१० ऑगस्टला पंचायती राज विभागाच्या सचिवांचा कलेक्टरांना फोन आला.
“अजित, नारायण सुंदरम १३ तारखेला इथे येतायत. ब्रह्मपूरला ते नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत. तुला त्यासाठी एक प्रेझेन्टेशन करावं लागेल.”
“नक्कीच सर. फक्त काय बोलायचं नाही ते सांगीतलंत तर बरं होईल सर,” कलेक्टर अदबीने म्हणाले.
नारायण सुंदर केन्द्र सरकारातील मंत्री. राज्य सरकारचा केन्द्राशी छत्तीसचा आकडा. त्यामुळे सुंदरांच्या समोर आपण काही बोलून बसू आणि नंतर राज्य सरकार आपल्याला धारेवर धरायचं ही कलेक्टरांची भीति निराधार नव्हती.
सचिवांनी कलेक्टरांचा रोख ओळखला. हसत हसत म्हणाले, “अरे घाबरु नकोस. आम्हीपण आहोत तिथे. आणि नारायण सुंदर हा वेगळा माणूस आहे. नुसते आकडे गोळा करुन आणू नकोस. कारणमीमांसा हवी. तुझ्या काही विकासाच्या हटके कल्पना असतील तर त्याही वेलकम आहेत.”
कलेक्टरांचे टेन्शन अजूनच वाढले. नारायण सुंदर अजून पन्नाशीत होते. आयआयटीयन. नंतर अर्थशास्त्रात डॉक्टरेट. सध्याचे पंतप्रधान अर्थमंत्री असताना त्यांचे सल्लागार. नॅशनल ऍडव्हायजरी कौन्सिलचे सदस्य. अशा पायऱ्या चढत आज ते कॅबिनेट मंत्री झाले होते. शिवाय लोकसभेतून होते; राज्यसभेतून नव्हे. विचारी माणूस. वरुन राजकारणाचा प्रत्यक्ष अनुभव.
राज्यातील पंधरा जिल्हे नक्षलग्रस्त होते. ऑपरेशन ग्रीन हंट सोबतच सरकारने या भागात इंटिग्रेटेड ऍक्शन प्लॅन आखला होता. हे भाग मुख्यत: दुर्गम. लोकसंख्या प्रामुख्याने आदिवासी. हजारो वर्षे भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाच्या महासागरात छोट्या छोट्या बेटांप्रमाणे अलिप्त राहिलेले आदिवासींचे समूह आत्ताशी कुठे थोडे थोडे मिळूमिसळू लागले होते. नक्षली नेतृत्वाला त्यांच्या अलिप्ततेमधून जन्माला आलेल्या दुराव्याचे आयते शस्त्र हाती मिळाले होते. अविश्वासाची ही दरी सांधणे हे आय ए पीचे मुख्य उद्दिष्ट होते. कलेक्टर, एस्पी आणि डीएफओ हे आयएपी साठी जबाबदार होते.
सुंदर येणार होते ते थेट कलेक्टरांशी बोलण्यासाठी. हा कार्यक्रम नेमका कसा चाललाय, फिल्डवर काय अडचणी आहेत, आणि योजना वास्तवापासून फार दूर तर नाहीत ना, याचा आढावा त्यांना घ्यायचा होता.
आणि बैठक तशीच झाली. संपूर्णपणे ऍकॅडेमिक वातावरणात. समस्यांच्या मुळांची चर्चा करीत. अनेक कलेक्टरांनी कसलेही दडपण न घेता काही भन्नाट कल्पना मांडल्या. सुंदरनी संयमाने त्या ऐकून घेतल्या. काहींचे पद्धतशीर खंडण केले, काही स्वत: पेन हाती धरून विचारमग्न मुद्रेने टिपून घेतल्या.
‘ही अशी जर पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट असेल, तर नोकरशाहीने अवश्य यांच्या अधीन रहायला हवे,’ कलेक्टरांच्या मनात आले. अशीच भावना सर्वच कलेक्टरांच्या मनात होती.
*****
१५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाला महिला बाल कल्याण विभागाच्या मंत्री यायच्या होत्या. १४ ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजता त्यांना हेलिपॅडवर रिसिव्ह करून सर्किट हाऊसवर सोडून कलेक्टर परतले. येण्यापूर्वी जिल्ह्यातील महत्वपूर्ण योजनांचे एक टिपण त्यांच्या सपूर्त करून कुणाकुणाला भेटायला पाठवायचे त्याची विचारपूस करून तशी व्यवस्थाही केली.
रात्री आठ वाजता कलेक्टरांचा मोबाईल वाजला. “सर मी मंत्र्यांना आत्ताच सर्किट हाऊसवर भेटले. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. तुमचा गाइड्न्स हवा होता,” सीताकुमारी बोलत होत्या. कलेक्टरांच्या लक्षात आलं, काहीतरी पॉप्युलिस्ट सूचना असणार. त्याशिवाय सीताकुमारी डिस्टर्ब करणार नाहीत.
सीताकुमारी मूळच्या आन्ध्र. पण इथेच स्थायीक झालेल्या. हुद्द्याने आय सी डी एस सुपरवायझर. म्हणजे अंगणवाडी सेविकांवरील अधिकारी. त्यांच्यावर सीडीपीओ अर्थात चाइल्ड डेवलपमेंट प्रोग्रॅम ऑफिसर. त्यावर डिस्ट्रिक्ट सोशल वेलफ़ेअर ऑफिसर. आणि मग जिल्हाधिकारी. परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा त्यांच्या क्षमतांवर फार विश्वास होता. त्यांना त्यांनी मिशन शक्ती च्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर बनवले होते. सर्व जिल्ह्यांमधील महिला बचत गटांना संघटित करणारा प्लॅटफॉर्म म्हणजे मिशन शक्ती.
एकूणच आय सी डी एस म्हणजेच इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा अनेक अव्यावहारिक पद्धतींमुळे आपली मूळ उद्दिष्टे गाठण्यात अपयशी ठरत होता. केवळ आर्थिक उद्दिष्टांवर अर्थात “झालेल्या किंवा करावयाच्या खर्चावर” लक्ष केन्द्रित करण्याच्या नोकरशाहीच्या वृत्तीमुळे वरवर पाहता सर्व आलबेल होते. पण काहीतरी गंभीर चुकते आहे हे कलेक्टरांच्या ध्यानात येत होते. लहान मुले, गर्भवती अनेक लाभांपासून वंचित रहात आहेत हे दिसत होते. आणि हे समजण्याची संवेदनशीलता आणि त्यावर मात करण्याची इच्छा व कुवत असणारी बाई आख्ख्या आयसीडीएस सेटपमध्ये अभावानेच दिसत असल्याने कलेक्टरांची बेचैनी वाढतच होती. सीताकुमारीमध्ये त्यांना आशेचा किरण दिसत होता. हुद्दा लहान असला तरी समज दांडगी होती. व्हिजन होती. संघटनकौशल्य अपार होते. आपल्या मर्यादा जाणून जी कामे आपल्याच्याने होणार नाहीत, ती कामे कलेक्टरांच्या सह्या घेऊन बिनबोभाट पार पाडत होत्या. एकूण सारांश म्हणजे फायर ऍण्ड फरगेट मिसाईल होते. जिल्हा रुग्णालयातील कॅण्टीन कंत्राटाने चालवायला दिले जाई. महिला गटांना काही फायदा होईल, आणि नाही झाला तरी त्यांना एक अनुभव तरी मिळेल या उद्देशाने कलेक्टरांनी दोन महिन्यांपूर्वी सीताकुमारींना हे कंत्राट घ्यायला लावले होते. त्यांनी एकाच महिन्यात १४० बेडच्या रुग्णालयात एक लाख ऐंशीहजाराच्या उलाढालीत साठ हजार निव्वळ नफा कमावून कलेक्टरांची निम्मी बेचैनी दूर केली होती. एवढे करुन रुग्णांना कधी नव्हे तो चविष्ट आणि पोषक आहार मिळत होता.
सीताकुमारी सांगत होत्या, “सर, मंत्री म्हणतायत, बाई काम असं करा की आमच्या पार्टीला भरपूर मतं मिळाली पाहिजेत!”
“बरं! अजून काय म्हणाल्या मॅडम!” कलेक्टर विचारते झाले.
“सर त्या म्हणतायत की उद्या झेंडावंदनाला दहा वीस महिला बचत गट बोलवा. आता सर एवढ्या रात्री मी मेसेज पाठवला तरी उद्या गावांकडून या बायका सकाळी नऊ वाजेपर्यंत मी कशा काय आणू? कुठून गाडी ऍरेंज करु?”
कलेक्टर म्हणाले, “असं बघा मॅडम, मंत्र्यांनी तुम्हाला आयसीडीएसच्या संदर्भात एक तरी भेदक प्रश्न विचारला का? नाही ना? मग निवांत रहा. हो म्हणा. सोडून द्या. सकाळी झेंडावंदनाला असेही पंधरा वीस हजार लोक असतात मैदानावर. तिथं म्हणा, ह्या दोनशे बायका आल्यात बचत गटाच्या! मंत्र्यांना दोन मिनिटं देखील वेळ असणार नाहीये त्यांच्याशी बोलायला. पावसाळी हवा असल्यामुळे आणि जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे पायलटला हेलिकॉप्टर उडवण्याची अशीही घाई असणार आहे. त्यामुळे झेंडावंदन, परेड, पारितोषिक, दवाखाना-जेलमध्ये फळफळावळ वाटप हे झालं की मंत्री लगेच हवेत उडणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या जे म्हणतील त्याला खुशाल मान डोलवा झालं टेन्शन न घेता!”
फोनवर सीताकुमारींचा चेहेरा दिसत नसला तरी त्यांच्या कपाळावरील आठ्या नाहीशा होऊन चेहेऱ्यावर स्मित पसरले असेल याची कलेक्टरांना खात्री होती.
****
नारायण सुंदरांचे मोल अधोरेखित करणारा अनुभव दोनच दिवसात यावा याची कलेक्टरांना अंमळ मौज वाटली.
प्रतिक्रिया
30 Aug 2011 - 1:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
उपोषण वगैरे चर्चांमधे असं काही वाचलं की बरं वाटतं.
30 Aug 2011 - 1:34 am | रामपुरी
अतिशय सुंदर लेखन....
(गोड जिलब्या/ तिखट जिलब्यांचे घाणे पडत असताना असे लेख आशेचा किरण दाखवितात)
30 Aug 2011 - 2:08 am | रेवती
लेखन आवडले.
बर्याच ठिकाणी नेमके शब्द वापरल्याने अनुभव रंगत गेला.
30 Aug 2011 - 3:41 am | इंटरनेटस्नेही
.
30 Aug 2011 - 3:36 am | विकास
पहीला अनुभव अवास्तव वाटला तर दुसरा वास्तवाशी जवळचा.... :(
30 Aug 2011 - 5:04 am | राजेश घासकडवी
तुमच्या लेखनाचं कौतुक करायचं म्हणजे तेच तेच पुन्हा पुन्हा लिहावं लागतं. :)
अत्यंत ओघवती शैली. प्रसंगातले नेमके विशेष टिपणारी. इतर फापटपसाऱ्याला फाट मारणारी.
सरकार, राजकारणी आणि नोकरशाही यांविषयी व्यवस्थेच्या बाहेरच्या लोकांमध्ये एकांगी प्रतिमा असते. ती प्रतिमा बरोबर नाही, वाईट आहे तसं चांगलंही आहे, हे तुम्ही नेहमीच छान पद्धतीने दाखवून देता. अजून येऊ द्यात.
30 Aug 2011 - 8:35 am | सहज
अर्थातच आवडला. लहरी लोकप्रिय नेत्यांपेक्षा, टेक्नोक्रॅट नेते असणे वाईट नाही वाचून बरे वाटले ;-)
अभ्यासू लोकप्रिय नेते ही दुर्मीळ होत चाललेली गोष्ट आहे का?
स्वगत : 'करीयर पॉलीटीशीयन' हा प्रकार बंद व्हायला हवा का?
30 Aug 2011 - 8:46 am | रामदास
ही अशी जर पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट असेल, तर नोकरशाहीने अवश्य यांच्या अधीन रहायला हवे,’ या वाक्यावर जास्त विचार करतो आहे.
31 Aug 2011 - 12:22 am | चतुरंग
अतिशय संयत मांडणी, शब्दांची अचूक निवड, प्रत्यक्ष अनुभवामुळे आलेला त्या त्या परिस्थितीचा वास्तविक अंदाज असे अनेक पौलू तुमच्या लिखाणातून दिसत राहतात.
राजकारणी आणि नोकरशाही ही परस्परपूरक आणि त्याचवेळी एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चेक ठेवणारी व्यवस्था अभिप्रेत आहे का/ असावी का?
-रंगा
30 Aug 2011 - 9:51 am | शैलेन्द्र
सुंदर लेख.. काहीतरी सकस वाचल्याच समाधान मिळाल..
30 Aug 2011 - 10:30 am | सुनील
प्रशासनावर घट्ट मांड असलेला नेता अशी काहींची ओळख करून दिली जाई, त्याची आठवण आली.
30 Aug 2011 - 11:14 am | श्रावण मोडक
मधल्या काळात गैरहजेरी का? तातडीने खुलासा करावा. ;)
30 Aug 2011 - 11:40 am | अर्धवट
श्रामोंशी बाडिस..
बाकी लेख उत्तमच.
30 Aug 2011 - 12:16 pm | फारएन्ड
आवडला लेख!
30 Aug 2011 - 6:16 pm | प्रास
फार दिवसान्नी दर्शन देऊन धन्य केलंय बघा तुम्ही!
सदर सकस लेख आवडला आणि पटलाही.
याला हरकत नाही पण मुद्दा हा आहे की अशा एस्टॅब्लिशमेंटचे आपल्या देशातील शेकडा प्रमाण किती आहे?
वरती सहजरावांनी म्हण्टलेल्या स्वगतात करिअर पॉलिटिशन्सचा उल्लेख आलाय. हा शब्द चांगल्या अर्थाने घेतल्यास, उच्च शिक्षितांनी आणि समस्यापूर्ती करण्याचे शिक्षण घेतलेल्यांनी पॉलिटिशिअनचे करिअर निवडणे योग्य व्हावे का? हा प्रश्न आहे. अशा प्रत्येकातच एखादा नारायण सुंदरम् असेलच का असा उपप्रश्नही आहेच.
बाकी बहुतांशी पॉलिटिशिअन्स पॉप्युलरिस्ट घोषणा करणारेच निघतात हा अनुभव आहे.
तूर्तास इत्यलम्।
तुमच्या पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत :-)
30 Aug 2011 - 9:14 pm | नितिन थत्ते
>>बाकी बहुतांशी पॉलिटिशिअन्स पॉप्युलरिस्ट घोषणा करणारेच निघतात हा अनुभव आहे.
माझ्या प्रतिसादाचा लेखाच्या विषयाशी संबंध नाही पण हे प्रतिसादातले हे वाक्य आणि अशाच अर्थाचं मूळ लेखातलं एक वाक्य यांच्याशी संबंधित एक प्रश्न विचारावासा वाटतो.
पॉप्युलिस्ट हा शब्द सहसा डिरॉगेटरी अर्थाने वापरला जातो. म्हणजे "सामान्य जनसमूहाला आवडेल असं पण अंतिमतः हिताचं नाही असं काहीतरी". सबसिडी आणि आरक्षण या दोन गोष्टी नेहमी पॉप्युलिस्ट मानल्या जातात.
नुकत्याच होऊन गेलेल्या आंदोलनात केल्या जाणार्या मागण्या अंतिमत: हिताच्या नाहीत असं काही लोकांना वाटत होतं. त्या मागण्यांनुसार वागल्यास एक समांतर सरकार निर्माण होईल असं त्यांचं म्हणणं होतं. त्या आंदोलनाच्या वेळी मात्र या मागण्या मान्य करणे हे "पॉप्युलिस्ट" आहे असे न म्हणता "लोकेच्छेचा आदर" असं म्हटलं जात होतं.
दोन्ही केसमध्ये (एका बाजूस सबसिडी/आरक्षण आणि दुसरीकडे कडक तरतुदी असणारा जनलोकपाल कायदा आणणे) खूप मोठ्या सामान्य जनसमूहाला आवडतील अश्या गोष्टी आणि काही थोड्या लोकांचे त्या विरोधातले मत या समान गोष्टी आहेत.
एका केसमध्ये सामान्य जनसमूह हा समाजातला खालचा वर्ग आहे म्हणून त्यांना हवे असते ते पॉप्युलिस्ट आणि दुसर्या केसमध्ये मीडिया आणि व्होकल मध्यमवर्गाच्या आवडीचं आहे म्हणून त्यांच्या मागण्या पॉप्युलिस्ट नाहीत असं असावं का?
31 Aug 2011 - 12:01 am | आळश्यांचा राजा
आवर्जून प्रतिसाददिल्याबद्दल सर्वांचेच मनापासून आभार! इथे मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे अजून लिहावसं वाटतं. थँक्स!
@ विकास - सुंदरम यांचा अनुभव अवास्तव वाटावा इतकी निराशाजनक परिस्थिती वाटायला सत्यपरिस्थितीजेवढी कारणीभूत आहे, त्याहूनही अधिक मीडिया कारणीभूत आहे असे वाटते.
@सहज - टेक्नोक्रॅट आणि लोकप्रिय अशा द्वंद्वाचा मी विचार केला नव्हता. आता करतोय!
@रामदास -
आता तुम्ही बोलल्यावर मीही जास्त विचार करु लागलोय! :-)
@सुनील -
असेच म्हणतो. फार थोड्या राजकीय नेत्यांना नोकरशहाचा आदर संपादन करता येतो असे वाटते. एकदा आदर जिंकला की झालं. मग नोकरशाही प्रॉपर नोकरासारखी राबते.
@श्रामो ((आणि अर्धवट) - आपल्या "कारणे दाखवा" नोटिशीत "व्हेअरअॅज" हा (नोकरशाही) शब्द राहून गेला असल्यामुळे टेक्निकली इनकरेक्ट अशा नोटिशीला उत्तर देणे बांधील नाही! ;-)
@प्रास - मला वाटते नारायण सुंदर हे मुळातच कमी असतात. नारायण सुंदर हे उच्चशिक्षित नसते तरी ते "नारायण सुंदर"च असते असे माझे मत आहे. नेतृत्वगुण ही वेगळी बाब आहे. फार शिक्षण घेतल्याने असे गुण येतात असे काही नाही, आणि शिक्षण नाही म्हणून कुणी नेता होऊ शकत नाही असेही नाही. मात्र, नेतृत्वाच्या जोडीला चांगले शिक्षण असेल, तर जनतेचे नशीब म्हणायचे!
@नितीन थत्ते - विचार करायला लावणारा मुद्दा आहे. "लोकेच्छेचा आदर" की "पॉप्युलिस्ट" हे म्हणजे "बाब्या" आणि "कार्टे" असे थोडेसे आहे खरे!
31 Aug 2011 - 10:04 am | अर्धवट
च्यायला लॉ पॉइंट.. ठिक आहे ही चालतिये का बघा. ;)
आमचे अशीलाचे अल्पबुद्धीचे नियमीत मनोरंजन करणारे तसेच प्रबोधन आणि विचारप्रवृत्त करणारे बहुतांशी लेखन करणार्या खाजगी मालकीच्या प्रथमदर्शनी खुल्या व्यासपीठासमान दिसणार्या संस्थळावरून आपण आगाउ सूचना न देता अथवा कोठल्याही प्रकारची बहुसंख्य सदस्यांच्या निदर्शनास येइल अशी घोषणा न करता स्वेच्छेने अथवा कसेही दखलपात्र कालावधीसाठी गायब होता आणि आमचे अशिलांना उत्तमोत्तम लेखांपासून दिर्घकाळ वंचीत ठेवता याबाबतचे स्पष्टीकरण आपण वा आपले प्रतिनीधींमार्फत सदर नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत मिपादरबारी सादर करावे. अन्यथा याबाबत आपले काहीही म्हणणे नाही असे समजून आपल्यावर टोकदार प्रतिसाद आणि खरडींचा भडीमार झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल, आणि त्याची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदारी आमचे अशिलांवर रहाणार नाही,
खाली सही करणार -
आमचे अशील श्रावण मोडक यांचे तर्फे
अॅड अर्धवट
31 Aug 2011 - 12:13 am | जाई.
आतापर्यतच्या आयुष्यात मी नोकरशाहीची सुदैवाने चांगली बाजू अनुभवली
बाबाचं अकाली निधन झाल्यावर याच लोकांनी फार मदत केली.
त्याच्यामुळेच अवघ्या सहा महिन्यात सावरु शकलो.
लेखन बुकमार्क केलय
31 Aug 2011 - 12:16 am | बिपिन कार्यकर्ते
अनुभव आवडले. प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणावेत असे आहेत. नारायण सुंदर आणि कलेक्टर दोघांनाही शुभेच्छा!
बादवे, नारायण सुंदर आणि कलेक्टर यांना अल्पसंख्याक असल्याचे फायदे मिळतात का? नाही म्हणजे असे फार सापडत नाहीत म्हणून विचारतो. ;)
31 Aug 2011 - 12:24 am | आळश्यांचा राजा
नसीमचाचांनी केलेला सतका आणि एखाद्या असहाय्य विधवेने आठवणीने पाठवलेली राखी अनपेक्षितपणे डाकपॅडमध्ये मिळते. अशा प्रकारचे काही पर्क्स अल्पसंख्यांक असल्यामुळे मिळतात असे ऐकून आहे!
31 Aug 2011 - 12:26 am | बिपिन कार्यकर्ते
_/\_
राखीची हकिकत लवकर यावी अशी मनोमन इच्छा!
31 Aug 2011 - 4:03 am | धनंजय
छान!
कधीकधी अशा प्रकारचे उदाहरण देऊन मायक्रोमॅनेजर विरुद्ध डेलेगेटरपैकी डेलेगेटरचे कौतूक केले जाते :-)
31 Aug 2011 - 4:50 am | चित्रा
हे मला या गोष्टीतून अजिबात सुचले नसते. पण बरोबर आहे. तशीही गोष्ट लिहीता आली असती.
अनुभव आवडले. फारसे शिकलेले नसले तरी वसंतदादा पाटलांचे नाव बुद्धिमान आणि जाणकार मंत्री म्हणून घेतले जाई असे आठवते. चू.भू.द्या.घ्या.
अधिक नियमितपणे लिहीत रहावे.
31 Aug 2011 - 6:54 am | स्वाती२
आवडले.
31 Aug 2011 - 8:29 am | ५० फक्त
वर श्रामों म्हणाताहेत त्याला सहमत, पण अतिशय छान लिहिलंय, पण एवढा मोठा गॅप नका ओ घेउ.
31 Aug 2011 - 11:34 am | ढब्बू पैसा
केव्हढा मोठा ब्रेक घेतलात! पण लिखाण नेहमीप्रमाणे रोचक. शैली खिळवून ठेवणारी आणि अचूक शब्दनिवड. मुळात कंटेंटच दमदार असल्याने एकदम सकस लेखन.
बाकीच्या गदारोळात असं दर्जेदार काही वाचलं की एकदम की बरं वाटतं. असेच लेख येत राहिले की कुणालाच प्रमाण लेखन म्हणजे काय हे समजावून सांगण्याची गरज पडणार नाही आणि आम्हा वाचकांचं भलं होईल.
प्लीज लिहीत रहा!
31 Aug 2011 - 2:17 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
31 Aug 2011 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार
देर आये दुरुस्त आये :)
अशा लेखकांच्या लेखनाच्या अभावाने बर्याचदा आजूबाजूच्या टूकार धाग्यांना वाचण्यासाठी उघडावे लागते ;) आरा ह्यांनी सर्वांच्या विनंतीस मान देऊन तातडीने लिहीते व्हावे.
मोजक्या शब्दात केलेले आशयपूर्ण आणि विचार करायला लावणारे लेखन.