साखरगोळ्या..

गवि's picture
गवि in काथ्याकूट
10 Nov 2010 - 12:58 pm
गाभा: 

लहानपणापासून इंजेक्शन हे सर्वात भयात्कारी औषध. आणि सर्वात टेन्शन फ्री औषध म्हणजे होमिओपथी. गोड गोड छोट्ट्याश्शा साखरगोळ्या.

होमिओपथी "Laws of similars" वर बनवलेली आहे. जशास तसे, किंवा काट्यानं काटा काढणं या तत्वावर. सगळ्यांना सहज समजेल अशा भाषेत सांगायचं तर (म्हणजे मला समजलंय त्या भाषेत..!!) रोगाची लक्षणं नीट पहायची आणि तीच लक्षणं शरीरात निर्माण करणारा पदार्थ अत्यंत डायल्य़ूट करून औषध म्हणून द्यायचा. त्या पदार्थामुळं मूळ रोगासारखीच लक्षणं शरीरात तयार होऊ पाहतील आणि मूळ रोग (लक्षणांचं कारण) शरीरातून बाहेर पडेल.

होमिओपथी ही थिअरी लक्षणं, रोगी व्यक्तीच्या सवयी, मानसिकता वगैरे या सर्वांत खूप डीटेलमधे जाणारी आहे. मध्यंतरी लान्सेट या मेडिकल जर्नलनं होमिओपथीवर मोठा रिपोर्ट छापला. नुसता लॉजिकली विचार करून सामान्य विवेक बुद्धीला ही "पथी" पटण्यासारखी नाही. निव्वळ श्रद्धेवरच सगळं अवलंबून आहे. त्याच्या सक्सेस स्टोरीज फक्त वैयक्तिक "गुण आल्याच्या" कथांच्या स्वरुपातच दिसतात. होमिओपथीला डावं ठरवून अलोपॅथी सर्वांग सुंदर आहे असंही म्हणण्याचा "कमर्शिअल" उद्देश नाही कारण मी दुरुनही वैद्यकीय व्यवसायात नाही. अलोपॅथी निदान प्रामाणिक असते, बॉक्सवर साईड इफेक्ट छापते आणि भन्नाट दावे करत नाही. पंतप्रधानांपासून ते (ग्यांरंटी देतो की) स्वतः कोणी आयुर्वेदाचार्य किंवा टी.व्ही वरचे योगाचार्य यांना जरा जरी "चिंताजनक" लक्षणं दिसायला लागली की आधी अलोपथी रुग्णालयाच्या आय सी यू मधे घातलं जातं. होमिओ आणि आयुर्वेद या निरोगी राहण्याच्या (प्रिव्हेंटिव्ह) शैली आहेत असंही म्हणतात. आणि तरीही होमिओपथी उपचारांपायी व्हॅक्सिन देण्यापासून परावृत्त करण्यात आलेले रुग्ण आहेत. हा एक धोकाच.

पण तो विषय इथे आणला की वेगळा वाद सुरु होईल. (अलो वि. होमिओ वि. आयु.)

ते कधीतरी नंतर.

इथे मी मुद्दाम एक विधान लिहितोयः

होमिओपथी औषधांच्या "औषधी गुणां"विषयी मी एक गृहितक धरतोय की ती "उपयुक्त" असतातच. (कारण मुळात तो तात्विक आणि फार पुढचा मुद्दा झाला..!)

"क्वालिटी" गृहित.. सध्या काथ्याकूट फक्त "क्वांटिटी "बद्दल... मुळात थोडं जरी तर्कट लढवायचं झालं तर हे खालचे मुद्दे "विश्वासाच्या" आड येतात:

होमिओपथी खरी, तर मग भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) चूक ठरते. लक्षणं निर्माण करणारी ही मूळ औषधं (पदार्थ) ही काहीवेळा पू, मृत पेशी, विष्ठा वगैरेपासूनही बनवली जातात. साधारणपणे हे विषारी पदार्थ असतात. (अलोपथीतही काही फार स्वच्छ शाकाहारी पदार्थ नसतात म्हणा..) प्रश्न तो नाही. प्रश्न असा की हे पदार्थ पाणी किंवा अल्कोहोलमधे अनेक अनेक अनेक वेळा विरळ (डायल्यूट) केले जातात. सिरीयल डायल्यूशन, म्हणजे शंभर भाग पाण्यात एक भाग मूळ पदार्थ मिसळून विशिष्ट (शास्त्रीय) पद्ध्तीनं ते मिश्रण हलवून हलवून ढवळायचं. मग परत त्यातला एक भाग घेऊन अजून शंभर भाग पाण्यात असाच डायल्यूट करायचा. असा शंभर शंभर पट विरळ विरळ द्राव बनवत जायचा. एकदा हा प्रकार झाला की १C नं औषधाची पोटेन्सी वाढली. २C म्हणजे एकदा शंभरपट डायल्यूशन आणि त्यातला एक भाग घेऊन परत शंभरपट डायल्यूशन.

होमिओपथीत असं मानलं जातं की जितके जास्त C, म्हणजे जितकी जास्त विरळता तितकी जास्त पोटेन्सी (प्रभावीपणा). हे तत्व आपल्याला माहीत असलेल्या "जास्त डोस-जास्त परिणाम" या तत्वाच्या विरोधात अहे.

३०C, २००C वगैरे अशी पोटेन्सी लिहितात. आता हे अतिरिक्त डायल्यूशनच होमिओपथी विरुद्धचा मुख्य मुद्दा बनलं आहे.

पदार्थाचा सर्व गुणधर्मांसहित सगळ्यात लहान करता येणारा कण म्हणजे एक रेणू (मोलेक्यूल).

सहज समजण्यासाठी ही पहा तुलना:

१२ C सोल्यूशन (डायल्यूशन) म्हणजे एक चिमूट मीठ संपूर्ण अटलांटिक (उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक एकत्र) महासागरात मिळून विरघळणं.

१३ C सोल्यूशन म्हणजे एक छोटा थेंब पदार्थ पृथ्वीवरच्या सर्व, एकूणएक पाणीसाठ्यात विरघळणं.

या संपूर्ण विश्वात (सर्व माहीत असलेले ग्रह, तारे वगैरे मिळून) १०‍^८० (दहावर ऐंशी शून्ये) एवढे अणू आहेत. ४०C वालं होमिओपथिक सोल्यूशन म्हणजे एक रेणू सर्व विश्वाइतक्या पदार्थात मिसळणं.

४० C ची ही कथा. इथं तर २०० C वालं औषधही सामान्यपणे वापरलं जातं. आता २०० C म्हणजे किती विरळ, तर आपल्याला मूळ औषधाचा एक रेणू विरघळवण्यासाठी अजून नवी "दहावर तीनशे वीस शून्य" इतकी नवी विश्वं (संपूर्ण पाण्याची बनलेली) तयार करून आणावी लागतील.

मुळात १२C च्या डायल्यूशनपेक्षा जास्त डायल्यूशन केलं तर मूळ पदार्थ त्यात शिल्लक राहूच शकत नाही (एक रेणू देखील). कारण Avogadro's number ची लिमिट ओलांडली तर मूळ पदार्थ आपल्या गुणधर्मांसहित त्याहून अधिक डायल्यूट करताच येत नाही.

पुन्हा एक बिनतोड मुद्दा येतोच. इतक्या सूक्ष्म (शून्यच म्हणा ना) डायल्यूशननं जर रोगावर इफेक्ट होत असेल तर त्याहून कितीतरी जास्त प्रमाणात इतर पदार्थ पाण्यात आलरेडी असतात ना हो. कितीही शुद्ध केलं तरी. त्यांचा इफेक्ट नाही होत इतर प्रकारे?

होमिओपथी एक्स्पर्टसनी सुचवलेल्या केमिकल टेस्ट्स करूनही होमिओपथी द्रावण आणि शुद्ध पाणी यात फरक आढळलेला नाही.

होमिओपथीवाल्यांचं म्हणणं असं की तो पदार्थ जरी शिल्लक राहिला नाही तरी त्याचा स्पिरिच्युअल इफेक्ट पाण्यात उतरतो. हे निदान फिजिक्सच्या कसोटीवर अगदी निराधार आहे.

सर्वसाधारण होमिओपथीवर होणारा आणखी एक आरोप म्हणजे ते लसीकरण आणि antibiotic उपचारांपासून रोग्यांना दूर ठेवतात आणि वेळेत उपचार मिळायला उशीर करतात. रोगजंतूंमुळे रोग होतो ही सर्वमान्य थिअरी होमिओपथीच्या वेळी नसल्यामुळे त्यांची तत्वं वेगळीच आहेत.

एकूण काय तर ही औषधं श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात. अदरवाईज त्या खरंच साखरेच्या गोळ्या आहेत. त्यात मूळ पदार्थ नसतोच. भले मूळ तत्व आपल्याला मान्य का असेना.

होमिओपथीचे सर्व रिसर्च कोणत्या ना कोणत्या दोषानं व्याप्त आहेत असं नवीन मेडिकल सायन्सचं म्हणणं आहे. बर्‍याच देशांत होमिओपथी मोडीत काढण्यात आली आहे. होमिओपथीवाले समर्थक मुद्दे मांडून पटवून देण्यापेक्षा मुद्दे टाळून फक्त कोणाला या थेरपीचा कसा उपयोग झाला याची उदाहरणं देतात. मूळ मुद्दा शास्त्रीय आहे का याचं विवेचन फार थोडे करत असावेत.

इतपत शंका येण्यासाठी होमिओपथीचा Doctor असण्याची गरज नाही. त्या शंका दूर करणं मात्र होमिओपथी एक्स्पर्टसच्या हातात आहे.

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

10 Nov 2010 - 1:11 pm | रणजित चितळे

मी डॉक्टर नाही -

माझा अनुभव (चाळीशी उलटलेलं वय)
इंग्रजी औषधे जर ऑपरेशन ची पाळी आली तर (सिंम्टम दुर करतो)
आयुर्वेद जिवन प्रणाली - रोग होउ नयेत म्हणुन घेतलेली काळजी (जिवन पद्धतीत फरबदल करुन रोग होउच नयेत किंवा झाले तरी अतीरेक होऊ नये म्हणुन)
होमीयोपथी, बाराक्षार - काही रोग जसे माईग्रेन, अॅसीडीटी काही अगावर येणा-या मासाच्या गाठी वगैरे (मुळाशी जावुन सिंम्टम कशा मुळे येतो ते दुर करतो)

गवि's picture

10 Nov 2010 - 4:49 pm | गवि

अनुभवांचा आदरच आहे..

अनुभवांवर आधारित गोष्टी ब-याचदा विश्वासार्हच असतात. पण दुर्दैवाने मेडिकल सायन्सला तर्क आणि रिप्रोड्युसेबिलिटीच्या कसोटीवर घासून औषधं बनवावी लागतात.

मला फक्त मी उपस्थित केलेल्या क्वांटिटी (डायल्यूशन) विषयक शंकांचं उत्तर हवं.

बाकी "गुण" येतो किंवा नाही किंवा कशा प्रकारच्या आजारात येतो, हा वेगळा विषय.

आपण घेतो ते औषधच नाही, नुसती साखर आहे .हा मुद्दा..

मराठमोळा's picture

10 Nov 2010 - 1:21 pm | मराठमोळा

घाटपांडे काकांनी माझ्या डॉक्टर लेखात ही लिन्क दिली होती.

http://www.eanubhav.com/Dr%20Shantanu%20Abhyankar.htm

वाचा. :)

हो. छानच आहे लिहिलेलं. पूर्वी वाचलंय हे..

या पथीविषयी अधिक वाचन/ माहिती मिळवताना ते ही वाचलं होतं.

त्यांनी तर खूपच मुद्दे घेतले आहेत. आणि ती वैद्यकीय शाखा सोडली सुद्धा आहे..

मी फक्त एक मुद्द (डायल्युशनचा) घेतलाय्..त्यानंतरच मग इतर प्रश्न येतात..

याच लेव्हलला पटेना..मग काय करणार?

मी होमिओपथी कधी वापरलेले नाही. होमिओपथी व अ‍ॅलोपथी या विषयावरच्या चर्चा आधी वाचल्या आहेत. "ही औषधं (होमिओपथी) श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात" असे एक विधान त्यात नेहमी आढळते. खरे तर
१) होमिओपथी - तो पदार्थ जरी शिल्लक राहिला नाही तरी त्याचा स्पिरिच्युअल इफेक्ट पाण्यात उतरतो
२) अ‍ॅलोपथी - ही औषध श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात
ही दोन्ही विधाने मला टोकाची वाटतात.
दुसर्‍या विधानाबद्दल, एक उदाहरण बघु. एखाद्या माणसाने केस गळण्यावर होमिओपथी उपचार केले व केस गळणे थांबले तर श्रध्देमुळे केस गळायचे कसे काय थांबु शकतील बुआ?

- सूर्य.

गवि's picture

10 Nov 2010 - 4:59 pm | गवि

"अ‍ॅलोपथी - ही औषध श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात"

..हे कुठे वाचलं असावं असा विचार मी करतोय.

केस गळणेच नव्हे तर इतर अनेक रोगांची लक्षणं (जी पेशन्ट्ला जाणवतात..) प्लासेबो इफेक्टने कमी होतात.

प्लासेबो इफेक्ट इतका महत्वाचा आहे की मेडिकल स्टडीजमधे त्याचा अंतर्भाव असतो.

पण केवळ प्लासेबोने पूर्ण उपचारपद्धती उभी रहात नाही.

किरकोळ आजारात ठीक आहे.

सूर्य's picture

10 Nov 2010 - 6:42 pm | सूर्य

"अ‍ॅलोपथी - ही औषध श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात"

..हे कुठे वाचलं असावं असा विचार मी करतोय.

क्षमस्व, व्यवस्थित लिहीले नाही. माय बॅड ;)

१) होमिओपथीकडुन मुद्दा (असा मांडला जातो की) - तो पदार्थ जरी शिल्लक राहिला नाही तरी त्याचा स्पिरिच्युअल इफेक्ट पाण्यात उतरतो
२)अ‍ॅलोपथीकडुन मुद्दा (असा मांडला जातो की) - ही (होमिओपथी)औषध श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात

असे म्हणायचे होते.

बाकी होमिओपथी डॉक्टरकडे जायची वेळ आली नाही त्यामुळे गुण येतो की नाही हे माहीत नाही. पण प्लासिबो इफेक्ट एवढा जबरी असु शकतो यावर (न अनुभवल्यामुळे कदाचित) विश्वास बसत नाहीये.
तुम्ही दिलेली लिंक वाचतो.

- सूर्य.

स्पंदना's picture

10 Nov 2010 - 5:19 pm | स्पंदना

मला एक्झिमा होता. नेमका बोटांना. परदेशात येउन भांडी धुवावी लागली अन भरली बोट.

अ‍ॅलोपथी न मला स्टीरॉइड्स अन अँटीबायोटीक दिली. आई ग!! मग खुप दिवसांनी एक भंपक होमीओपथी भेटला . त्यान लुटल ! मग एक खरच चांगला होमिओपॅथ मिळाला अन जवळ जवळ दिड वर्षान माझी बोट परत पुर्ववत झाली.

सांगायचा उद्देश एकच माणुस पारखुन घ्या.

सर्वसाक्षी's picture

10 Nov 2010 - 8:36 pm | सर्वसाक्षी

कदाचित आपल्याही पाहण्यात हे आले असेल.
१) लहान मुलांना होणारी सर्दी, विशेषतः वारंवार होणारी सर्दी व त्यावर डॉक्टरांच्या औषधाचा म्हणावा असा 'दिर्घरुप' परिणाम न आलेले पालक मुलांना होमिओपथीवाल्या डॉक्टर कडे घेऊन जातात. होमिओपथीचे प्रेमी ठामपणाने सांगतात की सर्दीला फक्त होमिओपथी हाच मार्गे आहे, तिथे अ‍ॅलोपथीचा गुण येणे शक्य नाही. साधारणतः अर्धा पाऊणतास अपघाताच्या रुग्णाला इस्पितळात दाखल करायला गेलेल्या भल्या माणसास पोलिस देखिल विचारत नसतील असे प्रश्न व रुग्णाच्या पालकांकडुन त्याला उत्तरे असे पार पडल्यावर साखरेच्या गोळयांची बाटली दिली जाते. वर भरमसाठ पथ्थ्ये असतातच (व यातले एखादे जरी पथ्थ्य पाळले गेले नाही तरी गुण येणार बाही असे 'दायित्वमुक्तीदायक' असतेच)
असे अनेक महिने गेल्यावर पालकांना साक्षात्कार होतो की अरेच्चा! आपल्या शेंबड्या बाब्याला आता सर्दी होत नाही! सगळा गुण होमिओपथीचा असे गुणगान व प्रसार सुरु होतो व कधी एकदा सर्दट पोर दिसते व कधी एकदा मी त्याच्या पालकांना माझ्या होडॉ चा पत्ता देतो असे होते. यामध्ये दोन अत्यंत महत्वाच्या बाबी नजरेआड होत असतात. पहिले म्हणजे जेव्हा होमिओपथी इलाज सुरू असतो तेव्हा देखिल जर मुलाला सर्दी बरोबर सणकुन ताप आला तर त्यावर होमिओपथीकडे तात्काळ उतारा देणारा इलाज नसतो व तिथे अ‍ॅलोपथीचेच उपचार केले जातात. दुसरे असे की जसजसे मूल वयाने वाढते तसतशी त्याची रोगप्रतिकारक शक्तिही वाढते व साहजिकच सर्दीचा त्रास होत नाही. माझा मुलगा लहान असताना मीही एकदा एका नातेवाइकाच्या आग्रहास्तव होमिओपथी वाल्याकडे गेलो होतो मात्र लवकरच वरील गोष्टी लक्षात आल्याने मी गोड साबुदाण्यांना रामराम ठोकला. जेव्हा सर्दी होइल तेव्हा मुलाला अ‍ॅलोपथीचे उपचार केले. मुलगा मोठा झाला तसा हट्टीपणा घटला, आहार सुधारला व रोगपप्रतिकारक शक्ति वाढल्याने सर्दीही गायब झाली.

२) माझ्या पाहण्यात होमिओपथीचे गुण गाणारे पण तरीही वेळ आल्यावर अ‍ॅलोपथीचे इलाज घेणारे अनेक जण आहेत. एक होमिओपॅथी सोडता काहीही झाले तरी मी होमिओपॅथी खेरीज कसलेही औषधोपचार घेणार नाही असे ठोकुन सांगणारा व अर्थातच ते निष्ठेने आचरणारा माझ्या पाहण्यात नाही. 'माझ्या स्पाँडीलायटीसला होमिओपथीनेच आराम दिला' असे सांगणारे एकिकडे अस्थिरोगतज्ञाकडे उपचार घेत असल्याचे मी पाहिले आहे.
अर्थात हे केवळ माझे निरिक्षण व अनुभव.

प्रियाली's picture

10 Nov 2010 - 8:50 pm | प्रियाली

मी कधी वापरली नाही त्यामुळे विश्वास असण्याचा प्रश्न नाही पण अनेकांचे अनुभव वाचून होमिओपॅथीमध्ये तथ्य नसावे असेच वाटते.

मध्यंतरी डॉ. निकम (यांचे पुण्यात होमिओपॅथी हॉस्पिटल आहे) यांच्यावर एक मराठी चित्रपट निर्माण होत होता असे वाटते.

बाकी, उपक्रमावर या निमित्ताने बर्‍याच चर्चा झडल्या आहेत. त्यांचे दुवे

http://mr.upakram.org/node/2389
http://mr.upakram.org/node/2408
http://mr.upakram.org/node/2413

आंसमा शख्स's picture

5 Apr 2011 - 6:41 am | आंसमा शख्स

लोकसत्ता मध्ये आलेला http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=132302:2... हा लेख वाचला का? मुंबई आयआयटी ने व नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या डॉ. ल्यूक माँटेनर नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञाने काही प्रमाणात याला सिद्धता आनली असे म्हणतात.
आक्षेप म्हणाल तर युनानी पद्धतीवरही काही आक्षेप आहेत आणि तसेच आधुनिक वैद्यकावरही आहेत. प्रत्तेक माणूस वेगळा असतो ज्याला जे पसंद असते तेच उपचार घेतले पाहिजेत. मनाला आवडले नाही तर ते उपचारही कामाचे नसतात. सगळ्याच वैद्यकांकडे सगळे उपाय नाहीत हेच खरे आहे. शेवटी उपाय एकच असतो तो म्हणजे खुदाला शरण जाणे.

शेवटी उपाय एकच असतो तो म्हणजे खुदाला शरण जाणे.

म्हण्जे झालेल्या आजारावर उपचार नाही झाला किंवा उपचाराचा गुण नाही आला..
तर काय देवाचं नाव घेत वनवासात जायचं असं म्हंताय का तुम्ही...
त्याच्यावर दुसरीकडुन काही हालचाल होत असल्यास (उपचारांची शक्यता) किंवा करता आल्यास ते न करता शेवटच्या घटकेची वाट पाहायची अन आयुष्य कंठायचे का देवाचा धावा करत बसायचा...
म्हंजे सगळी शस्त्र टाकुन मृत्युची गळाभेट घेण्यास सज्ज व्हायचे का?

इच्छा तेथे मार्ग असे म्हटलेले आहे...
बाकी आपल्या मताला अशक्य अशी असहमती..

चिगो's picture

8 Apr 2011 - 3:26 pm | चिगो

शेवटी उपाय एकच असतो तो म्हणजे खुदाला शरण जाणे.

ह्यावरुन एक किस्सा आठवला..
एकदा एका गावात पुर येतो. पाणी कमी असतं, तेव्हा लोकांना बाहेर घेऊन जायला एक जीप येते. पण एक माणूस बसायला नकार देतो आणि म्हणतो, "नहीं, मेरा खुदा मुझे बचाएगा." जीप निघुन जाते. पाणी वाढल्यावर हा माणूस थोडा वर जाऊन बसतो. एक बोट लोकांना बाहेर घेऊन जायला येते. पण हा माणूस पुन्हा बोटीत बसायला नकार देतो आणि म्हणतो, "नहीं, मेरा खुदा मुझे बचाएगा." बोट निघुन जाते. शेवटी पाणी बरंच वाढल्यावर हा माणूस छतावर जाऊन बसतो. थोड्या वेळाने एक हेलिकॉप्टर येते आणि त्याच्याकडे शिडी फेकते. हा माणुस पुन्हा ओरडतो आणि म्हणतो, "नहीं, मेरा खुदाही मुझे बचायेगा." शेवटी हेलिकॉप्टरही निघुन जाते. हा माणुस पुरात बुडून मरतो..
मेल्यावर जेव्हा जन्नतमधे तो खुदासमोर जातो तेव्हा खुदाला विचारतो, "या खुदा, मुझे मौत क्युं आयी? मुझे तो यकीं था के तुम मुझे बचाओगे? फिर क्युं?" खुदा त्याला म्हणतो, "अरे कंबख्त, वो जीप, बोट और हेलिकॉप्टर किसने भेजा था, मुरख?"

तात्पर्य म्हंजे, ज्याचा त्याने बोध घ्यावा आणि चान्स वळखावा...

वपाडाव's picture

8 Apr 2011 - 5:56 pm | वपाडाव

यकदम शॉल्लेट उदाहरण...

पंगा's picture

6 Apr 2011 - 5:06 am | पंगा

- सर्वप्रथम, वरील लेखांत (आणि काही प्रतिसादांतसुद्धा) प्रचलित उपचारपद्धतीचा उल्लेख 'अ‍ॅलोपथी' असा करण्यात आल्याचे आढळले. हे त्या उपचारपद्धतीचे अधिकृत नाव नसून, 'ती दुसरी उपचारपद्धती' अशा कुत्सितार्थाने होमियोपथीच्या प्रवर्तकांनी असा उल्लेख करण्याची प्रथा सुरू केल्याचे कळते.

सर्वसाधारण होमिओपथीवर होणारा आणखी एक आरोप म्हणजे ते लसीकरण आणि antibiotic उपचारांपासून रोग्यांना दूर ठेवतात आणि वेळेत उपचार मिळायला उशीर करतात. रोगजंतूंमुळे रोग होतो ही सर्वमान्य थिअरी होमिओपथीच्या वेळी नसल्यामुळे त्यांची तत्वं वेगळीच आहेत.

- वस्तुतः, लसीकरणातसुद्धा ज्या रोगापासून प्रतिकारकशक्ती मिळवायची, त्याच रोगाचे सौम्य (म्हणजे दुर्बल केलेले किंवा मृत) रोगजंतू किंवा तद्जन्य पदार्थ शरीरात घुसडून, शरीराच्या रोगप्रतिबंधक संस्थेला (इम्यून सिस्टिमला) त्या प्रकारच्या रोगजंतूंचा मुकाबला करायला "तयार" केले जाते. हा प्रकार काहीसा "काट्याने काटा काढण्या"सारखाच असल्याने (फरक एवढाच, की लसीकरणात रोगाचा मारा होण्यापूर्वीच प्रतिबंधक म्हणून लस टोचली जाते.), होमियोपथीवाल्यांचा लसीकरणास विरोध असण्याचे कारण कळत नाही.

कदाचित, आपण म्हणता तसे, मुळात रोग हा रोगजंतूंमुळे होतो हेच मान्य नसल्यामुळे विरोध असू शकेलही.

होमिओपथीत असं मानलं जातं की जितके जास्त C, म्हणजे जितकी जास्त विरळता तितकी जास्त पोटेन्सी (प्रभावीपणा). हे तत्व आपल्याला माहीत असलेल्या "जास्त डोस-जास्त परिणाम" या तत्वाच्या विरोधात अहे.

(मुळात होमियोपथीचे "औषध" म्हणून वापरली जाणारी द्रव्ये खरोखर उपयुक्त असतात, असा दावा करू इच्छीत नाही, पण) "जितकी विरलता तितका प्रभाव" हे तत्त्व (तत्त्व म्हणून) वरकरणी वाटते तितकेही अतार्किक असावे असे वाटत नाही.

समांतर उदाहरण म्हणून लसीकरणाचे उदाहरण घेऊ. जर मुळात ज्या रोगापासून प्रतिकारकशक्ती मिळवायची आहे, त्या रोगाचे जंतूच जर शरीरात घुसडायचे असतील, तर ते विरल / सौम्य / कमी डोसमध्ये असण्याने काय परिणाम होईल, विरुद्ध संहत / सशक्त / अधिक डोसमध्ये असण्याने काय परिणाम होतील, याचा विचार करून पहावा. मला वाटते (चूभूद्याघ्या) की ते एका मर्यादेत विरल असलेलेच बरे, अन्यथा (संहती वाढल्यास) विरुद्धप्रभावी ठरेल.

त्यामुळे, यदाकदाचित जर एखादे द्रव्य हे एखाद्या रोगास उपाय म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास आलेले असेल (तसे आहेच असा दावा नाही), तर त्या द्रव्याच्या कमी संहतीने अधिक प्रभाव (जर निरीक्षिला गेला असेल तर - पुन्हा: तसा तो निरीक्षिला गेला आहे असा दावा नाही.) हा केवळ तर्कदृष्ट्या अशक्य असण्याचे कारण दिसत नाही.

अर्थात, समजा असे (काही मर्यादांत राहून) होतही असले, तरी या 'विरलता तितका प्रभाव' तत्त्वाचा अतिरेक केल्यास 'औषध घेतलेच नाही तर सर्वाधिक प्रभाव येईल' असाही तर्क बांधता येईल, जो अर्थातच विसंगत आहे.

(पुन्हा एकदा) यातून (१) होमियोपथी खरोखरच गुणकारी असते, किंवा (२) होमियोपथीत एखाद्या रोगावस्थेला "औषध" म्हणून जे द्रव्य वापरले जाते ते खरोखरच गुणकारी असते, किंवा (३) 'जितकी विरलता तितका प्रभाव' हे तत्त्व प्रयोगाने सिद्ध झालेले आहे (आणि म्हणून योग्य आहे), यांपैकी कोणताही दावा केलेला नाही, करायचाही नाही. केवळ, 'जितकी विरलता तितका प्रभाव' हे तत्त्व (काही मर्यादांत राहून) तर्कविसंगत असायलाच हवे असे नाही, एवढेच मांडायचे आहे. (प्रत्यक्षात असे द्रव्य उपयुक्त आहे की नाही, 'जितकी विरलता तितका प्रभाव' या तत्त्वाप्रमाणे त्या द्रव्याचा इष्ट प्रभाव होतो की नाही, होत असल्यास कोणत्या मर्यादांमध्ये होतो, या आणि अशा गोष्टी प्रयोगांनी आणि निरीक्षणांनी पडताळूनच ठरवाव्या लागतील. असे प्रयोग किंवा अशी निरीक्षणे झाली आहेत की नाही याबद्दल मला व्यक्तिशः काहीही कल्पना नाही.)

(अर्थात, आपण उद्धृत केलेले 'जास्त डोस - जास्त परिणाम' हे तत्त्वही प्रत्यक्षात तितकेसे बरोबर आहे - आणि अगदी प्रचलित वैद्यकशास्त्रातसुद्धा लागू आहे - असे वाटत नाही. 'जास्त डोस = जास्त परिणाम' असे कोणतेही समीकरण नसावे; अन्यथा 'ओवरडोसने मरणे' हा प्रकारच उद्भवता ना. त्यापेक्षा 'योग्य डोस = योग्य परिणाम' अशी सुधारणा सुचवू इच्छितो.)

आता हे अतिरिक्त डायल्यूशनच होमिओपथी विरुद्धचा मुख्य मुद्दा बनलं आहे.

कोणतेही तत्त्व (किंवा कोणतेही निरीक्षण) जर मर्यादेबाहेर ताणले (किंवा मर्यादेबाहेर एक्स्ट्रापोलेट केले) आणि तरीही लागू आहे की नाही हे न पडताळता तसेच वापरले तर निष्प्रभ ठरणारच (किंवा त्यातून काहीबाही निष्कर्ष येणारच).

वर म्हटल्याप्रमाणे, असा अतिरेक केल्यास 'औषध न घेणे हेच सर्वात प्रभावी औषध' असाही निष्कर्ष काढता येईल. मग मुळात होमियोपॅथकडे पैसे खर्च करायला तरी कशासाठी जा? त्याचा चरितार्थ चालावा म्हणून?

अर्थात (पुन्हा एकदा): कोणत्याही मर्यादांमध्ये होमियोपथीचे कोणतेही औषध प्रभावी असते किंवा नाही याबद्दल मला वैयक्तिक माहिती नाही, आणि तशा प्रकारचा कोणता दावाही केलेला नाही.

बाकी,

अलोपॅथी निदान प्रामाणिक असते, बॉक्सवर साईड इफेक्ट छापते आणि भन्नाट दावे करत नाही.

प्रचलित औषधपद्धती ही कायद्याने अधिक सुनियंत्रित आहे, एवढेच याबाबत म्हणता येईल. इतर उपचारपद्धतींवर सुयोग्य नियंत्रणे आल्यास भन्नाट दावे आपोआप बंद व्हावेत.

अर्थात, एका मर्यादेपलीकडे सर्वच गोष्टींवर नियंत्रणे आणणे हे बहुधा शक्यतेच्या आवाक्याबाहेरचे काम असावे.

(अवांतर: अमेरिकेतही प्रचलित उपचारपद्धती वगळता हे जे 'पर्यायी उपचारपद्धती' अधिक Health Supplements वगैरे जे प्रकार आहेत, ते बहुतांशी अन्न आणि औषध प्राधिकरणाच्या (Food and Drug Administration - FDA) कक्षेबाहेरचे (किंवा मर्यादित कक्षेत) आहेत. त्यांत भन्नाट दावे करायला भरपूर जागा आहे, नव्हे अनेकदा केले जाततही. असे सगळेच दावे तपासत बसणे FDAला अर्थातच शक्य नाही. तेव्हा अशा दाव्यांबरोबरच केवळ 'हे दावे FDAने तपासलेले नाहीत' अशा 'इशार्‍या'च्या वाक्यांसहित अशी उत्पादने अनेकदा कायदेशीरपणे विकली जातातही. घेणारे घेतात. शेवटी आपण काय विकत घेत आहोत हे पाहणे ही विकत घेणार्‍याची जबाबदारी.)

पंगाशेठ,पंगाशेठ अहो तेच म्हणतोय. काट्याने काटा तत्व चुकीचे नाहीच.उलट तेच तत्व पाहून होम्योपॅथीविषयी काही सीरियस वाचावे लिहावे इतपत आदर झाला होता.

जास्त डोस जास्त परिणामचा अर्थ सुपरिणाम असा नव्हता इथे.
एक चमचा झुरळाचे औषध=मळमळ
दोन चमचे=उलट्या
वीस चमचे=मृत्यू.
असं लॉजिक आहे.

आता मळमळण्यावर औषध म्हणून झुरळाचे विष वापरायचे(सूक्ष्म क्वांटिटीत) तर जितके विरळ कराल तितके ते अधिक लक्षण उत्पन्न करुन मूळ मळमळीला बाहेर काढेल,अतएव बरे करेल असं हो.पॅ. लॉजिक आहे.
हेही ठीक म्हणू.प्रस्थापित कल्पनेविरुद्ध आहे म्हणून नाकारायचे असे नव्हे.पण निदान एक रेणू तरी त्या द्रव्याचा शरीरात जावा.एकही रेणू शिल्लक नाही अशा विरळ द्रावाने सुरुवात करुन त्य पाण्यालाच अधिक पाण्यात मिसळून ताकद ऊर्फ़ पोटेन्सी वाढली अशी समजूत करुन घ्यायची आणि कन्वेन्शनल लसीकरण,ज्यात खरोखर अर्धमृत जंतूंची व्यवस्थित detectable quantity असते ते अव्हेरायचे?

ही विरलीकरणाची संज्ञाकशी आली ते सांगतो.
दॉ. हानेमान यांच्या काळात आजच्यासारखी दळणवळणाची साधने नव्हती. ते बाहेरगावच्या लोकांना तपासण्यासाठी घोड्यवरून प्रवास करायचे. त्यांच्या असे लक्षात आले की बाहेरगावच्या पेशंटचा सक्सेस रेट जवळच्या पेशंट्पेक्षा जास्त आहे. असे का होते याचा विचार करता त्यांना असे लक्षात आले की घोड्यावरून गेल्यामुळे ही औषधे हलतात, त्यामुळे त्यांच्या परिणामकारकतेमध्ये वाढ होते. म्हणून त्यावर प्रयोग करून त्यांनी हे पोटॅन्सीची संज्ञा काढली.

शिल्पा ब's picture

6 Apr 2011 - 10:56 am | शिल्पा ब

थोडक्यात कधी असल्या गोळ्या घ्यायची वेळ आलीच तर १२ C किंवा त्यापेक्षा कमी C वाल्या गोळ्या घ्याव्यात एवढे समजले.

तुम्हाला अगदी ठीक समजले. हेच म्हणत होतो.

तरीही..

बहुधा इतक्या कमी C वाल्या गोळ्या नसतातच ना.

कारण कमी C म्हणजे त्यांच्या दृष्टीने कमी पोटेन्सी (कमी गुणकारी शक्ती) ..म्हणून २०० वगैरे C वाल्या पोटंट गोळ्या देतात ना.

मग काय घेणार..?

असो..

आंसमा शख्स's picture

6 Apr 2011 - 11:14 am | आंसमा शख्स

लेखातील काही मजकूर असे म्हणतो '२००८ सालचे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या डॉ. ल्यूक माँटेनर नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञाने जुलै २०१०मध्ये असा शोध लावला की, एका द्रावणात जर कुठल्याही AIDS सारख्या एखाद्या आजाराचे विषाणू किंवा जिवाणूंचे DNA असतील तर ते द्रावण एक प्रकारच्या हलक्या फ्रीक्वेन्सीच्या विद्युत चुंबकीय लहरी त्या पाण्यात सोडते. या हलक्या फ्रीक्वेन्सीच्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे त्या द्रावणातील आजूबाजूच्या पाण्यातील अणुरेणूंची रचना एक प्रकारच्या ‘सूक्ष्मादिसूक्ष्म संरचनेत’ बदलते. (Nano Structures) या शास्त्रज्ञाने असेही संशोधन केले की, हे आजूबाजूचे उरलेले पाणीही मग अशाच प्रकारच्या हलक्या फ्रीक्वेन्सीच्या विद्युत चुंबकीय लहरी सोडते. यावरून त्यांनी असे अनुमान काढले की, एखादे द्रावण जर कितीही पाणी मिसळून अतिविरळ करण्यात आले की त्या द्रावणातील मूलभूत गोष्टींचे DNA जरी दिसू शकले नाहीत, तरीही हे पाणी त्या मूलभूत घटकांच्या सर्व गुणधर्माचे अस्तित्व स्मरणात ठेवून त्या प्रकारच्या हलक्या फ्रीक्वेन्सीच्या विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात दाखवू शकते.'

लेखात डॉ. ल्यूक माँटेनर यांनी केलेले विधान आहे,
'एखाद्या अतिविरळ द्रावणातील मूलभूत घटकांचे अस्तित्व जरी नाहीसे झाले, तरीही त्या एका ठराविक आकाराच्या सूक्ष्म संरचनेतून त्या पाण्यात स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवू शकतात आणि त्यांनी सोडलेल्या विद्युत चुंबकीय लहरींचा अभ्यास करून आपण ते सिद्ध करू शकतो.'

पुढे लेखातली वाक्ये अशी, 'ऑक्टोबर २०१०च्या सुमारास मुंबई आयआयटीच्या संशोधकांचा याच विषयावरचा आणखी एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला. डॉ. जयेश बेल्लारे आणि त्यांचे विद्यार्थी प्रशांत चिक्रमाने यांनी मुंबईच्या आयआयटीमध्ये संशोधन करून असेच काही निष्कर्ष काढले की, होमिओपॅथीच्या पोटेन्सी असलेल्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोड गोळ्यांमध्ये ते औषध ज्या मूलभूत घटकांपासून केलेले असते त्यांचा अतिसूक्ष्म अंश असतो आणि ते सिद्ध करता येऊ शकते.'

यावर कुणी काहे बोलले नाही. हे नवीन शोध आहेत असे दिसते.
शास्त्र्ज्ञाचे अनुमान म्हनते की एखादे द्रावण जर कितीही पाणी मिसळून अतिविरळ करण्यात आले की त्या द्रावणातील मूलभूत गोष्टींचे DNA जरी दिसू शकले नाहीत, तरीही हे पाणी त्या मूलभूत घटकांच्या सर्व गुणधर्माचे अस्तित्व स्मरणात ठेवून त्या प्रकारच्या हलक्या फ्रीक्वेन्सीच्या विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात दाखवू शकते. हे जर सिद्ध होत असेल तर यामुळे या औषधांवर असलेल्या आक्षेपांना धक्का बसतो. त्यामुळे तो लेख येथे दिला होता.

तुमचे बरोबर आहे. पण हा नवा शोध नव्हे. तुम्ही म्हटलेल्या याच त्या इफेक्टमुळे मूळ औषध शिल्लक नसतानाही त्याचे गुण पाण्यात शिल्लक राहतात असाच दावा होमिओपॅथीकडून केला जातो.

पण पाण्यात किंवा अल्कोहोलमधे अशी कोणतीही मेमरी धरुन ठेवली जात नाही असं सिद्ध झालं आहे.
जी काही सूक्ष्मातिसूक्ष्म वेव्हजमुळे रचना बदलत असेल तीही काही नॅनोसेकंदांपेक्षा जास्त टिकून राहू शकत नाही हे उलट सिद्ध झालं आहे.
आणि अशी मेमरी राहते आणि ती (घोस्ट औषध) रोगावर उलटा परिणाम करते असं मानणं म्हणजे थेट गूढतेवर विश्वास ठेवल्यासारखं आहे.

मग ठीक.. तसे तर चुंबकचिकित्सा, सुगंधचिकित्सा अशा थेरपीज आहेतच.

खडे / रत्ने अंगठीत / दंडावर घालून तीही अमुक फ्रीक्वेन्सीच्या एलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह्ज सोडतात आणि त्या मोजता येतात. त्याने एव्हिल, दुरित एनर्जी (अतएव नजर लागणे) वगैरेचा अवरोध होतो.

पॉझिटिव्ह एनर्जीने जीवनातल्या अडचणी दूर होतात, नोकरी लागते इ इ.

त्या लेव्हलला आले ना मग एकदम हे तर.

निदान असा इफेक्ट पाण्यात राहतो इतके तरी निर्विवाद सिद्ध होईपर्यंत हे प्रश्न शिल्लक राहतातच.

बाळ सप्रे's picture

8 Jul 2013 - 5:36 pm | बाळ सप्रे

हा लेख बर्‍याच वेळा वाचलाय. बर्‍याच काथ्याकूटात याचा संदर्भही तुम्ही दिलाय. "डायल्यूशन"संदर्भातील विचार तार्कीकदृष्ट्या पटणारेच आहेत. हा मुद्दा घेउन कुठल्याही काथ्याकूटात होमिओपथीवर तुटून पडाव इतका ताकदवान मुद्दा आहे हा.. पण एक शंका रहाते.
मूळ होमिओपथी औषधांत ( डायल्यूशनशिवाय) जर खरच औषधी गुणधर्म असतील आणि हाय पोटेन्सी डायल्युशन तर practically impossible आहे, तर त्यामुळेच बाजारात मिळणारी होमिओपथी औषधे गुणकारी असतील का? औषधनिर्माते 2C, 3C, 10C, 100C हे तत्व गुंडाळून ठेवुन (कारण ते अशक्यच आहे) मूळ औषध वापरून साबुदाण्यासारख्या साखरगोळ्या करत असतील तर औषधांचा गुण येइलच ना??

शक्य आहे. (म्हणजे मूळ औषध गुणकारी असेलच असे एक गृहीतक मी धरले आहे, त्याविषयी माहिती नसल्याने किंवा एक तात्विक शक्यता म्हणून).

पण मूळ होमिओपथीचे तत्व हे अधिक विरळता = जास्त पोटेन्सी असं असल्याने पोटेन्सी न वाढवता (!!) अतएव कॉन्सेंट्रेटेड औषध विकणारे निर्माते / डॉक्टर्स हे होमिओपथीच्या तत्वाने वागत आहेत असं म्हणता येणार नाही.

पण तरीही.. हो. तात्विक शक्यता तरी आहे, कारण बरावाईट कोणतातरी पदार्थ शरीरात जातो आहे. तेव्हा परिणाम होण्याची शक्यता उत्पन्न तरी होते.

बाळ सप्रे's picture

9 Jul 2013 - 9:45 am | बाळ सप्रे
lakhu risbud's picture

9 Jul 2013 - 1:20 pm | lakhu risbud

ओ त्ये लंटनच्ये डागदर नि म्हन्त्लय ना मंग खरा खोटा त्या पर्मेस्वराला ठौक.
तस्सबि लंटन च्या लोकांस्नी जर्मल च्या लोकांची काय बी गोस्ट खपत न्हायी.
त्यी "होमोपदी" जर्मलीचीच हाय न्हवं का?

नितिन थत्ते's picture

8 Jul 2013 - 8:50 pm | नितिन थत्ते

कमी प्रमाण जास्त परिणाम यावर एक ज्योक वाचला होता.

"पेशंट ओव्हरडोसने मेला कारण तो औषध घ्यायला विसरला"

असो मुळात "समान लक्षणे निर्माण करणारा पदार्थ खाल्ला की रोग नाहीसा होतो" या गृहीतकाला तरी काय आधार आहे?

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jul 2013 - 1:35 pm | प्रकाश घाटपांडे

औषधं जान्हवी तोयं नुसार फक्त श्रद्धेने वैद्याने दिलेले पाणी घेतले तरी ते औषध म्हणुन काम करते. होमिओपथीच्या काय गोष्टी करता भाउ? लाभार्थींच्या म्हणण्यानुसार गुण येतो आहे ना मग झाले तर! ते प्लासिबो फिसिबो असो नाहीतर काहीही असो. शेवटे बरे वाटल्याशी मतलब! जर कुणाला गुणच आला नसता तर होमिओपॅथी आपोआप कालबाह्य / निरोपयोगी झाली असती.