✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ...

स
सुहास झेले यांनी
Wed, 02/05/2014 - 15:32  ·  लेख
लेख
जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता. नेमके २०१४ हे वर्ष राजवाड्यांचे १५० वे जन्मवर्षदेखील आहे आणि हाच योग साधून इतिहास प्रेमींसाठी, ह्या अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. मी इतिहासाचा इतका अभ्यासू नाही, जशी जशी माहिती मिळाली ती संग्रही ठेवत गेलो. आणि शिकत गेलो. श्री. निनादराव बेडेकर, श्री. पांडुरंगजी बलकवडे आणि डॉ. सदाशिव शिवदे, हे ह्या अभ्यासवर्गाचे मान्यवर वक्ते होते. आजच्या अभ्यासवर्गानंतर मला मिळालेली माहिती, तिथे उपस्थित असलेल्या मान्यवर वक्त्यांनी राजवाड्यांची आणि त्यांच्या विपुल संशोधनाची आम्हाला करून दिलेली ओळख, इथे थोडक्यात मांडत आहे. जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग.  स्थळ - साठ्ये महाविद्यालय जनसेवा समिती आयोजित अभ्यासवर्ग. स्थळ - साठ्ये महाविद्यालय[/caption] विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, ह्यांचा जन्म २४ जून १८६३ वरसई ह्या कोकणातला छोटेखानी गावातला. (ह्या जन्म तारखेबद्दल काहींचे दुमत आहे, सर्वसामान्य इतिहासाप्रमाणे ही तारीख १२ जुलै १८६३ आहे). १८९० मध्ये बी. ए. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्यांनी न्यूइंग्लिश स्कूलमध्ये नोकरी स्वीकारली आणि मग पुढे अडीच वर्षांनी ती नोकरी सोडली. त्यांचा विवाह १८८९ मध्ये झाला होता, परंतु १८९२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक साहित्याचा आणि साधनांचा शोध घेणे सुरु केले. त्यांच्या मते इतिहासाबद्दल संशोधन करणे म्हणजे, त्यासंबंधीची कागदपत्रे आधी जमवणे आणि त्यावरून इतिहास पुराव्यानिशी लोकांसमोर मांडणे. ह्यासाठी त्यांनी अखंड भटकंती सुरु केली. दऱ्याखोऱ्यात प्राचीन अवशेष पाहत व देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विविध दप्तरातून, त्यांनी महत्वाची कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली. त्यांचा हा निश्चय इतका दांडगा होता की, पार काबूलपर्यंत त्यांनी ही शोधमोहीम हाती घेतली होती. आता इतकी भटकंती करणे, कागद पुरावे जमा करणे, लोकांना त्या कागदांचे महत्त्व पटवून ते आपल्या ताब्यात घेणे, मग त्याची नीट वर्गवारी करणे, कोणी कागद देण्यास मनाई केल्यास, ते कागद जसेच्यातसे नकलून घेणे..हे सर्व प्रचंड कष्टाचे आणि जिकरीचे काम होते.. आणि ह्या कामात पैसा ही लागणारच. त्यासाठी त्यांना काही संस्थानिकांना मदत मागितली, पण कोणी त्यांना मदत देऊ केली नाही. नंतर काहीजण पुढे झाले, पण तोवर आपल्या पदरचे पैसे टाकून..घरदार, भांडीकुंडी विकून, ते आपला हा धंदा (हो...संशोधन कार्याला ते धंदा असेच संबोधत असे) मनापासून करत राहिले. हे सर्व करत असताना त्यांचे विविधांगी लेखन ही सुरु होतेच. सार्थ, ग्रंथमाला, विश्वृत्त, सरस्वती मंदिर, प्राचीप्रभा इत्यादी नियतकालिकांतून ते सतत आपले विचार मांडत राहिले. इतिहास हा कल्पित नसतो, तो कागदपत्रांवर अवलंबून असतो. हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्यांच्या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत असा की, "अस्सल कागदपत्राचं एक चिठोरं, अवघ्या बखरींचं बहुमत हाणून पडायला समर्थ आहे". त्यांनी अखंड संशोधनकरून जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, "मराठ्यांच्या इतिहासाची साधने" शीर्षकाचे अस्सल मराठी बावीस खंड त्यांनी प्रसिध्द केले (१८९८-१९१७). ह्या पैकी नऊ खंडांना त्यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिल्या आहेत. निनादराव ह्यांनी त्यांची ओळख करताना राजवाड्यांच्या प्रस्तावनेचा आवर्जून उल्लेख करतात. ही खंडाची मांडणी आणि त्यात दिलेला पत्र व्यवहार सलग नाही अशी त्यांच्यावर टीकाही झाली. जस जसे त्यांचे संशोधन होत गेले, तसेतसे ते खंड प्रकाशित करत गेले आणि लोकांना, इतिहासकारांना त्यावर चर्चा, टीका करण्यास भाग पाडले, जेणेकरून त्या चर्चेतून, टिकेतून इतिहासाची खरी ओळख समोर यावी. त्यापुढे १९२२ आणि १९२४ ह्या साली राधा माधव विलास चंपू आणि महिकावतीची बखर हे दोन ग्रंथ संपादून छापले. ह्या दोन्ही ग्रंथांनासुद्धा मोठ्या विवेचक प्रस्तावना त्यांनी जोडल्या. ज्ञानेश्वरीची फार जुनी हस्तलिखित पोथी, संस्कृत भाषेचा उलगडा, महाराष्ट्राचा वसाहत काल असे काही त्यांनी संपादिलेले ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिध्द झाले. राजवाड्यांनी लिहिलेल्या लेखांचे आणि प्रस्तावनेचे काही खंड शं,ना जोशी ह्यांनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. तसेच धुळ्याच्या संशोधक अंकामधून त्यांचे समग्र स्फुट लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांनी नुसता इतिहास लोकांसमोर मांडला नाही, तर त्याची त्यांच्या शब्दात कारणमीमांसादेखील केली. जी त्यांनी प्रस्तावना आणि लेखरुपात वेळोवेळी मांडली. राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधणे जमवण्यासाठी केलेला खटाटोप अगदी विलक्षण आहे. अस्सल आणि अमुल्य कागदपत्रे त्यांनी देशाच्या विविध भागातून जमा केली होती आणि त्यासाठी त्यांना काय काय करावे लागले ह्याचे काही उदाहरण देण्याचे झाल्यास... महाराजांच्या दक्षिण दिग्विजय ह्या मोहिमे अंतर्गत कर्नाटकात बिलवडी इथे, एका स्थानिक पाळेगर देशमुख बाईने स्वराज्यात सामील व्हावे, म्हणून मराठ्यांनी तिच्या गढीवर हल्ला केला होता. तिने त्याचा कडवा प्रतिकार केला. महाराजांना ही गोष्ट कळल्यावर, त्यांनी देशमुख बाईला बहिण मानून, तिची पुनर्स्थापना केली आणि तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्यानां शिक्षा केली. त्याचे ऋण म्हणून, तिने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे स्थापन केली. ही माहिती मिळाल्यावर तिथे काही कागदपत्रे नक्की मिळतील, म्हणून राजवाड्यांनी धाव घेतली. ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा, ती गढी अगदी पडक्या स्वरुपात होती आणि तिथे एक विधवा म्हातारी राहत होती. तिला त्यांनी त्या वळचणीला पडलेल्या कागदपत्रांची मागणी केली. तिला म्हातारीला कळले की त्यात नक्की काही महत्त्वाचे असणार. तिने त्यासाठी नकार दिला आणि त्या कागदांच्या मोबदल्यात राजवाड्यांना स्वतःची धुणीभांडी, स्वयंपाक आणि सेवा करायला लावली. राजवाड्यांनी ती अगदी मनापासून विनातक्रार केली आणि तीन दिवसांनी त्या म्हातारीला लाज वाटून, तिने ती गाठोडी राजवाड्यांच्या हवाली केली. अजून एक प्रसंग सांगायचा झाल्यास, राजवाडे पैठणला किराणामालाच्या दुकानात काही सामानाची खरेदी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी पहिले की तो दुकानदार ज्या कागदात सामान बांधून देत होता, ती मोडी लिपीतली कागदपत्रे होती. दुकानदाराने त्या "मोडी रद्दीच्या" बदल्यात तितकीच रद्दी मागितली आणि ती राजवाड्यांनी विकत आणून त्या दुकानदारास दिली आणि ते लाखमोलाचे कागद मिळवले. ह्या कागदपत्रांमध्ये सापडलेले महत्वाचे असे काही उल्लेख करायचे झाल्यास - १७५२ ला कनोजला झालेल्या अहमदी तहाची प्रत खंड क्रमांक १ मध्ये प्रसिद्ध केली आहे आणि त्यात मराठ्यांना संपूर्ण हिंदुस्थानच्या चौथाईचा अधिकार आणि मुघल बादशाहने अब्दालीपासून देशाचे रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांना दिली होती हे नमूद केलेले आहे. तसेच खंड एक मध्ये पानिपतच्या युद्धाच्या आधीची आणि त्या मोहिमेदरम्यान सुरु असलेल्या पत्र व्यवहारातील ३०० पत्रे प्रकाशित केली आहेत. तसेच १७५७ मध्ये शिवनेरी किल्ला मिळवण्यासाठी सलाबतजंगाबरोबर झालेल्या तहाची बोलणी आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. नानासाहेब आणि शाहूमहाराज ह्यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहारदेखील प्रकाशित केला गेला. खंड दोनमध्ये विस्तृत पेशवे शकावली आहे. जंजिरा मोहीम, उदगीर स्वारी, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या संस्थानाची व्यवस्था, वसई किल्ला मोहीम, हसबनीस नियुक्तींची पत्रे, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, संभाजी राज्यांची पत्रे, राजाराम महाराजांची पत्रे, शहाजी महाराजांची पत्रे, असे नानाविध कागद त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या ह्या अपार संशोधन कार्याने प्रेरित होऊन, इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांची एक फळी निर्माण महाराष्ट्रात निर्माण झाली. ज्यामुळे इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. हे संशोधन करत असताना १९१० ला पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना राजवाड्यांनी केली. त्यांचा विश्वास होता की कुठल्याही कार्यसिद्धीसाठी संघटना, ही गरजेचीच आणि त्यामुळेच ह्या संशोधक मंडळाची स्थापना झाली. समविचारी माणसे एकत्र आली, की कार्यसिद्धीस लवकर जाते. त्यांनंतर अनेक समविचारी, इतिहासकार संशोधन कार्याकडे वळू लागले. राजवाडे हे एका दीपस्तंभासारखे इतर इतिहासकारांना त्याकाळी प्रेरणा देत राहिले आणि आजही देत आहेत. याच भारतीय इतिहास संशोधक मंडळात आज लाखो मोडी कागदपत्रे पडून आहेत, ज्यांचा अभ्यास करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मोडी जाणकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि काही ५० वर्षांनी कोणी मोडी जाणकार उरणारदेखील नाहीत. तेव्हा ह्या कागदांना काही किंमत उरणार नाही. आज आपण इतिहास विविध संवादाने भरलेल्या कादंबरीरूपाने वाचतो. काही संदर्भ न देता...आपण मोठे जाणते इतिहासकार म्हणून स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेणारे चिक्कार आहेत. त्यांनी लिहिलेला-मांडलेला, हाच इतिहास असे आजच्या पिठीला वाटत आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या १०-१२ आवृत्या सहज खपतात, पण पुराव्यानिशी कागदपत्रांचे दिलेले खंड आवृत्ती क्रमांक १ आजही मंडळात धूळखात पडून आहे, ही मोठी शोकांतिका आहे. नुसते इतिहासात रमून जायला मी सांगत नाही, पण त्या इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अगदी आजच्या जीवन पद्धतीतही. एक छंद म्हणून तरी किमान मोडीचा अभ्यास तरुणाईने केला, तरी खूप झाले असे काकुळतीने बलकवडे सर सांगत होते. हा अभ्यासवर्ग माझ्यासारख्या नवशिक्याला नक्कीच मोलाची माहिती देऊन गेला. एका थोर संशोधकाची, मला झालेली ही आजवरची सर्वोत्तम ओळख आहे. त्यासाठी जनसेवा समिती आणि मान्यवर वक्त्यांचे खूप खूप आभार. डावीकडून - प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे डावीकडून - प्रा. मोहनराव आपटे, श्री. निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिव शिवदे आणि श्री. पांडुरंगजी बलकवडे[/caption] राजवाड्यांनी केलेल्या अपार संशोधन कार्यामुळे निदान ४५०० पत्रे तरी आपल्याला देवनागरीत लिप्यांतर करून उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांचे संबध आयुष्य इतिहासाच्या संशोधन कार्याला वेचले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी फकिरी घेतली तशीच राजवाड्यांनी राष्ट्रीय स्मृतीसंचालनासाठी तशीच फकिरी घेतली. मराठ्यांच्या इतिहासाच्या या महान भाष्यकाराला आणि एक अद्वितीय संशोधकाला मन:पुर्वक दंडवत !! - सुझे !! -------------------------------------------------------------- लेखन संदर्भ आणि इतर काही महत्त्वाचे १. कार्यक्रमात दिलेली माहिती पुस्तिका [लेखक सदाशिव आठवले] (ही माहिती कौस्तुभ कस्तुरे ह्याने, आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिली) २. मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलेले विविध संदर्भ. ३. मोडी शिकण्यासाठी काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास कौस्तुभशी संपर्क करावा. कौस्तुभचे अजून एक महत्त्वाचे सांगायचे झाल्यास त्याने पेशवाई विषयवार विविधांगी लेखन केले आहे. त्याच्या ब्लॉगवर इतिहासाची सुवर्णपाने इथे उपलब्ध आहे आणि तसेच त्याने असंख्य मोडी पात्रांचे लिप्यांतरदेखील केलेले आहे. जरूर वाचा !! ४. पानिपत ह्या विषयवार अनेक ग्रंथ, पुस्तके आजवर येऊन गेलीत. ह्या विषयावर हल्लीच प्रकाशित झालेले पुस्तक Solstice At Panipat: 14 January 1761 हे उजवे आहे असे निनादरावांनी सांगितले. ५. पानिपतचा महासंग्रमाबद्दल झालेल्या अभ्यासवर्गाच्या काही नोंदी मागे मी ब्लॉगवर इथे दिल्या आहेत. ६. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा ऑनलाईन वाचनास उपलब्ध आहे - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ वा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
29415 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

मग लिहायचे की राव. हाय काय

बॅटमॅन
Fri, 02/07/2014 - 15:53 नवीन
मग लिहायचे की राव. हाय काय नाय काय. :) अन बलकवडे सर असतात ते स्टेशनजवळच्या आर्काईव्हमध्ये. ते मंडळात तुलनेने कमीच येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

विक्षिप्तपणा

llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/07/2014 - 14:25 नवीन
परंतु एकूण विक्षिप्तपणा पाहीला तर ते जाळणे तितकेसे अशक्य नाही वाटले. परंतु तरीही त्यामुळे त्यांच्या कार्याला कमीपणा येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयला

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 02/07/2014 - 16:02 नवीन
मिपावरच्या विद्वान लोकांकडुन काय काय माहीतीचा खजिना बाहेर येतोय..लेखाएव्ह्ढेच प्रतिसाद जबरी अभ्यास वाढवायला लागणार...:(
  • Log in or register to post comments

+१

विकास
Fri, 02/07/2014 - 18:03 नवीन
लेखाएव्ह्ढेच प्रतिसाद जबरी अभ्यास वाढवायला लागणार अगदी सहमत! लेख आणि (विशेष करून बॅटमॅन यांचे) प्रतिसाद उत्कट आहेत. आपल्याला काय माहीती नाही हे कळायला देखील नशिब लागते. इतिहासाचार्यांच्या आणि इतिहास संशोधनाच्या परंपरेबाबत आज हे कळले इतकेच म्हणावेसे वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

राजवाड्यांबद्दल अजून एक कथा

बॅटमॅन
Fri, 02/07/2014 - 18:11 नवीन
राजवाड्यांबद्दल अजून एक कथा कायम सांगितली जाते-कुठल्यातरी सरदाराच्या वंशजाकडे ते कागदपत्रे मागण्यास गेले. त्याने नकार दिला, कदाचित अपमानही केला असावा. राजवाडे उठले आणि म्हणाले, "तुझ्याकडनं नाही मिळाली पत्रं तर तुझ्या विधवेकडून घेईन!" मग तो वरमला आणि पत्रे देऊ केली. त्यांच्या घरची परिस्थिती फार खास नसावी, पण त्यांचे आजोबा की पणजोबा बहुतेक करून लोहगडाचे किल्लेदार होते. त्यांचा स्वदेशीबद्दलचा आग्रह अजून एका गोष्टीत दिसतो. त्यांनी ठरवले असते तर भगवानलाल इंद्रजी, मिराशी, भाऊ दाजी, भांडारकर, इ. लोकांइतकेच भारतव्यापी लेव्हलला ते फेमस झाले असते. पण त्यांनी मुद्दामहून मराठीतच लिहिण्याचा निश्चय केला आणि तो कायम पाळला. लोकांना आपला इतिहास कळावयास हवा म्हणून ते आग्रहाने कायम आपले लेखन मराठीतच करीत असत. नुसते इतकेच नाही, तर लेखनात तिथ्याही इंग्रजी न वापरता शके अमुक तमुक आणि शुक्ल/वद्य तृतीया/चतुर्थी अशा थाटात लिहीत असत. त्यामुळे आज वाचणारास ते सगळे पचवणे त्रासाचे होते. त्यावर त्यांचे मत असे होते की 'बाकीच्यांना गरज वाटली तर ते वाचतील'. काहीसा एकारलेपणा आहे हा, पण चालायचंच तेवढं. भूषण जसे शिवाजीमहाराजांबद्दल म्हणतो तसेच राजवाड्यांबद्दलही म्हणता येईलः "अगर राजवाडे न होते तो अतीत मिटत मराठन की". त्यांनी लिहिलेले/प्रकाशात आणलेले ग्रंथः मराठ्यांच्या इतिहासाची साधने- २२ खंड अन त्यांपैकी प्रत्येक खंडाच्या आरंभी विस्तृत प्रस्तावना. महिकावतीची बखर. राधामाधवविलासचंपू. जेधे शकावली. ज्ञानेश्वरीची क्रिटिकल एडिशन. महानुभाव ग्रंथ- त्यातही महंतांचा विश्वास संपादन करून, त्यांची कूटलिपी समजून घेऊन मग ग्रंथ लिप्यंतरित करणे इ.इ. हे आणि अजूनही अनेक ग्रंथ त्यांनी प्रकाशात आणले नसते तर इतिहासाला त्याची खबरच कधी लागली नसती. राजवाड्यांची तुलनाच करावयाची झाली, तर तमिऴनाडूतील स्वामिनाथन ऐयर यांच्याशी करता येईल. शिलप्पधिकारम, मणिमेगलाई इ. काव्ये प्रकाशात आणणारे ऐयर यांनी तमिऴ साहित्यासाठी तितकंच भरीव काम केलेलं आहे. पण गावोगाव हिंडून रद्दीच्या दुकानापर्यंत जाण्याची वेळ अय्यरसाहेबांवर आली नाही. त्या बाबतीत राजवाडे युनिक आहेत. अख्ख्या भारतभर त्यांच्या एकांड्या योगदानाशी क्वचितच कुणाशी तुलना करता येईल. महिकावतीच्या बखरीत किंवा अन्यत्र एके ठिकाणी राजवाडे म्हणतात, की इतकी कागदपत्रे आहेत की ती कालाच्या भक्ष्यस्थानी पडण्याअगोदर प्रकाशित करणे अगोदर महत्त्वाचे आहे. त्याचा अ‍ॅनॅलिसिस इ. करणे हे पुढच्या संशोधकांचे काम. अ‍ॅनॅलिसिसला त्यांनी 'मखलाशी' असा अंमळ अपमानजनक शब्द वापरला आहे. पण ते समजण्यासारखे आहे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास नामक ४० पानांचे चोपडे वाचून स्कँडलाईझ होणार्‍या लोकांना हे समजणे अवश्यमेव आहे, की हे म्हणजे राजवाड्यांचे मुख्य योगदान नव्हेच नव्हे. ओमर खय्यामने टाईमपास म्हणून रुबाया लिहिल्या पण त्यामुळेच तो पुढे फेमस झाला. तद्वतच राजवाड्यांचे मुख्य काम हे नव्हे. त्यांची बुद्धी तीव्र होती, त्यामुळे बेधडक कुठल्याही क्षेत्रात घुसून तर्क लढवीत. शिक्षण मर्यादित झाले असल्याने ते तर्क पुढे रद्द करावे लागले तरी त्यांच्या बुद्धीची चमक त्यातून दिसते. इतिहासात संशोधन करायचं तर प्राथमिक माहितीचे स्रोत मिळणे अवश्यमेव आहे. ते मिळाले अन त्यांच्या सत्यासत्यतेबद्दल पारखूननिरखून काहीएक निर्णय झाला, की मग टेक्श्च्युअल क्रिटिसिझम इ. प्रकार सुरू होतात. त्या सर्वांमुळे मूळ विदा गोळा करणाराचे योगदान झाकोळले जाते. पण हे कधीही विसरता कामा नये, की या लोकांनी अन्य लोकांना वाद घालण्यासाठी बेसिक विदा उपलब्ध करून दिला. असे लोक म्हणजे इतिहासकारांच्या गोत्राचे मूळपुरुष होत.त्यांचे ऋण अन्य कोणापेक्षाही मोठे आहे. राजवाडे हे मराठ्यांचे काही पहिले इतिहासकार नव्हेत. ग्रँट डफचा इतिहास १८२६ सालीच लिहून तयार होता. त्यानंतर नीळकंठराव कीर्तने, चिपळूणकर, बाळकृष्ण, खरेशास्त्री, इ. लोक तयार होतेच. पण एंट्री अंमळ लेट करूनही त्यांनी जो अमिट ठसा उमटवला त्याला तोड नाही. आणि त्यांचा वारसा जपला गेला, त्यांच्यासारख्या संशोधकांची फळी तयार झाली, हे त्यांचं ऋण सर्वांत मोठं आहे.
  • Log in or register to post comments

मस्तं प्रतिसाद !

अनुप ढेरे
Fri, 02/07/2014 - 18:16 नवीन
मस्तं प्रतिसाद !
पण हे कधीही विसरता कामा नये, की या लोकांनी अन्य लोकांना वाद घालण्यासाठी बेसिक विदा उपलब्ध करून दिला.
हे वाक्य आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ग्रँट डफचा इतिहास १८२६ सालीच

प्रचेतस
Sat, 02/08/2014 - 09:33 नवीन
ग्रँट डफचा इतिहास १८२६ सालीच लिहून तयार होता
ग्रँट डफला मराठी येत होतं का? म्हणजे त्याने जो मराठ्यांच्या आणि एकूणच तत्कालीन कालखंडाचा जो इतिहास लिहिला तो फक्त फारसी, मुघल, इंग्लीश, डच, पुर्तुगेज कागदपत्रे अभ्यासून का त्याबरोबरच शिवकालीन साधने, पेशवे दफ्तर आदींमधील मोडी कागदपत्रेसुद्धा अभ्यासली होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आय थिंक येत होतं.

बॅटमॅन
Sat, 02/08/2014 - 15:35 नवीन
आय थिंक येत होतं. नारो भगवंत कुलकर्णी नामक पानिपताहून पळून आलेल्या कारकुनाची त्याने मुलाखत घेतली असे शेजवलकरांच्या पुस्तकात नमूद आहे. दुभाष्या घेतलाही असेल मदतीला पण अन्य उल्लेखांवरून वाटते की तो बहुतेक मराठी शिकला असावा. त्याने मराठी कागदपत्रे थोडी तरी नक्कीच अभ्यासली असणार, पण त्याचा इतिहास मी वाचला नाहीये. त्याच्याबद्दलची इतरांची टिप्पणी वाचून बोलतो आहे. त्याचा इतिहास वाचला की मग तुझ्या प्रश्नांची उत्तरे देता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्स रे.

प्रचेतस
Sat, 02/08/2014 - 17:33 नवीन
धन्स रे. बाकी मोडकंतोडकं मराठी येणं वेगळं आणि तत्कालीन कागदपत्रे समजून घेऊन इतिहास समोर मांडणं वेगळं. ह्या ग्र्याण्ट डफच्या च्या हातून पुरेशा अस्सल कागदपत्रांअभावी काही ढोबळ चुकाही झाल्यात. ह्याने चक्क कवी कलाशानेच संभाजी राजांना फ़ितुरीने औरंगजेबाच्या हाती पकडून दिले असे लिहिलेले आहे. काही अखबारात तसा उल्लेख असल्याने ही चूक झाली असावी. पण अशा काही चुकांचा अपवाद वगळता डफ चे एक श्रेष्ठ इतिहासकार म्हणून मूल्य वादातीत आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अर्थातच. तो पायोनियर असल्याने

बॅटमॅन
Sat, 02/08/2014 - 17:49 नवीन
अर्थातच. तो पायोनियर असल्याने त्याच्याकडून चुका घडणे अपेक्षितच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते बाकी खरे.

प्रचेतस
Sat, 02/08/2014 - 18:07 नवीन
ते बाकी खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जेम्स ग्रँट डफ

माहितगार
Sat, 02/08/2014 - 21:25 नवीन
ग्रँट डफ हि दोन्हीही आडनावेच ग्रँट हे स्वतःचे आणि डफ हे आजोळची जायदाद मिळाल्यामुळे घेतलेले त्याचे स्वत;चे नाव जेम्स होते. केवळ शालेय शिक्षण सोडून देऊनही त्याने चांगल यश संपादन केल तो सैनिक होता त्याने ब्रिटीशांकरता सैनिकी यशही संपादन केल पण त्या पेक्षा तो एक चांगला मुत्सद्दी डिप्लोमॅट असावा (हा माझा अंदाज). एकीकडे पेशव्यांना हरवणार्‍या शेवटच्या लढाईत महत्वाचा रोल निभावला हे सैनिकी कार्य स्वतःच्या वरीष्ठांची चांगली मर्जी संपादन केली. सातार्‍याच्या छत्रपतींना विश्वासात घेण्याची मुत्सद्देगिरी दाखवली. सातार्‍यात त्याच्या सोबतीला ब्रिटीश माणूस एकच होता बाकी फलटण (सैन्य) भारतीय वंशाची होती. जेम्सला मराठी येत होती का नाही याचा स्पष्ट उल्लेख आढळला नाही पण त्या संबंधाने डॉ.अ.रा.कुलकर्णींनी सखोल अभ्यास करून त्याचे चरित्र लिहिले त्यात या बद्दल अधिक माहिती मिळेल असे वाटते. भारतात आल्यावर त्याने फार्सीवर प्रभूत्व मिळवल्याने त्याचे मुंबई आणि गुजराथेत फारसे अडले नसावे पण पश्चिम महाराष्ट्रात दैनंदीन जीवन हिंदूस्थानी अथवा उर्दूच्या बळावर खूप सहज निभावणे सहज शक्य झाले असावे असे वाटत नाही. भारतात अधिकार्‍यांना पाठवण्यापुर्वी इस्ट इंडिया कंपनी इंग्लंडातच राजरोस भारतीय भाषांचे आणि बहुधा संस्कृताचे शिक्षण देऊनच पाठवत असावी पण या जेम्स बाबाने महाविद्यालयीन शिक्षणही घेतले नव्हते. पुस्तक लेखनाकरता कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर त्याने इंग्रजीत अनुवादीत करून घेतली होती याचा उल्लेख त्याच्या पुस्तकातच येतो. अगदी युद्धात राजकारणात मराठ्यांना परास्त करणार्‍या माणसा करता ते त्याचे तसे शत्रुच पण त्याच मराठ्यांचा इतिहास लिहितानाना त्याने त्याचा अभिनिवेश फारसा आड न येऊ देता तट्स्थ पणाने करून इतिहास लेखनास त्याच्या मर्यादेत झेपेल तेवढा न्याय देण्याचा तटस्थतेचा प्रयत्न केला आहे. त्याचे पुस्तक पुर्ण वाचले नाही. पण पुस्तक लेखनात विनम्रता तटस्थता जपण्याचा प्रयत्न करणारा हा ग्रँट डफ पुस्तक प्रस्तावानेत केवळ ब्रिटीश अधिकार्‍यांचेच आभार प्रदर्शन करताना दिसतो सातार्‍यात केवळ एका ब्रिटीश माणसासोबत राहणार्‍या माणसाचे नेटीव्ह भारतीय माणसां शिवाय चालणे शक्य नाही पण तरीही तोंडदेखले आभारप्रदर्शन पण नाही हे नोंद घेण्या साराखे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रतिसाद आवडला. बरीच माहिती

बॅटमॅन
Sat, 02/08/2014 - 23:50 नवीन
प्रतिसाद आवडला. बरीच माहिती नव्याने कळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ग्रँट डफ बद्दलची टिका

माहितगार
Sat, 02/08/2014 - 21:54 नवीन
परंतु मराठ्यांचा खरा इतिहास देण्याची तीव्र इच्छाच त्याला नव्हती व मराठ्यांसंबंधानें त्याची आदरबुद्धि नव्हती. ज्यांचें राज्य आपण घेतलें त्यांची त्रोटक माहिती आपल्या कांस थोडीफार असावी अशा हेतूनें त्यानें ही बखर रचिली;
केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशात " [डफच्या इतिहास प्रस्तावना; भा. सं. मं. त्रैमासिक व. ४ जोडअंक; राजवाडे खंड, १ प्रस्तावना.]." हा संदर्भ देऊन ग्रँट डफ बद्दल टिका अंतर्भूत केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ग्रँट डफच्या माहितीबद्दल

प्रचेतस
Sat, 02/08/2014 - 23:43 नवीन
ग्रँट डफच्या माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ब्रिटन मधील भारतीय भाषांचे शिक्षण

माहितगार
Sun, 02/09/2014 - 16:05 नवीन
चर्चेच्या विषयानुरूप फक्त संदर्भा करता नोंदवून ठेवतोय East India Company College ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या स्थापने पासून त्यामानाने उशीरा म्हणजे १८०६ मध्ये सुरू झाले.पूर्ण डीटेल्स नाहीत पण सुरवातीस पर्शीयन/उर्दू बंगाली इत्यादी भाषा शिकवल्या जात असाव्यात त्यात नंतर संस्कृतची भर पडली. पण संस्कृत असल्यामुळे मराठीचा वेगळा समावेश सुरवातीच्या काळाततरी आणि नंतरही असण्याची शक्यता कमी वाटते. संस्कृत करता १९३२ नंतर ऑक्सफर्ड विद्यापिठात वेगळी चेअर सुरू झाली होती या चेअरचा अधिकृत उद्देश अ‍ॅडमिनीस्ट्रेशनच्या पलिकडे होता चेअर स्पॉन्सर जोसेफ बॉडेनच्याच शब्दात " Shanskreet [sic] language, at or in any or either of the Colleges in the said University, being of opinion that a more general and critical knowledge of that language will be a means of enabling my countrymen to proceed in the conversion of the natives of India to the Christian Religion, by disseminating a knowledge of the Sacred Scriptures amongst them, more effectually than all other means whatsoever."[1] Lieutenant Colonel Joseph Boden, after whom the " या चेअरच्या प्रोफेसरची बाजाप्ता विद्यार्थ्यांच्या मतांवर निवडणूक होत असे आणि त्या निवडणूक मतदानाला ट्रेनने विद्यार्थी भरभरून न्यावेत एवढा राजकीय रंगही चढत असे . Boden Professor of Sanskrit election, 1860 हे त्याच क्लासिक उदाहरण होत. नंतरच्या काळात पंडीता रमाबाईंना सुद्धा तेथील विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यासाठी इंग्लंडला नेण्यात आल होत. अर्थात या संस्कृतचेअरचा अ‍ॅडमिनीस्ट्रेटर्स ना संस्कृत मुळे कोणतीही भारतीय भाषा सहज शिकण्यात उपयोग झाला असावा संस्कृत शिकण्याचा ख्रिश्चन धर्मप्रसारा करता उपयोग हा मुद्दा तेथील लोकांच्या भावनांना फुंकर घालण्या पलिकडे आणि बायबलच्या भारतीय भाषांतरा करता शब्दकोश बनवण्या पलिकडे भारतात फारसा उपयोगी पडला असावा असे वाटत नाही (हे माझे मत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ग्रँटचे समकालीन मोल्सवर्थ आणि कँडी

माहितगार
Sun, 02/09/2014 - 16:29 नवीन
पहिल्या विस्तृत मराठी शब्द कोशकर्ता मोल्सवर्थ याचही पहील नाव जेम्सच आणि हाही जेम्स ग्रँटडफ चा समकालीन या मोल्सवर्थचा एक सम्कालीन साथीदार म्हणजे थॉमस कँडी यानी मराठी भाषेच्या शालेय व्याकरणावर आणि तत्कालीन सरकारच्या मराठी भाषा धोरणावर एवढा (हट्टी) प्रभाव टाकला की स्थानिक व्याकरणकार त्याच्या शुद्धलेखन नियमांच्या हट्टाला दबकून असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

किंचित सुधारणा

सुनील
Mon, 02/10/2014 - 15:24 नवीन
"तुझ्याकडनं नाही मिळाली पत्रं तर तुझ्या विधवेकडून घेईन!" मग तो वरमला आणि पत्रे देऊ केली.
"तुम्ही मेल्यानंतर तुमची विधवा रद्दीवाल्याला विकेल तेव्हा मी घेईन" (श्रेय वि.द.घाटे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद!!

बॅटमॅन
Mon, 02/10/2014 - 15:27 नवीन
ओह अच्छा, धन्यवाद!! बादवे वि द घाटे म्हणजे हे वाक्य 'दिवस असे होते' मधले आहे काय? लै सुंदर पुस्तक हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मनोगते

सुनील
Mon, 02/10/2014 - 15:33 नवीन
नै. सदर वाक्य त्यांच्या मनोगते ह्या पुस्तकातील राजवाड्यांवरील लेखात आहे. अर्थात वाक्य आठवणीतूनच लिहिले आहे कारण पुस्तक वाचून लै वर्षे झालीत. हे पुस्तकदेखिल छानच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मनोगते यू से..हे पुस्तक

बॅटमॅन
Mon, 02/10/2014 - 15:36 नवीन
मनोगते यू से..हे पुस्तक माहिती नव्हते. आता वाचेन नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

बॅटमॅन, भारीच रे...खूप माहिती

सुहास झेले
Fri, 02/07/2014 - 18:25 नवीन
बॅटमॅन, भारीच रे...खूप माहिती दिलीस. लिह की लेका यावर मग वेळातवेळ काढून :)
  • Log in or register to post comments

बघू कधी वेळ होतो ते...एकदा

बॅटमॅन
Fri, 02/07/2014 - 18:31 नवीन
बघू कधी वेळ होतो ते...एकदा ट्रोजन सेरीज पूर्ण झाली की मग नक्की पाहीन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

बॅट्याचे सगळे प्रतिसाद आवडले.

प्यारे१
Fri, 02/07/2014 - 18:29 नवीन
बॅट्याचे सगळे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments

मलापण

आदूबाळ
Fri, 02/07/2014 - 18:38 नवीन
मलापण प्रतिसाद वाचनखुणेत टाकायची सोय पाहिजे असं वाटतं अशा वेळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे काय हे...

अर्धवटराव
Sat, 02/08/2014 - 01:05 नवीन
साला हे बॅट्या, वल्ली, माहितीगार वगैरे मंडळी मिपावर आहेत... शक्य तेव्हढं लिखाण करतातच ते... पण आपल्याला अजुन बरच काहि काढायला लागणार त्यंच्या पोतडीतुन. इतरही तज्ञ मंडळी आहेत मिपावर. आहे त्यापेक्षा बरीच मोठी वैचारी श्रीमंतीची पातळी गाठायला हवी आता मिपाने.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Sat, 02/08/2014 - 02:39 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+२

मदनबाण
Sat, 02/08/2014 - 04:00 नवीन
सहमत ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+3

उगा काहितरीच
Fri, 02/14/2014 - 23:45 नवीन
+3
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बॅट्या ची बॅटिंग प्रचंड

मृत्युन्जय
Sat, 02/08/2014 - 10:59 नवीन
बॅट्या ची बॅटिंग प्रचंड आवडल्या गेली आहे. साला मिपाचा राजवाडे आहे हा.
  • Log in or register to post comments

विक्षिप्तपणा

राही
Sat, 02/08/2014 - 13:03 नवीन
बॅट्मॅन यांचे आणि इतरांचेही प्रतिसाद आवडले. संशोधकांच्या एकारलेपणाविषयी असे म्हणता येईल की आपल्या आवडीच्या कामासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी आयुष्यातल्या इतर अनेक गोष्टींकडे, ज्या सर्वसामान्यांना महत्त्वाच्या वाटतात, त्यांच्याकडे पाठ फिरवलेली असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसे त्यांना 'कळपाबाहेरचा' मानून विक्षिप्त ठरवतात. अशा लोकांना त्यांच्या संशोधनविषयातली छोटीशी गोष्टसुद्धा महत्त्वाची वाटते. दगड, रद्दी, जुन्यापान्या वस्तू गोळा करणारा माणूस विक्षिप्तच ठरणार. शिवाय त्यांच्या निदिध्यासाच्या विषयाबद्दल इतरांकडून दाखवली जाणारी पराकोटीची अनास्था त्यांना कधीकधी वैफल्यग्रस्त करते. भगवानलाल इंद्रजींनी त्यांच्या मृत्युपत्रात असे लिहून ठेवले होते की त्यांचे कोणतेही अंत्यविधी करू नयेत. त्यांनी त्यांच्या हयातीतच स्वतःचे श्राद्ध किंवा तत्सम विधी उरकून टाकले होते! सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी एका गृहस्थ माणसाच्या -सन्यासी नव्हे- या कृत्याने त्यांच्या नागर ब्राह्मण जातीत किती खळबळ उडाली असेल याची आज आपल्याला कल्पनाही येणार नाही.
  • Log in or register to post comments

आयला, जितेपणीच श्राद्ध?????

बॅटमॅन
Sat, 02/08/2014 - 15:40 नवीन
आयला, जितेपणीच श्राद्ध????? खतराच प्रकार आहे हा तर!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

संन्यास

विकास
Sat, 02/08/2014 - 17:15 नवीन
संन्यास घेताना असे करण्याची प्रथा आहे. राही यांच्या प्रतिसादावरून त्यांनी संन्यास म्हणजे भगवी वस्त्रेवाला संन्यास घेतला नसावा. पण त्यांच्या लेखी तो संन्यासच असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओह अच्छा. हे माहिती नव्हते.

बॅटमॅन
Sat, 02/08/2014 - 17:17 नवीन
ओह अच्छा. हे माहिती नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

येस्स...

वाटाड्या...
Mon, 02/10/2014 - 22:55 नवीन
"संन्यास घेताना" स्वतः च्या हाताने स्वतः श्राद्ध घालावे लागते...आयला काय जोरदार चर्चा चालु आहे. रामदास काकांच्या लेखनानंतर बर्याच काळाने मजा येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अजून एक. संन्याश्याच्या

llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/11/2014 - 11:43 नवीन
अजून एक. संन्याश्याच्या प्रेतावर अंतिम संस्कार करत नाहीत. कारण वस्तुतः संन्याश्यानं आपली ओळख आधीच त्यागलेली असते आणि स्वतःच्या जुन्या ओळखीचा अंत्यसंस्कारही आधीच केलेला असतो. म्हणून जर संन्याश्याने समाधी लावून देह त्यागला असेल तर नाडीपरीक्षा झाल्यावर अणूकुचीदार वस्तूने (मुख्यत्वे शंखाने) त्या पार्थिवाच्या टाळूवर (जिथे ब्रम्हरंध्र असते (अशी माझी श्रद्धा आहे आणि तसे मानण्याची इतरांस सक्ती नाही)) प्रहार करून प्राणोत्क्रमण झाल्याची खात्री केली जाते. मग तो देह नदीत सोडून देतात. दहन करत नाहीत. (काही अपवाद असू शकतात जर नदी जवळ नसेल तर भडाग्नि दिलाही असेल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

बॅटमन, वल्ली, माहितीगार एट अ

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/08/2014 - 16:28 नवीन
बॅटमन, वल्ली, माहितीगार एट अ‍ॅल... एकत्र जमून काही एक प्रकल्प हाती घ्याच.
  • Log in or register to post comments

+१

सुधीर
Sat, 02/08/2014 - 17:48 नवीन
सुंदर लेख आणि तितकेच सुंदर प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सगळेच प्रतिसाद आवडले .

जेपी
Sat, 02/08/2014 - 18:08 नवीन
सगळेच प्रतिसाद आवडले .
  • Log in or register to post comments

बॅट्या आणि माहीतगार यांचे

किसन शिंदे
Sun, 02/09/2014 - 09:48 नवीन
बॅट्या आणि माहीतगार यांचे एकुण एक प्रतिसाद अतिशय वाचले. अतिशय माहीतीपुर्ण!!
  • Log in or register to post comments

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत आज ग्रंथ प्रदर्शन

माहितगार
Sun, 02/09/2014 - 12:24 नवीन
भांडारकर संस्थेतर्फे आयोजित दुर्मिळ हस्तलिखिते आणि संस्थेच्या प्रकाशनांच्या प्रदर्शन रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. "दुर्मिळ हस्तलिखिते आणि पोथ्यांचा खजिना खुला " आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात हे लोकसत्तातील बातमीच शीर्षक इंटरनेटवर ऑनलाईन तेही युनिकोडासहित गूगल सर्चेबल खुला अस असावयास हव होत त्या जागी अजून पुस्तक प्रदर्शन भरवण्यावर समाधान भरवल जात आहे
  • Log in or register to post comments

चीन आणि पूर्व आशिया

माहितगार
Mon, 02/10/2014 - 21:06 नवीन
बौद्ध विद्वानांनी बरेच पाली आणि संस्कृत हस्त लिखीते मोठ्या प्रमाणावर (मुख्यत्वे नकलवून) त्यांच्या सोबत नेली त्यातली बरीच भारतात राहिली नाही एक उदाहरण म्हणजे संस्कृतकरता एका कालखण्डात वापरली गेलेल्या लिपीचा मागमूस केवळ जपान मधल्या प्राचीन दस्तएवजात शाबूत आहे. यात चीनचीही महत्वाची नोंद वेगळ्या कारणाने म्हणजे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि शास्त्रीय पद्धतीने केलेले अनुवादाचे कष्ट या बद्दल Chinese translation theory आणि इतरही लेखातून माहिती मिळू शकते म्हणजे असे कि जे प्राचीन संस्कृत ग्रंथ आज भारतात अथवा शिल्लक नाहीत त्यांचे चिनी अनुवाद सुस्थितीत मिळण्याची आणि त्याचे अनुवाद घडवण्याचे भारतीयांनी अजून विचारातही घेतलेले नाही. अलिकडच्या काळात असाच काहीसा प्रकार मराठी व्याकरनाबद्दलचे फ्रेंच मधील पुस्तक पुन्हा मराठीत अनुवाद करून घ्यावे लागले होते. या लेखनात वेळेच्या अनुपलब्धते मुळे सर्व संदर्भ ऐन लेखन करताना पडताळलेले नाहीत स्मरणशक्तीवर अवलंबून लिहिले आहे चुकल्यास कळवावे
  • Log in or register to post comments

फ्रेंच बद्दल.

बॅटमॅन
Tue, 02/11/2014 - 00:33 नवीन
ज्यूल्स ब्लॉख नामक व्याकरणकार होता त्याने १९२० साली फ्रेंचमध्ये पुस्तक लिहिले ते १९७३ साली देब राज चनाना यांनी इंग्रजीत भाषांतरित केले. हा ज्यूल्स ब्लॉख सुनीती कुमार चॅटर्जींचा पीएचडीचा गाईड होता. अन चिनी ग्रंथांबद्दल कचकून सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

बाली बेंटांवरील लोंतार

माहितगार
Fri, 02/14/2014 - 19:03 नवीन
इंडोनेशियातील ज्वालामुखीची बातमी वाचता वाचता योगायोगाने बाली बेटावरील घराघरातून अजूनही जपले जात असलेले प्राचीन ताडपत्री दस्तएवज लोंतार बद्दल अधिक माहिती मिळाली. तेथील वाचनालयात संकलीत लोंताराचंची संख्या ३००० आहे आणि लोकांच्या घरा घरात जपल्या जाणार्‍या लोंताराम्ची संख्या ५०००० च्या घरात आहे यातील बेरेच लोंतार कावी लिपीतील बालीच्या भाषेत अथवा पल्लव लिपीतील संस्कृतात आहेत म्हणे. अर्थात पुन्हा एकदा त्यांच्या स्कॅनिंग आणि इंटरनेटवर टाकण्याचे काम मात्र भारतीय लोकांचा नाही आम्ही टिका करतो त्या पाश्चिमात्य लोकांचा आहे. असो अर्काईव्ह डोट ऑर्गवर एक मोठा प्रकल्पच चालू आहे असे दिसले Image removed. *प्रकल्पांबद्दल जकार्ता पोस्ट वरील बातमी दुवा * एका भारतीय प्राध्यापकाचा १९९०च्या दशकातील एक लेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ऐला हे तर भारीच काम झालं!!!!!

बॅटमॅन
Fri, 02/14/2014 - 23:29 नवीन
ऐला हे तर भारीच काम झालं!!!!! जबरीच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

चांगली माहिती सांगितलीत.

रेवती
Mon, 02/10/2014 - 23:19 नवीन
चांगली माहिती सांगितलीत. धन्यवाद सुझे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पैसा
Tue, 02/11/2014 - 15:27 नवीन
सुंदर लेख आणि अतिशय माहितीपूर्ण चर्चा! राजवाड्यांच्या संकीर्ण लेखांचे एक पुस्तक घेतले आहे. आता आधी वाचून पूर्ण करते!
  • Log in or register to post comments

जबरा

इरसाल
Sat, 02/15/2014 - 13:55 नवीन
सगळेच लै भारी लिहीत आहेत. आयला मला कधी एवढे वाचायला मिळणार. (कोणे एके काळी भेळेच्या कागदावरील मजकुर सुद्धा आवडीने वाचणारा) इरसाल (आता कुठे हरवला आहे)
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सुमीत भातखंडे
Fri, 11/13/2015 - 10:52 नवीन
निव्वळ भारी लेख अणि त्यावरच्या तितक्याच भारी प्रतिक्रिया. फ्रँकली राजवाडे हे "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुरतेच महित होते. इतकं प्रचंड व्यक्तीमत्व होतं हे आत्ता समजलं. धागकर्त्याचे आणि सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार.
  • Log in or register to post comments

राजवाडे चरित्र आणि

कंजूस
Fri, 11/13/2015 - 11:15 नवीन
राजवाडे चरित्र आणि व्याकरणाच्या दोन { फ्री } पिडीएफ आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा