साखरगोळ्या..
लहानपणापासून इंजेक्शन हे सर्वात भयात्कारी औषध. आणि सर्वात टेन्शन फ्री औषध म्हणजे होमिओपथी. गोड गोड छोट्ट्याश्शा साखरगोळ्या.
होमिओपथी "Laws of similars" वर बनवलेली आहे. जशास तसे, किंवा काट्यानं काटा काढणं या तत्वावर. सगळ्यांना सहज समजेल अशा भाषेत सांगायचं तर (म्हणजे मला समजलंय त्या भाषेत..!!) रोगाची लक्षणं नीट पहायची आणि तीच लक्षणं शरीरात निर्माण करणारा पदार्थ अत्यंत डायल्य़ूट करून औषध म्हणून द्यायचा. त्या पदार्थामुळं मूळ रोगासारखीच लक्षणं शरीरात तयार होऊ पाहतील आणि मूळ रोग (लक्षणांचं कारण) शरीरातून बाहेर पडेल.
होमिओपथी ही थिअरी लक्षणं, रोगी व्यक्तीच्या सवयी, मानसिकता वगैरे या सर्वांत खूप डीटेलमधे जाणारी आहे. मध्यंतरी लान्सेट या मेडिकल जर्नलनं होमिओपथीवर मोठा रिपोर्ट छापला. नुसता लॉजिकली विचार करून सामान्य विवेक बुद्धीला ही "पथी" पटण्यासारखी नाही. निव्वळ श्रद्धेवरच सगळं अवलंबून आहे. त्याच्या सक्सेस स्टोरीज फक्त वैयक्तिक "गुण आल्याच्या" कथांच्या स्वरुपातच दिसतात. होमिओपथीला डावं ठरवून अलोपॅथी सर्वांग सुंदर आहे असंही म्हणण्याचा "कमर्शिअल" उद्देश नाही कारण मी दुरुनही वैद्यकीय व्यवसायात नाही. अलोपॅथी निदान प्रामाणिक असते, बॉक्सवर साईड इफेक्ट छापते आणि भन्नाट दावे करत नाही. पंतप्रधानांपासून ते (ग्यांरंटी देतो की) स्वतः कोणी आयुर्वेदाचार्य किंवा टी.व्ही वरचे योगाचार्य यांना जरा जरी "चिंताजनक" लक्षणं दिसायला लागली की आधी अलोपथी रुग्णालयाच्या आय सी यू मधे घातलं जातं. होमिओ आणि आयुर्वेद या निरोगी राहण्याच्या (प्रिव्हेंटिव्ह) शैली आहेत असंही म्हणतात. आणि तरीही होमिओपथी उपचारांपायी व्हॅक्सिन देण्यापासून परावृत्त करण्यात आलेले रुग्ण आहेत. हा एक धोकाच.
पण तो विषय इथे आणला की वेगळा वाद सुरु होईल. (अलो वि. होमिओ वि. आयु.)
ते कधीतरी नंतर.
इथे मी मुद्दाम एक विधान लिहितोयः
होमिओपथी औषधांच्या "औषधी गुणां"विषयी मी एक गृहितक धरतोय की ती "उपयुक्त" असतातच. (कारण मुळात तो तात्विक आणि फार पुढचा मुद्दा झाला..!)
"क्वालिटी" गृहित.. सध्या काथ्याकूट फक्त "क्वांटिटी "बद्दल... मुळात थोडं जरी तर्कट लढवायचं झालं तर हे खालचे मुद्दे "विश्वासाच्या" आड येतात:
होमिओपथी खरी, तर मग भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) चूक ठरते. लक्षणं निर्माण करणारी ही मूळ औषधं (पदार्थ) ही काहीवेळा पू, मृत पेशी, विष्ठा वगैरेपासूनही बनवली जातात. साधारणपणे हे विषारी पदार्थ असतात. (अलोपथीतही काही फार स्वच्छ शाकाहारी पदार्थ नसतात म्हणा..) प्रश्न तो नाही. प्रश्न असा की हे पदार्थ पाणी किंवा अल्कोहोलमधे अनेक अनेक अनेक वेळा विरळ (डायल्यूट) केले जातात. सिरीयल डायल्यूशन, म्हणजे शंभर भाग पाण्यात एक भाग मूळ पदार्थ मिसळून विशिष्ट (शास्त्रीय) पद्ध्तीनं ते मिश्रण हलवून हलवून ढवळायचं. मग परत त्यातला एक भाग घेऊन अजून शंभर भाग पाण्यात असाच डायल्यूट करायचा. असा शंभर शंभर पट विरळ विरळ द्राव बनवत जायचा. एकदा हा प्रकार झाला की १C नं औषधाची पोटेन्सी वाढली. २C म्हणजे एकदा शंभरपट डायल्यूशन आणि त्यातला एक भाग घेऊन परत शंभरपट डायल्यूशन.
होमिओपथीत असं मानलं जातं की जितके जास्त C, म्हणजे जितकी जास्त विरळता तितकी जास्त पोटेन्सी (प्रभावीपणा). हे तत्व आपल्याला माहीत असलेल्या "जास्त डोस-जास्त परिणाम" या तत्वाच्या विरोधात अहे.
३०C, २००C वगैरे अशी पोटेन्सी लिहितात. आता हे अतिरिक्त डायल्यूशनच होमिओपथी विरुद्धचा मुख्य मुद्दा बनलं आहे.
पदार्थाचा सर्व गुणधर्मांसहित सगळ्यात लहान करता येणारा कण म्हणजे एक रेणू (मोलेक्यूल).
सहज समजण्यासाठी ही पहा तुलना:
१२ C सोल्यूशन (डायल्यूशन) म्हणजे एक चिमूट मीठ संपूर्ण अटलांटिक (उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक एकत्र) महासागरात मिळून विरघळणं.
१३ C सोल्यूशन म्हणजे एक छोटा थेंब पदार्थ पृथ्वीवरच्या सर्व, एकूणएक पाणीसाठ्यात विरघळणं.
या संपूर्ण विश्वात (सर्व माहीत असलेले ग्रह, तारे वगैरे मिळून) १०^८० (दहावर ऐंशी शून्ये) एवढे अणू आहेत. ४०C वालं होमिओपथिक सोल्यूशन म्हणजे एक रेणू सर्व विश्वाइतक्या पदार्थात मिसळणं.
४० C ची ही कथा. इथं तर २०० C वालं औषधही सामान्यपणे वापरलं जातं. आता २०० C म्हणजे किती विरळ, तर आपल्याला मूळ औषधाचा एक रेणू विरघळवण्यासाठी अजून नवी "दहावर तीनशे वीस शून्य" इतकी नवी विश्वं (संपूर्ण पाण्याची बनलेली) तयार करून आणावी लागतील.
मुळात १२C च्या डायल्यूशनपेक्षा जास्त डायल्यूशन केलं तर मूळ पदार्थ त्यात शिल्लक राहूच शकत नाही (एक रेणू देखील). कारण Avogadro's number ची लिमिट ओलांडली तर मूळ पदार्थ आपल्या गुणधर्मांसहित त्याहून अधिक डायल्यूट करताच येत नाही.
पुन्हा एक बिनतोड मुद्दा येतोच. इतक्या सूक्ष्म (शून्यच म्हणा ना) डायल्यूशननं जर रोगावर इफेक्ट होत असेल तर त्याहून कितीतरी जास्त प्रमाणात इतर पदार्थ पाण्यात आलरेडी असतात ना हो. कितीही शुद्ध केलं तरी. त्यांचा इफेक्ट नाही होत इतर प्रकारे?
होमिओपथी एक्स्पर्टसनी सुचवलेल्या केमिकल टेस्ट्स करूनही होमिओपथी द्रावण आणि शुद्ध पाणी यात फरक आढळलेला नाही.
होमिओपथीवाल्यांचं म्हणणं असं की तो पदार्थ जरी शिल्लक राहिला नाही तरी त्याचा स्पिरिच्युअल इफेक्ट पाण्यात उतरतो. हे निदान फिजिक्सच्या कसोटीवर अगदी निराधार आहे.
सर्वसाधारण होमिओपथीवर होणारा आणखी एक आरोप म्हणजे ते लसीकरण आणि antibiotic उपचारांपासून रोग्यांना दूर ठेवतात आणि वेळेत उपचार मिळायला उशीर करतात. रोगजंतूंमुळे रोग होतो ही सर्वमान्य थिअरी होमिओपथीच्या वेळी नसल्यामुळे त्यांची तत्वं वेगळीच आहेत.
एकूण काय तर ही औषधं श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात. अदरवाईज त्या खरंच साखरेच्या गोळ्या आहेत. त्यात मूळ पदार्थ नसतोच. भले मूळ तत्व आपल्याला मान्य का असेना.
होमिओपथीचे सर्व रिसर्च कोणत्या ना कोणत्या दोषानं व्याप्त आहेत असं नवीन मेडिकल सायन्सचं म्हणणं आहे. बर्याच देशांत होमिओपथी मोडीत काढण्यात आली आहे. होमिओपथीवाले समर्थक मुद्दे मांडून पटवून देण्यापेक्षा मुद्दे टाळून फक्त कोणाला या थेरपीचा कसा उपयोग झाला याची उदाहरणं देतात. मूळ मुद्दा शास्त्रीय आहे का याचं विवेचन फार थोडे करत असावेत.
इतपत शंका येण्यासाठी होमिओपथीचा Doctor असण्याची गरज नाही. त्या शंका दूर करणं मात्र होमिओपथी एक्स्पर्टसच्या हातात आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी डॉक्टर नाही
अनुभवांचा आदरच आहे..
घाटपांडे काकांनी माझ्या
हो. छानच आहे लिहिलेलं.
मी होमिओपथी कधी वापरलेले
"अॅलोपथी - ही औषध
"अॅलोपथी - ही औषध
मी घेतल्या आहेत
दोन निरिक्षणे
होमिओपॅथी
नवीन
शेवटी उपाय एकच असतो तो म्हणजे
ह्यावरुन...
यकदम शॉल्लेट उदाहरण...
काही मुद्दे
पंगाशेठ,पंगाशेठ अहो तेच
ही विरलीकरणाची संज्ञाकशी आली
थोडक्यात कधी असल्या गोळ्या
तुम्हाला अगदी ठीक समजले. हेच
लेखाचा काही भाग
तुमचे बरोबर आहे. पण हा नवा
हा लेख बर्याच वेळा वाचलाय.
शक्य आहे. (म्हणजे मूळ औषध
होमिपेथिला म्हणे ब्रिटिशांनी जादुटोणा (विचक्राफ्ट) म्हटलयं.
हो खरय हे..http://www
लंटनच्ये डागदर
कमी प्रमाण जास्त परिणाम यावर
औषधं जान्हवी तोयं