आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके १३० वी पुण्यतिथी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
क्रांतीविरांचा मुकुटमणी असे आद्य क्रांतिकारक फडके कुलोत्पन्न वासुदेव बळवंत फडके यांची १३० वी पुण्यतिथी १७ फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचे हृद्य स्मरण.
१८५७ सालच्या अयशस्वी क्रांतीपर्वानंतर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी स्वप्राणांच्या आहुत्या दिल्या, त्या थोर वीरांमध्ये वासुदेव बळ्वंत फडके यांचे नाव अग्रेसर आहे. या साठीच त्यांना “ आद्य क्रांतिवीर” असे संबोधले जाते.
पनवेल जवळील “अभयारण्य “ म्हणून प्रसिध्द असलेले “कर्नाळा” या ऐतिहासिक किल्याच्या पायथ्याशी आहे. वासुदेव बळ्वंत फडके यांचे आजोबा श्री अनंतराव फडके हे या किल्याचे किल्लेदार होते. इंग्रजांनी बेसावधपणे अनंतरावांवर हल्ला करून हा किल्ला त्यांच्या पासून हिरावून घेतला होता.
कर्नाळा परिसरातील “शिरढोण” या छोट्याशा गावामध्ये १८४५ साली वासुदेवरावांचा जन्म झाला. वीरात्वाचा वारसा लाभलेले वासुदेवराव गोऱ्यापान रंगाचे सरळ नाक व पाणीदार डोळ्यांचे व मजबूत शरीरय्ष्टीचे होते. खेडेगावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांना “कल्याण” येथे त्यांच्या आजोबांकडे ( आईच्या वडिलांकडे ) शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तेथे त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली.
त्यानंतर काहीकाळ अल्पकाळ नोकऱ्या केल्यावर ते पुणे येथे “मिलिटरी फायनान्स” या खात्यात नोकरीसाठी लागले. ते १८६५ साल होते.तेथील इंग्रज अधिकारी व भारतीय अधिकारी यांच्या पगारात विषमता होती. तसेच इंग्रज अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत. अश्या घटनांमुळे वासुदेवरावांच्या मनांत इंग्रजांविषयी चीड निर्माण होत गेली.परंतु त्यांच्या हृदयाला चटका लावणारी व इंग्रजांविषयी कमालीचा तिटकारा उत्पन्न करणारी घटना घडली ती १८७० मधे. शिरढोण येथे त्यांची आई गंभीर आजारी आहे असे त्यांना समजले पण तरीही त्यांचा रजेचा अर्ज नाकारण्यात आला. अखेर राजा मंजूर नसतानाही ते गावी आले,परंतु दुर्दैवाने तोपर्यंत त्यांच्या आईचे निधन झाले होते !
जुलमी परकीय सत्तेचे अनेक अत्याचार त्यांच्या डोळ्यासमोर होत होते. १८५७च्या अयशस्वी क्रांतीनंतर “इस्ट इंडिया कंपनी” कडून भारताचा कारभार जरी इंग्लंडच्या राणी सरकारकडे गेला असला तरी भारतीय जनतेच्या हलाखीच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नव्हता.
१८५८च्या प्रसिध्द जाहीरनाम्यात संस्थानिकांच्या कारभारात ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते,पण प्रत्यक्षात १८५७ मध्ये किरकोळ कारणे दाखवून बडोद्याचे राजे “मल्हारराव गायकवाड” यांना पदच्युत करण्यात आले. १८७६ – ७७ मध्ये दक्षिण भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. अन्न पाण्यावाचून लोक तडफडून मारत होते, पण निगरगट्ट इंग्रज सरकारने ‘दिल्लीदरबार” भरवून विक्टोरिया राणीच्या भारत भेटीच्या स्वागतासाठी भारताच्या सरकारी खजिन्यातील लाखो रुपयांची उधळण केली.
अशा अनेक अन्याय आणि संतापजनक घटनांमुळे मुळच्याच शूर व पराक्रमी वासुदेवरावांच्या मनांत जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध आग धगधगू लागली व ही जुलमी राजवट हटविण्याचा त्यांनी निश्चय केला.
सर्व सत्ताधारी इंग्रज सरकार विरुद्ध कोणतेही पाठबळ नसलेल्या एका मध्यमवर्गीय माणसाने झुंज देणे म्हणजे चिमुकल्या दिव्याने प्रचंड वादळाशी टक्कर देण्यासारखे होते. पण ज्योतीवर झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणे स्वातंत्र्याच्या युद्धाच्या होमामध्ये वासुदेवरावांनी स्वतःच समिधा होऊन झोकून दिले.
आपल्या समविचारी तरुणांचे सैन्य उभारण्यास त्यांनी सुरूवात केली. समाजातील निम्न स्तरातील पण बलदंड रामोशी,मांग यासारख्या जमातीतील तरुणांचीही मने जिंकून स्वतःचे सैन्य उभारले.
आता प्रत्यक्ष कारवाईची आवश्यकता होती. तथापि इंग्रजांशी टक्कर देण्यासाठी अधिक मोठ्या सैन्याची व लष्करी तयारीची आवश्यकता होती व त्या साठी त्यांना अर्थातच आर्थिक पाठबळ आवश्यक होते. अनेक श्रीमंत व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला पण १८५७ साल ची प्रत्यक्ष भारतीय सैन्याने केलेली क्रांती अयशस्वी ठरलेली असल्यामुळे श्रीमंत व्यक्तींकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही.
अखेर नाईलाजाने स्वतःच्या सैन्याच्या रसदीसाठी व शस्त्रास्त्रे खरेदी साठी , पैशाच्या व्यवस्थेसाठी वासुदेव रावांनी त्यांनी उभारलेल्या सैन्याच्या मदतीने त्या काळच्या श्रीमंत सावकार व व्यापारी यांच्या घरांवर दरोडे घातले. ब्रिटीश सत्तेला दिलेले हे अप्रत्यक्ष आव्हानच होते. ब्रिटीश सरकार विरुद्ध गवर्नर ‘रिचर्ड टेम्पल’ यांचेकडे भारतीय जनतेच्या होत असलेल्या हलाखी व छळाबद्दल त्यांनी सविस्तर निवेदन पाठविले व या परिस्थितीला इंग्रज सरकार जबाबदार असल्याने संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. या मुळेच त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने आटोकाट प्रयत्न केले व त्यांना पकडून देणाऱ्यास त्या वेळी रुपये ५००० चे बक्षीस जाहीर केले.
आपल्या सैन्याची ताकद वाढावी व केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरही इंग्रज सरकार विरुद्ध संघर्ष चालू राहावा या उद्देशाने त्यांनी ‘रोहिला’ या जमातीच्या ५०० घोडेस्वार सैनिकांची मदत मिळविण्यासाठी ते हैदराबाद कडे निघाले.
मात्र त्यांच्या मागावर मेजर डेनीअल या इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचा सतत पाठलाग करून २० जुलै १८७९ रोजी मेजर डेनीअल याने त्यांना देवरनावडगा येथे निद्रिस्त अवस्थेत अटक केली. पोलिसांच्या अटकेत असताना माहिती काढून घेण्यासाठी त्यांचा अतिशय छळ करण्यात आला. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा ही प्रयत्न केला.
पुणे येथे त्यांचेवर राजद्रोहाचे आरोपाखाली खटला चालविण्यात आला व त्यांना जन्मठेपेची म्हणजेच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठाविण्यात आली व त्यांची रवानगी अरबस्थान मधील ‘एडन’ येथे करण्यात आली व तेथील मजबूत किल्यांत त्यांना बंदिवान करण्यात आले.
एडन येथील तुरुंगात त्यांना अतिशय निर्दयपणे पशुतुल्य वर्तणूक देण्यात आली व अनन्वित छळ करण्यात आला.अखेर या अभेद्य काळकोठडीतून पळण्याचा त्यांचा प्रयत्न ही अयशस्वी ठरला. त्यामुळे दुर्दैवाने त्यांना पूर्वीपेक्षाही जास्त छळास सामोरे जावे लागले.
या सर्व दुर्दैवी परिस्थितीचा त्यांच्या मनावर व शरीरावर परिणाम झाला व अखेर रोगजर्जर अवस्थेमध्ये या महान देशभक्त क्रांतीविराने १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडन च्या तुरुंगात देह ठेवला.
एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या पार्थिव देहाची इंग्रज तुरुंग अधिकाऱ्यांनी विल्हेवाट लावली आणि एका महान देश् भक्ताचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाला. एक धगधगता निखारा कायमचा निवाला...........
संदर्भ – चित्तवेध त्रैमासिक
लेखक – श्री विजय कर्वे.
प्रतिक्रिया
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके
उत्तम माहितीपूर्ण लेख.
ध्येयवेडा....
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके
सादर प्रणाम
१८७६ – ७७ मध्ये दक्षिण भारतात
आदरांजली
+१
एक प्रश्न नेहमी पडतो.समजा
+१
बरोबर आहे
प्रचंड सहमत
चित्रपट आणि दैनंदिनी
उत्तम लेख