आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके १३० वी पुण्यतिथी

II श्रीमंत पेशवे II's picture
II श्रीमंत पेशवे II in जनातलं, मनातलं
18 Feb 2013 - 10:43 am

क्रांतीविरांचा मुकुटमणी असे आद्य क्रांतिकारक फडके कुलोत्पन्न वासुदेव बळवंत फडके यांची १३० वी पुण्यतिथी १७ फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचे हृद्य स्मरण.
१८५७ सालच्या अयशस्वी क्रांतीपर्वानंतर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी स्वप्राणांच्या आहुत्या दिल्या, त्या थोर वीरांमध्ये वासुदेव बळ्वंत फडके यांचे नाव अग्रेसर आहे. या साठीच त्यांना “ आद्य क्रांतिवीर” असे संबोधले जाते.
पनवेल जवळील “अभयारण्य “ म्हणून प्रसिध्द असलेले “कर्नाळा” या ऐतिहासिक किल्याच्या पायथ्याशी आहे. वासुदेव बळ्वंत फडके यांचे आजोबा श्री अनंतराव फडके हे या किल्याचे किल्लेदार होते. इंग्रजांनी बेसावधपणे अनंतरावांवर हल्ला करून हा किल्ला त्यांच्या पासून हिरावून घेतला होता.
कर्नाळा परिसरातील “शिरढोण” या छोट्याशा गावामध्ये १८४५ साली वासुदेवरावांचा जन्म झाला. वीरात्वाचा वारसा लाभलेले वासुदेवराव गोऱ्यापान रंगाचे सरळ नाक व पाणीदार डोळ्यांचे व मजबूत शरीरय्ष्टीचे होते. खेडेगावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांना “कल्याण” येथे त्यांच्या आजोबांकडे ( आईच्या वडिलांकडे ) शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तेथे त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली.
त्यानंतर काहीकाळ अल्पकाळ नोकऱ्या केल्यावर ते पुणे येथे “मिलिटरी फायनान्स” या खात्यात नोकरीसाठी लागले. ते १८६५ साल होते.तेथील इंग्रज अधिकारी व भारतीय अधिकारी यांच्या पगारात विषमता होती. तसेच इंग्रज अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत. अश्या घटनांमुळे वासुदेवरावांच्या मनांत इंग्रजांविषयी चीड निर्माण होत गेली.परंतु त्यांच्या हृदयाला चटका लावणारी व इंग्रजांविषयी कमालीचा तिटकारा उत्पन्न करणारी घटना घडली ती १८७० मधे. शिरढोण येथे त्यांची आई गंभीर आजारी आहे असे त्यांना समजले पण तरीही त्यांचा रजेचा अर्ज नाकारण्यात आला. अखेर राजा मंजूर नसतानाही ते गावी आले,परंतु दुर्दैवाने तोपर्यंत त्यांच्या आईचे निधन झाले होते !
जुलमी परकीय सत्तेचे अनेक अत्याचार त्यांच्या डोळ्यासमोर होत होते. १८५७च्या अयशस्वी क्रांतीनंतर “इस्ट इंडिया कंपनी” कडून भारताचा कारभार जरी इंग्लंडच्या राणी सरकारकडे गेला असला तरी भारतीय जनतेच्या हलाखीच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नव्हता.
१८५८च्या प्रसिध्द जाहीरनाम्यात संस्थानिकांच्या कारभारात ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते,पण प्रत्यक्षात १८५७ मध्ये किरकोळ कारणे दाखवून बडोद्याचे राजे “मल्हारराव गायकवाड” यांना पदच्युत करण्यात आले. १८७६ – ७७ मध्ये दक्षिण भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. अन्न पाण्यावाचून लोक तडफडून मारत होते, पण निगरगट्ट इंग्रज सरकारने ‘दिल्लीदरबार” भरवून विक्टोरिया राणीच्या भारत भेटीच्या स्वागतासाठी भारताच्या सरकारी खजिन्यातील लाखो रुपयांची उधळण केली.
अशा अनेक अन्याय आणि संतापजनक घटनांमुळे मुळच्याच शूर व पराक्रमी वासुदेवरावांच्या मनांत जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध आग धगधगू लागली व ही जुलमी राजवट हटविण्याचा त्यांनी निश्चय केला.
सर्व सत्ताधारी इंग्रज सरकार विरुद्ध कोणतेही पाठबळ नसलेल्या एका मध्यमवर्गीय माणसाने झुंज देणे म्हणजे चिमुकल्या दिव्याने प्रचंड वादळाशी टक्कर देण्यासारखे होते. पण ज्योतीवर झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणे स्वातंत्र्याच्या युद्धाच्या होमामध्ये वासुदेवरावांनी स्वतःच समिधा होऊन झोकून दिले.
आपल्या समविचारी तरुणांचे सैन्य उभारण्यास त्यांनी सुरूवात केली. समाजातील निम्न स्तरातील पण बलदंड रामोशी,मांग यासारख्या जमातीतील तरुणांचीही मने जिंकून स्वतःचे सैन्य उभारले.
आता प्रत्यक्ष कारवाईची आवश्यकता होती. तथापि इंग्रजांशी टक्कर देण्यासाठी अधिक मोठ्या सैन्याची व लष्करी तयारीची आवश्यकता होती व त्या साठी त्यांना अर्थातच आर्थिक पाठबळ आवश्यक होते. अनेक श्रीमंत व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला पण १८५७ साल ची प्रत्यक्ष भारतीय सैन्याने केलेली क्रांती अयशस्वी ठरलेली असल्यामुळे श्रीमंत व्यक्तींकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही.
अखेर नाईलाजाने स्वतःच्या सैन्याच्या रसदीसाठी व शस्त्रास्त्रे खरेदी साठी , पैशाच्या व्यवस्थेसाठी वासुदेव रावांनी त्यांनी उभारलेल्या सैन्याच्या मदतीने त्या काळच्या श्रीमंत सावकार व व्यापारी यांच्या घरांवर दरोडे घातले. ब्रिटीश सत्तेला दिलेले हे अप्रत्यक्ष आव्हानच होते. ब्रिटीश सरकार विरुद्ध गवर्नर ‘रिचर्ड टेम्पल’ यांचेकडे भारतीय जनतेच्या होत असलेल्या हलाखी व छळाबद्दल त्यांनी सविस्तर निवेदन पाठविले व या परिस्थितीला इंग्रज सरकार जबाबदार असल्याने संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. या मुळेच त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने आटोकाट प्रयत्न केले व त्यांना पकडून देणाऱ्यास त्या वेळी रुपये ५००० चे बक्षीस जाहीर केले.
आपल्या सैन्याची ताकद वाढावी व केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरही इंग्रज सरकार विरुद्ध संघर्ष चालू राहावा या उद्देशाने त्यांनी ‘रोहिला’ या जमातीच्या ५०० घोडेस्वार सैनिकांची मदत मिळविण्यासाठी ते हैदराबाद कडे निघाले.
मात्र त्यांच्या मागावर मेजर डेनीअल या इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचा सतत पाठलाग करून २० जुलै १८७९ रोजी मेजर डेनीअल याने त्यांना देवरनावडगा येथे निद्रिस्त अवस्थेत अटक केली. पोलिसांच्या अटकेत असताना माहिती काढून घेण्यासाठी त्यांचा अतिशय छळ करण्यात आला. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा ही प्रयत्न केला.
पुणे येथे त्यांचेवर राजद्रोहाचे आरोपाखाली खटला चालविण्यात आला व त्यांना जन्मठेपेची म्हणजेच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठाविण्यात आली व त्यांची रवानगी अरबस्थान मधील ‘एडन’ येथे करण्यात आली व तेथील मजबूत किल्यांत त्यांना बंदिवान करण्यात आले.
एडन येथील तुरुंगात त्यांना अतिशय निर्दयपणे पशुतुल्य वर्तणूक देण्यात आली व अनन्वित छळ करण्यात आला.अखेर या अभेद्य काळकोठडीतून पळण्याचा त्यांचा प्रयत्न ही अयशस्वी ठरला. त्यामुळे दुर्दैवाने त्यांना पूर्वीपेक्षाही जास्त छळास सामोरे जावे लागले.
या सर्व दुर्दैवी परिस्थितीचा त्यांच्या मनावर व शरीरावर परिणाम झाला व अखेर रोगजर्जर अवस्थेमध्ये या महान देशभक्त क्रांतीविराने १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडन च्या तुरुंगात देह ठेवला.
एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या पार्थिव देहाची इंग्रज तुरुंग अधिकाऱ्यांनी विल्हेवाट लावली आणि एका महान देश् भक्ताचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाला. एक धगधगता निखारा कायमचा निवाला...........
संदर्भ – चित्तवेध त्रैमासिक
लेखक – श्री विजय कर्वे.

इतिहाससद्भावना

प्रतिक्रिया

II श्रीमंत पेशवे II's picture

18 Feb 2013 - 10:50 am | II श्रीमंत पेशवे II

प्रिय बंधू आणि भागीनिंस , सप्रेम नमस्कार ,
मी काल हा लेख अपलोड करण्याचा खूप प्रयत्न केला.पण नवीन असल्याकारणाने मला काल जमले नाहीं.
आज मी शोध लावला आणि आज केले.
सचिन

प्रचेतस's picture

18 Feb 2013 - 10:58 am | प्रचेतस

उत्तम माहितीपूर्ण लेख.

आद्य क्रांतीवीरांनी तैलबैला सुधागड मार्गावरील वाघजाई घाटाजवळच्या दुर्गम ठाणाळे लेणीत काही काळ आश्रय घेतला होता असे स्मरते.

मन१'s picture

18 Feb 2013 - 11:23 am | मन१

ध्येयवेड्या, अव्यवहारी अशी हेटाळणी होउनही ध्येयाबद्दल निष्ठा न ढळलेल्या वेड्याला सलाम.

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना सलाम!!

१८५८च्या प्रसिध्द जाहीरनाम्यात संस्थानिकांच्या कारभारात ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते,पण प्रत्यक्षात १८५७ मध्ये किरकोळ कारणे दाखवून बडोद्याचे राजे “मल्हारराव गायकवाड” यांना पदच्युत करण्यात आले.

सालाच्या आकड्यांत गडबड आहे, जरा बघता का प्लीज़?

या क्रांतिवीराचे स्मारक शिवाजीनगरात सीओईपीला लागून सीआयडी आहे तिथेच आहे. नेटवर फोटो मिळाला नाही सबब टाकता आला नाही. :(

सर्वसाक्षी's picture

18 Feb 2013 - 11:58 am | सर्वसाक्षी

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना सादर प्रणाम.

१८७६ – ७७ मध्ये दक्षिण भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. अन्न पाण्यावाचून लोक तडफडून मारत होते, पण निगरगट्ट इंग्रज सरकारने ‘दिल्लीदरबार” भरवून विक्टोरिया राणीच्या भारत भेटीच्या स्वागतासाठी भारताच्या सरकारी खजिन्यातील लाखो रुपयांची उधळण केली.

ओळखीचं वाटतंय चित्र. आज कुणी फडके होणार नाही. आमची तेवढी लायकी नाही.

अशा स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलंत फडके, वाया घालवले गेलात आमच्याकडून. :(

सहज's picture

18 Feb 2013 - 4:21 pm | सहज

क्रांतीकारक फडके यांचे थोडक्यात चरित्र येथे (दुवा)

लेख वाचून काही प्रश्न पडले, काही नवी माहीती मिळाली.
१८७५ मधे ब्रिटिश सरकारच्या नोकरीत असलेला एक इसम आजुबाजूचे काही पेशावर डाकू जमवून इंग्रज व अन्य श्रीमंत लोकांचे खजिने लुटत असेल तर त्याच बरोबर (नेताजी बोस यांच्या कार्याप्रमाणे) काही जाहीरनामा, देशाची घटना, संभाव्य राज्याची रचना इ. काही माहीती देखील यायला हवी. जसे १८७५ भारतीय उपखंडात किती संस्थानीक, राज्ये त्यांच्या बरोबर येणार होती. एका दुव्यानुसार त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते म्हणजे लुटारू होते. व त्या समर्थकांच्या समोर देशप्रेम ध्येय असे काही नव्ह्ते. (दुवा १) अक्कलकोटचे स्वामी समर्थ, तसेच त्यावेळचे अन्य नेते यांनी फडके यांना बंड करण्यास ही योग्य वेळ नाही असे सांगीतल्याचे लिहले गेले आहे.

कोणाला फडके यांच्या कार्याची , धोरणांची, स्वतंत्र "भारताची" रचना यावर कोणास काही माहीती असेल तर जरुर लिहावी. चरित्र दुव्यात असल्याप्रमाणे (पान ५) बहुदा शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांना स्व:ताचे राज्य स्थापन करायचे होते असाही हेतू असावा असे वाटते.

रजा नाकारली म्हणून वरिष्ठ तसेच सहकारी यांची हत्या केल्याची काही उदाहरणे आजही स्वतंत्र भारतात पोलीस, राज्य राखीव दल, सैन्यात दिसुन येतात. (दुवा २)

मल्हारराव गायकवाड प्रकरण तर रोचक होतेच. पण त्याचा नेमका काय प्रभाव फडके यांच्यावर पडला होते हे काही नक्की कळाले नाही. भाउबंदकी(मल्हारराव आपल्या भावाच्या मृत्युनंतर गादीवर आले होते व त्याच भावाची हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून अगोदर तुरुगांत होते.), राज्यकारभारात मनमानी इ विविध कारणांनी ते पदच्युत झाले होते तसेच बडोदा संस्थान हे काही खालसा झाले नाही. बहुतेक त्यांच्या नंतरच बडोद्याचे सुप्रसिद्ध सयाजीराव गायकवाड गादीवर आले. त्यांनी केलेले कार्य मल्हारराव यांच्यापेक्षा नक्कीच उल्लेखनीय आहे असे दिसते. दुवा ३ , दुवा ४

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Feb 2013 - 9:32 am | पुण्याचे वटवाघूळ

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना श्रध्दांजली.

सहजरावांचा प्रतिसाद आवडला.मला एक प्रश्न नेहमी पडतो.समजा वासुदेव बळवंत फडके यांची आई आजारी असताना त्यांची रजा मंजूर झाली असती तर ते इंग्रजांविरूध्द तितकेच खवळून उठले असते का?जर का झाशी संस्थान दत्तकविधान नामंजूर धोरणातून खालसा झाले नसते तर लक्ष्मीबाई इंग्रजांविरूध्द तितक्याच खवळून उठल्या असत्या का? (त्यांची घोषणा होती-- मेरी झाशी नही दूंगी-- मेरा भारत नही दूंगी अशी नव्हे). तेव्हा आपल्या देशावर परकीयांचे राज्य आहे या भावनेव्यतिरिक्त इतर कुठले कारण असेल--- आपल्याला हक्काची रजा नाकारणे,आपले राज्य विनाकारण खालसा करणे,देवघरात बूट घालून जाणे इत्यादी आणि या कारणामुळे जर कोणी इंग्रजांविरूध्द उभे ठाकले असेल तर त्या क्रांतिकारकांना आणि 'मी माझ्या देशावर परकियांचे राज्य सहन करणार नाही' या भावनेतून इंग्रजांविरूध्द उभ्या ठाकलेल्या क्रांतिकारकांविषयी एकाच प्रतीची भावना असावी का? अर्थातच वासुदेव बळवंत फडके यांनी दाखविलेल्या मार्गावर इतर अनेक क्रांतिकारक गेले आणि त्यातून देशाचे स्वातंत्र्य लवकर मिळायला मदत झाली हे अगदी वादातित आहे.

एक प्रश्न नेहमी पडतो.समजा वासुदेव बळवंत फडके यांची आई आजारी असताना त्यांची रजा मंजूर झाली असती तर ते इंग्रजांविरूध्द तितकेच खवळून उठले असते का?जर का झाशी संस्थान दत्तकविधान नामंजूर धोरणातून खालसा झाले नसते तर लक्ष्मीबाई इंग्रजांविरूध्द तितक्याच खवळून उठल्या असत्या का?

हि तात्कालीक कारणे असतात, जी केवळ निमित्त ठरतात.

सहज's picture

19 Feb 2013 - 1:54 pm | सहज

बरोबर असे प्रश्न पडण्यात काही गैर नाही. अर्थात थोरा-मोठ्यांच्या प्रत्येक भूमीकेला आजच्या काळाची, आजच्या उपलब्ध माहीतीची फूटपट्टी लावून मोजमाप केले नाही पाहीजे हेही तितकेच खरे. पण आंधळेपणाने जे आजवर सांगीतले गेले आहे ते तसेच्या तसे स्वीकार करणेही वाईट.

इतिहासाच्या अभ्यासातला एक रोचक प्रकार म्हणजे एकाच कालखंडात काय काय घडत होते हे तपासणे. जसे फडके यांच्या बंडाच्या कालावधीच्या आसपास टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीला आकार देत होते. पंडीत रमाबाई, आनंदी जोशी या उच्चशिक्षण घेत/घेणार होत्या. राजा राम मोहनराय, इश्वरचंद विद्यासागर यांचे कार्य तर त्याही आधीपासुन होत होते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Feb 2013 - 5:48 pm | पुण्याचे वटवाघूळ

अर्थात थोरा-मोठ्यांच्या प्रत्येक भूमीकेला आजच्या काळाची, आजच्या उपलब्ध माहीतीची फूटपट्टी लावून मोजमाप केले नाही पाहीजे हेही तितकेच खरे. पण आंधळेपणाने जे आजवर सांगीतले गेले आहे ते तसेच्या तसे स्वीकार करणेही वाईट.

बरोबर आहे.पण होते काय की कोणत्याही कारणाने इंग्रजांविरूध्द उभ्या राहिलेल्या प्रत्येकालाच मोठा देशभक्त असे म्हटले जाते.टिपू सुलतान पण इंग्रजांविरूध्द लढला होता म्हणून त्यालाही देशभक्त म्हणणारे लोक आहेत.पण टिपू सुलतानच्या राजकारणाला धोका इंग्रजांनी निर्माण केला म्हणून तो इंग्रजांविरूध्द गेला याचा अर्थ त्याला भारत देश स्वतंत्र करायचा होता असे म्हणत त्याला फार मोठा देशभक्त का म्हटले जाते हेच समजत नाही.तसेच अगदी झाशीची राणी लक्ष्मीबाईसुध्दा सुरवातीला इंग्रजांच्या विरोधात नव्हती.दातिया आणि ओरछाच्या सैन्याने झाशीवर हल्ला केला तेव्हा लक्ष्मीबाईने इंग्रजांचीच मदत मागितली होती.पण राणीच्या सैन्याने इंग्रज अधिकारी आणि इतरांच्या कत्तली केल्या असा आरोप ठेऊन इंग्रजांनी राणीला मदत करायचे नाकारले. त्यानंतर राणी इंग्रजांविरोधात गेली.

तेव्हा त्या काळच्या परिस्थितीत आपण एका 'भारत' या देशात राहत आहोत ही भावना फारशी कोणामध्ये होती असे वाटत नाही.तर इंग्रजांकडेही एकूण सत्ताकारणातील एक इच्छुक (परकिय वगैरे नाही) अशाच पध्दतीने बघितले जात होते. म्हणजे आपल्या शत्रूविरूध्द तिसर्‍या पार्टीकडून मदत घेतली जायची त्यातलीच इंग्रज ही पण एक तिसरी पार्टी होती.तसेच इंग्रज हे परकिय आहेत तेव्हा त्यांची मदत घेऊ नये वगैरे वाटणे कोणाच्याही गावी नव्हते. अगदी पेशव्यांनीही आंग्र्यांचे आरमार बुडवायला इंग्रजांचीच मदत घेतली होती.अशाच सत्ताकारणात काही लोक इंग्रजांच्या विरोधात गेले आणि काहींनी इंग्रजांचीच मदत घेतली (तर काहींनी आपली पार्टीही बदलली). तरीही केवळ इंग्रजांविरूध्द उभा राहिला या एका कारणावरून अशा मंडळींना फार मोठे देशभक्त आणि ज्यांनी इंग्रजांची मदत घेतली त्यांना गद्दार वगैरे म्हणणे अयोग्य आहे असे मला वाटते.

पण आपल्याकडे होते की क्रांतिकारक, देशभक्त वगैरे शब्द ऐकले की असले प्रश्न विचारायचीच बंदी होते आणि मग आंधळी भक्ती किंवा द्वेष उरतो.हा महत्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल सहज यांना धन्यवाद.

राही's picture

20 Feb 2013 - 11:13 am | राही

सहजरावांचे प्रतिसाद व त्याखालील सर्व उपप्रतिसाद यांच्याशी प्रचंड सहमत. सर्व क्रांतिकारकांचे वैयक्तिक शौर्य लक्षात घेऊनही असे म्हणावेसे वाटते की ते सर्व एकांडे शिलेदार होते.व्यापक व्यूहरचना,जनतेचा सहभाग,धैर्य(पेशन्स) या बाबतीत ते खूपच कमी पडले. कट-कारस्थाने-बंड हे मार्ग गुप्तता पाळण्याचे असल्याने मुळातच जनतेला सहभागी करून घेतले जाउच शकत नाही.त्यांचा लढा हा जनतेचा लढा होऊच शकत नाही.अठराव्या एकोणिसाव्या शतकातील समांतर साहित्य (त्यात संतसाहित्यही आलेच.)जुजबी वाचले तरी कळून येते की या मार्गाने यश मिळणारच नव्हते. वैयक्तिक मानापमान,रागलोभ,लाभहानि हे आम जनतेचे जिव्हाळ्याचे विषय होउ शकत नाहीत.स्वातंत्र्यचळवळीला व्यापक आणि सनदशीर रूप दादाभाई नवरोझजी/नौरोजी(आणि त्यांच्या प्रभावळीतले इतर),टिळक, आणि नंतर अर्थात गांधी यांनीच दिले. संपूर्ण गदर चळवळीचा इतिहास हा असाच एकटेपणाने आणि अदूरदर्शित्वाने भरलेला आहे.'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र'एव्हढेच त्यांनी पाहिले, मात्र 'असंगाशी संग, प्राणांशीच गाठ' हे पाहिले नाही.

श्रीनिवास टिळक's picture

18 Feb 2013 - 8:34 pm | श्रीनिवास टिळक

(१) वासुदेव बळवंत यांचे गाव शिरढोण आमच्या पळस्पे गावापासून चारच कि मी अंतरावर असल्यामुळे मला लहानपणापासून त्यांच्या चित्तथरारक जीवन आणि ध्येयाविषयी माहिती होती. त्यांचा आवडता कर्नाळा किल्ला मात्र अजून पहिला नाही (परदेशात वास्तव्य असल्यामुळे).१९५० साली विश्राम बेडेकर यांनी त्यांच्यावर काढलेला चित्रपट मी तेव्हा पहिला होता. जवळ जवळ ६० वर्षानंतर रमेश देव यांचा नवीन चित्रपट निघाला (अजिंक्य देवची मुख्य भूमिका वासुदेव म्हणून) तोही पहिला. दरम्यान १९८४ मध्ये केंद्र सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीट काढले होते.

(२)महाराष्ट्र सरकारने भारताच्या आद्य क्रांतिकारकांवर एक पुस्तक माला प्रकाशित केली त्यात वासुदेव यांनी एडन मध्ये कारावासात असताना दैनंदिनी ठेवल्याचा उल्लेख आहे. त्याबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास ती द्यावी हि विनंती.

पैसा's picture

19 Feb 2013 - 6:01 pm | पैसा

आद्य क्रांतिकारकाला श्रद्धांजलि!