जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता. नेमके २०१४ हे वर्ष राजवाड्यांचे १५० वे जन्मवर्षदेखील आहे आणि हाच योग साधून इतिहास प्रेमींसाठी, ह्या अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. मी इतिहासाचा इतका अभ्यासू नाही, जशी जशी माहिती मिळाली ती संग्रही ठेवत गेलो. आणि शिकत गेलो. श्री. निनादराव बेडेकर, श्री. पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे, हे ह्या अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते होते. आजच्या अभ्यासवर्गानंतर मला मिळालेली माहिती, तिथे उपस्थित असलेल्या मान्यवर वक्त्यांनी राजवाड्यांची आणि त्यांच्या विपुल संशोधनाची आम्हाला करून दिलेली ओळख, इथे थोडक्यात मांडत आहे.
जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग. स्थळ - साठ्ये महाविद्यालय[/caption]
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, ह्यांचा जन्म २४ जून १८६३ वरसई ह्या कोकणातला छोटेखानी गावातला. (ह्या जन्म तारखेबद्दल काहींचे दुमत आहे, सर्वसामान्य इतिहासाप्रमाणे ही तारीख १२ जुलै १८६३ आहे). १८९० मध्ये बी. ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी न्यूइंग्लिश स्कूलमध्ये नोकरी स्वीकारली आणि मग पुढे अडीच वर्षांनी ती नोकरी सोडली. त्यांचा विवाह १८८९ मध्ये झाला होता, परंतु १८९२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक साहित्याचा आणि साधनांचा शोध घेणे सुरु केले. त्यांच्या मते इतिहासाबद्दल संशोधन करणे म्हणजे, त्यासंबंधीची कागदपत्रे आधी जमवणे आणि त्यावरून इतिहास पुराव्यानिशी लोकांसमोर मांडणे. ह्यासाठी त्यांनी अखंड भटकंती सुरु केली. दऱ्याखोऱ्यात प्राचीन अवशेष पाहत व देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध दप्तरातून, त्यांनी महत्वाची कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली. त्यांचा हा निश्चय इतका दांडगा होता की, पार काबूलपर्यंत त्यांनी ही शोधमोहीम हाती घेतली होती. आता इतकी भटकंती करणे, कागद पुरावे जमा करणे, लोकांना त्या कागदांचे महत्त्व पटवून ते आपल्या ताब्यात घेणे, मग त्याची नीट वर्गवारी करणे, कोणी कागद देण्यास मनाई केल्यास, ते कागद जसेच्यातसे नकलून घेणे..हे सर्व प्रचंड कष्टाचे आणि जिकरीचे काम होते.. आणि ह्या कामात पैसा ही लागणारच. त्यासाठी त्यांना काही संस्थानिकांना मदत मागितली, पण कोणी त्यांना मदत देऊ केली नाही. नंतर काहीजण पुढे झाले, पण तोवर आपल्या पदरचे पैसे टाकून..घरदार, भांडीकुंडी विकून, ते आपला हा धंदा (हो...संशोधन कार्याला ते धंदा असेच संबोधत असे) मनापासून करत राहिले. हे सर्व करत असताना त्यांचे विविधांगी लेखन ही सुरु होतेच. सार्थ, ग्रंथमाला, विश्वृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इत्यादी नियतकालिकांतून ते सतत आपले विचार मांडत राहिले.
इतिहास हा कल्पित नसतो, तो कागदपत्रांवर अवलंबून असतो. हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्यांच्या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा की, "अस्सल कागदपत्राचं एक चिठोरं, अवघ्या बखरींचं बहुमत हाणून पडायला समर्थ आहे". त्यांनी अखंड संशोधनकरून जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, "मराठ्यांच्या इतिहासाची साधने" शीर्षकाचे अस्सल मराठी बावीस खंड त्यांनी प्रसिध्द केले (१८९८-१९१७). ह्या पैकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. निनादराव ह्यांनी त्यांची ओळख करताना राजवाड्यांच्या प्रस्तावनेचा आवर्जून उल्लेख करतात. ही खंडाची मांडणी आणि त्यात दिलेला पत्र व्यवहार सलग नाही अशी त्यांच्यावर टीकाही झाली. जस जसे त्यांचे संशोधन होत गेले, तसेतसे ते खंड प्रकाशित करत गेले आणि लोकांना, इतिहासकारांना त्यावर चर्चा, टीका करण्यास भाग पाडले, जेणेकरून त्या चर्चेतून, टिकेतून इतिहासाची खरी ओळख समोर यावी. त्यापुढे १९२२ आणि १९२४ ह्या साली राधा माधव विलास चंपू आणि महिकावतीची बखर हे दोन ग्रंथ संपादून छापले. ह्या दोन्ही ग्रंथांनासुद्धा मोठ्या विवेचक प्रस्तावना त्यांनी जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहत काल असे काही त्यांनी संपादिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिध्द झाले. राजवाड्यांनी लिहिलेल्या लेखांचे आणि प्रस्तावनेचे काही खंड शं,ना जोशी ह्यांनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. तसेच धुळ्याच्या संशोधक अंकामधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांनी नुसता इतिहास लोकांसमोर मांडला नाही, तर त्याची त्यांच्या शब्दात कारणमीमांसादेखील केली. जी त्यांनी प्रस्तावना आणि लेखरुपात वेळोवेळी मांडली.
राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधणे जमवण्यासाठी केलेला खटाटोप अगदी विलक्षण आहे. अस्सल आणि अमुल्य कागदपत्रे त्यांनी देशाच्या विविध भागातून जमा केली होती आणि त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ह्याचे काही उदाहरण देण्याचे झाल्यास... महाराजांच्या दक्षिण दिग्विजय ह्या मोहिमे अंतर्गत कर्नाटकात बिलवडी इथे, एका स्थानिक पाळेगर देशमुख बाईने स्वराज्यात सामील व्हावे, म्हणून मराठ्यांनी तिच्या गढीवर हल्ला केला होता. तिने त्याचा कडवा प्रतिकार केला. महाराजांना ही गोष्ट कळल्यावर, त्यांनी देशमुख बाईला बहिण मानून, तिची पुनर्स्थापना केली आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यानां शिक्षा केली. त्याचे ऋण म्हणून, तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे स्थापन केली. ही माहिती मिळाल्यावर तिथे काही कागदपत्रे नक्की मिळतील, म्हणून राजवाड्यांनी धाव घेतली. ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा, ती गढी अगदी पडक्या स्वरुपात होती आणि तिथे एक विधवा म्हातारी राहत होती. तिला त्यांनी त्या वळचणीला पडलेल्या कागदपत्रांची मागणी केली. तिला म्हातारीला कळले की त्यात नक्की काही महत्त्वाचे असणार. तिने त्यासाठी नकार दिला आणि त्या कागदांच्या मोबदल्यात राजवाड्यांना स्वतःची धुणीभांडी, स्वयंपाक आणि सेवा करायला लावली. राजवाड्यांनी ती अगदी मनापासून विनातक्रार केली आणि तीन दिवसांनी त्या म्हातारीला लाज वाटून, तिने ती गाठोडी राजवाड्यांच्या हवाली केली. अजून एक प्रसंग सांगायचा झाल्यास, राजवाडे पैठणला किराणामालाच्या दुकानात काही सामानाची खरेदी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी पहिले की तो दुकानदार ज्या कागदात सामान बांधून देत होता, ती मोडी लिपीतली कागदपत्रे होती. दुकानदाराने त्या "मोडी रद्दीच्या" बदल्यात तितकीच रद्दी मागितली आणि ती राजवाड्यांनी विकत आणून त्या दुकानदारास दिली आणि ते लाखमोलाचे कागद मिळवले.
ह्या कागदपत्रांमध्ये सापडलेले महत्वाचे असे काही उल्लेख करायचे झाल्यास - १७५२ ला कनोजला झालेल्या अहमदी तहाची प्रत खंड क्रमांक १ मध्ये प्रसिद्ध केली आहे आणि त्यात मराठ्यांना संपूर्ण हिंदुस्थानच्या चौथाईचा अधिकार आणि मुघल बादशाहने अब्दालीपासून देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांना दिली होती हे नमूद केलेले आहे. तसेच खंड एक मध्ये पानिपतच्या युद्धाच्या आधीची आणि त्या मोहिमेदरम्यान सुरु असलेल्या पत्र व्यवहारातील ३०० पत्रे प्रकाशित केली आहेत. तसेच १७५७ मध्ये शिवनेरी किल्ला मिळवण्यासाठी सलाबतजंगाबरोबर झालेल्या तहाची बोलणी आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. नानासाहेब आणि शाहूमहाराज ह्यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहारदेखील प्रकाशित केला गेला. खंड दोनमध्ये विस्तृत पेशवे शकावली आहे. जंजिरा मोहीम, उदगीर स्वारी, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या संस्थानाची व्यवस्था, वसई किल्ला मोहीम, हसबनीस नियुक्तींची पत्रे, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, संभाजी राज्यांची पत्रे, राजाराम महाराजांची पत्रे, शहाजी महाराजांची पत्रे, असे नानाविध कागद त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
त्यांच्या ह्या अपार संशोधन कार्याने प्रेरित होऊन, इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांची एक फळी निर्माण महाराष्ट्रात निर्माण झाली. ज्यामुळे इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. हे संशोधन करत असताना १९१० ला पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाड्यांनी केली. त्यांचा विश्वास होता की कुठल्याही कार्यसिद्धीसाठी संघटना, ही गरजेचीच आणि त्यामुळेच ह्या संशोधक मंडळाची स्थापना झाली. समविचारी माणसे एकत्र आली, की कार्यसिद्धीस लवकर जाते. त्यांनंतर अनेक समविचारी, इतिहासकार संशोधन कार्याकडे वळू लागले. राजवाडे हे एका दीपस्तंभासारखे इतर इतिहासकारांना त्याकाळी प्रेरणा देत राहिले आणि आजही देत आहेत.
याच भारतीय इतिहास संशोधक मंडळात आज लाखो मोडी कागदपत्रे पडून आहेत, ज्यांचा अभ्यास करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मोडी जाणकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि काही ५० वर्षांनी कोणी मोडी जाणकार उरणारदेखील नाहीत. तेव्हा ह्या कागदांना काही किंमत उरणार नाही. आज आपण इतिहास विविध संवादाने भरलेल्या कादंबरीरूपाने वाचतो. काही संदर्भ न देता...आपण मोठे जाणते इतिहासकार म्हणून स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणारे चिक्कार आहेत. त्यांनी लिहिलेला-मांडलेला, हाच इतिहास असे आजच्या पिठीला वाटत आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या १०-१२ आवृत्या सहज खपतात, पण पुराव्यानिशी कागदपत्रांचे दिलेले खंड आवृत्ती क्रमांक १ आजही मंडळात धूळखात पडून आहे, ही मोठी शोकांतिका आहे. नुसते इतिहासात रमून जायला मी सांगत नाही, पण त्या इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अगदी आजच्या जीवन पद्धतीतही. एक छंद म्हणून तरी किमान मोडीचा अभ्यास तरुणाईने केला, तरी खूप झाले असे काकुळतीने बलकवडे सर सांगत होते. हा अभ्यासवर्ग माझ्यासारख्या नवशिक्याला नक्कीच मोलाची माहिती देऊन गेला. एका थोर संशोधकाची, मला झालेली ही आजवरची सर्वोत्तम ओळख आहे. त्यासाठी जनसेवा समिती आणि मान्यवर वक्त्यांचे खूप खूप आभार.
डावीकडून - प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे[/caption]
राजवाड्यांनी केलेल्या अपार संशोधन कार्यामुळे निदान ४५०० पत्रे तरी आपल्याला देवनागरीत लिप्यांतर करून उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांचे संबध आयुष्य इतिहासाच्या संशोधन कार्याला वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी फकिरी घेतली तशीच राजवाड्यांनी राष्ट्रीय स्मृतीसंचालनासाठी तशीच फकिरी घेतली. मराठ्यांच्या इतिहासाच्या या महान भाष्यकाराला आणि एक अद्वितीय संशोधकाला मन:पुर्वक दंडवत !!
- सुझे !!
--------------------------------------------------------------
लेखन संदर्भ आणि इतर काही महत्त्वाचे
१. कार्यक्रमात दिलेली माहिती पुस्तिका [लेखक सदाशिव आठवले] (ही माहिती कौस्तुभ कस्तुरे ह्याने, आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली)
२. मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलेले विविध संदर्भ.
३. मोडी शिकण्यासाठी काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास कौस्तुभशी संपर्क करावा. कौस्तुभचे अजून एक महत्त्वाचे सांगायचे झाल्यास त्याने पेशवाई विषयवार विविधांगी लेखन केले आहे. त्याच्या ब्लॉगवर इतिहासाची सुवर्णपाने इथे उपलब्ध आहे आणि तसेच त्याने असंख्य मोडी पात्रांचे लिप्यांतरदेखील केलेले आहे. जरूर वाचा !!
४. पानिपत ह्या विषयवार अनेक ग्रंथ, पुस्तके आजवर येऊन गेलीत. ह्या विषयावर हल्लीच प्रकाशित झालेले पुस्तक Solstice At Panipat: 14 January 1761 हे उजवे आहे असे निनादरावांनी सांगितले.
५. पानिपतचा महासंग्रमाबद्दल झालेल्या अभ्यासवर्गाच्या काही नोंदी मागे मी ब्लॉगवर इथे दिल्या आहेत.
६. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा ऑनलाईन वाचनास उपलब्ध आहे - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा
प्रतिक्रिया
5 Feb 2014 - 3:51 pm | सौंदाळा
सुंदर माहीती.
लेख आवडला.
5 Feb 2014 - 5:29 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत
5 Feb 2014 - 4:10 pm | प्रचेतस
सुरेख लिहिलंयस सुझे.
धन्स ह्या लेखाबद्दल.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, महिकावतीचि बखर, राजवाडे लेखसंग्रह अशी काही पुस्तके संग्रही आहेतच.
5 Feb 2014 - 4:10 pm | विटेकर
लेख आवड्ला. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचून इतिहासाचार्यांबद्दल अंमळ वेगलेच मत बनले होते. त्यांच्या विक्षिप्तपणाच्याही अनेक कथा ऐकल्या होत्या.
तुम्ही छान ओळख करुन दिली, धन्यवाद !
5 Feb 2014 - 4:18 pm | मृत्युन्जय
मस्तच रे सुहास. लिंकांबद्दल धन्यवाद.
5 Feb 2014 - 4:43 pm | जेपी
छान ओळख .
लिंक बद्दल धन्यवाद .
5 Feb 2014 - 4:56 pm | मुक्त विहारि
काही अपरिहार्य कारणा मुळे ह्या कार्यक्रमाला जाता नाही आले.
तुमच्यामुळे ती रुखरुख दूर झाली.
मनापासून धन्यवाद.
5 Feb 2014 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेख ! उपयोगी दुवे.
5 Feb 2014 - 6:21 pm | माहितगार
रोचक माहिती आणि दुव्यांबद्दल धागाकर्त्यास धन्यवाद.
मराठी विकिपीडियावर मोडी नावाचा लेख आहे. चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी या मोडी वळणांमधील फरका बद्दल अधिक सचित्र माहिती हवी आहे.
राजवाडे यांचे छायाचित्र (सौजन्य:इंग्रजी विकिपीडियावर Hsarpotdar1 यांनी चढवलेले छायाचित्र)

5 Feb 2014 - 6:34 pm | विकास
राजवाड्यांवरील माहिती आणि कार्यक्रमाचा वृत्तांत वाचनीय आहे. या लेखा बद्दल मनःपूर्वक आभार!
पुरंदर्यांचे वाक्य आहे का माहीत नाही पण त्यांच्या तोंडून ऐकलेले आहे: "केवळ वेडी माणसेच इतिहास घडवू शकतात..." अर्थात यात वेड हे उपरोधाने म्हणलेले आहे. राजवाड्यांनी इतिहास संकलन ज्या एका असामान्य वेडाने केले होते त्यामुळे त्याचाच त्यांनी एक इतिहास घडवला आणि नंतरच्या इतिहासकारांसाठी मार्ग तयार केला असे वाटते.
5 Feb 2014 - 6:42 pm | आतिवास
माहितीपूर्ण आणि चांगला लेख. दुव्यांसाठी दुवा :-)
5 Feb 2014 - 7:08 pm | शैलेन्द्र
+११११
5 Feb 2014 - 7:16 pm | जोशी 'ले'
सुंदर लेख
5 Feb 2014 - 7:28 pm | आदूबाळ
मस्त लेख, दुव्यांसाठी आभार, इ. इ.
राजवाड्यांच्या आयुष्यावर एक छान चित्रपट बनू शकेल...
6 Feb 2014 - 9:14 am | सुनील
नाटक बनले होते. आत्ता नाव आठवत नाही.
6 Feb 2014 - 5:54 pm | विकास
विषवृक्षाची छाया?
7 Feb 2014 - 5:51 am | सुनील
होय होय. तेच नाटक.
धन्यवाद.
5 Feb 2014 - 7:37 pm | Atul Thakur
सुझे, तुमचे खुप खुप आभार :)
5 Feb 2014 - 11:05 pm | आयुर्हित
सुंदर लेखन व सुंदर कथा नायक!
धन्यवाद अशी मोलाची माहिती दिल्याबद्दल.
मला तर वाटते, ह्या विषयावर नक्कीच एक चांगला सिनेमा होऊ शकतो!
5 Feb 2014 - 11:16 pm | मदनबाण
माहितीपूर्ण लेखन ! :)
8 Feb 2014 - 3:46 am | पाषाणभेद
हेच म्हणतो. छान लेख.
5 Feb 2014 - 11:36 pm | यशोधरा
धन्यवाद.
5 Feb 2014 - 11:43 pm | अर्धवटराव
मिपावर असे लेख जास्तीतजास्त यायला हवेत. हिच खरी आपल्या भाषेची सेवा. एका उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या उत्तुंग कार्याचा एक छोटाखानी आलेख बघुन सुद्धा छाती दडपुन जाते. काय अफाट माणसं होती हि. किती प्रचंड कार्य.
धुळ्याच्या शं.कृ.देव यांचं समर्थ रामदासस्वामींबाबत कार्य सुद्धा असच प्रचंड आहे. ते समर्थभक्त होते व त्याचा अभिनिवेष त्यांना टाळता आला नाहि हे खरं... पण समर्थ साहित्य कलेक्शन प्रचंड आहे त्यांचं.
6 Feb 2014 - 1:31 am | प्यारे१
+१११
>>>काय अफाट माणसं होती हि. किती प्रचंड कार्य.
तंतोतंत!
7 Feb 2014 - 1:30 pm | मंदार दिलीप जोशी
+ १११११११
6 Feb 2014 - 1:55 am | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेख,
स्वाती
6 Feb 2014 - 2:33 am | वाटाड्या...
अवलिया माणसांचं "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" वाचुनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती आली होती. अक्षरक्षः डोकं गरगरायला लागलेलं. चांगली माहीती.
- वाट्या...
6 Feb 2014 - 8:43 am | अजया
छान लेख! दुव्यांसाठी धन्यवाद!
6 Feb 2014 - 7:04 pm | राजेंद्र मेहेंदळे
एक जबरदस्त व्यक्तिमत्व होते. असे ऐकुन आहे की स्वैंपाक करण्यात वेळ जाउ नये म्ह्णुन ते भातावर एक वाटीभर मध ओतुन जेवण करत असत.
अश्या सेवाव्रती मनुष्याची ओळख करुन देणार्या लेखाबद्दल आभार
6 Feb 2014 - 7:28 pm | किसन शिंदे
अत्यंत माहितीपुर्ण लेखन. धन्यवाद झेलेअण्णा.!
7 Feb 2014 - 9:18 am | ऋषिकेश
चांगली माहिती. सदर लेख योग्य ते संस्कार करून विकीवर सुद्धा चढवावा ही विनंती
7 Feb 2014 - 9:57 am | सुधीर कांदळकर
अत्यंत विक्षिप्त गृहस्थ होते.त्यांच्या मताच्या विरोधी मत मांडले तर ते काठीने मारीत देखील असत वगैरे त्यांच्या विक्षिप्तपणाच्या काही मनोरंजक कथा दुर्गाबाईंनी एका जाहीर मुलाखतीत सांगितल्या होत्या. अर्थात त्यामुळे त्यांचे मोठेपण आणि त्यांच्या कार्याचे मोल जराही कमी होत नाही.
पी एच डी करणार्यांसाठी राजवाड्यांनी बराच कच्चा माल अपार कष्ट सोसून जमवून ठेवलेला दिसतो आहे. पण त्यावर काम केले तर मार्गदर्शक (पी एच डी गाईड) मिळणे कठीण. मार्गदर्शक मिळाला तर परीक्षक ते संशोधन स्वीकारणे कठीण. वशिल्याने विद्यापीठातल्या मोक्याच्या जागा भ्रष्टाचारी प्रतिगाम्यांनी अडवणार्यांमुळे अशा अस्सल कागदपत्रातून होणारे संशोधन दुरापास्त झाले ही देखील शोकांतिकाच आहे.
असो माहितीपर लेखाबद्दल धन्यवाद.
7 Feb 2014 - 12:06 pm | बॅटमॅन
मस्त लेख. या निमित्ताने वि का राजवाड्यांची अजून अनेक जणांना ओळख होतेय हे लै भारी काम झालं. हा माणूस नसता तर मराठ्यांच्या इतिहासाचं काय झालं असतं असं अनेक वेळेस वाटत राहतं.
एक मुद्दा मात्र वरील लेखात राहिलाय अन तो महत्त्वाचा आहे असं वाटतं. पेशवाई खालसा केल्यावर त्यांचे सगळे रेकॉर्ड्स हे ब्रिटिशांनी ताब्यात घेतले. ते इतके अवाढव्य होते की ३५०० बैलगाड्या भरून ऐवज झाला. तो त्यांनी पुण्यातल्या पेशवे दफ्तरात ठेवला आणि सुरुवातीला काही जमिनीचे वाद इ. असतील तर त्याचा रेफरन्स घेत असत. पण पुढे ग्रँट डफनंतर नीळकंठराव कीर्तने इ. लोकांपासून 'नॅशनॅलिस्टिक' इतिहासाची सुरुवात झाली आणि जुन्या कागदपत्रांच्या आधारे हे लोक भडकाऊ कैतरी लिहितील अशी भीती ब्रिटिशांना वाटल्यामुळे त्यांनी ते आर्काईव्ह लोकांसाठी बंद करून ठेवले. या आर्काईव्हमध्ये जवळपास ३ कोटी मोडी कागदपत्रे आहेत- त्यांपैकी बहुसंख्य कागदपत्रे अजूनही कोणीही वाचलेली नाहीत. पुढे रियासतकारांनी पेशवा दफ्तरातील काही डॉक्युमेंट्स वाचून त्यांचे ४५ खंड प्रकाशित केले. तरीही अजून कैक डोंगर बाकीच आहेत.
रियासतकारांचे सरकारदरबारी वजन तसे होते-जदुनाथांचे ते सहकारी असल्याने त्यांना वशिला मिळाला, पण पुण्यातच राहणारे राजवाडे इ. लोकांसाठी मात्र हा खजिना समोर दिसत असूनही बंद होता. त्यामुळे त्यांची जळजळ व्हायची प्रचंड. रियासतकार विरुद्ध पुणेरी इतिहासकार असे व्यक्तिगत हल्ले तेव्हा जे काही झाले त्याचे मूळ इथे आहे. असो.
पण या अडचणीमुळेच राजवाडे कामाला लागले. अख्खा मावळ पिंजून काढला आणि भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. जिथून मिळतील तिथून, जशी मिळतील तशी शेकडो-हजारो-लाखो कागदपत्रे गोळा केली आणि क्रियासिद्धि: सत्त्वे भवति महतां नोपकरणे हे वचन खरे ठरवले. त्यांच्या संशोधनाला फळ आले आणि एक अख्खी संशोधकांची फळी उभी राहिली. आज खुद्द मंडळात १५ ते १६ लाख कागदपत्रे आहेत. त्यांतही अनेक अनपब्लिश्ड आहेत.
राजवाड्यांची मते आयुष्यात नंतर बदललेली दिसतात असे शेजवलकरांनी दाखवून दिलेले आहे. कधीकाळी कम्युनिस्ट होऊ घातलेले राजवाडे नंतर सनातनी मताचे झाले हे त्यांनी एके ठिकाणी उद्धरणांसहित सिद्ध केलेले आहे. शेजवलकरांच्या निवडक लेखसंग्रहात त्यांनी राजवाड्यांवर लिहिलेला मृत्युलेख सुंदर आहे. त्यात त्यांनी राजवाड्यांच्या आयुष्याचे सार सांगणारी रॉबर्ट ब्राउनिंग या कवीची 'a grammarian's funeral' ही सुंदर कविता उद्धृत केलेली आहे ती इथे पेष्टवतो. लै मोठी आहे पण अतिशय यथार्थ आहे.
A Grammarian's Funeral
BY ROBERT BROWNING
Shortly after the Revival of Learning in Europe
Let us begin and carry up this corpse,
Singing together.
Leave we the common crofts, the vulgar thorpes
Each in its tether
Sleeping safe on the bosom of the plain,
Cared-for till cock-crow:
Look out if yonder be not day again
Rimming the rock-row!
That's the appropriate country; there, man's thought,
Rarer, intenser,
Self-gathered for an outbreak, as it ought,
Chafes in the censer.
Leave we the unlettered plain its herd and crop;
Seek we sepulture
On a tall mountain, citied to the top,
Crowded with culture!
All the peaks soar, but one the rest excels;
Clouds overcome it;
No! yonder sparkle is the citadel's
Circling its summit.
Thither our path lies; wind we up the heights:
Wait ye the warning?
Our low life was the level's and the night's;
He's for the morning.
Step to a tune, square chests, erect each head,
'Ware the beholders!
This is our master, famous, calm and dead,
Borne on our shoulders.
Sleep, crop and herd! sleep, darkling thorpe and croft,
Safe from the weather!
He, whom we convoy to his grave aloft,
Singing together,
He was a man born with thy face and throat,
Lyric Apollo!
Long he lived nameless: how should spring take note
Winter would follow?
Till lo, the little touch, and youth was gone!
Cramped and diminished,
Moaned he, "New measures, other feet anon!
My dance is finished"?
No, that's the world's way: (keep the mountain-side,
Make for the city!)
He knew the signal, and stepped on with pride
Over men's pity;
Left play for work, and grappled with the world
Bent on escaping:
"What's in the scroll," quoth he, "thou keepest furled
Show me their shaping,
Theirs who most studied man, the bard and sage,
Give!" So, he gowned him,
Straight got by heart that book to its last page:
Learned, we found him.
Yea, but we found him bald too, eyes like lead,
Accents uncertain:
"Time to taste life," another would have said,
"Up with the curtain!"
This man said rather, "Actual life comes next?
Patience a moment!
Grant I have mastered learning's crabbed text,
Still there's the comment.
Let me know all! Prate not of most or least,
Painful or easy!
Even to the crumbs I'd fain eat up the feast,
Ay, nor feel queasy."
Oh, such a life as he resolved to live,
When he had learned it,
When he had gathered all books had to give!
Sooner, he spurned it.
Image the whole, then execute the parts
Fancy the fabric
Quite, ere you build, ere steel strike fire from quartz,
Ere mortar dab brick!
(Here's the town-gate reached: there's the market-place
Gaping before us.)
Yea, this in him was the peculiar grace
(Hearten our chorus!)
That before living he'd learn how to live
No end to learning:
Earn the means first God surely will contrive
Use for our earning.
Others mistrust and say, "But time escapes:
Live now or never!"
He said, "What's time? Leave Now for dogs and apes!
Man has Forever."
Back to his book then: deeper drooped his head:
Calculus racked him:
Leaden before, his eyes grew dross of lead:
Tussis attacked him.
"Now, master, take a little rest!" not he!
(Caution redoubled
Step two abreast, the way winds narrowly!)
Not a whit troubled,
Back to his studies, fresher than at first,
Fierce as a dragon
He (soul-hydroptic with a sacred thirst)
Sucked at the flagon.
Oh, if we draw a circle premature,
Heedless of far gain,
Greedy for quick returns of profit, sure
Bad is our bargain!
Was it not great? did not he throw on God,
(He loves the burthen)
God's task to make the heavenly period
Perfect the earthen?
Did not he magnify the mind, show clear
Just what it all meant?
He would not discount life, as fools do here,
Paid by instalment.
He ventured neck or nothing heaven's success
Found, or earth's failure:
"Wilt thou trust death or not?" He answered "Yes:
Hence with life's pale lure!"
That low man seeks a little thing to do,
Sees it and does it:
This high man, with a great thing to pursue,
Dies ere he knows it.
That low man goes on adding one to one,
His hundred's soon hit:
This high man, aiming at a million,
Misses an unit.
That, has the world here should he need the next,
Let the world mind him!
This, throws himself on God, and unperplexed
Seeking shall find him.
So, with the throttling hands of death at strife,
Ground he at grammar;
Still, thro' the rattle, parts of speech were rife:
While he could stammer
He settled Hoti's business let it be!
Properly based Oun
Gave us the doctrine of the enclitic De,
Dead from the waist down.
Well, here's the platform, here's the proper place:
Hail to your purlieus,
All ye highfliers of the feathered race,
Swallows and curlews!
Here's the top-peak; the multitude below
Live, for they can, there:
This man decided not to Live but Know
Bury this man there?
Here here's his place, where meteors shoot, clouds form,
Lightnings are loosened,
Stars come and go! Let joy break with the storm,
Peace let the dew send!
Lofty designs must close in like effects:
Loftily lying,
Leave him still loftier than the world suspects,
Living and dying.
7 Feb 2014 - 12:35 pm | llपुण्याचे पेशवेll
झक्कास प्रतिसाद.
बादवे येवढ्या प्रचंड शोधकार्याला योग्य न्याय न मिळाल्यामुळे कदाचित नैराश्यातून अशा गोष्टी घडल्याही असतील. त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल एक गोष्ट अशी ऐकायला मिळाली की त्यांनी महत्प्रयासाने ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन अशी ज्ञानेश्वरीची प्रत/नक्क्ल मिळविली होती. त्यात त्यांच्या मतानुसार ज्ञानेश्वरांच्या काळात संस्कृताचा प्रभाव जास्त असल्याने ळ च्या ऐवजी ल चा वापर जास्त होता याला पुष्टी देणारी अनेक उदाहरणे होती आणि ळ चा वापर नगण्य होता. त्यावरून तत्कालीन इतिहासकारांमधे वादंग झाल्याने चिडून राजवाड्यांनी ती प्रत स्वतःच जाळून टाकली होती. आणि त्यामुळे एक मोठा द्स्तऐवज नष्ट झाला असे सांगितले जाते . असो.
त्यांच्या कार्याची दखल आता घेतली जात आहे ही मोठी कौतुकास्पद बाब आहे.
7 Feb 2014 - 12:48 pm | बॅटमॅन
असेलही. पण राजवाड्यांसारखे लोक कितीही झाले तरी हे असे करणे अशक्य.
राधामाधवविलासचंपूसारखे काव्य चिंचवडास कुणी कबाडे यांच्याकडून माळ्यावर अडगळीत पडलेले, पाली-उंदरांच्या लेंड्यांत पडलेले अन वाळवीने खाल्लेले असे त्यांनी मिळवलेले आहे. अन्य वस्तूही कशा मिळवल्या हे वरील लेखात आलेले आहेच. त्यामुळे वाद झाले तरी ते प्रत जाळून टाकणे केवळ अशक्य.
पुढे राजवाड्यांचे मंडळातील लोकांशीही वाद झाल्यावर त्यांनी धुळ्याला अजून एक मंडळ काढले. तेच हे धुळ्याचे राजवाडे संशोधनमंदिर.
कुणीतरी या इतिहासकारांचा इतिहास लिहिला पाहिजे. सुदैवाने बर्याच लोकांबद्दल माहिती उपलब्ध आहे. राजवाडे, मिरजेचे वासुदेवशास्त्री खरे, ग.ह.खरे, रियासतकार सरदेसाई, भिलवडीचे मियाँ सिकंदरलाल अत्तार, दत्तोपंत आपटे, वा.कृ. भावे, आज्ञापत्रवाले शं.ना.जोशी, शेजवलकर, वा.सी.बेंद्रे अशी अनेक नावे सांगता येतील. या लोकांनी इतके प्रचंड काम केले म्हणून मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बरीच विधाने आपण ठामपणे करू शकतो.
अशा लोकांमुळेच महाराष्ट्रात अन्य प्रांतांच्या तुलनेत पुराभिलेखागारेही जास्त आहेत. साधारणपणे प्रत्येक राज्यात एक नैतर दोन शासकीय पुराभिलेखागारे असतात. महाराष्ट्रात मात्र शासकीय अभिलेखागारे तब्बल पाच आहेत:
मुंबै, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर अन नागपूर या ठिकाणी आहेत.
हे सोडून प्रायव्हेट संस्था आहेत त्या आणि वेगळ्याच.
भारतात नक्की अशा किती संस्था आहेत आणि त्या कुठे आहेत, तसेच प्रत्येक संस्थेचे नक्की वैशिष्ट्य काय आहे, आणि संस्था कशी आहे याची ओळख करून देणारी एक लेखमाला खरे तर अतिशय आवश्यक आहे.
7 Feb 2014 - 12:52 pm | प्रचेतस
दोन्ही प्रतिसाद आवडले रे.
7 Feb 2014 - 2:40 pm | बॅटमॅन
धन्स रे. :)
अन पुपे: रैट.
7 Feb 2014 - 3:37 pm | आदूबाळ
हे आर्काईव्ह पुण्यात कुठेशी आहे? अजूनही बंदच असतं का आता उघडलंय? पेशवाईतली कागदपत्रं म्हणजे सरासरी २५० वर्षांपूर्वीची असं धरू. अजून किती वर्षं ती टिकतील?
7 Feb 2014 - 3:46 pm | सुहास झेले
सदर आर्काईव्ह पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात... पेशवे दप्तरात आहेत. तिथे जाऊन विचारणा करता येईल. बलकवडे सर असतात तिथे बराच वेळ...
7 Feb 2014 - 3:52 pm | बॅटमॅन
स्टेशनजवळ साधू वास्वानी चौकात वास्वानी पुतळ्याजवळ आहे. आता स्वातंत्र्यानंतर उघडे असते. जाण्याआधी एक फॉर्म भरावा लागतो. ओळखीचे आहात कुणाच्या तरी इ.इ. वाले शिफारसपत्र असते. तो फॉर्म घेऊन मंडळात गेले तर लोक मदत करतात असे ऐकून आहे. पण स्वतः मी अजून तिथे गेलेलो नाही. एकदा जायचे आहे, पाहू कधी जमते ते.
अन सुहास, भारत इतिहास संशोधक मंडळातले आर्काईव्ह अन हे पेशवा आर्काईव्ह दोन्ही वेगळे आहेत. मंडळातले आर्काईव्ह बघायचे असेल तर फापटपसारा तुलनेने बराच कमी आहे कारण तिथे गवर्मेंटचा संबंध णाही.
7 Feb 2014 - 4:10 pm | बॅटमॅन
योग्य काळजी घेतली तर अजून किमान शंभरदीडशे वर्षे टिकायला काहीच हरकत नाही. दणकट कागद असतो जण्रली. भारताच्या हवामानामुळे कागद युरोपासारखे हजारो वर्षे टिकत नसले तरी पाचेकशे वर्षांपूर्वीची पत्रे मी स्वतः पाहिली आहेत. काही होत नाही, फक्त कोरड्या ठिकाणी सुरक्षित ठेवायचे, वाळवी इ. पासून दूर ठेवले की झाले. अर्थात केमिकल इ. लावले तर अजून काही वर्षे टिकेलही.
पण या पत्रांचे वाचन इ. होणे परम आवश्यक आहे. लोक करताहेत बरंच काही, पण ते पुरेसं आजिबात नाहीये. यासाठी परदेशात लोकांनी एक अभिनव मार्ग अवलंबला होता. इजिप्तमध्ये एके ठिकाणी उत्खनन करता करता ग्रीक भाषेतले हजारो कागद सापडले. किमान लाखभर असावेत. आता मूठभर संशोधक ती कागदपत्रे ताब्यात घेणार अन वाचणार, किमान दहाएक वर्षे सहज जाणार आणि काही लोक त्यात फुलटाईम एंगेज राहणार. त्याऐवजी त्यांनी शक्कल लढवली. सर्व कागदपत्रे स्कॅन केली आणि नेटवर अपलोड केली आणि एक क्राउडसोर्सिंग अॅप तयार केले. त्यात आपल्यासमोर रँडमली कुठलाही कागद येतो वेबसाईट उघडल्यावर. आणि बाजूला अल्फा बीटा गॅमा थीटा सर्व अक्षरे असतात. वरिजिनल पत्रातले एखादे अक्षर आपल्याला वाचून वाटले की अल्फा असेल. तर त्यावर क्लिक करून अल्फा अक्षराची आयकॉन तिथे चिकटवायची. असे करून मग आपले वाचन तिथे सबमिट करायचे. असे अनेक लोक करतील अन मग त्यांचे रिझल्ट्स अॅव्हरेज औट करून कागदपत्रांचे फायनल अॅनॅलिसिस करता येईल असा तो एकूण प्रकार आहे.
आपल्या इथेही असे करता येईल. किंवा यापेक्षा साधं म्हणजे टॉपला चारपाच लोक, त्यांच्या हाताखाली चाळीसपन्नास लोक अन त्यांपैकी प्रत्येकाने कैक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एकेक पत्र वाचून घ्यायचं. इतके केले तरी पाचेक वर्षांत लाखो कागद वाचून होतील. अन एकदा का वाचून झाली की मग फायनल अॅनॅलिसिस करणे तुलनेने बरेच सोपे.
पेशवा दफ्तरापेक्षा कैक पटीने असे मुघल अन राजपूत सत्तांचे डोक्युमेंट आर्काईव्ह बिकानेर येथे आहे. तिथे ८ लाख रुमाल आहेत अन ऑन अॅन अॅव्हरेज प्रत्येक रुमालात १००० कागद असतात. म्हणजे ८ लाख गुणिले १००० पाहिले तर ८० कोटी कागद झाले. त्याचीही अवस्था अशीच आहे. नाही म्हणायला ग.ह. खरे तिथे एकदा चारपाच महिने आपली टीम घेऊन गेले होते अन १० हजार पर्यंत कागद वाचले होते. पण तो समुद्रातून बादलीने पाणी काढण्याचा प्रकार झाला.
आणि हे झाले फक्त शासकीय कागदपत्रांबद्दल. संस्कृत पोथ्या इ. पाहिल्या तर एका अंदाजानुसार भारतभर अदमासे ३ कोटी संस्कृत पोथ्या असाव्यात. पैकी ८० लाख एकट्या राजस्थानात आहेत. त्यांचे संकलन करणारेही थोडेच आहेत. जे आहेत ते जबरी आहेत, तरीही गरजेपेक्षा खूपच कमी आहेत. या क्षेत्रात इतके काम होणे अजून बाकी आहे की सांगता पुरवत नाही.
असो. याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.
7 Feb 2014 - 4:37 pm | माहितगार
बॅटमन यांनी सांगीतलेली अॅप जास्त एलॅबोरेट आहे ती येईल तेव्हा छानच. पण तो पर्यंत आपल्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे किंवा दस्तएवज बखरी पोथ्या असतील तर स्कॅन पिडिएफ कॉपी चढवण्या करता मराठी संस्कृत फार्सी विकिस्रोत प्रकल्प उत्तम पर्याय आहेत. कारण तेथे युनिकोडीकरणाकरता मुद्रीत शोधनाकरता वर्गीकरणाकरता शोध आणि वाचनाकरता काही उत्तम सुविधा आहेत.
नवीन मराठी टायपिंग शिकणार्यांनी मराठी विकिस्रोत प्रकल्पाचा उपयोग केला आणि ज्यांना मराठी टायपिंग येते त्यांनी प्रत्येकी १०० जरी टाईप केले तरी बरेच काम क्राऊड सोर्सींग मधून होऊ शकेल.
आपल्याकडील ऐतिहासिक दस्तएवज सांभाळणार्या संस्थामधील कार्यरत लोक तंत्रज्ञानापासून एकतर दूर आहेत किंवा एखाद्याच विशीष्ट तंत्रज्ञान पुरवठादारावर एवढे अवलंबून असतात की दुसरा कुणी अधीक चांगले तंत्रज्ञान घेऊन गेला तरी त्याला उभे केले जाणार नाही अशी सर्व साधारण स्थिती असते. म्हणजे इंटरनेट आणि स्कॅनींग उपलब्ध झाल्यावरही मंडळी फक्त मायक्रोफिल्मींग आणि तेही कोणा परकीय संस्थेने केलेले इत्यादीवर समाधानी असतात. आणि आर्थीक बजेटची तर सर्वात मोठी बोंब असते.
7 Feb 2014 - 5:03 pm | बॅटमॅन
माहीतगार यांनी सुचवलेला मार्ग मस्त आहे. याकरिता जागृती होणे अवश्यमेव आहे.
9 Feb 2014 - 1:30 am | प्रसाद गोडबोले
व्हॉट आर यु सेयिंग डुड ? आयेम स्टन्ड !!
पेशवे दफ्तराबद्दल ऐकुन होतो पण .... ३ कोटी संस्कृत पोथ्या ??!!
हायला जॉब बिब सोडुन फुल्ल टाईम उतरलो ह्या क्षेत्रात तरीही कमी पडेल ...
पण कालिदास / भास / बाणभट्ट ह्यांचे काही ओरीजीनल स्क्रिप्ट हाती लागले तर आयुष्याचे सार्थक होईल !
किंव्वा आचार्यांचे काही नवीन ओरीजिनल साहित्य सापडले तर ... ओह्ह माय ग्वाड ...थ्रिल्ड !!
9 Feb 2014 - 1:41 am | बॅटमॅन
येस्सार. शेल्डन पोलॉक नामक एक संस्कृतज्ञ आहे त्याच्या अंदाजानुसार इतक्या पोथ्या असाव्यात भारतभर मिळून.
खरेच लै कै कै मिळण्याचे चान्सेस आहेत.
10 Feb 2014 - 2:37 pm | llपुण्याचे पेशवेll
भारतातच इतक्या आहेत? मग भारताबाहेर ज्या बर्याच पोथ्या गेल्या त्याची काही आकडेवारी आहे का? कारण ब्रिटीश इंडीयामधे देखील बरे संशोधक येऊन पोथ्या संशोधन कार्यासाठी जमवून नेत असत.
निनाद बेडेकरांनी एकदा एका उल्लेखात शिवभारताच्या पोथीबद्द्लची माहीती एका जर्मन ग्रंथालयाकडून मिळाल्याचे सांगितले होते. ती पोथी सरस्वतीमहाल ग्रंथालयात असल्याचे त्या जर्मन ग्रंथालयाने कळवले होते ठावठीकाण्यासकट असे ऐकल्याचे नक्की आठवते.
10 Feb 2014 - 2:43 pm | बॅटमॅन
भारताबाहेर असलेल्या भारतीय हस्तलिखितांची-त्यात संस्कृतबरोबर मराठी, हिंदी, कन्नड, तमिऴ, उर्दू, फारसी, अरबी, इ. सर्व घेतले तर एकच एक राउंड फिगर एस्टिमेट मला ठाऊक नाही, पण साधारणपणे धरा की तोही आकडा लाखोंत असेल. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड, अमेरिका या देशांत इंडॉलॉजी हा प्रकार जोरात आहे तस्मात लय हस्तलिखिते आहेत. भारतात जे नाही ते बाहेर मिळण्याची शक्यता कमी आहे पण बाहेर जे आहे ते तुम्हाला विनासायास मिळू शकते, तुमचे रक्त आटवावे लागत नाही. भारतातही सर्व ठिकाणी त्रास होत नाही, पण काही मोठ्या संस्थांमध्ये इतके मूर्खपणाचे नियम आहेत की झक मारली आणि हस्तलिखिताची झेरॉक्स घ्यायला आलो असं वाटतं. यद्यपि मंडळासारख्या काही संस्थांत हा जाच तितकासा नाही.
9 Feb 2014 - 10:07 am | आनंदी गोपाळ
अनेक वेबसाईटस वर लावलेले कॅप्चा प्रकरण याच प्रकारचे असते. यातून विचित्रप्रकारे स्कॅन झालेल्या शब्दांचे स्पेलिंग क्राऊडसोर्स करून मिळवले जाते असे वाचनात आले आहे.
9 Feb 2014 - 9:52 pm | बॅटमॅन
येस! तसे असते.
7 Feb 2014 - 3:47 pm | सुहास झेले
अगदी अगदी... दोन्हीही प्रतिसाद उत्तम.
बॅटमन लिहायचे खूपच होते रे, पण म्हटलं चर्चेतून येऊ देत काही मुद्दे तुमच्यासारख्या जाणकारांकडून :)
7 Feb 2014 - 3:53 pm | बॅटमॅन
मग लिहायचे की राव. हाय काय नाय काय. :)
अन बलकवडे सर असतात ते स्टेशनजवळच्या आर्काईव्हमध्ये. ते मंडळात तुलनेने कमीच येतात.
7 Feb 2014 - 2:25 pm | llपुण्याचे पेशवेll
परंतु एकूण विक्षिप्तपणा पाहीला तर ते जाळणे तितकेसे अशक्य नाही वाटले. परंतु तरीही त्यामुळे त्यांच्या कार्याला कमीपणा येत नाही.
7 Feb 2014 - 4:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
मिपावरच्या विद्वान लोकांकडुन काय काय माहीतीचा खजिना बाहेर येतोय..लेखाएव्ह्ढेच प्रतिसाद जबरी
अभ्यास वाढवायला लागणार...:(
7 Feb 2014 - 6:03 pm | विकास
लेखाएव्ह्ढेच प्रतिसाद जबरी अभ्यास वाढवायला लागणार
अगदी सहमत! लेख आणि (विशेष करून बॅटमॅन यांचे) प्रतिसाद उत्कट आहेत. आपल्याला काय माहीती नाही हे कळायला देखील नशिब लागते. इतिहासाचार्यांच्या आणि इतिहास संशोधनाच्या परंपरेबाबत आज हे कळले इतकेच म्हणावेसे वाटते. :)
7 Feb 2014 - 6:11 pm | बॅटमॅन
राजवाड्यांबद्दल अजून एक कथा कायम सांगितली जाते-कुठल्यातरी सरदाराच्या वंशजाकडे ते कागदपत्रे मागण्यास गेले. त्याने नकार दिला, कदाचित अपमानही केला असावा. राजवाडे उठले आणि म्हणाले, "तुझ्याकडनं नाही मिळाली पत्रं तर तुझ्या विधवेकडून घेईन!" मग तो वरमला आणि पत्रे देऊ केली.
त्यांच्या घरची परिस्थिती फार खास नसावी, पण त्यांचे आजोबा की पणजोबा बहुतेक करून लोहगडाचे किल्लेदार होते.
त्यांचा स्वदेशीबद्दलचा आग्रह अजून एका गोष्टीत दिसतो. त्यांनी ठरवले असते तर भगवानलाल इंद्रजी, मिराशी, भाऊ दाजी, भांडारकर, इ. लोकांइतकेच भारतव्यापी लेव्हलला ते फेमस झाले असते. पण त्यांनी मुद्दामहून मराठीतच लिहिण्याचा निश्चय केला आणि तो कायम पाळला. लोकांना आपला इतिहास कळावयास हवा म्हणून ते आग्रहाने कायम आपले लेखन मराठीतच करीत असत. नुसते इतकेच नाही, तर लेखनात तिथ्याही इंग्रजी न वापरता शके अमुक तमुक आणि शुक्ल/वद्य तृतीया/चतुर्थी अशा थाटात लिहीत असत. त्यामुळे आज वाचणारास ते सगळे पचवणे त्रासाचे होते. त्यावर त्यांचे मत असे होते की 'बाकीच्यांना गरज वाटली तर ते वाचतील'. काहीसा एकारलेपणा आहे हा, पण चालायचंच तेवढं.
भूषण जसे शिवाजीमहाराजांबद्दल म्हणतो तसेच राजवाड्यांबद्दलही म्हणता येईलः
"अगर राजवाडे न होते तो अतीत मिटत मराठन की".
त्यांनी लिहिलेले/प्रकाशात आणलेले ग्रंथः
मराठ्यांच्या इतिहासाची साधने- २२ खंड अन त्यांपैकी प्रत्येक खंडाच्या आरंभी विस्तृत प्रस्तावना.
महिकावतीची बखर.
राधामाधवविलासचंपू.
जेधे शकावली.
ज्ञानेश्वरीची क्रिटिकल एडिशन.
महानुभाव ग्रंथ- त्यातही महंतांचा विश्वास संपादन करून, त्यांची कूटलिपी समजून घेऊन मग ग्रंथ लिप्यंतरित करणे इ.इ.
हे आणि अजूनही अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशात आणले नसते तर इतिहासाला त्याची खबरच कधी लागली नसती.
राजवाड्यांची तुलनाच करावयाची झाली, तर तमिऴनाडूतील स्वामिनाथन ऐयर यांच्याशी करता येईल. शिलप्पधिकारम, मणिमेगलाई इ. काव्ये प्रकाशात आणणारे ऐयर यांनी तमिऴ साहित्यासाठी तितकंच भरीव काम केलेलं आहे. पण गावोगाव हिंडून रद्दीच्या दुकानापर्यंत जाण्याची वेळ अय्यरसाहेबांवर आली नाही. त्या बाबतीत राजवाडे युनिक आहेत. अख्ख्या भारतभर त्यांच्या एकांड्या योगदानाशी क्वचितच कुणाशी तुलना करता येईल. महिकावतीच्या बखरीत किंवा अन्यत्र एके ठिकाणी राजवाडे म्हणतात, की इतकी कागदपत्रे आहेत की ती कालाच्या भक्ष्यस्थानी पडण्याअगोदर प्रकाशित करणे अगोदर महत्त्वाचे आहे. त्याचा अॅनॅलिसिस इ. करणे हे पुढच्या संशोधकांचे काम. अॅनॅलिसिसला त्यांनी 'मखलाशी' असा अंमळ अपमानजनक शब्द वापरला आहे. पण ते समजण्यासारखे आहे.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास नामक ४० पानांचे चोपडे वाचून स्कँडलाईझ होणार्या लोकांना हे समजणे अवश्यमेव आहे, की हे म्हणजे राजवाड्यांचे मुख्य योगदान नव्हेच नव्हे. ओमर खय्यामने टाईमपास म्हणून रुबाया लिहिल्या पण त्यामुळेच तो पुढे फेमस झाला. तद्वतच राजवाड्यांचे मुख्य काम हे नव्हे. त्यांची बुद्धी तीव्र होती, त्यामुळे बेधडक कुठल्याही क्षेत्रात घुसून तर्क लढवीत. शिक्षण मर्यादित झाले असल्याने ते तर्क पुढे रद्द करावे लागले तरी त्यांच्या बुद्धीची चमक त्यातून दिसते.
इतिहासात संशोधन करायचं तर प्राथमिक माहितीचे स्रोत मिळणे अवश्यमेव आहे. ते मिळाले अन त्यांच्या सत्यासत्यतेबद्दल पारखूननिरखून काहीएक निर्णय झाला, की मग टेक्श्च्युअल क्रिटिसिझम इ. प्रकार सुरू होतात. त्या सर्वांमुळे मूळ विदा गोळा करणाराचे योगदान झाकोळले जाते. पण हे कधीही विसरता कामा नये, की या लोकांनी अन्य लोकांना वाद घालण्यासाठी बेसिक विदा उपलब्ध करून दिला. असे लोक म्हणजे इतिहासकारांच्या गोत्राचे मूळपुरुष होत.त्यांचे ऋण अन्य कोणापेक्षाही मोठे आहे.
राजवाडे हे मराठ्यांचे काही पहिले इतिहासकार नव्हेत. ग्रँट डफचा इतिहास १८२६ सालीच लिहून तयार होता. त्यानंतर नीळकंठराव कीर्तने, चिपळूणकर, बाळकृष्ण, खरेशास्त्री, इ. लोक तयार होतेच. पण एंट्री अंमळ लेट करूनही त्यांनी जो अमिट ठसा उमटवला त्याला तोड नाही. आणि त्यांचा वारसा जपला गेला, त्यांच्यासारख्या संशोधकांची फळी तयार झाली, हे त्यांचं ऋण सर्वांत मोठं आहे.
7 Feb 2014 - 6:16 pm | अनुप ढेरे
मस्तं प्रतिसाद !
हे वाक्य आवडलं.
8 Feb 2014 - 9:33 am | प्रचेतस
ग्रँट डफला मराठी येत होतं का? म्हणजे त्याने जो मराठ्यांच्या आणि एकूणच तत्कालीन कालखंडाचा जो इतिहास लिहिला तो फक्त फारसी, मुघल, इंग्लीश, डच, पुर्तुगेज कागदपत्रे अभ्यासून का त्याबरोबरच शिवकालीन साधने, पेशवे दफ्तर आदींमधील मोडी कागदपत्रेसुद्धा अभ्यासली होती?
8 Feb 2014 - 3:35 pm | बॅटमॅन
आय थिंक येत होतं.
नारो भगवंत कुलकर्णी नामक पानिपताहून पळून आलेल्या कारकुनाची त्याने मुलाखत घेतली असे शेजवलकरांच्या पुस्तकात नमूद आहे. दुभाष्या घेतलाही असेल मदतीला पण अन्य उल्लेखांवरून वाटते की तो बहुतेक मराठी शिकला असावा. त्याने मराठी कागदपत्रे थोडी तरी नक्कीच अभ्यासली असणार, पण त्याचा इतिहास मी वाचला नाहीये. त्याच्याबद्दलची इतरांची टिप्पणी वाचून बोलतो आहे. त्याचा इतिहास वाचला की मग तुझ्या प्रश्नांची उत्तरे देता येतील.
8 Feb 2014 - 5:33 pm | प्रचेतस
धन्स रे.
बाकी मोडकंतोडकं मराठी येणं वेगळं आणि तत्कालीन कागदपत्रे समजून घेऊन इतिहास समोर मांडणं वेगळं.
ह्या ग्र्याण्ट डफच्या च्या हातून पुरेशा अस्सल कागदपत्रांअभावी काही ढोबळ चुकाही झाल्यात. ह्याने चक्क कवी कलाशानेच संभाजी राजांना फ़ितुरीने औरंगजेबाच्या हाती पकडून दिले असे लिहिलेले आहे. काही अखबारात तसा उल्लेख असल्याने ही चूक झाली असावी. पण अशा काही चुकांचा अपवाद वगळता डफ चे एक श्रेष्ठ इतिहासकार म्हणून मूल्य वादातीत आहेच.
8 Feb 2014 - 5:49 pm | बॅटमॅन
अर्थातच. तो पायोनियर असल्याने त्याच्याकडून चुका घडणे अपेक्षितच होते.
8 Feb 2014 - 6:07 pm | प्रचेतस
ते बाकी खरे.
8 Feb 2014 - 9:25 pm | माहितगार
ग्रँट डफ हि दोन्हीही आडनावेच ग्रँट हे स्वतःचे आणि डफ हे आजोळची जायदाद मिळाल्यामुळे घेतलेले त्याचे स्वत;चे नाव जेम्स होते. केवळ शालेय शिक्षण सोडून देऊनही त्याने चांगल यश संपादन केल तो सैनिक होता त्याने ब्रिटीशांकरता सैनिकी यशही संपादन केल पण त्या पेक्षा तो एक चांगला मुत्सद्दी डिप्लोमॅट असावा (हा माझा अंदाज).
एकीकडे पेशव्यांना हरवणार्या शेवटच्या लढाईत महत्वाचा रोल निभावला हे सैनिकी कार्य स्वतःच्या वरीष्ठांची चांगली मर्जी संपादन केली. सातार्याच्या छत्रपतींना विश्वासात घेण्याची मुत्सद्देगिरी दाखवली. सातार्यात त्याच्या सोबतीला ब्रिटीश माणूस एकच होता बाकी फलटण (सैन्य) भारतीय वंशाची होती. जेम्सला मराठी येत होती का नाही याचा स्पष्ट उल्लेख आढळला नाही पण त्या संबंधाने डॉ.अ.रा.कुलकर्णींनी सखोल अभ्यास करून त्याचे चरित्र लिहिले त्यात या बद्दल अधिक माहिती मिळेल असे वाटते.
भारतात आल्यावर त्याने फार्सीवर प्रभूत्व मिळवल्याने त्याचे मुंबई आणि गुजराथेत फारसे अडले नसावे पण पश्चिम महाराष्ट्रात दैनंदीन जीवन हिंदूस्थानी अथवा उर्दूच्या बळावर खूप सहज निभावणे सहज शक्य झाले असावे असे वाटत नाही. भारतात अधिकार्यांना पाठवण्यापुर्वी इस्ट इंडिया कंपनी इंग्लंडातच राजरोस भारतीय भाषांचे आणि बहुधा संस्कृताचे शिक्षण देऊनच पाठवत असावी पण या जेम्स बाबाने महाविद्यालयीन शिक्षणही घेतले नव्हते. पुस्तक लेखनाकरता कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर त्याने इंग्रजीत अनुवादीत करून घेतली होती याचा उल्लेख त्याच्या पुस्तकातच येतो.
अगदी युद्धात राजकारणात मराठ्यांना परास्त करणार्या माणसा करता ते त्याचे तसे शत्रुच पण त्याच मराठ्यांचा इतिहास लिहितानाना त्याने त्याचा अभिनिवेश फारसा आड न येऊ देता तट्स्थ पणाने करून इतिहास लेखनास त्याच्या मर्यादेत झेपेल तेवढा न्याय देण्याचा तटस्थतेचा प्रयत्न केला आहे. त्याचे पुस्तक पुर्ण वाचले नाही. पण पुस्तक लेखनात विनम्रता तटस्थता जपण्याचा प्रयत्न करणारा हा ग्रँट डफ पुस्तक प्रस्तावानेत केवळ ब्रिटीश अधिकार्यांचेच आभार प्रदर्शन करताना दिसतो सातार्यात केवळ एका ब्रिटीश माणसासोबत राहणार्या माणसाचे नेटीव्ह भारतीय माणसां शिवाय चालणे शक्य नाही पण तरीही तोंडदेखले आभारप्रदर्शन पण नाही हे नोंद घेण्या साराखे वाटले.
8 Feb 2014 - 11:50 pm | बॅटमॅन
प्रतिसाद आवडला. बरीच माहिती नव्याने कळाली.
8 Feb 2014 - 9:54 pm | माहितगार
केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशात " [डफच्या इतिहास प्रस्तावना; भा. सं. मं. त्रैमासिक व. ४ जोडअंक; राजवाडे खंड, १ प्रस्तावना.]." हा संदर्भ देऊन ग्रँट डफ बद्दल टिका अंतर्भूत केली आहे.
8 Feb 2014 - 11:43 pm | प्रचेतस
ग्रँट डफच्या माहितीबद्दल धन्यवाद.
9 Feb 2014 - 4:05 pm | माहितगार
चर्चेच्या विषयानुरूप फक्त संदर्भा करता नोंदवून ठेवतोय East India Company College ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या स्थापने पासून त्यामानाने उशीरा म्हणजे १८०६ मध्ये सुरू झाले.पूर्ण डीटेल्स नाहीत पण सुरवातीस पर्शीयन/उर्दू बंगाली इत्यादी भाषा शिकवल्या जात असाव्यात त्यात नंतर संस्कृतची भर पडली. पण संस्कृत असल्यामुळे मराठीचा वेगळा समावेश सुरवातीच्या काळाततरी आणि नंतरही असण्याची शक्यता कमी वाटते.
संस्कृत करता १९३२ नंतर ऑक्सफर्ड विद्यापिठात वेगळी चेअर सुरू झाली होती या चेअरचा अधिकृत उद्देश अॅडमिनीस्ट्रेशनच्या पलिकडे होता चेअर स्पॉन्सर जोसेफ बॉडेनच्याच शब्दात " Shanskreet [sic] language, at or in any or either of the Colleges in the said University, being of opinion that a more general and critical knowledge of that language will be a means of enabling my countrymen to proceed in the conversion of the natives of India to the Christian Religion, by disseminating a knowledge of the Sacred Scriptures amongst them, more effectually than all other means whatsoever."[1] Lieutenant Colonel Joseph Boden, after whom the " या चेअरच्या प्रोफेसरची बाजाप्ता विद्यार्थ्यांच्या मतांवर निवडणूक होत असे आणि त्या निवडणूक मतदानाला ट्रेनने विद्यार्थी भरभरून न्यावेत एवढा राजकीय रंगही चढत असे . Boden Professor of Sanskrit election, 1860 हे त्याच क्लासिक उदाहरण होत. नंतरच्या काळात पंडीता रमाबाईंना सुद्धा तेथील विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यासाठी इंग्लंडला नेण्यात आल होत. अर्थात या संस्कृतचेअरचा अॅडमिनीस्ट्रेटर्स ना संस्कृत मुळे कोणतीही भारतीय भाषा सहज शिकण्यात उपयोग झाला असावा संस्कृत शिकण्याचा ख्रिश्चन धर्मप्रसारा करता उपयोग हा मुद्दा तेथील लोकांच्या भावनांना फुंकर घालण्या पलिकडे आणि बायबलच्या भारतीय भाषांतरा करता शब्दकोश बनवण्या पलिकडे भारतात फारसा उपयोगी पडला असावा असे वाटत नाही (हे माझे मत).
9 Feb 2014 - 4:29 pm | माहितगार
पहिल्या विस्तृत मराठी शब्द कोशकर्ता मोल्सवर्थ याचही पहील नाव जेम्सच आणि हाही जेम्स ग्रँटडफ चा समकालीन या मोल्सवर्थचा एक सम्कालीन साथीदार म्हणजे थॉमस कँडी यानी मराठी भाषेच्या शालेय व्याकरणावर आणि तत्कालीन सरकारच्या मराठी भाषा धोरणावर एवढा (हट्टी) प्रभाव टाकला की स्थानिक व्याकरणकार त्याच्या शुद्धलेखन नियमांच्या हट्टाला दबकून असत.
10 Feb 2014 - 3:24 pm | सुनील
"तुम्ही मेल्यानंतर तुमची विधवा रद्दीवाल्याला विकेल तेव्हा मी घेईन"
(श्रेय वि.द.घाटे)
10 Feb 2014 - 3:27 pm | बॅटमॅन
ओह अच्छा, धन्यवाद!!
बादवे वि द घाटे म्हणजे हे वाक्य 'दिवस असे होते' मधले आहे काय? लै सुंदर पुस्तक हो.
10 Feb 2014 - 3:33 pm | सुनील
नै. सदर वाक्य त्यांच्या मनोगते ह्या पुस्तकातील राजवाड्यांवरील लेखात आहे. अर्थात वाक्य आठवणीतूनच लिहिले आहे कारण पुस्तक वाचून लै वर्षे झालीत. हे पुस्तकदेखिल छानच!
10 Feb 2014 - 3:36 pm | बॅटमॅन
मनोगते यू से..हे पुस्तक माहिती नव्हते. आता वाचेन नक्की!
7 Feb 2014 - 6:25 pm | सुहास झेले
बॅटमॅन, भारीच रे...खूप माहिती दिलीस. लिह की लेका यावर मग वेळातवेळ काढून :)
7 Feb 2014 - 6:31 pm | बॅटमॅन
बघू कधी वेळ होतो ते...एकदा ट्रोजन सेरीज पूर्ण झाली की मग नक्की पाहीन. :)
7 Feb 2014 - 6:29 pm | प्यारे१
बॅट्याचे सगळे प्रतिसाद आवडले.
7 Feb 2014 - 6:38 pm | आदूबाळ
मलापण
प्रतिसाद वाचनखुणेत टाकायची सोय पाहिजे असं वाटतं अशा वेळी.
8 Feb 2014 - 1:05 am | अर्धवटराव
साला हे बॅट्या, वल्ली, माहितीगार वगैरे मंडळी मिपावर आहेत... शक्य तेव्हढं लिखाण करतातच ते... पण आपल्याला अजुन बरच काहि काढायला लागणार त्यंच्या पोतडीतुन.
इतरही तज्ञ मंडळी आहेत मिपावर. आहे त्यापेक्षा बरीच मोठी वैचारी श्रीमंतीची पातळी गाठायला हवी आता मिपाने.
8 Feb 2014 - 2:39 am | विकास
सहमत
8 Feb 2014 - 4:00 am | मदनबाण
सहमत ! :)
14 Feb 2014 - 11:45 pm | उगा काहितरीच
+3
8 Feb 2014 - 10:59 am | मृत्युन्जय
बॅट्या ची बॅटिंग प्रचंड आवडल्या गेली आहे. साला मिपाचा राजवाडे आहे हा.
8 Feb 2014 - 1:03 pm | राही
बॅट्मॅन यांचे आणि इतरांचेही प्रतिसाद आवडले.
संशोधकांच्या एकारलेपणाविषयी असे म्हणता येईल की आपल्या आवडीच्या कामासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी आयुष्यातल्या इतर अनेक गोष्टींकडे, ज्या सर्वसामान्यांना महत्त्वाच्या वाटतात, त्यांच्याकडे पाठ फिरवलेली असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसे त्यांना 'कळपाबाहेरचा' मानून विक्षिप्त ठरवतात. अशा लोकांना त्यांच्या संशोधनविषयातली छोटीशी गोष्टसुद्धा महत्त्वाची वाटते. दगड, रद्दी, जुन्यापान्या वस्तू गोळा करणारा माणूस विक्षिप्तच ठरणार. शिवाय त्यांच्या निदिध्यासाच्या विषयाबद्दल इतरांकडून दाखवली जाणारी पराकोटीची अनास्था त्यांना कधीकधी वैफल्यग्रस्त करते.
भगवानलाल इंद्रजींनी त्यांच्या मृत्युपत्रात असे लिहून ठेवले होते की त्यांचे कोणतेही अंत्यविधी करू नयेत. त्यांनी त्यांच्या हयातीतच स्वतःचे श्राद्ध किंवा तत्सम विधी उरकून टाकले होते! सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी एका गृहस्थ माणसाच्या -सन्यासी नव्हे- या कृत्याने त्यांच्या नागर ब्राह्मण जातीत किती खळबळ उडाली असेल याची आज आपल्याला कल्पनाही येणार नाही.
8 Feb 2014 - 3:40 pm | बॅटमॅन
आयला, जितेपणीच श्राद्ध????? खतराच प्रकार आहे हा तर!!!!
8 Feb 2014 - 5:15 pm | विकास
संन्यास घेताना असे करण्याची प्रथा आहे. राही यांच्या प्रतिसादावरून त्यांनी संन्यास म्हणजे भगवी वस्त्रेवाला संन्यास घेतला नसावा. पण त्यांच्या लेखी तो संन्यासच असावा.
8 Feb 2014 - 5:17 pm | बॅटमॅन
ओह अच्छा. हे माहिती नव्हते.
10 Feb 2014 - 10:55 pm | वाटाड्या...
"संन्यास घेताना" स्वतः च्या हाताने स्वतः श्राद्ध घालावे लागते...आयला काय जोरदार चर्चा चालु आहे. रामदास काकांच्या लेखनानंतर बर्याच काळाने मजा येत आहे.
11 Feb 2014 - 11:43 am | llपुण्याचे पेशवेll
अजून एक. संन्याश्याच्या प्रेतावर अंतिम संस्कार करत नाहीत. कारण वस्तुतः संन्याश्यानं आपली ओळख आधीच त्यागलेली असते आणि स्वतःच्या जुन्या ओळखीचा अंत्यसंस्कारही आधीच केलेला असतो. म्हणून जर संन्याश्याने समाधी लावून देह त्यागला असेल तर नाडीपरीक्षा झाल्यावर अणूकुचीदार वस्तूने (मुख्यत्वे शंखाने) त्या पार्थिवाच्या टाळूवर (जिथे ब्रम्हरंध्र असते (अशी माझी श्रद्धा आहे आणि तसे मानण्याची इतरांस सक्ती नाही)) प्रहार करून प्राणोत्क्रमण झाल्याची खात्री केली जाते. मग तो देह नदीत सोडून देतात. दहन करत नाहीत. (काही अपवाद असू शकतात जर नदी जवळ नसेल तर भडाग्नि दिलाही असेल).
8 Feb 2014 - 4:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
बॅटमन, वल्ली, माहितीगार एट अॅल... एकत्र जमून काही एक प्रकल्प हाती घ्याच.
8 Feb 2014 - 5:48 pm | सुधीर
सुंदर लेख आणि तितकेच सुंदर प्रतिसाद!
8 Feb 2014 - 6:08 pm | जेपी
सगळेच प्रतिसाद आवडले .
9 Feb 2014 - 9:48 am | किसन शिंदे
बॅट्या आणि माहीतगार यांचे एकुण एक प्रतिसाद अतिशय वाचले. अतिशय माहीतीपुर्ण!!