येल्लगिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - १

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
18 Apr 2014 - 9:35 am

दक्षिण भारतातलं घनदाट अरण्यं होतं ते. दुपार कललेली होती. सकाळभर खाण्याच्या शोधात भटकणारे पक्षी आणि जनावरं सावलीला विसावली होती. असह्य उन्हाच्या तलखी मुळे डेरेदार वृक्षाच्या सावलीतही जीव नकोसा होत होता. वाराही साफ पडला होता. गवताची काडी देखील हलत नव्हती. जंगल अगदी शांत होतं.

या शांततेचा भंग होत होता तो जंगलात चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांच्या आवाजाने. गुरांच्या गळ्यात घंटा बांधण्यामागे दोन उद्देश होते. एक म्हणजे आपली गुरं कुठे आहेत हे गुराख्याला कळावं आणि दुसरं म्हणजे वाघ-चित्त्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून गुरांचं संरक्षण व्हावं. विचित्र आवाज येणारी घंटा गळ्यात असलेल्या जनावरावर झडप घालण्यापासून शिकारी प्राण्यांना परावृत्त करण्यासाठी गुराख्यांची युक्ती बहुतेकदा यशस्वी होत असे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत त्यांच्या युक्तीचा काही उपयोग होत नसे.

असाच एक प्रसंग त्या दुपारी जंगलात साकारत होता. अर्धवट वयाचा एक बैल आपल्या कळपापासून काही अंतरावर एका मोठ्या झाडाखाली चरत होता. मध्येच मान उंचावून आपल्या कळपाकडे नजर टाकावी, एखादी तृप्तीची ढेकर द्यावी आणि मान खाली घालून गवताचा फडशा पाडण्याचं आपलं काम चालू ठेवावं. सभोवतालच्या शांत वातावरणाशी सूर जुळल्यागत तो बैल मजेत चरत होता.

आपल्या खांद्यावरुन एक नजर मागे टाकली असती तर बैलाचा शांतपणा क्षणभरही टिकला नसता. गवताचे तुरे बाजूला सारून दोन हिरवट डोळे त्या बैलाचं निरीक्षण करत होते. ते डोळे होते एका धाडसी आणि जातिवंत शिका-याचे. त्याच्या देहावरचे मोठे काळे ठिपके त्या गवतात बेमालूमपणे मिसळून गेले होते. काही वेळ त्या बैलाचं निरीक्षण केल्यावर त्याचा विचार पक्का झाला असावा. आवाज न करता मागचे पाय जवळ ओढले गेले. देहावरचा स्नायू न स्नायू ताठ झाला. शरीराला गती येण्यासाठी त्याने हलकेच एक झोका घेतला आणि...

आकाशातून वीज कोसळावी तशी काळ्या-पिवळ्या ठिपक्यांची रास त्या बैलावर कोसळली. काय घडतं आहे याचं भान येण्यापूर्वीच बिबट्याचे अणकुचीदार सुळे बैलाच्या नरड्यात रुतले होते. स्वत:ला सावरण्याचा बैलाने निष्फळ प्रयत्न केला पण दुस-याच क्षणी तो जमिनीवर कोसळला. त्याच्या घशातून आता अखेरची घरघर लागल्याचा आवाज येत होता. बैलाचे चारही खूर जोरात थडथडले. त्याच्या निष्प्राण डोळ्यात जिवंतपणाचं कोणतंही लक्षण दिसत नव्हतं. बिबट्याने क्षणभराकरताही आपली पकड सोडली नव्हती!

नाथनचा पहिला बैल बिबट्याला बळी गेला तो असा. अर्थात ही तर सुरवात होती. पुढच्या दोन महिन्यात नाथनची अजून चार गुरं बिबट्याने उचलली. गावातल्या आणखीन दोन गुराख्यांचे मिळून चार बैल त्याच्या पोटात विसावले होते. बिबट्याच्या प्रकृतीला तो परिसर चांगलाच मानवला. इथे खाण्यापिण्याची लयलूट होती. जंगलातून शिकारीमागे भटकण्यापेक्षा हवं ते जनावर पळवून त्यावर ताव मारावा. बिबट्याने त्या जंगलातच कायमचा मुक्काम ठोकावा यात काहीच आश्चर्य नव्हतं.

लवकरच पावसाळा आला आणि जंगलात गुरं चरायला नेण्याची गरज पडेनाशी झाली. गावाजवळच भरपूर गवत उगवलेलं होतं. गुरं जंगलात येईनाशी झाल्यावर गावाजवळ येण्यापलीकडे बिबट्याला गत्त्यंतर नव्हतं. परंतु गावाजवळ झाडी विरळ असल्याने त्याला कोणाच्या नकळत हल्ला करणं अशक्यं होतं. गावक-यांच्या नजरेला तो पडल्यावर ते मोठ्याने आरोळ्या ठोकंत असत आणि त्याच्यावर दगड-धोंड्यांचा वर्षाव करत, त्यामुळे बिबट्याला माघार घेण्यापलीकडे गत्यंतर नसे.

बिबट्यापुढे आता दोनंच पर्याय होते. पूर्वीप्रमाणे जंगली प्राण्यांची शिकार करणं किंवा गावक-यांच्या बाबतीत आक्रमक धोरण स्वीकारणं. बिबट्याने दुसरा मार्ग पत्करला.

एका संध्याकाळी शक्यं तितक्या नकळतपणे एका गाईच्या जवळ जाऊन त्याने गाईच्या मानेत आपले सुळे खुपसले. त्याला झेप घेताना पाहिलेल्या गुरख्यांच्या ओरडा-आरड्याची त्याने यत्किंचितही पर्वा केली नाही. काही क्षण गोंधळून गेलेल्या गुराख्यांनी भानावर येताच बिबट्यावर दगडांचा वर्षाव करायला सुरवात केली. दोन-चार दगड जवळपास पडताच बिबट्याने गाईच्या मानेवरची पकड सोडली आणि त्यांच्याकडे पाहून त्वेषाने डरकाळी फोडली. त्याच्या नजरेतून बरसणारा अंगार आणि गाईच्या रक्ताने लालभडक रंगलेला जबडा पाहून गुराख्यांनी गावात धूम ठोकली.

बिबट्याचा आक्रमकपणा या थराला गेल्यावर गावक-यांनी तिथल्या वनरक्षकाला भेटून मदत करण्याची विनंती केली. या वनरक्षकाचं नाव रामू होतं. त्याच्या जवळ .१२ बोअरची बंदुक होती. चोरट्या शिका-यांचा बंदोबस्त करणं हा त्याच्या कामाचा भाग असला तरी आपल्याला मात्र चोरटी शिकार करण्यापासून कोणी रोखू शकत नाही अशी त्याची पक्की खात्री होती. आपल्या बंदुकीने त्याने अनेकदा हरीण, डुक्कर अशा शिकारी केल्या होत्या. हाताखालच्या माणसांना पत्ता लागू न देता त्याचे हे उद्योग चालत. कधी एखाद्याला कळलंच तर शिकारीतला थोडासा वाटा आणि जोडीला धमक्या देऊन तो त्याला गप्प बसवत असे. त्या भागातल्या रेंज ऑफिसरच्या कानावर रामूचे हे उद्योग आले होते, पण पुराव्याभावी तो त्याला हात लावू शकत नव्हता.

आत्तापर्यंत रामूने मोठ्या जनावरावर बंदूक चालवली नव्हती. बिबट्याचा बंदोबस्त करायची विनंती करायला आलेल्या गावक-यांनाही त्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. सध्या वेळ नाही, बंदुकीच्या गोळ्या संपल्या आहेत अशा अनेक सबबी त्याने सांगितल्या. परंतु गावक-यांच्या विनंत्या आणि त्याचा स्वाभिमान डिवचल्याने निरुपाय होऊन चित्त्याच्या मागावर जाण्याचं अखेर त्याने मान्यं केलं.

एक दिवस सकाळी रामू गावात प्रगटला. चित्त्याच्या तावडीतून सुटका करायला आल्याने गावक-यांनी त्याचं उत्साहाने स्वागत केलं. भरपेट जेवण आणि लोटाभर कॉफ्फी पिऊन त्याने झकासपैकी ताणून दिली ती दुपारी तीन वाजेपर्यंत! दुपारनंतर पाटील आणि काही माणसांना सोबत घेऊन तो बिबट्याच्या मागावर निघाला.

जंगलाची खडानखडा माहिती असल्याने मचाण बांधण्यासाठी झाडाची निवड त्याने मनाशी आधीच केली होती. गावातून येणारी पायवाट जिथे जंगलात शिरत होती तिथे वडाचं मोठं झाड होतं. या वाटेला लागूनच एक लहानसा ओढा होता. जंगलातल्या वाटेवर आणि ओढ्याच्या कोरड्या पात्रात बिबट्याच्या पंज्यांचे ठसे उमटलेले होते. बिबट्या कोठूनही आला असता तरी तिथे बांधलेलं आमिष त्याला दिसलं असतं. वडाच्या झाडावर बसलेल्या रामूला बिबट्या कोणत्याही दिशेने आला तरी दिसला असता. झाडाची निवड उत्कृष्ट होती यात शंकाच नाही.

संध्याकाळी पाचच्या सुमाराला रामू मचाणावर जाऊन बसला. मचाण जमिनीपासून वीस फुटांवर पानं आणि डहाळ्यांनी बेमालूमपणे झाकलेलं होतं. वाटेच्या बाजूलाच लहानशा खुंटाला बिबट्याला आमिष म्हणून बोकड बांधण्यात आला.

गावकरी दृष्टीआड होताच बोकडाने गावाच्या दिशेला तोंड करून बें बें करण्यास सुरवात केली. रामूचं नशीब जोरावर असावं! संध्याकाळी सहाच्या सुमाराला बिबट्याने बोकडावर हल्ला चढवला. बिबट्याने बोकडाचा गळा धरलेला असतानाच रामूने आपल्या बंदुकीतली एकमेव गोळी नेम धरून झाडली. बिबट्याने प्रचंड डरकाळी फोडली आणि हवेत जोरदार उसळी घेऊन तो जमिनीवर कोसळला, पण दुस-याच क्षणी बाजूच्या झाडीत झेप घेत तो दिसेनासा झाला. बिबट्याने नरडं फोडल्याने आधीच मरणपंथाला लागलेला बोकड एल जी काडतुसाचा एक छर्रा कानामधून मेंदूत घुसल्याने तत्काळ मरण पावला.

थोडावेळ वाट पाहून रामू झाडावरून उतरला आणि गावात परतला. गावक-यांना सर्व हकीकत सांगून बिबट्याची शिकार झाल्याचं त्याने खात्रीपूर्वक सांगितलं. दुस-या दिवशी बिबट्या आपल्याला मृतावस्थेत सापडेल या आनंदात सर्वजण निद्राधीन झाले.

दुस-या दिवशी सकाळी गावक-यांसह रामू वडाच्या झाडापाशी परतला. रात्रभरात तरसांनी बोकडाचा फन्ना उडवला होता. रामूने बोट दाखवलेल्या दिशेने सर्वजण शोध घेऊ लागले. काही अंतरावरच त्यांना रक्ताचा माग मिळाला! रामूची गोळी बिबट्याला लागली होती यावर शिक्कामोर्तब झालं. घनदाट झाडी आणि गवतातून माग काढत सर्वजण मैलभर लांब गेले पण बिबट्या मारून पडलेला आढळला नाही. अजून काही अंतरावर मग दिसेनासे झाल्यावर सर्वजण गावात परतले.

या घटनेनंतर दोन महिने उलटले. बिबट्याची कोणतीही खबरबात नव्हती. बिबट्या जंगलाच्या अंतर्भागात जाऊन मेला असावा अशी रामूसकट सर्वांची खात्री पटली.

एक दिवस संध्याकाळी सोळा वर्षांचा एक मुलगा गुरांचा कळप घेऊन जंगलातून एकटाच परतत होता. एका वळणावर सुमारे वीस यार्ड अंतरावर बसलेल्या बिबट्याशी त्याची अचानक नजरानजर झाली. त्या मुलाने आत्तापर्यंत जंगलात अनेक बिबटे पाहिलेले होते. इतर सर्व बिबट्यांप्रमाणे हादेखील निघून जाईल या अपेक्षेने मुलगा थांबला. पण निघून जाणं सोडाच, बिबट्या मुलाकडे पाहून गुरगुरू लागला. मागचे पाय आखडून त्याने झेप घेण्याची तयारी केली. त्याचा तो अवतार पाहून मुलाने पाठ फिरवून आल्या वाटेने धूम ठोकली. बिबट्याने एक मोठी डरकाळी फोडून त्याच्या पाठीवर झेप टाकली. बिबट्याचं धूड पाठीवर आदळताच मुलगा खाली कोसळला. चित्त्याचे दात त्याच्या खांद्यात रुतले होते पण मुलाचं नशीब भलतंच थोर असावं. खाली पडतापडता वाटेवर पडलेल्या लाकडाच्या मोठ्या तुकड्यावर त्याची नजर गेली. बुडत्याला काडीचा आधार दिसल्याप्रमाणे प्राणभयाने त्याने ते लाकूड बिबट्याच्या जबड्यात खुपसलं! बिबट्याची पकड सुटली पण त्याच्या नख्यांनी मुलाचा हात आणि पोट-या फाडून काढल्या होत्या. ताडकन उठून उभा राहत मुलाने लाकूड परजत बिबट्यावर हल्ला करण्याचा पवित्रा घेतला. आपल्या सावाजाने केलेल्या या अनपेक्षित प्रतिकारामुळे बिबट्याचं धैर्य गळाठलं आणि बाजूच्या झाडीत घुसून तो दिसेनासा झाला. मुलाची छाती, पाठ, खांदा आणि मांड्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. आपला जीव वाचवणारं लाकूड घट्टं धरून त्याने गावाकडे पलायन केलं.

बिबट्याचा माणसावरचा हा पहिलाच हल्ला होता. दुसरा हल्ला तीन आठवड्यांनी झाला. मात्र याखेपेला बिबट्या पळून गेला नाही. एक गुराखी बक-यांचा कळप घेऊन जंगलातून परतत असताना बिबट्याने अचानकपणे एका बकरीवर झडप घालून तिला उचललं. आपल्या बकरीवरचा हल्ला पाहून गुरख्याचं माथं भडकलं आणि हातातली काठी उगारत तो चित्त्यावर धावला. वास्तवीक तीन आठवड्यांपूर्वी कोणत्याही चिथावणीशिवाय बिबट्याने माणसावर हल्ला केलेला असताना त्याचं कृत्यं कितीही शौर्याचं असलं तरी खचितंच वेडेपणाचं होतं. आपल्या अविचाराची किंमत त्याला स्वत:च्या प्राणांचं मोल देऊनच चुकवावी लागली. बिबट्याने बकरी सोडली आणि एका झेपेत गुराख्याचा गळा पकडला.

बक-यांचा कळप गावात परतला. त्यांच्याबरोबर गुराखी नसलेलं पाहूनही कोणी फारशी चौकशी केली नाही. बळी पडलेल्या गुराख्याचे गावात कोणी नातेवाईक नसल्याने चांगला अंधार पडेपर्यंत त्याच्या अनुपस्थितीची कोणाला जाणीवही झाली नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्यावर काहीतरी गडबड असावी याची गावक-यांना कल्पना आली.

दुस-या दिवशी सुमारे तीस गावकरी लाठ्या-कु-हाडी घेऊन गुराख्याच्या शोधार्थ बाहेर पडले. बक-यांचा कळप उधळल्याने उमटलेल्या खुणांचा मागोवा घेत ते गुरख्यावर हल्ला झालेल्या ठिकाणी येऊन पोहोचले. सभोवतालच्या मातीत एका मोठ्या बिबट्याच्या पंज्यांचे ठसे उमटलेले होते. काही अंतरावर रक्ताचे थेंब आणि भक्ष्यं ओढून नेल्याची खूण दिसत होती. पायावाटेपासून सुमारे शंभर यार्डांवर गुराख्याला बिबट्याने ओढून नेलं होतं. गुराख्याची छाती आणि मांडीचं मांस खाण्यात आलं होतं.

येल्लागीरीच्या नरभक्षकाच्या कारकिर्दीला अशात-हेने सुरवात झाली !

(मूळ कथा : केनेथ अँडरसन )

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

18 Apr 2014 - 10:15 am | सुबोध खरे

एक महत्त्वाची गल्लत झाली आहे -panther किंवा लेपर्ड leopard म्हणजे बिबळ्या. http://en.wikipedia.org/wiki/Leopard

चित्ता नव्हे. (Cheetah) http://en.wikipedia.org/wiki/Cheetah
http://en.wikipedia.org/wiki/Leopard_of_the_Yellagiri_Hills

एस's picture

18 Apr 2014 - 11:53 am | एस

हेच म्हणायला आलो होतो. बाकी पुभाप्र.

नरभक्षक प्राण्यांच्या किश्शांमध्ये मला सर्वात थरारक वाटलेला म्हणजे रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता. त्याबद्दलही कधी आवर्जून लिहा. मराठीतून वाचायला मजा येईल.

शैलेन्द्र's picture

18 Apr 2014 - 1:06 pm | शैलेन्द्र

+१
हेच सांगायच होतं,

बाकी लेखनशैली, मस्तच..

कुसुमावती's picture

18 Apr 2014 - 1:27 pm | कुसुमावती

लेखनशैली मस्तच. केनेथ अँडरसन सारख्याच जिम कॉर्बेटच्या शिकार कथा मराठीत वाचायला आवडतील.

पु.भा.प्र.

आयुर्हित's picture

19 Apr 2014 - 2:34 am | आयुर्हित

दूरदर्शन वाहिनीवरून हाती आलेल्या माहितीनुसार, साधारणपणे वन्य प्राणी हे कधीच माणसाच्या वाट्याला जात नाहीत.
परंतु जर काही कारणाने हिंस्त्र श्वापदांचे सुळे जर तुटले असतील किंवा हिरड्यांना जखम झाली असेल अश्या परिस्थितीत मोठे जनावराची शिकार करता येत नाही किंवा त्यावरची पकड सैल राहिल्याने शिकार तोंडातून सुटू शकते.
तरच ते माणसासारख्या सोप्या शिकारीकडे वळतात, मात्र अश्या वेळी ते सलग २ ते ४ महिने माणसांवर हल्ले करतात. पावसाळा आल्यास २ ते ४ महिने दुसरीकडे जंगलात फिरून परत येवून माणसांवर हल्ले करतात.

The Last Maneater (Killer Tigers of India)
http://www.youtube.com/watch?v=zHfSTt1tcj0

स्पंदना's picture

20 Apr 2014 - 7:00 am | स्पंदना

फार छान लिहीता तुम्ही.
तुमच्या लेखणीत विषय फुलतो अगदी.
पुढचा भाग वाचते.

पैसा's picture

20 Apr 2014 - 9:26 am | पैसा

अगदी खिळवून ठेवणारं लिहिलं आहे!

मोक्षदा's picture

20 Apr 2014 - 9:38 am | मोक्षदा

चागले लिहले आहे