शीर्षक वाचून धागा उघडल्याबद्दल स्वताची पाठ थोपटून घेतो. स्वतःच्या लेखनाचा दर्जा ओळखून असल्याने अशी रोचक शीर्षके देऊन वाचक मिळवण्याचा क्षीण प्रयत्न.... असो आता मुद्द्याकडे वळूया. तसा आमचा प्रांत भटकंती या सदरातला , परंतु गेले २-३ महिने बंगळुरुला वास्तव्य असल्याने दुर्ग भ्रमंती होत नव्हती. त्यामुळे लेखन होत नव्हते, परंतु बंगुळूरुतील अनुभवांवर लेख लिहायचा विचार होता. तसे आम्ही पडलो अभियंता वर्गातले त्यामुळे ते अनुभव सर्वांस रुचातातच असे नव्हे. त्यामुळे आपल्या खाद्य्भ्रमंतीवर लेख लिहिण्याचा एक प्रयत्न!
MTR (Mavalli Tiffin Room) ला जाण्याचा योग तसा अचानकच जुळून आला .मुंबईला परत येत असतांना सहज चक्कर मारतांना आनंदराव circle जवळ हे हॉटेल दृष्टीस पडले .नाव ऐकून होतोच ,त्यामुळे पाऊले आपसूक तिकडे वळली . दुपारी जेवायची वेळ होती त्यामुळे जास्त मेनू संशोधन न करता डिलक्स थाळी मागवली . बंगळुरुत स्पेशल वा डिलक्स थाळी मागवली कि स्टार्टर म्हणून टोमाटो सूप मिळतेच !!! पण पहिलाच सुखद धक्का ! पन्हेसदृश पेय welcome ड्रिंक प्रमाणे मिळाले.त्यानंतर पंक्तीतील जेवणाप्रमाणे कप्प्यांचे ताट दिले (वाट्यान्नी भरलेले ताट नव्हे). व भाजी वाढतान्नासुद्धा वाटीचा हिशेब न लावता पोटास पुरेल इतकी भाजी ,कोन्शिम्बीर ,रस्सम वाढण्यात आले . पुरी वा चपातीची choice होती.दक्षिणेतील चपात्यांचा दर्जा ओळखून असल्याने निमुटपणे पुरी order केली . पुरीपण xxl size वाली होती . तसा माझा आहार भक्कम असल्यामुळे 3 पुर्या आरामात खाल्ल्या .आता बिसिबेली भाताकडे मोर्चा वळविला . तो संपवून जातीला जागून दहीभात मागविला .तसे नाव ठेवण्यात मी पटाईत. पण येथील एकही पदार्थातील मीठ ,तिखट ,तेलाच्या प्रमाणावर टीका करायला मलासुद्धा जड जाईल . येथील जेवणावर प्रसन्न झाल्याने संध्याकाळचा नाश्ता इथेच करायचे पक्के करून बाहेर पडलो .
संध्याकाळी दुपारच्या तृप्ती भोजनामुळे भूक नव्हती . पण काही नवीन पदार्थ ट्राय करायचाच या उद्देशाने हॉटेलात शिरलो . हॉटेलात मंद प्रकाश होता . जणू काय मद्यालय च ! परंतु mtr हे फक्त पदार्थांचा दर्जा पाळतात इतर गोष्टीत नव्हे , हि माहिती गुगल बाबाकडून मिळाली . येथे हॉटेलातील उजव्या बाजूच्या भिंतीवर MTR गाथा लिहिली आहे . जरी ती इंग्रजीत असली तरी नको तितक्या शेड्स नि विचित्र रंसंगती कि २ मिनिटाची कथा वाचण्यास मला ५ मिनिटे लागली .
मसाला दोस्याची order केली .ज्या पद्धतीने तो serve करण्यात आला ते बघूनच दिल खुश झाला . सांबर नि चटणी बरोबर छोटाश्या वाटीत तूप दिले होते .डोसा अप्रतिम होता . येथील स्पेशल रवा इडली खायची होती पण पोटात जागा नव्हती. पण पट्टीचा खाणार थोडीच ऐकतोय म्हटले सोडा वा तत्सम शीतपेये पिउन पोटात जागा करू .पण अहो आश्चर्यम ! येथे शीतपेये मिळत नाही . फळरस मिळतात . त्यामुळे मौसंबी रस पिउन या हॉटेल बाबत अधिक माहिती मिळवून हा अनुभव मिपा कारांबरोबर share करायचा असा निश्चय करून बाहेर पडलो . ( MTR वर विकिपेडीयावर page आहे, जरूर वाचा. रवा इदालीमागील कथा , चंद्रहार पदार्थाच्या नावाची कथा, आरस्पानी मुदपाकखाना अश्या अनेक गोष्टी आहेत).
भट - या हॉटेलचा मालकाबरोबर पुढील भेटीत फोटो काढण्याचे ठरविले आहे .कारण या हॉटेल म्हणा वा धाबा ,इथली चव घरच्या जेवणाला पण येणार नाही .अतिशयोक्ती वाटते का ? स्वानुभवावरून सांगतो बाकी तुमची मर्जी .हे हॉटेल नसून रस्त्याच्या कडेला असलेली मोठी टपरी आहे . तरीसुद्धा इथे लोकांचा रतीब असतो , जेवणाच्या वेळेस इथे बसायला जागा मिळत नाही . या भटांची आख्यायिका अशी आहे कि या माणसास १० शहरातून हाकलण्यात आले आहे .कारण जेवणाचा दर्जा उच्च असला तरी किंमत अगदी खिश्यास परवडणारी असते. इथे एक अफलातून पदार्थ मिळतो .केळ्याचे काप ,vanila ice cream नि गुलाबजाम . जीभ अडखळली ना ? एकदा खाऊन बघा इथे ,आयुष्यात तुम्ही चव विसरणार नाही.येथे संध्याकाळी नाश्त्यास अजून गर्दी असते. हि संधी मला मिळाली नाही. परंतु पुढील भेटीत जरूर संध्याकाळी तेथे जाणार हे नक्की. हे हॉटेल पिन्या औद्योगिक वसाहतीत आहे. (NTTF circle वरून जवळ )
पै - हे हॉटेल corporation circle ला आहे .KSTDC च्या कार्यालयाजवळ . ह्या हॉटेलची चव थोडी मुंबईतील कामतांच्या जवळ जाणारी आहे . तसेच उत्तर भारतीय पदार्थ वा चाट खायची हौस झाली तर वरील दोन हॉटेलात आपणास पर्याय नाही . परंतु इथे मुंबैया स्ताइल पदार्थ मिळतील .तसेच यांचे guest house सुद्धा आहे .guest house बाह्यरूपाने तरी चांगले वाटते .येथील अनुभव नाही . पै हॉटेलातील चहा वा कॉफ्फी एकदातरी हाणाच !
वरील तिन्ही हॉटेल हि नॉर्थ कॅनरा कडची माणसांची आहेत . त्यामुळे नॉर्थ कॅनारातील माणसे अभिमान्युप्रमानेच पाक कला शिकून येतात कि काय अशी रास्त शंका !
इति लेखनसीमा .
ता. क. - बंगुळूरातील मुक्कामात तिरुपती दर्शन करून घेतले, त्यावरील लेख सवडीनुसार टंकण्यात येईल.
प्रतिक्रिया
28 Dec 2014 - 12:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान रे वियर्ड्या. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.७०च्या दशकात तेथे जाणे झाले होते.अजूनही दर्जा टिकून आहे हे ऐकून बरे वाटले.इडली,वड्यासोबत वाटेल तेवढे सांबार व चटनी ही तिकडची,दक्षिणेची खासियत.नाहीतर आपले शेट्टी लोक- साउथ इंडियनखाली वाटेल ते खपवतात.
30 Dec 2014 - 11:08 am | सूड
असो माजों घोव म्हण्टां रवलां गे लिवायचा माई!!
30 Dec 2014 - 11:37 am | टवाळ कार्टा
=))
28 Dec 2014 - 12:28 pm | मुक्त विहारि
मी दोन वेळा लालबागच्या एम.टी.आर.मध्ये गेलो होतो.
एकदा स्वतः आणि नंतर बायकोला घेवून मुद्दाम.
तिला आधी ह्या हॉटेल विषयी काहीच कल्पना दिली न्हवती.
आता ती परत मागे लागली आहे, बंगलोरला जावू या आणि एम.टी.आर. मध्ये जेवू या म्हणून.
अवांतर....
बाकी सध्या पीनयाला कुठल्या कंपनीत.
मी ए.बी.बी. मध्ये होतो.
बंगलोर म्हणजे पार येड्याचा बाजार आहे.
पीनया ते मॅजेस्टीक ते बनेरगट्टा रोद... इन-मीन २५-३० किमीचा प्रवास पण जातांना २ तास आणि येतांना ४ तास लागायचे.
ह्यापेक्षा आपली मुंबई बरी.
अतिअवांतर,
जमल्यास बंगलोरला कट्टा करा की, मिपाकर असतीलच तिथे.
अतिअति अवांतर,
कट्ट्याचे फोटो काढले आणि इथे टाकले नाहीत तरी चालेल.
पण त्या एम.टी.आर.मध्ये कट्टा केलात तर तिथल्या खाण्याचे फोटो मात्र नक्की टाका.
आम्ही नाही तर नाही पण निदान आमचे मिपाकर तरी जेवले ह्यात समाधान आणि आनंद.
28 Dec 2014 - 1:46 pm | विअर्ड विक्स
अवांतर
MTR चे मसाले वा ready to eat फूड विशेष प्रसिद्ध नाही. बंगळुरात ओळखीच्या महिलेस विचारले असता MTR मसाले म्हटल्यावर नाक मुरडले. त्यपेक्षा मैयास वा रवि घ्या असे म्हणाली. MTR ready to eat फूड हे नोर्वेयिअन कंपनीला विकण्यात आले आहे. त्यामुळे MTR हे फक्त ब्रांड name आहे.
बाकी पिनायात गेले तर भट कॅन्टीनला जाच. नाव घेतले तरी रिक्षावाला सोडेल तिकडे.
@ मूवी - सध्या मुंबईत आहे. बंगळुरुला साईट आहे माझी. मी तर पिन्या, KR पूरम, गांधीनगर आणि माजेस्तिक हे सर्व एका दिवसात फिरायचो. कामापेक्षा प्रवासात जास्त वेळ जायचा. आता थोडी फार मेट्रो आहे. तरी फुल स्केलवर मेट्रो सुरु झाल्यावर traffic कमी होईल.
28 Dec 2014 - 3:26 pm | मुक्त विहारि
हे सर्व एका दिवसात फिरायचो. कामापेक्षा प्रवासात जास्त वेळ जायचा....
दंडवत...
28 Dec 2014 - 12:46 pm | एस
एमटीआर मस्त हॉटेल आहे.
28 Dec 2014 - 4:37 pm | बोका-ए-आझम
MTR शिवाय अजून अप्रतिम म्हणजे कोशीज् - मला वाटतं ब्रिगेड रोडवर आणि काटपाडी जंक्शन - गरुडा माॅलमध्ये. दोन्हीही ठिकाणं पट्टीच्या खाणा-याने जायलाच हवीत अशी!
28 Dec 2014 - 6:09 pm | मैत्र
लक्ष्यवेधी शीर्षकामध्ये एम टी आर च्या इतिहासाची जरा वाट लागली आहे.
मवाली नसून मावल्ली आहे. आनंदराव सर्कल जवळ म्हणजे गांधीनगर मधलं नवं एम टी आर.
मूळ एम टी आर हे अजूनही त्याच जुनाट जागेत लालबाग रोड - लालबागेच्या मुख्य गेट पासून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. लालबाग या भागाचे नावच मावल्ली होते आणि म्हणून मावल्ली टिफीन रुम अशा नावाने ते सुरु झाले.
अर्थात रवा ईडली, चंद्रहारा इ. चा इतिहास सहज मिळतो जालावर आणी विकीवर.
एम टी आर १९२४ या नावाने आता फ्रँचाइजीस केलेल्या आहेत शहराच्या विविध भागात. आणि काही वेळा जरा दर्जा घसरल्यासारखा वाटतो आहे गेल्या काही वर्षात या इतर ठिकाणी.
आणि जेवण उत्तम असले तरी इथल्या सांबार / रसम भाताला इतरत्र दक्षिणेत मिळणार्या आंध्र / तमिळनाडूतल्या सारखी चव नाही. हे काहीसं उडूपी गोड्सर सांबार असतं. भाताबरोबर खायला त्यातल्या त्यात बरं सांबार कामत मध्ये मिळतं.
नॉर्थ कॅनरा असा उच्चार सरकार दप्तरी असला तरी स्थानिक दृष्ट्या तो उत्तर कन्नडा आहे. एकदम अस्सल शुद्ध तुपातल्या कन्नडा वातावरणात अचानक हा उच्चार दाताखाली खडा लागावा तसा वाटतो.
पै माहीत नव्हते इतक्या वर्षात. माहितीबद्दल धन्यवाद! आता भेट देण्यात येईल. भट म्हणजे बंगलोरच्या ट्रॅफिकचा विचार करता दुसर्या शहरात जाण्याइतके लांब आहे त्यामुळे पास.
इतरः हे सगळे बल्लवाचार्य उत्तर कन्नडा पेक्षा उडुपी जिल्ह्यातले किंवा मंगलोर बाजूचे शेट्टी व कामत इ. असावेत असा अंदाज आहे. चुभूदेघे
28 Dec 2014 - 7:25 pm | मुक्त विहारि
तुम्ही पण बेंगलोरचे की काय?
28 Dec 2014 - 9:42 pm | विजुभाऊ
बंगलोर ला कामथ मधे एकदा नॉर्थ कर्नाटक थाळी खाऊन बघा. पुरणपोळी वगैरे एकदम फर्मास बेत असतो.
पोटाला तडस लागेपर्यन्त जेवण जाते
28 Dec 2014 - 10:36 pm | सिरुसेरि
बेंगलोरच्या जयनगर ,आयनोक्स गरुडा मॉल भागात पूर्वी फिरलो आहे. हा तसा गजबजलेला भाग आहे . ज्वेलरी , कापड व इतर अनेक मोठी दुकाने खुप आहेत . पण तिथे फारशी हॉटेल्स दिसली नाहीत .
सोनु निगमने गायलेले "निन् दीन दले" हे लोकप्रिय कन्नड गाणे , आप्तमित्रा , आप्तरक्षका हे विष्णुवर्धन चे हीट चित्रपट अशा आठवणी लक्षात आहेत .
29 Dec 2014 - 10:34 am | चिरोटा
एम.टी.आर.चे मालक होते यज्ञनारायण मैय्या.१९२४मध्ये ते लालबाग येथे 'ब्राम्हण कॉफी क्लब' नावाने सुरु झाले.तिकडे मिळणार्या डोश्यासाठी ग्राहक १ तास वाट बघायला तयार असत असे म्हणतात.१९७५ सालच्या आणीबाणीच्या संदर्भात एक घडलेला किस्सा-
तेव्हा केंद्र/राज्य सरकारने हुकुम काढला की मसाला डोश्याची किंमत जास्त असता कामा नये.व एम.टी.आर.ला किंमती कमी करायला सांगितले.एम.टी.आर.ने किंम्ती कमी केल्या व त्याबरोबर रोज "आजचा तोटा किती झाला" असा फलक बाहेर लावण्यास सुरु केले.
काही महिन्यांनी 'आता हॉटेल चालवू शकत नाही.क्षमस्व" फलक लावून होटेल बंदच केले.आणीबाणी संपली व ग्राहकांनीच हॉटेल मालकांना हॉटेल सुरू करायची गळ घातली.!!
गंमत म्हणजे मालकांनी आणीबाणीच्या काळात हॉटेल बंद केल्यावरही एकाही वेटरला कामावरून कमी केले नव्हते.अजूनही तेथे ३५-४० वर्षे काम करणारे वेटर्स आहेत.काही तिकडे कामाला लागले व तेथेच निवृत्तही झाले आहेत.वेटर्ससाटी वैद्यकीय वीम्याची मदत्,त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च उचलण्यास हातभार लावणे..ईत्यादी कामे करून आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
29 Dec 2014 - 12:42 pm | असंका
_/\_
त्यांच्या कर्तृत्वाला, आणि ही माहिती इथे सांगणार्या आपल्याला ही.
(अगदी खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसला नव्हता आपण जे लिहिलंय त्यावर...पण खालचा प्रतिसाद बघता शंकेला जागाच नाही.)
धन्यवाद!
29 Dec 2014 - 11:11 am | सुबोध खरे
@ चिरोटा
आपली माहिती १०० % सत्य आहे
माझा एक अतिशय चांगला मित्र एम टी आर च्या दानशूरतेवर मोठा झालेला आहे त्याचे वडील तेथे वेटर होते. त्याच्या अकरावी बारावीच्या शिक्षणाची फी त्यांनी भरली. या मुलाने आपल्या गुणवत्तेवर मैसूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला त्याच्या वसतिगृहाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला. मैसूर च्या एम टी आर मध्ये त्याचे दोन वेळचे जेवण फुकट होते. एम बी बी एस करून हा मुलगा नौदलात डॉक्टर म्हणून भरती झाला आणि आता तो बालरोगशास्त्राचा प्राध्यापक आहे. हि गोष्ट मी त्याच्या स्वतः च्या तोंडून ऐकलेली आहे.
यथाशक्ती तो अशाच गरीब विद्यार्थ्यांना मदत करीत असतो.
ज्योतसे ज्योत जलाते चलो याचे एक उत्तम उदाहरण.
तेथे कर माझे जुळती
29 Dec 2014 - 11:27 am | दाते प्रसाद
साधं पण उत्तम जेवण . दुपारी जेवायला जागा मिळत नाही . पण तुम्ही जरा ओळखीचे असाल तर मालक पहील्या मजल्यावर जेवायला बसवतो.
29 Dec 2014 - 12:20 pm | यशोधरा
बंगलुरुमध्ये असताना खूप खादाडी केली. जुने दिवस आठवले!
29 Dec 2014 - 12:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मवाली भट असं शिर्षक वाचुक बुवांविषयी अंमळ चिंता वाटली. गुरुजींच्या भावविश्वामद्गे तांब्या-फुलपात्र-ताम्हन आणि पळीबरोबर रामपुरी आणि खंजीर दिसला =))
29 Dec 2014 - 6:59 pm | सूड
बंगळूरास एका लग्नास गेलो असताना लग्नाचे जेवण सोडून यांच्या टिफीन रुमात हजेरी लावली होती. ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीचं जेवण मिळालं. बिशिबेळे भात खाल्ल्यानंतर जास्त पुर्या मागवून आधीच पोट भरल्याचा पश्चात्ताप झाला.
30 Dec 2014 - 10:20 am | विअर्ड विक्स
अनुमोदन. माझीपण तीच अवस्था झाली होती. तरी मिष्टान्न खाऊनच उठलो…