अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र - १

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
1 Jan 2013 - 4:14 pm

अनेक वर्षं मिपावर "मुखस्तंभ रहाणे" ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतर लेखनाचा पहिलावहिला प्रयत्न. दिग्गजांनी पहिलटकरणीला सांभाळून घ्यावे, ही विनंती!
-----------------------------------------------------------------------------

उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते.
"कशी काय गर्दी ?"
"ठीक आहे !"
"प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?"
"छे ! छे !"
"अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झाडल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच. सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही तुमच्या. 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?" नेहेमीप्रमाणे शेवटला 'काय' उडवीत अंतूशेट म्हणाले.
मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा."
"गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत - आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं - चार आण्यात जमवा."
"चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?"
"अहो तो बरा ! आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन." बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंतूशेटची नजर माझ्याकडे वळली.

"व्यक्ती आणि वल्ली" मधून साभार

‘फुकट ते पौष्टिक’ हा मानवी स्वभाव आहे. पण ‘फुकट’ सर्वार्थाने ‘फुकट’ नसतं आणि ते ‘पौष्टिक’ क्वचितच असतं हे चार झटके खाल्ल्यानंतर आपल्याला उमजतं.

तरीही कुठलीही वस्तू फुकट (किंवा कमी किमतीत) मिळवण्याचा आपला हव्यास सुटत नाही. (‘बिग बाजारा’त ‘सबसे सस्ते चार दिन’ असले, की तोबा गर्दी उसळते; गब्बर पगार असणारे लोकसुद्धा ‘डॉमिनोज’ची सवलतीची कुपन्स जपून ठेवतात.)

हा झगडा मूलभूत आहे – मूल्य (value) विरुद्ध किंमत (price). माणसाचा असा प्रयत्न असतो, की कमीत कमी किंमत मोजून जास्तीत जास्त मूल्य मिळवायचं! ‘फुकट ते पौष्टिक’ ही त्यातलं एक टोक – शून्य किंमत, शून्यापेक्षा जास्त मूल्य!

अंतूशेटचा अर्थशास्त्रीय विचार पहा: नाटक कंपनीने हा प्रयोग करण्यासाठी संपूर्ण खर्च केलेलाच आहे. जी काय तिकीटविक्री व्हायची ती झालेलीच आहे. पण ’प्लान’ मोकळाच आहे. एक अंक झाल्याने अजून काही तिकीटविक्री व्हायची शक्यताही संपलेली आहे. अशा वेळेला मिळणारं कोणतंही उत्पन्न नाटक कंपनीच्या मॅनेजरच्या दृष्टीने ‘वाढीव उत्पन्न’ (marginal income) आहे. यात नाटक कंपनीसाठी काही ‘वाढीव खर्च’ (marginal cost) नाही, कारण एवीतेवी रिकाम्या खुर्च्यांनाच नाटक दाखवायचं!

यात फायदा दोन्ही बाजूंचा झाला असता – अंतूशेटना अर्ध्या तिकिटात नाटक पहायला मिळालं असतं, आणि नाटक कंपनीला चार आण्यांचं वाढीव उत्पन्न मिळालं असतं.

मॅनेजरचं अर्थशास्त्र म्हणा (किंवा व्यवहारज्ञान म्हणा) कच्चंच दिसतंय. अंतूशेटची ऑफर त्याने नाकारली.

काही व्यवसायच असे असतात, की ज्यात बहुतांशी खर्च हे ‘अचल’ असतात (fixed costs). नाटक हा त्यातलाच एक व्यवसाय – नाटकाचा संच, नेपथ्य, प्रवास असे अनेक खर्च अचल आहेत, पण प्रयोगावेळी तिकीटविक्री होईलच याची शाश्वती नाही. प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाला, तर निर्मात्याला प्रचंड फायदा, नाहीतर प्रचंड तोटा. नाटकधंद्यात जोखीम (risk) असते ती याचीच!

ज्या व्यवसायात अचल खर्च (fixed costs) जास्त असतील आणि विक्री (sale) होत नाही, तिथे अंतूशेटची ही कल्पना ग्राहकाचा फायदा करून देईल!

जे लोक नियमितपणे विमानप्रवास करतात त्यांना ही कल्पना राबवता येईल. समजा, विमान सुटायला पंधरा मिनिटं उरलेली आहेत आणि विमानात पाच जागा शिल्लक आहेत. एक प्रवासी येतो, म्हणतो, मला त्यातली एक जागा द्या, मी तुम्हाला पाचशे रुपये देतो. विमान कंपनीच्या दृष्टीने `अर्थशास्त्रीय वर्तणूक’ (economic behaviour) काय आहे?

विमान कंपनी काय विचार करेल पहा: त्या सीटचं भाडं खरं तर दोन हजार रुपये आहे, आणि त्यावर आपण एक हजार रुपये खर्च केलेला आहे. पंधराच मिनिटं हातात आहेत. जर या ग्राहकाला नाकारलं, तर विक्री तर रुपयाची होणार नाही, पण हजार रुपयांचा बांबू बसेल! त्यापेक्षा याला विमानात घेऊ या – पाचशे तर पाचशे! हजार रुपयांच्या खर्चातले पाचशे तर सुटले – चोराच्या हातची लंगोटी!

अंतूशेटचं अर्थशास्त्र असं आहे, मंडळी – मनोरंजनात शहाणपण, स्वार्थात परमार्थ! आम के आम और गुठलियों के दाम!

मुक्तकसमाजराहणीअर्थकारणप्रकटन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2013 - 4:31 pm | अत्रुप्त आत्मा

छान..................:-)

अमोल खरे's picture

1 Jan 2013 - 4:32 pm | अमोल खरे

हे खुप कॉमन आहे. विशेषतः शुक्रवारी रात्री. इच्छुकांनी आपापल्या जबाबदारीवर हा प्रयोग करुन बघावा. नेहेमीप्रमाणे मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेरुन विमाने येतात. उ.दा. जर एखादे विमान आले अमेरिकेवरुन आणि मुंबईत १ तास थांबुन ते जाणार आहे मद्रासला, तर अनेकजण ते विमान सुटायच्या आधी अक्षरशः घासाघीस करुन तिकिट घेतात आणि मद्रासला जातात. लेखात म्हणाल्याप्रमाणे काहीतरी पैसे मिळतील म्हणुन विमान कंपन्यापण स्वस्तात तिकिटे देतात. आता होतं काय की मद्रासला जाणारी विमाने डोमेस्टीक एअरपोर्ट म्हणजेच सांताक्रुझवरुन जातात, त्यामुळे ज्यांना ही घासाघीस होते ही गोष्ट माहित नाही, ते सांताक्रुझ एअरपोर्ट वर जातात. जी लोकं रिस्क घेतात ती सहार एअरपोर्ट वर जाऊन वर म्हणाल्याप्रमाणे तिकिट घेतात. आता ह्यात तिकिट न मिळण्याची रिस्क असली तरी रिटर्न्स (स्वस्तात तिकिट मिळण्याची संधी) पण आहेत. हे अर्थशास्त्राचं आणखीन एक तत्व आहे.

अशीच घासघीस मधल्यादिवशी म्हणजे सोमवार ते गुरुवार पुण्यात "वाकड" ह्या स्टॉपवर होते. हा स्टॉप बहुदा एक्स्प्रेसवेच्या आधी सगळ्यात शेवटचा आहे, त्यानंतर थेट एक्स्प्रेसवे, त्यामुळे ज्या काही सीटा भरायच्या त्या ह्याच स्टॉपवर भरता येतात. ज्यांना नीट घासाघीस करता येते ते लोकं अगदी १५०- २०० रुपयात मर्सिडीजच्या आलिशान बसमधुन येतात असे ऐकले आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अमोल!

तुम्ही म्हणता ती रिस्क कमी करण्याचे मार्ग आहेत. Skyscanner सारख्या संकेतस्थळांवरून अशा कनेक्टिंग फ्लाईट्स कुठल्या आहेत याची माहिती काढायची. ते विमान अमेरिकेहून सुटण्याच्या आधी त्या विमान कंपनीला (भारतात) फोन करून विमान कितपत भरले आहे याची माहिती काढायची, म्हणजे आपल्याला जागा मिळणार की नाही याची आगोदरच कल्पना येईल.
____

वाकडसारखाच प्रकार मुंबईच्या बाजूला कळंबोलीला पण चालतो. माझा एक मित्र दादर-पनवेल एसटीने कळंबोलीला उतरायचा आणि एक्स्प्रेसवेच्या आधीच्या McDonalds वरून (स्वस्तात) पुण्याची व्होल्वो पकडायचा. (अवांतर: एकदा तिथे त्याला एक वेश्या "अप्रोच" झाली. या साहेबांची फाटली आणि तेव्हापासून हा अव्यापारेषु व्यापार बंद पडला!)

जनहितार्थ इशारा: कळंबोली मॅक्डोनल्डच्या समोर "त्या" स्पॉटला आता अशा कारणाने थांबल्यास काही हजारांचा दंड आहे आणि कडकपणे पाळलाही जातोय असं दिसतं.

अनुप कुलकर्णी's picture

1 Jan 2013 - 5:01 pm | अनुप कुलकर्णी

कोल्हापूरच्या मार्केट-यार्डातपण रोज संध्याकाळी हा शीन असतो. विकला न गेलेला भाजीपाला अक्षरश: कवडीमोलात मिळतो. पण त्यात गोम अशी असते की जो काही चांगल्या प्रतीचा माल आहे त्याने आधीच उचल खाल्लेली असते त्यामुळे अशा ठिकाणी चांगला माल मिळेलच याची खात्री नाही. खरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रिस्क आहे!

इथे बेंगलोर मध्येही बऱ्याच बझारमध्ये expiry date जवळ येत असलेले पदार्थ/शीतपेये इ. सवलतीत विकतात. त्यामध्येही तेच धोरण असावं. पण खरी गोम अशी की आता आमच्यासारख्यांना माहिती झालय कि अमुक अमुक ठिकाणी शीतपेये हमकास सवलतीत मिळतात, तेंव्हा आम्हीही या प्रकाराला सोकावालो. आणि आता तर आम्ही शीतपेये घेतली तर सवलतीत घेतो नाहीतर वाट बघतो.

या "नाहीतर वाट बघतो" वृत्तीमुळे या अर्थशास्त्राला जरा फाटे फुटतात. उदा. जर वरती नमूद केलेल्या बझारमध्ये expiry date वाली शीतपेये सवलतीत विकली नसती तर आमच्यासारख्या सोकावलेल्या गिर्हीकानी झक मारत छापील किमतीला माल घेऊन टाकला असता. कारण तेंव्हा दुसरा पर्याय नसतो. पण आत्ता याची शाश्वती आहे कि या नाहीतर पुढच्या वीकांतला काही ना काहीतरी मिळेलच!

त्या मॅनेजरनं अन्तू बर्व्याना तिकीट नाकारले त्याचे तो सोकावू नये हेच कारण असावे!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अनुप!

शेतीमालाचं अर्थकारण हा एक भयानक प्रकार आहे. त्यात बहुतांश वेळेला शेतकरी भरडला जातो. चांगलं पीक आलं भाव पडतात आणि वाईट आलं तर उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. आडत्यांची दादागिरी, कृ.उ.बा.स. मधल्या लाथाळ्या हे वर. दहावी मराठीच्या पाठ्यपुस्तकात एका टोमाटो शेतक~याचा धडा होता (नाव आठवत नाही), त्याची आठवण झाली.

त्या मॅनेजरनं अन्तू बर्व्याना तिकीट नाकारले त्याचे तो सोकावू नये हेच कारण असावे!

हे मात्र अगदी बरोबर!

यातसुद्धा एक गोम आहे. अंतूशेटना पूर्ण तिकीट घेऊन नाटक पहायची सवय जरी लावली, तरी पुढच्या वेळेस हीच कंपनी नाटक घेऊन रत्नांगीस येईल कशावरून? म्हणजे, मॅनेजरच्या त्यागाचा फायदा दुस~याच नाटक कंपनीला व्ह्यायचा! पण असं जरी असलं तरी संपूर्ण नाटकधंद्याचा विचार करता हे बरोबर आहे. याला गेम थिअरी मध्ये coopitition (cooperation + competition) म्हणतात. विना सहकार....

केदार-मिसळपाव's picture

3 Jan 2013 - 12:04 am | केदार-मिसळपाव

बापरे... लाल चिखल...अजुनही आठवतोय तो धडा..

अनुप कुलकर्णी's picture

2 Jan 2013 - 12:54 pm | अनुप कुलकर्णी

रिस्क आणि खात्री यामुळे वस्तूची किंमत आणि मूल्य यामध्ये तफावत येते आणि त्यावरच "गेम" ठरतो!
उदा.
आमच्या बाबतीत कुठले शीतपेय आहे? किंवा ते आहे का नाही यापेक्षा ते किती सवलतीत आहे ते महत्वाचे ठरते. जर सवलतीत मिळाले नाही तर न घेण्याचीही तयारी असते. म्हणजेच आमच्या पदरी त्या शीतपेयाचे मूल्य त्याच्या किंमतीपेक्षा खूप कमी आहे! पण जर आधीच ठरवलेली पार्टी वगैरे असेल तर मात्र मिळेल त्या किंमतीला घ्यावे लागते.

पुणे-मुंबई प्रवासाची देखील तीच गत. जर मुंबईहून पहाटे २ चे अमेरिकेचे विमान गाठायचे असेल तर लोक वाकड पुलावर घासाघीस करत थांबणार नाहीत! तेंव्हा ३००० मोजून कॅब करून जाणे देखील परवडते!

अन्तुबार्व्याची पण तीच स्थिती आहे. बालगंधर्वांच्या एकच प्याल्यापुढे, "सिंधुदुर्ग बरा" वाटणाऱ्या सिंधू सारखे नट असलेल्या त्या एकच प्याल्याचे मूल्य अंतूच्या पदरी अगदीच कमी. पण स्वत: बालगंधर्व येणार असले तर हाच अंतू अशी घासाघीस करत बसला असता काय? पहिल्या रांगेचे तिकीट काढून बसेल!

चिगो's picture

1 Jan 2013 - 9:55 pm | चिगो

आवडेश.. बाळंतपण अगदी सुखरुप झालंय हो..:-)

स्पंदना's picture

2 Jan 2013 - 3:05 am | स्पंदना

मग लाडु बनवता की नाही डिंकाचे?

चिगो's picture

2 Jan 2013 - 11:28 pm | चिगो

मग लाडु बनवता की नाही डिंकाचे?

अवो तै, त्येला त्यांच्या 'पहिलटकरीण'चा संदर्भ होता.. बाकी रेसिपी दिल्यास बनवूही.. ;-)

आदूबाळ's picture

2 Jan 2013 - 3:04 am | आदूबाळ

अत्रुप्त आत्मा आणि चिगो - धन्यवाद!

आदुबाळ लेख अगदी फर्मास. पण मग काय होइल असे वाट पहाणारेच फार होतील अन मूळ किंमत मिळायचीच नाही मालाला.
माझ्या इथे एक फार्मर्स मार्केट आहे. ताज्या छान भाज्या मिळायच ठिकाण. वेनसडे टु सन डे. इअतर दिवशी तुम्हाला ऑस्ट्रेलियन्स दिसतील, अर्थात व्हाइट. ज्या भावाने माल घ्यायला हवा त्या भावाने घेणारे, तर रविवारी संध्याकाळी तेथे चायनिज जमायला सुरवात करतात. एक एक फॅमिली दहा माणसांची. ही दहा माणस काय करतात तर वेगवेगळ्या भाज्या फळे उचलायला सुरवात करतात. जेंव्हा ते या भाज्या उचलत असतात तेंव्हा भाव तेच असतात, पण ही माणस पे करायला जात नाहीत, इनस्टेड दे वेट. अगदी मार्केट बंद व्हायच्या वेळी दुकानदार जो माल आता खराब होणार आहे, अन शेवटचे दोन चार क्रेट उरलेत अस दिसत तेंव्हा पडिक भाव डिक्लेअर करतो, की मग हे चायनिज पेमेंट करायला राम्गेत उभारतात. आय हेट एनी पर्सन हु डिसिव्हज फार्मर्स. तुम्ही भाव कमी करुन मागायला त्याला कमी कष्ट नाही पडलेले असतात अस मला मनापासुन वाटत. त्याच रुपांतर आता मला चायनिज न आवडण्यात झालय. एकुण काय वाट पाहुन पडिक भावाने मागायची वृत्ती वाढली तर मूळ गोष्ट पडिक भावाने विकुन विकुन दिवाळ निघेल.

तुषार काळभोर's picture

2 Jan 2013 - 12:40 pm | तुषार काळभोर

म्हनजे भारतातला असो वा ऑस्ट्रेलियातला, शेतकर्‍यांच्या समस्या सारख्याच आहेत.
(तिथे इथल्या पेक्षा कमी असतील, पण आहेत..)

आय हेट एनी पर्सन हु डिसिव्हज फार्मर्स.

पूर्ण सहमत!!!!!!!!!!

अपर्णाताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

त्या फार्मर्स मार्केटच्या मालकाने रविवारी संध्याकाळी दुकानात येण्यासाठी "प्रवेश फी" आकारली तर या वृत्तीच्या लोकांना अंशतः का होईना पण चाप बसेल. पण माझा असा अंदाज आहे की त्या मालकालाही असे ग्राहक हवेच असणार. ही चिनी मंडळी आली नाहीत, तर तो माल विकला जाणार नाही, खर्च अंगावर पडेल. ऑस्ट्रेलिया सारख्या देशात नाशिवंत पदार्थांच्या विल्हेवाटीला जवळजवळ मूळ किंमतीएवढाच खर्च येत असावा. हे डबल नुकसान सोसण्यापेक्षा कोणालातरी पडत्या भावात विकून मोकळं झालेलं परवडलं.

पण हां - तो मालक याप्रकारच्या ग्राहकांना फक्त रविवारी संध्याकाळीच थारा देईल, एरवी दारात उभं करणार नाही.

त्याच रुपांतर आता मला चायनिज न आवडण्यात झालय.

आणि असं नका करू हो! पुलंच्याच एका लेखात पी. जी. वुडहाऊसची आठवण सांगितली आहे. दुस~या महायुद्धात वुडहाउसला नाझींनी बंदिवासात ठेवलं होतं. नंतर त्याला एका पत्रकाराने विचारलं, तुला जर्मन लोकांचा तिटकारा असेल ना? त्यावर वुडहाऊस म्हणाला "मी घाऊक प्रमाणात द्वेष करत नाही!" (I don't hate in plurals!)

फेकुन द्यायच्या मालाला त्यान पडका दर लावण वेगळ आदुबाळ, अन त्यान पडका भाव लावायच्या आधी चांगला माल घेउन पैसे न देता वाट पहात रहाण वेगळ. या दोन्हीत फरक आहे.
एकुण तुमचा किती चायनिज लोकांशी संबंध आहे मला माहिती नाही, पण इथे, ८०च्या रस्त्याला मला जायचय म्हणुन ४०न जाणारे ९०% चायनिज असतात. उरलेले १०% वृद्ध ऑस्सीज, पण हे लोक मग ओव्हरटेक करायच्या लेन मधे नाही दिसणार. चायनिज मात्र दिसतील. शाळेत समोर भारतिय आले की मी ही डोक्युमेटरी पाहिली त्यात भारताबद्दल अमक अमक भयान्क लिहिल होत हे बोलणारे चायनिज. दुसर्‍याला मुर्ख समजत शहाण्पण शिकवणारे अन आपली बाजु पडती आहे दिसल की मग त्या क्षणापासुन ईंग्लीश न येणारे मख्ख चायनिज.
मी आलेय सिंगापुर मधुन, पण एव्हन सिंगापोरीयन्स उज टु हेट चाय्नामेन. एकदम मॅनरलेस अन अप्पल्पोटी लोक.

नगरीनिरंजन's picture

2 Jan 2013 - 12:50 pm | नगरीनिरंजन

पर्फेक्ट मार्केटचे मिथ आणि आर्बिट्राज याची ही उदाहरणे आहेत.

शेवटाला स्वस्त देण्याची वहिवाट पडून वर अन्यत्र इतर काहींनी उल्लेख केल्याप्रमाणे रेग्युलर ग्राहक कमी होईल.

उपरोक्त उदाहरणात ही टुरिंग नाटक कंपनी असल्याने अंतू बर्व्याला स्वस्तात प्रवेश द्यायला हरकत नव्हती. पण आठवडाभर किंवा अधिक मुक्काम असलेले नाटक असते तर चारचौघांत अंतूला अशी सवलत मिळालेली बघून तीच पब्लिसिटी झाली असती आणि दुसर्‍या दिवशी उरलासुरला प्लॅनही मोकळा झाला असता अतएव ऐनवेळी कनातीतून स्वस्तात घुसू पाहणारेच बहुसंख्य निर्माण झाले असते..

दादा कोंडके's picture

2 Jan 2013 - 1:28 pm | दादा कोंडके

'क्लिअरन्स सेल'ने जो पर्यंत रेग्युलर ग्राहक अ‍ॅफेक्ट होत नाही तो पर्यंतच हा सौदा विक्रेत्याला फायद्याचा पडेल.
इलेक्टोनिक्स वस्तूंच मार्केट फास्ट आणि वोलाटाइल असूनही एखादं मॉडेल (त्याचच अ‍ॅडवान्स्ड मॉडेल त्याच्यापेक्षा कमी किमतीत आलं तरी) आहे त्याच साधारण त्याच किमतीत बाजारात उपलब्ध असतं.

पैसा's picture

2 Jan 2013 - 1:38 pm | पैसा

मनोरंजक पद्धतीने लिहिलेलं अंतु बर्व्याचे अर्थशास्त्र आवडलं. थोडंसं थांबून तीच वस्तू जरा स्वस्तात मिळत असेल तर जास्त पैसे का खर्च करा? हा सर्वसामान्य माणसाचा विचार. त्यात गैर काही नाही. राहिलेले पैसे इतर कुठे वापरता येतात. टी शर्टपासून गाड्यांपर्यंत वस्तू विकत घेण्यासाठी लोक क्लिअरन्स सेलची वाट बघतात. तसेच माल फुकट जाण्यापेक्षा चार पैसे कमी मिळाले तरी चालतील असा विचार बहुसंख्य व्यापारी करतात कारण त्यांचे पैसे अडकून रहात नाहीत. विक्रेता आणि ग्राहक दोघांचाही फायदा.

sagarpdy's picture

2 Jan 2013 - 2:19 pm | sagarpdy

पु भ प्र

५० फक्त's picture

3 Jan 2013 - 12:28 am | ५० फक्त

लहानपणापासुन ' हे पुल ' विनोदी लेखक या नजरेतुनच पाहात आलोय, एक नवा विचार दिल्याबद्दल धन्यवाद.

आदूबाळ's picture

3 Jan 2013 - 2:05 am | आदूबाळ

मोठी पावती दिलीत!

आणि अर्थशास्त्राबद्दल म्हणाल ते जिथेतिथे असतंच! पुलंचं लिखाण "जिवंत" आहे - त्यात अर्थशास्त्राचं प्रतिबिंब आहेच. "असा मी असामी" मध्ये तर १९५०-६० च्या दशकातल्या मध्यमवर्गीय अर्थकारणाचं झकास चित्रण आहे. (उदा. शंक~याचा निबंध: "माझे पपा धोतरात वांगी बांधून आणतात" किंवा धोंडोपंत जोशींच्या पत्नीच्या हातात पैशाचे व्यवहार असणे, वगैरे!)

विकास's picture

3 Jan 2013 - 12:50 am | विकास

साईनफिल्ड नामक विनोदी मालीका (story about nothing) बघताना केवळ आपण हसतो. पण एका इकॉनॉमिक्स च्या प्राध्यापकाने त्यातून अर्थशास्त्राचे धडे काढले आणि प्रत्येक एपिसोडवरून मुलांसाठी धडे तयार केले. ते http://yadayadayadaecon.com/ येथे पहाता येतील.

आदूबाळ's picture

3 Jan 2013 - 2:17 am | आदूबाळ

पहातो ही मालिका.

जोशुआ गान्स नावाच्या एका ऑस्ट्रेलियन प्राध्यापकाने तर त्याच्या मुलांना वाढवताना अर्थशास्त्राची तत्त्वं वापरली. कधी ती भलतीच परिणामकारक ठरली तर कधी तो तोंडावर आपटला. त्या अनुभवावर त्याने "पेरेंटॉनॉमिक्स" हे धमाल पुस्तक लिहिलं आहे. मुलांना "टॉयलेट ट्रेनिंग" देताना आलेल्या अनुभवांचे किस्से तर कमाल!

योगप्रभू's picture

3 Jan 2013 - 11:42 am | योगप्रभू

छान विषय आहे.
व्यवहारी वृत्ती आणि काटकसरीपणा हा उपयुक्त असतोच, पण बर्‍याचदा त्यातून हलकट आणि कोडगेपणाकडे प्रवास सुरु होतो.
मला आठवतंय. आमच्या कॉलेज जीवनात बाहेरगावी राहाताना आम्ही खासगी मेसवर जेवायचो. त्या छोट्याशा गावात मेसवाल्यांमध्येही स्पर्धा होती. सगळ्यात जास्त मेंबर मिळवणे म्हणजे गर्दीचे मानसशास्त्र. पर्यायाने व्यवसायाची माउथ पब्लिसिटी फुकटात. तर एकदा माझा मित्र म्हणाला, 'काय रे! तुमच्या मेसला महिन्याला ३५० रुपयांत (त्यावेळचा दोन वेळच्या जेवणाचा दर) काय काय देतात?'
मी म्हटलो, ' पोळी-भाजी-भात-आमटी आणि मधून-अधून चटणी, कोशिंबीर इतकंच.'
त्यावर तो म्हणाला, ' अरे आमच्या मेसला तेवढेच रुपये घेतात, पण रोज जेवणात सॅलड, चटणी आणि दहीपण असते.' मग मी एकदा ते जेवण चाखून बघितले आणि त्या माणसाला या गोष्टी अ‍ॅड-ऑन देणे कसे परवडते, याच्या तपासाला लागलो. जे बघितले त्यातून मानवी स्वभावातील कल्पकतेचे कौतुक करावे, की हलकटपणाचा तिरस्कार करावा, हाच गुंता झाला. त्याच्या व्यवसायाचे रहस्य 'कल्पक हलकटपणा' होते.
कोणत्याही मेसवाल्याला पोळ्यांसाठी बाजारातील उत्तम लोकवन किंवा सिहोर गहू वापरणे परवडणारे नसते. ते बहुतेकवेळा वर्षभरासाठी भरलेला स्थानिक स्वस्तातील गहू वापरतात आणि मग त्यात त्यात रेशनवर मिळणार्‍या गव्हाची मिक्स करतात. बरेचजण आट्याच्या पोळ्या घालतात.
तर हा यशस्वी मेसवाला गिरणीत चक्कीच्या बाजूला पडलेले पीठ गिरणीवाल्याकडून २५ पैसे किलो दराने घेऊन त्याची मिसळ स्वस्त गहू + रेशनचा गहू या पीठात करायचा. त्यामुळे पोळ्यांमध्ये किंचितसा काळसरपणा येई, पण ते कुणाला समजत नसे. सॅलडबाबत मात्र त्याचे कौतुक करायला लागेल.शेतकरी बाजारात आल्यावर वाहतुकीत मार लागून फुटलेले टोमॅटो, जून झालेल्या काकड्या वेगळ्या टोपलीत काढत. असा माल हा इसम स्वस्तात उचलत असे. घरी आल्यावर खराब भाग कापून टाकायचा. टोमॅटो-निबर काकड्या-गुरांनी खाण्यासारखी गाजरे-वरुन सडके दिसणारे कांदे यातील चांगला राहिलेला भाग नीटस कापून त्याचे सॅलड करत असे. डंकावर खाली पडलेले तिखट-मसाले यांचा गाळ वापरुन त्यात अक्ख्या लसणाच्या पाकळ्या, वाळका कडीपत्ता घाले. कारळे-जवसाचा कूट घातल्यावर अशी चटणी समजूनही येत नसे. एका डेअरीवाल्याशी संधान बांधून स्वस्तात आंबलेले दही घेत असे. घरी येऊन त्यात पाणी घालून ठेवे. आंबट साका फेकून दिल्यावर दह्याला वास येत नसे. अशा रीतीने हा माणूस स्पर्धकांच्या तुलनेत तेवढ्याच किंमतीत अ‍ॅड-ऑन्स देऊन गिर्‍हाईके खेचत असे.
खरं तर घाऊक खरेदीचा फायदा उठवून दर्जेदार जेवण देणे अशक्य नसते, पण कच्च्या मालाच्या किंमती अत्यंत कमी राखून जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी 'स्वस्त-फुकट-खराब-भेसळ' या दिशेने प्रवास होत असावा.

बॅटमॅन's picture

3 Jan 2013 - 1:03 pm | बॅटमॅन

व्यवहारी वृत्ती आणि काटकसरीपणा हा उपयुक्त असतोच, पण बर्‍याचदा त्यातून हलकट आणि कोडगेपणाकडे प्रवास सुरु होतो.

जे बघितले त्यातून मानवी स्वभावातील कल्पकतेचे कौतुक करावे, की हलकटपणाचा तिरस्कार करावा, हाच गुंता झाला. त्याच्या व्यवसायाचे रहस्य 'कल्पक हलकटपणा' होते.

खरं तर घाऊक खरेदीचा फायदा उठवून दर्जेदार जेवण देणे अशक्य नसते, पण कच्च्या मालाच्या किंमती अत्यंत कमी राखून जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी 'स्वस्त-फुकट-खराब-भेसळ' या दिशेने प्रवास होत असावा.

ही वाक्ये लै आवडली.

नितिन थत्ते's picture

3 Jan 2013 - 2:12 pm | नितिन थत्ते

अनेकदा कारखान्यातली यंत्रे पूर्णतः उपयोगात येत नसतील तर 'मटेरिअल कॉस्ट' + थोडा नफा एवढ्या किंमतीला उत्पादने बनवून द्यायला कारखानदार तयार होतो. याला मार्जिनल कॉस्टिंग म्हणतात.

यात धोका असतो तो म्हणजे या किंमतीला वस्तू मिळत असल्याने मागणी वाढते + त्याच किंमतीची वहिवाट होते. नंतर कारखान्याची क्षमता संपल्यावर अधिकची क्षमता बाहेरून मिळवण्यात जास्त खर्च होऊन आतबट्ट्याचा व्यवहार होतो.

वर काही प्रतिसादकांनी हा विचार मांडलाच आहे.

उदाहरण: माझ्या कारखान्यात समजा ८ तास काम चालते. पण सध्या माझ्याकडे आठ तास पुरेल एवढे काम नाही. (सुमारे ६ तास पुरेल एवढेच काम आहे). हे अतिरिक्त दोन तास उपयोगात यावेत म्हणून मी एका ग्राहकाला कच्च्या मालाची किंमत + १ रुपया एवढ्या किंमतीला माल देण्यास तयार होतो. मला तो ग्राहक ऑर्डर देतो.

हळुहळू त्या ग्राहकाची ऑर्डर वाढत जाते आणि त्याची मागणी पुरी करायला दोन तास पुरेनासे होतात. आता त्याची मागणी पुरी करायची तर मला कामगारांना ओव्हरटाईम देऊन दुप्पट दराने काम करून घ्यावे लागते. हे किंमतीचे गणित पुरतेच चुकते. कारण मी आधी फक्त कच्च्या मालाचीच किंमत खर्चात धरली होती. पण आता मला माल बनवण्यासाठीही (मनुष्यबळ) अधिकचा खर्च करावा लागतो. पण ग्राहक मला किंमत वाढवून देत नाही. म्हणजे मला या नव्या ग्राहकाची ऑर्डर तोट्यात पडू लागते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Jan 2013 - 11:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकदम बरोबर. अश्या वेळी २ तास यंत्र रिकामी असलेली पर्वडतात.

अभ्या..'s picture

1 Nov 2015 - 12:33 pm | अभ्या..

अश्या वेळी बंद ठेवलेली परवडतात हे मान्य. कदाचित ह्या मशीन्स ऑन ऑफ मेथडने चालत असतील. म्हणजे ऑन केले की प्रॉडक्शन चालू ऑफ केले की बंद. पण काही ठिकाणी मशीन्स ना बंद करणे परवडत नाही. उदा. आमच्या फिल्ड मधले ऑफसेट मशीन. चालू असते तोपर्यंत चालू. एकदा बंद करायचे म्हणले की सगळ्या सिलिंडरची इंक रिमूव्ह करुन (ती वेस्ट जाते) कोम्प्रेसर ऑफ ठेवून मशीन क्लीन करणे अन ऑन करताना परत प्रोसीजर रिपेट करण्यापेक्षा मशीन चालूच ठेवणे परवडते. मग त्या टाइमस्लॉट मध्ये एखादे फक्त ऑपरेटिंग कॉस्ट देणारे काम जरी असले तरी परवडते.

मस्त चर्चा! अर्थशास्त्राचा हाही पैलू विचारात घेण्यासारखा आहे.

हेमंत लाटकर's picture

7 Oct 2015 - 7:36 am | हेमंत लाटकर

आदूशेठ मस्त लेख

शित्रेउमेश's picture

7 Oct 2015 - 12:41 pm | शित्रेउमेश

आदूशेठ मस्त लेख...

आवडेश.....

पद्मावति's picture

7 Oct 2015 - 1:23 pm | पद्मावति

मस्तं लेख. वेगळा विचार.
मला वाटतं बर्याच संग्रहालये, थीम पार्क्स, झू मधे पण ऑफ पीक वेळेस म्हणजे संग्रहालय, झू बंद होण्याच्या साधारण २ तास आधी तिकिटे कमी दरात असतात बहुतेक.

छान लेख आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातले प्रतिसादही उत्तम.
या आधी वाचायचा राहून गेला होता.

यमन's picture

7 Oct 2015 - 7:29 pm | यमन

चालू ठेवा .
माझाही विचार आहे . अर्थशास्त्रा वर लिहिण्याचा .
पुढील भाग वाचण्यास उत्सूक .

अभिजीत अवलिया's picture

8 Oct 2015 - 8:51 am | अभिजीत अवलिया

लेख आणी प्रतिक्रिया आवडल्या.

हॅपि अवर्स हि कल्पना सुध्हा याचाच एक भाग आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Nov 2015 - 11:48 am | माम्लेदारचा पन्खा

हाजिर तो वजीर....पण जे हवंय ते न मिळाल्यास अपेक्षाभंगही होऊ न देणंही तितकंच गरजेचं....