मी पाहिलेले मस्कत - भाग १ - सलालाह

Primary tabs

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 10:11 am

गेली ३२ वर्षे मी व्यवसायानिमित्त सल्तनत ऑफ ओमान उर्फ मस्कत येथे राहातो आहे. ह्या वास्तव्यात ह्या देशाच्या नयनरम्य प्रदेशांचे दर्शन घेतले आहे. त्यावरच एक लेखमाला लिहावी अशा विचाराने आज कळफलक बडवायला घेतला आहे.
भारताच्या पश्चिमेस १६०० कि.मी. वर आणि दुबईपासून ३५०-४०० कि.मी. अंतरावर अरबस्थानात हा देश आहे. 'मस्कत' हे ह्याचे पूर्वापार आणि रुढ नांव असले तरी कागदोपत्री 'सल्तनत ऑफ ओमान' हे नांव आहे. संक्षिप्तपणे ह्याला 'ओमान' असेही म्हणतात. 'ओमान' (मस्कत)च्या सीमा उत्तरेस युएई (दुबई), पश्चिमेस सौदी अरेबिया आणि दक्षिणेस येमेन ह्या देशांना जुळलेल्या आहेत. एकेकाळच्या रखरखीत वाळवंटात मनुष्यनिर्मित निसर्ग खूप आहे. ओमानची राजधानी मस्कत आहे. पूर्वीच्या काळी मस्कतच्या दक्षिणेस असलेले 'सलालाह' हे शहर देशाची (मस्कतची) राजधानी होते. परंतु, सध्याच्या राजाने राज्यभार स्विकारल्यावर (१९७०) आपली राजधानी 'मस्कत' ह्या शहरी केली. लोकसंख्येच्या दृष्टीने 'मस्कत' क्रमांक १ वर आहे तर 'सलालाह' क्रमांक २ वर. संपूर्ण देशभर वाळवंटी रखरखाट असला तरी मधे मधे 'ओअ‍ॅसिस' म्हणजे गोड्यापाण्याचे साठे आहेत. बहुतेक अशा पाण्याच्या साठ्यांच्या अवतीभवती शहरं वसली आहेत. परंतु ह्याला अपवाद 'सलालाह' हे शहर. इथे हिरवा निसर्ग आणि गोडे पाणी तुरळक नाही तर, मुबलक प्रमाणात आणि सर्वत्र आढळते. त्याचे कारण म्हणजे ह्या एकमेव प्रदेशाला लाभलेले 'पावसाळा' ह्या ऋतुचे वरदान. सलालाहचे ऐतिहासिक महत्व आणि राजाचे जन्मगाव म्हणून आपण आपल्या मालिकेची सुरुवात 'सलालाह' पासून करीत आहोत.

DXB_0124
सलालाह विमानतळाबाहेर पडल्या पडल्या नजरेस पडणारा आखीवरेखीव हमरस्ता

'ओमान' देशाच्या दक्षिणेस आणि मस्कत ह्या राजधानीपासून (जी ओमानच्या उत्तर प्रदेशात आहे) १२०० कि.मी अंतरावर आहे. ह्या शहराचे ऐतिहासिक महत्त्व अशाकरीता की पूर्वीच्याकाळी इथूनच राज्यकारभार चालायचा. राजसिंहासन इथे होते. हा प्रदेश निसर्गसंपन्न होता/आहे आणि 'धूपा' ची जंगले इथे होती. धूपाच्या झाडाला चिरा देऊन चीक गोळा केला जातो. तो वाळवतात. हाच 'धूप'. हा नंतर इथून उर्वरीत अरबस्थानात, भारतात आणि चीनमध्येही निर्यात व्हायचा. इमारती लाकूड आणि दर्यावर्दी लाकूड इथे भरपूर प्रमाणात मिळायचे. त्यामुळे युद्ध नौका, व्यापारी नौका आदी नौका बांधणीतही हा प्रदेश अग्रेसर होता. विशाल समुद्रकिनारा लाभलेल्या ह्या प्रदेशात मासेमारी व्यवसाय फोफावला नसता तर नवलच. तसा तो भरपूर फोफावला. आज युरोपात जाणार्‍या बोटींवरील मालवाहू कंटेनर्सचे मोठे यार्ड इथे आहे. सलालाहची जमीन सुपीक आहे. 'खरीप' हंगाम जून ते सप्टेंबर असा असून ह्या हंगामात सतत पाऊस पडतो. अगदी धो धो नसला तरी सतत रिपरिपत असतो. आणि ह्या प्रदेशाला आपल्या केरळ सारखे सौंदर्य प्राप्त होते.

DXB_0241

DXB_0196

'धूपांच्या' झाडांप्रमाणेच इथे नारळाची आणि केळ्यांची झाडे मुबलक आहेत. वर्षाचे बाराही महिने मधूर शहाळी आणि केळी विकणार्‍यांच्या टपर्‍या रस्त्यांच्या कडेला आहेत. टपरीधारक बहुदा आपले केरळीय किंवा तर मग बांगलादेशी असतात. येताजाता पर्यटकांच्या गाड्या थांबतात आणि शहाळ्यांचा, केळ्यांचा आस्वाद घेत असतात. ओमान मध्ये इतर ठिकाणी मिळणार्‍या शहाळ्या-केळ्यांपेक्षा इथल्या फळांना अतिशय मधुर चव आहे.
स्वच्छ आणि विस्तिर्ण समुद्रकिनारा हे सलालाहचे अजून एक वैशिष्ट्य आणि पर्यटकांचे आकर्षण आहे.

DXB_0164

DXB_0170

DXB_0166

भरतीच्या वेळी, खडकांच्या अंतर्गत पोकळीत दबाव वाढून पाण्याची नैसर्गीक कारंजी तयार होतात. २०-२० फुट उंच उडणारी ही कारंजी हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

Al Mughsayl Blowholes

ह्याहून विस्मयचकीत करणारा चमत्कार म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा विरोधाभास. एके ठिकाणी रस्त्याला चांगला ६-७ फूट खोल बांक आहे. त्याच्या तळाला वाहन उभे केले (अगदी इंजिन बंद करून) तरी ते वाहन आपसुक चढण चढून वर येते. आम्ही ९ पर्यटक आणि १ बसचा चालक अशा दहा माणसांना घेउन (इंजिन बंद असलेली) ती बस चढण चढून वर आली. ताशी २० कि. मी. चा वेग सुरुवातीला घेतला तो चढण चढून आल्यावर ताशी ५० कि. मी. पर्यंत गेला.
कॅलिफोर्नियातील सांताक्रूजच्या 'मिस्ट्री स्पॉटची' आठवण प्रकर्षाने झाली.
सलालाहचा एक महत्त्वाचा उद्योग, मासेमारी हा आहे.

DXB_0181

DXB_0184आज बकरीईदच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी आहे आणि म्हणून बोटी समुद्रात गेल्या नाहीत.

DXB_0185

DXB_0183

DXB_0179

मासेमारी करून आलेले कोळी बांधव किनार्‍यावर आल्यावर पकडलेले मासे निवडतात. त्यात नको असलेले मासे फेकून दिले जातात. ह्या फेकून दिलेल्या माशांवर आयता ताव मारणारे हे जीव. आज जेवणासाठी स्वतःच कष्ट करावे लागणार ह्या विवंचनेत दिसत आहेत.
पूर्वीच्या काळी बिलकीस नांवाच्या इजिप्तशियन राणीचा राजवाडा इथे होता. तो तिने यक्षाच्या मदतीने इजिप्तला नेला परंतु यक्षाने कांहीतरी घोळ घातला आणि अर्धाच राजवाडा इजिप्तला पोहोचला. अशी एक दंतकथा आहे. तो उरलेला अर्धा राजवाडा....हा.

DXB_0190

तसेच, १०००-१२०० वर्षापूर्वीचे अल बलीद नांवाच्या गावाचे भग्नावशेष पहावयास मिळतात. ह्या गावांत श्रीमंत किंवा राजघराण्यातील उच्चभ्रू आणि गरीब प्रजा असे गावाचे दोन भाग आहेत. दोन्ही वस्त्यांसाठी मशीदी वेगवेगळ्या आहेत. राजवाड्यासाठी संरक्षण व्यवस्था म्हणून खंदक आणि उघडझाप करणारे दरवाजे आहेत. उत्खननात सापडलेल्या ह्या गावाचा बराचसा भाग २००७च्या 'गोनू' नामक चक्रिवादळात जमिनदोस्त झाला. आता उरलेत ते हे 'भग्नावशेषाचे भग्नावशेष'.

DXB_0246

DXB_0244

सलालाह मध्ये भरपूर प्रमाणात विड्याच्या पानांची लागवड होते. शहरात (आणि संपूर्ण देशात) पान खाण्यावर बंदी आहे. पण लागवड करून निर्यात मात्र केली जाते.

DXB_0242

केरळचा एक राजा होता. त्याचं नांव चेरामन पेरुमल. इ.स. ६२२ मध्ये तो इस्लामने प्रेरित होऊन प्रोफेट मोहम्मदला भेटायला अरबस्थानात आला. आणि तत्क्षणी त्याने इस्लाम कबूल केला. भारताचा तो पहिला मुसलमान मानला जातो. इस्लाम स्विकारून भारतात परतताना त्या काळच्या येमेन (सध्याच्या सलालाह) मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याचा हा दर्गाह.

DXB_0239

मरते समयी त्याने इश्वराची करूणा भाकली की हा उजाड प्रदेश माझ्या केरळाप्रमाणे हिरवागार होऊ दे. त्याच्या प्रार्थनेला यश येऊन सलालाहमध्ये निसर्ग अवतरला.

DXB_0240

दंतकथा कांहीही असोत. अरबस्थानातील रखरखित वाळवंटी पार्श्वभूमीवर सलालाहची ही नेत्रसुखद हिरवळ आपल्या केरळची आठवण नक्कीच करून देते.
सलालाहचा खरिप हंगाम जून ते सप्टेंबर असा ४ महिन्यांचा असतो. फार मुसळधार पाऊस पडत नाही पण रिपरिप सतत चालू असते. हवा मस्त थंड होते. ह्या चार महिन्यांत डोंगरदर्‍यात राहणारे आदिवासी खाली पठारावर येऊन तंबू ठोकून राहतात. अरेबिक भाषेत 'जेबल' म्हणजे डोंगर आणि डोंगरात राहणारे ते 'जेबली'.
चार महिन्यांचा खरिप सलालाहला वर्षभराचे उत्पन्न मिळवून देतो. नद्या नाले भरतात. जमिनीतील गोड्यापाण्याची पातळी वाढते. त्यावर केळी, नारळ, पानवेलींचे उत्पन्न वर्षभर मिळत राहते. सौंदर्याने नटलेले शहर ह्या काळात अमाप पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांमध्ये जास्त भरणा आजूबाजूच्या अरबी जगतातील आणि युरोपातील पर्यटक ह्यांचा असतो. शहरातील जवळ जवळ ८० टक्के इमारती ह्या 'हॉटेल अपार्टमेन्ट्स' आहेत. ह्या इमारतींमधील सदनिका पर्यटकांना राहण्यासाठी भाड्याने देण्यात येतात. चार महिने सर्व इमारती आणि बंगले पर्यटकांनी गजबजून जातात. बाकी ८ महिने शुकशुकाट असतो. शुकशुकाटाच्या काळात एक सदनिका २४००/- रुपये भाड्यानेही मिळू शकते, तर ऐन मोसमात एखादा बंगला २४०००/- रुपये एवढ्या चढ्या दरात मिळतो. हि भाडी १ दिवसाची आहेत.
सर्व प्रकारची खाद्यसेवा उपलब्ध आहे. पाश्चिमात्य, अरबी, भारतिय, पाकिस्तानी, चीनी आणि अतिपूर्वेच्या देशांची खाद्यसंकृती अनुभवता येते. आता मौसम संपला आहे. पण तरीही उडप्याच्या हॉटेलात अर्धा पाऊण तासाची प्रतिक्षा करावी लागली. मांसाहारी (आणि शाकाहारीही) जेवणासाठी 'बार्बेक्यू नेशन' नांवाचे अति विशाल आणि आलिशान उपहार गृह आहे. त्यांच्याच इमारतीत वरती राहायला सदनिकाही भाड्याने आहेत. रात्री २ वाजे पर्यंत सदनिकेत जेवण पोहोचते करतात. पदार्थ अतिशय रुचकर आणि परवडणार्‍या दरात होते.
ह्यावेळी खरिप हंगाम संपल्यावर सलालाह्ला भेट द्यायचा योग आला पण आता मात्र ऐन मोसमात सलालाह भेटीची उत्कंठा वाढली आहे.
अशा ह्या नयनरम्य सलालाहला माझा ..... सलाम.

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

पियुशा's picture

1 Nov 2013 - 2:13 pm | पियुशा

खरच नयनरम्य !

पियुशा's picture

1 Nov 2013 - 2:13 pm | पियुशा

खरच नयनरम्य !

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 3:55 pm | प्यारे१

छान सचित्र वर्णन.
मी काम करतोय त्या शापूरजी पालनजी कंपनीने ओमानच्या राजाचा राजवाडा ७१ च्या आसपास बांधलाय.
कधीतरी फिरायला यायला नक्की आवडेल. :)

बॅटमॅन's picture

1 Nov 2013 - 4:15 pm | बॅटमॅन

जबराट वर्णन!!! चित्रे अन माहिती दोन्हीही मस्त. हिरवाई टिप्पिकल कोंकणी-केरळी छाप वाटतेय. :)

अनन्न्या's picture

1 Nov 2013 - 5:11 pm | अनन्न्या

अगदी इस्पिक एक्का करतात तस्सेच परफेक्ट!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 11:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

जुन्या आठवणी ताज्या केल्यात राव ! सलालाहमध्ये पावसाळ्यात जरूर जा, तो एक वेगळाच अनुभव आहे. पहिल्यांदा सलालाहला गेलो तेव्हा मित्राने फिरत फिरत गाडी हाफा विभागात नेली आणि केरळमध्ये असल्याचा भास झाला ! त्याकाळी (१९८२) तेथे परदेशी लोकांत मल्याळी लोक बहुसंख्य होते आणि तसेच लुंगी-बनियनमध्ये फिरत होते, ते बघून तर केरळमध्येच गेल्याची खात्री पटली होती ;) बाजारातही काउंटरवर मल्याळीच जास्तकरून होते... "मल्याळीमध्ये बोलले तर जास्त डिसकाऊंट, हिंदिवाल्याला बरा डिसकाऊंट तर अरबीत बोलले तर नो डिसकाउंट" असा एक विनोद त्यावेळेस सांगितला जायचा. नंतर काही वर्षांनी सतत साडेचार वर्षे राहायचा योग आला. तिथल्या महाराष्ट्र मंडळात आणि इंडियन क्लबमध्ये धमाल मजा केलेली आठवली.

आजही सलालाह म्हटले की काय वाटते हे वर इतके लिहीले यावरून समजले असेलच ! आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद !

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2013 - 3:58 am | प्रभाकर पेठकर

ऐंशीच्या दशकात सलालाह मराठी मंडळात आणि मराठी हस्तलिखितात 'देव कुटुंबा'चे वर्चस्व होते. मेहनती कुटुंब होते. मला तेवढे एकच नांव लक्षात आहे.

त्या नंतर सलालाह बरेच बदलले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2013 - 2:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

१९८८ ते १९९१ या सलग काळात खुद्द सलालाह मध्ये होतो. त्यातल्या शेवटच्या दोन वर्षांत महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष होतो. चाळीस पन्नास कुटूंबे आणि अनेक एकांडे शिलेदार असा लवाजमा होता. मुख्य म्हणजे महाराष्ट्र मंडळात इतर राज्यांचेही काही कायमस्वरूपी सदस्य होते. पावसाळ्यात सगळे वातावरण थंड आणि हिरवेगार झाले की दर आठवड्याच्या सुट्टीला हमखास जवळच्या हिरव्या झालेल्या डोंगरांवर नाहीतर समुद्रकिनार्‍यावर सहल असायची... फोनाफोनी झाली की सहज कमीतकमी ५०-६० जण तयार असायचे. दिवाळी, गणपतीचे सण जोरात साजरे व्हायचे... सणातला एक दिवस कोणाच्या तरी टेरेसवर १००-१२० लोकांची जंगी पार्टी असायची. सणाच्या पार्टीला सगळे पारंपारिक पदार्थ मंडळातल्या गृहिणी आगत्याने नियोजन करून वाटून घेऊन घरी बनवून आणत असत. कोणत्याही सणाच्या पार्टीला विकतचे पदार्थ आणलेले गृहिणींना आवडत नसे. सगळ्यांच्या अशाच सहृदयपूर्ण वागणूकीमुळे ते दिवस अजूनही स्मरणात ताजे आहेत. इंडियन क्लबमध्येही अनेक वर्षे बस्तान ठोकून बसलेल्या मल्याळी गँगला टशन देऊन "भारतीय" पॅनेल निवडून आणले होते त्यात भाग घेतला होता ती मजा काय वेगळीच होती. एक वर्ष सांस्कृतीक सचिव होतो... सलालाह म्ह्टले की बर्‍याच गोष्टी आठवतात. असो.

तुमचे मस्कतचे अनुभवही वाचायची उत्सुकता आहे. तेथेही व्यतीत केलेल्या काळातील आठवणींना उजाळा मिळेल. लवकर टाका पुढचे भाग. ओमान खूप जिव्हाळ्याचा देश आहे :)

मुक्त विहारि's picture

2 Nov 2013 - 9:25 am | मुक्त विहारि

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत....

पैसा's picture

2 Nov 2013 - 10:14 am | पैसा

वाळवंटातले ओअ‍ॅसिस बघून मस्त वाटले!

चौकटराजा's picture

2 Nov 2013 - 5:16 pm | चौकटराजा

ट्रीप चान चान झाली. पण एक महत्वाचे स्थळ पहायचे राहिले.
पेठकर काकांचे हाटेल.

दिपक.कुवेत's picture

3 Nov 2013 - 12:43 pm | दिपक.कुवेत

हिरवागार निसर्ग दिसला कि किति पाहु अन किति नको असं होउन जातं. नशिबवान आहात.

अनिता ठाकूर's picture

3 Nov 2013 - 6:47 pm | अनिता ठाकूर

लेख आणि फोटो.. सर्वच छान! पुढील लेखाची वाट पहात आहे.

सुधीर कांदळकर's picture

4 Nov 2013 - 8:45 am | सुधीर कांदळकर

वाचूनच जावेसे वाटले. तिथे एवढी झाडे पाहून आश्चर्यच वाटले. धूपांच्या झाडोर्‍यात गंध कसा दरवळत असेल? पूर्वी व्हायोलीनच्या गजाच्या केसांना चोळत तो डिंक याच झाडांचा असतो का? आता वापरतात की नाही ठाऊक नाही.

अलीकडेच आपल्या उत्तर पूर्व राज्यांतल्या पर्यटनाबद्दल माहिती जमवीत होतो. त्रिपुराची राजधानी अगरतळा इथे `लोबान' ज्या झाडांपासून काढतात ती झाडे आहेत अशी माहिती जालावर वाचली. ते सहज आठवले.

पुभाप्र

धन्यवाद.

सचित्र वर्णन आवडले. समुद्राची निळाई अगदी छान!

कंजूस's picture

5 Nov 2013 - 6:40 pm | कंजूस

छान ! लिहित राहा .

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 7:02 am | स्पंदना

फारच छान माहीती. आता दुसरा भाग कधी?

सविता००१'s picture

11 Nov 2013 - 3:48 pm | सविता००१

किती मस्त वर्णन केलय हो काका तुम्ही!!! अगदी सुंदर वर्णन आनि तितकीच सुंदर छायाचित्रे!! आता पटापट पुढचा भाग येउद्या!!!

त्रिवेणी's picture

12 Nov 2013 - 2:50 pm | त्रिवेणी

मला इतके वर्ष वाटत होते की अरब देशात समुद्र नाहीच आहे.
त्या देशात पान खायला बंदी का आहे? काही विशेष कारण आहे का?

पान खायला बंदी का आहे?

नक्की कारण मलाही माहित नाही. (कारण मी स्वतः पान खात नाही) पण पान खाऊन इथे-तिथे थुंकणे, त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता आणि रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरण्याची भिती ही कारणे असावीत असे वाटते. तरीही चोरुन पान आणि गुटखा मिळतोच आणि खाणारे शौकीनही आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2013 - 3:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेठकर साहेब, मस्कत मालिका रंगतदार होणार यात काही वाद नाही. सलालाहचा सचित्र वर्णनासहित असलेला भाग आवडला.

खडकाच्या पोकळीत दबावाने उडणारे कारंजे, यक्षाने घोळ घातला आणि अर्धाच ठेवलेल्या राजवाड्याची कथा, निसर्गरम्य सलालाह...स्पेशलच.

-दिलीप बिरुटे

भाते's picture

24 Jan 2014 - 8:42 pm | भाते

पेठकर काका, मिपा दिवाळी अंकातला हा लेख मला खुपच आवडला आहे. दिवाळी अंकात भाग १ आल्यावर भाग २ ची जवळपास २ महिने आतुरतेने वाट पहात आहे. तुमच्या सोयीनुसार पुढचा भाग २ लवकर लिहावा हि नम्र विनंती. मस्कतमध्ये कधी जायची संधी मिळेल का ते माहित नाही. पण तोपर्यंत किमान तुमच्या लिखाणामधुन तरी तो अनुभव घ्यायची ईच्छा आहे. आपल्या कामातुन वेळ काढुन कृपया मस्कत मालिका पुढे चालु करावी हि नम्र विनंती.