श्रीगणेश लेखमाला ८ : सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट (खरेदी विभाग)

Primary tabs

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
25 Sep 2015 - 12:04 am

उत्पादन अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडलो. शून्य अनुभव पण शिकण्याची व कष्टाची तयारी या जोरावर नक्कीच काहीतरी मिळवू हा विश्वास ठेवत इंटरव्ह्यू देत होतो. अखेर एके ठिकाणी हातात ऑफर लेटर पडले. पोस्ट - ग्रॅज्युएट ट्रेनी इंजीनिअर (मटेरिअल्स). लगोलग रुजू झालो. ट्रेनिंगच्या पहिल्या दहा दिवसात एकेका विभागाची ओळख करून देण्यात आली. कंपनी काय वस्तू पुरवते, कुणाला पुरवते इ. इ. बाबींची व्यवस्थित ओळख करून घेतली. उत्पादन विभागात असेंब्ली कशी होते, काय काय गोष्टी लागतात हे नीट समजून घेतले.

कोणत्याही आस्थापनेस एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते. कच्च्या मालासोबतच इतर काही पुरवणी घटकवस्तू अथवा सेवा यांचा नियमित पुरवठा गरजेचा असतो. उदा. एखादी गाडी तयार करण्यासाठी इंजीन, ब्रेक्स, चाके, फ्रेम, स्टीअरिंग व्हील, गिअरबॉक्स, काच, दिवे या प्रमुख घटकांची उपलब्धता अनिवार्य आहे. पण फक्त या वस्तू मिळून गाडी तयार होते का? तर नाही. या सगळ्याची जोडणी करताना काही ऑईल्स, कामगारांच्या सुरक्षेसाठी चश्मे, हेल्मेट्स आवश्यक असतात. ऑफिसच्या कामांसाठी कागद, स्टेपल पिन्स, स्टेपलर अशा गोष्टीही लागत असतात. या सर्व वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट विभाग काम करतो. आलेल्या-गेलेल्या (वापरासाठी) सर्व वस्तूंचे हिशेबही ठेवणे अत्यावश्यक असते. याविषयी जाणून घेऊ आजच्या लेखात.

या सर्व प्रक्रियेचे तीन टप्पे आहेत. सोर्सिंग, प्रॉक्युरमेंट व पर्चेस. आधी यांच्या व्याख्या समजून घेऊ.
सोर्सिंग - the process of finding suppliers of goods or services.
वस्तू व सेवा यांचे पुरवठादार शोधणे अशी सोर्सिंगची मराठीत व्याख्या करता येईल. वस्तुनिर्मितीसाठी लागणार्‍या इतर वस्तूंचे व सेवांचे पुरवठादार शोधणे हे दिसते तेवढे सोपे काम नाही. याबद्दल विस्ताराने पुढे येईलच.

प्रॉक्युरमेंट - The act of obtaining or buying goods and services.
The process includes preparation and processing of a demand as well as the end receipt and approval of payment.
वस्तू अथवा सेवा खरेदीच्या प्रक्रियेस प्रॉक्युरमेंट असे म्हणता येईल.

पर्चेस - The activity of acquiring goods or services to accomplish the goals of an organization.
खरेदी केलेल्या वस्तूचा ताबा घेणे, सेवेचा लाभ घेणे व ज्या कारणासाठी वस्तू अथवा सेवा विकत घेतली जात आहे, त्यासाठीच विनियोग होण्याची काळजी घेणे म्हणजे पर्चेस.

वरवर पाहता या तिन्ही गोष्टी सोप्या वाटतात, पण तेवढ्या सोप्या नसतात. आता जरा खोलात माहिती करून घेऊ.
कंपनीत ज्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बनतात, त्यापैकी काही वस्तू बाहेरून घेतल्या जातात, तर काही कंपनीतच बनवून वापरल्या जातात. ज्या वस्तू बाहेरून घेतल्या जातात, त्यासाठी एकाच पुरवठादारावर (व्हेंडर अथवा सप्लायर) अवलंबून चालत नाही. पुरवठ्यातील तो एक धोका मानला गेला आहे.
उदा. क्रेनसारखी मोठी वस्तू घ्या. क्रेन व्यवस्थित चालण्यासाठी तिचे पार्ट्स व्यवस्थित असले पाहिजेत. ते पुरवणार्‍या कंपनीने अपेक्षेपेक्षा समजा दहा दिवस जास्त घेतले, तर क्रेन बंद असलेल्या दहा दिवसांच्या कामाचे पैसे मिळणार नाहीतच, शिवाय कामगारांना बिनकामाचेही पैसे द्यावे लागतात. हा कंपनीसाठी अनुत्पादक खर्च आहे.
तर अशा घटना होऊ नयेत यासाठी करावयाच्या उपाययोजना ही सोर्सिंगच्या माणसाची जबाबदारी असते. त्यासाठी संबंधित व्यक्तीस कोणती वस्तू कुठे मिळते याची माहिती असणे अत्यावश्यक असते. कोणत्या पुरवठादाराकडे कोणती मशीनरी आहे, क्षमता किती आहे याची खातरजमा करता आली पाहिजे.

नव्याने खरेदी केल्या जणार्‍या प्रत्येक गोष्टीस सोर्सिंग टीम जबाबदार असते. नवीन उत्पादनाच्या संदर्भात डिझाईन टीमच्या सहकार्याने स्पेसिफिकेशन्स ठरवणे, ते योग्य त्या सप्लायरला समजावून सांगणे, व त्याची अंमलबजावणी होतेय हे सुनिश्चित करणे ही यांची जबाबदारी असते. सप्लायरला अथवा कंपनीतील वापरकर्त्यास तांत्रिक मदत देणे हेही यात अपेक्षित आहे.

आमच्या कंपनीत एक किस्सा माझ्या कायम लक्षात राहील असा आहे. अंदाजे २ टन वजनाचे मशीन काही फूट उंच उचलावे लागणार होते. या कामासाठी प्रॉडक्शन विभागाचा एक जण आमच्याकडे आला. त्याने सांगितले की त्याला अमुक एका मापाचे लिफ्टिंग बोल्ट्स पाहिजेत. पुढे पुस्ती जोडत म्हणाला की हार्डनिंग करून हवेत. मी आणि माझे सहकारी बुचकळ्यात पडलो. कारण स्टीलचे हार्डनिंग केल्यावर उचलण्याची क्षमता कमी होते. उचलण्याची क्षमता वाढवण्यासाठी टफनिंग पद्धत वापरतात. मग आम्ही त्याला विचारले की नक्की कसले बोल्ट्स हवेत, टफन्ड का हार्डन्ड? परत परत त्याने हार्डन्ड बोल्ट्सचीच मागणी केली. मग आम्ही त्याला दोन्ही पद्धतीतला फरक समजावून सांगितला व अखेर टफन्ड बोल्ट्स मागवले गेले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रॉक्युरमेंट – कंपनीत प्रामुख्याने उत्पादन विभाग व मेंटेनन्स विभाग त्यांना लागणार्‍या वस्तूंची यादी पर्चेस / मटेरियल्स / सोर्सिंग विभागाला देतात. उत्पादन विभाग प्रत्येक महिन्याच्या टारगेटनुसार मागणी (पर्चेस रिक्विझिशन – पीआर) नोंदवते. ज्या वस्तू नेहमीच्या वापरात असतात, त्याची दरसूची सप्लायरशी बोलून ठरवून ठेवलेली असते. मागणी नोंदवल्यापासून कोणती वस्तू किती दिवसात मिळणार याचा कालावधी (लीड टाईम) सहसा ठरलेला असतो. त्यानुसार प्रॉक्युरमेंट विभाग पुरवठादारास पर्चेस ऑर्डरद्वारे (पीओद्वारे) अथवा वर्क ऑर्डरद्वारे (डब्ल्युओद्वारे) कळवतो.

प्रॉक्युरमेंट टीम व सोर्सिंग टीम मिळून पुरवठादारासोबत उत्पादनाची दरनिश्चिती करतात. पुरवठादाराने दिलेल्या दराचे अवलोकन करणे, आपल्या कंपनीच्या अंदाजपत्रकानुसार दर व्यवस्थित आहे का नाही हे पडताळून बघितले जाते. उत्पादनाच्या कच्च्या मालाचे बाजारभाव, गुणवत्ता या गोष्टी माहीत असाव्या लागतात.
उदा. स्टीलचे अथवा अ‍ॅल्युमिनियमचे बाजारातील भाव पडले असता तेवढ्या प्रमाणात स्टील वा अ‍ॅल्युमिनियमपासून बनवून घेतलेल्या उत्पादनांचे खरेदीदर पुरवठादाराकडून कमी करून घेणे.
दरनिश्चितीसाठी कच्चा माल, त्याची उपलब्धता, उत्पादनपद्धती, लागणारा वेळ याची चांगली माहिती हवीच.
इन्व्हेन्टरी कंट्रोल – कंपनीस लागणार्‍या वस्तूंचे कमीत कमी भांडारण ठेवणे, पण त्यामुळे कंपनीच्या उत्पादन क्षमतेची हानी न होऊ देणे ही एक तारेवरची कसरतच जणू. मागणी, पुरवठा व भंडारण या तिन्हीत समन्वय साधणे हेही प्रॉक्युरमेंट टीमचे एक मोठे काम.

सुरुवातीला मी ज्या वस्तू मिळवण्यासाठी जबाबदार होतो, त्याच्या सप्लायर्सची मला काहीच माहिती नव्हती. एके दिवशी मला स्टोअर्स डिपार्टमेंटच्या मॅनेजरकडून निरोप आला. तुझ्या अमक्या तमक्या सप्लायरला आता डिस्पॅच बंद करायला सांग, स्टोअरमध्ये जागा नाहीये. म्हटलं, बघू तरी काय परिस्थिती आहे ते. स्टोअरमध्ये गेल्यावर खरंच एका महिन्याचा सप्लाय ५ दिवसात केला होता. तिथपासून मी खरा कंट्रोल घेतला. कोणाकडून किती सप्लाय आलाय, कोणत्या पीओसाठी आलाय हे डिटेल्स घेतले आणि चालू झाला माझा खरा प्रवास.

सप्लायरला पीओ दिल्यानंतर वस्तू वेळेत मिळणार हे सुनिश्चित करण्यासाठी एक्स्पेडायटर (Expeditor) किंवा चेजर (Chaser) असतात. प्रॉक्युरमेंट टीम व सप्लायर यातील दुवा म्हणून एक्स्पेडायटर काम करतात. सहसा विद्युतनिर्मितीसंचासारख्या मोठ्या प्रोजेक्टची कामे घेणार्‍या (Engineering Procurement Construction – EPC) कंपनीत ही पद्धत बघायला मिळते. अन्यथा प्रॉक्युरमेंटच्या लोकांनाच हे काम करावे लागते. पुरवठादाराकडे आपण दिलेल्या कामाची पूर्तता कधी होईल याचा आढावा ठरावीक कालावधीत घ्यावा लागतो. फोन, स्काईप कॉल अथवा प्रत्यक्ष भेट याद्वारे अशी कामे केली जातात.

लॉजिस्टिक्स अथवा वाहतूक व्यवस्था सांभाळणारे लोकही कंपनीस लागतात. काही कंपन्या स्वखर्चाने पुरवठादाराकडून वस्तू आणतात. आयात माल असल्यास बंदरापासून कंपनीपर्यंत आणायची व्यवस्था वाहतूक विभाग बघते. यासाठी सामानाचे वजन, पॅकिंगची मापे, ट्रक अथवा वाहनाची क्षमता, लागणारी कागदपत्रे इ. बाबींची माहिती आवश्यक असते. उद्देश हाच, की माल वेळेवर व कमीत कमी वाहतूक खर्चात मिळावा. अनेक ठिकाणांहून वस्तू आणायच्या असल्यास कमीत कमी वेळ व पैसा वापरून सर्व वस्तू कशा आणता येतील ही व्यवस्था वाहतूक विभाग बघतो.

भांडार विभाग (स्टोअर्स) – हा विभाग वस्तूंची आवक–जावक व हिशेब बघतो. विविध पुरवठादारांकडून आलेल्या सामानाची नोंद करणे, उत्पादन वा अन्य संबंधित विभागाकडे योग्य ते सामान पोहोचवणे इ. कामे यात अंतर्भूत आहेत. शिवाय, आलेल्या वस्तू वा संबंधित विभागांकडे वर्ग केलेल्या वस्तू याचा हिशेब (स्टॉक लेजर्स) ठेवला जातो. वेळोवेळी त्याचा आढावा (स्टॉक टेकींग) घेतला जातो.

मलाही रोज स्टॉक टेकींग घ्यायची सवय लागली ती माझ्या सहकार्‍यामुळे. सप्लाय किती आणि कधी आणायचा हे ठरवायला त्याचा फायदा व्हायचा. एके दिवशी तर भारीच किस्सा झाला. कामगारांनी काम टाळण्यासाठी एक मोठी प्लेट खोपच्यात दडवून ठेवली होती. बरं, या वस्तूंवर सप्लायरचे नाव, आयडी नंबर वगैरे काहीच नसायचे. आणि झाला की इश्यू. उत्पादन विभाग म्हणतो आमच्याकडे प्लेट नाही, आमचे टारगेट हुकणार. स्टोअर्समध्ये हलकल्लोळ. मटेरियल असताना सापडत कसं नाही? मला हा प्रकार कळल्यावर टेन्शन. लगेच सप्लायरला फोन करून किती प्लेट्स पाठवल्या हे कन्फर्म करुन घेतले. डिलिव्हरी चलनची कॉपी मागवून ठेवली. जीआर रेकॉर्ड्स चेक करणार यात शंकाच नव्हती. सप्लायर खरं बोलतोय, त्याची काहीच चूक नाहीये हे लक्षात आले. मग प्लेट्सची मोजणी चालू केली. जीआर रेकॉर्ड्सप्रमाणे आलेल्या प्लेट्स आणि उत्पादन विभागाला दिल्या गेलेल्या प्लेट्स यात काहीच तफावत नव्हती. मग मीच शोधाशोध चालू केली. शॉपफ्लोअरचा कोपरा धुंडाळला. त्यावरूनही कामगार संतापले. तेवढ्यात खोपच्यातली लपवलेली प्लेट दिसली. कामगारांच्या सुपरवायझरने ती प्लेट क्वालिटी टीमने रिजेक्ट केल्याचा बहाणा केला. मग क्वालिटीच्या लोकांना बोलावले. रिजेक्शन मार्क नव्हताच. अशा प्रकारे कामगारांचा डाव त्यांच्यावर उलटवला आणि स्टोअर्सच्या लोकांचा व माझा जीव भांड्यात पडला. कामगारांना तोंडी समज दिली गेली. एकंदरीत तुम्हाला प्रत्येक डिटेल्स माहीतच पाहिजेत. नाहीतर लोक हातोहात फसवू शकतात.

एक सप्लायर छोटे बोल्ट्स, क्लॅम्प्स, नट्स, वॉशर अशा किरकोळ वस्तू पुरवायचा. पेमेंटसाठीही रडायचा. त्याच्या एकंदर अवतारावरून (मळकट शर्ट, ढगळ पँट) खरंच याचा बिझनेस फार नसावा असे वाटायचे. त्याने त्याच्या मुलीच्या लग्नात केलेला खर्च बघून आमचे डोळे फिरायची वेळ आली होती. 'वेष असावा बावळा, परी अंतरी नाना कळा' याचा चांगलाच प्रत्यय यानिमित्ताने आला.

या फील्डमध्ये रोज काही ना काही वेगवेगळे, चित्रविचित्र अनुभव येतात. कधी वाहतूकदारांकडून, कधी कामगारांकडून तर कधी सप्लायरकडून. डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे लागते. कोणत्याही व्यक्तीस दुखावून चालत नाही. याचे कारण म्हणजे कोण कधी कामास येईल याचा नेम नसतो. अर्थात, या गोष्टी अनुभवातून येत जातात. ज्यांना चॅलेंजिंग कामाची आवड आहे, त्यांनी यात काम नक्कीच करावे.

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

वा! खूप छान लेख. खरेदी विभागाच्या कार्यपद्धतीवर खूप वर्षांपूर्वी 'दै. सकाळ' मध्ये फार छान लेखमाला यायची. 'जस्ट इन टाइम', 'कायझेन', 'लीन ऑर्गनायझेशन' इत्यादी संकल्पनांची माहिती तेव्हा झाली होती.

या विषयावर अजूनही प्रत्यक्ष अनुभवाचे किस्से असल्यास जरूर लिहा.

मुक्त विहारि's picture

25 Sep 2015 - 12:41 am | मुक्त विहारि

मस्त.

प्यारे१'s picture

25 Sep 2015 - 12:56 am | प्यारे१

लेख आवडला. लेखमालेतल्या सगळ्या लेखांबाबत हीच तक्रार म्हणजे प्रत्येक लेखाची लेखमाला होण्याइतपत पोटेंशियल मटेरियल असताना लेखकांनी आखडते घेतलेले हात. अर्थात हेच या लेखमालेचं यश मानावं लागेल.
अन्याचा लेख सुद्धा त्रोटक च वाटला. अजून किस्से येऊ द्या हीच अपेक्षा.
कुठल्याही कंपनी मध्ये कच्चा माल ते फायनल प्रॉडक्ट अशी चेन असते. या चेन मधून जाताना जोडीला आवश्यक ते मनुष्यबळ, आवश्यक यंत्रणा आणि मशीनरी आणि अर्थातच आर्थिक पाठबळ हा विषय असतो.
मटेरियल, लेबर (यात कंपनीचे स्वत:चे किंवा एका ठराविक दरानं काम करणारे ठेकेदार सब कॉंट्रॅक्टर) आणि प्लान्ट/ मशीनरी असा भाग असायला हवा. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष खर्चात तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑफिसच्या जागेपासून ते अगदी कर्मचाऱ्या च्या चहापाण्याचा खर्च या सगळ्या गोष्टी अप्रत्यक्ष खर्चात समाविष्ट होतात.
विक्री करताना आपल्या जमा खात्यामध्ये एकच एंट्री दिसते (आपल्याला मिळणारा दर गुणिले नगांची संख्या किंवा एक अंतिम वस्तू) मात्र खर्चाच्या खात्यामध्ये शेकडो गोष्टी येऊ शकतात किंवा येतात.
या सगळ्यात अन्यानं लिहिलेल्या गोष्टी खूप महत्वाचा भाग असतात. या गोष्टी व्यवस्थित नियोजन असल्यासच जमतात अन्यथा बेक्कार वाट लागण्याची शक्यताच जास्त.

बोका-ए-आझम's picture

25 Sep 2015 - 1:08 am | बोका-ए-आझम

एमबीएला असताना प्राॅडक्शन अँड आॅपरेशन्स मॅनेजमेंट हा एक विषय होता. शिकवणारे प्राध्यापक शिक्षक म्हणून अप्रतिम होते त्यामुळे तो पार्श्वभूमी नसतानाही छान समजला होता. त्यांच्या लेक्चरला बसल्यासारखं वाटलं हा लेख वाचताना!

नाखु's picture

25 Sep 2015 - 9:22 am | नाखु

माझ्या मागच्या तीनही कुंपणीतले अनुभव वाचतोय असेच वाटले. (बाप्पा कृपेने सध्याचा कार्यभार फक्त अ-प्रत्यक्ष कराशी संबधीत आहे म्हणून या विभागाशी संबध (थेट तरी ) नाही).

लेख लवकर गुंडाळला आहे. (एकाच भागात बसवायची ताकीद असल्याने असेल पण अनुभवात तीन लेखांची ताकद आहे हे नम्रपणे नमूद करतो)

वरील मंडळींची (सोर्सिंग, प्रॉक्युरमेंट व पर्चेस.) प्रसंगाव्धान+तबलावादन्+जुगलबंदी जवळून अनुभवलेला नाखुस

प्रचेतस's picture

25 Sep 2015 - 9:42 am | प्रचेतस

दातार सरांचे लेख नेहमीच विचारांना चालना देणारे असतात. हा लेखही त्यातलाच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Sep 2015 - 9:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडेश. पण लेख आवरता घेतला आहेस. जे.आय.टी. विषयी एक वेगळा लेख येउ दे. बाकी प्रत्यक्ष भेटीमधे बोलु.

मांत्रिक's picture

25 Sep 2015 - 10:02 am | मांत्रिक

आवडला लेख. अगदी अनोळखी क्षेत्रांविषयी या लेखमालेमुळे माहिती मिळत आहे. कामगारांच्या फसवणुकीचा किस्सा भन्नाटच. मला पण असे अनुभव आलेले आहेत. बाकी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Sep 2015 - 10:05 am | ज्ञानोबाचे पैजार

लेखात वापरलेल्या संज्ञा रोजच्या रोज एकदातरी ऐकत असल्यामुळे लेख अत्यंत आवडला. रोज ज्यांच्याबरोबर लढाई करतो त्यांची बाजूही आज थोडीफार समजली.

माझ्या मागच्या कंपनीचे परचेस हेड स्वत:ची केबीन सोडुन सतत शॉप-फ्लोर नाहितर स्टोअर मध्ये पडिक असायचे आणि सतत मोबाईलवरुन कोणालातरी झापत असायचे. पण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी कधी लाईन थांबू दिली नव्हती. काही वेळा तर अगदी सप्लायरला सहा सहा महिने पेमेंट झाले नसले तरी.

तरीसुध्दा लेख फारच त्रोटक वाटला. अजून वाचायला आवडेल.

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

25 Sep 2015 - 10:16 am | चांदणे संदीप

छान माहितीपूर्ण लेख!

वाखूसा आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2015 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे

अजून एक माहितीपूर्ण लेख. तुमच्या रोचक अनुभवांसंबंधी लिखाण वाचायला आवडेल !

छान लेख.रोज नविन विश्वाची ओळख होतेय लेखमालेमुळे.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2015 - 10:54 am | प्रभाकर पेठकर

लेख खुप छान आहे.
पर्चेस खाते हे कुरण आहे. खात्यातील 'खाद्यसंस्कृती'वरही लिहा.
मी क्रॉम्पट ग्रीव्ह्ज, वरळी येथे, लेखा विभागात, नोकरीत असताना घडलेला किस्सा. एक सप्लायर होता. तो सिल्व्हर रिव्हेट्स सप्लाय करायचा. प्रत्येक ऑर्डरचे पैसे आगवू घ्यायचा. आणि एका छोट्या बॉक्स मध्ये सिल्व्हर रिव्हेट्स सप्लाय करायचा. एकदा एका बॉक्स मध्ये रिव्हेट्स ऐवजी दगड निघाले. ७३ साली २५०००/- रुपये ही मोठी रक्कम होती. पर्चेस विभागात कोणाची तरी नोकरी गेली असती. त्याला फोन करून ताबडतोब बोलावले, तो मान्य करेना की त्याने दगड सप्लाय केले आहेत. साहेबांनी त्याला त्यांच्या कॅबिन मध्ये बसवून ठेवले आणि ऑपरेटरला पोलीसांना फोन लावायला सांगितले. (खरं पाहता त्यांच्या टेबलावर डायरेक्ट लाईन होती, पण त्यांना त्याच्यावर फक्त प्रेशर टाकायचे होते.) क्लूप्ती यशस्वी झाली आणि त्याने साहेबांचे पायच धरले. २४ तासात पैसे परत करण्याच्या कबुलीवर पोलीस केस झाली नाही. सप्लायर बदलला गेला. ह्यात त्या साहेबाचेही कांही 'अर्थकारण' होते अशी बोलवा होती.

लाल टोपी's picture

25 Sep 2015 - 11:03 am | लाल टोपी

एका नविन क्षेत्राची ओळख झाली. लेख्ही आवडला

अतिशय वास्तववादी अनुभव आणि लेख.
गणेश लेखमालेत इतका वैविध्यपूर्ण आयटम आणल्याबद्दल सासंमं चे अभिनंदन !

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 12:00 pm | वेल्लाभट

वा वा वा!
उत्तम अनुभवकथन.
गणेश लेखमालेनिमित्त बरंच शिकायला मिळतंय. नवी क्षेत्र जवळून जाणता येतायत.

खूप छान.

मित्रहो's picture

25 Sep 2015 - 1:49 pm | मित्रहो

कंपनीतील फार महत्वाच्या परंतु नेहमीच दुर्लक्षिलेल्या विभागाची छान ओळखकरुन दिल्याबद्दल धन्यवाद.
आज परिस्थिती बदलेली असावी परंतु नव्दच्या दशकात बऱ्याच कंपन्या सप्लायरचे पेमेंट द्यायला उशीर करायचा, किंवा टाळाटाळ करायची किंवा कधीकधी द्यायचेच नाही. कित्येक सप्लायरने पर्चेसवाल्याला त्यावेळेला शिव्याशाप दिले असतील. त्याला नवीन माल द्यायला नकार दिला असेल. एका कंपनीत पेमेंट मिळाले नाही म्हणून सप्लायरने सप्लाय करनेच बंद केले आणि त्या प्लास्टीक पार्टचे मोल्ड स्वतःच ठेवून घेतले. कंपनीने स्वतः मोल्ड बनविले, प्लास्टीक पार्ट बनवून आणला पण तो पार्ट फिट होत नव्हता. हाती असलेल्या ड्राइंगशी तंतोतंत जुळुन सुद्धा फिट होत नव्हता. नवीन सप्लायर, पर्चेस आणि डीझाइन मधे रोज वाद होत होते. शोध घेतल्यावर लक्षात आले की जुन्या सप्लायरने जे ड्राइंग पाठविले होते त्यात काही महत्वाच्या डायमेंशन नव्हत्या. सारा गोंधळ त्यामुळे होत होता.
तसेही हे काम भावनिक दृष्ट्या पण कठीण काम असेल. समोरचा सप्लाय या किमतीला सप्लाय करु शकत नाही हे माहीत असूनही त्याला सप्लाय करायला सांगने. कुणाचा सप्लाय बंद करने. हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणणे फार कठीण असते. कधी कधी विचार येतो की वॉलमॉर्ट वगेरे कंपनीतील पर्चेसमधील लोक हे सारे कसे करीत असतील.

या लेखमालीकेतला अजुन एक उत्तम लेख.
अतिशय माहितीपूर्ण.

मधुरा देशपांडे's picture

25 Sep 2015 - 2:38 pm | मधुरा देशपांडे

सोप्या भाषेतील माहितीपुर्ण लेख आवडला.

दातार सर, मस्त लेख. एक जवळचा मित्र या विभागात कार्यरत असल्याने याबद्दलचे अनेक किस्से कायम कानावर पडत असतात. लाईन बंद पडली की दिल्लीपासून कोईमतूरपर्यंत घालावे लागणारे हेलपाटे, कामचुकार लोक्स आणि त्यापायी प्लँटला येणारा लॉस, जमलेला डेटा आणि त्याआधारे बरेच काही करण्यास असलेला स्कोप वगैरे वगैरे....

कोणत्याही व्यक्तीस दुखावून चालत नाही. याचे कारण म्हणजे कोण कधी कामास येईल याचा नेम नसतो.

पूर्ण सहमत !

छान लेख !

मी सुद्धा ह्याच विभागात काम करतो. फक्त आमचे प्रोजेक्ट प्रोक्युरमेंट असते. त्याविषयी लिहील म्हणतो.

पियुशा's picture

25 Sep 2015 - 3:00 pm | पियुशा

छान लिहिलेस , आमच्या कुम्पनीतले कीस्से आठवले मला :)

प्रास's picture

25 Sep 2015 - 4:13 pm | प्रास

लेख फर्मास जमलाय पण वरती प्यारेलाल म्हणतायत त्याप्रमाणे संबंधित किस्से आणि विवेचन जास्तीचं आलं असतं तर बहार आली असती.

आणि हो, करियरचा विचार करता विविध क्षेत्रातला तुमचा अनुभवही दांडगा आहे, त्याबद्दलही जरा.....

ठीक ना.... ;-)

किसन शिंदे's picture

25 Sep 2015 - 6:52 pm | किसन शिंदे

लेख आवडला दातार सर. :)

खरच एक वस्तु बनवायला किति मोठि साखळि लागते हे कळ्ले . आपण किम्मत जास्त आहे किवा चांगलि नाहि म्हणुन मोकळे होतो.

रेवती's picture

25 Sep 2015 - 7:46 pm | रेवती

लेखन आवडले.

द-बाहुबली's picture

25 Sep 2015 - 8:23 pm | द-बाहुबली

बापरे. हे सर्व वाचुन तर माझं डोकेच गरगरु लागले आहे.

छान लिहलयं.

मस्त लिहिलायस रे अन्या. फक्त लागणार्‍या गोष्टी बाजारातून मिळवण्यासाठी एवढी लफडी असतात मोठ्या कंपनीत हे माहीत नव्हते. बरेच आर्थिक अन लीगइल्लीगल पैलू असणार यात शंका नाही.
धन्यवाद मित्रा.

पैसा's picture

25 Sep 2015 - 10:29 pm | पैसा

पर्चेस खात्याबद्दल बरेच काही ऐकलेले आहे. तिथे आपले काही तत्त्व वगैरे शिल्लक ठेवून काम करणे मुश्किल. असे काही आंबट गोड अनुभव तुला असणारच. कधीतरी लिही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Sep 2015 - 8:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

असे काही आंबट गोड अनुभव तुला असणारच. कधीतरी लिही.

हल्ली पर्चेस वाले शॉपिंगला पण जातात असं ऐकुन आहे. =))
स्मायल्या नसल्याने लैच्चं गोची झालेली आहे.

पैसा's picture

26 Sep 2015 - 10:20 am | पैसा

एक पर्चेसर मधे एका स्वत:च आयोजित कट्टयाला अदृश्य होऊन कांदेपोहे खायला गेले होते असं ऐकलं. हे कांदेपोहया नंतरचे शॉपिंग का!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Sep 2015 - 10:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

काय आयड्या नै बॉ!! त्यांनी हल्ली गुप्ततेची शपथ घेतल्यामुळे काही सांगत नाहित. =))

नाखु's picture

26 Sep 2015 - 11:11 am | नाखु

"उचलले तू बोट पेर(चिमूट)भर अन विंजीनरचा खचला पाया" अशी म्हण सध्या फिरतेय खवतून.

लक्ष्यवेधी नाखु

योगी९००'s picture

26 Sep 2015 - 7:28 am | योगी९००

छान अनुभव कथन..!!

मी साधारण ८ महिने पर्चेस विभागात काम केले होते त्याची आठवण झाली. लार्सन अँड टुब्रो च्या चेन्नाईच्या प्लँटमध्ये हा अनुभव होता. सॉलिड टेन्शनवाले काम होते. जर एखादा क्रिटीकल पार्ट यायला उशीर होत असेल तर कधी कधी व्हि.पी. लेवलवरून फोन येउन शिव्या खाल्ल्या आहेत.

लाचार सप्लायर आणि उद्दाम सप्लायर असे दोन्ही नमुने बघीतले आहेत. लाचार सप्लायर इतका लाळघोटेपणा करतात की कधी कधी त्यांना हाकलून द्यायची वेळ यायची. आणि त्यांच्या कारखान्यावर तर जाणे ही नकोसे वाटायचे. (इतकी सरबराई व्ह्यायची की बाबारे आता बस कर...मला माझे काम करू दे (इंस्पेक्शन वगैरे) असे सांगावे लागायचे). उद्दाम सप्लायरच्या तर पाया पडायची वेळ यायची आणि धमकी देऊन (तुझी ऑर्डर कॅन्सल करेन, पेंमेंट रखडवेन) काही उपयोग नसायचा कारण वरिष्ठ लोकांचे हीतसंबंध गुंतलेले असायचे. एकदातर एका उद्दाम सप्लायरने दुपारी येऊन सर्वांसमोर आमच्या बॉसचा पाणउतारा केला होता कारण त्याला नवीन ऑर्डर दिली नव्हती.

गंमत म्हणजे कंपनीतले काही सिनीयर कामगारांचे सुद्दा छोटे छोटे कारखाने (बायको, मुलाच्या नावावर) होते आणि ते लोकं आमचेच सप्लायर होते. कंपनीत आल्यावर कधी कधी आजारी असल्याचा बहाणा करून ही लोकं त्यांच्या कारखान्यावर जाऊन काम करत असतं. समजा असेंब्लीत एका कामगाराच्या कंपनीचा पार्ट लेट झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला की दुसरा कामगार मुद्दाम पर्चेसला बोलवायचा आणि त्या कामगारासमोर मुद्दाम आम्हाला शिव्या घालायचा. (म्हणायचा की तुम्ही पर्चेसवाले या सप्लायरला चांगली सूट देता...त्याचा फालतू माल अ‍ॅक्प्सेट करता, जा त्या सप्ल्यायरला आत्ता बोलवा आणि आमच्या समोर त्याला शिव्या घाला वगैरे वगैरे). हे झाले की तो दुसरा कामगार अचानक आजारी पडायचा किंवा त्याला घरचा काही निरोप यायचा. आम्ही पर्चेसवाले सुद्दा दोन कामगारांच्या अशा भांडणांचा वापर करून घ्यायचो आणि आमचा उद्देश सफल करून घ्यायचो.

सुधीर कांदळकर's picture

26 Sep 2015 - 8:00 am | सुधीर कांदळकर

वरील अनेक प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे त्रोटक वाटले. सविस्तर माहितीमुळ्र मजा वाढली असती. इनव्हेंटरी कन्ट्रोल, मिनिमम लेव्हल, व्हॅल्यू अनालिअसिस, ओडीसी कार्गो, ट्रॅन्झिट इन्शुरन्स वगैरे गोष्टी आठवल्या आणि वेगवेगळ्या गंमतीदार आठवणी जाग्या झाल्या.

धन्यवाद.

सुबोध खरे's picture

26 Sep 2015 - 10:44 am | सुबोध खरे

रुग्णालयाच्या औषधी भांडारात ( मेडिकल स्टोअर) अडीच वर्षे काम केल्याचा बर्यापैकी अनुभव असल्यामुळे बर्याच गोष्टी भावल्या. अभियांत्रिकी पेक्षा औषधी मध्ये एक वेगळी कटकट असते ती म्हणजे औषधे मुदत बाह्य( EXPIRY) होतात त्यामुळे आलेले प्रत्येक औषध मुदतीत आहे का ते तपासून पाहावे लागते. शिवाय त्याची मुदत संपण्याअगोदर एक महिना ती BATCH औषध्धालयाकडे (DISPENSARY) कड पाठवावी लागते. जी औषधे संपली नाहीत ती परत घ्यावी लागतात. कधीकधी मध्यवर्ती औषध भांडारातून मुदतबाह्य होणारी औषधेच पाठविली जातात. त्यांना ती ताबडतोब परत करायला लागतात. त्यांच्या कडून जीवनावश्यक औषधे आली नाहीत तर स्थानिक बाजारपेठेतून विकत घ्यावी लागतात त्यासाठीची सगळे कागदपत्रे तयार करावी लागतात. (३ निविदान्सहित). शिवाय उपकरणे त्यांचे वार्षिक देखरेखीचे कंत्राट आणी त्याची कागदपत्रे ई. बिघडलेली उपकरणे दुरुस्त करून घेणे नादुरुस्त झालेल्यांच्या जागी नवी घेणे ई.
त्यातून आलेल्या मालाबद्दल खात्री असावी लागते. दिल्लीत संरक्षण मंत्रालयात वशिला लावून कंत्राट मिळवलेल्या काही कंपन्या वाईट दर्जाची औषधे पुरवत असत. अशा एका कंपनीचे डोळ्यात टाकायचे औषध निम्न दर्जाचे होते त्यावर मी पूर्ण कागदी कार्यवाही करून ते परत पाठविले त्यामुळे त्याचे कंत्राट रद्द केले तेंव्हा त्यांचा गोव्यातील माणूस माझ्या पाया पडायचा बाकी होता. कारण ते औषध भारतभरातील लष्करी रुग्णालयातून परत पाठवले गेले आणी त्याची किंमत ७५ लाख रुपये होती. ( लष्करात तुम्हाला असे केल्यास कोणताही त्रास होत नाही. इतर सरकारी खात्यात तडकाफडकी "बदली" होते).
भांडार व्यवस्थापनातील अनेक गंमतीदार किस्से आहेत. परत केंव्हातरी.

रीटेल केमिस्ट कडे स्टॉकीस्ट जो माल पाठवतात त्यात अनेक गोळ्यांमधील पट्ट्यांमध्ये एक एक्स्पार्ड पट्टी घुसडून देणे. माझा जीवलग मित्र तळेगाव दाभाडे, पुणे येथे दुकान चालवतो त्याने सांगीतलेला हा नवीन प्रकार.

पिशी अबोली's picture

26 Sep 2015 - 12:04 pm | पिशी अबोली

निरनिराळे चॅलेंजीस आणि अनुभव वाचून वेगळ्याच विश्वाची ओळख झाली.

pradnya deshpande's picture

26 Sep 2015 - 12:52 pm | pradnya deshpande

तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी सप्लायर आणि पर्चेसरची स्थिती असते. दोघांनाहि गरज असल्याने त्यांच्या संबंधात मधुरता हवीच. हे क्षेत्र हळू हळू व्यावसायिक होण्यापेखा धंदेवाईक होत आहे. नीती नियम गुंडाळून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा क्षेत्रात टिकून काम करणे च्यालेन्जिग आहे.

नाखु's picture

28 Sep 2015 - 9:27 am | नाखु

व्यावसायिक होण्यापेक्षा धंदेवाईक होत आहे.

याल जोरदान आणि खच्चून अनुमोदन. लांडी-लबाडी-हितसंबध-पाठराखण-भलाम्ण-अरेरावी- अनुभवलेला आणि त्यामुळे (पर्दाफाश केल्यानेच) बरेच शत्रू आणि मोजकेच (पण कायमचे) सन्मित्र मिळवलेला कारकुंड्या नाखु.

पैलवान's picture

26 Sep 2015 - 3:19 pm | पैलवान

उत्पादन क्षेत्राशी संबंध नसलेल्या लोकांना त्या क्षेत्रातील एका महत्वाच्या विभागाच्या कार्यशैलीशी तोंडओळख मस्त करून दिली आहे.
काहीजण म्हटले तसा लेख त्रोटक वाटतो खरा, पण त्याला लेखकमहोदयांपेक्षा त्या विभागाचा मोठा पसारा व गुंतागुंतीची कार्यशैली कारणीभूत असावी.

(५ वर्षांपासून उत्पादनक्षेत्रात माहिती तंत्रज्ञानात काम केल्याने सर्व विभागांशी घनिष्ट संबंध असलेला) पैलवान

मृत्युन्जय's picture

28 Sep 2015 - 12:50 pm | मृत्युन्जय

मस्त जमलाय लेख. इथे प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी भलतीकडेच प्रतिक्रिया देउन आलो. पैजारबुवांमुळे ध्यानात आले.

कामगारांचा अनुभव मजेशीरच.

सानिकास्वप्निल's picture

28 Sep 2015 - 4:27 pm | सानिकास्वप्निल

छान लिहिलाय लेख, आवडला.