प्लॅनेट ऑफ एप्स् (सिरिज)
विसु. : ही चित्रपटाची ओळख वा परिक्षण नाही.
फार तर सहावी सातवीत असेन, तेव्हा दुरदर्शनवर शनीवारी की रविवारी रात्री इंग्रजी चित्रपट लागायचे. मराठी माध्यमवाले आम्ही, आमचं इंग्रजी यथा तथाच होतं. (कोण रे तो अजुनही तसच आहे म्हणतोय?) पण इंग्रजी सिनेमे आवडायचे. मुकपट समजुनच पहायचो. तर एका शनीवारी की रवीवारी रात्री मामाचा फोन आला की एक मस्त चित्रपट लागाय बघ. तेव्हा वाहिन्यांच जंजाळ नव्हतं त्यामुळे दुरचित्रवाणीसंच लावताच चित्रपट नुकताच चालु झालेला दिसला पण तरी चित्रपटाचं नाव आधीच येउन गेलं होतं. (कारण पुढे ते दिसलं नाही, आणि दुरदर्शन वाल्यांनी पुन्हा एकादी पाटी टाकण्याचे कष्ट घेतले नाहीत.) एक अंतराळ यान आणि २-३ वीर दिसले. वाह काही तरी सायंटीफीक चित्रपट दिसतोय म्हणुन खुश झालो. (स्टारट्रेकने आधीच खुळ लावलं होतं) यान कुठल्याश्या ग्रहावरल्या सरोवरात की समुद्रात कोसळलं होतं. आतल्या अंतराळविरांची बाहेर पडण्याची धडपड चालु होती. कॅमेरा यानातल्या दिनदर्शीकेवर क्षणभर स्थिरावला. तारीख होती २५-११-३९७८ बाबौ. चित्रपट पुढे चालत राहीला आणि मी मुग्ध होत पहात राहीलो. बोलणारी, चालणारी, घोडे आणि बंदुका उडवणारी, (मुक्या) माणसांनाच बंदी बनवणारी माकडं(एप्स्) पाहुन खिळुन गेलो. २ तास कसे भुर्कन उडुन गेले कळलच नाही. चित्रपट संपला. शेवट पाहुन नकळत शहारे आले. चित्रपटाचं नाव मात्र शेवट पर्यंत कळलं नाही. (चित्रपटच्या शेवटी श्रेय नामावलीत कधी कधी चित्रपटाचही नाव दाखवतात हे ज्ञान त्यावेळी नव्हतं. )
पुढल्या विकांती परत मामाचा फोन अरे आज दुसरा भाग आहे. या वेळी थोड्या आधी पासुनच संच चालु करुन बसलो. नाव सोडायचं नव्हत. :) आणि चित्रपट चालु होताच नाव दिसलं 'Beneath The Planet Of The Apes' पहिला भाग पाहिला असल्याने कथानकाबद्दल थोडी फार कल्पना होती. चित्रपटाची सुरवातच मागील पानावरुन पुढे अशी होती. संवाद कळत नसल्याने नक्की हे का घडतय ते कळत नव्हत, बरेच प्रश्न पडले होते. पण याही भागाने खिळवून ठेवलं. पुढले अनेक विकांत मी रात्री पुढचे भाग दिसतील या आशेने दुरचित्रर्वाणी संचा समोर बसुन असायचो. पण निराषाच पदरी पडली. शेवटी दोनच भाग असतील अशी मनाची समजुत घातली. वर्षे लोटली पण त्या पहिल्या भागातील शेवटचा प्रसंग मनावर जो कोरला गेला तो कायमचाच.
२००१ साली परत एकदा 'Planet Of The Apes' नव्यानं आला . दरम्यानच्या काळात पुलाखालुन बरच पाणी वाहुन गेलं होतं. इंग्रजी सिनेमातल्या तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल झाले होते. थारुर मातुर संवाद साधण्या इतपत माझ्या इंग्रजीने बाळसं धरलं होतं. त्या सुमारास दुबईत नवा नवाच होतो. फारसे मित्रं झाले नव्हते. देशही नवाच होता. पण 'Planet Of The Apes' या नावाचं गारुड जबरदस्त होतं. त्यामुळे ऑफिसमधल्या कलीगला जवळपासच्या चित्रपटगृहाचा पत्ता विचारला. त्याने माझ्याकडे पाहुन आयला नवं पाखरु लैच षौकीन दिसतय असा लुक दिला. (तो मल्लू माझ्यापेक्षा जवळपास ७-८ वर्षे सिनियर, पण त्याने आजवर दुबईत आल्यापासुन कधी चित्रपटगृहात जाउन चित्रपट पाहिला नव्हता.) असो तर त्याच्याकडुन पत्ता घेउन अस्मादिकांनी परदेशातला पहिलावहीला चित्रपट (स्वखर्चाने) पाहिला. यावेळी बरीचशी ष्टुरी समजली.
यावेळी आंतरजाल हाताशी असल्याने जुन्या चित्रपटाची काही माहिती मिळते का पहायचं ठरवलं. 'प्लॅनेट ऑफ एप्स्' ला सर्च केलं तर सुरवातीला सगळ्या नव्याच चित्रपटाच्या लिंका समोर आल्या. मग 'ओल्ड प्लॅनेट ऑफ एप्स्' सर्च करुन पाहिलं आणि एकदम जुना मित्र गवसल्याचा आनंद झाला. थोडं फार धुंडाळल्यावर प्लॅनेट ऑफ एप्स् नावाची एक चित्रपट मालिकाच येउन गेली होती असं कळलं.
या मालिकेत पाच चित्रपट होते.
१ Planet Of The Apes [1968]
२ Beneath The Planet Of The Apes[1970]
३ Escape From The Planet Of The Apes [1971]
४ Conquest Of The Planet Of The Apes [1972]
५ Battle For The Planet Of The Apes [1973]
सगळे माझ्या जन्मायच्या आधीच झळकुन गेलेले. :)
चित्रपट फार जुने असल्याने दुकानात त्याच्या सीडीज मिळणं कठीण होतं. कंपनीच आयटी डिपार्ट्मेंट आमच्याच हाता खाली असल्याने त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं. चित्रपट जालावर कुठे मिळतात याचा शोध घेउ लागलो पण त्यात ही (त्याकाळी) फारसं यश पदरी पडलं नाही. यथावकाश इतर कामं वाढत गेली आणि ही सिरीज पुन्हा एकदा मन:पटलावरुन पुसली गेली. २००९-१० साली नवा Planet Of The Apes [2001] कुठल्याश्या वाहिनीवर लागला होता आणि परत एकदा मनाने उचल खाल्ली. दरम्यान जालावर बरेच जुने चित्रपटही मिळु लागले होते. यावेळी पदरी निराशा पडली नाही. थोडी शोधाशोध केल्यावर पाच ही भाग मिळाले. सगळे उरतवून घेतले आणि एका विकांती अधाश्या सारखे एका मागोमाग एक सगळे पाहिले.
पहिले ३ भाग आवडले ४ आणि ५ थोडे ताणल्या सारखे वाटले. पण इट वॉज वर्थ वॉचिंग.
माझ्या दुबळ्या लेखणीने या चित्रपटांचा परिचय वा परिक्षण करुन त्यांच्यावर अन्याय करु इच्छीत नाही. पण जमल्यास तुम्ही हे चित्रपट नक्की पहा. इथे बरेच उत्तम लिहिणारे आहेत. त्यांच्या लेखणीतुन या चित्रपटांचा परिचय आला तर वाचायला नक्की आवडेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गुरुदेव आपण कुठल्या काळात
हम्म.......तू खरा
मस्त
नाम श्रेयावलीत ...? कि श्रेय
इंग्रजी प्रमाणे मराठीही
नाय हो राजे ,तुमची चुक
रागावून नाही बोललो हो. खरच
बाकी वर्णन खुपच छान.....
एक डीव्हीडी
मस्त..
अगदी अगदी!
बाब्बो, फारच जुनी दिसते आहे
नवीन
सुंदर रे गणपा