दावती नुसता उमाळा बेगडी
माणसे आतून सारी कोरडी
पाय मातीचेच सार्यांचे इथे
चाल उंटाचीच होती वाकडी
पोट छोटे भूक मोठी फार ही
ही पहा कुरकूर करते आतडी
थोर समतेचा तुझा दावा खरा
मारती ही हात आता मापडी
तू जरी आजन्म करशी भिक्षुकी
रे तुझी झोळीच राहे तोकडी
छान तू हा न्याय सार्यांना दिला
वाजतो हा दंड नुसता लाकडी
जी मघा मिरवीत गेली पालखी
त्यात होती जातधर्माची मढी
हे कसे स्वातंत्र्य आम्हाला दिले
ही अता विद्रोह करते कातडी
पापपुण्ये मोज सारी तु पुन्हा
थरथरु दे ही जीवाची पालडी
वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू
ने भरोनी देह अमुचे कापडी
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
22 Mar 2014 - 7:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना
-दिलीप बिरुटे
22 Mar 2014 - 9:57 am | drsunilahirrao
प्रा.डॉ दिलीप बिरुटे,
खूप खूप आभार सर !
23 Mar 2014 - 12:50 pm | kurlekaar
दावती नुसता उमाळा बेगडी
माणसे आतून सारी कोरडी
व
जी मघा मिरवीत गेली पालखी
त्यात होती जातधर्माची मढी
व
वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू
ने भरोनी देह अमुचे कापडी
य ओळी छान आहेत. यान्त तुमचा यमकी ट्रेड्मार्क व काव्यगुण यान्चा चान्गला सन्गम झालाय.