व्हायरस हंटर

हारुन शेख's picture
हारुन शेख in जनातलं, मनातलं
20 Jul 2012 - 3:05 pm

त्याला विषाणू संशोधनातला 'इंडियाना जोन्स' म्हणतात. टाईम मासिकाने २०११ साली जगातल्या १०० सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये त्याची निवड केलेली आहे.'स्टॅनफर्ड विश्वविद्यापीठाचे' सन्माननीय प्राध्यापकपद तो भूषवतो. आणि जिथे आधुनिक युगातील प्रगतीचा आणि सुखसुविधांचा गंधही नाही अशा आफ्रिका आणि आशियाच्या घनदाट वर्षावनांमध्ये अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत रक्ताचे नमुने गोळा करत फिरत असतो. तीन वेळा त्याला मलेरियाचा जीवघेणा संसर्ग झालेला आहे. तिसर्या वेळचा संसर्ग तर इतका भयानक होता कि साक्षात मृत्युच्या दारातून तो परत आलाय. तरीही त्याचं काम अथकपणे चालू आहे.'नॅथन वूल्फ' हा माणूस केवळ एक वैज्ञानिक नाही तो विषाणूंबद्दल संपूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलून टाकणारा 'झंझावात' आहे.

उत्क्रांतीच्या बाबतीत 'विषाणू' हे माणसाचे पृथ्वीवरील सर्वात कडवे प्रतिस्पर्धी आहेत. ठराविक काळाच्या अंतराने ते भयानक महामारीच्या स्वरुपात आपल्यापुढे येत असतात. मानवी इतिहासात सगळ्यात जास्त मृत्यू विषाणूंमुळे झालेले आहेत. १९१८ साली आलेल्या एन्फ्लूएंझाच्या साथीत ५ कोटी माणसं मेली होती (ही संख्या पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात मेलेल्या एकूण सैनिकांच्या संख्येपेक्षा जास्त आहे, आणि त्या काळच्या जगाच्या लोकसंख्येच्या ३%), एड्समुळे आजपर्यंत २ कोटी १० लाख लोकं मेली आहेत त्यात १ कोटी ७५ लाख मोठी माणसे आणि ४३ लाखाच्या आसपास १५ वर्षाखालील लहान मुले आहेत, आत्ताआत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर H1N1 (स्वाईन फ्लू) मुळे ३६००० लोकं मेली आहेत आणि मरत आहेत. हे मातबर विषाणू सोडले तर पोलिओ, रेबीज, हेपेटाइटीस,H5N1 (बर्ड फ्लू), SARS, HPV, Herpes हे विषाणूपण तितकेच प्राणघातक आहेत.

विषाणूंविरुद्धच्या आपल्या लढाईत आतापर्यंत आपण आपले सर्व लक्ष महामारीला पसरण्यापासून कसे रोखायचे , विषाणूंविरुद्ध लस अथवा प्रभावी औषधे कशी विकसित करायची यावर केंद्रित केले होते. पण विषाणूविरुद्ध हि पारंपारिक पद्धत आताशा निकामी ठरते आहे. गेली तीस वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू असूनही आपल्याला एड्सच्या विषाणूवर लस बनवता आलेली नाहीये. H1N1 (स्वाईन फ्लू) विरुद्ध लस बनण्यापूर्वी त्याने हजारो लोकांचे बळी घेतले होते. एकूणच विषाणूंशी आपली लढाई आपण हरतोय कि काय असे चित्र निर्माण झाले असतांना नॅथन वूल्फने GVFI (GLOBAL VIRAL FORECASTING INTIATIVE ) ही संस्था स्थापन करून नवीन दिशा दाखवली.

हॉपकिन्स विश्वविद्यापिठात पोस्ट डॉक्टरेट रीसर्च करतांना त्याच्या लक्षात आले कि आत्तापर्यंत झालेल्या विषाणूसंक्रमणाच्या मोठ्या घटनांमध्ये प्रत्येक वेळेस पाहिलं संक्रमण प्राण्यांपासून माणसात झालं आहे. (cross-species transmission) त्यातही मनुष्यसदृश प्राणी म्हणजे चीम्प, एप माकडं,गोरील्ले यांच्यापासून संक्रमणाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. कुठलीही विषाणूजन्य महामारी प्रभावीपणे रोखायची असेल तर हे पाहिलं संक्रमण रोखलं गेलं पाहिजे. पण त्या दृष्टीने कुठलेच प्रयत्न होत नव्हते. तातडीनं कुणी तरी यावर काम सुरु करणं आवश्यक होतं. वूल्फने रिसर्च गुंडाळून ठेवली, हॉपकिन्समधल्या सहप्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. आणि सरळ कॅमरून हा आफ्रिकेचा घनदाट वर्षावनांनी गजबजलेला देश गाठला. इथले स्थानिक आदिवासी वर्षावनांमध्ये माकडं, साळून्द्री, घुशी इत्यादी प्राण्यांची शिकार पूर्वापार करत आले आहेत. ह्या प्राण्यांच्या मांसावर ते गुजराण करतात (Bushmeat practice). विषाणूंना प्राण्यांपासून माणसांवर संक्रमित होण्यासाठी हे सर्वात आदर्श ठिकाण होतं. एड्सचा विषाणू (HIV) हा प्रथम चिम्पान्झी माकडाच्या रक्ताशी मानवी रक्ताचा संपर्क आल्यामुळे संक्रमित झाला होता. ह्या संक्रमणामागे bushmeat प्रकार असण्याची वूल्फला जवळजवळ खात्री होती. त्यामुळे वूल्फने इथे लक्ष केंद्रित करायचे ठरवले. क्यामरूनच्या शिकारी आदिवासी टोळीतल्या लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करायला सुरुवात केली. ते लोक जेंव्हा शिकारीसाठी जात तेव्हा वूल्फ पण त्यांच्यासोबत जात असे. मारलेल्या प्राण्यांच्या रक्ताचे नमुनेही तो गोळा करी. शिवाय जंगलात निसर्गतः मरणार्या प्राण्यांच्या रक्ताचे नमुनेही तो घेत असे.

ह्या नमुन्यांचं प्रयोगशाळेत विश्लेषण केले जाई आणि त्यात आढळलेल्या विषाणूंचा अभ्यास करून नोंद ठेवली जाई. एखादानवीन विषाणू आढळल्यास त्याचा विस्तृत आढावा घेऊन ती माहिती GVFI पत्रकाद्वारे जगभर प्रसिद्ध केली जाई. वूल्फने सुरु केलेल्या या संस्थेने आत्तापर्यंत अनेक नवीन विषाणू शोधले आहे. सतत विषाणूंच्या मागावर असल्यामुळे GVFI ला गमतीने 'विषाणूंची CIA' म्हंटले जाते. नव्याने शोधलेल्यांत काही एड्सच्या विषाणूंशी साधर्म्य दाखवणारे (Retroviral) विषाणू आहेत. काही तर आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहेत. त्यांची मारकक्षमता, संक्रमणक्षमता, जनुकीय रचना या गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे. २००४ साली वूल्फला आढळून आलं कि कॅमरूनच्या जंगलातील आदिवासींच्या एका टोळीतील लोकांना एका नव्याच विषाणूची लागण झाली आहे. हा विषाणू (simian foamy virus) एड्सप्रमाणेच मानवी रोगप्रतिकारक्षमतेवर हल्ला करणारा होता पण मारकक्षमतेत एड्सपेक्षा जास्त भयानक होता. आणि एड्सप्रमाणेच पसरण्याची क्षमताही त्याच्यात होती. ह्या शोधामुळे जगभर खळबळ माजली. देशोदेशींची सरकारे झोपेतून जागी झाली. जंगली प्राण्यांमध्ये सामान्यपणे आढळणारे विषाणू किती सहजासहजी माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतात व हि समस्या किती गंभीर आहे याची जाणीव जगाला झाली.आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित झाली.

विषाणूंचा पाठलाग हे काम तसं खूप जिकिरीचं आहे आणि त्यासाठी लागणारी संसाधनं खूप खर्चिक आहेत. जीवाला असलेला धोका वेगळाच. पण तरीही वूल्फने हार न मानता काम सुरु ठेवलं. नंतर गूगल आणि अमेरिकन सरकारच्या लाखो डॉलर्सच्या आर्थिक पाठबळाने कामाचा आवाका वाढता ठेवला. वूल्फ म्हणतो कि "आपल्याला भविष्यातली एक जरी मोठी साथ टाळता आली तरी सगळी गुंतवणूक वसूल होईल." आज जगभरातले १०० वैज्ञानिक GVFI मध्ये काम करत आहेत. या जाळ्यात विषाणूतज्ञ आहेत, महामारीतज्ञ आहेत, संगणक तज्ञही आहेत. GVFI अंतर्गत मध्य आफ्रिकेतले देश, आणि आशियातले चीन, मलेशिया, लाओस या ठिकाणी नव्या विषाणूंचा शोध घेणारी केंद्रे स्थापन केली गेलीयेत. चीन आणि इतर पूर्व आशियाई देशांमध्ये Bush meat प्रकार नसला तरी जंगली प्राणी मार्केटमध्ये खाण्यासाठी सर्रास विकले जातात. तिथेही विषाणूंची प्राण्यांवरून माणसांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता वाढते.

वूल्फ फक्त एवढेच करत नाहीये तर Bush meat शिकाऱ्यांना आरोग्यदृष्ट्या घ्यायच्या काळजीचे प्रशिक्षण तो देतो जेणेकरून विषाणूंचा प्रसार टाळता येईल. वर्षावनांमधल्या प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन यावरही तो काम करतो. विषाणूंबद्दलचे त्याचे ज्ञान अफाट आहे आणि ते सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. स्टॅनफर्ड मध्ये विषाणूंवरची त्याची कार्यशाळा हि विद्यार्थ्यांना एक पर्वणी असते. ‘The Viral Storm' हे त्याचे पुस्तक विषाणूविज्ञानाबद्दल उत्सुकता असणार्या सगळ्यासाठी मनोरंजक माहितीचा खजिना आहे.

विषाणू विरुद्ध माणूस हे अस्तित्वाचं युद्ध आहे. ते अनंतकाळ चालेल. या युद्धात सध्या तरी विषाणू बलाढय आहेत. पण नॅथन वूल्फ या वैज्ञानिकाने आपण ते युद्ध कधीतरी नक्कीच जिंकू शकू अशी आशा निर्माण केली आहे. मानवी प्रज्ञेने घेतलेली हि आणखी एक मोठी झेप.

मौजमजालेखसंदर्भशिफारसमाध्यमवेधमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

20 Jul 2012 - 3:20 pm | नाना चेंगट

लेखन आवडले.

इरसाल's picture

20 Jul 2012 - 3:22 pm | इरसाल

लेख आवडला. अजुन वाचायला आवडेल.

हारुन शेख साहेब, अतिशय उत्तम लेख आहे.
अश्याच एका अतिघातकी विषाणु ऐबोला वर एक मराठीत अनुवादीत केलेल पुस्तक वाचल होत.

नॅथन वूल्फ सारखी तळमळीने काम करणारी लोक आहेत म्हणुनच विषाणुंचा प्रसार रोखणारी कामे होतील अशी आशा वाटते.

मी_आहे_ना's picture

20 Jul 2012 - 3:39 pm | मी_आहे_ना

असेच म्हणतो

आत्मशून्य's picture

20 Jul 2012 - 3:45 pm | आत्मशून्य

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2012 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय माहितीपूर्ण असा लेख. लेख आवडलाच.

हारुन शेख, नॅथन वूल्फ च्या कार्याचा आलेख तुम्ही मांडला नसता तर मला वूल्फच्या कार्याची ओळख तरी झाली असती का, असे वाटले. उत्तम अशा माहितीपूर्ण लेखनाबद्दल आपले मनःपूर्वक आभार........!!!

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

20 Jul 2012 - 4:32 pm | बॅटमॅन

मस्त लेख!

रोचक विषय... यापुढेही आणखी असेच वेगवेगळे विषय वाचायला आवडेल.

उत्तम ओळख करुन दिलीत.
धन्यवाद :)

मृत्युन्जय's picture

20 Jul 2012 - 4:44 pm | मृत्युन्जय

साली वूल्फला आढळून आलं कि कॅमरूनच्या जंगलातील आदिवासींच्या एका टोळीतील लोकांना एका नव्याच विषाणूची लागण झाली आहे. हा विषाणू (simian foamy virus) एड्सप्रमाणेच मानवी रोगप्रतिकारक्षमतेवर हल्ला करणारा होता पण मारकक्षमतेत एड्सपेक्षा जास्त भयानक होता. आणि एड्सप्रमाणेच पसरण्याची क्षमताही त्याच्यात होती. ह्या शोधामुळे जगभर खळबळ माजली.

या रोगाचे नाव काय? याचे पुढे काय झाले?

बाकी लेख रोचक. खुपच छान माहिती.

हारुन शेख's picture

20 Jul 2012 - 6:19 pm | हारुन शेख

SFV हा मानवी रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करणारा विषाणू आहे (Retroviral). एड्ससारखाच. त्याच्यामुळे होणारा आजार एड्सच म्हणवला जातो. होस्ट शरीरात संक्रमित झाल्यावर हे विषाणू सुप्तावस्थेत जातात आणि बर्याच काळानंतर घातक रुपात प्रकट होतात तेव्हा रोगप्रतिकारक्षमता जवळजवळ नष्ट झालेली असते. असा माणूस मग इतर साध्या साध्या (सर्दी, खोकला) विषाणूंनाही प्रतिकार करू शकत नाही. एड्स ने बाधित मनुष्य मरतो तो सर्दी खोकल्यासारख्या संसर्गामुळे. कारण प्रतिकारशक्ती शून्य. SFV वर संशोधन सुरु आहे. त्याने महामारीचे रूप धारण केलेलं नाहीये. thanks to wolfe.

लेख आवडलेल्या सगळ्यांचे आभार !

जे.पी.मॉर्गन's picture

20 Jul 2012 - 4:45 pm | जे.पी.मॉर्गन

नॅथन वूल्फची साइट आणि GVFI च्या वेबसाईटवरही खूप रोचक माहिती आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इतक्या क्लिष्ट विषयाबद्दल किती सोपं करून सांगितलंय हो! हारून... ह्या झपाटलेल्या माणसाची ओळख करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद.

जे पी

गणेशा's picture

20 Jul 2012 - 7:16 pm | गणेशा

एकदम असेच म्हणतो आहे.

मोदक's picture

21 Jul 2012 - 1:45 am | मोदक

सहमत..

एकदम सोप्पी करुन दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार..

टुकुल's picture

20 Jul 2012 - 9:50 pm | टुकुल

एकदम सोप्प्या भाषेत वुल्फ आणी त्याच्या कामाची ओळख करुन दिलित. काही दिवसांपुर्वी http://www.ted.com/ वर विषाणु संदर्भात एक कार्यक्रम पाहत होतो आणी मला वाटतेय कि तो वुल्फचाच होता.

--टुकुल

स्मिता.'s picture

20 Jul 2012 - 5:12 pm | स्मिता.

नेहमीपेक्षा वेगळ्या तरी महत्त्वाच्या विषयावर रोचक लेख वाचायला मिळाला. तसेच नॅथन वूल्फ यांच्या कार्याची माहितीही आवडली. या विषयावर आणखी वाचायला नक्की आवडेल.

स्पंदना's picture

20 Jul 2012 - 5:49 pm | स्पंदना

अतिशय रोचक लिखाण.

मन१'s picture

20 Jul 2012 - 5:57 pm | मन१

वेगळ्या विषायावरचा, चांगला लेख.
बादवे रोडिज नावाचा एक किळसवाणा कार्यक्रम बघायची वेळ माझ्यावर पूर्वी यायची. भारतभर एमटीव्हीवर प्रसारित होणार्‍या ह्या कार्यक्रमाचा प्रमुख सूत्रधार( मराठीमध्ये सांगायचं तर "अँकर") होता रघू.
त्यानं कार्यक्रमात एका बिचार्‍या स्पर्धकाला (शाब्दिक) तुडवताना सांगितलं होतं
"साल्याहो.... मी काहीएक वर्षे एका एड्स संबंधी काम करणार्‍या एनजीओ मध्ये काम केलेलं आहे. माकड किंवा इतर कुठल्याही मानवेतर(चिंपाझी सदृश ) प्राण्याकडून एड्स संक्रमित झाला हा शुद्ध गैरसमज आहे. तो पद्धतशीरपणे पसरवण्यात येतोय."

पैसा's picture

20 Jul 2012 - 6:28 pm | पैसा

वुल्फ नावाला जागला खरा! अतिशय उत्तम ओळख करून दिलीत. असे आणखी काही लेख वाचायला आवडतील!

स्वप्नाळू's picture

20 Jul 2012 - 6:36 pm | स्वप्नाळू

रीचर्ड प्रेस्टन या लेखकाच्या "द हॉट झोन" या पूस्तकात या विषाणू बद्दल सविस्तर माहिती आहे. ते पुस्तक वाचल्यावर " अज्ञाना त सु़ख असते." हे पटले होते. खालील लिन्क वर या पूस्तकाची माहिती वाचता येइल.

http://en.wikipedia.org/wiki/The_Hot_Zone

सोत्रि's picture

20 Jul 2012 - 7:23 pm | सोत्रि

हारुनशेठ, धन्यवाद ह्या माहितीबद्दल!

-(एक अनुपद्रवी जंतू) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2012 - 7:23 pm | प्रभाकर पेठकर

अशी मानवजातीच्या सुरक्षेसाठी आयुष्य वेचणारी माणसे विरळाच.
धन्यवाद हारुन शेख. तुमच्या मुळे ह्या अवलियाची ओळख झाली.

राजघराणं's picture

20 Jul 2012 - 7:33 pm | राजघराणं

ओघवती भाषा. लेख आवडला.....

प्रचेतस's picture

20 Jul 2012 - 8:18 pm | प्रचेतस

माहितीपूर्ण लेख.
आवडला.

सुनील's picture

20 Jul 2012 - 9:09 pm | सुनील

वेगळ्या विषयावरील लेख आवडला.

हारून भाई, सुंदर लेख. आवडला. धन्यवाद!


नॅथन वुल्फ

लेखात फोटो दिसला नाही म्हणून म्हंटलं आपण इथे प्रतिसादात द्यावा.

हारुन शेख's picture

20 Jul 2012 - 10:24 pm | हारुन शेख

प्रास यार खूप प्रयत्न केला फोटो टाकायचा ,जमलं नाही. धन्स !

माहितीपूर्ण लेखन आवडलं

पांथस्थ's picture

20 Jul 2012 - 10:35 pm | पांथस्थ

हारुन,

लेख झकास आहे. नॅथन वोल्फ च्या कार्याचा परिचय करुन दिल्याबद्दल आभार. असेच काहि काहि नवीन वाचायला मिळेल अशी आशा!

वीणा३'s picture

20 Jul 2012 - 10:46 pm | वीणा३

माहितीपूर्ण लेख.

चिगो's picture

20 Jul 2012 - 11:26 pm | चिगो

रंजक माहिती.. लेखासाठी आभार शेखसाब..

अर्धवटराव's picture

21 Jul 2012 - 2:06 am | अर्धवटराव

कसली अचाट कामे करतात पब्लीक... आणि या अवलीयांबद्दल साधी माहितीही नसते आमच्यासारख्यांना.
धन्यवाद हारुन दादा.

बाकी हे वुल्फ महाराज दिसतात लै बेस्ट. एखादा हुच्च कोटीचा संगीतज्ञ वगैरे वाटतो.

अर्धवटराव

हरिप्रिया_'s picture

21 Jul 2012 - 7:12 pm | हरिप्रिया_

आवडेश!!

चित्रगुप्त's picture

21 Jul 2012 - 7:25 pm | चित्रगुप्त

उत्तम लेख व माहिती.
थोडेसे विषयांतर करून विचारतो की भाजीपाला, फळे इ. वनस्पतिजन्य खाद्यपदार्थातून सुद्धा असे विषाणु संक्रमित होतात का? (नसतील, तर शाकाहार जास्त सुरक्षित, असे म्हणता येईल).

हारुन शेख's picture

23 Jul 2012 - 4:50 pm | हारुन शेख

भाजीपाला, फळे इ. वनस्पतिजन्य खाद्यपदार्थातून विषाणू संक्रमणाची उदाहरणं कमी आहेत. पण जीवाणू संसर्ग मात्र बर्यापैकी होतात. Salmonella, E. coli ह्या जीवाणूंची फळे आणि भाजीपाल्यातून संसर्गित होण्याची बरीच उदाहरणं जगभर नोंदवली गेली आहेत.हे जीवाणूसंसर्ग माती, शेतीला पुरवले जाणारे संसर्गित पाणी, कमी कुजलेले सेंद्रिय खत, शेतीत उपयोगात येणारी संसर्गित जनावरे, शेतमाल हाताळणारे संसर्गित मजूर, धूळ , घाण अश्या अनेक पद्धतीने शेती उत्पादनात पसरतात. तरीही फळे आणि भाजीपाला मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे किंवा उकड्ल्यामुळे संसर्गाचा धोका खूप कमी होतो.

लेख माहितीदार आहे

थोडा थोडा समजून घेत सिप बाय सिप वाचणार आहे

प्रीत-मोहर's picture

23 Jul 2012 - 11:19 am | प्रीत-मोहर

मस्त ओळख. या विषयावर अजुन लेख वाचायला आवडतील.

प्यारे१'s picture

23 Jul 2012 - 12:09 pm | प्यारे१

छान माहिती.
आमच्यापर्यंत 'संक्रमित' केल्याबद्दल आभार. ;)

सुमीत भातखंडे's picture

23 Jul 2012 - 2:53 pm | सुमीत भातखंडे

चांगली ओळख करून दिलीत या अवलियाची.
धन्यवाद!

चौकटराजा's picture

24 Jul 2012 - 10:12 am | चौकटराजा

दहा वर्षापूर्वी एबोला या भयानक व्हायरस वर आधारित कंटेजन ही कादंबरी वाचली होती. शिवाय डॉ जॉन ड्वायर यांचे body at war हे पुस्तक वाचले आहे. मानवी प्रयोगशाळेला मागे टाकणारी संशोधकता व्हाय्ररस मधे असते. कधी वायरस नी २ चेंडूत १६२ धावा काढा असा डकवर्थ लुईस रूल मानवजातीला
लावला तर ??? तर ????

प्रचेतस's picture

24 Jul 2012 - 11:21 am | प्रचेतस

एबोला व्हायरसवर आधारीत कादंबरी रिचर्ड प्रेस्टनची ' द हॉट झोन' ही होती. कंटेजन मेडीकल थ्रिलरच आहे पण दुसर्‍या रोगांवर.