प्लॅनेट ऑफ एप्स् (सिरिज)

Primary tabs

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
15 Jan 2012 - 2:01 am

विसु. : ही चित्रपटाची ओळख वा परिक्षण नाही.

फार तर सहावी सातवीत असेन, तेव्हा दुरदर्शनवर शनीवारी की रविवारी रात्री इंग्रजी चित्रपट लागायचे. मराठी माध्यमवाले आम्ही, आमचं इंग्रजी यथा तथाच होतं. (कोण रे तो अजुनही तसच आहे म्हणतोय?) पण इंग्रजी सिनेमे आवडायचे. मुकपट समजुनच पहायचो. तर एका शनीवारी की रवीवारी रात्री मामाचा फोन आला की एक मस्त चित्रपट लागाय बघ. तेव्हा वाहिन्यांच जंजाळ नव्हतं त्यामुळे दुरचित्रवाणीसंच लावताच चित्रपट नुकताच चालु झालेला दिसला पण तरी चित्रपटाचं नाव आधीच येउन गेलं होतं. (कारण पुढे ते दिसलं नाही, आणि दुरदर्शन वाल्यांनी पुन्हा एकादी पाटी टाकण्याचे कष्ट घेतले नाहीत.) एक अंतराळ यान आणि २-३ वीर दिसले. वाह काही तरी सायंटीफीक चित्रपट दिसतोय म्हणुन खुश झालो. (स्टारट्रेकने आधीच खुळ लावलं होतं) यान कुठल्याश्या ग्रहावरल्या सरोवरात की समुद्रात कोसळलं होतं. आतल्या अंतराळविरांची बाहेर पडण्याची धडपड चालु होती. कॅमेरा यानातल्या दिनदर्शीकेवर क्षणभर स्थिरावला. तारीख होती २५-११-३९७८ बाबौ. चित्रपट पुढे चालत राहीला आणि मी मुग्ध होत पहात राहीलो. बोलणारी, चालणारी, घोडे आणि बंदुका उडवणारी, (मुक्या) माणसांनाच बंदी बनवणारी माकडं(एप्स्) पाहुन खिळुन गेलो. २ तास कसे भुर्कन उडुन गेले कळलच नाही. चित्रपट संपला. शेवट पाहुन नकळत शहारे आले. चित्रपटाचं नाव मात्र शेवट पर्यंत कळलं नाही. (चित्रपटच्या शेवटी श्रेय नामावलीत कधी कधी चित्रपटाचही नाव दाखवतात हे ज्ञान त्यावेळी नव्हतं. )

पुढल्या विकांती परत मामाचा फोन अरे आज दुसरा भाग आहे. या वेळी थोड्या आधी पासुनच संच चालु करुन बसलो. नाव सोडायचं नव्हत. :) आणि चित्रपट चालु होताच नाव दिसलं 'Beneath The Planet Of The Apes' पहिला भाग पाहिला असल्याने कथानकाबद्दल थोडी फार कल्पना होती. चित्रपटाची सुरवातच मागील पानावरुन पुढे अशी होती. संवाद कळत नसल्याने नक्की हे का घडतय ते कळत नव्हत, बरेच प्रश्न पडले होते. पण याही भागाने खिळवून ठेवलं. पुढले अनेक विकांत मी रात्री पुढचे भाग दिसतील या आशेने दुरचित्रर्वाणी संचा समोर बसुन असायचो. पण निराषाच पदरी पडली. शेवटी दोनच भाग असतील अशी मनाची समजुत घातली. वर्षे लोटली पण त्या पहिल्या भागातील शेवटचा प्रसंग मनावर जो कोरला गेला तो कायमचाच.

२००१ साली परत एकदा 'Planet Of The Apes' नव्यानं आला . दरम्यानच्या काळात पुलाखालुन बरच पाणी वाहुन गेलं होतं. इंग्रजी सिनेमातल्या तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल झाले होते. थारुर मातुर संवाद साधण्या इतपत माझ्या इंग्रजीने बाळसं धरलं होतं. त्या सुमारास दुबईत नवा नवाच होतो. फारसे मित्रं झाले नव्हते. देशही नवाच होता. पण 'Planet Of The Apes' या नावाचं गारुड जबरदस्त होतं. त्यामुळे ऑफिसमधल्या कलीगला जवळपासच्या चित्रपटगृहाचा पत्ता विचारला. त्याने माझ्याकडे पाहुन आयला नवं पाखरु लैच षौकीन दिसतय असा लुक दिला. (तो मल्लू माझ्यापेक्षा जवळपास ७-८ वर्षे सिनियर, पण त्याने आजवर दुबईत आल्यापासुन कधी चित्रपटगृहात जाउन चित्रपट पाहिला नव्हता.) असो तर त्याच्याकडुन पत्ता घेउन अस्मादिकांनी परदेशातला पहिलावहीला चित्रपट (स्वखर्चाने) पाहिला. यावेळी बरीचशी ष्टुरी समजली.

यावेळी आंतरजाल हाताशी असल्याने जुन्या चित्रपटाची काही माहिती मिळते का पहायचं ठरवलं. 'प्लॅनेट ऑफ एप्स्' ला सर्च केलं तर सुरवातीला सगळ्या नव्याच चित्रपटाच्या लिंका समोर आल्या. मग 'ओल्ड प्लॅनेट ऑफ एप्स्' सर्च करुन पाहिलं आणि एकदम जुना मित्र गवसल्याचा आनंद झाला. थोडं फार धुंडाळल्यावर प्लॅनेट ऑफ एप्स् नावाची एक चित्रपट मालिकाच येउन गेली होती असं कळलं.
या मालिकेत पाच चित्रपट होते.
१ Planet Of The Apes [1968]
२ Beneath The Planet Of The Apes[1970]
३ Escape From The Planet Of The Apes [1971]
४ Conquest Of The Planet Of The Apes [1972]
५ Battle For The Planet Of The Apes [1973]

सगळे माझ्या जन्मायच्या आधीच झळकुन गेलेले. :)
चित्रपट फार जुने असल्याने दुकानात त्याच्या सीडीज मिळणं कठीण होतं. कंपनीच आयटी डिपार्ट्मेंट आमच्याच हाता खाली असल्याने त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं. चित्रपट जालावर कुठे मिळतात याचा शोध घेउ लागलो पण त्यात ही (त्याकाळी) फारसं यश पदरी पडलं नाही. यथावकाश इतर कामं वाढत गेली आणि ही सिरीज पुन्हा एकदा मन:पटलावरुन पुसली गेली. २००९-१० साली नवा Planet Of The Apes [2001] कुठल्याश्या वाहिनीवर लागला होता आणि परत एकदा मनाने उचल खाल्ली. दरम्यान जालावर बरेच जुने चित्रपटही मिळु लागले होते. यावेळी पदरी निराशा पडली नाही. थोडी शोधाशोध केल्यावर पाच ही भाग मिळाले. सगळे उरतवून घेतले आणि एका विकांती अधाश्या सारखे एका मागोमाग एक सगळे पाहिले.
पहिले ३ भाग आवडले ४ आणि ५ थोडे ताणल्या सारखे वाटले. पण इट वॉज वर्थ वॉचिंग.

माझ्या दुबळ्या लेखणीने या चित्रपटांचा परिचय वा परिक्षण करुन त्यांच्यावर अन्याय करु इच्छीत नाही. पण जमल्यास तुम्ही हे चित्रपट नक्की पहा. इथे बरेच उत्तम लिहिणारे आहेत. त्यांच्या लेखणीतुन या चित्रपटांचा परिचय आला तर वाचायला नक्की आवडेल.

मौजमजाचित्रपटविरंगुळा

प्रतिक्रिया

गुरुदेव आपण कुठल्या काळात जन्म घेतला होता.. २५-११-३९७८

- (अजून प्लॅनेट ऑफ एप्स सीरीज बघायची राहिलेला) पिंगू

रेवती's picture

15 Jan 2012 - 7:39 am | रेवती

हम्म.......तू खरा शौकीन!;)
गेल्या अठवड्यातच लायब्ररीत गेले असताना या प्रकारची चित्रं असलेल्या डिव्हिडीज् दिसल्या होत्या.
स्टारट्रेकचेही सगळे भाग होते. ते कधीकाळी थोडंफार आवडलं होतं.
मला मागल्यावर्षी आलेला अननोन शिनुमा पहायचा असल्याने फक्त तो आणि जुना अननोन आणला.
नवाच आवडला.

प्रचेतस's picture

15 Jan 2012 - 9:31 am | प्रचेतस

प्लॅनेट ऑफ द एप्स बघितला होता आणि आवडलेलाही होता.

नुकताच प्लॅनेट ऑफ द एप्स (२००१) चा सिक्वेल 'राइज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स' या नावाने २०११ मध्ये आला होता.

" alt="" />

पक पक पक's picture

15 Jan 2012 - 3:34 pm | पक पक पक

नाम श्रेयावलीत ...?

कि श्रेय नामावली..?

इंग्रजी प्रमाणे मराठीही कच्चचं आहे याची जाणीव करुन दिल्या बद्दल धन्यवाद. :)
असो बदल केले आहेत.

पक पक पक's picture

15 Jan 2012 - 4:12 pm | पक पक पक

नाय हो राजे ,तुमची चुक काढ्ण्याचा प्रयत्न नव्हता .तुम्हि आमचे मिपा वरील एक आदर्श बल्लव आहात.

पण सगळा संगती चा परिणाम आहे.

रागावून नाही बोललो हो.
खरच मनमोकळेपणे प्रतिसाद दिला होता. :)

पक पक पक's picture

15 Jan 2012 - 3:35 pm | पक पक पक

बाकी वर्णन खुपच छान.....

पैसा's picture

15 Jan 2012 - 3:55 pm | पैसा

कधीची आणलेली आहे. आता शोधून बघते.

स्वाती दिनेश's picture

15 Jan 2012 - 7:22 pm | स्वाती दिनेश

आवडले, छान लिहिलं आहेस.
स्टारट्रेक आणि प्लॅनेट ऑफ एप्स च्या आठवणींच्या सिरिज ताज्या केल्यास.
स्ट्रारट्रेक दर रविवारी (सकाळी ११च्या सुमारास बहुदा) लागायचे. तेव्हा काळ्यापांढर्‍या रंगात ते बघताना अद्भुत दुनिया पाहत आहे असं वाटायचं.
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jan 2012 - 9:25 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी अगदी!

मराठमोळा's picture

16 Jan 2012 - 6:40 am | मराठमोळा

बाब्बो,
फारच जुनी दिसते आहे ही सिरीज.
बाकी चित्रे पाहून एका क्षणासाठी जुना 'जानी दुश्मन' आठवून गेला. :P

शरभ's picture

16 Jan 2012 - 1:37 pm | शरभ

Rise of planet of Apes(2011) पण ठिक होता...
नवीन सिरिज येउ घातलेय आता बहुतेक...

सागर's picture

16 Jan 2012 - 2:58 pm | सागर

बल्लव म्हणून तुला ओळखत होतो , पण तू तर चित्रपटांवरही तितक्याच रसदारपणे लिहितोस की :)

प्लॅनेट ऑफ द एप्स चा एकच भाग मी पाहिला आहे. तो अफलातून होता. बाकीचे बघायचा योग कधी आला नव्हता पण आता तुझ्या लेखामुळे सगळे चित्रपट नक्की पाहीन :)