मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो.
बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे:
१. आजच्या भ्रमणध्वनी, उपग्रह वाहिन्या, आंतरजाल या सुविधांनी युक्त अशा जीवनाने भौगोलिक सीमा हा प्रकार (निदान देशांतर्गत तरी) रद्दबातल ठरवलेला आहे. बेळगाव (सामील निपाणी, कारवार, हुबळी, विजापूर इ.) जरी कर्नाटकात असले तरी तेथील मराठीभाषिक जनतेला आपली संस्कृती जपणे अशक्य आहे असे मुळीच नाही. महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहणारे अमराठी लोक आपली ओळख सांभाळून असतात (नोंदः यात त्यांच्यावर टीका करण्याचा जराही हेतू नाही), तर कर्नाटकातील मराठी लोकांनाही हे करता येईल. आणि ते करत असणारच.
२. बेळगाव हे काही मराठी वस्ती असलेले महाराष्ट्राबाहेरील एकमेव शहर नव्हे. इंदूर, बडोदा, सुरत, गोवा, रायपूर, जबलपूर भोपाळ, हैदराबाद, बंगलोर अशा अनेक ठिकाणी मराठी जनता बहुसंख्येने राहते. ग्वाल्हेर, झांसी, जयपूर, कोटा, वाराणसी अशा अनेक उत्तर भारतीय शहरांतही मराठीजन स्थायिक होऊन राहिलेले आढळतात. केवळ या एका कारणावरून ही शहरे महाराष्ट्राला जोडावी ही मागणी करणे हास्यास्पद आहे.
३. "कर्नाटक सरकारने केले मराठी जनतेवर अमानुष अत्याचार", "कर्नाटकातील मराठी जनतेचा वाली कोण?" किंवा "कर्नाटक पोलिसांकडून मराठी जनतेची मुस्कटदाबी" असे मथळे काही (कोणत्या ते सांगणे नलगे!) वर्तमानपत्रांतून दिसत असतात. ते शुद्ध अतिरंजन असते हे खालील मजकूर वाचताच उमगते.
४. बेळगाव महाराष्ट्रात आलेच पाहिजे अशी साम्राज्यवादी मागणी करण्यापेक्षा कर्नाटकाला आपल्या मर्हाटी रंगात रंगवून टाकणे हाच मराठी संस्कृतीचा खरा विजय ठरेल अशी माझी समजूत आहे. यामागेही कानडी जनतेचा दुस्वास मुळीच नाही हे पुन्हा एकदा नमूद करतो.
५. बेळगाव महानगरपालिकेवर महाराष्ट्रवादी पक्षांचा वरचश्मा असतो. तिथे मराठी फलक लावणे, मराठीतून कारभार चालवणे अशा मुद्द्यांवरून वाद होत असतात. हे कर्नाटक राज्याचे अंतर्गत मुद्दे आहेत आणि ते चर्चेने सोडवणे मुळीच कठीण नाही असे मला वाटते.
----
वरील विवेचनात काही चुका असू शकतात. नव्हे, असणारच. कारण मी अनिवासी मराठी आहे.
या मुद्द्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी मी मुद्दामच बाजूला ठेवलेली आहे. पूर्वी, भूतकाळात, मराठी जनांवर तिथे अन्याय झाला असेलही. पण त्या जखमा किती दिवस गोंजारत बसणार, असे मला प्रामाणिकपणे वाटते.
"इथले लोक बाहेर पळायची संधी शोधतायत आणि तुम्हाला कशाला महाराष्ट्रात यायचंय? लाईट नाही, पाणी नाही, नोकर्या नाहीत, नेते सगळे चोर......." इ. निराशावादी आणि आततायी विचार मी अर्थातच मांडू इच्छित नाही, कारण मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही.
तरी जाणकारांनी सदर वादावर अन्य अंगांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
25 Jan 2015 - 11:39 am | सोत्रि
१-५ ह्या सर्व मुद्द्यांशी सहमत!
- (अनिवासी मराठी) सोकाजी
25 Jan 2015 - 11:43 am | यसवायजी
वाचतोय..
25 Jan 2015 - 1:15 pm | मंदार कात्रे
१. कर्नाटक सरकार जाणूनबुजून मराठी शाळा बन्द करत आहे, मराठी महापौर निवडुन आलेला असताना नगरपालिका बरखास्त केली
२.इतर ठिकाणे व बेळगाव ची परिस्थिती निराळी आहे .
३.वर्तमानपत्रांतून शुद्ध अतिरंजन असते >>> हे तुम्हाला कसे कळले ? स्वप्न पडले का?
४.कर्नाटकाला आपल्या मर्हाटी रंगात रंगवून टाकणे>> हे तुमचे स्वप्नरंजन आहे. बेळगावात् जाऊन राहून पहा.
५. कर्नाटक राज्याचे अंतर्गत मुद्दे आहेत आणि ते चर्चेने सोडवणे>> तरुण भारत बेळगाव या वॄत्तपत्राचे संपादक किरण ठाकुर याना भेटा एकदा ...
उगाच प्रश्नाच्या भयावहतेची जाणीव नसताना हवेत गोळीबार करू नये
25 Jan 2015 - 2:00 pm | चलत मुसाफिर
कात्रे भाऊ, नमस्कार.
मी माझी भूमिका मांडलेली आहे. ती(च) बरोबर आहे अशी घोषणा कुठेही केलेली नाही. उलट, मला दुसरी बाजू जाणून घ्यायला आवडेल हेच म्हटले आहे. त्यामुळे तुम्ही हवेत केलेला गोळीबार हा निश्चितच व्यर्थ आहे. आंतरजालावर तुमच्यासारखे पेटते पलिते नेहमी भेटत असल्यामुळे आता राग येण्याऐवजी गंमत वाटते! :)
थोडं भीमथडीचं थंड पाणी पिऊन घ्या आणि पाच मिंटं कपालभाति करा. शांत झालात की मग बोलू. शुभेच्छा! :)
25 Jan 2015 - 2:16 pm | राही
मुद्दा १,३, ४ शी असहमत. बेळगावात मर्हाटी संस्कृती जपणे अशक्य व्हावे असे प्रयत्न होत असतात. इंदौर, उज्जैन,भोपाल ह्या शहरात मराठी जनता बहुसंख्येने राहाते हे विधान चूक आहे. ही सर्व हिंदी भाषिक शहरे आहेत. तिथे मराठी भाषक अल्पसंख्य आहेत. शिवाय ती महाराष्ट्राशी भौगोलिक दृष्ट्या संलग्न नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक ही वेगळी राज्ये झाली तेव्हा बेळगावात मराठी लोकांची बहुसंख्या होती आणि भौगोलिकरीत्या बेळगाव महाराष्ट्राला जोडणे सहज शक्य होते.
आता हा तिढा सुटणार्यातला राहिला नाही. काही वर्षाम्पूर्वी शरद पवारांनी एक सूचना केली होती की बेळगावच्यासमोरच महाराष्ट्राच्या सीमेत एक शहर-प्रति बेळगाव-वसवावे. त्याला हवे तर नवे बेळगाव म्हणावे. कालांतराने हे शहर बेळगावचे उपनगर किंवा बेळगाव हे या नव्या शहराचे उपनगर होउ शकले असते. आर्थिक व्यवहार, नोकर्या, शिक्षण, हॉस्पिटले, वाहातुकीची साधने, करमणुकीच्या सोयी दोन्ही शहरांना लाभदायक होऊन दोहोबाजूने जाणेयेणे सुरू झाले असते, दैनंदिन संपर्क वाढला असता आणि तेढ कमी झाली असती.
25 Jan 2015 - 2:27 pm | उडन खटोला
+१
25 Jan 2015 - 7:12 pm | यसवायजी
बेळगावच्यासमोरच महाराष्ट्राच्या सीमेत एक शहर-प्रति बेळगाव-वसवावे. त्याला हवे तर नवे बेळगाव म्हणावे. कालांतराने हे शहर बेळगावचे उपनगर किंवा बेळगाव हे या नव्या शहराचे उपनगर होउ शकले असते.
समजले नाही. महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला प्रति-बेळगाव नाव दिल्याने मुळ बेळगावच्या रहिवाश्यांच्या समस्या (स्थलांतरा शिवाय) कशा काय सुटतील? अन्यथा, बॉर्डरजवळ दुसरं बेळगाव वसवलं काय, किंवा कोल्हापुरजवळ वसवलं काय, एन फायदा इल्ले.
27 Jan 2015 - 11:56 pm | राही
बेळगावच्या लगतच दुसरे मोठे शहर वसवल्याने दोन्ही शहरांमध्ये संबंध (व्यापारी, सामाजिक, शैक्षणिक आणि रोटीबेटीचेही)वाढून तेढ कमी झाली असती.कालांतराने नंतरच्या पिढ्यांनी कदाचित नव्या शहरात घरे घेतली असती. आज नव्या मुंबईत हेच होते आहे. मुंबईकरांची दुसरी तिसरी पिढी नवी मुंबई, ठाणे-डोंबिवली, विरार-वसई या ठिकाणी स्थलांतरित होते आहे आणि एक अतिविस्तारित मुंबई जन्म घेते आहे. या विस्तारित प्रदेशाचे मूळ शहराशीही लागेबांधे आहेतच.
25 Jan 2015 - 3:11 pm | चलत मुसाफिर
१. मर्हाटी संस्कृती जपणे हे वैयक्तिक आणि सामाजिक रूपाने कठीण नसावे. मराठीपण हे कधीही देशविरोधी अवतार धारण करीत नाही (अजूनतरी असे दिसलेले नाही). किंबहुना मराठी लोक हे प्रत्येक राज्यातील भाषा, संस्कृती यांच्याशी समरस होऊनच राहतात असे मी पाहिलेले आहे (ही लाजेची नसून अभिमानाची बाब आहे). संस्कृती म्हणजे काय, हा मुद्दा इथे उपस्थित होतो.
सामान्यपणे गणपति, शिवजयंती, पाडवा, गानमहोत्सव, नाट्यमहोत्सव, चित्रपट, महाराष्ट्र मंडळ, मराठी शाळा ही सामाजिक संस्कृती आणि घरातील वातावरण, वेशभूषा (नऊवारी इ.), घरातील बोलीभाषा, पुस्तके इ. ही वैयक्तिक पातळीवरील संस्कृती म्हणावी काय?
असे जर असेल, तर पहिला प्रश्न म्हणजे या सर्व गोष्टींवर कर्नाटकात कितपत निर्बंध आहेत, आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्रातील किती शहरांतील किती घरे या व्याख्येनुसार मराठी म्हणून गणली जातील?
२. मराठी संस्कृती कर्नाटकात असुरक्षित आहे, या विधानाची दुसरी बाजू म्हणजे ती महाराष्ट्रात सुरक्षित आहे. मग इतक्या सगळ्या सेना उभ्या करण्याची काय गरज आहे? (हा फक्त एक मुद्दा म्हणून उपस्थित केला आहे. माझी वैयक्तिक राजकीय मते इथे अजिबात महत्वाची नाहीत. तेव्हा चर्चा त्या दिशेने नेऊ नये ही विनंती.)
३. बहुसंख्य हा शब्द ५०% या अर्थाने वापरला नव्हता. सदर शहरांत सहज दिसून येण्याइतकी मराठी वस्ती आहे एवढाच त्याचा अर्थ होता.
४. प्रति-बेळगाव ही कल्पना अजूनही अंमलात आणली जाऊ शकते, नाही?
25 Jan 2015 - 3:29 pm | दादा पेंगट
सहमत.
25 Jan 2015 - 3:27 pm | काळा पहाड
कर्नाटक सरकार कडून असली थापेबाजी करण्यासाठी पगार घेता का? तुम्ही अनिवासी आहात तेच बरं. तिथेच रहा.
बाकी इतरांसाठी.
कर्नाटक सरकारला धडा शिकवणं मुळीच कठीण नाही असं पर्सनल मत आहे. बेंगलोर सोडलं तर कर्नाटकात फारसं काही नाहीय. कृष्णेच्या पाण्यात ती जिथं कर्नाटकात शिरते तिथे ती "अॅक्सीडेंटली" दूषित करता येईल. पावसाळ्यात कृष्णेच्या पाण्याचा कर्नाटकचे भाग पूरग्रस्त करण्यासाठी वापर करता येईल. कर्नाटकच्या सगळ्या प्रवासी गाड्यांची वाहतूक महाराष्ट्रातून बंद करता येईल. कर्नाटक कडे होणारी सर्व मालवाहतूक थांबवता येईल. कांदावाहतूक आणि भाजीपाल्यांची कर्नाटकला होणारी विक्री थांबवता येईल.
25 Jan 2015 - 3:31 pm | काळा पहाड
आणि हो, लाँग रेंज पॅट्रोल युनिट्स तयार करून कर्नाटकात दूरवर धाडी घालून रसद लुटता येईल.
25 Jan 2015 - 3:33 pm | चलत मुसाफिर
"प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद" असं टंकणार होतो. पण आपले तडफदार, ज्वालाग्राही विचार वाचून "धन्य झालो" असेच उद्गार निघाले! :)
चालू द्या साहेब.
25 Jan 2015 - 3:37 pm | काळा पहाड
ज्याचं जळतं त्यालाच कळतं साहेब. बाकीच्यांचं "सेक्युलर" बनून नोबेल शांती पारितोषिकासाठी प्रयत्न करण्यात काहीच जात नाही, नाही का?
25 Jan 2015 - 3:44 pm | चलत मुसाफिर
म्हणूनच हा विषय काढला साहेब.
माझ्यापुढचे दोन पर्यायः
१. नोकरीधंद्यावर लाथ मारून बेळगावला जाऊन (फुटपाथवर!) राहणे आणि सीमाप्रश्न समजून घेणे
२. सीमाप्रश्नाची सखोल माहिती असलेल्या मिपाकरांशी संवाद साधणे.
मी "माझं ते खरं" असं कुठेही म्हटलेलं नाहीये. उलट मला पूर्ण माहिती नाही, अस डिसक्लेमर टाकलेला आहे.
25 Jan 2015 - 6:18 pm | टवाळ कार्टा
खिक्क...खास मिपाने मराठी भाषेला दिलेला "ड्वाळे पाणावले" हे लिहायचे होते की ;)
25 Jan 2015 - 3:36 pm | चलत मुसाफिर
रच्याकने, कर्नाटक सरकारमध्ये खरंच अशी व्ह्याकन्सी आहे का? नोकरी बदलण्याचा तीव्र मोह होत आहे. :) :)
25 Jan 2015 - 5:32 pm | क्लिंटन
आपापसात कितीही मतभेद असले तरी शेवटी आपण सगळे भारतीयच आहोत आणि भारतीयच राहू असे सगळ्यांना वाटते हा गैरसमज हा प्रतिसाद वाचून गळून पडला.
बाकी चालू द्या
25 Jan 2015 - 6:16 pm | टवाळ कार्टा
28 Jan 2015 - 9:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर वर थेट मराठा बटालियन तैनात करता येतील. दिसली लुंगी की घाला गोळी. काय कशी काय वाटते आयडीया!!! =))
(ह.घ्या. ओ)
28 Jan 2015 - 10:31 am | सुनील
लुंगी घालण्याची प्रथा उत्तर कर्नाटकात आहे किंवा काय, याविषयी साशंक आहे. तशीही दोन्ही बाजूची तरुण पिढी शर्ट-प्यांटच घालत असावी!!
मराठा रेजिमेन्टचे मुख्यालय बेळगावातच आहे, तेव्हा विशेष बटालियनच्या तैनातीचीही आवश्यकता नसावी!! ;)
28 Jan 2015 - 11:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
;)
28 Jan 2015 - 6:32 pm | आदूबाळ
मराठा लाईट इन्फन्ट्रीचं मुख्यालय बेळगावलाच आहे!
7 Apr 2020 - 3:57 pm | विटेकर
अरे ते कानडी आहेत की पाकीस्तानी ?? काय गोष्टी करताय तुम्ही ? इतका पराकोटीचा द्वेष ??
25 Jan 2015 - 4:06 pm | सस्नेह
लेखामागे कोणताही अभ्यास किंवा अनुभव यांचा अभाव असल्याचे जाणवते. मते जाणून घेण्यासाठी नव्हे तर, केवळ लेख टाकण्यासाठी लिहिल्यासारखे वाटते.
(कर्नाटक सीमावासी) स्नेहांकिता
25 Jan 2015 - 4:38 pm | चलत मुसाफिर
अभ्यासाचा अभाव आहे हे आपले मत विनम्रपणे स्वीकार करतो. मात्र केवळ टाकायचा म्हणून एक लेख टाकलेला आहे, हे आपले विधान बरोबर नाही. माझ्या खर्याखुर्या भावनाच इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
धन्यवाद.
25 Jan 2015 - 4:22 pm | पैसा
http://www.misalpav.com/node/28397
http://www.misalpav.com/node/5645
http://www.misalpav.com/node/22911
http://www.misalpav.com/node/17029
http://www.misalpav.com/node/10035
**************
बेळगावबद्दल एवढे धागे मिपावर सहज सापडले. पैकी एका धाग्यावर २०१२ मधे माझा अनुभव लिहिला होता, तोच पुन्हा पेस्टवते.
**********
भावना पोचल्या! गेल्याच आठवड्यात रामनगरवरून हळशी इथे गेले होते, प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे सगळीकडे घरांच्या पाट्या, दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत. रस्त्यावरच्या सरकारी पाट्या फक्त कानडी भाषेत आहेत, कुठेही हिंदी इंग्लिश सुद्धा वापरलेलं नाही. साहजिकच ठिकठिकाणी थांबून लोकांना रस्ता विचारणे भाग होते, कारण हळशी हे बर्यापैकी आत आहे. आणि मराठीत विचारलेल्या प्रश्नाना सगळे लोक अगत्याने गोड हेल काढत मराठीत उत्तरे देत होते. जागोजागी सरकारी प्राथमिक शाळा मराठीत दिसत होत्या. हीच परिस्थिती गेल्या वर्षी कारवारला जाताना पाहिली होती. बेळगाव शहरात मात्र एखाद्या पोलिसाला मराठीत काही विचारले तर कानडीत उत्तरे मिळायची. सर्व पोलीस कानडी आहेत अशी माहिती एका रिक्षावाल्याने दिली होती. बेळगावचे कानडीकरण सरकारतर्फे जोरदार चालू आहे. शिवाय हा भाग मराठी म्हणून विकासकामांच्या बाबतीत सरकारतर्फे दुर्लक्ष चालू आहे. हळशी इथे रोज १४ तास वीज नसते कारण लोडशेडिंग अशी माहिती मिळाली. गेली २० वर्षे अनमोडमार्गे बेळगावला जाते आहे. एकदाही रस्ता चांगल्या अवस्थेत बघायला मिळाला नाही. गोव्याची सीमा ओलांडली की बेळगावपर्यंत फक्त खड्डेच आहेत. दर वेळी हाडे खिळखिळी झाली की परत बेळगावला येणार नही म्हणते आणि ४/६ महिन्यांनी परत जाते! तेव्हा कर्नाटकात लोक सुखी आहेत यात काही तथ्य नसावे.
सहजच गेल्या वर्षी मराठी दिनाला येळ्ळूरबद्दल अपर्णाने लिहिलेल्या लेखाची आठवण आली. बेळगाव प्रश्न म्हणजे फक्त बेळगाव शहराचा प्रश्न नव्हे, तर आसपासच्या बर्याच मोठ्या भागाचा प्रश्न आहे, आणि कोणत्याही देशव्यापी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय ही चळवळ लोकांनी इतक्या वर्षांनी देखील चालवली आहे याबद्दल त्यांचं कौतुक वाटतं. ते खरे मराठी भाषेचे प्रेमी. आमच्यासारखे आंजावर चर्चा करत बसत नाहीत. की मराठीचा उद्घोष करत स्वत:च्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालत नाहीत. त्या सगळ्यांना इथून पाठिंबा देणं यात फार काही अर्थ नाही म्हणून सलाम म्हणते.
त्याच वेळी सरसकट कानडी सामान्य लोक वाईट असेही म्हणवत नाही. कितीतरी चांगले कानडी लोक भेटले आहेत. आणि मी त्यांच्याकडून कानडी शिकण्याचा मोडकातोडका प्रयत्न केला आहे. कानडी आणि मराठी असे वेगळे प्रदेश खरे तर भौगोलिक दृष्ट्या नाहीतच. असलेच तर कोकण आणि घाट आहेत! शिवाय मराठी आणि कानडीत बरेच साम्य असणारे शब्द आहेत. दोन भाषांमधे वैर असू शकत नाही. बेळगावचा प्रश्न सोडवण्यात कोणत्याही राजकीय पक्षाला खर्या अर्थाने रस किंवा इच्छाशक्ती नाही हेच खरे!
25 Jan 2015 - 4:44 pm | चलत मुसाफिर
आपण इतके सर्व दुवे एकत्र करून दिल्यबद्दल मनापासून आभार. वाचत आहे.
हे दुवे बरेच जुने आहेत. त्यावेळी अस्मादिक मिपावर नव्हते. हे मी सुरुवातीलाच म्हटले आहे.
वरवर नजर मारताना असे जाणवते की या विषयावर अभिनिवेशविरहित चर्चा होत नाही. वैयक्तिक किंवा भावनिक पातळीवर जाऊन बहुतेक विधाने केली गेली आहेत. असो. नीट वाचतो आणि पुन्हा बोलतो. :)
25 Jan 2015 - 5:06 pm | चलत मुसाफिर
साधारण अशीच परिस्थिती धुळे, शिरपूर, अमळनेर भागात दिसून येते. या भागात लक्षणीय गुजराती वस्ती झाली आहे. शिरपूर - सुरत रस्त्यावर दुकानांचे फलकही मला गुजराती भाषेत लिहिलेले आढळले होते. पण तो धंद्याचा भागही असू शकेल. शिवाय, तिथे कुणीही 'चोपडा, अमळनेर, धुळ्यासह संपूर्ण गुजरात झालाच पाहिजे' अशी आरोळी मारलेली नाहीये. सारांश काय, महाराष्ट्र हाकेच्या अंतरावर असताना बेळगावात सीमाप्रश्नावरून वादंग होत राहणे याचा अर्थ समजत नाही.
25 Jan 2015 - 6:08 pm | राही
चोपडे, अमळनेर, धुळे हे पूर्वीपासून मराठी बहुसंख्येचेच भाग होते. त्यामुळे द्वैभाषिक मोडताना ते नव्या महाराष्ट्रातच राहिले यात काही नवल नाही.तिथे झालाच पाहिजे'ची आरोळी उठलीच नसती.उलट डांग-उंबरगावचा बराच मोठा मराठीभाषिक भाग गुजरातेत गेला.पण हा सर्व मागास, आदिवासी भाग होता त्यामुळे त्यासाठी आंदोलन झाले नसावे.शिवाय, इथल्या भाषेवर (अहिराणी किंवा खान्देशीचा एक प्रकार)गुजरातीचा प्रभाव आहे असे सांगून गुजरात ह्या पट्ट्यावर हक्क सांगू लागले होते,पण तेव्हा उकाईचा लाभार्थी सुपीक काळ्या मातीचा पट्टा म्हणून डांग-उंबरगाव देऊन तडजोड करण्यात आली असा प्रवाद आहे. खरे तर अश्या तडजोडीची जरूर नव्हती कारण या भाषा ह्या मराठीच्याच बोलीभाषा आहेत आणि त्या बोलणारे स्थानिक लोक हे मराठी भाषकच आहेत.
परिस्थिती कशी बदलते ते पहा. गेली काही वर्षे अगदी पार बडनेर्यापासूनचे उत्तर महाराष्ट्रातले लोक नोकरीसाठी सुरतेला जातात. शनिवार-रविवार घरी येतात. त्या दिवशी गुजरातेकडे जाणार्या रेल गाड्या भरून जातात.गुजराती कारखानदारसुद्धा 'हेड्-हंटिंग्'साठी या भागात येतात.
28 Jan 2015 - 12:02 am | राही
वरील प्रतिसादात अर्थ पुरेसा स्पष्ट झालेला नाही असे वाटल्याने पुन्हा स्पष्ट करून लिहीत आहे. धुळे, चोपडे वगैरे पट्टा हा सुपीक भाग होता. उकाई धरणामुळे तिथली जरी जमीन गेली तरी फायदेही झाले. असा सुपीक पट्टा गुजरातेत जाऊ देण्याऐवजी डांग-उंबरगाववर पाणी सोडून तडजोड करण्यात आली असे म्हटले जाते.
25 Jan 2015 - 6:12 pm | विवेकपटाईत
बेळगाव हे कर्नाटकचे आहे, हेच आजचे सत्य आहे आणि ते कर्नाटकातच राहणार हे ही सत्य आहे. बाकी मराठी संस्कृती रक्षणार्थ महाराष्ट्रात राहणे आवश्यक नाही. आज दिल्लीत राहत असून ही सर्व मराठी चनेल टीवी वर पाहतो, सर्व सणवार - संक्रांतीच्या हळदी कुंकू पासून ते दत्त जयंती पर्यंत इथे साजरे होतात. गेल्या रविवारीच दिल्लीच्या दत्तविनायक मंदिरात गणेश याग झाला. असो.
25 Jan 2015 - 6:53 pm | हरकाम्या
का उगीच "जखमेवरची खपली " काढ्ताय ?
25 Jan 2015 - 8:48 pm | यसवायजी
आमच्या निपाणीतली या आठवड्यातली मराठीची स्थिती-
१. जाणता राजा - हाऊसफुल्ल! लोकाग्रहास्तव अजुन २ दिवस (२५ & २६) वाढवले.
२. नगरपालिकेकडून ३ कोटी खर्चून शिवछत्रपतींचा पुतळा आणी सांस्कृतीक भवन.
26 Jan 2015 - 2:54 pm | चलत मुसाफिर
१. यावरून, मराठी संस्कृतीला कर्नाटकात मुळीच धोका नाही असा निष्कर्ष काढला तर ते चुकीचे होईल काय?
२. याउलट बोलायचे, तर महाराष्ट्रातील ज्या ज्या शहरात अजून जाणता राजाचे प्रयोग झालेले नाहीत, त्या शहरांवरचा मराठी माणसांचा हक्क रद्दबातल होतो काय?
३. बेळगावव्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेरील अन्य काही शहरात जर जाणता राजाचे प्रयोग हाऊसफुल्ल गेले, तर तीही महाराष्ट्राला जोडून घ्यावीत काय?
तिन्ही प्रश्नांचे उत्तर ("होय" किंवा "नाही") एकच असू शकते.
लोभ असावा ही विनंती :)
26 Jan 2015 - 3:23 pm | यसवायजी
@ यावरून काय सिद्ध होते? >>>>>>
मला काहीच सिद्ध करायचे नाहीए. मी फक्त माहिती दिली. तुम्हीच ठरवा काय ते.
-काडी-
उद्या समजा कुठल्यातरी मुर्ख कमिटीने कोल्हापुर कर्नाटकात टाकले तरी त्यावेळेससुद्धा तुमच्या लेखातील सगळे मुद्दे लागू होतात का?
26 Jan 2015 - 5:17 am | रमेश आठवले
नुकत्याच संजय राउत यांनी काढलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर आधारित असलेल्या बाळकडू या सिनेमाची जाहिरात पाहिली आणि विचारात पडलो -कारण त्यात मुंबईतील मराठी माणसांची संख्या फक्त २२ टक्के आहे असे सांगितले आहे .
26 Jan 2015 - 11:42 pm | चिगो
मुंबई हे खर्या अर्थाने 'मेट्रो' शहर आहे. 'मेट्रो'चा अर्थच मुळात अठरापगड.. अगदी कलकत्त्यात सुद्धा फक्त १३% बंगाली आहेत, असं मला एका बंगाल्याने सांगितलं. कुठल्याही 'वर्ल्ड क्लास सिटी' बनण्याची स्वप्ने पाहणार्या शहरात एका विशिष्ट जाती/धर्म/भाषा समुहाच्या लोकांची टक्केवारी मोजण्याच्या भानगडीत पडू नये, असं माझं मत आहे.. कणेकरांनी म्हटल्याप्रमाणे "परवा न्युजर्सीत एक अमेरीकन दिसला होता म्हणे" हे घडणं हेच "मेट्रो"चं प्राक्तन असतं..
26 Jan 2015 - 7:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आम्ही सर्व भारतीय जिथे राहु तिथे गुण्यागोविंदाने राहु.
-दिलीप बिरुटे
(भारतीय)
9 Feb 2016 - 11:58 am | मयुरMK
पण इथली लोक गुण्या गोविंदाने राहू देत नाहीत कि ओ ? :)
ह.घ्या:)
26 Jan 2015 - 8:03 am | पाषाणभेद
चलत मुसाफ़िर, आपल्या मतांच्या मुदलातच घोळ आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाला केवळ राजकीय संदर्भ नाहीत. सीमाप्रश्नाविषयी येथे प्रकट झालेल्या मतांबद्दल वैषम्य वाटते. आधीचे धागे पहा. इतर संस्थळावरील चर्चा पहा. सीमाप्रश्नाचा, तेथील लढ्याचा अभ्यास करा.
उगाच केवळ तांत्रीक अंगाने जग जवळ आले म्हणून आपण काही रशीयन, जापनीज, चायनीज बोलत नाही, शिकत नाही आणि लिहीतही नाही.
कंटाळा आलाय समजावून समजावून.
26 Jan 2015 - 2:47 pm | चलत मुसाफिर
अहो साहेब,
१. मी या प्रश्नाला सद्यकालात महत्व उरले आहे का, असा विषय मांडू पाहत आहे. इतिहास हा मुद्दा मी बाजूला ठेवला आहे असे नमूद केलेलेच आहे. अर्थात, या वादाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची संगतवार चर्चा इथे झाली तर ते चांगलेच होईल.
२. संस्कृती या विषयाबद्दलची माझी मतेही लिहिली आहेत. दुर्दैवाने त्यावर बोलण्यास कोणी उत्सुक दिसत नाहीत.
३. आपण महाराष्ट्रात जपानी बोलावे असे लेखात कुठेही म्हटलेले नाही. उलट, जपानमधील मराठी नागरिकही आजच्या युगात सुलभपणे मराठी बोलू / वाचू/ लिहू/ सांभाळू शकतात असे सुचवलेले आहे.
26 Jan 2015 - 3:18 pm | यसवायजी
सिमाभागात मराठीवर बंदी नसली तरी कन्नड सक्तीचे आहे. मला शाळेतल्या कन्नड स्क्तीचा फायदाच जास्त झाला असला तरी, याच गोष्टीचा जास्त त्रास होतो जुन्या लोकांना. सरकारी कागदपत्रे, नोटीस, बसच्या पाट्या वगैरे वाचता येत नाहीत. सरकारी कार्यालयात कन्नड अधिकारी बसवलेत की जे मराठी लोकांशी उर्मटपणे बोलतात, बर्याचदा उगाचच त्रास देतात.
मी लहान असताना एकदा हेडमास्तरांनी प्रार्थनेच्या वेळेस "जय जय महारष्ट्र माझा" म्हणायला लावलं होतं तर काही कन्नड मास्तरांनी आक्षेप घेतला होता. (चूक/बरोबर वगैरे जाऊद्या). आता त्याच शाळेत "जय हे कर्नाटक माते" म्हटले जाते.
26 Jan 2015 - 9:03 am | नितिन थत्ते
बेळगाव प्रश्न जागृत ठेवणार्यांच्या सुदैवाने इतक्या वर्षात एकदाही महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकार ही तीनही सरकारे एकाच वेळी बिगर काँग्रेसी नव्हती.
26 Jan 2015 - 9:27 am | चिरोटा
लढ्याआधी,मागणी कारण्याआधी जरा नकाशा पाहूया-
बेळगाव शहर हे बरेच आत आहे.तेव्हा NH4 वरची लागणारी व आजूबाजूची सर्व गावे घ्यायची का?फक्त बेळगाव शहर महाराष्ट्रात हवे ही मागणी हास्यास्पद आहे.ईतर धाग्यात नोंदवलेली निरिक्षणे पुन्हा-
१) बेळगाव शहरात अजूनही असंख्य दुकानांची नावे मराठीत आहेत्,स्थानिक नियमांना फाट्यावर मारून.
२)रस्त्यांची,उपनगरांची नावे,अजूनही जुनी म्हणजे मराठीतच आहेत.किर्लोस्कर रोड्,टिळक्वाडी,सोन्या मारूती...
३)शिवसेना व मनसेच्या शाखा येथे आहेत.
थोडक्यात संस्कृती जपायच्या मागे ज्या काही मागण्या असतात त्या येथे व्यवस्थित पुरवल्या गेल्या आहेत.
४)शहरात मराठी बहुसंख्य असतील किंवा होते पण शहराची,जिल्ह्याची मूळ संस्कृती कन्नड आहे-जुनी कागदपत्रे,व्यवहार... महाजन आयोगाने हाच मुद्दा महत्वाचा मानला होता.
५)'लढा' लढणार्या वृत्तपत्रमालकाची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक हुबळी,धारवाड्,बेंगळूरू येथे आहे.स्थानिक निवडणूका आल्या की मग ह्या पेपरातून 'कर्नाटकची दडपशाही,वरवंटा' वगैरे बातम्यांचा रतीब यायला लागतो.दुसर्या पानावर लोकप्रिय कन्नड चित्रपटांच्या जाहिरातीही असतात!.
26 Jan 2015 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण प्रतिसाद.
-दिलीप बिरुटे
26 Jan 2015 - 12:10 pm | अभिरत भिरभि-या
-> "बेळगाव शहर हे बरेच आत आहे.तेव्हा NH4 वरची लागणारी .. "
चंद्गड रस्त्यावरच्या शिनोली या महाराष्ट्रातील गावापासून बेळगाव केवळ १९ किमी वर आहे. NH4 वरून लांब पडते म्हणून महाराष्ट् सीमेपासून बेळगाव दूर. म्हणून महाराष्ट्राने बेळगाव मागणे चुकीचे हा दावा तर्कहीन आहे.
-> फक्त बेळगाव शहर महाराष्ट्रात हवे ही मागणी हास्यास्पद आहे
बेळगाव, कारवार निपाणी आदींसह ८००+ गावांचा हा लढा आहे.
-> शहराची,जिल्ह्याची मूळ संस्कृती कन्नड आहे.
रा. चिं. ढेरे, दुर्गा भागवत आदी विद्वानांच्या मतानुसार महाराष्ट्र, कर्नाट्क व तेलुगु प्रातांची संस्क्रूतीची मूळधारा एकच आहे. या मूळ धारेला कन्नड ही म्हणू शकता वा मराठी ही म्हणू शकता.
पण अगदी नावापासून सुरु केले तर वेणूग्राम (संस्कृत) -> वेळुगाव/बेळगाव (प्राकृत) अशी होते. संस्कृतीची ही रेषा कोरेगाव / जळगाव अशा मराठी प्रदेशांशी जास्त जुळते का कानडी प्रदेशात असणा-या हळ्ळी / पाळ्या अशा नावांशी ?
-> जुनी कागदपत्रे,व्यवहार
पुन्हा बुद्धीभ्रम. बेळगाव पालिकेचा व्यवहार मराठीत असायचा हे कानडी राज्यकर्त्यांचे हे तर शल्य होते.
बेळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग हा कानडीबहुल आहे. तो महाराष्ट्रात यावा ही मागणी केलेली नाही. केवळ मराठीभाषिक महाराष्ट्रात यावेत ही न्याय्य इच्छा आहे.
26 Jan 2015 - 12:40 pm | यसवायजी
मोठ्ठा + १
27 Jan 2015 - 11:46 pm | राही
खूपच छान प्रतिसाद.
१९५६ सालापूर्वी सध्याच्या कर्णाटकातले जे चार जिल्हे मुंबई इलाख्यात होते (बेळगाव, कारवार, धारवाड, विजापूर)तिथले सरकारी व्यवहार मराठीतून होत असत. जुन्या काळी मराठी भाषेसाठी मोडी लिपीसुद्धा वापरलेली असे.
26 Jan 2015 - 2:57 pm | चलत मुसाफिर
अभिनिवेश नसल्यामुळे प्रतिसाद अधिकच चांगला वाटला. निदान या प्रतिसादाच्या पातळीवर उर्वरित चर्चा व्हावी अशी इच्छा.
26 Jan 2015 - 10:05 am | hitesh
बेळगाव कर्नाटकात हवे असे सांगुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोल्ले होते की नावातील पहिल्या दोन अक्षरानी तयार होणारा शब्द बेळी हा कन्नड आहे.
आचार्य अत्रे बोल्ले .. हा युक्तिवाद मान्य करायचा असेल तर लंडन महाराष्ट्रात सामील करावे लागेल.
26 Jan 2015 - 10:34 am | खटपट्या
कीत्ती कीत्ती जुने विनोद सांगतोस रे हीतेशदादा !!
नवीन असतील तर सांग ना !! :)
26 Jan 2015 - 10:38 am | यसवायजी
The following are the summary of Mahajan committee report.
Belgaum to continue in Karnataka
Around 247 villages/places including Jatta, Akkalakote, Sholapur to be part of Karnataka
Around 264 villages/places including Nandagad, Nippani Khanapur to be part of Maharastra
Kasaragod (of Kerala) to be part of Karnataka
27 Jan 2015 - 11:49 pm | रमेश आठवले
राज्य पुनर्निर्माण आयोगांनी नवीन प्रांत रचना करताना जिल्हा हे मुख्य युनिट वापरले होते. यामुळे कन्नड बहुभाषी बेळगाव जिल्हा कर्नाटकात गेला.
त्यानंतर ओडीसा आणि मध्य प्रदेश यांच्या मध्ये सरहद्दीच्या जवळच्या गावांना त्यांच्या प्रांतात सामील करण्याविषयी वाद होता. यावर पाटसकर यांनी गाव भाषा हे विभाजनाचे युनिट वापरून , त्या त्या राज्याला जोडून असलेली गावे त्या त्या राज्यात जावी असा तोडगा दिला आणि त्या प्रमाणे दोन्ही राज्यातील सरहद्द नव्याने ठरवली गेली.
हाच तोडगा आता बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी वापरून महाराष्ट्राला सलग्न असलेली गावे त्या मध्ये जोडून हा प्रश्न निकालात काढावयास ह्वा.
सध्या बेळगावचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे -म्हणजे नक्की काय आहे हे कोणी सांगू शकेल काय ?
27 Jan 2015 - 3:24 pm | मराठी_माणूस
Sholapur ?
27 Jan 2015 - 5:09 pm | चिरोटा
बेळगाव पाहिजे असेल तर सोलापूर द्यावे लागेल असे वाचले आहे. सुशील कुमार शिंद्यांना मग कन्नड शिकावे लागेल.
27 Jan 2015 - 6:34 pm | वैभव जाधव
येते हो त्यांना.
सोलापूरात सगळ्यांनाच स्वल्प स्वल्प बरतद.
28 Jan 2015 - 11:53 am | अद्द्या
बेळगावातच वाढलो असल्यामुळे काही गोष्टी सांगू शकतो .
कुठल्याही गावात / देशात आपली संकृती जपणे कधीच कठीण नसावं (मुस्लिम देशांचा अपवाद वगळता ) . पण . . शहरात / जिल्ह्यात एखाद्या भाषेचे ३०% पेक्षा जास्ती लोक आहेत . तिथे त्या लोकांच्या भाषेत सरकारी कागदपत्रे उपलब्ध करून देणे गरजेचे असते . बेळगावात मराठी लोक ६०% आहेत . इथे राहत असलेल्या जवळपास सगळ्या मागच्या पिढ्याचं शिक्षण मराठी भाषेत झालंय . . इतिहास / भूगोल तुम्हाला माहिती असेलच . . बेळगाव पूर्वीच्या मुंबई राज्यात होतं . . ज्याचे दोन तुकडे होऊन गुजरात आणि महाराष्ट्र राज्ये निर्माण झाली . .
तुमच्या जन्म दाखल्या पासून मृत्यू दाखल्या पर्यंत कागदपत्र कन्नड मधेच मिळतात . मागून सुद्धा मराठी . इतकंच काय हिंदी / इंग्रजीत सुद्धा नाही मिळत . . आता म्हणाल "मग शिका कन्नड" . शिकलो . नवीन भाषा शिकायला काहीच कधीच हरकत नाही . . अतिशय सुंदर भाषा आहे कन्नड . . पण त्या अरेरावी चालते . ती नाही मान्य .
कर्नाटक सरकारने बेळगाव शहराचं सरसकट कानडीकरणाचे बरेच प्रयत्न केलेत आणि करतच राहतील . त्याविरोधात कायद्याने संमत मार्गाने लोक काहीना काही लढा देतच असतात . . आणि देताच राहतील . .
बाकी वृत्तपत्रातल्या गोष्टींना "अतिरंजित कहाण्या" म्हणत असाल तर खरच म्हणेन . . ' जिथे आहात तिथे सुखी असा . उगा माहित नसलेल्या गोष्टीत बोलू नये माणसाने ' .
मूक मोर्च्यावर काहीही कारण नसताना लाठीमार करणे . मोर्च्यात सामील झालो म्हणून राजद्रोह / खुनाचे प्रयत्न (मारणाऱ्या पोलिसाची लाठी हाताने अडवली म्हणून ) सारख्या गुन्ह्याचे खोटे खटले भरून जेल मध्ये टाकणे इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष बघितल्या शिवाय खऱ्या वाटणाऱ्यातल्या नाहीत . .
पण एक गोष्ट नमूद करावी वाटते . . जे चांगलं त्याला चांगलं म्हणावंच
. बेळगाव आणि कोल्हापूर जवळपास एकाच आकाराची आणि जुळी म्हणता येतील अशी शहरं आहेत . . आणि दोन्ही कडच्या रस्ते , वीज पाणी अश्या अगदी सुविधांच्या अनुभव घेतल्या म्हणू शकतो . . कि बेळगाव बरंच पुढे आहे आपल्या शेजारच्या पेक्षा . . . काही अपवाद वगळता चांगले रस्ते . चोवीस तास पाणी . आणि उन्हाळ्यात सुद्धा २फक्त १-२ तास वीज कपात . या गोष्टी कर्नाटक सरकारने केल्या आहेत . . हे सगळं पाहता . बेळगाव महाराष्ट्रात घ्याच हे मी कधीच म्हणणार नाही . . फक्त . . कन्नड भाषेची जबरदस्ती नका करू . लोकांना त्यांच्या भाषेत शिकण्याच्या , कागदपत्रे बनवण्याच्या हक्क आहे . घेता कामा नये .
28 Jan 2015 - 2:22 pm | क्लिंटन
प्रतिसाद आवडला. याविषयीच मिपावर पूर्वी झालेल्या अनेक चर्चांपैकी एका चर्चेत लिहिलेला माझा प्रतिसाद जसाच्या तसा चोप्य-पस्ते करतो:
"मला पण बेळगावातल्या मराठी लोकांना खरोखरच महाराष्ट्रात यायचे आहे का हा प्रश्न पडला होता. काही वर्षांपूर्वी मी या विषयी माझ्या बेळगावच्या एका मराठी मित्राच्या वडिलांशी बोललो. ते शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. म्हणजेच माझे याविषयीचे बोलणे एका जबाबदार व्यक्तीशीच झाले होते. त्यांचे स्वत:चे मत होते ’महाराष्ट्र काय आणि कर्नाटक काय आम्हाला काहीही फरक पडत नाही’. त्यांनी पुढे जे सांगितले ते मात्र धक्कादायक होते. ते म्हणाले की याविषयी प्रत्येकाचे मत वेगळे असू शकेल पण महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना मात्र बेळगाव कधीच महाराष्ट्रात सामील होऊ नये असे वाटते.याचे कारण म्हणजे हा प्रश्न तापता ठेऊन त्यांना नगरसेवक, आमदार अशा निवडणुका जिंकणे सोपे जाते. समजा उद्या बेळगाव महाराष्ट्रात सामील झाले तर त्यांचा हक्काचा मुद्दा हिरावून घेतला जाईल आणि त्यांना निवडणुका जिंकणे सोपे जाणार नाही.
अर्थात हे मत माझ्या मित्राच्या वडिलांचे झाले. ते कितपत प्रातिनिधिक आहे याची कल्पना नाही. पण ते सत्य असेल तर राजकारणी लोक स्वत:च्या स्वार्थासाठी किती घाणेरडे खेळ खेळू शकतात याचे ते एक आणखी एक उदाहरण आहे."
28 Jan 2015 - 5:16 pm | मराठी_माणूस
हे त्यांचे मत आहे, वस्तुस्थिती काही वेगळीच असु शकते. त्यातल्या काहीना प्रत्यक्ष असे घडावे असे मनापासुन/प्रामाणिक पणे वाटु शकते.
28 Jan 2015 - 5:57 pm | अद्द्या
ते म्हणाले ते पूर्ण खोटं आहे असं नाही म्हणू शकत :)
समितीत सुद्धा २-३ गट आहेत / काहीना खरोखरंच प्रश्न सुटावा असं वाटतं . . मग त्यात मग त्यात ७८-८० वर्षाचे म्हातारे गृहस्थ जे म्हणतात "माझं गाव महाराष्ट्रात गेल्याशिवाय मारणार नाही " असे लोक आहेत . .
दुसरा गट . कन्नड सक्ती नका करू . आणि महाराष्ट्रात जमत नसेल केंद्रशासित तरी करा म्हणणारा आहे .
तिसरा गट म्हणताय तसा आहे . . प्रत्येक पार्टीत असे लोक असतातच . . काही सत्तेला हपापलेले . . जे खुर्चीसाठी पार्टीच्या आणि जे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांचं नुकसान करतात .
28 Jan 2015 - 2:35 pm | क्लिंटन
आपल्याकडे जशी बेळगाव महाराष्ट्रात पाहिजे की कर्नाटकात यावर हमरीतुमरीवर येऊन चर्चा चालते तशी परदेशात चालत असेल का? उदाहरणार्थ ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग आणि जर्मनीतील फ्रीलासिंग (बहुदा शहराचे नाव बरोबर लिहिले असावे) ही शहरे जवळपास एकसलगच आहेत.या दोन्ही शहरात भाषा एकच असली (जर्मन) तरी देश मात्र वेगवेगळे आहेत. मग "साल्झबर्ग आमचेच" ही मागणी जर्मनीत किंवा "फ्रीलासिंग आमचेच" ही मागणी ऑस्ट्रीयात उठत असल्याचे ऐकिवात नाही. सॅन सेबॅस्टिअनमध्ये तर काही भाग फ्रान्समध्ये तर काही भाग स्पेनमध्ये आहे. तरीही तिथे "सगळ्या सॅन सेबॅस्टिअनसकट संयुक्त फ्रान्स झालाच पाहिजे" किंवा "सगळ्या सॅन सेबॅस्टिअनसकट संयुक्त स्पेन झालाच पाहिजे" अशा स्वरूपाच्या मागण्या उठतात असे मी तरी वाचलेले नाही (चू.भू.दे.घे).हे वेगळे देश असूनही अशा मागण्या तिथे उठत नाहीत पण भारतात मात्र एकाच देशातील दोन राज्ये असूनही अशा मागण्या अगदी हिरीरीने उठतात.त्यामुळे हिंसाचारही होतो.याचे कारण काय असावे याविषयी पूर्वी मिपावरच लिहिलेला एक प्रतिसाद जसाच्या तसा चोप्य-पस्ते करतो:
"मला वाटते की स्वातंत्र्योत्तर काळात सरकारला मोठ्या प्रमाणावर समतोल आर्थिक विकास घडवता आला असता तर भाषावार प्रांतरचना यासारख्या मुद्यांना फारसे महत्व मिळाले नसते.अर्थात सरकारपुढे मोठ्या प्रमाणावर अडचणी होत्याच पण आपले जीवनमान भरभर उंचावत आहे असे लोकांना जाणवले असते तर अशा वेगवेगळ्या मागण्यांना समर्थन मिळाले नसते. एक उदाहरण द्यायचे झाले तर युरोपचे उदाहरण घेता येईल.वरकरणी युरोपात भाषेच्या आधारावर राष्ट्रे आहेत असे वाटू शकते.पण ते १००% बरोबर नाही.स्वित्झर्लंडमध्ये अर्ध्या भागात जर्मन तर उरलेल्या अर्ध्या भागात फ्रेंच भाषा बोलली जाते.बेल्जियममध्ये तर डच,फ्रेंच आणि जर्मन या तीन भाषा बोलल्या जातात.युरोपात जर भाषा हा एकच घटक देशांच्या सीमा ठरविण्यात असता तर स्वित्झर्लंड, बेल्जियम यासारख्या देशांचे अस्तित्व राहिले नसते आणि स्वित्झर्लंडचा फ्रेंच भाषिक प्रदेश फ्रान्सला आणि जर्मनभाषिक प्रदेश जर्मनीला जोडला गेला असता.पूर्वीच्या काळी ज्या कोणत्या कारणामुळे त्या देशांच्या सीमा ठरविल्या गेल्या त्या त्यांनी तशाच ठेवल्या.आज फ्रान्स,जर्मनी,स्वित्झर्लंड या तीनही देशांचा आर्थिक विकास चांगलाच झाला आहे.तेव्हा स्वित्झर्लंडमधील लोकांना आपण स्वीस नागरीक असलो काय आणि फ्रेंच/जर्मन नागरीक असलो काय त्याचा काहीही फरक पडणार नाही म्हणून आहे ती रचना मुद्दाम बदलण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आता भारताच्या प्रश्नाकडे बघितले तर असे लक्षात येते की स्वातंत्र्य मिळाले तेव्हा लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर होत्या.लगेच आपल्याला महालात राहायला मिळेल अशी अपेक्षा कोणी केली नसेल पण दोन वेळचे अन्न,प्यायला पुरेसे पाणी,डोक्यावर घराचे छत्र आणि घालायला पुरेशी वस्त्रे आणि या सगळ्या गोष्टींसाठी हाताला काम एवढी माफक अपेक्षाही दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलेली नाही.तेव्हा अशा पार्श्वभूमीवर लोकांना ’अरे तू मराठी किंवा इतर भाषिक, तू अमक्या जातीचा किंवा अमक्या धर्माचा म्हणून तुझ्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणूनच सरकार तुझ्या माफक अपेक्षाही पूर्ण करत नाही’ असे सांगून आकर्षित करणे खूप सोपे असते.लोकांच्या अपेक्षा वेळीच पूर्ण झाल्या असत्या आणि त्यांचे जीवनमान भरभर उंचावत गेले असते तर स्वतंत्र राज्यासाठी आंदोलने,इतर आंदोलने यासारख्या गोष्टींना लोकांचे समर्थन आज मिळते तितक्या प्रमाणात मिळाले नसते.आणि आजही राजकारणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या मागे न लागता विविध आंदोलनांच्या आगीत तेल घालतात, वातावरण तापवून आपली पोळी भाजून घेतात हेच दुर्दैव."
(या धाग्याच्या निमित्ताने मला माझेच दोन जुने प्रतिसाद जसेच्या तसे चोप्य-पस्ते करता आले :) )
28 Jan 2015 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा
चलत मुसाफ़िर
आत्ता काय चालू आहे? सद्यःस्थिती काय? वर्तमान काय? हे जाणून घेणं आपला उद्देश आहे ना? मग काय आकलन झालं आपल्याला आत्तापर्यंत??? सांगा बरं. आता बरच चित्र स्पष्ट झालं आहे- आत्ताचं/सद्यःस्थितीचं/वर्तमानाचं !!! मग आता आपलं मत,एका निश्चित-बाजुला, आलेलं असायला पाहिजे? मग कुठे आहात आपण(आत्ता)?
सांगा?
सांगा?
सांगा?
28 Jan 2015 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
अआ, तुम्ही तुमचा पॉईंट एको पॉईंटवरून ओरडून का बरे सांगत आहात...
का ?
का ?
का ?
;) +D
28 Jan 2015 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा
हा.... हा.... हा....
=))
28 Jan 2015 - 11:49 pm | काळा पहाड
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
तीनच एको का बरे?
29 Jan 2015 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे
बुवा माथेरानच्या एको पॉईंटवरून ओरडतायत आणि तुम्ही ग्रँड कन्यानच्या...
म्हणून...
म्हणून...
म्हणून...
म्हणून...
म्हणून...
म्हणून...
(मी तुमच्या जवळच उभा आहे +D )
29 Jan 2015 - 12:17 am | यसवायजी
धागा कुठला?? चाल्लंय काय??
धागा कुठला?? चाल्लंय काय??
30 Jan 2015 - 3:14 pm | चलत मुसाफिर
बहुसंख्येने प्रतिसाद देऊन उत्साहवर्धन केल्याबद्दल समस्त मिपाकरांचे धन्यवाद.
शीर्षकात सूचित केलेल्या प्रश्नाचे अनेकांनी अनुमोदन केलेले आहे. जे विरोधात आहेत, त्यांनी दिलेली कारणे मला समाधानकारक वाटलेली नाहीत. अतएव, माझे या विषयावरील मत अजूनही कायम आहे. बेळगाव महाराष्ट्रात आले काय किंवा कर्नाटकात राहिले काय, मोठासा काही फरक पडत नाही असे मला वाटते.
बेळगाव भारतात आहे, आणि राहणार आहे, इतके मला पुरेसे आहे.
लोभ असावा ही विनंती! :)
9 Feb 2016 - 6:57 am | प्रणवजोशी
भाषावार प्रांतरचनेच्या वेळी प्रादेशिक सल्लगनेतेचे तत्व वापरले गेले होते. बेळगावातील जनतेला पहिल्यापासुन महाराष्ट्रात यायचे होते. पण त्यांचे मत गाडुन टाकले गेले.
7 Apr 2020 - 3:01 pm | चलत मुसाफिर
संचारबंदीला वैतागलेले मिपाकर या लेखावर त्वेषाने तुटून पडतील व प्रतिसादांचे घमासान होईल या निखळ प्रामाणिक आशेने धागा वर काढत आहे. लोभ असावा. :-)
7 Apr 2020 - 4:40 pm | कंजूस
महाराष्ट्र एसटीचे पगार काढायला पैसे नाहीत. मुंबइची बेस्ट मरणपंथाला. रस्ते - गोवा रस्ता बनवता येत नाही. त्यावर संबंधितांची एक पिढी मोठी झाली तरी पनवेल पेण होत नाही. एसटी डेपो पाहा. यावर आणखी कोस्टल रोड, टोलनाके नावाचे कामधेनू चानेल. शाळेच्या ग्रांट/अनुदान उडले आहे.
कर्नाटकात खाजगी बस वाहतूक असूनही सरकारी रेड् बस जोरात. डेपो पाहा. रस्ते पाहा. कुठे भ्रष्टाचार असला तरी चार पैसे खर्च केलेले दिसत आहेत.
यातून मला बेळगाव प्रश्न पुढे रेटणाऱ्या नेत्यांची कीव येते. काय देणार तुम्ही त्यांना? एक साहित्य संमेलन?
9 Dec 2022 - 8:51 pm | चलत मुसाफिर
गेले आठ-दहा दिवस चालू झालेले तेच ते जुने सीमावादाचे राजकारण पाहता हा धागा वर काढणे महत्वाचे वाटले. येऊ द्या प्रतिसाद :-)