत पेकींग दरबारात पोहोचवला. सम्राटाने कॅन्टॉन ला आदेश देऊन एकुण ट्रॆड सिस्टीमचा रीपोर्ट मागितला. पहील्यांदा कंपनीने परंपरा मोडुन डायरेक्ट सम्राटापर्यंत पोहोचण्याचा गुन्हा केला होता. कॅन्टॉन प्रशासन खवळुन गेले.पुढील परीणामस्वरुप कारवाईत जेम्स फ़्लीन्ट ला शिक्षा करण्यात आली त्याच्यावर कायमची बंदी टाकण्यात आली. जो ट्रान्सलेटर होता त्याचे मुंडके रीतसर उडवण्यात आले. पहीला प्रयत्न असा पुर्णपणे फ़सला. यानंतर कॅन्टॉन ची एकाधिकारशाही अधिकच मजबुत करण्यात आली. उलट अनेक नविन निर्बंध व अटी युरोपियनांवर लादण्यात आल्या. फ़ॅक्टरी सोडुन इतर कुठेच जाण्यासही कडक बंदी घालण्यात आली. असे सम्राटापर्यत पाठवलेले वेगवेगळे प्रत्येक मिशन्स वाया गेले. त्यातील एक मोठे मिशन होते डायरेक्ट ब्रिटीश क्राऊन ने राजाने पाठवलेले मॅकॉर्टनीच मिशन याची गोष्ट बघण्यासारखी आहे.

तर झाले असे की १७८४ च्या नोव्हेंबरमध्ये एक इंग्लीश जहाज लेडी ह्युज ने चायनात व्हॅम्पोआत आल्यावर एक गन सॅल्युट ठोकला त्यात अपघाताने चुकुन लोकल चायनीज बोटीतील दोन चायनीज नागरीकांचा मृत्यु झाला. ही शीप आपण वर पाहीले त्याप्रमाणे मुंबईची एक "कंट्री शीप" होती कॅन्टॉन ने कंपनीला दोषी गनर ला ताब्यात देण्याची मागणी केली. गनर ताब्यात देण्यास नकार दिल्याने त्यांनी कंपनीला व्यापार थांबवण्याची धमकी दिली. कंपनीने युनियन लीडर टाइप भुमिका घेतली व इतर युरोपियन्स ट्रेडर्स सहीत विरोध दर्शविला. कॅन्टॉन प्रशा्सनाने आक्रमक होत थेट कंपनीच्या कौन्सील चीफ़ ला ताब्यात घेण्याची धमकी दिल्यावर निमुटपणे गनरला कॅन्टॉन च्या ताब्यात देण्यात आले. पुढे गनरचे विदाऊट ट्रायल रीतसर मुंडके उडवण्यात आले. या प्रकरणामुळे युरोपियन कंपन्यामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले. तणाव फ़ारच वाढला. परीणामस्वरुप डायरेक्टर्सनी थेट चायनीज सम्राटा समोर आपल्या व्यावसायिक समस्या मांडण्यासाठी व नविन अनुकुल व्यापार नियमांसाठी कर्नल कॅथकार्ट च्या नेतृत्वात एक मिशन चायनाला पाठवले डीसेंबर १७८७ मध्ये चायनीज सम्राटासाठी "गिफ़्ट्स" इ. घेऊन कॅथकार्ट निघाला मात्र दुर्देवाने प्रवासातच त्याचा मृत्यु झाला व हे मिशन अर्धवटच राहीले.

यानंतर पुढे विलीयम पिटमुळे एक अत्यंत महत्वाचा टी ट्रेड वर दुरगामी परीणाम करणारा कम्युटेशन अ‍ॅक्ट इंग्लंडमध्ये पास झाला ज्यात चहावरील इम्पोर्ट ड्युटी मोठ्या प्रमाणात घटवण्यात आली त्यामुळे एकीकडॆ चहाची अतीप्रचंड मागणी निर्माण झाली व दुसरीकडे जी कंपनी व्यतिरीक्त खासगी व्यापार्‍यांमार्फ़त चहाची मोठ्या प्रमाणावर इंग्लंडमध्ये स्मगलींग होत होती ती परवडु न लागल्याने बंद झाली. आता संपुर्ण इंग्लडची चहाची गरज पुरवण्याची जबाबदारी एकट्या इस्ट इंडिया कंपनीवर आली नव्या अ‍ॅक्ट ने कंपनीला किमान एक वर्षाचा स्टॉक स्पेअर मध्ये ठेवण्याची अट घातली.व त्याच सुमारास इंग्लंडमध्ये टेक्सटाइल व पोलाद उद्योगात भरमसाट उत्पादन सुरु झाल्याने त्याला चायनासारख्या मोठ्या मार्केटची नितांत गरज होती. यामुळे आता संसद व ब्रिटीश सरकारने चायनाकडे लक्ष वळविले व चायनीज ट्रेड चा होमवर्क केला. आता जर ब्रिटीश माल चायनात खपवायचा असेल व चायना इम्पोर्ट एक्स्पोर्ट मध्ये वाढ विकास करायचा असेल तर कॅन्टॉन ची रिजीड आणि रीस्ट्रीक्टीव्ह ट्रेड सिस्टीम बदलण्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणुन आता स्वत: ब्रिटीश सरकारनेचच नविन महत्वाकांक्षी मिशन डायरेक्ट सम्राटापर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन केला. यासाठी राजदुत म्हणुन जॉर्ज मॅकॉर्टनी ची निवड करण्यात आली. पुर्वानुभवांमुळे या मिशनमध्ये कंपनीला आता फ़ारसा रस नव्हता पण इलाज नव्हता. चायनीज सम्राटासाठी एक डिटेल पत्र तयार करण्यात आले त्यात सध्या कॅन्टॉन मध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व नियम व्यवस्थेची माहीती देऊन मग कंपनीला अपेक्षीत असलेले बदल सल्ले नियम नोंदवण्यात आले. याला एक ब्रिटनच्या राजाचे क्राउन्स मिशन म्हणुन बनवण्यात आले. (कंपनीचे नाही) तरी मिशनचा खर्च मात्र कंपनीच्याच माथी मारण्यात आला. डायरेक्टर्स नी कॅन्टॉन कौन्सील ला मदत करण्याच्या सुचना दिल्या. मोठ्या उत्साहात मिशनची तयारी करण्यात आली इंडियन प्रेसीडेन्सीजना ही मिशनला मदत करण्याच्या सुचना
पाठवण्यात आल्या. चायनाच्या गव्हर्नर जनरल ला गाठुन कंपनीच्या सुपरकार्गोजनी चायनीज सम्राटाच्या ८० व्या वाढदिवसाचे निमीत्त साधले. व त्याच्या मार्फ़त पत्र पाठवुन वाढविवसाला हजर राहुन ब्रिटनचा राजदुत तुम्हाला ब्रिटनच्या राजा तर्फ़े गिफ़्ट देऊ इच्छितो (स्वत" ब्रिटीश राजा येऊ शकत नसल्याची खंत ही पत्रात व्यक्त केली होती) असे म्हणुन वाढदिवशी हजर राहण्याची भेटीची परवानगी मिळवली. परवानगी मिळवण्यासाठी चायनीज मॅन्डारीन्स चे हात ही ओले करण्यात आले. एच एम एस लायन नावाचे जहाज मिशन ला घेऊन १७९३ ला चायनात पोहोचले.(एक लक्षात घ्या तोपर्यंत कोणीही ब्रिटीश राजदुत प्रत्यक्ष राजदरबारापर्यंत पोहोचु शकला नव्हता यांच्यासाठी तो दुर पेकींग मध्ये राहणारा एक गुढ अनअ‍ॅप्रोचेबल सम्राट होता) तेव्हा सम्राट त्याच्या समर पॅलेस मध्ये मुक्कामाला होता. तिथे चायनीज अधिकार्‍याबरोबर मॅकॉर्टनी पोहोचला. तिथे अनेक उच्चपदस्थ चायनीज सरदार अधिकारी व अनेक विदेशी दुत अगोदरच आलेले होते.अखेरीस १७ सप्टेंबरला सम्राट भेटला. मॅकॉर्टनी ने ब्रिटीश किंग जॉर्ज (३रा) चे पत्र सम्राटाकडे दिले.त्यात अगोदर क्षेमकुशल हॅपी बर्थडे उपस्थित न राहु शकल्याची खंत व नंतर त्यात काही प्रमुख मागण्या होत्या यात कॅन्टॉन्वरील व्यापारी निर्बंध उठवणे, इतर चायनीज पोर्ट्स वर व्यापार खुला करणे ( हे दुसरे पोर्ट टी-सिल्क प्रोड्युसींग
रीजन्सना जवळ होते त्यामुळे खर्चकपात मोठी होती), इम्पोर्ट एक्स्पोर्ट चे रेट्स कमी करणे, सीजन नंतर चायनात थांबण्याची परवानगी असणे . व मुख्य म्हणजे एक कंपनीचा रेसीडेंट पेकींग दरबारात नेमणे जो मग डायरेक्ट सम्राटाशी हॉप्पो कॅन्टॉन प्रशासनाला टाळुन ट्रेड संदर्भात डिल करु शकेल.(दरबारात आपला कायमस्वरुपी एक रेसीडेंट नेमणे ही एक जुनी सिस्टीम होती उदा. आपल्या पुण्यात पेशवे दरबारात इस्ट इंडिया कंपनीचा एक रेसीडेंट "चार्ल्स मॅनॆट" होता. याविषयी पुढे बघु )
तर मॅकॉर्टनी ने सोबत अनेक मौल्यवान गिफ़्टस देखील आणल्या होत्या.त्यात प्लॅनेटेरीयम ,कॅरेजेस इ. चा समावेश होता. मॅकॉर्टनी चे राजदरबाराकडुन रीतसर स्वागत करण्यात आले. मॅकॉर्टनी ने सम्राटापुढे kwotow घातला की नाही घातला यावर चायनीज ब्रिटीश इतिहासकार अजुनही मारामारी करत असतात. हा एक प्रकारचा गुडघे टेकुन केलेला कुर्निसात टाइप वंदनाचा पारंपारीक चायनीज प्रकार होता. याचा एक पारंपारीक प्रतिकात्मक अर्थ जो कोटो घालतो तो सम्राटाचा मांडलीक एक प्रकारे ट्रीब्युटरी असतो असे मानले जात असे.असो. तर सम्राटाने काय प्रतिसाद दिला ? प्रतिसाद होता
ढिम्म ढिम्म ढिम्म थंडगार कोरडा प्रतिसाद को-र-डा !
सम्राटासाठी मॅकॉर्टनी हा इतर चिल्लर राजे जे त्याच्या इथे हजेरी लावत त्यांच्या दुतासारखा आणखी एक होता. चायनीज सम्राट अती अहंकारी व शक्तीशाली होता. स्वत:च्या धुंदीत मस्तीत होता तो चायनीज एंपायर हे सेलेस्टीयल एंपायर आहे असे काहीतरी समजत असे. त्याने ओके ठीकाय म्हटल आणि सर्वच्या सर्व मागण्या धुडकावुन लावल्या (इन्क्लुडिंग रेजीडेंट नेमणुक वगैरे आठवा चायनीज श्लोक अतिथी दानवो भव ) परततांना मॅकॉर्टनी सोबत इंग्लंडच्या राजासाठी चायनीज सम्राटाने एक पत्रही दिले त्यात सर्वच येते ते बघण्यासारखे आहे.
या पत्रात चायनीज सम्राट म्हणतो

'Notwithstanding you, 0 King, reside ... beyond many tracts of seas, ... you have desperately to send me an ambassador to congratulate me upon my birthday. You commissioned him by letter ... directed to me, to come into my presence .... to offer me various gifts and articles, the produce of your country, all which he did accordingly ... Those presents ... which you have now sent me from your distant country, I have thought fit to accept of, as tokens of your affectionate regard for me. But in truth, as the greatness of splendour of the Chinese Empire have spread its fame far and wide, and as foreign nations from a thousand parts of the world ... to pay us their homage, and to bring us the rarest and most precious offerings, what is it that we ... want here? ... and stand it no needs of those things that are made in your kingdom.

पत्रात सम्राट पुढे म्हणतो,

'As to the proposal contained in your letter ... that I should select one of your subjects for the purpose of permitting him to reside in my dominions, and to act on behalf of the English merchants coming to this country, that is ... contrary to the laws of this country ... Having this clearly and distinctly laid upon my mind to your majesty, I have ... thought it proper to dismiss the ambassador who brought me your presents ... I now entreat you ... to make your intentions correspond with mine .. adhere to truth and equity ... act with all prudence and benignity ... that we may reciprocally enjoy the blessings of peace and tranquility.

चायनातल्या प्रखर "रीअ‍ॅलीटी" ने डायरेक्टर्स च्या इंडिया हाऊसच्या पेंटींग मधील "फ़ॅन्टसी" ला आरपार छेद दिला होता.

चार दिवसानंतर अजुन एक दुसरे पत्र मॅकॉर्टनी ला देण्यात आले ज्यात ब्रिटीशांची एकुण एक मागणी (रेसीडेंट नेमणुकी सहीत सर्वच) पुर्णपणे धुडकावण्यात आली.
अशा रीतीने मॅकॉर्टनी मिशन पुर्णपणे आपल्या उद्दीष्टांत पुर्णपणे फ़ेल झाले. तरीही चिवट शहाणा व टीपीकल ब्रिटीश व्यावहारीक मॅकॉर्टनी ने जाता जाता चिंग प्रशासनाकडुन स्वत:व इतर मिशन मेंबर्ससाठी चायनाच्या इनलॅन्ड टुरीझम ची परवानगी मिळवली व तितक्या थोड्याश्या कालावधीत जिथे ब्रिटीश कधीही पोहोचु बघु शकले नव्हते त्या चायनीज प्रांतांमध्ये इनलॅन्ड चायनात प्रवास करुन फ़िरुन या सफ़रीत चायनाच्या इकॉनॉमी भुगोल समाज ची जास्तीतजास्त माहीती जमा करुन घेतली. ही प्रचंड माहीती पुढे चायना समजावुन घेण्यात अर्थातच फ़ार उपयोगी पडली.

क्रमश:

प्रतिक्रिया

प्रचंड अभ्यासपूर्ण मालिका! पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2016 - 5:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

खूपच बारकावे असलेली ही मालिका प्रचंड परिश्रम घेऊन अभ्यासपूर्वक लिहिली आहे हे उघड आहे ! खूपच मजा येते आहे वाचायला.

पुभाप्र.

"कंट्री ट्रेड आणि मनिला कनेक्शन" या भागात ड्रॉप्बॉक्समधून टाकलेले टेबलाचे ग्राफिक "पब्लिकली शेअर्ड" नाही आणि /किंवा ती लि़ंक मूळ चित्राची नसून त्याच्या आयकॉन (थंबनेलची) आहे. त्यामुळे ते चित्र दिसत नाही. मूळ चित्राची लिंक वापरल्यास ते दिसू शकेल.

इथे प्रतिसादात मूळ चित्राची लिंक दिल्यास ते काम होऊ शकेल.

शाम भागवत's picture

1 May 2016 - 5:36 pm | शाम भागवत

_/\_

टवाळ कार्टा's picture

1 May 2016 - 6:22 pm | टवाळ कार्टा

जबराट

अभ्या..'s picture

1 May 2016 - 7:17 pm | अभ्या..

अप्रतिम अभ्यासू लेखन.
सिंप्ली सुपर्ब.

mugdhagode's picture

1 May 2016 - 8:52 pm | mugdhagode

छान

लॉरी टांगटूंगकर's picture

1 May 2016 - 11:12 pm | लॉरी टांगटूंगकर

कडकडीत अभ्यासू लेखन. खूप धन्यवाद!

अभ्यासपूर्ण लेखन …. क्लास मध्ये मुलांना वाचायला सांगतोय …

मारवा's picture

2 May 2016 - 8:39 pm | मारवा

सर्व वाचक व प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद !

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 8:50 pm | विजय पुरोहित

मारवा साहेब. प्रचंड मेहनत करताय हो लेखनासाठी. अप्रतिमच!